सेंद्रिय शेती काळाची गरज

सेंद्रिय शेती काळाची गरज

 677 views

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

आजच्या बदलत्या शेती पद्धतीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत आहे.

आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांचा जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. विशेषतः यूरोप व संयुक्त राष्ट्रसंघातील देश हे सेंद्रिय शेतीविषयी अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. कारण तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची व सरकारी राज्यकर्त्यांची सेंद्रिय शेतीविषयी असलेली मानसिकता आदर्शवत आहे.

पर्यावरण व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण, प्रमाणीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याने सध्याच्या युगात सेंद्रिय शेती करणे नितांत गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षात रासायनिक कीटकनाशकांचा सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे  भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसू लागले आहेत. याचाच परिणाम नवीन आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला मित्रकीटक, परागीभवन करणाऱ्या मधमाशांची संख्यासुद्धा कमी होत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची बाब काही सर्वेक्षणांनंतर पुढे आली आहे.

या सर्व प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अवशेषमुक्त शेती करण्याचे आवाहन केले जात आहे. या बाबींचा आता शेतकऱ्यांना विश्वास पटल्‍याने ते देखील सेंद्रिय शेती करण्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

संपूर्ण जगभरातील आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती, सेंद्रिय दूध आदी खाद्य पदार्थांची दिवसेंदिवस विशेष मागणी वाढत आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके व अन्य औषधे यांचा अतिवापराने शेतमाल जरी दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानिकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे.

या रसायनांचा वापर शेतजमीन, पाणी, हवा व परिसर यांनाही खराब करतो. प्रदूषणांच्या या दोषांमुळे रसायनांचे उर्वरित अंश नसलेला शेतमाल व दूध वापरावे असा जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अन्न व कृषी संघटना (FAO) यांनी सुद्धा यात लक्ष घातले आहे. परंतु अजूनदेखील मानवी स्वास्थ्य व आरोग्यबाबतची जागरूकता म्हणावी इतकी झालेली दिसत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर सेंद्रिय उत्पादित मालास जो मोबदला (दर) मिळायला हवा आहे, तो मिळत नाही.

सेंद्रिय भाजीपाला व फळे रासायनिक मालाच्या तुलनेत कमी आकर्षक असल्याने सामान्य व मध्यम ग्राहकवर्ग रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या शेतीमालास अधिक पसंती देताना दिसतात. राज्यात सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना अद्यावत माहिती मिळत नाही, दर्जेदार, प्रमाणिक सेंद्रिय निविष्ठांची सर्वत्र उणिवा असून यात शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत आहे. अशा निविष्ठांच्या वापरामुळे शेतमालाचे उत्पादन आणि दर्जाही घटत आहे.

भारताला सेंद्रिय शेती क्षेत्रात मोठा वाव आहे, मात्र युरोप, अमेरिका, चीन आदी विकसित देशातून प्रचंड प्रमाणात सेंद्रिय मालास मागणी असली तरी तेथील सेंद्रिय मालाची प्रमाणीकरण तपासणी ही कडक आहे. सेंद्रिय पदार्थांचे परीक्षण करणे व त्‍यांना तसे प्रमाणपत्र मिळवून देणे, त्‍यांचे वर्गीकरण, निरीक्षण करणे याचेही काही कार्यपद्धती व मानके निश्चित केली आहेत. येथील वेगवेगळया प्रकारच्‍या हवामानामुळे सर्व प्रकारची सेंद्रिय उत्‍पादने घेता येणे शक्‍य आहे. तसेच पूर्वापर शेतीची पद्धत सेंद्रियच राहिली आहे. त्‍यामुळे घरगुती व निर्यात बाजारपेठेतून मोठया प्रमाणात फायदा घेता येईल.

सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्ये :

 • स्थानिक गोष्टींचा पुनर्वापर करण्यायोग्य वनस्पती व प्राण्याचे अवशेष पुनर्वापर.
 • मातीचाआरोग्यशास्त्र कायम ठेवण्यास मदत.
 • पिके आजूबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्या मधील पोषक तत्वांचा व सभोवतालच्या सेंद्रिय पदार्थाचा पुर्नवापर.
 • अवलंबून असणाऱ्या  ज‍वांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. 
 • पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
 • अन्नसुरक्षेची खातरी व जीवनमान उंचावण्यास मदत.
 • आर्थिक उत्पन्नात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
 • एकमेकांशी निगडित पद्धती.
 • जैवविविधता वापरून पीक पद्धतीचा अवलंब.
 • सकस व शाश्‍वत पीक उत्पादन.     

