सुधारित सोयाबीन लागवड तंत्र

खरीप हंगामातील घेतलेल्या जाणाऱ्या पिकांपैकी सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन साधारणपणे 40 टक्के प्रथिने व 20 टक्‍के तेलाचे प्रमाण असते. सोयाबीन प्रथिनांचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे हे पीक कडधान्‍यात तसेच यामध्‍ये असणाऱ्या तेलामुळे हे पीक गळीताचे पीक म्‍हणूनही ओळखले जाते. सोयाबीन हे द्विदल पीक असल्‍याने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्‍या वाढीसाठी उपलब्‍ध करून देते. सोयाबीन हे ऊस, कापूस, तूर व ज्‍वारी यामध्‍ये आंतरपीक म्‍हणून तसेच फेरपालटीचे पिके व बेवड म्‍हणून ही महत्‍त्‍वाचे पीक आहे. सोयाबीनच्‍या झाडाचा पाला-पाचोळा जमिनीवर पडल्‍यामुळे जमिनीचा पोत सुधारण्‍यास मदत होते.

महाराष्ट्रात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता मात्र कमी आहे. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शेतीचे तुकडीकरण वाढत असून कमी धारण क्षेत्रावर सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. याच उदेशाने शेतकरी बांधवांचे सोयाबीन उत्पादन वाढावे, प्रती हेक्टरी उत्पादकता वाढावी, त्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी सुधारित सोयाबीन लागवड तंत्र हा लेख उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरू शकेल.

हवामान 

सोयाबीन हे पीक उष्ण तापमानास अतिशय संवेदनशील आहे. या पिकाची वाढ सरासरी 25 ते 35 अंश तापमान व 700 ते 1000मि.मी. पाऊसमान असलेल्या भागात होऊ शकते. सोयाबीनला आर्द्रता 70 टक्क्यापेक्षा जास्त असल्यास बियांची उगवण क्षमता व रोपांची वाढ चांगली होते. जास्तीत – जास्त फुले येऊन उत्पादन वाढीसाठी साधारणत: 270 ते 300 सेल्सिअस तापमान उत्तम असते.

जमीन

सोयाबीन पिकासाठी जमीन मध्यम स्वरुपाची, भुसभुशीत व पाण्याच्या योग्य  निचरा होणारी जमीन उत्तम होते. सोयाबीनच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, लालसर, गाळाची किंवा पोयट्याची जमीन सुद्धा योग्य असते. जमिनीचा सामू (P.H.) साधारणपणे 6.5 ते 7.5 पर्यंत असल्यास, सोयाबीनची वाढ उत्तम होते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल जमीन, मोकळ्या हवेची, अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली, सेंद्रिय पदार्थ मुबलक असलेली जमीन चांगली असते. इतर अन्नघटकांचा साठा समतोल असणे जरुरीचे असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास हे पीक उत्तम येते. अति आम्लधर्मी जमिनीमुळे सोयाबीन मुळांवरील गाठींवर परिणाम होतो. म्‍हणून शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या जमिनी सोयाबीन लागवडीसाठी शक्यतो टाळाव्‍यात.

सोयाबीन सुधारित वाण

सोयाबीन वाणांची लागवडीसाठी निवड करताना निवडलेल्या जातीचे दर्जेदार उत्पादन क्षमता असली पाहिजे, कमी कालावधीत पक्व होणारी व काढणीस लवकर येणारी जात, कीड व रोगांना प्रतिकारी करणारी असावी, बाजारपेठेत त्या वाणाला चांगला बाजारभाव व वाणाला गुणात्मक वैशिष्टे असणे आवश्यक आहे. याप्रमाणे विचार करून सोयाबीन लागवडीसाठी त्या जातीचा उपयोग करावा.    

1) एम. एस. सी. एस. 13

ही जात मध्‍यम उंचीची (50सें.मी.) असून तिला मुख्‍य खोडापासून बऱ्याच फांद्या फुटतात. शेतकऱ्यांच्‍या शेतावर या जातीचे उत्‍पन्‍न प्रति हेक्‍टरी 25-35 क्विंटल पर्यंत येते. प्रतिकूल हवामानातसुद्धा ही जात चांगले उत्‍पादन देत असून महाराष्‍ट्र, मध्‍य प्रदेश, गुजरात व राजस्‍थान या राज्‍यांसाठी लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे. 

2) एम. एस. सी. एस. 124

ही जात 1992 मध्‍ये विकसित झालेली आहे.या जातीस तयार होण्‍यास 90-100 दिसाचा कालावधी लागतो, ही जात बऱ्याच रोगांना व किडींना प्रतिकारक आहे. शेंगा न फुटणाऱ्या असून दाणे पिवळसर व आकाराने मोठे आहेत. शेंगात तीन दाण्‍यांचे प्रमाण 80 टक्‍केपेक्षा जास्‍त आहे. ही जात अधिक उत्‍पन्‍न देणारी असून प्रति हेक्‍टरी उत्‍पादन 30-35 क्विंटलपर्यंत मिळते. या जातीची महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्‍यांसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.

3) जे. एस.- 335

ही जात मध्‍य भारतात लागवडीसाठी प्रसारित करण्‍यात आली आहे. भारतात एकूण सोयाबीन क्षेत्राच्‍या 90टक्‍के क्षेत्रावर या जातीची लागवड केली जाते. जे.एस. 78 व 77, जे. एस. 71-05 या जातीच्‍या संकरापासून ही जात तयार केली आहे. या जातींच्‍या फुलांचा रंग जांभळा असून, 95ते 100 दिवसांत ही जात परिपक्‍व होते. या जातीपासून सरासरी उत्‍पन्‍न 25-35 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.

4) एम. एस. सी. एस. 57 

ही जात लवकर येणारी असून साधारणत: 75-90 दिवसांत तयार होते. खरीप आणि उन्‍हाळी हंगामासाठी योग्‍य असून हिरवा मोझॅक विषाणू रोग व करपा रोगास प्रतिकारक आहे. या जातीचे सरासरी 20-30 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्‍पादन मिळते. ही जात कापूस, ऊस व फळबागेत आंतरपीक म्‍हणून लागवड करण्‍यास उपयुक्‍त आहे.

5) एम. एस. सी. एस. 58

ही जात उंच वाढणारी असून फुले निळसर रंगाची व खोड जाड असल्यामुळे झाळे लोळत नसून पीक तयार होण्‍यास 90-100 दिवसांत परिपक्‍व होऊन काढणीस येते. या जातीची उगवण क्षमता 90 टक्‍के पेक्षा अधिक असून बहुसंख्य रोग व किडींना प्रतिकारक आहे. या जातीचे सरासरी उत्‍पादन 25-35 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. यात तेलाचे प्रमाण जास्त असते. या जातीची महाराष्‍ट्र, मध्‍य प्रदेश, गुजरात व राजस्‍थान या राज्‍यांसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे. 

पूर्व मशागत

सोयाबीन लागवडीपूर्वी शेताची ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून जमिनीतील निघालेले धसकटे, काडीकचरा वगैरे वेचून जमीन स्‍वच्‍छ ठेवावी. नांगरणी नंतर वखराच्‍या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून समपातळीत करून घ्‍यावी, त्यानंतर जमिनीत चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्‍ट खत (सुमारे 12 ते 17 गाड्या) मिसळून जमीन तयार करावी. 

पेरणी हंगाम

सोयाबीन लागवडीचे प्रमुख दोन हंगाम असून खरीप व उन्‍हाळी असे आहेत.  खरीप पेरणी जून महिन्‍यात 75 ते 100 सें.मी. पाऊस झाल्‍यावर जमिनीत 4 सें.मी. खोलीवर पेरणी करावी. सोयाबीन बियाणे 4सें.मी. पेक्षा जास्‍त खोल पेरल्‍यास बियाणे कुजून जाते किंवा अंकुर वाळतो, त्‍यामुळे रोपांची संख्‍या कमी होऊन उत्‍पादनात घट येते. पेरणीचा योग्‍य कालावधी हा जूनचा तिसरा आठवडा (20 जून) ते जूलैचा दुसरा आठवडा (10 जूलै) आहे. 15जूलैनंतर पेरणी केल्‍यास उत्‍पादनात घट येते. शक्‍यतो 20जूलैनंतर सोयाबीनची पेरणी करू नये.

बीजप्रक्रिया

सोयाबीन पिकाचे मुळकुजव्‍या व इतर बुरशीजन्‍य रोगांपासून संरक्षण करावयाचे असल्‍यास 3 ग्रॅम थायरम 1 किलो बियाण्‍यास किंवा 2 ग्रॅम थायरम + 1 ग्रॅम बावीस्‍टीन किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्‍हीरीडी (जैविक) बुरशी) प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर सोयाबीन पिकासाठी रायझोबियम जपोनिकम हे जिवाणू खत वापरावे. साधारणत: 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू खत अधिक 250 ग्रॅम स्‍फुरद विरघळणारे जिवाणू खत 10 ते 15 किलो बियाण्‍यासाठी वापरावेत.  गुळाचे द्रावण तयार करण्‍यासाठी 1 लिटर पाण्‍यात 125ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे सोयाबीन मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्‍ध केला जातो आणि त्‍यामुळे पीक उत्‍पादनात वाढ होते.

हेक्‍टरी बियाणे (किलो)

सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्‍टरी 4 ते 4.5 लाख झाडांची संख्‍या शेतात राखण्‍यासाठी 70-75 टक्‍के उगवण क्षमता असलेले 75किलो बियाणे प्रमाणे हेक्‍टरी वापरावे किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे 80 किलो पुरेसे होते. अन्‍यथा उत्‍पादन कमी मिळते. 

सोयाबीन पेरणी पद्धती

) पारंपारिक पेरणी

सर्व खरीप पिकांची पेरणी शक्‍यतो पूर्व-पश्चिम अशी करतात. सोयाबीन सुद्धा याला अपवाद नाही. परंतु शेताला जर उतार असेल तर मशागतीसोबतच पेरणी सुद्धा उताराला आडवी राहील याची दक्षता घेऊनच करावी. पेरणी करतांना तिफणीने किंवा पेरणी पाभरीने करावी, तिफणीचा वापर टाळावा. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम दिशेने करावी. सोयाबीन करिता दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर 30 x 10 सें. मी. किंवा 45 x 10 सें. मी. ठेवावे. सोयाबीन बियाची पेरणी 4सें.मी. खोलीवर करावी. पेरणी करतांना बी जमिनीत जास्त खोलवर जाऊ नये याची दक्षता घ्यावी.

आधुनिक ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी

महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांनी विकसित केलेले हे पेरणी यंत्र ट्रॅक्‍टरचलित असून या यंत्राने सोयाबीन  पिकांची पेरणी चांगल्या प्रकारे करता येते. सदरचे ट्रॅक्‍टर चलित पेरणी यंत्र हे बैचलित पेरणी यंत्राप्रमाणे आहे. फक्‍त यामध्‍ये बियाणे व खतांच्‍या पेटीचा आकार वाढविलेला आहे. या यंत्रामध्‍ये बियाणे नियंत्रित करण्‍यासाठी प्‍लॅस्टिक रोटर वापरले आहेत. खत नियंत्रणासाठी फ्युटेरोलरची सोय आहे. यामध्‍ये फणांतील अंतर कमी – जास्‍त करता येते. या यंत्राणे सहा ते नऊ ओळी एका वेळेस पेरता येतात. या यंत्राने 8 ते 10 एकर क्षेत्र एक दिवस पेरणी करता येते. ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी केल्‍यास मनुष्‍याची गरज भासत नाही. कमी वेळात व कमी श्रमात जास्‍त क्षेत्र पेरणी करता येणे सुलभ झाले आहे. ज्‍या ठिकाणी शेतमजूरांचा अभाव आहे अशा ठिकाणी या पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते.

आंतरमशागत

खरीप हंगामातील पिकांना आंतरमशागत करणे अत्यंत गरजेचे असते. मुख्य पिकाच्या दोन ओळी मध्ये केल्या जाणाऱ्या उदा. खुरपणी करणे, कोळपणी, करणे, विरळणी करणे, इत्यादी कामास आंतरमशागत असे म्हणतात. पिकाच्या जोमदार योग्य वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवावे. सोयाबीन पीक 25 ते 30 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. तसेच सोयाबीन पिकांतील तणे खुरपणीद्वारे काढून शेत तणविरहित ठेवावे. तणांचा प्रादुर्भाव अधिक असल्यास सोयाबीन पिकांत तणनाशक फवारणी करावयाचे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पाणी व्‍यवस्‍थापन

सोयाबीन हे आपल्याकडे खरीप हंगामात घेतले जात असल्याने त्याला फारशे पाणी देण्याची गरज भासत नाही. परंतु पाऊसाचा खंड पडल्यास किंवा पीक फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना एक ते दोन संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे. अथवा यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यास पारंपारिक पद्धतीने पाणी देणे गरजेचे असते.  

सोयाबीन आंतरपिके

सोयाबीन पीक कमी कालावधीचे (90 दिवस) असल्‍यामुळे जास्‍त करून यात आंतरपिकांचा समावेश कमी प्रमाणात होतो, तर ऊस, तूर, ज्‍वारी यामध्‍ये आंतरपीक म्‍हणून जास्‍त प्रमाणात घेतले होते.  उदा. कपाशी + सोयाबीन 1.2 किंवा 1.1 ओळीच्‍या प्रमाणात किंवा तूर + सोयाबीन 1.2 किंवा 2.4 ओळीच्‍या प्रमाणात लागवड करणे गरजेचे असते.  

तक्‍ता क्र. 1 सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्‍टरी खतांचा मात्रा

लागवडीनंतर दिवसनत्रस्फुरदपालाशमॅग्नेशियम सल्फेटकॅल्शियम नायट्रेटझिंक सल्फेटफेरस सल्फेट
5 ते 10 दिवस20757500000010
30 ते 3500000010000010
कू20757510000010

सोयाबीन प्रमुख किडींचे व्यवस्थापन

सोयाबीनवर प्रामुख्याने पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, घाटेअळी, हिरवी उंट-अळी, खोडमाशी, लष्‍करी अळी, केसाळ अळी, पानावरील ठिपके, पानांवरील मोझॅक, मावा, तुडतुडे, फुलकिडे  इ. अनेक किडी अधिक प्रमाणात आढळून येतात.

1) पाने खाणारी अळी (स्‍पोडोप्‍टेरा लिटुरा)

पाने पोखरणारी अळ्या ह्या तीन प्रकारच्‍या असतात. आपणाकडे या अळ्यांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात असतो. अळ्या पानावरील पापुद्रा तसाच ठेऊन पानातील हरित पदार्थ खातात. ह्या अळ्या पानावर नागमोडी चरत जातात. त्‍यामुळे पानांवर पांढ-या रेषा व चट्टे दिसतात. त्‍यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने वाळतात व पडतात.

उपाय : महाराष्‍ट्रात सोयाबीनच्‍या पिकावर या किडींचा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव होत असला तरी, काही ठिकाणी  यांचा उपद्रव जास्‍त असतो. यासाठी इन्‍डोकार्ब 6.6 मि. ली. किंवा क्‍लोरएंट्रानिलोप्रोल 18.5 ईसी 2 ते 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रावर  फवारणी करावी.

2) पाने गुंडाळणाऱ्या अळ्या

खरीप व उन्‍हाळी या दोन्‍ही हंगामात घेतल्‍या जाणाऱ्या सोयाबीनच्‍या पिकामध्‍ये अळ्या अतिशय नुकसानकारक ठरतात. या किडींच्‍या पतंगाला पांढऱ्या रंगाचे पंख असतात. पुढील पंखावर पांढ पांढऱ्या या रंगाचा फिक्‍ट ठिपका असतो. अळी तपकिरी करड्या रंगाची असून पाठीमागे निमुळती असते. फक्‍त अळी पिकाचे नुकसान करते. प्रथम अळी पानांचा वरचा पापुद्रा पोखरते. मोठी झाल्‍यावर पानांची गुंडाळी करून त्‍यामध्‍ये राहते. पानांचा रस शोषण करते व पानांवर उपजीविका करते. त्‍यामुळे पाने करपून आकसतात व वाळून जातात. या किडींचा प्रादुर्भाव जास्‍त झाल्‍यास पीक करपल्‍यासारखे दिसते, म्‍हणजेच ही अळी प्रकाशसंश्‍लेषण क्रियेस अडथळा आणते. 

उपाय : या किडीच्‍या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट योग्य करावी. एक हेक्‍टर सोयाबीनच्‍या क्षेत्रासाठी एका प्रकाश सापळयाचा वापर फायदेशीर ठरतो. नियंत्रणासाठी डेकामे‍थ्रीन 8 मि.ली. 10 ली. पाण्‍यात, सायपरमोथ्रिन 25 % प्रवाही 50 मि. लि. 10 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी. 

3) फुलकिडे

सोयाबीन पिकाच्‍या फुलोऱ्या अवस्‍थांमध्‍ये ह्या किडीचे अस्तित्‍व स्‍पष्‍ट दिसू लागते. पाऊसमान तसेच जास्‍त तापमान अशी हवामानाची स्थिती निर्माण झाली की पिकास फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलकिड्यांच्‍या तीन जाती आहेत. त्‍यांचा रंग फिक्‍कट पिवळसर असते. ते पाने खातात व आतील रसाचे शोषण करतात. या उपद्रवामुळे पाने चुरडू लागतात. फुलकिड्यांना अरूंद अशा पंखांच्‍या दोन जोड्या असतात. भिंगातून पंखाचे निरीक्षण केल्‍यास ते दोन्‍ही बाजूस दाते असलेल्‍या कंगव्‍याप्रमाणे असतात. या किडीचा प्रादुर्भाव दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतो. फुलकिड्यांची मादी पानांच्‍या शिरांमधील पेशीत अंडी घालते. एक मादी साधारणता 4 ते 6 दिवसांच्‍या काळात 50 ते 60 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडताच पिल्‍ले पूर्ण वाढ होईपर्यंत पानांतील व कळ्यांमधील रसांचे शोषण करतात. फुलकिड्यांचा आयुष्‍यक्रम साधारणतः 25 दिवसांचा असतो. 

उपाय : फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी 50 मि.ली. डायमिथोएट 30 टक्‍के प्रवाही  10 लिटर पाण्‍यात  मिसळून  फवारणी करावी. त्‍यानंतर फुलकिडी आटोक्‍यात येते. तसेच कडूलिंबाचा अर्क (5 टक्‍के) किंवा तेल (1 ते 2 टक्‍के) फवारणीसाठी वापरल्‍यास फुलकिडींची संख्‍या कमी होते.

4) मावा

ही कीड विविध पिकावर कमी जास्‍त का होईना पण नुकसानीस कारणीभूत ठरते. सोयाबीनच्‍या बाबतीतही मावा ही कीड उपद्रव करणारी आहे. ही कीड आपल्‍या शरीरातून मधासारखा गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर टाकते. तो पानावर पसरून त्‍यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्‍यामुळे पानांच्‍या अन्‍न तयार होणाऱ्या क्रियेमध्‍ये अडथळा निर्माण होतो. पूर्णवाढ झालेला मावा व त्‍याची पिल्‍ले मुख्‍यत्‍वे पानाच्‍या खालच्‍या बाजूस समूहाने राहून पानांतील रस शोषून घेत राहतात. अर्थातच त्‍यामुळे झाडांच्‍या वाढीवर अनिष्‍ट परिणाम होतो. त्‍यामुळे रस शोषून घेणाऱ्या किडींत ही कीड नुकसानीच्‍या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.  

उपाय : कोणत्‍याही आंतरप्रवाही कीटकनाशकाच्‍या फवारणीने मावा या किडीचे सहज नियंत्रण करता येते. तसेच मावा कीटकांचा जास्‍त प्रादुर्भाव झालेल्‍या सोयाबीनच्‍या झाडावर लेडी बीटल भुंगेरे, सिर्फीड माशीच्‍या अळया आणि लेसवींग मावा कीटक अधा‍शीपणे खात असतात. त्‍यामुळे माव्‍याचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणता येतो.

5) तुडतुडे

सोयाबीनच्‍या पानांतील रस शोषण करणारी ही एक महत्‍त्‍वाची कीड आहे. ते पाचरीच्या आकारा सारखे दिसतात. पूर्ण वाढ झालेले तुडतुडे आणि त्‍यांची पिल्‍ले दोन्‍ही पिकास उपद्रव करतात. सोयाबीनच्‍या कोवळ्या झाडांतील आणि पानांतील रस ते शोषत राहतात. त्‍यामुळे झाडाची वाढ खुंटते. ही कीड तिच्‍या सोंडेने रस शोषून घेते. त्‍यामुळे व्‍हायरस रोगाचा फैलाव होण्‍यास तुडतुडे अप्रत्‍यक्षरित्‍या कारणीभूत ठरतात. तुडतुडे हिरवट, पिवळ्या रंगाचे असून त्‍यांच्‍या पुढील पंखावर एक काळा ठिपका व कपाळावर दोन काळे ठिपके दिसतात. बाल्‍यावस्‍थेत ते बिनपंखी व हिरव्‍या रंगाचे असून तिरके चालतात. हे किडे पानांच्‍या मागच्‍या बाजूस राहून पानांच्‍या पेशीतील रस शोषून घेतात. त्‍यामुळे पानांच्‍या कडा पिवळ्या पडू लागतात. किडींचे प्रमाण जास्‍त झाल्‍यास पाने पिवळी पडून वाळतात व सोयाबीनला शेंगा कमी लागून उत्‍पादनात घट येते.  

उपाय : या किडीच्‍या नियंत्रणासाठी मिथील डिमेटॉन 25 टक्‍के प्रवाही 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्‍यातून फवारल्‍यास चांगल्‍या प्रकारे नियंत्रण होते.

6) लष्करी अळी

या अळ्यांचे आक्रमण एकाच वेळी हजारोंच्या संख्येने होत असल्यामुळे त्यांना लष्करी अळ्या असे म्हणतात. अन्नधान्यांच्या लागवडीत ही कीड एकदम फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करते. परंतु सोयाबीनच्या पिकात ती अल्पशा स्वरूपात आढळते मात्र जास्त नुकसानकारक ठरते. पीक लहान असताना जर अळ्यांचे आक्रमण झाले तर संपूर्ण पिकाचा नाश होतो. पिकाची वाढ झालेल्या पिकावर आक्रमण झाल्यास आक्रमणाच्या स्वरूपानुसार पिकाच्या उत्पादनावर घट होत असते. अळी गर्द हिरव्या रंगाची, अथवा मळकट हिरवीगार दिसते. तिच्या दोन्ही बाजूस दोन पांढरट पट्टे असतात. सोयाबीन शिवाय इतर एकदल व द्विदल डाळवर्गीय पिकावरही ह्या लष्करी अळ्या आढळून येतात.

उपाय : लष्‍करी अळीच्‍या नियंत्रणासाठी  क्‍लोरोपायरीफॉस 20 टक्‍के 20 मि.ली.  10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. तसेच याच्‍या भुकटीची हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणे धुरळणी पिकांवर करावी

7) केसाळ अळी

सोयाबीन या पिकावर कोणत्याही प्रकारच्या फवारण्या अथवा धुरळण्या वेळच्या वेळी केल्या गेल्या नाहीत, तर केसाळ अळ्यांसारख्या किडीदेखील या पिकाला उपद्रव करायला लागतात. ह्या अळ्या बदामी रंगाच्या असतात. त्यांच्या शरीरावर बारीक, बारीक तंतुमय केसांची वलये सहजरित्या पाहिले तरी ओळखू येतात. म्हणून त्यांना केसाळ अळ्या असे म्हणतात. ह्या अळ्या सोयाबीनची पाने कुरतडून खातात व पानांच्या शिरा शिल्लक ठेवतात. ह्या अळ्यांना सुरवंट असेही म्हणतात. ह्या अळ्या कधी-कधी पिकांवर अधाशासारख्या तुटून पडतात. त्यंच्या केसाळपणामुळे त्यांना अस्वल अळ्या असेही म्हणतात.

उपाय : केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित औषधांच्या फवारण्या अथवा धुरळण्या कराव्यात, कारण ह्या अळ्या लहान असतानाच त्यांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. यांच्‍या नियंत्रणासाठी नेमोरिया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्‍यातून फवारणी करावी.  

8) हिरवी उंट अळी 

अळी हिरव्‍या रंगाची असून चलताना उंटासारखा बाक पाठीवर दिसतो. ही अळी मोठ्या प्रमाणात पाने व फुलांचे नुकसान करते. यामुळे उत्‍पादनात 50 टक्‍के घट होते. 

उपाय : या अळीच्‍या नियंत्रणासाठी इन्‍डोकार्ब 6.6 मि.ली. किंवा क्‍लोरएंट्रानिल 18.5 ईसी 2 ते 3 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून एक हेक्‍टर मध्‍ये फवारावे, तसचे 5 टक्‍के निंबोळी अर्क किंवा 5 टक्‍के  निंबोळी अर्काबरोबर शिफारस केलेल्‍या कीटकनाशकाची अर्धी मात्रा वापरावे. 

सोयाबीन प्रमुख रोगांचे व्यवस्थापन

1) पानावरील मोझॅक

या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो व तो पिकास घातक ठरतो. घातक विषाणूमुळे असे रोग निर्माण होतात. पाने चुरडणे, पाने लहान-जाड व कडक होऊन पर्णगुच्छ तयार होणे, झाडांची वाढ खुंटणे, पुष्कळशा कळ्या येऊन त्यांची गळ होणे, पानावर पिवळ्या हिरव्या रंगाची वेडीवाकडी नक्षी होणे, ही सर्व मोझॅक रोगाची लक्षणे आहेत. या रोगाची लागण व प्रसार काही कीटकांमुळे होतो. मोझॅक रोग पाण्यामुळे पसरतो. फुलकिडे व माईट्स यांची लागण झालेली झाडे कीटकनाशकाचा फवारा मारल्यास सुधारतात. सुरुवातीपासून ह्या रोगाची काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत या रोगाबाबत पिकांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडी पडायला सुरुवात झाली म्हणजे रोगग्रस्त झाडे थोडीफार सुधारणा दाखवितात. झाडावर नवीन कळ्या व पाने येतात. परंतु झालेले नुकसान भरून निघत नाही.

उपाय : सोयाबीनच्‍या नांग्या भरल्यानंतर 5-6 दिवसांनी मिथील डिमेटॉन 25 ई.सी. 400 मि. लि. किंवा फोसॅलीन 34 ई.सी. 750 मि.लि. अधिक गंधक 80 टक्के पाण्यात मिसळणारे, थायोमेटॉन 25 ई.सी. 400 मि. लि. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी करावी. 

2) पानावरील ठिपके

सोयाबीन पानावर, फुलावर, खोडावर आणि फांद्यावर अनेक प्रकारचे ठिपके आढळून येतात. त्यामध्ये करपा व अल्टर्नेरिया या दोन्ही रोगाची लक्षणे पानांवर दिसून येतात. उदा. तेलकट डाग दिसणे, पाने काळी पडणे इ. अतिवृष्टी होऊन शेतात पाणी तुंबून राहिले व बराच काळ ढगाळ हवामान राहिले तर हे रोग उद्भवतात. फांदी सडणे, दांड्याच्या गळ्याभोवती काळी बांगडी उद्भवणे, पाने कुजून सडणे, घाण साचणे, पाणथळ होणे इ. अनेक कारणांमुळे हे रोग उद्भवतात. काही वेळा पानांवर फिक्कट रंगाची वलये तयार होऊ लागतात. तर काही ठिकाणी सोयाबीनच्या पानावर काळे गोल किंवा वेडेवाकडे ठिपके पडतात.

उपाय : अशा रोगाचा प्रसार हवेतून जास्त फैलावतो. या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच ताम्रयुक्त बुरशीनाशक 50 टक्के 1250 ग्रॅम 50 लिटर पाण्यात द्रावण करून फवारावे. किंवा झायनेब (डायथेन झेड-78) 75 टक्के, अगर डायथेन एम-45 हे 1500 ग्रॅम 500 लिटर पाणी या द्रावणात 10 किलो युरिया मिसळून फवारणी करावी. शक्य असल्यास दुसरी फवारणी देखील झायनेबचीच करावी. सोयाबीनचे पीक 5-6 आठवड्यांचे असताना 300 पोताची गंधकाची भुकटी हेक्टरी 12 ते 15 किलो या प्रमाणात धुरळणी करावी.

3) करपा (कॉलर रॉट)

करपा हा बुरशीजन्‍य रो असून त्‍याचा प्रसार जमिनीतून होतो. या रोगामुळे रोपे कोलमडून जमीनीवर पडतात. त्‍याचप्रमाणे हा रोग मोठ्या झाडांना झाल्‍यास बुंध्‍याजवळ कापसाप्रमाणे पांढरी बुरशी वाढलेली दिसते व तेथील भाग सडतो. या मोठ्या झाडांचे शेंडे प्रथम पिवळे होऊन नंतर मरतात.

उपाय : पिकांची योग्‍य फेरपालट करणे, शेतात स्‍वच्‍छता ठेवणे, प्रति हेक्‍टरी 20 कि‍लो क्‍लोरोनेबच्‍या द्रावणाने जमीन भिजवावी. रोगट झाडे मुळासगट उपटून नष्‍ट करावीत.  तसेच हा रोग टाळण्‍यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्‍यास थायरम 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

4) मररोग

हा रोग फुज्‍जॅरियम नावाच्‍या बुरशीमुळे होतो. सोयाबीन वरील हा महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. रोगाच्या प्रादुर्भावाने पिकाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होते. रोगाचे बीजाणू जमिनीत राहात असल्यामुळे ते तंतुमय मुळांच्या द्वारे रोपांत प्रवेश करतात. रोपाच्या वाढीबरोबरच बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. झाडाच्या मुख्य अन्न व पाणी वाहिनीच्या भागात प्रवेश करून त्या ठिकाणच्या पेशीच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे मुख्य झाडाचा अन्न व पाण्याचा पुरवठा कमी होतो किंवा बंद पडतो. यामुळे सुरुवातीस पाने पिवळट पडून हळूहळू सुकून जातात. कित्येक वेळा फांदीच्या फांदीच सुकते आणि शेवटी पूर्ण झाड मरते. या रोगाची बुरशी जमिनीत 3 ते 4 वर्षापर्यंत जिवंत राहात असल्यामुळे रोग-नियंत्रणासाठी त्याच जमिनीत पुन्हा-पुन्हा सोयाबीनचे पीक घेऊ नये. किंवा फेरपालट करावी व रोगप्रतिबंधक जातीची लागवड करावी.

5) तांबेरा

हा बुरशीजन्‍य रोग असून हा रोग सोयाबीन प्रमाणेच इतर पिकांवरही आढळतो. या रोगामुळे पानांच्‍या खालील बाजूस प्रथम ठिपके दिसून येतात. नंतर हे ठिपके सर्वच पानांवर पसरतात. सुरुवातीस पानगळ होऊन झाडास फक्‍त शेंगाच राहतात. अशा शेंगात दाणे भरण्‍याची क्षमता कमी होऊन शेंगा पोचट राहतात.

उपाय : रोग प्रतिबंधात्‍मक जातींचा लागवडीसाठी वापर करण्‍यात यावा. सोयाबीन पिकाची पेरणी लवकर करून पिकाची यापासून काही प्रमाणात सुटका करून घेता येते. तसेच डायथेन एम 45 टिल्‍ट, कॉन्‍टॉफ किंवा डायथेन झेड 78 या बुरशीनाशकांची हेक्‍टरी 2 ते 2.5 किलो 800 ते 1000 लिटर पाण्‍यात फवारणी करावी. सोयाबीनवर ज्‍या भागात तांबेरा रोग आला असेल तेथे कोणत्‍याही परिस्थितीत रब्‍बी किंवा उन्‍हाळी हंगामात सोयाबीनची लागवड करू नये.

सोयाबीनवर आढळून येणाऱ्या प्रमुख रोगांची माहिती आपण जाणून घेतली आहे. सोयाबीन रोगांच्या नियंत्रणासाठी आवश्यक रासायनिक औषधे, प्रमाण व वापर याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण शासन वेळोवेळी रासायनिक औषधे अथवा कीटकनाशकावर बंदी घालत आहे.

काढणी

सर्वसाधारणपणे सोयाबीनची सर्व पाने झडून जातात तसेच 95 टक्‍के शेगा परिपक्‍व झालेल्‍या असतात तेव्‍हा पीक कापणीयोग्‍य झाले असे समजावे, परंतु सोयाबीनच्‍या जास्‍त कालावधीच्‍या जातीमध्‍ये शेंगा जरी पक्‍व झालेल्‍या दिसल्‍या तरी झाडावर हिरवी पाने दिसून येतात आणि 10 टक्‍के शेंगा सुद्धा हिरव्‍या दिसतात. तेव्‍हा पीक पक्‍व झाल्‍याबरोबर ताबडतोब कापणी सुरु करावी अन्‍यथा कापणीस उशीर झाल्‍यास शेंगा तडकून जातात व उत्‍पादनात घट येऊ शकते. सोयाबीन कापणी मजूराच्या साह्याने करावी. मजूरांचा अभाव असल्यास सोयाबीन काढणी यंत्राद्वारे करावी. सोयाबीन कापणी लवकर केली, तर अपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. तसेच कापणी उशिरा केली, तर शेंगा फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी सोयाबीनची पाने पिवळी होऊन शेंगा पक्व झाल्यावर पिकाची कापणी करावी. नंतर पीक विळ्याने कापून शेतातच 1-2 दिवस चांगले वाळवावे. वाळलेले सोयाबीनचे पीक खळ्यावर पसरून ट्रॅक्टरच्या चाकाखाली किंवा मळणी यंत्राच्या साह्याने मळणी करावी.  

उत्पादन

सोयाबीनचे सर्वसाधारणपणे 35 ते 40 क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. परंतु सोयाबीनचे उत्पादन जमीन, हवामान, सुधारित वाण, लागवड पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात्त इ. प्रमुख घटकांवर सुद्धा अवलंबून असते. या घटकांची पूर्तता केल्यास प्रति हेक्टरी अधिक उत्पादन मिळू शकते.

अशाप्रकारे सुधारित सोयाबीन लागवड तंत्र या लेखामध्ये सविस्तर सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. त्यामध्ये माहिती अनावधाने कमी वा जास्त असू शकते यामध्ये काही चुकीचे असल्यास खाली कमेंटस बॉक्सद्वारे कळवावे. त्याचे चुकांचे वेळीच निराकरण करण्यात येईल. अशाप्रकारे सुधारित सोयाबीन लागवड तंत्र हा लेख महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची दिशा व प्रेरणादायी ठरू शकेल, अशी लेखकाची खात्री आहे.     

सदर्भ ग्रंथ

  1. जगन्‍नाथ शिंदे, (2016) : सुधारित सोयाबीन लागवड व व्‍यवस्‍थापन, गोदावरी पब्‍लीकेशन, नाशिक
  2. ठोंबरे शिवाजी, खुस्‍पे वसंत (2015) : सोयाबीन, कॉन्टिनेन्‍टल प्रकाशन, विजयानगर, पुणे
  3. काटोले रविंद्र मधुकर, (2016) : सोयाबीन प्रक्रिया उद्योग, गोडवा कृषि प्रकाशन, पुणे
  4. शेतकरी मासिक, सोयाबीन लागवड  (2018-19) : महाराष्ट्र शासन, कृषि विभाग, मुंबई

प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, अति. एम.आय.डी.सी., लातूर

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

सुधारित सोयाबीन लागवड तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

1 thought on “सुधारित सोयाबीन लागवड तंत्र”

Leave a Reply