कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व

कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979

भारत हा जगातील प्रमुख फळे व भाजीपाला उत्पादक देश आहे. फळांच्या विपणनात काढणीनंतरचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असून त्यामध्ये प्रतवारी, पॅकींग,प्री-कुलींग, साठवण, प्रक्रिया, वाहतूक व विक्री व्यवस्थेचा समावेश होतो. काढणीपश्चात व्यवस्थापनातील त्रुटीमुळेच आपल्या देशात दरवर्षी साधारणपणे 1 लाख कोटींचे नुकसान होत आहे.
भारतात कृषि मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण हे 2 ते 3 टक्के आहे. तर तेच प्रमाण विकसित राष्ट्रांमध्ये 40 टक्के आहे. शेतमाल प्रक्रिया ही महत्त्वाची बाजार सेवा आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये कच्चा माल विक्रीसाठी नेण्यापेक्षा मालावर प्रक्रिया करुन माल विकल्यास चांगली किंमत (दर) ‍मिळते. त्या दृष्टीकोनातून भारतातील शेतमाल प्रक्रिया उद्योगांना शासनामार्फत अनुदान (सबसीडी) देऊन कृषि उद्योगांना मोठी चालना देण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतमाल प्रक्रिया उद्योगात वाढ व्हावी, शेतीचे उत्पादन दुप्पट होईल, कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल त्यातून शेतकऱ्यांना आशादायी दिलासा मिळेल यामुळेच कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व हा लेख तयार करण्याचे कारण घडले आहे.
जागतिकीकरण धोरण स्वीकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षा रूंदावल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कृषिप्रक्रियायुक्त पदार्थ जास्त प्रमाणात येत आहेत व त्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मलेशिया, ‍फिलीपाईन्स, अमेरिका, ब्राझीलसारख्या विकसित देशांचे कृषिप्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना आकर्षित करुन घेत आहेत. या विकसित देशांमध्ये मलेशिया अंदाजे (3 टक्के), ‍फिलीपाईन्स (78 टक्के), ब्राझील (70 टक्के),अमेरिका (65 टक्के) या प्रमाणात फळे व भाजीपाल्यांवर प्रक्रिया करुन टिकवणक्षम प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात तर भारतासारख्या खंडप्राय देशाचा फळे व भाजीपाला उत्पादनात आकडेवारीनुसार अंदाजे दुसरा क्रमांक असून ही फक्त 2 टक्केच फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया केली जाते.सध्या देशात उत्पादित होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये टोमॅटो केचअप, आंबागर, फळांचे रस, फळे, जॅम, जेली, लोणची व सरबत यांचा प्रमुख वाटा आहे. त्याशिवाय फळांचा गर, वाळविलेला व अतिथंड तापमानात सुकविलेला भाजीपाला, डबाबंद अळिंबी, पाण्याचा अंश काढून टाकलेले फळांचे रस यांसारख्या पदार्थांची त्यात भर पडते आहे.
भारत गेल्या 30 वर्षांपासून थोड्या प्रमाणावर का होईना प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करत आहे. निर्यात होत असलेल्या पदार्थांमध्ये कैरीची चटणी, लोणचे, फळांचे रस व गर, डबाबंद व सुकविलेली अळिंबी तसेच गोठवलेली व डबाबंदफळे यांचा वाटा प्रमुख आहे. आंबा गराला सौदी, कुवेत, नेदरलँड व हाँगकाँगमध्ये मागणी आहे लोणचे व चटण्या अमेरिका, इंग्लंड, जर्मनी व सौदीमध्ये लोकप्रिय आहेत. टोमॅटो, पेस्ट, जॅम, जेली व रसासारखे पदार्थदेखील अमेरिका, रशिया, इंग्लंड, अरब, अमिरात इ. देशांमध्ये निर्यात होतात.
भारतातील एकूण फळे आणि भाजीपाला उत्पादनांपैकी फक्त केवळ 2 टक्केच कृषि मालावर प्रक्रिया केली जाते. हल्ली ग्राहकांची खाद्य पदार्थांबद्दलीची बदलती मानसिकता, सवय, गतिमान जीवन पद्धती, वाढती क्रियाशक्ती इत्यादींमुळे प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची मागणी दरवर्षी 10 टक्यांपर्यंत वाढत जात आहे. यामुळे पुढील कालावधीमध्ये कृषिमाल प्रक्रिया उद्योग उभारणे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला योग्य तो दर देणे ही येणाऱ्या काळाची गरज बनत चालली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना तारण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे, जेणेकरुन शेतकरी समृद्ध होईलच शिवाय शासनाच्या चूकीच्या धोरणाच्या फटकाही शेतकऱ्यांना बसणार नाही.
कृषिमालप्रक्रिया :  उद्योगाची व्‍याप्‍ती
आपल्या देशातील 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु सध्या शेतीची झालेली दयनीय अवस्था पाहता यावर प्रामुख्याने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. आज आपण बघतो शेतकरी, पिकवणाराच आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल तर सर्वांना विचार करायला लावणारे आहेत. शेतकरी 25 एकर कांदे शेतामध्ये, बांधावर टाकून देत आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळेच अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषिमाल प्रक्रिया उद्योगाची नितांत गरज आज आहे.
अ) जगातील फळे व भाजीपाला प्रक्रियेची स्थिती
जगात फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे अनेक देश असून त्यांपैकी आघाडीवर असलेले देश फिलीपाईन्स 78 टक्के, ब्राझील 70 टक्के, अमेरिका 65 टक्के, मलेशिया 3 टक्के, भारत 2 टक्के इतक्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते. त्यामुळे भारतात शेतमाल प्रक्रिया, उद्योगाची व्याप्ती आणि महत्त्व असल्याचे दिसून येते.
तक्ता क्र. 1
जगातील फळे व भाजीपाला प्रक्रिया करणाऱ्या देशांची स्थिती दर्शविणारा तक्ता
अ.क्र.
देश
शेकडा प्रमाण
1
फिलीपाईन्स
78
2
ब्राझील
70
3
अमेरिका
65
4
मलेशिया
3
5
भारत
2
स्त्रोत: कृषि पणन मित्र मासिक : जून, 2019 टीप: प्रक्रिया उद्योगाची आकडेवारी कमी जास्त असू शकते.
ब) भारतातील कृषिप्रक्रिया उद्योग
कृषिप्रक्रिया उद्योगांची व्‍याप्‍ती ही संपूर्ण जगभर पसरलेली आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळात भारतात या उद्योगांची व्‍याप्‍ती निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरल्‍याचे दिसून येते. भारतात कृषिप्रक्रिया उद्योगांची संख्‍या 27,479 इतकी आहे त्‍यांपैकी सर्वाधिक म्‍हणजे, 6,313 (23 टक्‍के) उद्योगाची संख्‍या एकट्या आंध्र प्रदेशात आहे. तामिळनाडूमध्‍ये ही संख्‍या 4,000 (15 टक्‍के), पंजाबमध्‍ये 2,285 (8 टक्‍के) तर महाराष्‍ट्र कृषिप्रक्रिया उद्योगाची संख्‍या 2,252 (7 टक्‍के) इतकी आहे. याचाच अर्थ, महाराष्‍ट्र या उद्योगांची आज पीछेहाट झाल्‍याचे दिसून येते. महाराष्‍ट्रात केळी, मोसंबी, संत्री, द्राक्षे, डाळिंब यांसारख्‍या फळांच्‍या उत्‍पादनही अधिक होत असताना प्रक्रिया उद्योगांच्‍या अभावामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होताना दिसते. आंध्र प्रदेशासारंख्या राज्यांनी या उद्योगासाठी सवलती आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणात या राज्यात प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली आहे मात्र, प्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल वातावरण तयार करणे फारसे स्वारस्य न दाखवल्याने गुंतवणूकदार या उद्योगाकडे फारसे आकर्षित होताना दिसत नाहीत. असे असले तरी भारताच्या ग्रामीण विकासासाठी अशी उद्योगांची नितांत गरज आहे.
तक्ता क्र. 2
भारतातील कृषिमाल प्रक्रिया  उद्योगाची संख्या व शेकडा प्रमाण दर्शविणारा तक्ता
अ.क्र.
राज्य
कृषिमाल प्रक्रिया उद्योगाची संख्या
प्रमाण शेकडा
1
आंध्र प्रदेश
6313
23
2
तामिळनाडू
4000
15
3
पंजाब
2285
8
4
महाराष्ट्र
2252
7
स्त्रोत: कृषि पणन मित्र मासिक : जून, 2019 टीप: प्रक्रिया उद्योगाची आकडेवारी कमी जास्त असू शकते.
वरील तक्ता क्र. 2 हा भारतात कृषिप्रक्रिया उद्योगांची संख्‍या व शेकडा प्रमाण दर्शवित आहे. कृषि पणन मित्र, 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात कृषिप्रक्रिया उद्योगांची एकूण अंदाजे संख्या 27,479 इतकी आहे.
कृषिमाल प्रक्रिया उद्योगातून शेतीला व्यवसायिक दर्जा देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. इतर उद्योगाला ज्या सवलती दिल्या जातात त्या शेती व्यवसायाला मिळाल्या तरच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभरणे शक्य होईल. यामुळे शेतीला चांगले दिवस येऊन बळीराजाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता फार मोठा हातभार लागेल. तर शेतकऱ्यांच्या गटाने एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करुन प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास ह्या पद्धतीने तो जास्त फायद्याचा ठरेल.
शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात विस्तार केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलते. त्यादृष्टीने असे उद्योगधंदे महत्त्वपूर्ण ठरतात. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कच्चा माल, बाजारपेठ, ग्राहक व विक्री हे प्रमुख घटक असून याकरिता विक्री व्यवस्थापन व आपल्या क्षेत्रातील स्पर्धकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच शेतमालाचे मार्केटिंग, जाहिरातीकरण, आणि ब्रॉण्डींग अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकरिता वेगळे आर्थिक नियोजन करायला पाहिजे. तसेच व्यवसायातील आदर्श, तंत्र व अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन ही शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे. अशा प्रकारे योग्य ते नियोजन केल्यास शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणे सोपे होईल.
आपल्या देशामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञानाभावी 25 टक्के शेतमालाची नासाडी किंवा खराबीहोते. याला कृषिमाल प्रक्रिया उद्योगाची साथ मिळाल्यास यामध्ये निश्चितपणे घट होईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये देशात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज (FPI) क्षेत्रामध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून जवळपास 31 लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. वर्ष 2020 पर्यंत कृषिमाल प्रक्रिया केलेल्या शेतमालाची उलाढाल अंदाजे 62 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता एका खाजगी सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कृषिमाल प्रक्रिया उद्योगाला प्रचंड मागणी राहणार आहे. यात मुळीच शंका नाही.
कृषिमाल प्रक्रियांमुळे होणारे फायदे
1.नाशवंत मालाचा नाश थांबवता येतो.
2.फळांची व भाजीपाल्यांची टिकवण क्षमता वाढवता येते.
3.कृषिमालाचे मूल्यवर्धनात वाढ करता येते.
4.कृषिमाल प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण बेकारी व दारिद्रय कमी करता येते.
5.शेतीमध्ये असलेले मनुष्यबळ यामध्ये काही प्रमाणात वर्ग करण्यात येते.
6.कृषिमाल प्रक्रिया उद्योगामुळे बाजारपेठांचा दर्जा वाढतो.
7.शेतमाल प्रक्रिया उद्योगामुळे बाजारपेठांचा विकास होतो.
8.देशाच्या निर्यातवृद्धीला चालना मिळते.
9.कृषिप्रक्रियेमध्ये उत्पादनामध्ये विविधता आणता येते.
10. देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते.
11.कृषिमाल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी व उद्योजकांचे आर्थिक सशक्तीकरण होते.
भारतातील नाशवंततेसाठी प्रक्रिया स्तर
1.फळे आणि भाज्या 2 टक्के
2.समुद्री उत्पादन 23 टक्के
3.कुक्कुट 6 टक्के
4.मांस 21 टक्के
5.डेअरी 35 टक्के
शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्‍त्‍व
भारतात तसेच महाराष्‍ट्रात शेतमाल प्रक्रिया उद्योगाला अनन्‍यसाधरण महत्‍त्‍व आहे. कारण भारतातील महाराष्‍ट्र हे महत्‍त्‍वाचे शेतीप्रधान राज्‍य म्‍हणून ओळखले जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये विविध प्रकारच्‍या शेतमालाचे उत्‍पादन घेतले जाते व यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्‍यासाठी लागणारा कच्‍चा माल उपलब्‍ध होत असतो. मात्र प्रक्रिया करणाऱ्या उद्योगकाची कमतरता असल्‍याचे दिसून येते. यामुळे येथील कच्‍चा माल हा बाहेर देशात जाऊन त्‍यापासून विविध मूल्‍यवर्धित पदार्थ निर्मिती करून पाच ते दहा पटीने उत्‍पन्‍न विदेशी देशातील उद्योजक वाढवत आहेत. यामुळे प्रक्रिया उद्योगाला व पदार्थ निर्मितीला विशेष महत्‍त्‍व आहे.
भारतात ही मैसूर येथे अन्न प्रक्रिया व कृषि उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे. फळांवर प्रक्रिया केल्याने विविध वस्तूंची निर्मिती करता येते हे या संस्थेने सिद्ध केले आहे.
फळेभाजीपाला प्रक्रियेचे वर्गीकरण 
आंबा : लोणचे, पन्हे, रस, आंबा पावडर, पल्प, कॅन रस, जॅम, स्क्कॅश, आंबा फ्लेक्स, टॉफी.
संत्री : रस, सॉफ्ट ड्रिंक.
मोसंबी : मोसंबी अर्क, आम्ल, मोसंबीच्या सालीपासून सौंदर्य प्रसाधने.
चिक्कू : फ्लेक्स, पावडर, मिल्क शेक, टोफी, जॅम इ.
डाळिंब : अनारदाना, रस, चूर्ण, दमा व खोकल्याची औषधे, सौंदर्य प्रसाधने.
द्राक्ष : रस, बेदाणा, मनुका, वाईन.
पपई : पेपेन पावडर, टूट्रीफ्रुटी.
केळी : वेफर्स, पावडर.
बोर : बोर पावडर, बोरकुट, मद्यार्क
लिंबू : रस, लोणचे, सायट्रिक आम्ल.
जांभूळ : रस, सिरप, जॅम, पावडर
पेरु : पावडर, पेय, जेली.
बटाटा : वेफर्स, फिंगर चिप्स, बटाटा पावडर
टोमॅटो : प्यूरि, सॉस, सूप्स, पावडर
शेवगा : बी पावडर, पानाचे पावडर, पानाचा रस,बेन ऑईल.
कांदा : कांदा पावडर, मसाला पावडर, मसाला कांदा.
लसूण : लसूण पावडर, पेस्‍ट लसूण.
भेंडी : भेंडी पावडर
मिरची : मिरची पावडर, लोणचे,ठेचा.
गाजर : गाजर पावडर, भाजी इत्यादी.
सिताफळ : पावडर, पल्‍प, ज्‍यूस.
वरील सर्व फळांवर व भाजीपाल्यांवर प्रक्रिया करुन अनेक प्रकारचे उपपदार्थ तयार करता येतात. शिवाय बाजारामध्ये अशा वस्तूंना चांगली मागणी आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला ग्रामीण भागामध्ये फारच मोठा वाव व संधी आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठे, उत्पादक, निर्माते, अन्न प्रक्रिया उद्योजक, तसेच त्या विषयांमधील तज्ज्ञ (एक्स्पर्ट) प्राध्यापकांनी, धोरणकर्ते यांनी आपले योगदान देणे आवश्यक आहे.
भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर या शेतमाल प्रक्रिया उद्योगाबाबतच सरकारचे धोरण उदार असले पाहिजे. शिवाय या कृषिप्रक्रिया उद्योगासाठी विविध सोयी-सुविधा, सवलती देणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे यावर भर देऊन त्याचे विकेंद्रीकरण केल्यास, भारताच्या आणि राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निश्चितच मोठे अपेक्षित बदल घडून येतील असे मला वाटते. म्हणूनच कृषिमाल प्रक्रिया उद्योग ही शेतकऱ्यांसाठी एक संधी तर आहेच. त्यापेक्षाही शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कृषिप्रक्रिया उद्योग उभारणी करणे ही काळाची गरज बनली आहे.
कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व हा लेख भारतातील तसेच महाराष्ट्रातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असून त्यांच्या शेतीचे कृषिप्रक्रिया उद्योगातून उत्पादन वाढावे आणि त्यांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया : उद्योगाची व्याप्ती आणि महत्त्व हा लेख उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरू शकेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे सदर लेख ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करून सहकार्य करावे.
संदर्भ ग्रंथ :
  1. भिसे प्रविण शामसुंदर (फेब्रुवारी 2020) : कृषि प्रक्रिया उद्योगाची गरज, महत्‍त्‍व आणि निवडक पदार्थ निर्मितीचा अभ्‍यास, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  2. फळबाग उत्पादन पदविका (2017-18) : फळांची काढणी, हाताळणी व विक्रीव्यवस्था, पाठ्यपुस्तिका-1, य.च.म.मु.वि., नाशिक (AGR-208)
  3. फळबाग उत्पादन पदविका (2017-18) : फळांची काढणी, हाताळणी व विक्रीव्यवस्था, पाठ्यपुस्तिका-2, य.च.म.मु.वि., नाशिक (AGR-208)
  4. डॉ. कटके शैलेंद्र (सप्टेंबर 2019) : अन्न-तंत्रज्ञान महाविद्यालय, व.ना.म.कृ.वि., परभणी, कृषि पणन मित्र
  5. www.fao.com
  6. www.agrowon.com
  7. https://marathi.krishijagran.com/agriculture-processing
डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979  
कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे
******
Prajwal Digital

2 thoughts on “कृृ‍ष‍ि‍माल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व”

Leave a Reply