शेताचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असून यामध्ये जमीन, पाणी, हवामान, खते, पीक संरक्षण, आंतर मशागत आणि वापरण्यात येणारे बियाणे या बाबींचा मुख्यत्वेकरून समावेश होतो.
इतर घटकांच्या तुलनेत बियाण्यावर फारच कमी खर्च होतो. यासाठी वापरण्यात येणारे बियाणे शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे असल्याशिवाय खते, पाणी, आंतर मशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी शक्यतो बियाणे शुद्ध, दर्जेदार व बियाण्याची उगवण क्षमता 99 टक्के पर्यंत असावी लागते. त्यामुळे पीक उत्पादन चांगले होते व बियाण्याची गुणवत्ता चांगली राखली जाते. याच अनुषंगाने संत तुकाराम महाराज असे म्हणतात की, “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” याप्रमाणे बियाणे जर शुद्ध व दर्जेदार असेल तर त्यापासून उत्पादीत होणारे बियाणे हे आनुवंशिक व भौतिक शुद्धतेचा विचार करता उत्तम असतील.
बियाणे पेरणीसाठी वापरताना त्यांची उगवणक्षमता, अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता याबाबत काळजी घेणे आवश्यक असते. जर बियाण्याची उगवणक्षमता आणि शुद्धता न तपासता बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. काही शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मागील हंगामातील धान्य पेरणीसाठी वापरतात.
धान्य आणि बियाणे यातील मुख्य फरक म्हणजे बियाणे शुद्ध आणि उगवणक्षम असते तर धान्य म्हणून वापरलेले बियाणे उगवणक्षमता आणि शुद्ध असतेच असे नाही. म्हणून पेरणी करताना शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचेच बियाणे वापरले पाहिजे. तरच अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.
याच उद्देशाने शेतकरी बांधवांना बी व धान्यातील फरक समजावा, बियाण्याची अनुवंशिक शुद्धता, बियाणे गुणधर्म, बी उगवण क्षमता, बियाणे तपासणीच्या पद्धती, विविध पिकांसाठी बियाणे शास्त्रानुसार निर्धारित केलेले प्रमाणके व इतर आवश्यक बियाणे घटकांची माहिती सुलभ मिळावी म्हणून बियाणे उगवणक्षमता तपासणी पद्धती व प्रमाणके हा लेख शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेला आहे. सदर लेख बियाणे शुद्धधता व बियाण्याची उगवण क्षमता तपासणीसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल.
बियाण्याचे गुणधर्म
सुधारित व संकरित वाणांचे बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या, प्रक्रियेच्या, साठवणूकीच्या तसेच वितरणाच्या वेळी सर्व काळजी घेतली गेली पाहिजे. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे बियाणे पोहचू शकेल. यासाठी संकरीत तसेच सुधारित वाणंचे बीजोत्पादन कसे तयार केले जाते आणि ते तयार करताना घ्यावयाची काळजी या गोष्टींची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. बियाणे तयार / खरेदी करताना काही बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे.
सुधारित वाण हे नेहमीच्या प्रचलित वाणंपैकी जे वाण चांगले उत्पन्न देतात, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यामधुनच त्यांची निवड केली जाते. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना उगवणक्षमता तपासून घेणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शरीरशास्त्रीय, रासायनिक व बाह्य गुणधर्म हे एकसारखे असले पाहिजेत. ते पेरणीसाठी पुन्हा पुन्हा वापरले असता त्यांच्या गुणधर्मामध्ये कोणताही फरक येत नाही. उत्पादित धान्याची किंवा उत्पादनाची प्रत एकसारखी असल्यामुळे बाजारामध्ये त्यास भावसुद्धा चांगला मिळतो.
बीजोत्पादन करताना त्यांचे वितरण, परिक्षण, प्रक्रिया आणि प्रमाणीकरण या सर्वांसाठी जे नियम तयार केले आहेत ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्यांच्या निरनिराळ्या बाबींचे निरीक्षण करणे महत्वाचे आहे. यामध्ये बियाण्याची शुद्धता, तण बियांपासून मुक्तता, बियाण्यांची उगवणक्षमता, त्यांचा जोम, आकार, प्रत व शारिरीक शुद्धता या सर्व गोष्टी विचारात घेऊनच शास्त्रीयदृष्ट्या बीजोत्पादन केले पाहिजे. यासाठी प्रथम बियाण्याची प्रत तपासली पाहिजे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे देणे हा होय. बियाण्याची प्रत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये बियाणांची अनुवांशिक शुद्धता आणि बियाण्याचे आरोग्य या प्रमुख बाबींचा समावेश होतो.
अ) अनुवंशिक शुद्धता
नवीन वाण जेव्हा शेतकऱ्यांना उत्पादनासाठी प्रसारीत केले जातात तेव्हा त्या वाणाला विशेष असे गुणधर्म असतात. ज्यावरून त्या वाणाची ओळख पटविता येऊ शकते. अशा गुणधर्मावरूननच त्याची शुद्धता पडताळण्यास मदत होते. मूलभूत बियाणे अनुवंशिक दृष्ट्या 100 टक्के तर पायाभूत आणि प्रमाणित बियाणे 99.5 टक्के शुद्ध असणे आवश्यक असते. संकरीत बियाणे तयार करताना प्रत्येक पिकास परपरागीकरण होऊन भेसळ होऊ नये म्हणून योग्य ते विलगीकरण अंतर ठेवणे आवश्यक असते. तसेच त्यांच्या मधील इतर जातीची रोपे काढून टाकणे व पेरणीसाठी खात्रीलायक बियाणे वापरणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास बियाण्याची अनुवंशिक शुद्धता राखण्यास मदत होते.
ब) भौतिक शुद्धता
बियाण्याची भौतिक शुद्धता म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या इतर घटकांचे प्रमाण उदा. त्यातील काडीकचरा, बियाण्याची उगवणक्षमता, बियाण्याचा जोम, बियाण्याचे आरोग्य, बियाण्यातील भेसळ म्हणजेच भौतिक शुद्धता, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण, यांच्या परिक्षणावरून बियाणे पेरणीसाठी योग्य किंवा अयोग्य ते ठरवितात. बीज परिक्षणाचे प्रमुख, उद्देश म्हणजे, बियाण्याची पेरणीसाठी योग्यता पहाणे, बियाणे चांगले नसल्यास त्याची कारणे शोधणे, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पहाणे आणि साठवणूकीसाठी योग्य आहे किंवा नाही ते ठरविणे, बियाण्याची गुणवत्ता ठरविणे, खरेदी केलेले बियाणे खूणचिठ्ठीवरील माहितीप्रमाणे त्या प्रतीच्या गुणवत्तेस उतरते का ते तपासणे. अशाप्रकारच्या परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे पोहचविणे हा होय.
बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?
बियाण्याच्या एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतिकारात्मक नमुन्यातील कमीतकमी 400 बी तपासावे लागते. ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे. प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मीनेटर) हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक लागणारे तापमाण आणि आर्द्रता राखता येते. तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला टॉवेल पेपर असे म्हणतात, ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.
बी उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती
1) शोषकागदाच्या वरती (Top of Paper)
लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता याप्रकारे तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मीनेटरमध्ये) उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्याप्रकारे आर्द्रता (70 टक्के पेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास पुरेसे होते.
2) कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे (Between Paper)
उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदामध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावे. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) खालच्या 3 / 4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मीनेटरमध्ये ठेवतात. ओले कागद बोटाने दाबले असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.
3) वाळूमध्ये उगवणक्षमता पहाणे (Sand)
कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1 ते 2 सें. मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावे. बियाच्या आकारमानावर वाळूचा ओलेपण ठरवतात. अशा कुंड्या जर्मीनेटर मध्ये उगवणीसाठी ठेवतात. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा प्रमाणतच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण 8 ते 10 दिवसात बियाण्याची उगवण होते.
दुसऱ्या जातीचे अथवा पिकाचे बियाणे, तण बियाणे, फुटके बियाणे यांचे प्रमाण पाहिले जाते. ते जर प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त असेल तर ते बियाणे भौतिक दृष्ट्या शुद्ध नाही असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे त्या बियाण्याचे बाह्य गुणधर्मही शुद्धता (भौतिक) पाहताना पडताळले जातात. बियाण्याची शुद्धता टिकवण्यासाठी प्रक्रिया करताना फुटलेले किंवा कीड लागलेले बियाणे, रोगट बियाणे, प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यात काढून टाकणे आवश्यक असते. तसेच बियाणे साठवणूकीच्या वेळी त्यांचे कीड व रोग यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजणे आवश्यक आहे. त्याच बियाण्याची भौतिक शुद्धता टिकण्यास मदत होते.
उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण
1) साधारण किंवा चांगली रोपे (Normal Seedings)
उगवणक्षमता चाचणीत 8 ते 10 दिवसात बियाणे उगवते. ज्या रोपांची वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते. त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते. या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.
2) विकृत रोपे (Abnormal Seedlings)
दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्याच्या कोंब आणि मुळांना इजा पोहोचलेली असते. तसेच बियाणांशी निगडित असलेलल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.
3) कठीण बी (Hard Seed)
तिसरा प्रकार हा न उगवलेल्या बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर 8- 10 दिवसात अजिबात उगवत नाहीत. यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाही. यानांच कुचर किंवा कठीण बी म्हणतात. परंतु काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही (Dormant Seed) काही बी हे मृत (Dead Seed) पोकळ बियाणे, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच अशाप्रकारे उगवलेल्या बियाण्याची वर्गवारी करून सर्वसाधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. बीजोत्पादीत केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता या प्रमाणकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नामंजूर होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे. उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10 टक्केपर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा कमी 10 टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये. शेतकऱ्यांनी जे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे आहे अशा बियाणांचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जवळील बीज प्रयोगशाळा, कृषि महाविद्यालये, कृषि विद्यालये यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी किंवा घरच्याघरी ओल्या पोत्यामध्ये वाळू (बारीक रेती), शोष कागदामध्ये अशा प्रकारची उगवण परीक्षा घेऊन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पाहू शकतात. ज्या बियाण्याची उगवणक्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे असेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे एकरी अपेक्षित रोपांची संख्या राखण्यात मदत होते पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन फायदा होतो.
4) मृत बी :
काही बिया सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही, काही बिया मेलेल्या अवस्थेत असतात. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात. त्यामुळे असे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे नाही.
विविध पिकासाठी बियाणे उगवणक्षमता प्रमाणके
खालील तक्त्यामध्ये तृणधान्ये पिकांची कमीत कमी उगवण क्षमता, जास्तीत जास्त आर्द्रता, कडधान्ये पिकांची कमीत कमी उगवण क्षमता, जास्तीत जास्त आर्द्रता, तेलबिया पिकांची कमीत कमी उगवण क्षमता, जास्तीत जास्त आर्द्रता, तंतुमय पिकांची कमीत कमी उगवण क्षमता, जास्तीत जास्त आर्द्रता, चारा पिके, भाजीपाला पिकांची कमीत कमी उगवण क्षमता, जास्तीत जास्त आर्द्रता यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
तक्ता क्र. 1 विविध पिकांची न्यूनतम उगवणशक्ती व अधिकतम आर्द्रता यांची प्रमाणके
अ.क्र. | पिकाचे नाव | उगवण शक्ती कमीत कमी | आर्द्रता (टक्के) जास्तीत जास्त | |
साधी पिशवी | आर्द्रताविरोधक पिशवी | |||
1 | मका | |||
2 | एकरी संकर | 80 | 12 | 8 |
3 | संकरित | 90 | 12 | 8 |
4 | बाजरी | 75 | 12 | 8 |
5 | भात | 80 | 13 | 8 |
6 | ज्वारी | 75 | 12 | 8 |
7 | गहू | 85 | 12 | 8 |
1 | हरभरा | 85 | 9 | 8 |
2 | चवळी | 75 | 9 | 8 |
3 | कुळीथ | 80 | 9 | 7 |
4 | मूग | 75 | 9 | 8 |
5 | तूर | 75 | 9 | 8 |
6 | राजमा | 75 | 9 | 7 |
7 | उडीद | 75 | 9 | 8 |
1 | एरंडी | 70 | 8 | 5 |
2 | भुईमूग | 70 | 9 | 5 |
3 | खुरसणी | 80 | 8 | 5 |
4 | मोहरी | 85 | 9 | 5 |
5 | करडई | 80 | 8 | 7 |
6 | तीळ | 80 | 9 | 5 |
7 | सोयाबीन | 70 | 12 | 7 |
8 | सूर्यफूल | 70 | 9 | 7 |
1 | कापूस | 65 | 10 | 6 |
2 | ज्यूट | 80 | 9 | 7 |
1 | बरसीम | 80 | 10 | 7 |
2 | ओट | 85 | 12 | 8 |
3 | ज्वारी | 75 | 12 | 8 |
1 | वांगी | 70 | 8 | 6 |
2 | कोबी | 70 | 7 | 5 |
3 | मिरची | 60 | 8 | 6 |
4 | गाजर | 60 | 8 | 7 |
5 | फ्लॉवर | 65 | 7 | 5 |
6 | चवळी | 70 | 8 | 6 |
7 | कारले | 60 | 7 | 6 |
8 | दोडका | 60 | 7 | 6 |
9 | घोसळी | 60 | 7 | 6 |
10 | भोपळा | 60 | 7 | 6 |
11 | मेथी | 70 | 7 | 6 |
12 | भेंडी | 65 | 10 | 8 |
13 | कांदा | 70 | 8 | 6 |
14 | मुळा | 70 | 6 | 5 |
15 | टोमॅटो | 70 | 8 | 6 |
अशाप्रकारे चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी त्यांची भौतिक आणि अनुवंशिक शुद्धता उत्तम असावी लागते. यासाठी बीजोत्पादन, बी प्रक्रिया, बीज परीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण पॅकिंग आणि विक्री यामध्ये विशिष्ट प्रकारची योग्य ती दक्षता घ्यावी लागते.
तसेच बी व धान्यातील फरक समजावा, बियाण्याची अनुवंशिक शुद्धता, बियाणे गुणधर्म, बी उगवण क्षमता, बियाणे तपासणीच्या पद्धती, विविध पिकांसाठी बियाणे शास्त्रानुसार निर्धारित केलेले प्रमाणके व इतर आवश्यक बियाणे घटकांची माहिती शेतकऱ्यांना सुलभ मिळावी म्हणून बियाणे उगवणक्षमता तपासणी पद्धती व प्रमाणके हा लेख खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बियाणे बाबत जागृती होईल आणि बी व धान्य यांच्यातील फरक व गुणधर्म व शुद्धता समजण्यास मदत होईल. याकरिता सदर लेख बियाणे शुद्धधता व बियाण्याची उगवण क्षमता तपासणीसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल.
संदर्भ :
- बीजोत्पादन तंत्रज्ञान, पाठयपुस्तक क्र.-2, निम्नस्तर कृषि शिक्षण शाखा, म.फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
- जाधव भाग्यश्री भगवान (2018) : बीजोत्पादन तंत्रज्ञान, कृषि विज्ञान प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
- डॉ. विजय शेलार व इतर, बियाणे तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन,पुणे
- कृषि विद्यापीठातील मासिके, कृषि दैनंदिनी, शेतकरी पत्रिका व संकेतस्थळे
प्रा. गोविंद अंकुश, सहयोगी प्राध्यापक, अदित्य कृषि महाविद्यालय, बीड
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
Good
Good information