महिला बचत गट

        

पूर्वी महिलांना चूल आणि मूल यामध्‍ये गुरफटून रहावे लागत असे. मात्रा आता महिला एकत्रित येऊन, बचत गटाची स्‍थापना करुन त्‍यामधून एखाद्या उद्योगाची उभारणी करून स्‍वयंरोजगाराची निर्मिती करीत आहेत. त्‍यातून स्‍वतः व कुटुंबाचे आर्थिक सशक्‍तीकरण होण्‍यास मदत मिळत आहे. त्‍यामुळे या माध्‍यमातून महिलांना रोजगाराच्‍या प्रवाहात आणून त्‍यांचे आर्थिक सशक्‍तीकरण व्‍हावे या उद्देशाने स्‍वयंसहाय्यता बचत गटाची निर्मिती करण्‍यात आलेली आहे.  
बचतगट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. आपल्या देशात बचतगट झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: ग्रामीण भारतात हे फार चांगले कार्य करते, अर्थव्यवस्था आणि समाज यावर चांगला परिणाम होत आहे. बचतगटाच्या मदतीने बऱ्याच गरीब स्त्रिया उपलब्ध स्थानिक स्त्रोतांसह, त्यांचे कौशल्य आणि ज्ञानाने स्वयंरोजगार निर्माण करून स्‍वावलंबी  झालेल्‍या आहेत. आजच्या दिवसाची बचत गट ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बचत गट केवळ महिला सबलीकरणच नव्हे तर महिलांच्या गुंतवणूकी, उत्पादन आणि विपणन प्रयत्नांच्या बाबतीतही आहे.
महिला सशक्तीकरण म्हणजे काय?                           
स्त्री सक्षमीकरण म्हणजे स्त्रीच्या अंगी निर्णय घेण्याची, निर्णय करण्याची, संघटित करण्याची, समता व मतप्रदर्शन करणे, कृतिशील कार्यक्रम घडवून आणणे, लोकसंपर्क, जनसंपर्क, संस्था संपर्क, आर्थिक व्यवहार इत्यादी करण्याची क्षमता व आवड निर्माण होणे त्यास महिला सशक्तीकरण म्हणतात.
महिला बचत गट म्हणजे काय?                             
एकाच वाडीवस्‍तीतील, एकाच सामाजिक, आर्थिक स्‍तरामधील, समविचारी, समान गरजा असणाऱ्या 10 ते 20 महिलांच्‍या संघटनेस महिला बचत गट असे म्‍हणतात.
A Self Help Group is a Voluntary Association of Homogeneous set of people, either working together or living in the neighborhood, engaged in similar of activity, working with or without registration for the common good of their members.” 
स्वप्न माझे इवलेसे, दोन्ही बाहूं सामावते,
देऊन उभारी आत्मीयतेला, दहाही दिशांत कीर्ती गाजवते,
मिळून साथ एकमेकांची, झेप माझी उभारते,
उद्योगसेतू बांधताना, बचत गटाची मैत्री माझी वाढवते!….
महिला आर्थिक सशक्तीकरणासाठी बचत गटाची गरज   
ग्रामीण भागातील महिलांचे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक व शैक्षणिक विकासाच्‍या दृष्‍टीने स्‍वयंसहाय्यता बचत गट महत्‍त्‍वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे महिलांचा सर्वांगीण विकास तसेच महिला आर्थिक सशक्तीकरण होण्यासाठी बचत गटाची नितांत गरज आहे. 
·        महिलांचे आर्थिक, सामाजिक व मानसिक सबलीकरण करणे.
·        महिलांचा कौटुंबिक दर्जा वाढविणे व दबावगट निर्माण करणे.
·        आर्थिकदृष्‍ट्या घटकांना सावकाराच्‍या पाशातून मुक्‍त करणे.
·        महिलांना संघटित करुन स्‍व अस्तित्‍वाची जाणीव करुन देणे.
·        महिलांमध्‍ये आत्‍म सम्‍मान व आदर निर्माण करणे.
·        महिलांना काटकसर, बचतीची सवय लावून त्‍यांच्‍यात नेतृत्‍व गुण विकसित करणे. 
·        ग्रामीण भागातील दुर्बल महिलांना बचतीस प्रवृत्त करणे.
·        स्‍वयंसहाय्यता गटामार्फत सामाजिक उपक्रम राबविणे.
·        महिलांच्‍या ज्ञान कक्षा रूंदावणे.
·        स्‍वयंरोजगार निर्मितीसाठी स्‍वयंसहाय्यता गटाद्वारे प्रशिक्षण देऊन उद्योजकता वाढविणे.
·        स्‍वयंसहाय्यता समुहाद्वारे वित्‍तीय संस्‍थांकडून पतविस्‍तार करुन पतशक्‍ती वृध्‍दींगत करकणे.
·        महिलांना एकमेकांशी मुक्‍त संवाद करण्‍यासाठी, विचारांची व अनुभवांची देवाण-घेवाण करण्‍यासाठी हक्‍काचे व्‍यासपीठ म्‍हणून स्‍वयंसहाय्यता गटाची आवश्‍यकता आहे.
·        स्‍वयंसहाय्यता गटाची स्‍वावलंबन, मानसिक व वैचारिक, आर्थिक उन्‍नतीचे आणि सामाजिक प्रगतीचे उत्तम माध्‍यम म्‍हणून आवश्‍यकता आहे.
·        स्‍वयंसहाय्यता गटामुळे सदस्‍य, पर्यायाने कुटुंब, गाव, राज्‍य व देशाचे उत्‍पन्‍न वाढवून सर्वांगीण विकास साध्‍य करणे.  
महिला बचत गटाची वैशिष्‍ट्ये
महिला आर्थिक सशक्तीकरणासाठी बचत गटाची गरज. कारण महिलांचा  विकास झाला तर सर्व कुटुंबाचा विकास होईल या उक्तीप्रमाणे महिलांना आर्थिक सक्षम करून त्यांना सशक्तीकरणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
1) सामाजिक वैशिष्‍ट्ये                             
महिला आर्थिक सक्षम व सशक्तीकरणासाठी महिला बचत गटाची गरज सर्वात जास्त ग्रामीण भागात आहे. कारण या ठिकाणी शाश्वत रोजगार करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नसते. त्यामुळे महिलांचा विकास होत नाही. कौटुंबिक दारिद्रय, शिक्षणाचा अभाव, धाडस नसणे, प्रशिक्षणाचा अभाव या सारख्या बाबीं समोर असल्यामुळे महिलांना सक्षम होता येत नाही.  
·        गटात सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाते. 
·        सर्व महिला समानता या तत्‍त्‍वाचे पालन करतात. 
·     सभासदांमध्‍ये आस्‍था, आदर व आपुलकी निर्माण होऊन एकात्‍मतेची भावना वाढीस लागते. 
·        स्‍वयंसहाय्यता गटामुळे महिलांची स्‍वशक्‍ती  व समूहशक्‍ती प्रबळ बनते. 
·        स्‍वयंसहाय्यता गटात निर्णय व कृती सामुदायिकरीत्‍या होत असते. 
·        महिलांना त्‍यांच्‍या कलागुणांना वाव देणारे हक्‍काचे असे व्‍यासपीठ आहे. 
·        सभासदांचा एकमेकांवरील विश्‍वास वृध्‍दींगत करुन एकजूट निर्माण करणे. 
·        समाज व देशामध्‍ये फार मोठे परिवर्तन होऊ शकते. 
·        स्‍वयंसहाय्यता गटामुळे नितीमूल्‍ये जोपासली जातात.
2) आर्थिक वैशिष्‍ट्ये
ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर खूपच कमी असल्यामुळे त्यांचा विकास झालेला नाही. अशा परिस्थितीत महिला आर्थिक सक्षम व सशक्तीकरणासाठी महिला बचत गटाची गरज असल्याचे जाणवते. बचत गटामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जाऊ शकतो. तसेच कुटुंबाला येणाऱ्या वेळोवळी अडीअडचणींचे निराकारण सुध्दा बचत गटातून करता येते. यातून महिला आर्थिक सशक्तीकरणासाठी बचत गट महत्त्वाची भूमिका बजावतो.
·        गटातील सभासद हे स्‍वेच्‍छेने सभासद झालेले असतात.
·        सभासद कमी उत्‍पन्‍न गटातील असल्‍यामुळे ते काटकसर करून बचत करतात. त्‍यामुळे सभासदांची काटकसर वृत्ती जोपासली जाते.
·        सभासद हे नियमित बचत, पतनिर्मिती व कर्ज व्‍यवहार यामुळे आर्थिक देवाण-घेवाणच्‍या बाबतीत सक्षम बनतात. 
·        महिला बचत गटांना जो लाभ होईल त्‍याचे सभासदांना समान वाटप केले जाते.
·        बचत गटाची नियमावली ही स्‍वनिर्मित व सुलभ असावी.
·        स्‍वयंसहाय्यता गटात सभासदांना व्‍यावसायिक प्रशिक्षण व त्‍यांचे सतत प्रबोधन केले जाते.
3) राजकीय वैशिष्‍ट्ये
महिलांना पूर्वी राजकारणात स्थान दिले जात नव्हते, परंतु भारतीय राज्यघटनेनुसार महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रात कामगिरी करता येत आहे.   
·    गटात लोकशाहीचे मूल्‍ये जपली जात असून गट सक्षम होतात.
·    प्रत्‍येक सभासदाला नेतृत्‍व करण्‍याची संधी मिळते. त्‍यामुळे सभासदांमध्‍ये नेतृत्‍व गुण विकसित होतात.
·    गटात सर्व समान असून राजकीय प्रभाव व धार्मिक दडपणास गट बळी पडत नाही.
·    स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकारणात महिलांचा सहभाग वाढत आहे.
4) व्यावसायिक वैशिष्‍ट्ये
स्‍वयंसहाय्यता बचत गटाची निर्मिती केल्यामुळे महिलांना एकत्रित येऊन स्वयंरोजगार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसायातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे. तसेच महिलांचे कुटुंबाला आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे आजची स्त्री ही व्यावसायिक बनत चाललेली आहे. तसेच पुरूषांच्या बरोबरीने ती सुद्धा उद्योग व व्यवसाय करू शकत हे सिद्ध होत आहे.
·        महिलांचे व्यावसायिक कौशल्य व धाडस वाढत आहे. 
·    महिलांना व्यवसाय व लघु उद्योग करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रशिक्षण दिले जाते.
·        गटांना कमी व्याजदरात राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो.
·   अल्पशा व्याजदरात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्राम उद्योगाकडून कर्ज सुलभपणे दिले जाते.
·        महिलांच्या उद्योग करण्याच्या क्षमतेनुसार नाबार्डकडून कर्ज उपलब्ध केले जाते.
·        उत्पादित मालाची शासकीय स्तरावरून विक्री केली जाते.
बचत गटाद्वारे करता येणारे उद्योग व व्यवसाय 
महिला आर्थिक सशक्तीकरणासाठी बचत गटाची गरज जास्त असल्यामुळे महिलांना उद्योग वा व्यवसाय करता यावे म्हणून शासनाने विविध योजना कार्यान्वित करून रोजगार उपलब्ध केला आहे.  
अ. व्यवसाय देणारे उद्योग
·        किराणा दुकान चालविणे
·        हॉटेल चालविणे
·        विमा सेवा केंद्र चालविणे
·        रसवंती गृह चालविणे
·        लाँड्री व्यवसाय
·        मोबाईल दुरूस्ती
·        शुश्रुषा सेवा
·        पाळणघर चालविणे
ब. शेतीपूरक व्‍यवसाय
·        कुक्कुटपालन
·        शेळी व मेंढीपालन  
·        दुग्धोत्पादन/ दुग्धजन्य पदार्थ
·        इमू पालन  
·        मशरुम शेती
·        रेशीम उद्योग
·        मत्स्यशेतीव्यवसाय
·        कृषि पर्यटन उद्योग
·        पशुखाद्य निर्मिती
·        गांडूळ खत प्रकल्प
·        पापड व लोणचे तयार करणे
·        मसाले तयार करणे
·        औषधी वनस्पती लागवड
·        फळ प्रक्रिया उद्योग  
·        बेकरी उद्योग
·        टोमॅटोन सोयास्वॉस बनविणे
·        वन उत्पादने जमा करणे
·        रोपवाटिका
·        फूलशेती
·        ग्रामीण माती परीक्षक
·        कंत्राटी शेती
·        कृषिसेवा केंद्र चालविणे
क. आधुनिक यंत्राद्वारे उद्योग
·        शेवया मशीन
·        मिनी दाळ मिल 
·        चटणी कांडप यंत्र           
·        बायो डि‍झेल प्रोसेसर
·        एक्‍सपिलर
·        खवा तयार करण्‍याची मशीन
·        पापड लाटण्‍याची मशीन
. इतर लघु उद्योग
·        सोंर्दर्यालंकार तयार करणे
·        मेणबत्ती तयार करणे
·        पेपर प्लेट तयार करणे
·        परफ्यूम तयार करणे
·        अगरबत्ती तयार करणे
·        लाकडी खेळणी तयार करणे
·        रेडिमेड गारमेंट तयार करणे
·        झाडू तयार करणे
·        फर्निचर तयार करणे
·        कोल्ड्रींक्स तयार करणे
शब्‍दांकन : किशोर ससाणे, लातूर

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading