हरभरा उत्‍पादन तंत्रज्ञान

 1,176 views

हरभरा हे महाराष्‍ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकाच्‍या उत्‍पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या बाबींचा विचार केला तर हरभरा लागवडीस व उत्पादनास तसेच महाराष्‍ट्रात मोठा वाव आहे. 
अलीकडे पर्यावरणातील वाढता असमतोलपणा, अपुरे पाऊस त्यामुळे निर्माण होणारी दुष्‍काळी परिस्थिती, कीड व रोगांचा वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा बाबींमुळे भारतातील प्रति हेक्‍टरी हरभरा पिकाची उत्‍पादकता मात्र कमी आहे. यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित सुधारित व संकरित वाणांचा अधिकाधिक लागवडीसाठी वापर करणे तसेच शास्‍त्रोक्‍त पद्धतीने शेती व्‍यवसाय करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतीतून निरनिराळ्या पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेऊन स्वत:चे आर्थिक सशक्तीकरण करून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणे हे प्रथम कर्तव्य आहे. असे समजून पीक उत्पादन घेणे अत्यंत आवश्यक आहे. 
उगमस्‍थान 
हरभरा पिकाचे कुळ लेग्युमिनोसी हे असून मूलस्थान आशिया/ इथिओपिया आहे. भारतात हरभरा पिकाची लागवड फार वर्षांपासून केली जात आहे. ह्या पिकाचा उल्लेख वैदिक ग्रंथात चुनका‘,’चेतूला‘, या नावांनी आढळून येतो. इंग्रजीत या पिकास चिक पी,बेंगाल ग्राम अशी नावे आहेत.
हरभरा या पीकाला मराठी हरभरा‘ (Harbhara), हिंदीमध्ये चण्णा‘ (Chann), तर इंग्रजी ग्राम (Gram),’गारबेंझोबीनआदी नावाने ओळखले जाते. हरभरा या पिकाचे शास्त्रीय नाव ‘Cicer Arientinom’ असे आहे. जगात हरभरा उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. तसेच हरभरा या पीकाचा प्रक्रिया उद्योग व औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे.
भारतामध्ये लागवडी खाली असलेल्या चणा पिकाचे खालील प्रकारे वर्गीकरण करण्यात येते.
अ. देशी/तपकिरी चणा– 
सियसरऑरिटिनम ही जात सर्वात जास्त क्षेत्रावर लागवड करण्यात येते. 
ही उभी तसेच निमपसरी वाढणारी आहे. 
रोपांना फांद्या येण्याचे प्रमाण चांगले असते. 
आकार 5 ते 12 मी.मी. इतका असतो. 
गुण सूत्रांची संख्या 14,16,24,32 इतकी असते.
ब. कबुली / पांढरा चणा
सियरस कबुलियम ही जात उंच  सरळ वाढणारी आहे. 
रोपांना फांद्या येण्याचे प्रमाण  मध्यम असते. 
दाणे जाड, आकर्षक आणि पांढऱ्या रंगाचे असतात. 
याची उत्पादकता देशी चण्यापेक्षा कमी असते. 
गुणसूत्रांची संख्या 16 इतकी असते. 
महत्‍त्‍व 
भारतातील बहुतांशी लोकसंख्या शाकाहारी असून आपल्या शरीराची प्रथिनांची गरज भागविण्यासाठी प्रामुख्याने हरभरा व कडधान्य पिकांवर अवलंबून रहावे लागते. पिकाचा उपयोग मनुष्याच्या आहारात कडधान्य पीक म्हणून तसेच गुरांना खाद्य म्हणून प्रामुख्याने केला जातो. भारतात उत्पादन होणाऱ्या कडधान्यांपैकी 37 टक्के क्षेत्र व 50 टक्के उत्पादन हे हरभरा या पिकाखाली आहे. हरभरा हे प्रथिने तसेच ऊर्जेचे स्‍त्रोत असून त्यात कॅल्शियम, लोह आणि अमिनो आम्लाचे  प्रमाण जास्त असते. हरभरा या पिकात 21.1 टक्के प्रथिने, 61.5 टक्के कर्बोदक, 4.5 टक्के मेदाचे प्रमाण असते. हरभऱ्याचा उपयोग अक्खे भाजून तसेच उकडून, मीठ लावून खाण्यासाठी करतात. या पिकाची डाळ करून किंवा पीठ (बेसन) मिठाईचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. पिकाची ताजे पाने भाजी (साग) करण्यासाठी वापरतात. हरभरा पिकामध्ये औषधी गुणधर्म आहेत. याचा उपयोग रक्त शुद्धीकरणासाठी केला जातो. पिकाचे मोड आलेले दाणे स्कर्व्ही या आजाराच्या नियंत्रणासाठी वापरतात.
 
उत्‍पादन
हरभरा हे प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. भारत, पाकिस्तान, मेक्सिको, तुर्कस्थान, म्यानमार आणि इथिओपिया हे प्रमुख हरभरा उत्पादक देश आहेत. क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तान व्दितीय क्रमांकावर आहे. भारतात एकूण अंदाजे 12 दश लक्ष्य हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली असून या पिकापासून अंदाजे 40 मेट्रिक टन उत्पादन मिळते. पिकाची हेक्टरी उत्पादकता 915 किलोग्रॅम इतकी आहे. याचाच अर्थ असा की, भारतात हरभरा लागवडीस व उत्‍पादनास मोठा वाव आहे, मात्र प्रति हेक्‍टरी उत्‍पादकता कमी आहे. 
हरभरा पिकाची कमी उत्पादकतेची कारणे
हरभरा हे महत्‍त्‍वाचे कडधान्‍य पीक आहे. महाराष्‍ट्रात हरभऱ्याची लागवड रब्‍बी हंगामात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र अलीकडे हरभरा पिकांवर वेळोवेळी पडणारे कीड व रोग, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील तुटपूंजी भाव इ. बाबींमुळे हरभरा उत्‍पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे. यामागचे प्रमुख कारणे कोणती याविषयी माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.  
1) कृषी हवामान घटक
भारताच्या पूर्वेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडतो तसेच तेथील जमिनी पाणथळ प्रकारच्या आहेत. भारताच्या पश्चिमेकडील राज्यात कमी पाऊस पडतो तसेच कडधान्य पिकांच्या वाढीच्या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असतो तर तापमानही जास्त असते. त्यामुळे फुलगळ मोठया प्रमाणात होते व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कडधान्य पिके आम्‍लविम्‍ल निर्देशांक व खारपट होणाऱ्या जमिनीस फारच संवेदनशील आहेत. कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील जमिनी त्यामुळे हरभरा उत्पादनाठी चांगल्या नाहीत. 
कृषी हवामान घटक म्हणूनच हरभरा पिकांच्या कमी उत्पादनात महत्वाची भूमिका बजावतो. पिकाची पेरणी करताना बियाणे फेकून देणे ही सर्वात सोपी पद्धत वापरल्याने बियाणे जास्त वापरूनही रोपे खूप जवळजवळ असल्याने त्यात अन्न, पाणी, जागा, सूर्यप्रकाश याकरिता स्पर्धा होते. अशा रोपांची वाढ चांगली न झाल्याने फुले येणे, शेंगा येणे याचे प्रमाण घटते अशा पेरणी केलेल्या पिकात आंतरमशागतीचे कामे करणे जवळपास अशक्‍य असते. बहुतांश शेतकऱ्यांचा हरभरा लागवडीचा कल हा मिश्रपीक किंवा आंतरपीक पद्धतीतून असतो. त्यामुळे दुय्यम पीक घेतले गेल्याने पिकापासून उत्पन्न कमी प्रमाणात मिळते. काही ठराविक शेतकरी हे हरभरा पीक सलग क्षेत्रावर घेतात. 
2) अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची अनुपलब्धता
हरभरा पिकाच्या स्थानिक जाती खूप शाखीय वाढ होणाऱ्या, कमी उत्पादन देणाऱ्या, जास्त फुलगळ होणाऱ्या आहेत. हरभरा पिके भारतात हलक्या जमिनीत आणि कमी निविष्ठा वापरूनच घेण्यात येतात. आता संशोधनातून निवड करण्यात आलेल्या जाती ह्या मध्यम व्यवस्थापनास प्रतिसाद देणाऱ्या आहेत, परंतु या जाती शेतकऱ्याच्या शेतावर योग्य उत्पादन देत नाहीत. तसेच हरभरा पिकांचे जास्त उत्पादन देणाऱ्या जातींशी स्पर्धा करू शकत नाहीत. म्हणून हवामानात चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित  जातींचा शोध लावून त्यांची शेतकऱ्यांना उपलब्‍धता करून देणे आवश्यक आहे.
लागवड व्यवस्थापन
हरभरा पिकांचे लागवडीत योग्य व्यवस्थापन केले असता उत्पादनात वाढ होते असे आढळून आले आहे. हरभरा पीक बहुतांशी खताविना, कमी रासायनिक खताच्या मात्रा देऊन किंवा जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा वापर करण्याच्या उद्देशाने घेण्यात येतात. हरभरा पीक दुलर्क्षित व्यवस्थापनात घेण्यात येतात, ज्यामध्ये  पिकातून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, बहुवर्षायू तणांचे नियंत्रण, जमिनीची मशागत आणि निर्धारित रासायनिक खतांची मात्रा देणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येते. याचा परिणाम पिकांच्या कमी उत्पादनात होतो. हरभरा पीक त्यांच्या मुळावर असणाऱ्या रायझोबियम जिवाणूंच्या गाठींद्वारे हवेतील नत्र स्थिर करतात. ज्या जमिनीत द्विदलवर्गीय पिके घेण्यात येतात त्या-त्या पिकांसाठी योग्य रायझोबियम जीवाणूंच्या प्रजाती उपलब्ध असणे आवश्यक असते. अशा प्रजातीचे कडधान्य पेरणीची बीजप्रक्रिया करणे हे शेतकऱ्यांच्या गळी उतरवणे अत्यावश्यक आहे. शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अशा जिवाणू संवर्धकाची उपलब्धत नसते किंवा उपलब्ध झालेच तर ते चांगल्या प्रतीचे नसते. त्यामुळे हरभरा लागवडीसाठी उच्च दर्जाच्या कृषि निविष्ठा असणे आवश्यक आहे.
तणांचा वाढता प्रादुर्भाव
हरभरा पीक तणाशी स्पर्धा करून तणांचा प्रादुर्भाव कमी करतात. परंतु पीक वाढीच्या सुरुवातीच्या 20-25 दिवस या कालावधीत या पिकाची वाढ हळूवार होत असल्याने हरभरा पीक तणे यामध्ये स्पर्धा होते व त्यांचा परिणाम पीक उत्पादन घाटण्यावर होतो. हरभरा पिकांमध्ये तणांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हरभरा पिकामध्ये 30-50 टक्के पर्यंत उत्पादनामध्ये घट येते. 
किडींचा व रोगांचा वाढता प्रादुर्भाव
हरभरा पिकावर पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कोणत्याही अवस्थेत विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर, मुळ कुजव्‍या, करपा (ॲस्‍कोचायटा ब्‍लाईट) पानांवरील ठिपके, तांबेरा, माण कुजव्‍या (कॉजरा रॉट), बॅट्रेट्रीस ग्रे मोल्‍ड, खोड कुज (स्‍कलेरोटिनिया स्‍टेम रॉट) त्यादी रोगांचा उपद्रव होतो. संशोधनाद्वारे विकसित नवीन जाती या रोगास प्रतिकारक अशा आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही रोगांना त्या बळी पडून पीक उत्पादनात खूप मोठी घट येते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्था या महत्वाच्या अवस्थांमध्ये किडींची जास्त पिकास हानी पोचण्याची शक्यता असते. हरभऱ्यावरील पाने पोखरणारी अळी (लिफ मायनर), मुळे कुतरडणारी अळी (कटवर्म), शेंगा खाणारी अळी, घाटे अळी (अमेरिकन बोंडअळी) या किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे जवळपास 60 ते 70 टक्के नुकसान होते.    
6) गुणवत्तापूर्ण संशोधनाचा अभाव
भारतातील कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्राद्वारे विभागवार हरभरा पिकांवर संशोधन करण्यात येत आहे. हरभरा पिकांच्या नवनवीन सुधारित व संकरित जातींचा शोध लावण्यात आला आहे. या जाती शेतकऱ्यांच्या शेतावर कमी उत्पादन देणाऱ्या, एकाचवेळी फुले व शेंगा न येणाऱ्या, खतांचा जादा मात्रांना प्रतिसाद न देणाऱ्या, सिंचन व मशागतीला योग्य प्रतिसाद न देणाऱ्या, विविध पीक पद्धतीत चपखलपणे न बसणाऱ्या, किडी व रोगास कमी प्रमाणात प्रतिकार करणाऱ्या जमिनीत व हवामानात येणाऱ्या जाती विकसित करण्यात आलेल्या नाहीत. तसेच आम्लविम्ल निर्देशांक, निचरा न होणाऱ्या जमिनींवर चांगले उत्पादन देणाऱ्या जातींचा शोध लागणे गरजेचे आहे.
7) शेतकऱ्यांच्या आर्थिक  सामाजिक समस्या
भारतातील बहुतांश शेतकरी अल्‍पभूधारक व अत्‍यल्‍प शेती गटात मोडतात. या शेतकऱ्यांचा कल हा तृणधान्ये पिकवण्याकडे तसेच नगदी पिके घेण्याकडे असतो. त्यामुळे हरभरा पीक सलग क्षेत्रावर न घेता मिश्र, आंतरपीक म्हणून घेऊन स्वतःची गरज भागवतो. या शेतकरीवर्गास शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळत नाही. नवनवीन संशोधनाची माहिती, नवीन बियाण्याची उपलब्धता होत नाही. त्यामुळे शेतकरी आपल्याकडील उपलब्ध बियाणे पेरणीसाठी वापरतो, त्यामुळे उत्पादनात घट येते. अल्‍पभूधारक शेतकरी बाजारात उपलब्ध कडधान्य पिकाचे बियाणे जास्त महाग असल्याने ते खरेदी करू शकत नाहीत. हरभरा पिकास हमी भाव, साठवणुकीस गोदामांची उपलब्धतता व विक्री व्यवस्था या काही महत्वाच्या अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. अशा अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे किफायतशीर उत्पादन घेणे  शक्य होत नाही. 
हवामान  
हरभरा पीक‍ उष्णसमशीतोष्ण कटिबंधातील  असल्यामुळे या पिकाला विशेषत: 20 दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान 100 अंश ते 150 अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान 250 अंश ते 300 अंश सें.ग्रे. असावे लागते. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. त्यामुळे असे वातावरण हरभरा पिकास पोषक व वाढीसाठी उत्तम ठरते. 
जमीन  
हरभरा पीक मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक 700 ते 1000 मि.मी. पर्जन्यमान असणाऱ्या भागाती जमिनीत जिरायती हंगामात हरभरा चांगला येतो. हालकी, चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.  उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.
पूर्व मशागत  
पीक लागवडीसाठी व पेरणीपूर्वी जमिनीत जी मशागत केली जाते त्‍या मशागतीस पूर्वमशागत असे म्‍हणतात. हरभरा पीक आपल्याडे रब्बी हंगामात येत असल्यामुळे त्याला फारशी पूर्व मशागतीचे कामे करण्याची गरज भासत नाही, परंतु हरभरा पेरणीपूर्व मशागतीचे कामे करताना जमिनीत योग्‍य प्रमाणात ओलावा असणे गरजेचे असते. पिकाची लागवड करीत असताना जमिनीची खोलवर नांगरणी, बैलाच्‍या दोन ते तीन पाळ्या देणे, जमिनीत सेंद्रिय खते चांगले मिसळून टाकणे लागवडीपूर्वी जमिनीत तणनाशकाचा वापर करणे इत्‍यादी महत्‍त्‍वाची कामे करावी लागतात. त्यामुळे हरभरा पिकाचे उत्पादन चांगले घेणे शक्य होईल.  
पिकांचे सुधारित वाण  
कोणत्‍याही पिकाचे उत्‍पादन हे बियाणे, जाती व त्‍यातील असलेल्‍या आनुवंशिक व भौतिक गुणधर्मावर आधारित असते. म्‍हणून पिकाचे दर्जेदार व अधिकाधिक उत्‍पादन घ्‍यावयाचे असेल तर सुधारित वा संकरित जातींचा प्राधान्‍याने लागवडीसाठी अवलंब करावा. हरभरा पिकाच्‍या चाफा, अन्निगेरी,एन 59, बी.डी.एन. 9/3 विकास असे जुने वाण रोगाला बळी पडतात म्हहणून जुने अथवा स्थानिक वाण न वापरता सुधारित वाण पेरणीसाठी वापरावे. विश्वास हा चांगला उत्पादन देणारा वाण आहे. तथापि अलीकडे या वाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने या वाणाऐवजी नवीन वाण विशाल, दिग्विजय हे वाण पेरणीसाठी वापरावे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय हे वाण अतिशय चांगले आहेत. काबूली वाणामध्ये विराट, काक 2 हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत.
तक्‍ता क्र. 1 : हरभरा पिकाचे काबुली व गुलाबी वाणांची प्रमुख वैशिष्‍ट्ये
अ.
क्र.
हरभरा वाण
कालावधी (दिवस)
उत्‍पादन
प्रमुश वैशिष्‍ट्ये
1
श्‍वेता (आयसीसीव्‍ही 4-2)
85-0
10-15 (बागायती)
काबुली वाण, दाणे टपोरे
2
पीकेव्‍ही (2-काबुली)
100-110
15-18 (जिरायत)
20-25 (बागायती)
काबुली वाण, अतिशय टपोरे दाणे
3
विराट (फुले जी 94418)
100-105
10-12 (जिरायत)
20-25 (बागायती)
काबुली वाण, अतिशय टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक
4
हिरवा चाफा
(एकेजीएस-1)
105-110
18-20 (बागायती)
ओलितासाठी योग्‍य, वाळल्‍यानंतर दाणे हिरवे राहतात.
5
डी-8
135-145
15-16
फुटाण्‍याकरिता उत्‍कृष्‍ट
6
गुलक-1
135-145
14-15
फुटाण्‍याकरिता योग्‍य, टपोरे दाणे
तक्‍ता क्र. 2 : हरभरा पिकाचे सुधारित वाणांची प्रमुख वैशिष्‍ट्ये
अ.
क्र.
हरभरा वाण
कालावधी (दिवस)
उत्‍पादन
प्रमु वैशिष्‍ट्ये
1
बीडीएन-93
110-105
10-11 (जिरायत)
18-20 (बागायती)
लवकर तयार होणारा, पाण्‍याचा ताण सहन करणारा, मर रोग प्रतिकारक, दाणा लहान.
2
बीडीएनजी-797 (आकाश)
105-110
18-24 (कोरडवाहू)
पिवळसर टपोरे दाणे, कोरडवाहूसाठी उत्तम
3
फुले जी-12
105-110
10-12 (जिरायत)
20-25 (बागायती)
मर रोग प्रतिकारक, दाणे मध्‍यम आकर्षक पिवळे
4
फुले जी-5 (विश्‍वास)
105-110
25-30 (बागायती)
घाटे लांब मोठे, हिरवा हरभरा म्‍हणून चांगला
5
विजय
110-115
15-18 (जिरायत)
पाण्‍याचा ताण सहन करणारा, मर राग प्रतिकारक, जिरायती व बागायतीसाठी योग्‍य, उशिरा पेरणीसाठी शिफारस
6
विशाल
110-115
15-20
दाणे टपोरे, बागायती व कोरडवाहूसाठी योग्‍य
7
दिग्विजय
105-110
14-15 (जिरायत)
30-35 (बागायती)
दाणे मध्‍यम आकारचे बागायती व कोरडवाहूसाठी योग्‍य
8
जॅकी-9218
105-110
18-20
टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक
9
साकी
105-110
16-18
मर रोग प्रतिकारक
हेक्‍टरी बियाणे 
हरभरा पिकाचे उत्‍पादन घेताना जमिनीच्‍या प्रकारानुसार बियाण्‍याच्‍या प्रमाणात फरक पडत असतो. हरभऱ्यामध्‍ये विविध जातींच्‍या बियाण्‍याचा आकार‍ भिन्‍न आहे त्‍यामुळे हरभऱ्याच्‍या जतीनुसार बियाण्‍यांचे पेरणीतील प्रमाण वेगवेगळे आहे.
तक्‍ता क्र. 3 : हरभऱ्याचे सुधारीत वाणाचे हेक्‍टरी  बियाणे प्रमाण  
अ.क्र.
वाण
हेक्‍टरी बियाणे (किलो)
1
बीडीएन 9-3, फुले जी-12
60-65
2
विकास, विजय
65-70
3
विश्‍वास, विशाल, श्‍वेता, विराट,दिग्विजय, पीकेव्‍ही-2
60-65
बीजप्रक्रिया 
कोणत्‍याही बियाण्‍यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्‍यंत गरजेचे असते. त्‍यामुळे बियाण्‍याची उगवण क्षमता वाढते व बियाण्‍यास कीड व रोगापासून संरक्षण होते. यामुळे हरभऱ्याची सुध्‍दा बीजप्रक्रिया करावी लागते. पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या प्रतिकिलो बियाण्यास 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बन्डेझिम एकत्र करून प्रतिकिलो बियाण्यास चोळू बीजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर जिवाणू संवर्धन रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्‍यास लावून चोळावे आणि काही वेळ बियाणे सुकविण्‍यासाठी ठेवावे. व त्‍यानंतर लगेच पेरणी करावी. 
लागवड हंगाम 
हरभऱ्याची पेरणी आपल्‍याकडे रब्‍बी हंगामात करतात. सर्वसाधारणपणे 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर या कालावधीत हरभऱ्याची पेरणी होणे आवश्‍यक आहे. यानंतर सुध्‍दा हरभऱ्याची पेरणी करता येते मात्र उत्‍पन्‍नात घट येते. त्‍यामुळे दर्जेदार उत्‍पादन घ्‍यावयाचे असेल तर हरभऱ्याची पेरणी शक्‍यतो वेळेवर करावी. हरभरा पीक भारतात व महाराष्‍ट्रात प्रामुख्‍याने दोनच हंगामात घेतले जाते. रब्‍बी व बागायती हंगामाचा समावेश होतो. या हंगामातील हवामानुसार वेगवेगळ्या हंगामात वेगळी पिके घेता येतात.
अ) रब्‍बी हंगाम : 15 नोव्‍हेंबर 15 जानेवारी पर्यंत 
ब) बागायती : 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर पर्यंत
हरभरा पेरणी पद्धती 
जिरायत क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी 10 सें.मी. खोलवर करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्‍याची सोय असल्‍यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्‍हेंबर दरम्‍यान करतात. तसेच बागायती क्षेत्रात कमी खोलीवर 5 सें.मी. हरभऱ्याची पेरणी केली जाते. पेरणी लवकर किंवा उशीरा केल्‍यास पीक उत्‍पादनात घट होऊन नुकसान होते. त्‍यामुळे पेरणी वेळेवरच करावी लागते. पेरणी लवकर केल्‍यास बियाण्‍याची उगवण क्षमता घटते तर पेरणीस उशीर झाल्‍यास जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतोव बियाणे ओलाव्‍या अभावी उगवत नाही. तसेच पिकाच्‍या वाढीसाठी आवश्‍यक तेवढी थंडी मिळत नाही. त्‍यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फूले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. आणि दोन रोपातील अंतर 10 सें.मी. राहील व काही काबूली वाणासाठी दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपातील अंतर 15 सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी.
अ) पारंपारिक पेरणी पद्धती 
1) पेरणी (ड्रिलिंग)
आपल्‍याकडे अजूनही हरभरा या पिकाची पेरणी पारंपारिक पद्धतीने केली जाते. सामान्यत: देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने दोन ओळीतील अंतर 30 सेंमी रहावे व दोन रोपातील 10 सेंमी अंतरावर करतात. या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो तर विशाल, विराट किंवा पी.के.व्ही – 2 या वाणांचे हेक्टरी 100 किलो बियाणे पुरेशे लागते. भारी जमिनीत 90 सेंमी रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरब्यांच्या दोन्ही बाजूला 10 सेंमी अंतरावर 1 ते 2 दाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करुन वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.   
2) टोकण पद्धत (डिबलिंग)
महाराष्‍ट्रात हरभरा पिकाची लागवड ही टोकण पद्धतीने केली जाते. टोकण पद्धतीचा वापर भारी जमिनीत व बागायती क्षेत्रात प्रामुख्‍याने केला जातो. भारी जमिनीत 90 सें.मी. रूंदीच्‍या सऱ्या सोडतात आणि वरब्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूस 45 X 10 सें.मी. अंतरावर 1-2 बिया टोकूण लागवड केली जाते. काबूली हरभऱ्याच्‍या लागवडीसाठी टोकण पद्धतीचा महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणावर वापर करतात. टोकण पद्धतीने हरभरा पिकाची लागवड करण्‍यासाठी 45-50 किलो प्रति हेक्‍टरी बियाण्‍याची गरज लागते. टोकण पद्धतीमुळे लागवडीच्‍या बियाण्‍याची बचत होते व उत्‍पादनात चांगली वाढ होते.
ब) आधुनिक पेरणी पद्धती 
1) बैलचलित पेरणी यंत्र 
केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍था (CRIDA), हैद्राबाद येथे विकसित केलेले बैलचलित बहुपीक टोकण यंत्र आहे. हे यंत्र दोन, तीन किंवा चार फणामध्‍ये उपलब्‍ध आहे.
सोयाबीन, तूर, मका, हरभरा, भुईमूग, ज्‍वारी, उडीद, मूग, बाजरी, वाटाणा व गहू इ. पिकाच्‍या पेरणीसाठी वापरता येते. यामध्‍ये बियाण्‍यासाठी व खतांसाठी वेगळी व्‍यवस्‍था केलेली आहे. प्‍लॅस्टिक तबकड्याद्वारे बियाणे पाडण्‍याची क्रीया केली जाते. त्‍यामुळे खत व बियाणे योग्‍य प्रमाणात नियंत्रित होते.  या यंत्राने पेरणी केल्‍यास एका दिवसात  1 ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करता येते.
2) ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र 
महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांनी विकसित केलेले हे पेरणी यंत्र ट्रॅक्‍टरचलित असून या यंत्राने ज्‍वारी, सूर्यफूल, करडई, मका, हरभरा, सोयाबीन इ. पिकांची पेरणी करता येते. ट्रॅक्‍टर चलित पेरणीयंत्र हे बैचलित पेरणी यंत्राप्रमाणे आहे. फक्‍त यामध्‍ये बियाणे व खतांच्‍या पेटीचा आकार वाढविलेला आहे. या यंत्रामध्‍ये बियाणे नियंत्रित करण्‍यासाठी प्‍लॅस्टिक रोटर वापरले आहेत. खत नियंत्रणासाठी फ्युटेरोलरची सोय आहे. यामध्‍ये दोन फणांतील अंतर कमी-जास्‍त करता येते. या यंत्राणे 6 ते 9 ओळी एका वेळेस पेरणी करता येतात. या यंत्राने 10 ते 12 एकर क्षेत्र एका दिवसात पेरणी करता येते. ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी केल्‍यास मनुष्‍याची गरज भासत नाही. कमी वेळात व कमी श्रमात जास्‍त क्षेत्र पेरणी करता येणे सुलभ झाले आहे. ज्‍या ठिकाणी शेतमजूरांचा अभाव आहे अशा ठिकाणी या पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी केली जाते.
आधुनिक लागवडीचे फायदे 
 • अधिक कार्यक्षमता असल्‍यामुळे वेळेवर पेरणी पूर्ण होते. 
 • योग्‍य खोलीवर बियाणे व एकाच वेळी पेरणी करता येते.
 • वेळेची 25-30 टक्‍के बचत होते.
 • कमी वेळेत व कमी श्रमात जास्‍त क्षेत्र पेरणी करता येते.
 • बियाण्‍याची 20-25 टक्‍के बचत होते.
 • मजूरांच्‍या खर्चात 55-60 टक्‍के बचत होते.
 • वेळेवर पेरणी करणे शक्‍य झाले.
 • वेगवेगळ्या पीक पद्धतींचा वापर करता येतो.            
 • पीक उत्‍पादनामध्‍ये 15-30 टक्‍के वाढ होते. 
आंतरमशागत 
शेतात पीक उभे असतांना जी मशागत करतात तिला आंतरमशागत असे म्‍हणतात. एखादे पीक पेरणीनंतर त्‍या पिकाच्‍या काढणीपर्यंत त्‍या पिकामध्‍ये जी मशागत केली जाते त्‍या मशागतीला आंतरमशागत असे म्हणतात. हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी व उत्तम उत्‍पादनासाठी शेत हे सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी आंतरमशागतीचे कामे करावी लागतात. हरभऱ्यात तणे काढणे, खुरपणी करणे,  झाडांची विरळणी अथवा नांगे भरणे, पीकसंरक्षण, खते व सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा, पाणी देणे, आदी कामांचा समावेश होतो.  
आंतरपिके 
आंतरपीक म्‍हणजे मुख्‍य पिकांबरोबरच इतर कमी कालावधीचे घेतले जाणारे दुय्यम पिकास आंतरपीक असे म्‍हणतात. आंतरपीक पद्धतीत एकाच शेतात, एकाच हंगामात दोन पिके घेण्‍यात येतात. त्‍यात एक प्रमुख पीक असते, तर दुसरे दुय्यम पीक असते. पिकांची पेरणी ओळींच्‍या ठराविक प्रमाणात केली जाते.
हरभरा हे पीक कमी कालावधीचे (110 दिवस) असल्‍यामुळे जास्‍त करून यात आंतरपिकांचा समावेश कमी प्रमाणात होतो, तर ऊस, तूर, ज्‍वारी यामध्‍ये आंतरपीक म्‍हणून घेतले सर्रास जास्‍त प्रमाणात घेतले होते. तथापि हरभरा हे रब्‍बी हंगामात पीक येत असल्‍याने हरभरा पिकाबरोबरच मोहरी, करडई, ज्वारी इ. आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.
आंतरपीक उत्‍पन्‍न 
हरभरा पिकात इतर दुय्यम पीक हरभरा+ मोहरी, हरभरा+करडई तसेच ऊसामध्‍ये देखील हरभरा सरी/वरंबावर घेतला जातो. वेगवेगळ्या पीक लागवडीचे आंतर वेगळे असते. कारण दुय्यम पीक मुख्‍य पिकांवर अन्‍नद्रव्‍ये तसेच जमिनीतील ओलावा शोषून घेण्‍यासाठी स्‍पर्धा करणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून उत्‍पादनात घट होणार नाही.
आंतरपिकाचे फायदे 
 1. जमिनीतील उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.
 2. आंतरपिकामुळे उत्‍पन्‍न जास्‍त मिळते.
 3. मुख्‍य पिकांच्‍या लागवडीचा खर्च काही प्रमाणात भरून काढता येऊ शकतो.
 4. उपलब्‍ध जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेता येऊ शकतो.
 5. कमी जमीन क्षेत्रावर असलेल्‍या शेतकऱ्यांना आंतरपीक पद्धतीचा जास्‍त फायदा होतो. 
 6. आंतरपीक कमी वेळेत जास्‍त उत्‍पादन देणारे पीक आहे.
आंतरपिकाचे तोटे/मर्यादा 
 • मुख्‍य पिकांना हवा, पाणी व इतर अन्‍नद्रव्‍यांसोबत आंतरपीक सतत स्‍पर्धा करीत असतात.
 • आंतरपिकासाठी लागवड व्‍यवस्‍था ही वेगळ्या स्‍वरूपाची करावी लागते.
 • आंतरपिके कमी कालावधीची असावी नाहीतर मुख्‍य पिकांना अडथळा होतो.
 • आंतरपिकांमुळे मुख्‍य पिकाचे उत्‍पादनात काही प्रमाणात घट येऊ शकते.

खत व्‍यवस्‍थापन   

हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्‍यासाठी खताची मात्रा योग्‍य प्रमाणात देणे गरजेचे आहे. पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्‍फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी म्‍हणजेच 125 किलो डायअमोनियम फॉस्‍फेट डी.ए.पी. अधिक 50 किलो स्‍फुरद म्‍युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेट अधिक 50 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्‍टरी द्यावे. संतुलित खतांच्‍या वापरामुळे उत्‍पादनात अंदाजे 18.55 टक्‍के इतकी वाढ झाल्‍याचे आढळून आले आहे. पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्‍के युरियाची पहिली फवारणी करावी आणि नंतर 10-15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. त्‍यामुळे पीक उत्‍पादनात वाढ होते. 

पाणी व्‍यवस्‍थापन 
हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असणारे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी, 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीत भेगा पडण्यास सुरू होण्याआधी पाणी द्यावे. मोठया भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास खूप पाणी बसते आणि अति पाण्यामुळे हरभरा उमळून जातो. पिकात पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के उत्पादनात वाढ होते. दोन पाणी दिल्यास 60 टक्के वाढ होते आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकास फुलोरा ते दाणे भरण्‍याचा कालावधीत पाण्‍याची जास्‍तीत जास्‍त आवश्‍यकता असते. हरभरा पिकाच्‍या पाणी देण्‍याच्‍या 2 मुख्‍य अवस्‍था आहेत. एक म्‍हणजे फांद्या फुटताना व दुसरे घाटे भरताना पाण्‍याच्‍या पाळ्या देणे गरजेचे असते. सिंचनाची जरी व्‍यवस्‍था असेल तरी अतिशय हलके पाणी या पिकास द्यावे. 
हरभरा : पाणी देण्‍याच्या आधुनिक पद्धती (Modern methods of watering a gram)
हरभरा पिकास पाणी देण्‍याच्‍या प्रचलित पद्धतीच्‍या तुलनेत तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतींना अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. आधुनिक पद्धतीमुळे कमी पाण्‍यात जास्‍त क्षेत्र ओलिताखाली आणता येते. आधुनिक पद्धतीमध्‍ये तुषार सिंचनात अंदाजे 25-30 टक्‍के तर ठिबक सिंचनात अंदाजे 3545 टक्‍के पाण्‍याची बचत होते. पीक उत्‍पादनात अंदाजे 1520 टक्‍के वाढ होते. पाण्‍यासोबत खते देता येतात. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे पिकांना प्रमाणशीर पाणी देणे शक्‍य झाले आहे.  
तण नियंत्रण (Wood Control)
हरभरा शेतीची नियमित खुरपणी करून बागेतील तण काढून टाकावेत. खुरपणी करताना हरभराच्‍या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही. हरभरा पिकाची वेळेवर खुरपणी नाही केल्यास अथवा बंदोबस्त नाही केल्यास एकूण उत्पादनाच्या 30-40 टक्‍के घट होते. यामुळे शेतातील तणांचे एकात्मिक तण नियंत्रण करणे गरजेचे असते.
तण नियंत्रण उपाय
तणांच्‍या बंदोबस्‍ताच्‍या पद्धतीची दोन गटांत विभागणी करता येते. अ) प्रतिबंधात्‍मक उपाय ) निवारणात्‍मक उपाय
अ) प्रतिबंधात्‍मक उपाय 
तणे उगवण्‍यापूर्वीच त्‍यांची वाढ होऊ नये म्‍हणून वारल्‍या जाणाऱ्या पद्धतींचा समावेश या गटात होतो. तणांचा प्रसार होऊन नवीन ठिकाणी त्‍यांचा प्रादुर्भाव न होण्‍यासाठी वापरल्‍या जाणाऱ्या तण बंदोबस्‍ताच्‍या पद्धती : हरभरा पिकाचे प्रमाणित व स्‍वच्‍छ बी वापरावे. धान्‍य निवडल्‍यानंतर राहिलेले तणांचे बी मिसळलेले धान्‍य अगर तणांचे बी असलेले गवत जनावरांना चारण्‍याचे टाळावे. तणांच्‍या बियांची उगवणक्षमता नष्‍ट करण्‍यासाठी ती दळावीत, शिजवावीत अथवा अन्‍य मार्गाने त्‍यांची उगवणक्षमता नष्‍ट करावी. तणयुक्‍त शेताची मशागत केल्‍यानंतर कुळप, कोळपी, कापणीयंत्रे, गवत कापण्‍याची यंत्रे इ. औजारांच्‍या साह्याने तण नियंत्रण करावे. वरच्‍यावर स्‍वच्‍छता मोहिम राबवून शेतीभोवतालची कुंपणे, कोपरे, बांध इ. तणमुक्‍त करावे.  
) निवारणात्‍मक उपाय 
तणांचा प्रादुर्भाव शेतामध्‍ये झाल्‍यानंतर तणांची तीव्रता कमी करण्‍यासाठी वापरावयाच्‍या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. यामध्‍ये प्रामुख्‍याने भौतिक, मशागत व यांत्रिक पद्धतीचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्‍छादनाचा वापर करणे. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी मशागत, रासायनिक, यांत्रिक व जैविक पद्धतीचा वापर करावा. तसेच तंणाचा प्रादूर्भाव जास्त असल्यास खाली दिलेल्या रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणनियंत्रण करावे.
तक्‍ता क्र. 4 : हरभरा पिकातील रासायनिक पद्धतीने एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन
वापरावयाच्‍या तणनाशकाचे शास्‍त्रीय नाव
तणनाशकाचे प्रमाण प्रति 10 लिटर पाण्‍याकरिता
तणनाशकामुळे नियंत्रित होणारे तणांचे प्रकार
तणनाशक वापरण्‍याची पद्धत
ॲट्राझीन 5.0 टक्‍के डब्‍लयू.पी.
40 ते 80 ग्रॅम
सर्व प्रकारची तणे
पीक व तणे उगवण्‍यापूर्वी हेक्‍टरी 500 लीटर पाण्‍यातून फवारणी करावी व पेरणीनंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी.
280 सी सोडियम 4 टक्‍के डब्‍लू.पी.
25 ते 36 ग्रॅम
वार्षिक व बहुवार्षिक रूंद पानाची तणे
पेरणी नंतर 3 ते 4 आठवड्यानंतर हेक्‍टरी 500 लीटर पाण्‍यातून फवारणी करावी.
हरभरा किडींचे नियंत्रण 
हरभरा पिकावर हवामानातील प्रतिकूल बदलामुळे मुख्‍यत्‍वे करून घाटे अळी (हेलीकोर्व्‍हपा), मुळे कुरतडणारी अळी (कटवर्म), पाने पोखरणारी अळी (लिफ मायनर), रस शोषक कीड मावा यांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो.
1) घाटे अळी (अमेरिकन बोंडअळी)
घाटेअळी ही बहुभक्षी कीड 181 पेक्षा जास्‍त वनस्‍पतीवर उपजीविका करू शकते. कमी उत्‍पन्‍नाच्‍या अनेक कारणांपैकी घाटेअळीचा प्रादुर्भाव हे मुख्‍य कारण होय. घाटेअळीचा जीवनक्रम हा घाटेअळी प्रौढ मादी 300 ते 500 अंडी देते. ही अंडी पानाच्‍या देठावर तसेच कळ्या व फुलांवर एकेक या प्रमाणे टाकली जातात. अंडी गोलाकार हिरवट पिवळी असतात. अंड्यातून 5 ते 7 दिवसात कालावधी लागतो. अळीचा रंग हिरवट असून तिच्‍या शरीरावर तूटक अशा गर्द करड्या रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी 35 ते 50 मि.मी. लांब असते. कोषावस्‍था एक आठवड्यापासून ते महिनाभर टिकते. एका वर्षात घाटे अळीच्‍या 6 अ‍थवा अधिक पिढ्या पूर्ण होतात. हरभऱ्यावर लहान-लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, कळया व फुले खरवडून खातात. घाटे लागताच अळया कुरतडून नुकसान करतात. घाटे खात असताना त्‍या शरीराचा पुढील भाग घाट्यामध्‍ये खूपसून व बाकी भाग बाहेर ठेऊन दाण्‍यावर उपजीविका करतात. या अळीमुळे सर्वसाधारण हरभऱ्याचे 5 ते 38 टक्‍के पर्यंत नुकसानीची पातळी जाऊ शकते.
नियंत्रण : पिकाची पेरणी वेळेवर करावी. शिफारस केलेल्‍या वाणांचीच (फुले जी-12, साकी-9516, विश्‍वास, विजय, विशाल, विराट इ.) योग्‍य अंतरावर पेरणी करावी. हरभरा पिकात आंतरपीक अथवा मिश्र पीक म्‍हणून जवस, कोथींबर व मोहरी या पिकाची लागवड करावी. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्काची 25 किलो/ हे. पहिली फवारणी करावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावे. असे एकूण 100 लिटर द्रावण 20 गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकील विषाणूग्रस्त अळ्यांचे द्रावण 500 मि.लि. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. हरभरा पिकाचे घाटे अळीमुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते. पीक 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळया दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. यावेळी लिंबोळीच्या 5 टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी. 
2)  मुळे कुतरडणारी अळी (कटवर्म)
ह्या किडींचा प्रादुर्भाव हरभऱ्यासोबतच टोमॅटो, भेंडी, बटाटा, मिरची, भोपळा व कांदा या पिकावर अधिक आढळतो. मुळे कुतरडणारी अळीचा जीवनक्रम मादी पतंग पांढऱ्या रंगाची 1500 पर्यंत गोलाकार अंडी जमिनीवर अथवा झाडाच्‍या विविध भागावर घालते. अळ्या काळपट तपकिरी रंगाच्‍या असून स्‍पर्श करताच अंग आखडून घेतात व गोलाकार होतात. पूर्ण वाढ झालेली अळी 40 मि.मी. लांब असते. अंडी अवस्‍था, अळी अवस्‍था व कोषावस्‍था अनुक्रमे 4 ते 7, 10 ते 30 10 ते 30 दिवसांपर्यंत पूर्ण होते. प्रौढ पतंग 25 मि.मी. लांब असून त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे तर पंख तपकिरी रंगाचे तर मागील पंख पांढरट रंगाचे असतात. जमिनीच्‍यावर किंवा खाली अळी रोपे, शेंडे अथवा फांद्या कापते. काही ठिकाणी प्रादुर्भाव 30 टक्‍के पर्यंत असू शकतो. ह्या किडीची अळी निशाचर असते त्‍यामुळे ती दिवसा जमिनीत राहते व रात्री बाहेर येऊन जमिनीलगत रोपांना कुरतडते.
नियंत्रण : पिकास वेळोवेळी खुरपणी करावी किंवा पिकाला हलके पाणी द्यावे, त्‍यामुळे जमिनीत दडून बसलेल्‍या अळ्या बाहेर येऊन पक्षाचे भक्ष बनतील. प्रादुर्भावग्रस्‍त शेतात सायंकाळी ठिकठिकाणी गवतांचे पुंजके ठेवावेत व दुसरे सकाळी पुंजकेखाली दडलेल्‍या अळ्या जमा करून नष्‍ट कराव्‍यात. जर अळीचा प्रादुर्भाव जास्‍त असेल तर जमिनीत मिथाईल पॅराथिऑन 2 टक्‍के भुकटी हेक्‍टरी 20 किलो याप्रमाणात धुरळणी प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
3) हरभऱ्यावरील पाने पोखरणारी अळी (लिफ मायनर)
या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्‍या प्रथमावस्‍थेत कमी जास्‍त प्रमाणात आढळून येतो. या कीडींचा जीवनक्रम मादी पंतग पानांवर छिद्र पाडून अंडी देते, अंडी अवस्‍था 4 दिवसांनी असते, अळी पिवळ्या रंगाची असते, अळी अवस्‍था एक आठवड्याची असते, पूर्ण वाढ झालेली अळी 3 मि.मी. लांब असते. कोषावस्‍था ही जमिनीत आढळते किंवा काही वेळा पानांच्‍या गुच्‍छामध्येही आढळते. एक पिढी पूर्ण होण्‍यास साधारणपणे तीन आठवड्याचा कालावधी लागतो. अळी पाने पोखरून आतील हरितद्रव्‍यांवर उपजीविका करते, यामुळे पानाच्‍या वरच्‍या बाजूस नागमोडी आकाराच्‍या रेषा निर्माण होतात व प्रादुर्भाव जास्‍त झाल्‍यास पानांची गळसुद्धा होऊ शकते.
नियंत्रण : किडींचा प्रादुर्भाव जास्‍त आढळून आल्‍यास डायमिथोएट 35 टक्‍के प्रवाही 15 मि.ली. किंवा कार्बारील 50टक्‍के पाण्‍यात मिसळणारी भुकटी 20 ग्रॅम  10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.
4) मावा (Aphids)
मावा या किडींचा जीवनक्रम मावा मृद शरीराचा,अर्ध गोलाकार, प्रौढ अवस्‍था 2 मि.मी. लांब व रंगाने चमकदार हिरवट काळ्या रंगाचा असतो. बऱ्याचदा पंख असलेला मावाही आढळून येतो. पिल्‍लावस्‍था ही प्रौढ अवस्‍थेप्रमाणेच परंतु आकाराने लहान असते. एक मादी दिवसाला 8 ते 25पिल्‍लांना जन्‍म देते. 10 ते 15दिवसांत पिल्‍लांची पूर्ण वाढ होते. अनुकूल हवामानात एक आठवड्यात एक पिढी तयार होऊ शकते. मावा ही किड बहुसंख्‍येने राहून झाडावरील शेंडे, फांद्या, फुले व घाटे यावर राहून रस शोषण करते. रोपे अवस्‍थेत माव्‍याचा प्रादुर्भाव झाल्‍यास पाने आकसतात, त्‍यामळे पानांवर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.
नियंत्रण  : प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. या किडीसोबतच भक्षक किडी जसे ढालकिडा ही मित्र कीड भरपूर संख्‍येने आढळून येते. त्‍यामुळे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्‍याचे टाळावे, ज्‍यामुळे या मित्रकिडीचे संरक्षण व संवर्धन होईल. किडीचा प्रादुर्भाव जास्‍त आढळून आल्‍यास डायमेथोएट 30 टक्‍के प्रवाही 10 मि. ली.   प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.
तक्तार क्र. 5 : हरभरा किडी नियंत्रणासाठी रासायनिक औषधांची माहिती
अ.
क्र.
कीटकनाशक
कीटकनाशकाचे प्रमाण प्रती 1 लिटर
प्रमाण
प्रती 10 लिटर 
1
क्लोरअँन्ट्रीनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही
2.5 मिली
10 लि.
2
इमामेकटींन बेंझोएट 5 टक्के
4.5 ग्रॅम
10 लि.
3
क्लोरोपायरीफॉस 20 टक्के
25 मिली
10 लि.
4
सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही
8 मिली
10 लि.
5
डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही
10 मिली
10 लि.
6
फ्लूबेंडीअमाईड 48 टक्के प्रवाही
2.5 मिली
10 लि.
हरभरा रोगांचे नियंत्रण 
हरभरा हे महत्‍त्‍वाचे कडधान्‍य पीक असून त्‍याच्‍या उत्‍पादनात रोगांमुळे मोठी घट येते व आर्थिक नुकसान होते. हे टाळण्‍यासाठी हरभरा पिकाचे विविध रोगांपासून संरक्षण प्रभावीपणे करणे अत्‍यंत गरजेचे असते.
1) मर रोग (Wilt)
हा रोग फ्युजॅरीयम’ ‘ऑक्‍झीस्‍फोरम या बुरशीमुळे होतो.  हरभरा या पिकास कोणत्‍याही अवस्‍थेत बळी पडून झाडे कोलमडून मरतात. रोगग्रस्‍त झाडे कोमेजून जमिनीवर आडवी पडतात त्‍यांचा हिरवा रंग नाहीसा होऊन पिवळी दिसू लागतात. खोडे उभे कट केले असता खोडाचा आतील भाग गडद, तपकिरी व काळपट रंगाचा दिसतो. रोगाचा प्रतिसाद वाढल्‍यास संपूर्ण पाने पिवळसर तपकिरी रंगाची दिसू लागतात. तसेच फांद्या जमिनीच्‍या दिशेने लोंबकाळतात. संपूर्ण झाड वाळण्‍यास सुरुवात होते. या रोगाचा प्रसार उष्‍ण व कोरड्या वातावरणात जास्‍त होतो. 
नियंत्रण : रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. पिकाची 6 वर्षाकरिता योग्‍य फेरपालट करावी. कार्बेन्डॅझ‍िम 2.5 ग्रॅम किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्‍हॅरीडी / 4 ग्रॅम प्रती किलो बियाण्‍यास चोळावे.
2) मुळ कुजव्‍या
हा रोग रायझोक्‍टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे होतो. रोगाची लागण पीक फुलोऱ्यात आणि घाटे तयार होण्‍याच्‍या अवस्‍थेत दिसून येते. पीक शेतात उभे असताना हा रोग विखुरल्‍या सारखा आढळून येतो. नवीन पालवी तसेच फांद्या पिवळसर दिसतात. फांद्यावर सुद्धा रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्‍त झाडांची पाने, फांद्या व खोड पिवळसर रंगाचे दिसतात. मुख्‍य मुळे (सोटमुळे) हे बुरशीची वाढ दिसून येते. मुळावर काही प्रमाणात बुरशीची वाढ दिसून येते. अति तापमान व पाण्‍याची कमतरता असेल तर रोगाची वाढ झपाट्याने होते.
नियंत्रण : रोग प्रतिबंधक जातीचा किंवा वाणांचा वापर करावा. ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम + थायरम / 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्‍यास चोळावे म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात उद्भवतो. पिकाची रोगट झाडे शेतातून नष्‍ट करावे. पिकाची योग्‍य फेरपालट करावी.
3) करपा (ॲस्‍कोचायटा ब्‍लाईट)
हा रोग ॲस्‍कोचायटा राबेई बुरशीपासून होतो. पीक फुलोऱ्यात व घाटे तयार होण्‍याच्‍या अवस्‍थेत असताना उद्भवतो. पानावर लहान गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. पानावरील ठिपके गोलाकार, मध्‍यभागी राखाडी रंगाचे असून ठिपक्‍या भोवती तपकिरी रंगाची वलये दिसून येतात. रोगाची तीव्रता अधिक असल्‍यास पानावर तसेच फांद्यावर हे ठिपके दिसून येतात. कालांतराने हे ठिपके मोठे होऊन एकात एक मिसळल्‍या जाऊन पानावर तसेच नवीन उगवणाऱ्या फांद्यावर करपा दिसून येतो. रोगाची तीव्रता जास्‍त असल्‍यास खोड कांड्यावरून मोडते. उष्‍ण व कोरड्या वातावरणात रोगाची तीव्रता अधिक असून त्‍याची लक्षणे झाडाच्‍या पानावर, फांद्यावर, घाट्यांवर तसेच बियावर आढळतात. ढगाळ वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो.
नियंत्रण  : रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. थायरम/ 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम / 2 ग्रॅम प्रति‍ किलो बियाण्‍यास चोळावे. कॅप्‍टन किंवा क्‍लोरोथॅलोनील / 3 ग्रॅम प्रती लीटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. पिकाची योग्‍य फेरपालट करावी. रोगट झाडे शेतात दिसतात उपटून ती नष्‍ट करावीत. गहू किंवा मोहरी पिकासोबत पेरणी करावी.
4) पानांवरील ठिपके
हा रोग अल्‍टरनेरिया अल्‍टरनेटा बुरशीमुळे होतो. पीक फुलोऱ्यात व घाटे तयार होणाऱ्या अवस्‍थेत रोगाची लागण झाल्‍याची दिसून येते. रोगाची प्रमुख लक्षणे म्‍हणजे पानावर लहान गोलाकार भिजट व जांभळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. कालांतराने हे ठिपके गडद तपकिरी रंगाचे दिसतात. दमट वातावरणात हे ठिपके एकात एक मिसळून मोठाले ठिपके तयार होतात आणि पाने करपून गळण्‍यास सुरुवात होते. रोगाची तीव्रता अधिक असल्‍यास पानांची गळ होते. रोगग्रस्‍त झाडांवरील घाटे काळसर पडतात व आतील दाणे सुरकुतल्‍याप्रमाणे दिसतात. रोगाची तीव्रता अधिक असल्‍यास फुलांवर रोग व फुलांची गळ जास्‍त होते. घाट्यावर सुद्धा हे ठिपके दिसून येतात व रोगग्रस्‍त घाटे हे काळपट रंगाची दिसतात. कमी तापमान (20-25 अंश से.) आणि जास्‍त आर्द्रता अशा वातावरणात रोगाचा प्रसार अधिक होतो.      
नियंत्रण  : पेरणीतील अंतर योग्‍य ठेवावे. तसेच आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. कार्बेन्डॅझिम 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. मॅन्‍कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.  
5) तांबेरा (Rust)
हा रोग युरोमायसेस सीसरॲरीएन्‍टीनी बुरशीमुळे होतो. ह्या रोगाची लागण पीक परिपक्‍व अवस्‍थेत असताना दिसून येते. पानांवर लहान अंडाकृती, गोलाकार ठिपके पानांच्‍या दोनही बाजूस दिसून येतात. तपकिरी रंगाची पावडर दिसते व ओलसर थंड वातावरणात बुरशीची वाढ अधिक होते. काही वेळेला हे ठिपके खोडावर सुद्धा दिसून येतात व रोगाची तीव्रता अधिक असल्‍यास संपूर्ण झाडावर ही पावडर पसरलेली दिसते.
नियंत्रण  : रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास विटावॅक्‍स /2 ते 3 ग्रॅम प्रती किलो बियाण्‍यास चोळावे. रोगाची सुरुवात दिसताच मॅन्‍कोझेब 3 ग्रॅम अथवा हेक्‍झाकोनॅझोल 1 मि.ली. अथवा प्रोपीकोनॅझोल 1 मि.ली. लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. 
6) माण कुजव्‍या (कॉजरा रॉट)
माण कुजव्‍या रोग जमिनीत असणाऱ्या व कुजलेल्‍या सेंद्रिय पदार्थात वाढणाऱ्या स्‍क्‍लेरोशी अम रॉल्‍फसाय नावाच्‍या बुरशीमुळे होतो. पीक लहान 6 ते 8 आवठड्याचे असताना हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जमिनीलगतच्‍या खोडाचा भाग बारीक होऊन कुजू लागतो. जमिनी लगतच्‍या भागावर मोहरीच्‍या आकाराची बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसून येते त्‍यामुळे रोपे पिवळी पडून कोलमडून मरण पावतात. जास्‍त ओलावा व उष्‍ण तापमान असल्‍यास रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो.
नियंत्रण  : जमिनीची खोलवर नांगरट करावी. रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास कार्बेन्‍डॅझीम 1.5 ग्रॅम आणि थायरम 1.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्‍यास चोळावे. रोगग्रस्‍त झाडे उपटून नष्‍ट करावीत. 
7) खुजा रोग 
हा रोग पी लिफरोल या विषाणूपासून उद्भवणारा रोग आहे. लागण झालेल्‍या झाडाची वाढ खुंटते, पेरकांडी लहान पडतात व पाने छोटी होऊन पिवळी, नारंगी किंवा तपकिरी आकाराची होतात. रोगाची प्रमुख लक्षणे म्‍हणजे पाने तांबूस रंगाची दिसतात व रोपांची वाढ थांबते व रोपे खुजे अथवा बुटके दिसतात. अशा रोगग्रस्‍त झाडांना कमी प्रमाणात फुले व घाटे लागतात.  
नियंत्रण : रोगाचा फैलाव होऊ नये म्‍हणून प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करून रस शोषक किडींचा बंदोबस्‍त त्‍वरित करावा. 
8) बॉट्रेट्रीस ग्रे मोल्‍ड
 बॉट्रेटीस ग्रे मोल्‍ड हा बियाणेजन्‍य रोग असून बॉट्रेटीस सिनेरीआ या बुरशीपासून होतो. रोगाची लागण झाली असता प्रक्षेत्रातील झाडांची विखुरलेल्‍या भागत मर झाल्‍याचे दिसून येते. फांद्यावर 10 ते 30 मि. मी. लांबीचे आवरण चढविल्‍याप्रमाणे चट्टे पाहावयास मिळतात. रोगग्रस्‍त झाडावरील कोवळ्या फांद्या तुटून पडतात. फुलावर सुध्‍दा रोगाची लागण झाल्‍याचे दिसून येते व फुले ही कुजल्‍यासारखे दिसतात. घाट्यातील दाणे हे आकाराने लहान राहतात व सुरकुतल्‍या प्रमाणे दिसतात. या रोगाच्‍या बुरशीचे कवके ही कुजलेल्‍या व सेंद्रिय तसेच रोगट झाडांवर आठ महिन्‍यापर्यंत जीवंत राहू शकतात. पाण्‍याचे अधिक प्रमाण झाल्‍यास व पेरणीतील अंतर कमी झाल्यास रोगाची वाढ जास्‍त दिसून येते.
नियंत्रण  : झाडांची शाखीय वाढ अधिक प्रमाणात होऊ नये. योग्‍य वेळीच पाणी पिकांना पाणी द्यावे.जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास कार्बेन्‍डाझीम आणि थायरम 1:1 /3 ग्रॅम प्रती किलो बियाण्‍यास चोळावे. 
9) खोड कुज (स्‍कलेरोटिनिया स्‍टेम रॉट)
हा रोग स्‍कलेरोटिनीया रक्‍लेरोटीओरम या बुरशीमुळे होतो. पिकाच्‍या कुठल्‍याही अवस्‍थेत हा रोग उद्भवतो. रोगाची प्रमुख लक्षणे म्‍हणजे पानातील हिरवेपणा नाहीसा होऊन फांद्या वाळण्‍यास व निस्‍तेज होण्‍यास सुरुवात होते.  रोगग्रस्‍त झाडांच्‍या जमिनी लगतचा खोडाचा भाग कुजतो. पांढरट तपकिरी रंगाची बुरशीची कवके ही फांद्यावर व खोडाच्‍या आतील बाजूस पहावयास मिळते.
नियंत्रण  : झाडांची शाखीय वाढ अधिक प्रमाणात होऊ नये. योग्‍य वेळीच पाणी द्यावे. जमिनीची पेरणीपूर्वी खोलवर नांगरट करावी. रोगग्रस्‍त झाडे उपटून नष्‍ट करावी. 
काढणी 
हरभरा पीक जातीपरत्‍वनेनुसार लागवडीपासून साधारणतः 110 ते 120 दिवसांमध्‍ये पीक तयार होते. पिकाच्‍या दर्जेदार उत्‍पादनासाठी व भरपूर उत्‍पन्‍न मिळविण्‍यासाठी हरभऱ्याची काढणी व मळणी ही योग्‍य वेळी करणे अत्‍यावश्‍यक असते. हरभरा पिकाची काढणी ही पीक परिपक्‍वतेचा कालावधी पूर्ण होताच तसेच संपूर्ण पीक पिवळे पडू लागते तेव्‍हा करावी. त्‍याचप्रमाणे हरभरा पिकाचे घाटे वाळू लागताच  हरभरा पिकाची कापणी करावी. पीक ओलसर असताना काढणी करु नये. हरभरा पीक फुलावर येण्‍याचा व घाटे भरण्‍याचा कालावधी महत्‍त्‍वाचे ठरतो. त्‍यावेळेला दाणे पूर्णत: पक्‍व झालेले असतील त्‍यावेळी पिकाची कापणी करावी. वाळलेली झाडे विळ्याच्‍या सहाययाने जमिनीलगत कापून किंवा हाताने उपटून हरभऱ्याची काढणी करतात.
मळणी 
हरभरा पिकाची मळणी करताना पिकाची कापणी झाल्‍यानंतर लगेच करू नये. हरभरा पीक कापणीनंतर काही दिवस शेतावरच लहान लहान ढीग लावून वाळण्‍यासाठी ठेवावेत किंवा खळ्यावर 2 ते 3 दिवस चांगले ऊनात वाळवावे. म्‍हणजेच हरभरा पीक मळणीसाठी योग्‍य होऊन व दाण्‍याचे नुकसान होत नाही. पीक चांगले उनात वाळल्‍यानंतर मळणी यंत्राच्‍या साह्याने किंवा काठीच्‍या साह्याने बडवून हरभऱ्याची मळणी करावी. मळणी करताना पिकांच्‍या दाण्‍यांना इजा होणार नाही याची काळजी घ्‍यावी लागते. शक्‍यतो हरभरा पिकाची मळणी काठीने बडवून न करता आधुनिक मळणी यंत्राच्‍या साह्याने करावी म्‍हणजचे वेळेची व श्रमाची बचत होईल. 
साठवणूक 
हरभरा पीक मळणी करून झाल्‍यानंतर त्‍याची व्‍यवस्थित साठवणूक करणे गरजेचे असते. कारण या पिकास किडे, मुंग्‍या व इतर किटकांपासून संरक्षण करता येते. हरभरा पिकाची चांगल्‍या प्रकारे निगा व काळजी घ्‍यावी. हरभऱ्याची साठवण करत असतांना 10 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याचा अंश (ओलावा) राहील अशा दृष्टीने हरभरा वाळवून ती पोत्यात भरावी आणि एकावर एक अशी रचून ठेवावी. ठेवत असतांना पाणी, पाऊस, हवा, उष्णता, लागू नये अशा सुयोग्‍य ठिकाणी साठवण करावी. तसेच हरभऱ्याच्या साठवणीत कोणतीही कीड लागू नये, म्हणून यासाठी योग्‍य त्या उपाययोजना शेतकऱ्यांनी कराव्यात.
विपणन  
हरभरा मळणी झाल्‍यानंतर एक ते दोन दिवस दाणे चांगले उन द्यावे. जेणेकरून त्‍यास कीड अथवा इतर भक्षक किटाणू उपद्रव करणार नाही व आवश्‍यकता भासल्यास कडूलिंबाचा पाला (5 टक्के) घालावा. त्‍यानंतर आपण हरभरा विक्रीसाठी बाजार समितीकडे पाठवू शकतात. बाजार समितीमध्ये हरभऱ्याची गुणवत्ता, वाण, ओलाव्याचे प्रमाण, रंग इत्यादी घटक पाहून त्याला बाजार भाव ठरविला जातो. त्यामुळे या बाबींचा विचार शेतकऱ्यांनी लागवडीपश्चात्त करणे अत्यंत गरजेचे आहे.  
उत्‍पादन 
हरभरा पिकाचे जातीपरत्‍वनेनुसार प्रति हेक्‍टरी उत्‍पन्‍न विभिन्‍न स्‍वरूपात आहेत. सुधारीत जातींचा लागवडीसाठी अवलंब करून, हंगाम, लागवडीचे अंतर, पाणी व खतव्‍यवस्‍थापन, कीड व रोग नियंत्रण इ. सर्व बाबींचे योग्‍य प्रकारे नियोजन केल्‍यास हरभऱ्याची शेती केल्‍यास सरासरी 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्‍पादन मिळते.  
संदर्भ 
 1. शिंदे, जगन्नादथ (2015) : सुधारित हरभरा, गोदावरी पब्लिकेशन, नाशिक, पान क्र. 3-30
 2. काटोले, रवींद्र मधुकर (2014) : हरभरा लागवड, उत्पादन तंत्रज्ञान, चतुर्थ आवृत्ती, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे, पान क्र. 6 45
 3. पीक-उत्पादनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धतीः पाठ्यपुस्तिका-1-59- ...मु.वि. नाशिक, पान क्र. 25-187
 4. अप्रकाशित प्रकल्प (2018) : हरभरा उत्पादन तंत्रज्ञान, ...मु.वि. नाशिक, पान क्र. 2756
 5. अप्रकाशित प्रकल्प (2019) : हरभरा लागवड तंत्रज्ञान, ...मु.वि. नाशिक, पान क्र. 12-23
 6. अप्रकाशित प्रकल्प (2020) : हरभरा लागवड तंत्रज्ञान, ...मु.वि. नाशिक, पान क्र. 1234
 7. शेतकरी मासिक (2018) : हरभरा उत्पादन तंत्रज्ञान, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, मुंबई, पान क्र. 546
हरभरा उत्‍पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.
 

3 thoughts on “हरभरा उत्‍पादन तंत्रज्ञान”

Leave a Reply