गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेतकरी हा उभ्या जगाचा अन्नदाता आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल देशातील जनतेला अन्नधान्य स्वरूपात मिळत असतो. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नफा प्राप्त होतो. अशाच परिस्थितीत शेतकरी शेतात काम करत असताना किंवा शेतीतील वीजेच्या उपकरणामुळे त्याला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते किंवा बहुतांशी प्रमाणात त्याला स्वत:चे जीवनयात्रा संपावी लागते. यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शासन स्तरावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सदर योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयासाठी वरदान ठरत आहे.

शेतकरी बांधव आपली शेती व्‍यवसाय करताना होणारे विविध प्रकारचे अपघात उदा. वीज पडणे, सर्पदंश होणे, पूर येणे,विजेचा झटका (शॉक) बसणे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्‍य कोणत्‍याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढावतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्‍व येते. त्यामुळे घरातील कुटुंब कर्त्‍याव्‍यक्तिस झालेल्‍या अपघातामुळे कुटुंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा अपघातग्रस्त पीडित शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍याकरिता शासनाने सन 2015-16 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाराज्‍यात सुरू केली आहे. सन 2018-19 मध्‍ये सदर योजना दि. ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत रा‍बविण्‍यात येत असून जयका इन्‍शुरन्‍स कंपनी ब्रोकरेज प्रा.लि. नागपूर ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांशाचे विवरण

अ.क्रअपघाताची विशेष बाबनुकसान भरपाई रक्कम रू.
1.      अपघाती मृत्‍यू2,00,000
2.      अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे2,00,000
3.      अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे2,00,000
4.      अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे1,00,000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची ठळक वैशिष्‍टये

  • शेतकऱ्यांनी स्‍वतः त्‍यांच्‍या वतीने अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने या योजनेत पुन्‍हा स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही. शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्‍ता भरण्‍यात येतो.
  • यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्‍यांच्‍या वतीने अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्‍यास अथवा विमा उतरविला असल्‍यास त्‍याचा या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्‍वतंत्र असतील.
  • योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी विहित नमुन्यात प्रपत्रे व कागदपत्रे वगळता अन्‍य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी वेगळ्याने सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही.

लाभार्थी पात्रतेच्‍या अटी व आवश्‍यक कागदपत्रे

  • महाराष्‍ट्र राज्‍यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी.
  • शेतकरी म्‍हणून त्‍याच्‍या नावाचा समावेश असलेला 7/12 किंवा 8-अ नमुन्‍यातील उतारा
  • ज्‍या नोंदीवरून अपघातग्रस्‍त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल, अशी सबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड)
  • शेतकऱ्याचे वारस म्‍हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6-क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
  • अपघाताच्‍या स्‍वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे.

विमा संरक्षणामध्‍ये समाविष्ट बाबी

  •  रस्‍ता/रेल्‍वे अपघात
  •  पाण्‍यात बुडून मृत्‍यू
  • जंतूनाशके हाताळताना अथवा अन्‍य कारणामूळे विषबाधा
  •  विजेचा धक्‍का बसल्‍यामुळे झालेला अपघात.
  • वीज पडून मृत्‍यू
  •  खून
  •  उंचावरून पडून झालेला अपघात
  • सर्पदंश व विंचूदंश
  •  नक्षलवाद्याकडून झालेल्‍या हत्‍या
  • जनावरांच्‍या खाल्‍ल्‍यामुळे / चावण्‍यामुळे जखमी / मृत्‍यू
  •  दंगल
  • अन्‍य कोणतेही अपघात.

विमा संरक्षणामध्‍ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी

  • नैसर्गिक मृत्‍यू
  • विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्‍व
  • आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न, आत्‍महत्‍या किंवा जाणीवपूर्वक स्‍वतःला जखमी करून घेणे
  • गुन्हेगारी उद्देशाने कायद्याचे उल्‍लंघन करतांना झालेला अपघात
  • अंमली पदार्थाच्‍या अंमलाखाली असताना झालेला अपघात
  • भ्रमिष्‍टपणा
  • बाळंतपणातील मृत्‍यू
  • शरीरांतर्गत रक्‍तस्‍त्राव
  • मोटार शर्यतीतील अपघात
  • युद्ध
  • सैन्‍यातील नोकरी
  • जवळच्‍या लाभधारकाकडून खून.

अपघात विमा वारसदार

  • मृत शेतकऱ्याची पत्‍नी/मृत शेतकरी स्‍त्रीचा पती
  • मृत शेतकऱ्याची अविवाहित मुलगी
  • मृत शेतकऱ्याची आई
  • मृत शेतकऱ्याचे मुलगे
  • मृत शेतकऱ्याची नातवंडे
  • मृत शेतकऱ्याची विवाहित मुलगी.

विमा प्रस्‍ताव सादर करण्‍याची पद्धती

शेतकरी/वारसदाराने विमा कालावधीत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्‍ताव जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडे पाठवावयाचा आहे. जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्‍या प्रस्‍तावांची नोंद घेऊन शासनाच्‍या विमा सल्लागार यांच्‍या विभागीय कार्यालयाकडे पाठवतील. विमा सल्‍लागार यांच्‍या कार्यालयाकडून प्राथमिक छाननी होऊन तो प्रस्‍ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवतील.

अशाप्रकारे शेतकरी बांधव अथवा त्यांच्या कुटुंबातील शेतकरी व्‍यक्‍तींचा अपघात झाला असल्यास त्याचा शासकीय यंत्रणेमार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी योग्य त्या प्रपत्रामध्ये पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सदर पाठपुरावा केल्यानंतर विमा कंपनीमार्फत सद्य:स्थितीची पडताळणी होऊन संबंधित शेतकरी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदार कुटुंबांना योग्य तो मोबदला वितरित केला जातो.

योजनेच्‍या अधिक माहितीसाठी शासन निर्णय पाहावा. इथे क्‍ल‍िक करावी. 

विमा कंपनी विषयी जाणून घेण्‍यासाठी इथे क्लिक करावी


 संदर्भ :

  • शेतकरी मासिक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
  •  www.mahakrishi.gov.inकृषि विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
Prajwal Digital

2 thoughts on “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना”

Leave a Reply