टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र

टोमॅटो हे महत्त्वाचे फळभाजीपाला पीक आहे. टोमॅटो पीक तिन्ही हंगामात चांगल्या प्रकारे घेता येते. देशातील तसेच राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधव टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून कधी कधी बाजारपेठेत टोमॅटोला भाव मिळत नाही, तर कधी कधीहवामान, कीड व रोगराईमुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होते.

यासाठी टोमॅटो शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते आणि टोमॅटो पिकाकडे पाहण्याचा दृष्टीकोनात बदल होतो. यामुळेच टोमॅटो उत्पादनाचे सुधारीत तंत्राची महाराष्ट्रातील तमाम टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जावे, त्यांचे उत्पादनात भर पडावी आणि शेतीचा दर्जा सुधारवा यासाठी हा उपयुक्त व महत्त्वपूर्ण लेख टोमॅटो उत्पादनासंदर्भात सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. 

हवामान :

टोमॅटो हे उष्‍ण कटिबंधातील फळपीक असून महाराष्‍ट्रात  याची लागवड तिन्ही हंगामात  केली जाते. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तापमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. सर्वसाधारण 130 ते 180 अंश सेल्सिअस या तापमानास टोमॅटो झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 180 ते 200 अंशसेल्सिअस दरम्यान राहिल्यास टोमॅटोची फळधारणा उत्तम होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिनरंगद्रव्य 260 ते  320 अंश सेल्सिअस तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या वाढीवर व फळधारणेवर होतो. सर्वसामान्य 200 ते 320अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्वच्छ सूर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते.  

जमीन :

टोमॅटोपिकासाठीमध्यम ते भारी, खोलीची पोयटयाची, भरपूर पाण्‍याचा निचरा होणारी सुपीक जमीन या पिकाला मानवते. परंतु पाणथळ, मुरमाड, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड करू नये. टोमॅटोच्या केशमुळ्या ह्या जमिनीच्या वरील 1 फुट थरात पसरत असल्याने हलक्या जमिनीत हे पीक घेतले जाते. हलक्या जमिनीत पाण्याचा निचरा होत असल्याने पिकांची वाढ चांगली होते व पीक लवकर तयार होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्यम प्रतिचा म्हणजे 6 ते 8 दरम्यान असावा. भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो. परंतु उत्पादन भरपूर निघते. पावसाळी टोमॅटो पिकासाठी काळीभोर जमीन टाळावी तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्या व उथळ जमिनीत घेऊ नये. क्षारयुक्त चोपण व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते. यामुळे अशा जमिनीत टोमॅटोची लागवड करू नये.

टोमॅटो सुधारित वाण :

टोमॅटोची लागवड आपल्या भागातील हवामान, हंगाम, लागवडीची पद्धती, ग्राहकांची आवड-निवड बाजारपेठेचे अंतर या सर्वांचा विचार करून टोमॅटोच्या वाणांची निवड करणे आवश्यक असते. भारतातील कृषि विद्यापीठांनी आणि कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेल्या, टोमॅटोच्या अधिक उत्पादन देणाऱ्या, कमी कालावधीत फळधारणा होणाऱ्या, रासायनिक खतांचा चांगला प्रतिसाद देणाऱ्या सुधारित जातींची माहिती खालील प्रमाणे :

1) पुसा रूबी

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली ही जात आहे. सर्व भारतातप्रसिद्ध आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीची असतात. झाडाची पाने आकाराने लहान असतात. या जातीची झाडे सहज ओळखता येतात. या जातीची फळे चपटी गोल असतात आणि फळावर 4 ते 5 कंगोरे असतात. फळामध्ये रस आणि बी भरपूर असून फळाची साल पातळ असते. फळांचा रंग आकर्षक लाल असतो. वाहतूक आणि साठवण क्षमता कमी असल्यामुळे ही जात लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त ठरत नाही. ही जात करपा, भुरी आणि स्पॉटेड विल्ट व्हायरस या रोगाना कमी प्रमाणात बळी पडते. याशिवाय ही जात इतर कोणत्याही जातीपेक्षा जास्त प्रमाणात पाण्याचा ताण सहन करून शकते. प्रत्येक झाडाला 25 ते 30 फळे लागतात. लवकर तयार होणाऱ्या वाणाची पश्चिम महाराष्ट्रात तिन्ही हंगामात लागवड करता येते. या जातीचे दर हेक्टरी उत्पादन 35-40 टन इतके मिळते. तसेच टोमॅटो रस आणि केचप तयार करण्यासाठी ही जात चांगली आहे.

2) पुसा अर्ली ड्वॉर्फ

भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली यांनी हा वाण विकसित केला आहे. या जातीची झाडे बुटकी 55-60 से.मी. उंचीची असतात. फळे मध्यम, आणि आकाराने चपटी गोल असतात. फळांवर चार ते पाच कंगोरे असतात. फळांचा रंग आकर्षक लाल असतो. प्रत्येक झाडावर 55 ते 60 फळे येतात. फळांची पहिली तोडणी रोपांच्या लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी सुरु होते. महाराष्ट्रात ही जात तिन्ही हंगामात घेता येते. या जातीचे प्रति हेक्टरी उत्पादन 10 ते 35 टन इतके आहे.

3) पुसा गौरव 

भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली यांनी ही जात विकसित केली आहे. पानांचा रंग फिकट हिरवा असून ती कंगुरेदार असतात. या जातीची फळे लंबगोल आकाराची असतात. पिकलेल्या फळांचा रंग पिवळा असतो. लांबच्या वाहतुकीसाठी आणि फळांवर प्रक्रिया करण्यासाठी ही जात उपयुक्त आहे. पुसा गौरव या जातीचे प्रति हेक्टरी उत्पादन 40 टन इतके येते.  

4) भाग्यश्री

ही जात खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी वापरता येते. या जातीच्या झाडांची फुले मध्यम ते मोठी असून देठाकडे फळ उभट आहे. फळाचे सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅम भरते. पिकलेली फळे गर्द लाल रंगाची असतात तर कच्ची फळे फिक्कट हिरवी असतात. फळांचा तोडा 60 दिवसांनी  सुरू होतो. फळामध्ये गराचे प्रमाण अधिक असून  बियांचे प्रमाण कमी असते. फळे गर्द लाल व अधिक गरांची असल्यामुळे केचप, सॉस इत्यादीसाठी चांगली आहेत. टोमॅटो मधील लायकोपीनया रंगद्रव्याचे प्रमाण या जातीच्या फळांमध्ये अधिक आहे. झाडांचे आयुष्यमान 155 दिवस असते. ही जात विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते. प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्न 65 टन आणि जास्तीत जास्त 87 टन उत्पादन मिळण्याची क्षमता या जातीमध्ये आहे.

5) धनश्री

ही जात तिन्ही हंगामात येणारी असून मध्यम वाढणारी, फळे मध्यम गोल आकाराची, नारंगी रंगाची,गराची असतात.या जातीचे सरासरी उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

6) वैशाली  

मध्यम वाढीची वैशाली ही जात फारच लोकप्रिय झाली आहे. खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी या जातींची शिफारस करण्यात आली आहे. ही जात मर रोगास बळी पडत नाही, परंतु स्पॉटेड विल्ट व्हायरस आणि इतर विषाणूजन्य रोगांना मोठया प्रमाणात बळी पडते. फळे आकाराने लंबगोल असून फळांचा रंग गर्द लाल असतो. या  जातीचे प्रति हेक्टरी उत्पादन 80-90 टन इतके येते.

7) फुले राजा

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेला वाण फुले राजा या जातीची फळे नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लिफकर्ल, व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. प्रति हेक्टरी 55 ते 60 टन उत्पादन मिळते.

8) राजश्री 

राजश्री ही संकरित जात असून या जातीची फळे गोल असून एका फळाचे सरासरी वजन 85 ग्रॅम भरते. फळे नारंगी रंगाची, लाल रंगाची असतात व या संकरित वाणाचे उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्टर मिळते. ही संकरित जात लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.

9) रूपाली

रूपाली या जातीच्या झाडांना भरपूर पाने असल्याने उन्हाळयात फळांना उन्हापासून चांगले संरक्षण मिळते. फळे आकाराने लंबगोल आणि 100 ग्रॅम वजनाची असतात. फळांचा गर घट्ट असून  रंग गर्द लाल असतो. ही जात चांगली आहे. दूरवरच्या वाहतुकीत या जातीची फळे चांगली राहतात. ही जात फळप्रक्रिया करण्यासाठी विशेषत: केचप आणि सॉस बनविण्यासाठी चांगली आहे. या जातीचे उत्पादन सरासरी हेक्टरी 80-90 टन मिळते.

10) रश्मी  

या जातीची फळे गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळांचे सरासरी वजन 80 ग्रॅम असते. फळांचा गर घट्ट असल्याने या फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे टिकाऊ पदार्थ बनविण्यासाठी तसेच वाहतूक आणि साठवणुकीसाठी ही जात चांगली आहे. उष्ण आणि कोरडया हवामानात या जातीचे उत्पादन चांगले येते. या जातीचे उत्पादन सरासरी हेक्टरी 70-80 टन येते.

11) वसुंधरा

हा संकरित वाण असून बुटक्या प्रकारचा आहे. हेक्टरी 50-55 टन उत्पादन मिळते. हा वाण करपा व स्पॉटेड विल्ट व्हायरस या रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. फळाचा आकार गोल व फळांचे सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅम असून रंग लाल भडक आहे.

पूर्व मशागत :

टोमॅटो लागवडीकरिता उपयोगात येणाऱ्या क्षेत्रातील तणे उपटून जमिनीची उभी-आडवी नांगरट करावी. जमिनीची ट्रॅक्‍टरद्वारे नांगरणी करताना जमिनीच्‍या पृष्‍ठ भागावर उघडे पडलेले तण आणि कीडी किंवा कोष यांचा वेचून नाश करावा. नंतर कुळवाची पाळी देऊन जमीन भुसभुशीत करावी. नांगरलेली जमीन सपाट करावी व जमिनीला गरजेनुसार थोडासा चढउतार द्यावा. पहिल्‍या पिकाच्‍या वेळी ज्‍या बाजूने पाटाने पाणी दिले होते. त्‍याच्‍या विरूद्ध बाजूला उतार द्यावा, म्‍हणजे आधीच्‍या पिकाच्‍या वेळी साठलेले क्षार धुवून जाण्‍यास मदत होईल. टोमॅटो पिकांसाठी पूर्वमशागत नांगरणी ट्रक्‍टरद्वारे,कुळवाच्‍या दोन ते तीन पाळ्या बैलाच्‍या साह्याने करून,शेणखत अथवा कंपोष्‍ट खतांचा अधिक वापर करून जमीन तयार करून घ्‍यावी. कारण टोमॅटोसाठी जमिनीतील उपलब्‍ध अन्‍न्‍द्रव्‍यांचा पुरवठा पिकांना समाधानकारक होण्‍यास मदत होते.          

टोमॅटो लागवड हंगाम :

महाराष्ट्रातील हवामानात टोमॅटोचे पीक जवळ-जवळ वर्षभर केव्हाही घेता येते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीन मुख्य हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली जाते ते पुढील प्रमाणे-

) खरीप हंगाम : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात टोमॅटो पिकाची लागवड खरीप हंगामात करतात. मे महिन्याच्या शेवटी बी पेरून रोपांची लागवड जून महिन्यात केली जाते. रोपांची लागवड केल्यानंतर दोन ते अडीज महिन्यांनी फळांची पहिली तोडणी सुरु होते. हंगाम चांगला राहिल्यास फळांची तोडणी ऑक्टोबरपर्यंत चालू राहते. कोकणात जोराचा पाऊस असल्यामुळे पावसाळ्यात टोमॅटोचे बी पेरणे, रानबांधणी आणि लागवड करणे ही कामे जवळ-जवळ अशक्य होतात.

) रब्बी हंगाम : टोमॅटोच्या रब्बी हंगामासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बी पेरून रोपांची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. टोमॅटो लागवडीचा हा कालावधी सर्वात योग्य असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागात टोमॅटोची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील कोरडे हवामान, कमी तापमान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे  झाडांची वाढ चांगली होते.   

) उन्हाळी हंगाम : उन्हाळी हंगामात बी डिसेंबर-जानेवारी महिन्याच्या दरम्यान बी पेरून रोपांचीलागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केली जाते. कारण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जेथे पाण्याची चांगली व्यवस्था आहे आणि दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जात नाही अशा भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड यशस्वी होऊ शकते. मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागात उन्हाळ्यात तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या वर जाते. अशा वेळी झाडांची वाढ खुंटते. तापमान जास्त वाढल्यास झाडांना फुले न लागणे, फुलांची आणि फळांची गळ होणे, फळांवर पांढरे चट्टे पडणे, फळांचे वजन कमी भरणे इत्यादी दोष निर्माण होतात. परंतु या वेळी बाजारात मालाची आवक कमी असल्यामुळे मार्च ते ऑगस्टपर्यंत टोमॅटोला भाव चांगला मिळतो. अशा वेळी लागवडीची वेळ थोडी मागे पुढे केली आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य जातीची निवड केली तर उन्हाळी हंगामातील टोमॅटोचे पीक फायदेशीर होऊ शकते.

लागवडीसाठी वाफे तयार करणे :

टोमॅटोची रोपे तयार करण्‍यासाठी गादीवाफे तयार करावे. जमिनीच्‍या सपाटीप्रमाणे वाफ्याची लांबी ठेवावी. साधारणता 3 मीटर लांब आणि 1.5/2 मीटर रूंद, जमिनीपासून 9 इंच उंच वाफा तयार करावा. त्‍यावर 20 किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, सुफला (20 : 20 : 0) 50 ग्रॅम, बोनमील 1 किलोग्रॅम व निंबोळी पेंड 2 किलोग्रॅम आणि फोरेट 10 जी टक्‍के 20 ग्रॅम प्रत्‍येक वाफ्यात वरच्‍या थरात मिसळून टाकावे. एक एकराच्‍या रोपासाठी 28 वाफे पुरेसे असतात.

टोमॅटोचे प्रक्रिया केलेले बियाणे 5X75 सेंमी अंतरावर 3 सेंमी खोलीवर एकक टोकून लावावे. आर्द्रतेत वाढ करण्‍याकरिता वाफ्यावर पाचट झाकावे किंवा 60 ते 80  टक्‍के नायलॉन जाडीचे पिंजरे झाकावे. वाफ्याला दररोज झारीने पाणी सोडावे. बियांची लागण झाल्‍यापासून बी रुजणे, अंकुरणे, मोड येणे व खरी पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना. 6 ते 7 दिवसात होते. बियांची उगवण झाल्‍यावर आर्द्रतेकरिता वापरलेली पाचट दररोज पंचवीस टक्‍क्‍यांनी कमी करावी. या क्रियेमुळे रोपांना कणखरपणा येत असतो. वाफ्यात उगवलेले तण हळूवारपणे उपटून काढावे व रोपांच्‍या दोन ओळीत अत्‍यल्‍प प्रमाणात संपूर्ण (19 : 19 : 19) खते पेरावे व आणि सिंचनाचे पाणी द्यावे.

रोपनिर्मितीसाठी प्रो ट्रे

प्रो ट्रे किंवा सीडलिंग ट्रे विशिष्ट प्रकारच्या प्‍लॅस्टिकपासून बनवितात. सर्वसाधारणपणे 104 कप असलेला व कपाची खोली चार ते पाच सें.मी. असलेला प्रो ट्रे वापरावा. एक प्रो ट्रे भरण्यासाठी सर्वसाधारणपणे एक किलो कोकोपिटची आवश्यकता असते. एक भाग कोकोपिट व एक भाग गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत मिसळून घ्यावे. तयार झालेले माध्यम निर्जंतुक करून घ्यावे.

मध्यम प्रो ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ओले करून घ्यावे व प्रो ट्रेमध्ये दाब देऊन भरावे. कपाच्या तोंडाशी थोडी जागा रिकामी ठेवावी व एक सें.मी. खोलीवर प्रत्येक कपात एक बी या प्रमाणे बी लावावे व कोकोपिट मिश्रणाने प्रो ट्रे पूर्णपणे भरून घ्यावा. बी लावलेले प्रो ट्रे एकावर एक दहा याप्रमाणे रचून गोणपाटाने झाकून ठेवावे. तीन दिवसांत बी उगवल्यानंतर प्रो ट्रे मोकळ्या जागेत सूर्यप्रकाशात पसरून ठेवावेत व झारीच्या साह्याने हलकसे पाणी द्यावे.

टोमॅटो लागवड पद्धती :

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे टोमॅटोची लागवड सरी-वरंब्यावर केली जाते. 90 से.मी. सऱ्या पाडून वरंब्याच्या बगलेत एका बाजूने 30 से.मी. अंतरावर रोपे लावतात. परंतु वाफ्याचा आकार आणि रोपामधील अंतर प्रामुख्याने लागवडीचा हंगाम, संकरित वाणाची उपयुक्तता, टोमॅटोच्या वाढीचा प्रकार, झाडांना वळण आणि आधार देण्याची आवश्यकता यावर अवलंबून असते.  

टोमॅटोच्‍या बुटक्या आणि कमी पसरणाऱ्या जातींची 60X 45 सें.मी. अंतरावर लागवड करावी. त्यासाठी 60 सें.मी. अंतरावर सऱ्या-वरंबे पाडून पाणी देण्याच्या उपलब्ध सोयीने 5 ते 6 मी. अंतरावर आडवे पाट घालून 4 ते 5 सऱ्यांचा वाफा तयार करावा आणि नंतर वरंब्याच्या बगलेत एका बाजूवर 45 सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.

टोमॅटोच्‍या बुटक्या जातींना आधार देण्याची आवश्यकता नसली तरी अशा जातींना आधार दिल्यास फळे जमिनीला टेकून खराब होत नाहीत. शिवाय उत्पादनात भरीव वाढ होते. झाडांना तारेचा आधार योग्य रितीने देता यावा तसेच पाणी देणे, औषध फवारणे आणि फळे काढणे ही कामे सोयीस्कर व्हावेत म्हणून वाफे बांधणीत थोडा फरक करावा लागतो.

बुटक्या जातीसाठी लागवडीचे अंतर 1 मी. X 30 सें.मी. तर उंची वाढणाऱ्या जातींसाठी 1 मी. X 45 सें.मी. ठेवावे. शेताच्या रूंदीशी समांतर 1 मी. अंतरावर 60 सें.मी. रूंदीच्या वाफ्यांमध्ये एक सरी मोकळी सोडून तिचा वापर वाफ्यांना पाणी देण्यासाठी करावा. बांधलेल्या वाफ्यात वरंब्याच्या एका बाजूवर जातीप्रमाणे 30 किंवा 45 सें.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप लावावे.

रोपांच्या रांगेवरून तार ताणून रोपांना आधार द्यावा. अशा पद्धतीमध्ये प्रत्येक सरीमध्ये शेताच्या एका कडेपासून ते दुसऱ्या कडेपर्यंत मोकळेपणाने फिरता येते. झाडे कितीही उंच वाढली तरी औषधांचा पंप पाठीवर घेऊन सहजपणे चालता येते. टोमॅटो फळांची काढणी आणि पाणी देणे सुलभ होते. जमिनीला फारसा उतार नसेल तर वाफे न बांधता प्रत्येक सरीत शेवटपर्यंत पाणी सोडावे.

रोपे 3 ते 4 आठवड्यानंतर साधारणत: 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवडीच्या वेळी रोपांना 4 ते 6 पाने आलेली असावीत आणि त्यांचे खोड मजबूत झालेले असावे. बऱ्याच वेळा जास्त वयाची आणि उंचीची रोपे त्यांचा शेंडा खुडूनच लावली जातात. शेंडे कापल्याने रोपांना जमिनीलगत बगलफुटी येतात. झाडे खुरटी आणि झुडूप वाढतात. म्हणून योग्य वयाची आणि उंचीची रोपे पुर्नलागवडीसाठी वापरावीत.

बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्यावर रोपांची सरी वरंब्यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्ध होतात. रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्याकाळी किंवा ऊनाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. टोमॅटोची लागवड करताना बियांची बीजप्रक्रियेसाठी थायरम किंवा ट्रायकोडर्मा आणि त्यानंतर अॅझोटोबॅक्‍टर  बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कूज हे रोग नियंत्रणात राहतात. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे.

रोपे उपटण्यापूर्वी  एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. जेणेकरून रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपटता येतील. रोपांची पुनर्लागवड नेहमी संध्याकाळी किंवा दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर करावी. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी वाफ्यांना पाणी द्यावे. रोपे लागवड करण्यापूर्वी औषधाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. त्यासाठी 10 लीटर पाण्यात 15 मि.ली. नुवाक्रॉन, 25 ग्रॅम डायथेन एम-45 आणि 25 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून द्रावण तयार करावे. लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी आंबवणी द्यावे आणि त्याच वेळी नांगे पडले असल्यास ते बांधून घ्यावेत.

टोमॅटोची पॉलिमल्चिंगवर लागवड

टोमॅटो ची लागवड पॉलिमल्चिंग करणे गरजेचे आहे. एका बंडलमध्ये 400 मीटर लांबीचा पॉलिथीनकागद बाजारात उपलब्ध असून वरील बाजूस चंदेरी व खालील बाजूस काळा रंग असलेला किंवा दोन्ही बाजूंस काळा रंग असलेला पॉलिथीन कागद वापरणे फायदेशीर दिसून आले. पाच फूट अंतरावर गादी वाफे काढल्यास एकरी सहा बंडल लागतात. केंद्राने विविध रंगांच्या पॉलिथिन पेपरच्या वापराचे प्रयोग केले. त्यात निळा-निळा, तांबडा-तांबडा, काळा-काळा या रंगांच्या पेपरमध्ये काळा-काळा व चंदेरी-काळा रंगांचे पेपर वापरणे फायदेशीर दिसून आले.

टोमॅटोला ठिबक सिंचनद्वारे पाणी व्यवस्थापन :

टोमॅटो हे पीक वेलवर्गीय असल्यामुळे ठिबक सिंचन या पद्धतीने पाणी दिल्यास पिकाला समाधानकारक पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची बचत करणारी आणि जास्त उत्पादन देणारी ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये नळीच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याजवळ पाणी आणले जाते. आणि ड्रीपरच्या साह्याने थेंब-थेंब पाणी थेट मुळांच्या जवळ सोडले  जाते. पाण्याची टाकी बांधून पाणी साठविले जाते आणि त्या पाण्याला दाब देऊन फिल्टरमधून गाळून  घेतले जाते. सुरूवातीला ही पद्धत खर्चाची असते. मात्र मोजके आणि गरजेप्रमाणे सिंचन करता येत असल्यामुळे पाण्याची मोठयाप्रमाणावर बचत होते आणि उपलब्ध पाण्यात अधिक सिंचन करता येते. तसेच अतिरिक्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे होणारे तोटेही टाळता येतात. टोमॅटोफळपिकांनाही पद्धत फारच उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येते.

ठिबक सिंचनाचे फायदे

  • पिकाची वाढ समाधानकारक होते व पाण्याची  50 ते 55 टक्‍के  बचत होते.
  • उत्पादनात मोठी वाढ होते, पिकाची गुणवत्ता व दर्जा राखण्यास मदत होते.
  • पिकांना खते योग्य ठिकाणी व मुळाजवळ प्राप्त होते.
  • श्रमाची आणि रासायनिक खताची बचत होते.
  • अनियमित आकार फील्ड सहज उपलब्ध आहेत, पुनर्प्रक्रिया केलेला नॉन-पाणी पिण्यायोग्य सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते.
  • जमिनीची धूप कमी आहे.
  • तणाची वाढ कमी होते त्‍यामुळे मजूरी खर्चात बचत होते. 

टोमॅटो खतव्यवस्थापन:

टोमॅटो पिकाचे चांगले उत्‍पादन मिळण्‍यासाठी झाडाच्‍या वाढीच्‍या अवस्‍थेनुसार योग्‍य ती खते फवारणी आवश्‍यक असते. यासाठी खते पाण्‍यात 100 टक्‍के विरघळणारी तसेच ती सोडियम व क्‍लोराईड या पिकास अत्‍यंत हानीकारक असलेल्‍या घटकांपासून मुक्‍त असावीत व खतांमध्‍ये असणारी सर्व अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध व चिलेटेड स्‍वरूपात असल्‍यामुळे पिकांकडून त्‍वरित शोषली जातात. या खतांच्‍या फवारणीमुळे फुलगळ थांबते व फळधारणा चांगली होते. तसेच फळांचे वजन, आकार व प्रत यात लक्षणीय वाढ होते व त्‍यामुळे नि‍र्यातक्षम दर्जा मिळतो व साठवणूकीमध्‍ये तसेच दूरच्‍या बाजारपेठेत माल पाठवितांना चांगल्‍या पद्धतीने टिकतो. खतांचे व्यवस्थापन हा यापैकी एक महत्वाचा पैलू आहेकारण कोणत्याही पिकाला जर योग्य खत योग्य प्रमाणात दिले गेले तर त्याचा फायदा निश्चितच दिसून येतो. टोमॅटो या पिकांसाठी खत व्यवस्थापन खालीलप्रमाणे करणे गरजेचे असते. 

  1. टोमॅटो हे पीक रासायनिक तसेच जैविक खतांना चांगला प्रतिसाद देते.
  2. लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 टन शेतामध्ये मिसळावे.
  3. रासायनिक खतांमध्ये सरळ जातीसाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 150 किलो पालाश.
  4. संकरित वाणासाठी 300:150:150 किलो नत्र: स्फुरद: पालाश प्रति हेक्टरी वापरावे.
  5. एकूण रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर वाफ्यात टाकावे तर उरलेल्या निम्म्या नत्राच्या 3 ते 4 समान मात्रा 20 दिवसाच्या अंतराने द्याव्यात.
  6. लागवडीच्या वेळी 20 ते 25 किलो फेरस सुल्फेट व झिंक सुल्फेट प्रति हेक्टर द्यावे.
  7. निंबोलीपेन्ड 8 ते 10 बॅग पर हेक्टर द्यावे.
  8. वरील सर्व खते म्हणजे NPK, सूक्ष्म अन्नद्रव्ये व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.

तक्‍ता क्र. 2 : टोमॅटोच्या संकरित जातीसाठी विविध खतांचे हेक्टरी प्रमाण

. क्र.खते देण्याचा  काळटोमॅटोच्या 1 हेक्टर क्षेत्रासाठी खताची मात्रा
नत्र(किलो)स्फुरद (किलो)पालाश(किलो)
1रोपांची लागवड करण्यापूर्वी608050
2लागवडीनंतर 10 दिवसांनी40025
3लागवडीनंतर 30 दिवसांनी40025
4लागवडीनंतर 50 दिवसांनी40025
5लागवडीनंतर 60 दिवसांनी40025

ठिबक सिंचन पद्धतीने खताचा वापर

ठिबक सिंचन पद्धतीने पाण्‍यात विरघळणारी खते व मुलद्रव्‍ये योग्‍य त्‍या प्रमाणात पाहिजे त्‍यावेळीपिकाच्‍या गरजेनुसार परिणामकारकरित्‍या देता येतात. पाण्‍याबरोबर खते व मुलद्रव्‍य देण्‍याच्‍या या प्रकारास फर्टीगेशन असे म्‍हणतात.

ठिबक सिंचनाने खते दिल्‍याचे फायदे

  • खताचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
  • खते देण्‍याचा मजूरी खर्चात बचत होते.
  • खताचा अपव्‍यय होत नाही व खताची बचत होते.
  • टोमॅटो मध्‍ये ठिबक सिंचनामुळे खते दिल्‍यास दर्जा व गुणवत्‍ता अधिक वाढून उत्‍पादनात भर पडते.
  • पिकांना गरजेनुसार व योग्‍य वेळी खताची मात्रा देण्‍यास  सुलभ होते. 

टोमॅटो झाडाला आधार देणे :

टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो. पहिला प्रकार म्हणजे प्रत्येक झाडाजवळ 1.5 ते 2 मीटर लांबीच्या आणि 2.5 सें.मी. जाडीच्या काठ्यारोवून झाड जसजसे वाढत जाईल तसतसे ते काठीला बांधत जावे. आधारासाठी बांबू, शेवरी, सुबाभूळ, वेडी बाभूळ किंवा कारवी तसेचलोखंडीएंग्‍लस व जी.आय. तारेचा वापर करावा. दुसऱ्याप्रकारात तारा आणि बांबू किंवा काठ्यांचावापर करून ताटी केली जाते आणि अशा ताटीच्या आधारे झाडे वाढविली जातात. प्रत्येक झाडाला बांबू किंवा काठ्यांचा आधार देण्यापेक्षा ताटी पद्धत अधिक फायदेशीर आहे. कारण ताटी पद्धतीमध्ये खर्चाची बचत होते, तसेच ताटी उभारण्यासाठी वापरलेल्या तारा आणि बांबू 3 ते 4 वेळा वापरता येतात. सरीच्या बाजूने प्रत्येक 10 फुट अंतरावर पहारीने दर घेऊन त्यात 1.5 ते 2 मीटर उंचीच्या आणि 2.5 सेंटीमीटर जाडीच्या काठ्याघट्ट बसवाव्यात. सरीच्या दोन्ही टोकांवर जाड लाकडी डांब बांधाच्या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्या समोर जमिनीत जाड खुंटी रोवून डांब खुंटाशीतारेच्या साहाय्याने ओढून बांधावेत. त्यानंतर 16 गेजची तार सरीच्या एका टोकाकडून बांधत जाऊन आणि प्रत्येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुसऱ्या टोकापर्यंत ओढून घ्यावी. अशाप्रकारे तारेचे एकावर एक, दोन ते तीन पदर ओढावेत. पहिली तार जमिनीपासून 45 सेंटीमीटर, दुसरी 90 सेंटीमीटर आणि तिसरी तार 120 सेंटीमीटर अंतरावर बांधावी.

टोमॅटो तणनियंत्रण :

टोमॅटो पिकातील नियमित खुरपणी करून बागेतील तण काढून टाकावेत. खुरपणी करताना टोमॅटोच्‍यामुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही. तण नियंत्रणासाठी आंतरमशागत करणे गरजेचे ठरते. तणांमध्ये काही तणे हंगामी म्हणजे त्या तणांचा कालावधी हा कमी असतो. काही वार्षिक व काही बहुवर्षीय (हरळी, लव्हाळा) अशा तणांचे नियंत्रण करणे कठीण जाते कारण या तणांचे बी वर्षानुवर्षे जमिनीत पडून राहतात त्यामुळे त्यांचा बदोबस्‍त करणे कठीण जाते. यासाठी वेळीच तणांचे नियंत्रण करावे.  

टोमॅटो प्रमुखकिडींचेनियंत्रण :

टोमॅटो पिकांतील किडींची ओळख, नुकसानीचे स्वरूप, किडींचा जीवनक्रम व महत्त्वाच्या अवस्था आणि व्यवस्थापन तंत्र या विषयी सविस्तर माहिती आवश्यक आहे. टोमॅटो पिकावर विशेषत: फुलकिडे, मावा, पांढरी माशी, कोळी व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रामुख्याने उपद्रव होत असतो. टोमॅटोवर अशा आढळणाऱ्या प्रमुख किडींची माहिती व नियंत्रणात्मक उपाय खालील प्रमाणे : 

1) फळ पोखरणारी अळी

ही कीड टोमॅटो, भेंडी, वाटाणा, हरभरा, तूर, कपाशी इत्यादी पिकांवर आढळून येते. या किडींची अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. पूर्ण वाढलेली अळी गर्द हिरव्या रंगाची असून तिच्या दोन्ही अंगास काळसर करड्या रंगाच्या रेषा असतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाते आणि नंतर फळे पोखरण्यास सुरुवात करते. या अळीमुळे टोमॅटोच्या फळांचे 40-50 टक्‍के नुकसान होऊ शकते. मादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते. नंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते. अळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळांत ठेवते. त्यमुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

उपाय : कीडगस्त फळे तोडून नष्ट करावीत. अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. फुले लागत असताना 15 मिलीमीटर किंवा 5 मिलीमीटर सायपरमेथ्रीन अथवा 4 मिलीमीटर फेनवलरेट 10 लीटर पाण्यात मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे. टोमॅटो पिकात नुकसान पातळीपर्यंत प्रादुर्भाव असल्‍यावर मॅलेथिऑन 35 टक्‍के प्रवाही 400 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्‍के मि. ली. एकरी फवारणी करावी. डायमेथोएट (30 टक्‍के प्रवाही) 16 मिलि, किंवा इमिडाक्लोप्रीड 3 मिलि, किंवा मिथाईल डेमेटॉन (25 टक्‍के प्रवाही) 15 मिलि. जैविक पद्धतींमध्ये ट्रायकोग्रामा व कॅम्पोलेरील क्लोरीडी हे परोपजीवी कीटक वापरून डेल्फिन किंवा डायपेल या बीटीयुक्त जीवाणूचे अथवा हेलीओकील हे जौविक औषध वापरून या किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते. या किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचाही वापर करता येतो. तसेच टोमॅटो पिकाशेजारी झेंडूची रोपे लावावी.

2) पाने खाणारी अळी

टोमॅटो पिकातील ही कीड आंतरराष्‍ट्रीय आहे. या किडीचा उद्रेक भाजीपाला पिकाशिवाय मादक वनस्‍पतीवर आढळतो. ही कीड भारतात टोमॅटो, कोबी, फुलकोबी, वांगी, वाटाणा व तंबाखू या पिकावर सर्रास प्रादुर्भाव आढळून येतो. या किडींचा पतंग बळकट, मध्‍यम आकाराची असते. अंदाजे त्‍याची लांबी 22 मि. मी. असते. पंखाचा रंग फिक्‍कट करडा व त्‍यावर नागमोडी, पांढऱ्या रेषा असतात व विस्‍तार 40 मि.मी. असते. या किडींची अळी गुळगुळीत शरीराची, हिरव्‍या किंवा पिवळ्या रंगाची असून, काळ्या खुणा असतात व छातीवर पट्टा असतो. प्रौढ अळीची लांबी 40 मि.मी. असते. रोपावस्‍थेतील पिकावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्‍यास, फार मोठे नुकसान करत असतात. या किडीची सुरुवातीची अवस्‍था समूहाने रात्री अधाशासारखी पिकांवर हल्‍ला चढविते व संपूर्ण पानांचा फडशा पाडतो.

