सोयाबीन हे खरीप हंगामातील अत्यंत उपयुक्त असे पीक आहे. सोयाबीनमध्ये 40 टक्के उच्च ऊर्जाची प्रथिने आणि 20 टक्के तेल असणारे पीक असून सोयाबीन उत्पादनापैकी 75 टक्के सोयाबीन हे खाद्य तेलासाठी वापरले जाते. सोयाबीनपासून 18 टक्के तेल व 82 टक्के तेलविरहित पेंड मिळते. उत्पादन पेंडीपैकी अंदाजे 80 टक्के पेंडी ही निर्यात होते त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
सोयाबीन उत्पादन :
भारतातील प्रमुख राज्यांची सोयाबीन उत्पादन स्थिती दर्शविणारा तक्ता
अ.
क्र.
|
राज्य
|
क्षेत्र
(हेक्टर लाख)
|
उत्पादकता (किलोग्रॅम हेक्टर)
|
उत्पादन
(मे. टन)
|
1
|
51.952
|
772
|
40.107
|
|
2
|
37.365
|
971
|
36.296
|
|
3
|
9.627
|
681
|
6.56
|
|
4
|
3.302
|
816
|
2.694
|
|
5
|
इतर
|
1.841
|
748
|
1.377
|
6
|
1.783
|
846
|
1.508
|
|
7
|
1.003
|
858
|
0.861
|
|
8
|
0.742
|
726
|
0.539
|
|
|
एकूण
|
107.615
|
6418
|
89.942
|
उपरोक्त तक्ता हा भारतातील खरीप हंगामातील सन 2019 मधील सोयाबीन क्षेत्र, उत्पादकता व उत्पादन स्थिती दर्शवित आहे. भारतातील सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश आघाडीवर राज्य असून मध्य प्रदेश या राज्याचे सोयाबीनखालील क्षेत्र, 51.952 हेक्टर लाख असून, उत्पादन 40.107 मे.टन व उत्पादकता 772 हेक्टर किलोग्रॅम इतकी आहे. तर सर्वात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून सोयाबीनखालील क्षेत्र, 37.365 हेक्टर लाख असून, उत्पादन 36.296 मे. टन व उत्पादकता 971 हेक्टर किलोग्रॅम इतकी आहे. तर याच खालोखाल भारतातील राजस्थान, कर्नाटक, आंध प्रदेश, गुजरात, छत्तीसगड व इतर इतर राज्यांचा सोयाबीन क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेसाठी क्रम लागतो. त्यामुळे वरील विश्लेषणाचा विचार भारतात व महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता ही चांगली असून सोयाबीन प्रक्रिया उद्योग करण्यास मोठा वाव व संधी असल्याचे स्पष्ट होते.
सोयाबीन महत्त्व :
देशात एकूण गळीतधान्य उत्पादनात सोयाबीन या पिकाचा फार मोठा वाटा आहे. मनुष्याच्या आहारातील पौष्टिक पदार्थ, पशुखाद्य तथा औद्योगिकदृष्ट्या सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेले आहे. एकंदरीत समाजाची दिवसेंदिवस वाढती खाद्य तेलाची मागणी तसेच पनीर, दही यांसारख्या महागड्या खाद्यांना विकल्प उपलब्ध करून देणे काळाची गरज झाली आहे. त्यासाठी सोयाबीनवर प्रकिया करणाऱ्या उद्योगांची स्थापना करणे अगत्याचे ठरते. आपल्या सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते मात्र सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा कमी प्रमाणात आहेत. यामुळेच देशात व महाराष्ट्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणी काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा विचार करता बेकारी व बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे बहुसंख्य ग्रामीण व शहरी भागातील मजूरांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळेल. सोयाबीन उद्योगामुळे लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
उद्योजक म्हणून कार्य करीत असताना सर्वसाधारपणे विपणन, उत्पादन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि वित्त व्यवस्थापन ही अंगे प्रकर्षाने विचारात घेतली जातात. ग्रामीण भागात सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून ज्यामध्ये सोया मिल्क, सोया ऑईल व पेंड, सोया पनीर, सोया दही आणि यांसारखी इतर खाद्य पदार्थांचा समावेश आहे. सोया पदार्थांना बाजारात विशेष मागणी सुध्दा आहे. त्यामुळे उत्पादीत पदार्थांना चांगली बाजारपेठ मिळण्याची शाश्वतता देशात आहे.
सोयाबीन पेंड उत्तम पशुखाद्य :
पशुखाद्य निर्मितीत सोयाबीनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोयाबीनपासून तेल काढल्यानंतर उरलेल्या ढेपेचा पशुपक्ष्यांच्या खाद्यात एक अत्यावश्यक घटक म्हणून वापर केला गेला, तर दर्जेदार व भरपूर दूध उत्पादन मिळू शकते. दुभत्या गाई–म्हशींच्या वाढ, प्रजनन आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक सर्व पोषक घटक सोयाबीनमध्ये आहेत. त्यात प्रथिनांचे व ऊर्जेचे प्रमाण जास्त आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, अ, ब, क असून प्रथिनांचे प्रमाण अन्य कडधान्यांच्या तुलनेत दुप्पट असते. जनावरांना प्रसूतीनंतर तीन महिने सतत ऊर्जेची कमतरता भासते. अशावेळी दूध उत्पादन कमी होते. जनावरे प्रसूतीच्या काळामध्ये सोयाबीनचा पशुखाद्यात उपयोग केला असता, जनावरांच्या ऊर्जा व्यवस्थापनास मदत मिळते आणि दुधाची प्रतही उत्तम चांगली राखली जाते. यामुळे जनावरांना सोयाबीन पेंड हे एक उत्तम पशुखाद्य म्हणून वापरले जाऊ शकते. जनावरांच्या खाद्यात सोयाबीनचा वापर करताना तज्ज्ञांचा व मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.
सोयाबीन प्रकिया उद्योगाची गरज :
जनतेसाठी प्रथिनांची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने मागील दशकात सोयाबीनच्या लागवडीस प्राधान्य दिले गेले. हा उद्देश पूर्ण करण्याकरिता गृह /कुट्टीर उद्योगांची स्थापना करून सोयाबीनवर प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे सोयाबीनचे फक्त तेल काढण्याऐवजी सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध सोयापदार्थ तयार करण्याकडे आहे.
ग्रामीण किंवा शहरी सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यापूर्वी त्या ग्रामीण भागातातील लोकांच्या खाद्यपदार्थ संबंधित पसंत व आवड यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. लोकांना जे खाद्यपदार्थ आवडतात तेच खाद्यपदार्थ तयार करावेत त्यामुळे तयार मालाला उत्तम बाजारपेठ मिळू शकेल. अशा प्रकारे लोकांच्या पारंपारिक आवडीचा व त्यांच्या आहारातील एक भाग असलेला सोया आधारित खाद्यपदार्थ तयार केल्यामुळे तो उद्योग फायद्याचा ठरेल आणि लोकांना त्यांच्या आवडीच्या प्रकारातला सोयापीठ मिळाल्यापासून सोयाबीनच्या पौष्टिक व स्वास्थवर्धक गुणांचा फायदा मिळू शकेल. त्याचप्रमाणे लहान मुलासाठी विशेष सोयापदार्थ तयार करता येतील. सोयाबीन प्रकिया उद्योग सुरु करण्यापूर्वी त्या त्या भागातील स्थानिक लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकांच्या आवाक्यापेक्षा जास्त किंमतीचे पदार्थ तयार करू नयेत. ही बाब उद्योजक व ग्राहक या दोघांच्याही हिताची असल्यामुळे प्रकिया उद्योग निश्चित करताना या गोष्टीला प्राधान्य देण्यात यावे.
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे फायदे
- सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते.
- ग्रामीण व शहरी भागातील कुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होते.
- मजुरांचे स्थलांतर काही प्रमाणात कमी होते.
- ग्राहकांना सोयाबीनचे प्रक्रियायुक्त पदार्थ उपलब्ध होतात.
- सोयाबीन कच्च्या मालाची किंमतीत वाढ होते.
- इतर पदार्थांच्या तुलनेने सोया दूध व सोया पनीर या पदार्थांचा मानवी आहारात उपयोग होतो.
- सोयाबीन उद्योगासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.
- सोयाबीन पिकाकडे पाहण्यच्या दृष्टीकोनात बदल होतो.
सोयाबीनपासून निरनिराळे मूल्यवर्धित पदार्थ
1) सोयादूध : सोयाबीनपासून तयार केलेले दूध आरोग्यदायी आहे, तसेच या दुधापासून पनीर, लस्सी, तयार करता येते. दूध काढून झाल्यानंतर राहिलेल्या लगद्यापासून शेव, चकली, शंकरपाळीही तयार करता येते. बाजारपेठेत या पदार्थांना मागणी वाढते आहे.
2) सोया पनीर : सोया दुधाप्रमाणेच सोया पनीर (टोफू) लाही मोठी मागणी आहे. सोया पनीरची किंमत ही 150 ते 200 रुपये प्रति किलो आहे. सोया पनीरमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. परदेशामध्ये विविध पदार्थामध्ये टोफूचा वापर लोकप्रिय आहे. एक किलो सोयाबीनपासून 1 ते 1.5 किलो सोया पनीर तयार होते. त्याला बाजारामध्ये अंदाजे 150 ते 200 रुपये किंमतीला विकले जाते.
3) सोया खारमुरे : सोयाबीन 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजविले जाते. त्यानंतर त्याला पाच ते सहा तास उन्हात सुकवून नंतर वाळूत भाजले जाते. वाळूत भाजताना चवीपुरते व मीठ टाकले की सोयाबीन खारमुरे तयार होतात.
4) सोया बिस्कीट : बहुतेक बिस्किटे मैद्यापासून तयार करतात; परंतु मैद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर प्रथिनांचे अत्यल्प प्रमाण आहे. म्हणून प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी सोयाबीन हा फार मोठा पर्याय आहे. सोयाबीनपासून उत्तम प्रकारचे बिस्किटे तयार करता येतात.
सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक बाबी :
सोयाबीन प्रकिया उद्योगांमधील उद्योगनिहाय उद्योगांची उभारणी करणे, उद्योगांचे अर्थशास्त्र इ. बाबत माहिती असावी लागते. तसेच सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे फायदे व तोटे, सोया मिल्क उद्योग सुरू करावयाच्या अगोदर करावयाच्या कच्चा मालाची उपलब्धतता, पुरवठा, त्याची प्रतवारी, उपलब्धतेचा हंगाम, प्रकिया उत्पादनासाठीची बाजारपेठ, कुशल मजूराची उपलब्धतता, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धतता, प्रक्रिया उत्पादनाचे पॅकिंग, लेबलींग, टेस्टींग इत्यादीचे सर्वेक्षण, सोयाबीनपासून विविध पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेतील विविध टप्पे व दर्जेदार उत्पादने तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी, प्रक्रिया उद्योगाच्या अर्थशास्त्रानुसार उद्योगावरील खर्च, खर्चाचे अंदाज पत्रक, ढोबळ उत्पन्न, व्यवसायातून मिळणारा नफा आणि होणारा तोटा आदी बाबींचा योग्य विचार करावा लागतो.
अशाप्रकारे सोयाबीन प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी समविचारी शेतकरी एकत्रित येऊन शेतकरी गट स्थापन करून ग्रामीण किंवा शहरी भागात सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी. यासाठी शासनाच्या गटशेती व इतर कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच प्रक्रिया युनिट उभारणीसाठी नाबार्ड अथवा राष्ट्रीयकृत बँकेकडून व्यावसायिक कर्ज प्राप्त करावे. त्यामुळे व्यवसायात खेळते भांडवल तयार होईल आणि आर्थिक निकड जाणवणार नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार केल्यास सोयाबीन प्रक्रिया उद्योग यशस्वी होईल, असे मला वाटते.
सदरील सोयाबीन प्रक्रिया उद्योग काळाची गरज हा लेख महाराष्ट्रातील तमाम सोयाबीन उत्पादक शेतकरी, सोयाबीन उद्योजक आणि नवीन व्यवसाय चालू करणाऱ्या समूहांसाठी उपयुक्त, महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी ठरू शकेल. प्रक्रिया उद्योग यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष युनिटला भेट द्यावी किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संदर्भ :
- प्रशिक्षण पुस्तिका, कृषी पणन मंडळ, सोयाबीनपासून विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती आणि विक्री
- बन गोविंद गजेंद्र (2020) : सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
लेखक : डॉ. सुमठाणे योगेश वाय., दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर