विकसित व विकसनशील देशांमध्ये सर्वत्रच शेतीशास्त्राच्या विविध शाखांमध्ये दिवसेंदिवस वेगाने सुधारणा घडून येत आहेत. त्यामुळेच अन्नधान्य, कंद पिके, भाजीपाला, फळ, दूध, मांस, व अंडी आदींच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. भारतामध्ये झालेल्या अन्नधान्य उत्पादन वाढीचे बहुतांश श्रेय हरिक्रांतीलाच आहे.
पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा व संकरित वाणांचा विकास, रासायनिक खते, पीकसंरक्षण तंत्र, सुधारित पीक लागवड तंत्र आणि शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर इत्यादी बाबींमुळे उत्पादनात वाढ झाली आहे. असे असेल तरी जगातील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता, वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी शेती उत्पादनात होणारी ही वाढ अपुरी ठरते. त्यामुळे शेती क्षेत्रातील संशोधनाकडे आज अधिकाधिक लक्ष दिले जात आहे. परिणामी शेतीत क्रांतिकारी बदल घडवणारे नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर व्हावा यासाठी सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न सुरू आहेत.
उत्पादनातील महत्वाचे घटक म्हणजे जमीन, हवामान, बी, पेरणी, आंतरमशागत, पाणी व्यावस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खते, पीक संरक्षण, काढणी, मळणी, साठवण व विक्री हे आहेत. यापैकी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बी होय, कारण पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळत नाही. आधुनिक शेती जगतात बियाणे या घटकांवर प्रचंड संशोधन होत असून दिवसेंदिवस त्यात विकास व वाढ होत आहे. राज्यात आणि देशात सरकारी, खाजगी व स्वयंसेवी सस्था वेगवेगळया पिकांच्या बियाणे संशोधनात आणि उत्पादनात कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते असते.
बीजोत्पादन व्याख्या :
“सुधारित आणि संकरित वाणांचे शुद्ध दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या बियाण्याचे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या प्रमाणकेनुसार उत्पादन घेणे म्हणजे बीजोत्पादन होय.”
बीजोत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना जी बीजोत्पादन प्रमाणके / मापदंड ठरवून दिलेले आहेत. त्या नियमाप्रमाणेच बीजोत्पादन घ्यावे लागते. बियाणे कायद्यातील कलम 9 नुसार कोणत्याही शेतकऱ्याला बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांत बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक असते. यासाठी विहित नमुन्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे नोंदणी शुल्कासह अर्ज रितसर सादर करावा लागतो. यामध्ये जे बीजोत्पादन होईल त्याची प्रक्रिया, विक्री व्यवस्था, साठवण या सर्व गोष्टीत बीजोत्पादकालाच लक्ष पुरवावे लागते. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना प्रक्रिया, विक्री यांसारख्या मूलभूत सोई उपलब्ध नसतील अशा शेतकऱ्यांनी राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे मंडळ किंवा खाजगी बियाणे कंपन्यांकडे नोंदणी केल्यास कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना बीजोत्पादन करता येऊ शकते.
बीजोत्पादनासाठी लागणारे बियाणे, त्याची नोंदणी परीक्षण यांसारख्या गोष्टीत महामंडळे / कंपन्या यांची मदत होऊ शकते. प्रमाणीकरण यंत्रणेकडून सदर बीजोत्पादनाचे परीक्षण करून बियाण्याचे बीज प्रमाणीकरण केले जाते. तयार झालेल्या बियाण्याचे प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था ही बियाणे महामंडळ/ कंपन्यांकडून केली जाते. अशा बीजोत्पादनासाठी एका गावातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास बीजोत्पादन क्षेत्राचे परीक्षण, पिकाची काढणी, तपासणी यांसारखी कामे करणे बियाणे महामंडळाला तसेच प्रमाणीकरण यंत्रणेला सोईस्कर होते.
सदरील लेखात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबींची माहिती व बियाणे कायदा; तरतूदी व नियम यांची सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली असून याप्रमाणे बीजोत्पादन घेणाऱ्या संस्था, महामंडळे, शेतकरी गट आदींनी बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा बोगस बियाणे बीजोत्पादन करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्यास कायद्यानुसार बीजोत्पादन संस्था, शेतकरी गट व इतर यांच्यावर शिक्षा होण्याची व दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे बीजोत्पादन करताना कायद्यातील गोष्टींचा अभ्यास करूनच बीजोत्पादन करावे.
बी – बियाणे कायदा, 1966 :
भारतामध्ये बी-बियाणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्यास भारतीय बियाणे कायदा – 1966 असे नाव असून हा कायदा सर्व भारतात 1 ऑक्टोबर 1969 पासून अंमलात आला आहे. पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. हा कायदा सर्व भारतात लागू असल्यामुळे यातील सर्व नियम, अटी, याबाबत सर्व राज्यात एकसारखेपणा (समानता) आहे. या कायद्यानुसार सर्व देशात आणि देशाच्या निरनिराळ्या भागासाठी किंवा स्थानिक दृष्ट्या महत्त्वाच्या जाती, पिके व पिकांच्या अधिसूचित जाती (Notified Variety) म्हणून जाहीर केल्या जातात. त्या जातींच्या उत्पादन व विक्रीपुरताच हा कायदा लागू असतो. अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना अगर बियाणे विक्रीसाठी ठेवताना विक्रेत्यांना या कायद्यातील अटींचे व तरतूदीचे पालन करणे आवश्यक आहे, मात्र शेतकऱ्यांनी या अधिसूचित जातीचे बियाणे तयार करून स्वतःसाठी वापरले किंवा दुसऱ्या शेतकऱ्यास टॅग न लावता विना ब्रॅंडनेमने विकले अथवा दिले तर त्यास हा कायदा बंधनकारक नाही.
बियाणे कायदा, 1966 अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी :
अधिक सूचित (Notified) म्हणून जाहिर केलेल्या जातींच्या बियाण्यांची विक्री करताना बी- बियाणे विक्रेत्याने खालील महत्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, डबा अथवा अन्य प्रकारे बियाणे ठेवल्यास त्यावर बियाण्याचा खरा दर्जा दाखविणारे सूचीपत्र किंवा निशाणी, खूणचिठ्ठी असली पाहिजे, या खूण चिठ्ठीवरील माहितीच्या सत्यतेबद्दलची जबाबदारी बी विक्रेत्याची राहील. बियाणे अप्रमाणित असले तरी खूणचिठ्ठी ठराविक रंगाची आणि आवश्यक नमुन्यातीलच असावी, बियाण्याच्या प्रत्येक गटाचा (Seed Lot) योग्य नमुना त्या गटातील त्या बियाण्याची संपूर्ण विक्री झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येक बियाणे गटाचे खरेदी – विक्रीबाबतचे दप्तर विक्री संपल्यानंतर तीन वर्षापर्यंत जतन करून अद्यावत ठेवणे आवश्यक आहे.
बियाण्याच्या बॅगवरील खुणचिठ्ठी :
अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाण्याच्या प्रतीच्या कमीत कमी मूल्यांचा दर्जा दाखविणारी माहिती खूणचिठ्ठी असणे अत्यावश्यक आहे. बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या खूणचिठ्ठी प्रमाणित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रमाणित बियाण्यासाठी निळा, पायाभूत बियाण्यासाठी पांढरा, मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची तर सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाची खूणचिठ्ठी असते. या खूणचिठ्ठीवर खालील माहिती असणे आवश्यक असते.
v बियाण्याचा प्रकार
v जात
v गट क्रमांक
v बीज परीक्षणाची तारीख
v उगवणशक्ती (कमीत कमी)
v शुद्धतेचे प्रमाण (कमीत कमी )
v इतर पिकांच्या बियाण्याचे प्रमाण (जास्तीत जास्त)
v निव्वळ वजन
v काडी कचरा
इतर अनावश्यक गोष्टी, विक्रेत्याचे नाव व पत्ता इ. आहेत. याशिवाय बियाण्यास कीड अथवा रोगप्रतिबंधक औषधे लावली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे खूणचिठ्ठीवर असावी. औषधे विषारी असतील तर ठळक अक्षरात माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा असलाच पाहिजे.
बियाणे प्रमाणीकरण आणि कायदा :
बियाण्याचे प्रमाणीकरण केल्यानंतर भौतिक शुद्धता, उगवणक्षमता यांच्या उच्च दर्जाबरोबर बियाण्याच्या आनुवंशिक शुद्धतेबद्दल प्रमाणीकरण यंत्रणा खात्री देत असते. त्यामुळे अशा बियाण्याची किंमत नेहमीच जास्त असते. बियाणे कायद्यान्वये प्रमाणीकरण ऐच्छिक आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 1970 पासून कृषि संचालनालयाच्या अधिपत्याखाली बीज प्रमाणीकरण यंत्रणा आहे. प्रमाणित बियाण्यासाठी असलेल्या प्रमाणकांप्रमाणे बीजोत्पादन केल्यास तसेच अनुवंशिक शुद्धतेबद्दल खात्री पटल्यानंतरच त्यास बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे टॅग दिला जातो. प्रमाणित बीजोत्पादन करावयाचे असल्यास ठराविक नमुन्यास बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नेमण्यात आले आहे.
बियाणे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बीज निरीक्षण अधिकारी, बीज परीक्षण केंद्र, बीज विश्लेषण अधिकारी आणि मध्यवर्ती बीज परीक्षण केंद्र यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे कृषि विकास अधिकारी यांचा बीज निरीक्षण अधिकाऱ्यांच्या यादीत समावेश केला आहे. तसेच कृषि संचालनालयातील व अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी नागपूर येथील बीज परीक्षण केंद्र हे प्रमुख बीज विश्लेषण केंद्र आहे. भारत सरकारचे राष्ट्रीय बीज संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रवाराणसी यांचे बीज परीक्षण केंद्र, मध्यवर्ती बीज परीक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. बियाणे उगवणीबाबत काही अडचणी असल्यास या केंद्राचा अहवाल समजण्यात येतो. बियाणे प्रमाणीकरण करताना गैरमार्गाने अथवा खोटी माहिती देऊन किंवा कायद्यातील तरतूदींचे उल्लंघन करून बियाणे प्रमाणीकरण करून घेतल्याचे लक्षात आल्यास प्रमाणीकरण रद्द करण्याचा अधिकार प्रमाणीकरण यंत्रणेला आहे.
बीजोत्पादन घेण्यापूर्वीची काळजी :
v ज्या क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घ्यावयाचे आहे ते क्षेत्र ज्या पिकाचे बीजोत्पादन घ्यावयाचे त्या पिकासाठी प्रमाणीत केलेल्या विलगीकरण (Isolation) अंतराएवढे इतर जातीपासून विलग असावे.
v ज्या क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घ्यावयाचे आहे ते पीक पूर्वी त्या क्षेत्रात घेतलेले नसावे.
v ज्या भागात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या भागात येणाऱ्या पिकांचीच शक्यतो बीजोत्पादनासाठी निवड करावी.
v नोंदणीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
बिजग्राम किंवा ग्राम बीजोत्पादन योजना : या योजनेमध्ये एका किंवा आसपासच्या गावामध्ये पिकाच्या एकाच वाणाचे किंवा जातीचे बीजोत्पादन घेतात. यामुळे बीजोत्पादनासाठी विलगीकरण, पेरणी, भेसळ झाडे काढणे, प्रमाणीकरण, प्रक्रिया यांसारखी कामे खूपच सोपी होतात. परागीभवनासाठी विपूल प्रमाणात परागकण उपलब्ध होतात आणि पर्यायाने बीजोत्पादन चांगल्या प्रतीचे होते. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या कृषी खाते, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या सहाय्याने या प्रकारची योजना राबवून बीजोत्पादन घेता येते.
बियाणे प्रमाणीकरणाची आवश्यकता : विविध स्तरावरील प्रमाणीकरण प्रमाणकाप्रमाणे शुद्ध बियाणाचे उत्पादन केले जाते. बियाण्याचे उत्पादन करतांना बियाणे प्रमाणीकरणाच्या चार प्रमुख आवश्यक बाबी आहेत.
सुधारित वाण : सर्वसामान्यतः केंद्रिय वाण प्रसारण समिती किंवा राज्य वाण प्रसारण समितीद्धारा केल्या जाणाऱ्या वाणास सुधारित वाण असे म्हणतात. सुधारित वाणाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अधिक उत्पादन क्षमता, विस्तृत अनुकूलन, परिपक्वतेचा योग्य कालावधी, खतांना प्रतिसाद देणारा, मुख्य रोगांना तसेच हानीकारक कीटकांना लवकर बळी न पडणार, इ, बाबींचा समावेश होतो.
अनुवंशिक शुद्धता : अनुवंशिक शुद्धता म्हणजे वरील सुधारित वाणांची वैशिष्ट्ये पिढीमध्ये जशीच्या तशी राहणे. अनुवंशिक शुद्धतेची निरीक्षण पिकाच्या पुढील पिढीत केली जातात.
भौतिक शुद्धता : भौतिक शुद्धता म्हणजे बियाणे काडी, कचरा, खडे यांसारख्या निष्क्रिय वस्तू व खराब बियाण्याचा अभाव होय. खराब बियाणे म्हणजे तुटलेले, किडलेले, रोगयुक्त, अर्ध विकसित त्याचप्रमाणे उगवण्यासाठी उपयुक्त नसलेले बियाणे.
उगवण : उगवणक्षमता राष्ट्रीय बियाणे प्रमाणिकरण यंत्रणेने केलेल्या मानकानुसार योग्य ती असावी. सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केल्यास शुद्धतम बियाणाचे उत्पादन करता येते.
बियाणे नमुना घेण्याची पद्धत :
अधिसूचित जातींच्या बियाण्यांबाबत तक्रार असल्यास बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील बियाण्याचा नमुना घ्यावयाचा असल्यास त्यांना प्रथम लेखी कळविण्यात येते. दोन पंचांच्या समक्ष शास्त्रीय दृष्ट्या नमुना काढण्यात येतो. या नमुन्यांपैकी एक संबंधीत बी विक्रेत्यास देण्यात येतो. तर दुसरा बीज परीक्षण केंद्राकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतो. तिसरा नमुना बियाणे परीक्षक स्वतःजवळ ठेवतात. गरज पडल्यास हा नमुना न्यायालयात सादर करावा लागतो. यावेळेस प्रत्येक नमुन्यावर मोहोर लावून साक्षीदारांच्या सह्या घेण्यात येतात. संबंधीत बी विक्रेत्यांना जर नमुना घेण्याचे नाकारले तर बीज परीक्षण केंद्राकडे नमुना पाठविताना त्याप्रमाणे कळविण्यात येते. बीज विश्लेषण अधिकारी अशा नमुन्यापैकी निम्मा भाग स्वतःच्या अधिकाऱ्याकडे पाठवितात. बियाणे निकृष्ट आहे अथवा बियाण्याच्या कायद्याचे उल्लघंन होत आहे, अशी खात्री झाल्यास बीज निरीक्षक 30 दिवसांपर्यंत बियाणे विक्री थांबवू शकतो.
बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची कार्ये, कार्यपद्धती, मूलतत्वे :
बी बियाणे कायदा 1966 अंतर्गत, कलम-अन्वये अधिसूचीत पीक वाणाचे उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करण्यासाठी बीजोत्पादन करताना बीज प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. यातीलच कलम 9 अन्वये महाराष्ट्रामध्ये राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा कार्य करते. प्रत्येक पिकासाठी बीज प्रमाणीकरण मानके निर्धारीत करून दिलेली आहेत. या निर्धारित मानकाप्रमाणेच बीजोत्पादन करणे आवश्यक असते, तरच आपल्याला अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होते.
महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा :
महाराष्ट्र राज्यामध्ये बीज प्रमाणीकरण यंत्रणा 1 जून 1982 पासून कार्यरत आहे. या यंत्रणेचे कार्य नियामक मंडळाच्या मार्गदशनाखाली चालते. नियामक मंडळाचे अध्यक्ष हे प्रधान सचिव, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य असून संचालक, महाराष्ट्र राजय बीज प्रमाणीकरण यंत्रणा हे सदस्य सचिव आहेत. नियामक मंडळाचे 22 सदस्य असून यामध्ये 4 सदस्य बीजोत्पादकांचे प्रतिनिधी असतात. राज्य प्रमाणीकरण यंत्रणेचे मुख्य कार्यालय अकोला येथे आहे.
प्रमाणीकरण अधिकऱ्यांची कार्ये :
1) बियाण्याची स्त्रोत पडताळणी : बीजोत्पादन कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची (उदा. पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रमासाठी पैदासकार बियाणे तर प्रमाणीत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे स्त्रोत म्हणून वापरले जाते) स्त्रोत पडताळणी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी करतात. बियाण्याच्या स्त्रोत पडताळणी अहवालाशिवाय बीजोत्पादन कार्यक्रम नोंदणी करता येत नाही. स्त्रोत पडताळणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उदा. बियाणे खरेदी बील, मुक्तता अहवाल, जमा केल्यावर विहित प्र-पत्रात स्त्रोत पडताळणी अहवाल देण्याचे काम जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी करतात.
काही अपवादात्मक परिस्थितीत बीजोत्पादन कार्यक्रमासाठी आवश्यक दर्जाचे स्त्रोत बियाणे उपलब्ध न झाल्यास पायाभूत बियाण्याचा पायाभूत- 2 बीजोत्पादनासाठी किंवा प्रमाणीत -1 बियाणे, प्रमाणीत- 2 दर्जाचे बीजोत्पादनासाठी स्त्रोत वापरण्यास परवानगी देण्याचे काम प्रमाणीकरण अधिकारी करतात. अशा परिस्थितीत स्त्रोत बियाण्याची अनुवंशिक शुद्धता क्षेत्र चाचणी अहवाल आवश्यक असते.
2) क्षेत्र नोंदणी : बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीसाठी आवश्यक शुल्क जमा करणे व कागदपत्रे पडताळणी करून क्षेत्र नोंदणी करणे त्यासाठी खालील बाबींची ची पूर्तता पाहणे. बीजोत्पादकांचे विहित नमुन्यातील अर्ज, विहित करारनामा, स्त्रोत पडताळणी अहवाल, मूळ मुक्तता अहवाल, मूळ खरेदी बील
3) क्षेत्र तपासणी : बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झालेल्या क्षेत्राची क्षेत्र तपासणी यंत्रणेच्या कृषि अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. बीज यंत्रणेच्या प्रमाणीकरण मानकांप्रमाणे बीजोत्पादन करण्यात येते किंवा नाही याची तपासणी पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्यात केली जाते.
4) प्रक्रिया पूर्व बियाणे : क्षेत्र तपासणीत पात्र ठरलेल्या क्षेत्रातील उत्पादीत बियाणे पुढील प्रक्रियेसाठी मोहोरबंद करण्याचे काम प्रमाणीकरण अधिकारी करतात. त्यापूर्वी आवश्यक विहित शुल्काचा बीजोत्पादकांकडून भरणा करून घेणे, तसेच बियाणे व्यवस्थितरीत्या वाळवून स्वच्छ पोत्यात भरून घेणे, त्यावर बीजोत्पादकाचे नाव, गाव, पोती संख्या / क्रमांक इ. नमूद केले जाते.
5) बीज प्रक्रिया : बीज प्रक्रिया केंद्रांनी आवश्यक किमान मानकांची पूर्तता केल्यानंतर त्यांना बीज प्रक्रिया करण्यास परवानगी देणे. बीजोत्पादकांची आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्यांना बियाणे प्रक्रियेसाठी परवानगी देणे. तसेच बीज प्रक्रिया केंद्रावर प्रक्रिया करताना देखरेख करणे.
6) आवश्यक कागदपत्रे : अंतिम क्षेत्र तपासणी अहवाल / मळणी प्रमाणपत्र, प्रक्रिया केलेले बियाणे ज्या पिशवीत भरावयाचे आहे त्या पिशवीचा नमुना.
7) बीज परीक्षण : प्रक्रिया झालेले बियाणी पिशवीत भरताना त्या लॉटच्या बियाण्यातील प्रतिनिधीक नमुना काढून बीज परीक्षणासाठी पाठविणे. पीकनिहाय मानकांची पूर्तता करणारे बी प्रमाणीकरणास पात्र ठरविणे तर मानके पूर्ण न करणारे बी अपात्र ठरविणे.
8) अनुवंशिक शुद्धता क्षेत्र चाचणी : पायाभूत बियाणे जे पुढील बीजोत्पादनासाठी स्त्रोत आहे असे बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर अनुवंशिक शुद्धता चाचणीसाठी पाठविणे. तसेच त्याची अनुवंशिक शुद्धता चाचणी घेणे.
9) पात्र बियाणे ठरविणे : बीज परीक्षण व अनुवंशिक शुद्धता क्षेत्र चाचणी मध्ये प्रमाणीकरण प्रमाणकांची पूर्तता करणारे बियाणे पात्र ठरवून त्यास यंत्रणेने विहित केलेले टॅग (पांढरे / निळे) लावणे. पिशव्या मोहोरबंद किंवा सील बंद करणे.
10) मुक्तता अहवाल : पात्र बियाण्यास विहित प्रपत्रात कोणत्याही स्वरूपात अहवाल देण्यात येतो. या अहवाल शिवाय बियाणे विक्री करता येत नाही.
11) प्रमाणीकरण रद्द ठरविणे : बियाण्याचे प्रमाणीकरण कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे अधिकार प्रमाणीकरण यंत्रणेला आहेत. बीजोत्पादकांनी दिशाभूल करून बियाण्याचे प्रमाणीकरण केल्याचे लक्षात आल्यास या अधिकारांचा ते वापर करू शकतात.
बीजोत्पादन राबविण्याची मूलतत्वे :
हवामान : आपल्या विभागातील वातावरणात चांगल्याप्रकारे येऊ शकणाऱ्या पिकांचीच शक्यतो बीजोत्पादनासाठी निवड करावी. बहुतांश पिकांना मध्यम स्वरूपाचा पाऊस, तापमान आणि आर्द्रता पोषक असते. पीक फुलोऱ्यात असताना स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मिळाल्यास परागीकरण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. फुलोऱ्याच्या काळात जास्त पाऊस किंवा तापमान परागीकरणास अयोग्य असतो. त्यामुळे अशाप्रकारचे हवामान असणाऱ्या भागात शक्यतो बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये आणि घ्यावयाचेच असल्यास अशाप्रकारच्या हवामानात येणाऱ्या पिकांचीच निवड करावी.
जमीन : बीजोत्पादनासाठी शक्यतो सपाट, मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच ज्या पिकाचे बीजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या जमिनीमध्ये पूर्वीच्या हंगामात त्या पिकाच्या त्याच अथवा दुसऱ्या जातीचे पीक घेतलेले नसावे. शिवाय बीजोत्पादनासाठी आवश्यक विलगीकरण असावे.
विलगीकरण : बीजोत्पादनाचे क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातींपासून प्रमाणीकरण यंत्रणेच्या नियमाप्रमाणे अलग (अंतर राखून) असावे. विलगीकरण अंतर हे प्रत्येक पिकांसाठी वेगवेगळे असते आणि पिकाच्या परागीभवनाच्या पद्धतीप्रमाणे कमी जास्त होते.
मशागत : पेरणीपूर्वी खोल नांगरट करून घ्यावी म्हणजे जमिनीतील तण कमी होण्यास मदत होते. कुळवाची पाळी घालून जमीन चांगली भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार करावी.
बियाणे : पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत बियाणे तर प्रामाणीत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवरील खुणचिठ्ठी काळजीपूर्वक पहावी.
बीजप्रक्रिया : बियाणे पेरणीपूर्वी त्यावर प्रक्रिया केलेली नसल्यास प्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये बुरशीनाशके, कीटकनाशके, जिवाणू संवर्धक यांची प्रक्रिया करणे गरजेचे असते. अशी प्रक्रिया शेतावर पेरणीपूर्वी करावी.
पेरणी : पेरणी शक्यतो पेरणी यंत्राने करावी. त्यामुळे बी एका रेषेत पडते. लहान बी खोलीवर पेरू नये. मोठ्या आकाराचे बी खोलीवर पडले तरी उगवू शकते. कोरड्या जमिनीत बी खोलवर पेरावे म्हणजे ते ओलीशी संपर्कात येवून उगवते. रेताड जमिनीत बी खोल पडले तरी उगवू शकते. परंतु भारी जमिनीत बी जास्त खोलवर पडू नये म्हणून पेरणी यंत्राने पेरणी करावी.
खते : रोग आणि कीडमुक्त बीजोत्पादनासाठी कोरडे हवामान चांगले असते. परंतु अशा हवामानात बीजोत्पादन क्षेत्रात गरजेनुसार पाणी देणे आवश्यक असते. भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीस वारंवार पाणी देणे गरजेचे असते. फुलोऱ्यानंतर एक दोन पाळया देणे बीजोत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पेरणीनंतर जास्त दिवस ओल राहिल्यास अथवा पुरेसा ओलावा नसल्यास उगवण कमी होते. पिकांच्या वाढीनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
आंतरमशागत : चांगल्या प्रकारचे बीजोत्पादन घेण्यासाठी बीजोत्पादनाचे क्षेत्र तणविरहित असणे फार आवश्यक असते. तणामुळे बीजोत्पादनाची प्रत कमी होते. काढणीच्या वेळेस बियाण्यांमध्ये तणाचे बी मिसळण्याचा संभव असतो. असे बी वेगळे करणे फारच जिकिरीचे होते. तणांमुळे कीड आणि रोग वाढण्याचा किंवा पसरण्याचा धोका असतो. यामुळे आवश्यक तेवढया निंदण्या-खुरपण्या करून बीजोत्पादन क्षेत्र तणविरहित ठेवावे.
पीक संरक्षण : रोग आणि कीड यांचे प्रभावी नियंत्रण हा बीजोत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रोग आणि कीड यांच्या संसर्गामुळे बीजोत्पादन घटते आणि तयार झालेले बियाणे निकृष्ट प्रतीचे होते. रोग अथवा किडींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. त्यासाठी चांगल्या प्रतीची कीटकनाशके अथवा बुरशीनाशके वापरावीत. रोग आणि किडींच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी आवश्यक तेव्हा फवारण्या कराव्यात. रोग आणि कीडग्रस्त रोपे/झाडे उपटून काढावीत. बियाण्यापासून होणारे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नेहमी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
भेसळ काढणे : बीजोत्पादनामध्ये वेळोवेळी भेसळीची झाडे काढणे फारच महत्त्वाचे असते. वेगळया जातीची तसेच त्याच जातीची परंतु रोगट, पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच किंवा बुटकी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे उपटून काढून टाकावीत. पीक अशा प्रकारच्या भेसळीपासून मुक्त होईपर्यंत दररोज भेसळ काढण्याचे काम चालू ठेवावे. ज्या पिकांत परपरागीभवन होते, अशा पिकांतील भेसळीची झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत. जी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत, अशी झाडे फुलोऱ्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात. तसेच संकरित बीजोत्पादनात मादी वाणाच्या ओळीत नर वाणाची झाडे असल्यास तीसुद्धा काढून टाकावीत. पीक पक्व होण्याच्या अवस्थेतसुद्धा भेसळ काढणे महत्त्वाचे असते. वेगळया गुणधर्मांची झाडे स्वपरागीभवन होणाऱ्या पिकांमध्ये पक्व होण्याच्या अवस्थेतही काढता येतात.
बीजोत्पादन क्षेत्र तपासणी : बीजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणा पिकाच्या परागीभवनाच्या प्रकारानुसार 2 ते 4 क्षेत्र तपासण्या करतात. यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बीजोत्पादन आहे किंवा नाही, ते तपासले जाते, तसेच बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाते.
बीजोत्पादक पिकांची काढणी करताना घ्यावयाची काळजी
1) काढणी: पिकांतील आंतरमशागती आणि तपासणी झाल्यानंतर पीक जेव्हा पक्व होईल, तेव्हा ते काढावे. बीजोत्पादन पिकांची काढणी पक्वतेस करणे आवश्यक असते, कारण त्या वेळी बियाण्याची पूर्ण वाढ झालेली असते व बियाण्यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने सर्व गुणधर्म असतात. बियाणे पक्व होण्याच्या आधी काढले तर मळणी आणि उफणणीच्या वेळेस त्यातून अपरिपक्व बियाणे जास्त प्रमाणात निघून वाया जाते आणि उत्पन्न कमी होते. काढणी उशीरा झाली तर बियाणे शेतातच गळून पडल्यामुळे नुकसान होते. त्यामुळे उत्पन्नात घट येते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणतः 12 ते 15 टक्के दरम्यान असल्यावर ते काढण्यास तयार होते. काढणी वेळेवर झाल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.
बियाण्याची शुद्धता ही काढणीनंतर होणाऱ्या हाताळणीवर अवलंबून असते. काढणी आणि मळणी करतेवेळी इतर बियाण्याची भेसळ त्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी बियाणे क्षेत्रातील पीक वेगळे ठेवावे. मळणी शक्यतो सपाट जागेवर ताडपत्रीवर किंवा फरशीवर करावी. सारवलेल्या जागेवर मळणी केल्यास बियाण्याकडून जमिनीतील पाणी /ओलावा शोषला जाण्याची शक्यता असते. मळणी यंत्र बियाण्याच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थित सेट केलेले असावे.
2) बियाणे वाळवणे : काढणी आणि मळणीच्या वेळेस बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने ते उन्हात वाळवणे आवश्यक असते. त्यामुळे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता आणि जोम टिकून राहतो. बियाण्यातील पाण्याचे प्रमाण ठराविक पातळीपर्यंत कमी केल्याने साठवणीच्या वेळी किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) तात्पुरती साठवण : थोडे दिवस साठवणीकरिता स्वच्छ केलेल्या कीडविरहित पोत्यात किंवा नवीन पोत्यात बियाणे भरून ठेवावे. पोत्यावर बियाण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असावी. पोती जमिनीपासून काही अंतर ठेवून उंचावर तयार केलेल्या लाकडी रॅक्सवर ठेवावी. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची संख्या 4/5 पेक्षा जास्त असू नये. तसेच बियाणे स्वच्छ, थंड आणि कोरडे हवामान असलेल्या भांडारात साठवावे. आवश्यकतेनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा भांडारात वापर करावा. त्यानंतर बियाणे प्रक्रिया केंद्रावर पाठवावे.
बिजोत्पादन तंत्राचा अवलंब करून बीजोत्पादन घेत असतांना संपूर्ण बाबींची सखोल माहिती घेऊनच बीजोत्पादन कार्यक्रम राबवावा. तसेच बी एका रेषेत पेरल्यामुळे भेसळ रोपे काढणे सोपे जाते. तसेच पिकावर वखरणी, खते देणे, पिकाची पाहणी यासारखी कामे करणे सोईस्कर होते. तसेच संकरित बीजोत्पादनाच्या वेळी नर आणि मादी वाणांच्या ओळी ठराविक प्रमाणातच पेराव्या लागतात.
अशाप्रकारे बीजोत्पादन घ्यावयाचे असल्यास बीजोत्पादन कायदा, 1966 अन्वये निर्धारित केलेले नियम व तरतुदीचे पालन करून बीजोत्पादन घ्यावे, तसेच बीजोत्पादनासाठी आवश्यक घटक असतात त्यांची बीजोत्पादन क्षेत्रावर योग्य ती काळजी घ्यावी. तसेच बीजोत्पादन यशस्वी होण्यासाठी सदर लेखात दिलेल्या बियाणे लागवडीची मूलतत्त्वे, कायदा, तरतूदी व नियमांची तंतोतंत पालन करून बीजोत्पादन घ्यावे.
संदर्भग्रंथ
1. बीजोत्पादन तंत्रज्ञान, पाठ्यपुस्तक क्र.-2, निम्नस्तर कृषि शिक्षण शाखा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
2. डॉ. विजय शेलार व इतर, बियाणे तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
3. प्रमुख पिकांचे बीजोत्पादन तंत्रज्ञान, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, पान क्र. 5-90
4. कृषि दैनंदिनी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, 2015
5. कृषि दैनंदिनी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी , 2016-17.
शब्दांकन : Kishor Sasane, Latur
Good information
Vipul lalsing padvi