उपाय : टोमॅटो पिकात अळीच्‍या सुरुवातीला कमी उपद्रव असताना, बी.टी. डेल्‍फीन जीवाणूंची फवारणी करावी. जैविक नियंत्रणास एनपीव्‍हीचा वापर करावा. अळ्या गोळा करून त्‍याचा नाश करावा. अंड्याचे पुजके असलेली पाने झाडापासून वेगळे करून अंड्याचा नाश करावा. फोरेट 10 टक्‍के प्रति एकरी 5 कि‍लोग्रॅम पेरून ओलीताचे पाणी घ्‍यावे. पीक काढणीनंतर लगेच जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्‍यामुळे कोष उघडे पडतात व उन्‍हामुळे ते मरतात. तसेच पक्षी वेचून खातात. किडींचा उपद्रव अधिक असल्यास पालीट्रीन सी 300 मि. ली. एकरी फवारावे. या किडीचे प्रभावी नियंत्रण करावे.

3) नागअळी

अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही.या अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.

उपाय : ‘बॅसिलस थुरीन्जिएन्सीस’ प्रतिहेक्टरी 25 किलो किंवा अॅझाडीरेक्टीन (1 टक्‍के) 25 मि. लि. किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मि.लि.टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.  फिप्रोनील 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.सूत्रकृमींचा उपद्रव कमी होण्यासाठी टोमॅटोच्या पिकाभोवती झेंडू, सदाफुली यासारख्या फुलांची लागवड करावी.

4)  पांढरी माशी

ही कीड टोमॅटो, वांगी, भेंडी आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर आढळून येते. ही कीड आकाराने लहान आणि रंगाने पांढरी असते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पानांतील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडतात. प्रौढ कीटक त्यांच्या शरीरातून चिकट पांढरा द्रव बाहेर टाकतात. हा द्रव टोमॅटोच्या पानांवर जमा होतो. त्यामुळे पानांवर काळी बुरशी येते. काळ्या बुरशीमुळे पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. तसेच ही कीड लीफ कर्ल नावाच्या विषाणू रोगाचा प्रसार करते. 

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी फॉस्फॅमिडॉन कीटकनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या फरकाने फवारणी करावी. यासाठी 10 ल‍िटरपाण्यात 10 मिली. ल‍िटरफॉस्फॅमिडॉन मिळसून फवारणी करावी. या फुलकिडीसाठी औषध मारत असताना पांढऱ्या माशीचा आपोआपच बंदोबस्त होईल. याशिवाय टोमॅटोवरील लीफ मायनरचाही बंदोबस्त या कीटकनाशकांमुळे होतो.

5) मावा

टोमॅटो पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात आढळतो. मावा किटकांच्‍या काही प्रजाती विषाणू रोगाचा प्रसार करतात. मावा कीटकाचे शरीर मऊ व लांबोळा फुगीर आकारासारखा असतो. त्‍याला दोन अॅंटेना व दोन संयुक्‍त डोळे असतात. पंखांचे व विना पंखाचे मावा आढळत असतात. मावा किडीमध्‍ये विना पंखांच्‍या मावांची संख्‍या पंखांच्‍या मावांपेक्षा अधिक असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्‍थलांतरीत होताना विना पंखी माव्‍याला पंख फुटत असतात. मावा किडीला दोन उभे पंख असतात व बाजूला चिकट द्रव टाकण्‍याकरिता दोन नळ्या असतात. त्‍यामुळे मावा स्‍वत:चे शत्रू किटकापासून संरक्षण करीत असते. 

उपाय : मावा किडीच्‍या नियंत्रणाकरिता मिथाईल डिमॅटोन 350 मि. ली. ची एकरी फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास इतर औषधांची फवारणी करावी.  

6) फुलकिडे

या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात आणि विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय उपलब्ध नाही. या किडीची प्रादुर्भाव टोमॅटो, भेंडी, कांदा, वाटाणा, लसूण, मिरची आणि वांगी इ. भाजीपाला पिकांवर दिसून येतो. ही कीड अतिशय लहान आणि नाजूक असते. पूर्णावस्थेतील फुलकिडे सुमारे 1 मि.ली. लीटर लांबीचे असतात. रंग फिकट पिवळसर किंवा काळसर असतो. फुलकिड्यांची पिले पंखविरहित असतात.  

उपाय : टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड,थायामेथोक्झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत, त्यानंतर लागवड करावी.रोपवाटिकेत थायमेटसारख्या दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा. रोपांच्या लागवडीनंतर शेतात आंतरप्रवाही दाणेदार कीटनाशक वापरावे. लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांपासून दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 20 मिलि.  20 मि. ली. फॉस्फॅमिडॉन 10‍ लि. पाण्यात मिळसून फवारणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव प्रथम पानांवर दिसताच, निंबोळी अर्क पाच टक्‍के किंवा निंबोळी तेल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

7) सूत्रकृमी

या किडीमुळे टोमॅटोच्या झाडाच्या मुळांवर गाठी तयार होतात. सूत्रकृमी मुळातील पेशींमध्ये शिरून अंडी घालतात आणि त्यामुळे झाडाच्या मुळांवर गाठी तयार होऊन मुळांची पाणी आणि अन्न शोषून घेण्याची क्रिया स्थगित होते. मुळांवर गाठी आल्यामुळे झाड हळूहळू सुकू लागते आणि वाळून जाते. झाड उपटून पाहिल्यावर त्याच्या मुळावर गाठी आलेल्या दिसतात. सूत्रकृमींमुळे केव्हा केव्हा संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते. कांदा, लसूण ही भाजीपाला पिके सोडल्यास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सर्व भाजीपाला पिकांवर होतो. याशिवाय सूत्रकृमी अनेक प्रकारच्या गवताच्या मुळांवरही जिवंत राहतात आणि त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे कठीण जाते.

उपाय : पिकांची चांगली फेरपालट करणे. सूत्रकृमी प्रतिबंधात्मक जातींचा लागवड करणे. सिलेक्शन 120, व्ही.एफ.एन. 6, पंजाब केसरी या जातींची लागवड करणे. जमिनीत झेंडू पीक घ्यावे. जेणेकरून किडींचा उपद्रव पिकावर होणार नाही. प्रति हेक्टरी 10 किलो फोरेट, 33 किलो फ्युराडान किंवा अल्डीकार्ब हे दाणेदार कीटकनाशक रोपांच्या लागवडीनंतर वापरावे.

टोमॅटो प्रमुख रोगांचे नियंत्रण

या टोमॅटो पिकावरील विविध रोग आढळून येतात जसे की, टोमॅटो मर रोग, व्‍हर्टिसिलीयम मर रोग,रोपाचा मर रोग, मूळ कुजव्‍या रोग, कोनीय मूळ कुज रोग, खोड कूज रोग, करपा, भुरी, रोपे कोलमडणे हे बुरशीजन्‍य रोग, बॅक्‍टेरियल विल्‍ट, बॅक्‍टेरियल कॅंकर, बॅक्‍टेरियल स्‍पॉट हे जीवाणजून्‍य रोग तर स्‍पॉटेड विल्‍ट व्‍हायरस आणि लीफ कर्ल हे विषाणूजन्‍य रोग प्रमुख आढळून येतात. याचे वेळीच नियंत्रण करावे लागते. अन्यथा टोमॅटो उत्पादनात घट येते. 

1) मर रोग

टोमॅटो मर रोग ‘फ्युजारियम ऑक्‍सीस्‍पोरम उडम’ या रोगकारक बुरशीमुळे होतो. हा टोमॅटो पिकातील अति महत्‍त्‍वाचा बुरशीजन्‍य रोग आहे. 1952 साली आयर्लंडमध्‍ये या बुरशीजन्‍य रोगांची नोंद झाली. 18.3 सेल्सिअस पेक्षा जास्‍त आणि 37.7 सेल्सिअसच्‍या खाली तापमानात या बुरशीजन्‍य रोगाची लागण होत असते. या बुरशीचे बिजाणू गवतावर किंवा आश्रय वनस्‍पतीच्‍या अवयवावर सुप्‍तावस्‍थेत असतात. टोमॅटो पिकात रोप अवस्‍थेत या रोगाचा उद्रेक होतो. मोठी टोमॅटो झाडेसुद्धा बळी पडतात. या बुरशीजन्‍य रोगाच्‍या उद्रेकामुळे झाड हळूहळू किंवा एकदम पिवळे दिसते. पिवळी पाने सुकून गळून पडतात आणि फांद्या व पूर्ण झाड सुकते. 

उपाय : टोमॅटो पिकांचे ओलीताचे पाणी कमी करावे. रोगग्रस्‍त टोमॅटोच्‍या झाडाच्‍या मुळांच्‍या उत्‍तम वाढी व विस्‍ताराकरिता रेणू-बी ची लागवडीपासून 10 आणि 35 व्‍या दिवसांनी फवारणी करावी. तसेच जमिनीत प्रति हेक्‍टरी 25 किलोग्रॅम फुरादान वापरावे किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशी नियंत्रकांची बीजप्रक्रिया करावी.

 2)  व्‍हर्टिसिलियम मर

टोमॅटो पिकात हा रोग ‘व्‍हर्टिसिलियम एलब्रोएट्रम स्‍प्रे व्‍हॉलीडाटली’ बुरशीमुळे होतो. या बुरशीच्‍या लागणीची लक्षणे फुलांच्‍या अवस्‍थेपासून दिसून येतात. या रोगाची तीव्रता पर्यावरणीय कारणापेक्षा अधिक असते. या बुरशीचा प्रसार जमिनीतून मुळाच्‍या उपीत्‍वामधून होतो. मुळामधून बुरशीचा प्रसार खोडात होतो. जुनी पाने हळूहळू पिवळी होतात व रोगग्रस्‍त झाडात अनियमित आढळतो. टोमॅटो झाड अशक्‍त, खुंटीत आणि नंतर वाळतात.

उपाय : आशादायक परिणामाकरिता टोमॅटो, मिरची व वांगी यात लागवड करताना दोन पिकांत पिकांच्‍या फेरपालटीकरिता दुसऱ्या कुळातील पिकांची लागवड करावी व जमीन निर्जंतुक करावी. याकरिता बेनोमील 1 ग्रॅम /चौ. मी. क्षेत्रास वापरावे. ही मात्रा रोपांचे स्‍थानांतरण करताना 40 व 70 दिवशी घ्‍यावी आणि रोपांचे स्‍थानांतरणापूर्वी रोपांची मुळे कॅप्‍टानच्‍या किंवा ट्रायकोडर्माच्‍या द्रावणात बुडवून लागवड करावी.

3)पर्णगुच्छ

या रोगामुळे पानांची वाढ खुंटते, ती लहान आणि बोकडासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा घातक लसीमुळे (मायक्रो प्लाझमा) होतो आणि याचा प्रसार तुडतुड्यामुळेहोतो. काही वेळा विशेषत: पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो. तसेच पाने सुरकुतल्यासारखी होऊन पानांची वाढ खुंटते व त्यांचा रंग फिकट हिरवा दिसतो. वाढीच्या सुरुवातीला रोग असल्यास फळधारण होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी रस शोषणाऱ्याकिडींचे नियंत्रण करणे आवश्यक असते.हा एक विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे पाने बारीक, खडबडीत होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात व झाडाची वाढ खुंटते.

उपाय : बी पेरताना दोन ओळीत थिमेट हे दाणेदार औषध प्रति-वाक्यात 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.रोपे लावणीपूर्वी नुवाक्रॉन 12 मि.ली. व अक्रामायसीन 5 मि.लि. (20 गोळ्या) व 10 लीटर पाणी या मिश्रणामध्ये साधारण 5 मिनिटे बुडवून लावावीत. लागवडीनंतर 10 दिवसांनी थिमेट प्रति हेक्टरी 10 किलो याप्रमाणे प्रत्येक झाडाभोवती गोल रिंग काढून द्यावे. रोगग्रस्‍त झाडे दिसतात उपटून नष्‍ट करावीत. लागवडीनंतर 45 दिवसांनी मि.लि. नुवाक्रॉन किंवा 30 ग्रॅम कार्बारिल 10 लि. पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारे द्यावेत.

4)  रोप कोलमडणे

राझोक्टोनिया, ‘फायटोप्थ्रोराकिंवा पिथियमया बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग रोपवाटिकेत मोठ्याप्रमाणात दिसून येतो. या रोगाचे जंतू बियांसोबत तसेच जमिनीवरही आढळतात. बी. पेरल्यानंतर रोपेउगवून जमिनीवर येण्यापूर्वी बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास बी मरते. बियांपासून बाहरे येणारा अंकुर कुजतो. बऱ्याच वेळा रोप उगवून आल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. बुरशीचा उपद्रव झाल्यामुळे रोपाचे मूळ आणि खोडाचा जमिनीलगतचा भाग सडतो. अशी रोपे शेतातून मुळासगट उपटून टाकावीत. जेणेकरून दुसऱ्यापिकांवर प्रादुर्भाव होणार नाही.

उपाय : या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी बियांना थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम या प्रमाणात चोळावे आणि नंतर बी पेरावे. रोपे नेहमी गादीवाफ्यावर तयार करावीत. तसेच मुळांभोवती फार काळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपवाटिकेच्या जागेचे सोलारायझेशनया तंत्राने निर्जंतुकीकरण करून घ्यावे आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडीही उपयुक्त बुरशी जमिनीत मिसळावी. 

5)करपा

हा रोग अल्टरनेरिया सोलानाई या बुरशीमुळे होतो. जमिनीलगतच्या पानांपासून या रोगाची सुरुवात होते. प्रथम पाने पिवळी पडतात आणि नंतर पानावर तपकिरी काळपट ठिपके दिसू लागतात. बारकाईने निरीक्षण केल्यास या ठिपक्यांवर एकात एक अशी वर्तुळे दिसतात.पाने करपून गळून पडतात. कित्येक वेळा फांदीवर आणि फळांवर ठिपके आढळून येतात. दमट व उष्ण हवेत या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.हा एक बुरशीजन्य रोग आहे. यामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. नंतर ते आकाराने वाढतात संपूर्ण पान वाळते. दमट हवामान  ह्या रोगासाठी पोषक आहे. या रोगामुळे फळांवरही चट्टे पडुन फळांची प्रत खालावते.

उपाय : या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी झायनेब, डायफोलटान यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी 2 किलो / हेक्टरी करावी. बियांना पारायुक्‍त औषधाची प्रक्रिया करावी. रोपांची पाने काढून टाकावीत व ती लांब नेऊन नष्‍ट करावीत. मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड 30 ग्रॅम / क्लोरोथॉनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून15दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्यकतेनुसार तीन ते चार फवारण्या कराव्यात. रोगांना प्रतिंबध करणाऱ्या जातीची लागवड करावी.

6)भुरी रोग

थंड आणि कोरड्याहवामानात हा रोग प्रामुख्याने येतो. पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि पानाचा वरचा भाग फिकट पिवळसर होतो. भुरीचे प्रमाण फार वाढल्यास पानांची गळ होते. भुरीचे ठिपके फांद्या आणि फळे यांवरही येतात. हा रोग पानांवर व फुलांवर येतो. या रोगाची पांढरट पिठासारखी बुरशी पानाच्या पृष्ठभागावर व खालच्या बाजूस येते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 10 ल‍िटर पाण्यात मिसळून फवारावे. लागवडीपूर्वी हे. 12.5 किलो थिमेट जमीनीत मिसळावे. टोमॅटोची लागवड झाल्‍यानंतर 30 दिवसांनी कॅरथेनची फवारणी करावी.

7)  स्पॉटेड विल्ट व्हायरस

हा रोग विषाणूमुळे होतो. या रोगाचे विषाणू टोमॅटो, बटाटा, मिरची , तंबाखू, लेट्यूस, पालक, वाटाणा व टोमॅटो इत्यादी पिकांवर रोग निर्माण करतात. या रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या नवीन कोवळ्या पानांवर वरच्या भागावर तांबट छटा येते. पानांवर काळे गोल ठिपके पडतात. ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. पानाचा भाग सूर्याच्या दिशेने धरला असता ठिपके पारदर्शक दिसतात तसेच त्यातील वर्तुळे स्पष्ट दिसतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढून संपूर्ण पान काळे पडते आणि वाळून जाते. खोडावरही काळे चट्टे पडतात.  शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. रोपांच्या लागवडीनंतर थिमेट किंवा कार्बोफ्युरॉन यासारख्या आंतरप्रवाही, दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा. रोपवाटिकेवर नायलॉनच्या दोनशे मेशच्या मच्छरदाण्यांचा वापर करावा. इमिडाक्लोप्रीड 10 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 20 मि.लि. अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

टोमॅटो तोडणी :

टोमॅटोरोपांची लागवड झाल्‍यानंतर साधारणता जातीनुसार टोमॅटो60 ते 70 दिवसांत फळांची काढणी सुरु होते. टोमॅटोची फळे कोणत्या बाजारपेठेत पाठवायाची आणि कोणत्या उद्देशाने पाठवायची याचा विचार करून कोणत्या अवस्थेतील फळे तोडावयाची हे ठरविले जाते.टोमॅटो हे 125 ते 130 दिवसांचे पीक असून पुनर्लागवड केल्यानंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसात फूल लागते. गर्द पिवळी फुले फळधारणेस योग्य असतात. फिकट पिवळ्या रंगाची फुले नाजूक असून ती गळतात व फळधारणा होत नाही. साधारणपणे 50-60 दिवसांत फळ लागण्यास सुरुवात होते. 60 ते 70 दिवसात फळांची तोड करता येते. सरासरी उत्पादन 30 ते 45 क्विंटल प्रती एकर फळे निघतात. टोमॅटोची फळे पिकताना फळांचा हिरवा रंग हळूहळू कमी होऊन त्यावर गुलाबी छटा येण्यास सुरुवात होते. फळे शेंड्याकडून देठाकडे पिकात जातात आणि त्यांचा रंग जातीप्रमाणे लाल, गुलाबी किंवा नारिंगी होतो. त्यावेळेस टोमॅटोची तोडणी करावी. तसेच बाजारपेठेची आवक व चालू बाजारभाव याची पूर्व कल्पना लक्षात घेऊन तोडणी करावी.   

टोमॅटो उत्पादन :

टोमॅटो जातीपरत्वे आणि हंगामानुसार सरळ वाढणाऱ्याजातीचे सरासरी 20 ते 35 टन प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. तसेच टोमॅटोच्या संकरित जातीमध्ये सरासरी 60-80 टन उत्पादन मिळू शकते.  टोमॅटोचे उत्पादन हे लागवड पद्धती, सुधारित वा संकरित बियाणे, खत व पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण आदी घटकांवर अवलंबून असते. 

संदर्भसूची :

  1. कोळपे संपत, सोनवणे प्रभाकर (2014) : फळे व भाजीपाला उत्‍पादन तंत्रज्ञान व कीड रोग व्‍यवस्‍थापन, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
  2. कृषि दैन‍ंदिनी (2015) : टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
  3. काळे पांडूरंग आणि काळे सरला (2005) : भाजीपाला उत्पादन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, आंबिल ओढा, विजय नगर, प्रथमावृत्ती, पुणे.
  4. काळे पांडूरंग आणि काळे सरला (2000) : भाजीपाला उत्पादन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, आंबिल ओढा, विजय नगर, प्रथमावृत्ती, पुणे.
  5. कापसे हरिश्‍चंद्र, रवींद्र काटोले,टोमॅटो लागवड, कीड-रोग संरक्षण व प्रक्रिया, गोडवा प्रकाशन, पुणे
  6. शेख शादुल्ला (2017) : टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  7. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-दोन : पाठ्यपुस्तिका-2, य.च.म.मु.वि., नाशिक
  8. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-एक : पाठ्यपुस्तिका-1, य.च.म.मु.वि., नाशिक
  9. पन्हाळे अजय (2018) : टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक

टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र या विषयी अद्यावत व सुधारित माहितीशेतकऱ्यांना सोप्या भाषेत प्राप्त व्हावी, त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हा लेख https://www.agrimoderntech.in/ प्रकाशित करण्यात येत आहे. याचा फायदा महाराष्ट्रातीलतमाम टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या शेतातील टोमॅटोचे दर्जेदार व विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल, अशी माझी खात्री आहे.

5 thoughts on “टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र”

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading