सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके

आधुनिक रासायनिक शेती पद्धतीचे दुष्परिणाम आता सर्व जगाने अनुभवले आहेत. त्यामुळे प्रत्येक देश सेंद्रिय शेती पद्धतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसाराचे कार्य भारतात सुद्धा शासन स्तरा सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारास महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती जगाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. यातून विषमुक्त रसायनापासून मानवाचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  
जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणामुळे, आज मुक्त व्यापार धोरणामुळे निर्माण झालेली आव्हाने व सुसंधी याचा तौलनिक विचार करता येणाऱ्या आव्हानांना उत्तर शोधण्यासाठी सेंद्रिय शेती हा एकच मार्ग व अंतिम उपाय वटतो. आज देशात बहुसंख्य शेतकरी सेंद्रिय शेती करू लागले आहेत. त्यासाठी आवश्यक शेती पद्धतीत बदल जसे, जैविक खते, भूसुधारक पीक संरक्षण इ. मध्ये सेंद्रिय, जैविक निविष्ठांचा वापर व निर्मितीही तो स्वत: करू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकसंरक्षणासाठी कोणत्याही रसायनावर अवलंबून राहावयाची गरज वाटत नाही.
अखिल भारतीय सेंद्रिय शेती व शेतमालाचा दर्जा कसा असावा यासाठी काही मानके ठरविलेली आहेत. त्यानुसार शेती पद्धती व मान्य असलेल्या निविष्ठांचा वापर जर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून होत असेल तर अशा शेतीच्या शेतमालाचे प्रमाणिकरण करणे सर्वाच्या हिताचे होऊ शकते. याच उद्देशाने लेखकांनी सेंद्रिय शेती व उत्पादनावर शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रीत व्हावे, सेंद्रिय उत्पादनाबाबत जनजागृती व माहिती मिळावी, सेंद्रिय शेतीच्या विविध योजनेबाबत त्यांना ज्ञापन व्हावे यासाठी सदर लेख तयार करण्यात येत आहे. यामध्ये सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची गरज, प्रमाणीकरण म्हणजे काय? प्रमाणीकरण केव्हा करावे ? सेंद्रिय शेतीची राष्ट्रीय मानके, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण प्रकार, पद्धती, प्रमाणीकरण यंत्रणा आणि सेंद्रिय शेतीसाठी स्मॉल होल्डर ग्रुप सर्टिफिकेशन आदीं बाबींची माहिती प्रस्तुत संशोधन लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
प्रमाणीकरण म्हणजे काय ?
ढोबळमानाने सांगायाचे झाले तर सेंद्रिय मालाचे निर्माता म्हणजे शेतकरी व मालाचा उपभोक्ता म्हणजे ग्राहक यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास त्रयस्थ संस्थेमार्फत निर्माण करणे व ग्राहकांची फसवणूक टाळून शेतकऱ्यांना देखील त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी त्यांच्या शेती पद्धतीचे प्रमाणीकरण करून देणे ह्या पद्धतीत उत्पादित मालातील घातक द्रव्याची/घटकांची पातळी मोजून तिचे प्रमाण ठरविले जाते. रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आपणास आज दिसून येत आहेत कोणत्याही पदार्थाचे जेव्हा सेवन केले जाते, तेव्हा प्राणीमात्राच्या आरोग्यास त्यामधील विषारी द्रव्ये, घटक यामुळे हानी पोहचण्यासाठी शक्यता असते. अशा द्रव्याची चाचणी करून त्यांचे प्रमाण या पद्धतीने मोजले जाते.
सध्याच्या प्रचलित रासायनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते, किटकनाशके बुरशी नाशके मोठया प्रमाणात वापरली जात आहेत. या घटकांचे अंश मोठया प्रमाणात जमिनीमध्ये भूगर्भात, वातावरणात तसेच अन्य पदार्थात उतरत आहेत अशा जमिनीतून तयार होणारे अन्य सगळयांच्याच आरोग्यास हानीकारक ठरत आहे. जर अशा हानिकारक द्रव्याचे प्रमाण मर्यादित स्वरूपात असेल तर ह्यापासून सजीव जातीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता कमी असते. म्हणून अशा द्रव्याची पातळी /प्रमाण सेवनापूर्वी मोजणे अतिशय महत्वाचे असते.
या उलट सेंद्रिय शेती प्रमाणीकरण पद्धतीमध्ये शेती माल अशा पद्धतीने उत्पादित केला जातो की, ज्यामध्ये अशा हानिकारक घटकांचे प्रमाण नैसर्गिकरित्या येणारच नाही. तर परिसरातील जैव विविधता उत्पादित मालाचे वैविध्य गुणधर्म, वास, चव, रंग, टिकाऊपणा हे पारंपारिकच राहतील म्हणजेच सेंद्रिय शेती प्रमाणीकरणामध्ये संबंधित यंत्रणेचे शेतमाल उत्पादक पद्धतीची प्रमाणित मानके ठरवून दिलेली आहेत जर अशा मालास सेंद्रिय शेती उत्पादन म्हणून प्रमाणीकरण शेती करण्याची पद्धती ठरवून दिलेली आहे. यानुसार उत्पादीत होणारा माल हा प्रमाणित उत्पादीत होत असतो.
प्रगत देशा मानवाच्या आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या औषंधावर बंदी असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. मात्र आपल्याकडे अशा औषधांवर बंदी असून देखील राजरोसपणे ती शेतात वापरली जातात यावर कटाक्षाने बंदी आणणे गरजेचे व अत्यंत महत्वाचे आहे.
सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची गरज
सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाने जे आपणास दिले आहे ते निसर्गाला परत करणे म्हणजेच सेंद्रिय शेती होय. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून त्यामुळे शेतीचे उत्पादनात वाढ जरी होत असली तरीही यातून उत्पादित होणारा माल हा विषारी व रसायनयुक्त तयार होत असल्यामुळे मानवी जीवितास यापासून मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीत विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला पिके घेणे आवश्यक असून त्याचे प्रमाणीकरण यंत्रणेकडून तपासणी करून उत्पादीत सेंद्रिय माल ग्राहकांना विक्री करण्यासाठी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होते.  
प्रमाणीकरण का करावे ?
ग्राहकांमध्ये सेंद्रिय उत्पादनाविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी आपल्या शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असते. हे करीत असतांना प्रमाणीकरण संस्था शेती पद्धतीचे विषयी संशय असल्यास त्या शेतातील माती, पाणी, फळे आदींच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्या घेण्यास सांगते उत्पादित माला हानिकारक द्रव्यांची पातळी तपासून पाहते व त्याप्रमाणे प्रमाणिकरणाचा निर्णय घेते थोडक्यात आपल्या शेतातून तयार तयार होणाऱ्या अन्नधान्यामध्ये किती प्रमाणात कोण-कोणते विषारी घटक आहेत ते कळते जर हे घटक मर्यादीत स्वरूपात असतील तर योग्य मात्र अधिक प्रमाणात असतील तर त्याचा आरोग्यावर होणारा परिणामही तेवढाच घातक ठरणार आहे.
शिवाय या घटकांचा परिणाम नुसताच आरोग्यावर होत नाही तर पर्यावरण, हवा, पाणी, माती, जीवजंतू, झाडे, पशुपक्षी या सर्वच घटकांवर होत असतो व त्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढते आहे. नैसर्गिक निविष्ठांचा वापर शेतीत केल्याने जमीन सजीव होऊन विषमुक्त व दर्जेदार शेतमाल उत्पादित करता येतो.
प्रमाणिकरणाचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेतमालाचा दर्जा, प्रत आपणास माहिती होते व अशा मालास सुरक्षिततेमुळे ग्राहक जास्त दर देण्यास तयार होतात. अशा मालास देशान्तर्गत मोठी बाजारपेठत सुद्धा प्रचंड मागणी आहे. प्रमाणीकरणामुळे उत्पादीत मालाविषयी ग्राहकास कोणत्याही प्रकारची शंका अथवा गैरसमज उद्भवणार नाहीत आणि सेंद्रिय उत्पादीत मालाची विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा
सेंद्रिय शेतीपद्धतीचे प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था शक्यतो बिगर शासकीय यंत्रणा असतात. खालील प्रमाणीकरण यंत्रणांना आतापर्यंत मान्यता देण्यात आली आहे.
 • इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटलॉजी, 78 पहिला मजला,11 क्रॉम,इंदरानगर,1 स्टेज,बंगलोर
 • एस.के.एल.इंडिया 3 रा मजला,मोनार्च चेंबर्स,122 इन्फटरी रोड,बंगलोर
 • इकोसर्ट-इंटरनॅशनल कोरस्टर स्ट्रे 87 डी-37520, ओस्टॉरोड,जर्मनी
 • भारतातील कार्यालय-औरंगाबाद (महाराष्ट्र) गुरगाव हरियाणा
 • एस.जी.एस.इंडिया प्रा.लि.250,उदयोगविहार,फेज-4 गुरगाव (हरियाणा)
 • इन्डोसर्ट इंडियन ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी,केरळ
 • सर्ग विकास समिती नैनीताल
 • नोका, पुणे
सेंद्रिय शेतीच्या राष्ट्रीय मानकांची सखोल तपासणी व पूर्तता करणे ही प्रमाणीकरण संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. तसेच त्यांना सेंद्रिय मालाच्या उत्पादनाला शेतकऱ्याला द्यावयाचे आवश्यक प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत.
प्रमाणीकरणासाठी आवश्यक बाबी  
 • माती व पाणी तपासणी करणे
 • सेंद्रिय शेतीसाठी जमीन तयार करणे
 • पेरणी लागवडी बियाणे
 • सेंद्रिय शेतीच्या निकषानुसार पेरणी  लागवड करणे
 • जैव विघटनक्षम खतांची,जैविक कीड-रोग नियत्रंकांची निर्मिती व वापर
 • सेंद्रिय मानकानुसार शेतकऱ्यांना फार्म शेड, जनावरांचे गोठे, साठवण गृह तयार करण्यास मार्गदर्शन
 • खुरपणी, कोळपणी व तणांचा चा बंदोबस्त करणे.
 • काढणी व साठवण करणे.
 • अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे अशा शेतीची पाहणी व प्रमाणीकरण करणे.
 • प्रक्रिया व विक्रीसंबंधी पुढील व्यवस्था
प्रमाणीकरण केव्हा करावे ?
आपल्या शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे हे आपल्या हिताचे आहेच. शिवाय असे प्रमाणीकरण योग्य वेळी केल्यास त्यासाठी होणारा खर्च कारणी लागू शकतो. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीने सलग 3 वर्ष पिके घेणे महत्वाचे आहे. परंतु संबंधित शेतकऱ्यांचा अर्ज प्रमाणीकरणासाठी घेण्याचा निर्णय प्रमाणीकरण संस्थेने घेतल्यांनतर हा तीन वर्षाचा कालावधी सुरू होतो. याचा अर्थ आपण गेल्या तीन वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने जरी शेती करीत असल्यास आपण तीन वर्षानंतर प्रमाणीकरण संस्थेकडे प्रमाणीकरणासाठी अर्ज केला तर हा अर्ज संस्थेला मिळाल्यापासून पुढील तीन वर्षाचा काळ प्रमाणीकरणासाठी मोजला जाईल. अशाप्रकारे आपले तीन वर्ष वाया जातील याचा अर्थ आपण ज्या वर्षी आपण सेंद्रिय शेती पद्धत अवलंबणार आहोत. त्याच वर्षी प्रमाणीकरण संस्थेकडे अर्ज पाठविणे केव्हाही उचित ठरेल. अर्थात काही संस्था एक वर्षाची सूट देतात परंतु त्यासाठी त्रसस्थ व्यक्तीकडून जसे तालुका कृषि अधिकारी इत्‍यादीचे आपण सेंद्रिय शेती गेल्या तीन वर्षापासून करीत आहात याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
ढोबळमनाने चालू वर्षापासून सेंद्रिय शेतीच्या मानकानुसार शेती करण्यास सुरूवात केल्यानंतर तीन वर्षानंतर होणारे धान्य किंवा फलोत्पादन हानिकारक घटकांपासून मुक्त होऊ शकते. प्रमाणीकरण प्रक्रियेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा सेंद्रिय शेती पद्धतीच्या कालावधीनुसार प्रमाणीकरण संस्था खालीलप्रमाणे प्रमाणपत्र देते.
अ) प्रथम वर्ष : In Confirmation  : म्हणजे सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाच्या वाटचाली चे पहिले वर्ष, आपण वाहन चालवण्याचा परवाना काढताना पहिले लर्निंग लायसन्स काढतो.
ब) दुसरे वर्ष : In Conversion (रूपांतरीत)
क) तिसरे वर्ष : बहुवार्षिक किंवा दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी उदा. द्राक्षे, डाळींब इत्यादी सारखी फळपिके रूपांतरीत (In Conversion). अल्प मुदतीच्या पिकांसाठी उदा. भाजीपाला,गहू,भात,कडधान्ये इत्यादी साठी प्रमाणित सेंद्रिय (Certified Organic)
) चौथे वर्ष  बहुवार्षिक किंवा दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी प्रमाणीत सेंद्रिय (Certified Organic)
सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे प्रकार
साधारणपणे आपण करीत असलेल्या शेतीचे दोन प्रकारे प्रमाणीकरण करता येते एक म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीचे प्रमाणीकरण तर दुसरे म्हणजे सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण होय.
पहिल्या प्रकारात आपण करीत असलेली शेती कशा पद्धतीने करतात त्यामध्ये मशागत खते बियाणे, पिकांची फेरपालट, तणांचा बंदोबस्त कीड-रोगनियंत्रण वाहतूक आणि साठवण या गोष्टीचा अखिल भारतीय सेंद्रिय शेती संघटना दिलेला मानकानुसार शेतीमध्ये होत असेल व क्षेत्रिय भेटी दरम्यान तसे आढळून आल्यास आपली शेती पद्धती प्रमाणित असते. उदा. सेंद्रिय दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण शेतीमध्ये वापरलेल्या वरील निविष्ठा त्यापासून तयार झालेले अन्नधान्यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांचे प्रमाण याची चाचणी घेऊन ठरविण्यात येते. प्रामुख्याने निर्यात होणाऱ्या शेतीमालासाठी या पद्धतीने प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असते.
प्रमाणीकरण यंत्रणेस मान्यता देणाऱ्या संस्था
भारत सरकारच्या व्यापार मंत्रालयाने खालील 6 संस्था मार्फत देशामध्ये स्थानिक पातळीवर विविध प्रमाणीकरण यंत्रणांना मान्यता देण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. या संस्थांना अक्रेडिटेशन एजन्सी असे म्हणतात या सर्व संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आहेत.
अपेडा, कॉफीबोर्ड, स्पायसेसबोर्ड, टीबोर्ड, कोकेनट डेव्हलपमेंट बोर्ड, कॅश्यू डेव्हलपमेंट बोर्ड इ. यापुढे मात्र प्रमाणीकरण यंत्रणांना मान्यता देण्याची जबाबदारी भारत सरकारने फक्त अपेडावरच सोपवली आहे. सेंद्रिय शेती मालाला देशांतर्गत मोठा बाजरपेठ उपलब्ध असल्याने प्रमाणीकरण प्रक्रियेस मोठा खर्च करून निर्यात करण्याचे मागे शेतकऱ्यांनी न लागता स्थानिक बाजारपेठेत मालाची विक्री केल्यास योग्य मोबदला आपणास मिळू शकतो.
प्रमाणीकरण पद्धती
सेंद्रिय शेती प्रमाणित करावयाची असेल तर खालील गोष्टींची तपशीलवार नोंद व प्रमाणित निविष्ठांचा वापर शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. अशा शेतीस प्रमाणीकरण संस्था किंवा त्यांनी नेमलेली निरीक्षक सातत्याने भेटी घेन या बाबींविषयी तपासणी व मार्गदर्शन करीत असतात.
सेंद्रिय शेतीची राष्ट्रीय मानके 
वाणिज्य मंत्रालयाने ठरविलेली राष्ट्रीय मानकेच देशांतर्गत व बाजारपेठेसाठी वापरावयाची आहेत. सन 2000 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य (Economic) खात्याने सेंद्रिय शेतीचे नियम व पद्धतीचा उल्लेख करून सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme For Organic Production Npop) जाहीर केला. अखिल भारतीय सेंद्रिय शेती संघटनेने 1995 मध्ये सेंद्रिय शेती व शेतमालाचे प्रमाणीकरण करण्यासाठी खालील प्रमाणे मानके निर्धारित केली आहेत.  त्यासाठी एकू4 वर्ग करण्यात आले आहेत.
 • पहिला वर्ग : शिफारस ( Recommended)
 • दुसरा वर्ग : अनुज्ञेय ( Allowed)
 • तिसरा वर्ग : मर्यादित ( Limits/Restricted)
 • चौथा वर्ग : मनाई ( Prohibited)
स्मॉल होल्डर ग्रुप सर्टिफिकेशन
यास गट योजना किंवा ग्रुप स्कीम असे म्हणता येईल व्यक्तिगत एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही खर्चिक असून हा अर्थिक भार व्यक्तिगत शेतकऱ्यालाच उचलावा लागतो. त्यासाठी सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण कमीत कमी खर्चाने एकत्रिरित्या करणे हे देशतील लहान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. वैयक्तिक रितीने सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करता येते, अशा पद्धतीस शेतकऱ्यांचे लाहन-लहान एक गट तयार करता येतात. अशा गटांचे सेंद्रिय शेती पद्धतीच्या निरीक्षणासाठी एक बिगर शासकीय यंत्रणा जसे स्वयंसेवी संस्था अंतर्गत नियंत्रण व्यवस्था निर्माण करून काम पहात असते. प्रमाणीकरण संस्था ही शेतकऱ्यांचे गटास प्रमाणपत्र वितरित करताना अंतर्गत प्रणालीचे मूल्यमापन करून निर्णय घेत असते. या गट योजनेचे मूलभूत तत्व लहान शेतकऱ्यांना प्रमाणीकरण शक्य नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा गट स्थापन करून त्यांच्या सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करणे हा आहे.
अशाप्रकारे सेंद्रिय मालाचे प्रमाणीकरण केल्यास त्याचे नोंदणीकृत प्रमाणपत्र उत्पादकास प्राप्त होते. त्यामुळे सेंद्रिय पिकविलेल्या जाणाऱ्या मालास ग्राहकांची पसंती वाढेल आणि ग्राहकांमध्ये सेंद्रिय उत्पादन घेणेबाबत विश्वासर्हता संपादन होण्यास मदत होईल. सेंद्रिय माल उत्पादकांनी आपला सेंद्रिय उत्पादित माल नोंदणीकृत विक्री केंद्रातूनच विकावा. सुज्ञ ग्राहकांनी सर्व अन्नधान्य, भाजीपाला, इतर सेंद्रिय उत्पादित माल अशा विक्री केंद्रातूनच खरेदी करावा. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनासोबत सांगड घालून मानवाने निरामय आणि सुखी जीवन जगावे असे आवाहन या लेखाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सेंद्रिय शेतीबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा, सेंद्रिय उत्पादनास प्राधान्यक्रम देण्यात यावा, यातून मानवी आरोग्याचे हित जोपासता यावे यासाठी सदर लेख तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या लेखाचे वाचन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंब करावा आणि मानवाचे आरोग्य विषमुक्त करावे हीच अपेक्षा करण्यात येत आहे.  
सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके या लेखामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी तसेच आता नवीन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल अशी माझी खात्री आहे. तसेच सेंद्रिय शेती, प्रमाणीकरण यंत्रणा व मानके बाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. जर माहिती कमी वा अधिक असू शकेल किंवा दिलेल्या माहिती काही तथ्यहीन बाब असल्यास खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळावी. आवश्यक त्या सूचना दिल्यास आपले आभार व्यक्त केले जाईल.
संदर्भ :
 • गुंजाळ संजय भा. (2016) : सेंद्रिय शेती उत्‍पादन, प्रमाणीकरण, पणन, शासन आणि आपण, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे
 • भारती इंद्रायणी (2018) : सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 • कृषि दैनंदिनी (2016) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
 • नाईकवाडी प्रशांत (2016) : सेंद्रिय शेती, सकाळ पेपर्स, पुणे प्रकाशन
 • सेंद्रिय शेती विशेषांक, दै. अॅग्रोवन, 30 जानेवरी 2016
 • सेंद्रिय शेती विशेषांक, दै. अॅग्रोवन, 25 नोव्‍हेंबर 2017
 • www.organicfarming.com
 • https://apeda.gov.in  
 • www.fao.com
सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके हा लेख आपणास आवडला असल्यास लाईक, कंमेटस आणि किमान 10 शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा.
Prajwal Digital

2 thoughts on “सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके”

 1. सर मला वैयक्तिक सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल ते सांगा व कुणाशी संपर्क साधावा लागेल ही विनंती

  Reply

Leave a Reply