सेंद्रिय शेतीचे फायदे :

 • उत्पादन खर्चात घट करून शेती फायदेशीर करता येते.
 • जमिनीचा पोत सुधारून शाश्वत आणि सातत्यपूर्ण उत्पादन घेता येते.
 • जमीन, हवा आणि पाणी यांचे प्रदूषणाचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संतुलन राखता येते.
 • बियाणे,रसायनिक खते, कीटकनाशके, औषधे यांच्या वापरावर मर्यादा आणता येते.
 • गांडूळखत,जैविक कीड व रोग नियंत्रण इ. स्वस्त व सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक  साधन संपत्तीचा वापरावर भर देता येतो.
 • पिकाची फेरपालट करणे, उसाचे पाचट, कापसाच्या पऱ्हाट्या, धसकटे, तण, पाला-पाचोळा आणि शेणपासून शेतातच सेंद्रिय खत निर्मिती व वापर या बाबींवर लक्ष देता येते.
 • कीटकनाशके,रसायनमुक्त, शुद्ध आरोग्यदायी, टिकाऊ, शेतमालाची निर्मिती, पर्यायाने सुरक्षित व विषमुक्त अन्नाची निर्मिती करून मानवाच्या आरोग्याचे रक्षण करता येते.
 • सेंद्रिय मालासाठी देशांतर्गत आणि देशाबाहेर निर्यातीसाठी बाजारपेठा उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ करून शेती फायदेशीर करता येते.
Sp-concare-latur

वरील बाबींचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन, पृथ्वी तलावरील प्राणी व जीवसृष्टी संवर्धन, जमिनीचे स्वास्थ्य, शेतमाल विषमुक्त, फळे व भाजीपाला, मानवाचे आरोग्य इत्यादी घटकांवर सेंद्रिय शेती हाच एकमेव घटक आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन, अधिकाधिक सेंद्रिय उत्पादन घेऊन, देशाच्या व स्वत:च्या हितासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करून मानवाचे आरोग्य नैसर्गिक तत्त्वानुसार अबाधित ठेवणे आवश्यक आहे. 

संदर्भ ग्रंथसूची :

 • गुंजाळ संजय भा.,(2016) : सेंद्रिय शेती उत्‍पादन, प्रमाणीकरण, पणन, शासन आणि आपण, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे, पान क्र. 5-70
 • नाईकवाडी प्रशांत (2016) : सेंद्रिय शेती,सकाळ पेपर्स, पुणे प्रकाशन, पान क्र. 1-150
 • तानाजीराव विक्रम : सेंद्रिय शेती,अंजिक्‍यतारा पब्लिकेशन, पुणे, पान क्र. 5-46
 • कृषि दैनंदिनी (2016) : व. ना. म. कृ. वि.,परभणी, पान क्र. 45-59
 • अशोक किरनळ्ळी : बायोडायनॅमिक व सेंद्रिय शेती मार्गदर्शक पुस्तिका,पृ.3
 • कानवडे सतीश : सेंद्रिय शेती शाश्‍वत शेती,पृ.1-29
 • जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर : गांडूळ शेती,पृ.1-9
 • जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर : सेंद्रिय शेती प्रमाणिकरण,पृ. 38

सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयी सुधारित माहिती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत प्राप्त व्हावी, त्यांचे उत्पादन वाढावे, रसायन विरहित अन्‍न मानवजातीला मिळावे, तसेच सेंद्रिय उत्‍पादनाची मानवाच्‍या आरोग्‍यास नितांत गरज आहे यासाठी हा लेख प्रकाशित करण्यात येत आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या शेतातील सेंद्रिय उत्‍पादन दर्जेदार व विक्रमी घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल, अशी माझी खात्री आहे. 

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

3 thoughts on “सेंद्रिय शेती काळाची गरज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: