ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान

ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. ऊस पिकामुळे महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या असून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यास मोठी मदत झालेली आहे.

देशात अंदाजे 5 कोटीपेक्षा जास्‍त शेतकऱ्यांना आधार देणारा हा ऊस कारखानदारी उद्योग जगात द्वितीय क्रमांकावर आहे. ब्राझील अद्यापही प्रथम क्रमांकावर भक्‍कमपणे उभा आहे. जागतिक उत्‍पादनात भारताचा अंदाजे 17 टक्‍के वाटा आहे. परंतु साखर निर्यातीत त्‍याचा केवळ 4 टक्‍के इतका वाटा आहे. सध्‍या अंदाजे 80 हजार कोटीच्‍या आसपास मूल्‍य निर्माण करणारा हा उद्योग नियंत्रणाच्‍या श्रृंखलांमधून मुक्‍त होण्‍याची वाट पाहत आहे.

अलीकडच्या काळात ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यास आपण अपयशी ठरलो आहोत, कारण कृषि विद्यापीठाने व संशोधन संस्थेने विकसित केलेल्या सुधारित व संकरित जातींचा शेतकरी लागवडीसाठी वापर न करणे, पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीचा वाढता वापर करणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर करणे, केंद्र शासनाचा ऊस पिकाला मिळणारा तुटपुंजी भाव व ऊस तोड मजुरांची दिवसेंदिवस घटती संख्या इ. प्रमुख समस्या एकविसाव्या शतकात शेतकरी व ऊस उत्पादक कारखानदारी व्यवसायासमोर मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत. अशा परिस्थितीत ऊस शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चाललेला असल्याचे दिसून येते.

ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांना करावयास हवा. सुधारित लागवड तंत्र, ऊसाचे रोपे, ऊस बेणे प्रक्रिया, लागवडीसाठी आधुनिक यंत्राचा वापर, कृषि विद्यापीठ व ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊसाच्या नवीन वाण, ऊसाचे लागवड अंतर, ऊस लागवडीच्या पद्धती, ऊसातील आंतरमशागत, पाणी व्यवस्थान, खत व सूक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, ऊसातील तणांचा बंदोबस्त, पाण्याद्वारे विद्राव्ये खते देणे, उसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, ऊस तोडणी व वाहतूक इत्यादी अनेक बाबींचा योग्य समतोल साधल्यास ऊसाचे प्रतिहेक्टरी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे ऊस शेतीतील उत्पादनास शाश्वत आणता येईल. त्यामुळे सदरील लेखाद्वारे ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान या ‍विषयावर सखोल माहिती सादर करण्यात येत आहे. या तंत्राचा शेतकऱ्यांनी  त्यांच्या शेतात अवलंब केल्यास किफायतशीर ऊसाचे उत्पादन निश्चितपणे मिळू शकेल, यात शंका नाही.   

ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान

ऊस उत्पादन :

महाराष्‍ट्र राज्‍यात सन 2017-18 मध्‍ये ऊस क्षेत्र सरासरी 9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर एवढे असून 722 लाख मेट्रिक टन ऊस  गाळपासाठी  उपलब्ध होणार आहे. उर्वरित ऊस बेणे, रसवंती व ऊस गुऱ्हाळ यासाठी जाऊन प्रत्‍यक्षात गाळपासाठी 649 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्‍ध होईल असा अंदाज साखर आयुक्‍तालय, पुणे यांनी दिलेला आहे. राज्‍यात सर्वाधिक 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टर क्षेत्रावर पुणे विभागात लागवड करण्‍यात आली, तर सर्वात कमी नागपूर विभागात 11 हजार 165 हेक्‍टर क्षेत्रावर उत्‍पादन झाले.

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या तुलनेत एकूण सरासरी ऊसाखालील क्षेत्र 9 लाख 42 हजार 560 हेक्‍टर असून, पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा जिल्‍ह्यातून मिळून 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टर तर ऊस नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्‍ह्यांमध्‍ये मिळून 11 हजार 165 हेक्‍टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झालेली होती.

महाराष्‍ट्रातील ऊस कमी उत्‍पादकतेची कारणे

1)     ऊसाची पारंपारिक पद्धतीने लागवड करणे.

2)   लागवडीपूर्वी बिण्‍यास बेणे प्रक्रिया वा उष्‍णजल प्रक्रिया न करणे.

3)   ऊसाच्‍या सुधारीत व संकरित जातीचा लागवडीसाठी अभाव.

4)     खोडवा पिकाचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन न करणे.

5)     ऊस उत्पादनात आधुनिक सिंचन पद्धतीचा अभाव.

6)     कीड व रोगांचे एकात्मिक नियंत्रणाचा अभाव.

हवामान :

ऊस पीक वाढीच्‍या काळात उष्‍ण तापमानाचा कालावधी व सूर्यप्रकाशाचा कालावधी अधिक असल्‍यास आणि पाण्‍याची कमतरता न भासल्‍यास ऊसाची वाढ उत्तम होते म्‍हणजेच कांड्याची संख्‍या व लांबी वाढते. पानांची संख्‍या अधिक असते आणि ऊसाचे जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन आणि उत्‍पादकता मिळते. ऊस वाढीच्या काळात 1100 ते 1500 मी. मी. पावसाची गरज असते. पीक परिपक्‍व होण्‍यासाठी कोरडे हवामान, प्रखर सूर्यप्रकाश असावा, मात्र थंड हवामान आणि धुके नसलेले हवामान अत्‍यंत गरजेचे असते. जेव्‍हा पीक परिपक्‍वतेचे दिशेने वाटचाल करते, तेव्‍हा सुरूवातीस 83 टक्‍के इतके पाण्‍याचे प्रमाण म्‍हणजेच रसाचे प्रमाण असते, मात्र ऊस परिपक्‍व होताच पाण्‍याचे किंवा रसाचे प्रमाण घटते ते 71 टक्‍के इतके होते. त्‍याच कालावधीत साखरेचे प्रमाण ऊसात 10 ते 45 टक्‍क्‍यापर्यंत वाढत जाते आणि ते प्रमाण ऊस वाळल्‍यानंतर भागाच्‍या प्रमाणानुसार असते. वादळी, वारे, गारपीट, सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक लोळ शकते. चक्रीय वारे आणि वादळेही या पिकाच्‍या वाढीवर विपरित परिणाम करतात.

जमीन :

ऊस पिकासाठी जमीन कमीत-कमी 50 ते  75 सें.मी. खोलीची, भुसभुशीत, सच्छिद्रता असलेली, निचरा होणारी क्षारांचे प्रमाण नसलेली जमीन उत्तम असते. ऊस पिकासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर उत्पादन चांगले मिळते. जमिनीच्‍या प्रकारानुसार मशागत, भरखते, वरखते, पाणी देण्‍याच्‍या पद्धती, लागवड पद्धत यामध्‍ये बदल केल्‍यास अपेक्षित उत्पादन घेणे शक्‍य होते. जमीन मुख्यता चार घटकांनी बनली आहे.

माती परीक्षण :  

ऊस पिकाची लागवड करण्‍यापूर्वी पिकाची वाढ चांगली व्‍हावी व जमिनीमध्‍ये कोणती अन्‍नद्रव्‍ये कमी प्रमाणात आहेत व कोणती अन्‍नद्रव्‍य जास्‍त प्रमाणात आहेत, याची माहिती करून घेण्‍यासाठी पूर्व मशागत करण्‍याअगोदर माती परीक्षण करून घ्‍यावे. माती परीक्षण म्‍हणजे जमिनीतील उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍याचे पृथ्‍थकरण करणे होय. पिकांच्‍या माध्‍यमाची माहिती असणे, पीक व्‍यवस्‍थापनेतील अति महत्‍त्‍वाची बाब आहे. यात मृदाचाचणी आणि पाण्‍याचे पृथ्‍थकरण आहेत. मृदा चाचणीमुळे जमिनीचा आम्‍ल-विम्‍ल निर्देशांक, चुन्‍याचे प्रमाण, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्‍ध नत्र, स्‍फुरद तसेच गंधक, चुना, लोह, जस्‍त, बोरॉन व तांबे ही अन्‍नद्रव्‍ये प्रमाणित पद्धतीने काढली जातात. मृदा परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्‍लेषण करण्‍याची जलद पद्धत आहे. यात जमिनीची पिकांना अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध करण्याची क्षमता सुपीकता आाणि उत्‍पादक क्षमतेचा अंदाज लक्षात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करण्यापूर्वी संबंधित माती परीक्षण केंद्राकडे मातीचा नमुना घेऊन तपासणी करावी. 

पूर्व मशागत :

ऊसाचे पीक शेतात साधारणपणे 3 वर्षापेक्षा ज्यादा कालावधीसाठी उभे असते. ऊसाच्या मुळया जमिनीमध्ये चारही बाजूंनी विस्तारत असतात. यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. बागायती जमिनीमध्ये पाणी, मशागत, खते इ. मुळे 6 ते 8 इंच खोलीवर घट थर तयार होतो. तो घट थर तोडून चांगल्या प्रकारे पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. ऊसाच्या मुळया 90 ते 100 सें.मी. पर्यत खोल जाऊ शकतात. त्यामुळे जमिनीत योग्य ओलावा असताना खोल नागरट करावी जमीन तापू दयावी त्यानंतर हे 50 गाड्या शेणखत / कंपोस्ट खत जमिनीवर एकसारखे पसरवून कुळव/फनीच्या साह्याने ढेकळे फोडावी. त्याचप्रमाणे चांगल्या पाणी नियोजनासाठी जमीन समपातळीत आणावी. शेणखत/कंपोस्ट खताची कमतरता भासल्यास हिरवळीच्या खताचा वापर करावा.

ऊस : हंगामनिहाय सुधारित जाती :

अ) पूर्व हंगामी (ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर)- को-7219, कोम-7714, को-740, को-86932, कोसी-671 व को-8014 या जातींचा लागवडीसाठी वापर करावा. महाराष्‍ट्रात ह्या जातींचा मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापर केला जातो.

ब) सुरू हंगामी (जानेवारी-फेब्रुवारी)- को-419, को-7219, कोम-88121,को-740, कोम-7125, कोसी-671, को-8014, को-86032 इ. सुधारित जातींचा सुरू हंगामासाठी वापर करावा. ह्या जाती  रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देतात.

क) आडसाली ऊस (जूलै-ऑगस्‍ट)- आडसाली ऊस लागवडीत ऊस शेतात साधारणपणे 16 ते 18 महिने शेतात उभा राहत असल्‍यामुळे या पिकासाठी को-740, को-88121 व को-86032 इ. जातींचा आडसाली ऊस लागवडीसाठी वापर करावा. कारण जूलै महिन्‍यात आपल्‍याकडे पावसाळा सुरू असतो त्‍यामुळे ऊसाची चांगल्‍या प्रकारे वाढ होऊ शकते.

ऊस बेणे निवड ठळक वैशिष्टये

  • ऊसाचे बेणे जाड, रसरशीत व सशक्त असावे.
  •  डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण) झालेली असावी व डोळे फुगीर असावेत.
  •  डोळे जास्त जुनी व निस्तेज नसावेत.
  • 10 ते 11 महिने वयाचा ऊस बेण्यासाठी वापरावा.
  • बेणे रोग व किडमुक्त असावे.
  •  मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
  •  खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.

ऊस बेणे प्रक्रिया :

ऊस लागवडीपूर्वी ऊस हे बेणे मळ्यात वाढविलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्‍ट्या शुद्ध बेणे वापरल्‍यास ऊस उत्‍पादनात 15 ते 20 टक्‍के वाढ होते. जिवाणू खतांच्‍या प्रक्रियेमुळे 50 टक्‍के नत्र, 25 स्‍फुरद खतांची बचत होते व उत्‍पादनात वाढ होते. त्‍यानंतर 100 लिटर पाण्‍यात 100 ग्रॅम कार्बेन्‍डेझिम आणि डायमेथोएट 10 मिनिटे बुडवूना काढाव्‍यात. त्‍यानंतर त्‍याची लागवड करण्‍यात यावी. यामुळे बुरशीजन्‍य, जिवाणूजन्‍य व मररोगापासून संरक्षण होते व उत्‍पादनात चांगली वाढ होते.

ऊस रोपे तयार करणे :

रोपे निर्मितीसाठी सरीत पट्टया पसरण्‍यासाठी 50 पोती लागतात. एक एकर लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्र आवश्‍यक असते. प्रत्‍येकी 100 फूट लांब खताच्‍या पोत्‍याच्‍या पट्टयात अंथरल्‍या. एका पोत्‍यापासून 15 फूट अंतराची पट्टी तयार होते. पट्टीच्‍या कडा सरीच्‍या बगलेतील मातीने बुजविल्‍या. पट्टीवर दोन बोटे जाडीचा मातीचा थर घातला. त्‍यात पुरेसे शेणखत, क्‍लोरऍन्‍ट्रानिलीप्रोल (दाणेदार) व डीएपी मिसळून एक डोळ्याची कांडी लागवड केली. फुले265 या जातीचे दहा महिने वयाचे प्रमाणित बेणे निवडले. बेणे प्रक्रियेनंतर सरीत अंथरलेल्‍या पट्टीवरील शेणखत-मातीच्‍या मिश्रणाच्‍या बेडवर कांडीवरील डोळ्याची बाजूवर करून कांड्या आडव्‍या ठेवावेत. बेणे लावल्‍यानंतर पट्टीच्‍या कडेने मातीत लहानशी चळी घेऊन ती माती बेण्‍यावर अंथरून हलकासा दाब दिला. चळीमुळे पट्टीवर जादा झालेले पाणी निघून जाते.

ऊसाची बेणे लागवड पूर्ण झाल्‍यावर गरजेनुसार पाणी चार दिवसांनी तणनाशकाचा वापर बेण्‍याची उगवण 15 दिवसांत पूर्ण (पारंपारिक पद्धतीमध्‍ये 15 ते 25 दिवस लागतात) रोपवाटिकेत बेणे लागवडीनंतर 20 व्‍या दिवशी युरिया सरीत विस्‍कटून द्यावा. सुमारे 21 व्‍या दिवशी 19:19:19 नत्र, स्‍फुरद व पालाश या विद्राव्‍य खताची फवारणी केली. क्‍लोरोपायरीफॉस व त्‍यानंतर सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य फवारणी. सुमारे 30 दिवसांत चार पानांची रोपे तयार झाली. पुनर्लागवडीच्‍या दिवशी कात्रीने रोपांची वरची निम्‍मी पाने कापली, यामुळे लागवडीनंतर रोपांचे बाष्‍पीभवन कमी होण्‍यास मदत होते.

तीन स्तरीय बेणे मळा पद्धती :

1)प्रजनीत (ब्रीडर) बेणे

या प्रकारचे ऊस बेणे फक्त संशोधन संस्थांच्या (व्ही.एस. आय., पुणे ऊस संशोधन केंद्र पाडेगांव, विभागीय ऊस व गुळ सेंशोधन केंद्र कोल्हापूर व कृषि विद्यापीठे इ.) प्रक्षेत्रावर तयार करून त्याचे कारखाने किंवा संशोधन संस्थांच्या प्रक्षेत्रावर पायाभूत बेणे तयार करण्यासाठी दिले जाते. या प्रकारच्या बेणे निर्मितीसाठी मूलभूत बेणे वापरून त्यावर खालीलपैकी एक प्रक्रिया केली जाते.

अ) उष्णजल प्रक्रिया : बेणे 50 अंश सें. तापमान दोन तास किंवा 52 अंश सें. तापमान अर्धा तास याप्रमाणे प्रक्रिया करून लागण करावी.

ब) बाष्प उष्ण हवा प्रक्रिया : 54 अंश सें. तापमान 2.5 तास प्रक्रिया करून लागण करावी. या बेणे प्रक्रियामुळे प्रामुख्याने काणी व गवताळ वाढ या रोगांचा नाश होतो.

2)पायाभूत (फाऊंडेशन) बेणे

पायाभूत बेणे संशोधन संस्था किंवा करखाना प्रक्षेवार तयार केले जाते. या बेण्यावर मूळ व कांडी कूज यासारखे रोग आणि खवले कीड, पिठे कीड इ. नाश करण्यासाठी लागणीच्या वेळी औषधांची बेणे प्रक्रिया करावी.

3)प्रमाणित (सर्टिफाईड) बेणे

पायाभूत बेणे कारखाने किंवा निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रमाणित बेणे तयार करण्यासाठी दिले जाते. सदरील बेणे मळा कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावा व वेळोवेळी तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा. रोग, कीड व ऊसाच्या इतर जातींचे ऊस आढळल्यास वेळोवेळी ताबडतोब काढून त्याची नोंद घ्यावी. असे प्रमाणित बेणे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये लावण्यासाठी दिले जाते.

ऊस लागवड हंगाम :

ऊस पिकाची लागवड महाराष्ट्रात वर्षभरात तीनही हंगामात करता येते. त्‍यात प्रमुख्‍याने आडसाली हंगाम, पूर्व हंगाम व सुरू हंगामात केल्‍यास समानधानकारक उत्‍पन्‍न मिळते. ऊस लागवडीचे प्रामुख्याने तीन प्रमुख हंगाम आहेत.

) आडसाली हंगाम : आडसाली ऊसाची लागवड जुलै -ऑगस्ट महिन्यात केली जाते. हा ऊस 16 ते 18 महिने शेतात राहतो. 

) पूर्व हंगाम: पूर्व हंगामी ऊसाची लागण सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. पूर्व हंगाम या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पद्धतीत ऊस 14 ते 15 महिने शेतात राहतो व ऊस लवकर परिपक्व होतो त्यामुळे ऊसाची तोड सुद्धा लवकर होते.

) सुरू हंगाम : सुरू हंगामी ऊसाची लागण डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते. या पद्धत फारच प्रचलित नसून महाराष्ट्रात काही जिल्ह्यात या पद्धतीने ऊस पिकासाठी हंगाम निवडतात. या पद्धतीत ऊस 13 ते 14 महिने शेतात राहतो. कारखान्यास जाण्यास काही प्रमाणात विलंब लागतो.

तक्‍ता क्र. 1 : ऊस लागवडीचा प्रकार व कालावधी याची माहिती

लागवड प्रकारलागवड कालावधी पीक कालावधी मह‍िने
आडसाली15 जुलै ते 15 ऑगस्ट16 ते 18 महिने
पूर्व हंगाम15 ऑक्टोबर 15 नोव्हेबर14 ते 16 महिने
सुरू हंगाम15 जानेवारी 15 फेब्रुवारी12 त 14 महिने
खोडवाआक्टोबर ते फेब्रुवारी अखेर12 ते 13 महिने

ऊस लागवडीचे प्रकार :

जमिनीचा प्रकार व पाण्याचे साधन, पाणी देण्याची पद्धत ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग इ. बाबी विचारात घेऊन ऊसासाठी योग्य अंतरावर सरी घेणे व लागवडीची योग्य पद्धत अवलंबने गरजेचे आहे. हलक्या जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करताना 90 ते 105 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात मध्यम भारी काळया जमिनीत रुंद सरीचा अवलंब करावा. रुंद सरी तयार करताना 120 ते 150 से.मी. अंतरावर सऱ्यापाडाव्यात. सरी जास्त खोल व उथळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

अ) जमिनीतील ओलाव्यानुसार ऊस लागण

1. ऊस कोरडी लागण

ऊसाची लागण मध्यम ते भारी जमिनीमध्ये करताना कोरडी / वाफशावरची करावी. सरीमध्ये लागवडीच्या वेळी टाकावयाचे शेणखत सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खते टाकून घ्यावीत. कुदळीने किंवा बळीराम नांगराच्या साह्याने 2 इंच ते 3 इंच (5 ते 7.5 सें.मी.) इंच चळी घ्यावी म्हणजे टाकलेली खते मातीमध्ये मिसळतील चळीमध्ये 2 इंच ते 3 इंच (5 ते 7.5 सें.मी.) खोलीवर व योग्य अंतरावर टिपऱ्या लावून मातीने झाकूण घ्याव्यात. पहिल्या दोन ते तीन पाण्याच्या पाळया हालक्या दयाव्या. म्हणजे कांड्या उघड्या पडून नांग्या पडणार नाहीत. कोरडी / वाफशावर लागण ही योग्य पद्धत आहे.

2. ओली लागवड

ही योग्य पद्धत असून महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत सरीमध्ये पाणी सोडून 2.5 ते 5 से.मी. खोल जमिनीमध्ये टिपरी दाबली जाते. जमीन ओली असल्याने बेण्याच्या डोळयास इजा होत नाही. त्याचप्रमाणे लागवडीस जास्त वेळ खर्च होत नाही. ओली लागण हालक्या ते मध्यम जमिनीमध्ये जास्त फायदयाची दिसून आली आहे. 

ब) टिपरीच्या डोळयाच्या संख्येवरून ऊस लागवड

टिपरीच्या डोळयाच्या संख्येनुसार ऊस लागण ऊसाच्या संख्येचा विचार करता 1 चौरस फुटात 1 ऊस असावा; एका हेक्टरचे 1,08,900 चौ. फुट क्षेत्रफळ असते. त्यानुसार हेक्टरी सव्वा लाख ऊसाची संख्या असावी; परंतु शेतकरी जास्त बेणे वापरतात. एकरी विचार केला तर 1 एकर मध्ये 43,560 चौ. फूट क्षेत्रफळ असते. यानुसार सरासरी 45000 ऊस असावेत. यामुळे सर्व ऊसाला सूर्यप्रकाश मिळतो ऊस वाढीस जागा मिळते. ऊसाची जाडी वाढून उत्पादनात वाढ होते.

तीन डोळा टिपरी

तीन डोळा पद्धतीने ऊसाची लागवड करताना बेण्याचा वरील भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा. शेतकरी तीन डोळा टिपरीचा जास्त वापर करतात. व लागण करताना टोकास टोक लागण करतात. यामुळे भरणी / बांधणी पर्यत हेक्टरी 2 ते 3.125 लाख ऊसाची संख्या होते मोठया बांधणीनंतर सूर्यप्रकाश घेण्याच्या स्पर्धेने व दाटीमुळे नाजूक असणाऱ्या ऊसाची भर होते. त्यामुळे तोडणीच्या वेळी 100,000 सुधा ऊस मिळत नाही. व राहिलेला ऊस पोसत नाही. लहान राहतो व उत्पादनात घट येते म्हणून शेतकऱ्याने तीन डोळा पद्धतीचा वापर करणे टाळावे.

दोन डोळा टिपरी

टिपरी तयार करताना डोळयाचा वरचा भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा दोन टिपरीमध्ये 6 इंच ते 8 इंच (15 ते 20 से.मी.) अंतर ठेऊन डोळे बाजूला येतील अशी लागण करावी फुटव्याचे प्रमाण कमी असणाऱ्या जातीमध्ये दोन टिपरीतील अंतर कमी ठेवावे. टिप­यामध्ये अंतर एक ते दिड फूटापर्यंत वाढवण्यास हारकत नाही. दोन डोळा पद्धतीमध्ये ऊस संख्या नियोजन आपोआप होत असते. ऊसाच्या सर्व पानाना सूर्यप्रकाश मिळतो. ऊस वाढीस जागा मिळते व स्पर्धा कमी झाल्याने ऊसाची जाडी वाढून उत्पादनात वाढ होते. दोन डोळा पद्धतीची लागण शेतकऱ्याना उपयुक्त आहे व मोठया क्षेत्रावी घेता येते. तीन डोळा पद्धतीतील तोटे आणि एक क्षेत्रावर घेता येते. तीन डोळा पद्धतीतील तोट आणि एक डोळा पद्धतीतील धोके लक्षात घेता दोन डोळा टिपरी पद्धत फायद्याची आहे.

एक डोळा टिपरी पद्धत

टिपरी तयार करताना डोळयाचा वरचा भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा. टिपरे तयार करताना विशेष काळजी घ्यावी. एक डोळा पद्धतीची लागण 1 ते 1.5 (30 ते 45 से.मी.) अंतरावर करावी डोळा वरती येईल याची काळजी घ्यावी. एक डोळा टिपरीचा वापर मोठया प्रमाणात हरीतगृहात पाँली ट्रे मध्ये रोपे तयार करण्यासाठी केला जातो. पाँली ट्रे मध्ये गांडूळखत व कोकोपिट याचे मिश्रण 1:1 या प्रमाणात घेऊन एक डोळा बेणे वापरून रोप निर्मिती केली जाते. त्याचबरोबर प्लँस्टिक पिशवीमध्ये ही एक डोळा पद्धतीने रोपे तयार केली जातात.

या रोप निर्मिती करून ही पुर्नलागवड मोठया प्रमाणात केली जाते. ही एक फायदेशीर ऊस लागवड शेती आहे. एक डोळा पद्धत आडसाली व पूर्व हंगामी ऊस लागवडीस योग्य आहे. 20 ते 25 दिवसात उगवण पूर्ण होते. या कालावधीत नांग्या भरण्याचे काम करावे यासाठी प्लँस्टीक पिशवीतील रोपाचा वापर करावा. नांग्या भरण्यासाठी हेक्टरी अंदाजे 500 ते 1000 रोपे तयार करावीत. त्‍यासाठी एक डोळा टिपरी ज्यादा लावाव्या. सुरू हंगामात एक डोळा पद्धत लागण केल्यास जास्त तापमान पाण्याची कमतरता खोड कीडीचा प्रार्दुभाव यामुळे नांग्या पडून उत्पादनात घट येते.

ऊस लागवडीच्या पद्धती :

) पारंपरिक पद्धत

पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी दोन सरीतील अंतर 2.5 ते 3 (75 ते 90 से.मी.) ठेऊन कट वाफा पद्धतीने वाफे तयार करून लागण करतात. सरीतील अंतर कमी असल्याने फुटव्याची संख्या वाढून मर जास्त होते. व उत्पादनात घट येते. पाण्याचा वापर जास्त होत असल्याने जमिनी कालांतराने नापीक होतात. हे ऊसाची संख्या जास्त राहते. त्यामुळे ऊस बारीक राहतात. यंत्राच्या साह्याने आंतरमशागत व तोडणी करता येत नाही. आंतरपीक घेण्यास अयोग्य सर्व पिकाला पूरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. पांरपारीक लागण पद्धतीमध्ये सुधारणा करून मध्यम भारी जमिनीमध्ये जोडओळ पटा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीचा अवलंब करावा. पाटपाणी व ठिबक सिंचन या पाणी देण्याच्या पद्धती तसेच जमिनीचा प्रकार पाहून सरीतील अंतर ठेवावे. पाट पाण्याची ऊस शेती असेल तर सरीतील अंतर 4.5 ते 5 ठेवावे. 

) पट्टा पद्धत / जोड ओळ पद्धत

2.5:5 (75-150 से.मी.) किंवा 3:6 (90-180 से.मी.) हेक्टरी ऊसाचे उत्पादन वाढवणे व ज्यादा नफा मिळवण्यासाठी आंतरपीक घेण्याच्या दृष्टीकोनातून पट्टा पद्धतीचा अवंलब करणे आवश्यक आहे. ट्रँक्टर अथवा बैलाच्या साह्याने सऱ्या काढाव्यात सलगत 2.5 (75 से.मी.) किंवा 3 (90 सेम.मी.) अंतरावर सर्व सऱ्या काढाव्यात मात्र ऊस लागण करताना दोन सऱ्या मध्ये लागण करून नंतरची एक सरी रिकामी सोडावी म्हणजे पट्टा पद्धतीची लागण होते. या पद्धतीमध्ये ऊसाची लागण नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच सरीच्या मध्यावर करावी आंतरपीक फक्त पट्टयामध्येच लावावे. जोड ओळीमध्ये आंतरपीक घेऊन नये. या पद्धतीत एक हेक्टरमध्ये असणाऱ्या ऊसाची संख्या मर्यादीत राहते आणि 2.5 ते 5 इंच (75 ते 150 से.मी.) किंवा 3 इंच ते 6 इंच (90 ते 180 से.मी.) लागण पद्धतीसाठी अनुक्रमे 25000 आणि 20,000 दोन डोळा टिपरी लागतात. पट्टा पद्धतीमध्ये ऊसाची सरीची लांबी सरळ 40 ते 60 मीटर ठेवली तरी चालते.

) रुंदी सरी पद्धत

या पद्धतीत दोन सरीतील आंतर 4 इंच (120 से.मी.) 4.5 इंच (135 से.मी.) 5 इंच (150 से.मी.) 5.5 (165 से.मी.) 6 इंच (180 से.मी.) ठेवावे व सरीची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटर ठेवावी. एक डोळा किंवा दोन डोळा पद्धतीने लागवड करावी. यामध्ये सरीतील आंतर जास्त असल्याने ऊस फुटवे मरण्याचे प्रमाण कमी होते. वाढ जोमदार होतें आणि उत्पादनात वाढ होते. सरीतील आंतर वाढवत असताना हेक्टरी ऊस संख्या एक लाखाच्या पूढे ठेवण्याचे ज्ञान शेतकऱ्याना असणे गरजेचे आहे. जादा फुटवे येणाऱ्या जातीसाठी सरीतील आंतर वाढवावे व कमी फुटवे येणाऱ्या जातीसाठी आंतर कमी करावे.

हंगामनिहाय आंतरपिकांचे नियोजन :

अ) पूर्व हंगामी ऊस

पूर्व हंगामी ऊसाची लागण ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. हा हंगाम रब्बीचा असल्याने या हंगामात येणाऱ्या पिकांची आंतरपिकांसाठी निवड करावी. उदा. कांदा, कोबी, बटाटे, नवलकोल, फ्लॉवर, लसूण, मुळा, मेथी, कोथींबर इ.

ब) सुरू ऊस

सुरू ऊसाची लागण डिसेंबर-जानेवारी महिन्यात केली जाते. ऊस लागवड जर डिसेंबरमध्ये करावयाची असेल तर फ्लॉवर, कोबी, नवलकोल, मुळा, कोथींबर, मेथी, कलिंगड, काकडी इ. भाजीपाला पिके घ्यावीत. जानेवारीच्या सुरू ऊस लागवडीत भुईमूग, सोयाबीन, मूग, भेंडी, कांदा, गवार, चाऱ्याची पिके मिश्र आंतरपीक घेणे प्रयोगांती आर्थिकदृष्टया फायद्याची दिसून आली आहेत.

क) आडसाली ऊस

आडसाली ऊस शेतामध्ये 18 महिन्यापर्यंत किंबहुना त्यापेक्षा जास्त कालावधीत राहतो. आंतरपीकासाठी जमिनीची योग्यता पाहून चवळी, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला यासारख्या प्रामुख्याने खरीप हंगामात येणाऱ्या द्विदल पिकांचा वापर करावा. जून महिन्यात सऱ्या पाडून 15 जून पर्यंत वरंब्यावर फुले प्रगती भुईमूगाची टोकण करावी. भुईमूगास लागणाऱ्या रासायनिक खताची जादा मात्रा देणे आवश्यक आहे. शिफारशीनुसार 15 जुलैनंतर अगोदर सोडलेल्या सरीत ऊसासाठी लागणाऱ्या खतमात्रा पेरणी करून द्यावीत. ताग, धैंचा सारखी हिरवळीची खते वरंब्यावर टोकण करून ती 45 दिवसानंतर कापून सरीत गाडली तरीसुद्धा कायदेशीर ठरते. 

ऊसातील आंतरमशातीचे कामे :

ऊस हे पीक वर्षभर शेतात राहत असल्यामुळे या पिकातील मशागतीचे कामे चांगल्या प्रकारे करावी लागतात. ऊस पिकात प्रामुख्‍याने आंतरमशागत, ऊसाची बाळबांधणी, मोठी बांधणी, तणनियंत्रण, अच्‍छादन व इतर आवश्‍यक केल्‍या जाणाऱ्या आंतरमशागतीचे प्रमुख कामे खालील प्रमाणे आहेत.

) ऊसाची लहान बांधणी

ऊस पिकास बुंदाजवळ हलकी माती लावणे, म्‍हणजेच बाळ बांधणी होय. बड चीप पद्धतीत रोप लागवडीनंतर साधारणपणे 30-35 दिवसांनी बाळ बांधणी करावी. ऊसास फुटवे येण्‍यास सुरूवात झाल्‍यानंतर ही बांधणी केली जातो. यावेळी ऊसास माती लावण्‍याबरोबरच खताचा दुसरा हप्‍ता द्यावा. जेणेकरून खत मातीत पेरता येतात.

) मोठी बांधणी

ऊस पीक 100 ते 110 दिवसांचे झाल्‍यानंतर अथवा ऊस पिकाने कांडी धरावयास सुरूवात केल्‍यानंतरच मोठी बांधणी करावी. ऊसाची ‘मोठी बांधणी’ म्‍हणजे सरीत असणाऱ्या ऊसाभोवती माती लावणे म्हणजेच सरीचा वरंबा व वरंब्‍याची सरी करणे होय. यामुळे पूर्ण वाढ झालेल्‍या फुटव्‍याचे ऊसात रूपांतर होऊन वाढ जोमदार होते.

) ऊसाची वाळलेली पाने काढणे

ऊसाची वाढ होत असताना बुडाकडील पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्‍यामुळे ती पिवळी पडून सुकतात व कालांतराने वाळतात. ही वाळलेली पाने अन्‍न तयार करण्‍यास सक्षम राहत नाहीत. याच वाळलेल्‍या पानांवर व पानाच्‍या देठावर किडींची अंडी असतात. कीड नियंत्रणासाठी व उत्‍पादन वाढीसाठी ही पाने काढणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे अंड्याच्‍या नाश होऊन किडींची प्रादुर्भाव कमी करता येतो.

साधारणपणे ऊसाच्‍या प्रत्‍येक कांडीला एक पान याप्रमाणे ऊसास पाने असतात. चांगली वाढ झालेल्‍या ऊसास 25 ते 30 पाने असतात. ऊसाची वाढ झालेली असल्‍यामुळे शेंड्याकडील 8 ते 10 पाने हिरवी असतात. सदर पाने प्रभावी प्रकाश संश्‍लेषण करतात. उर्वरित पाने वाळलेली असतात. ही वाळलेली पाने निरूपयोगी असतात. परंतु ऊसामध्‍ये हवा खेळती राहण्‍यासाठी ही पाने काढून टाकावीत. त्‍यामुळे  ऊसामध्‍ये स्‍वच्‍छ हवा खेळती राहते. किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. काढलेल्‍या पानांचा उपयोग सरीमध्‍ये आच्‍छादन म्हणून करावा. 

) आच्‍छादन

ऊस पिकातील ओलावा टिकवून ठेवण्‍याकरिता व तणांचे वेळेवर नियंत्रण करणे गरजेचे असते. कारण तणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ऊसात उन्हाळ्यात आच्‍छादन करत असताना ऊसाचे पाचटाने, गवताचे, किंवा पॉलिथीन कागदाच्‍या सहाययाने जमीन झाकण्‍याच्‍या पद्धतीस आच्‍छादन असे म्‍हणतात. एक हेक्‍टर क्षेत्रावर पाचटाचे आच्‍छादनाचा 10 सें.मी. उंचीचा थर देण्‍यासाठी 10 ते 12 टन पाचट पुरेशी होते. लागणीच्‍या ऊसात पाचट वाहतुकीसाठी वेगळा खर्च करावा लागत असला तरी आच्‍छादनाचे खालील फायद्यामुळे निश्चित 4 ते 6 टन /हे. उत्‍पादनात वाढ होते.

) तण नियंत्रण

ऊसातील तणे पिकाबरोबरच सूर्यप्रकाशात, अन्‍नद्रव्‍यात, पाण्‍या व जमिनीत वाटेकरी होतात. तणांचे नियंत्रण वेळेत न केल्‍यास ऊस उत्‍पादनात येणारी घट 73% पर्यंत येऊ शकते. कमी उत्‍पादन येण्‍याचे हे एक मुख्‍य कारण आहे. ऊस पिकाची उगवण व वाढ सावकाश होत असल्‍यामुळे तणांच्‍या उगवण व वाढीसाठी वाव मिळतो. ऊसाच्‍या अगोदर तणाने जमीन झाकली गेल्‍यामुळे ऊसाच्‍या वाढीवर सुरूवातीपासून अनिष्‍ट परिणाम होत असतात.

तक्‍ता क्र. 2: ऊस पिकात तणनाशक वापरण्‍याचे प्रमाण

तणनाशकवापरण्‍याची वेळकिलो/हे.पाणी प्रमाणतणनाशकाचे प्रमाण
सेन्‍कॉरलागवडीनंतर 6-7 दिवसांनी1 किलो10 लि.10 ग्रॅम
ॲट्राटॉपलागवडीनंतर 6-7 दिवसांनी4 किलो10 लि.40 ग्रॅम
डायुरॉनलागवडीनंतर 6-7 दिवसांनी2.5 किलो10 लि.25 ग्रॅम

) खुरपणी करणे

ऊस हे पीक शेतात वर्षभर राहात असल्‍यामुळे या पिकातील तणे हे खुरपणी /निंदणी करून काढणे गरजेचे असते. कारण तणांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणावर झाल्‍यास उत्‍पादनात मोठी घट येते व आर्थिक नुकसान होऊ शकते म्‍हणून आवश्‍यकतेनुसार ऊस पिकातील तणे काढणे गरजेचे असते. तणांचा प्रादुर्भाव अधिक असल्‍यास व कुशल मजूरांचा अभाव असल्‍यास ऊस लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी जमीन वापसावर असताना हेक्टरी 5 किलो अँट्रॅझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी एक किलो 500 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी. ऊस उगवल्यानंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळून येतो.   

पाणी व्‍यवस्‍थापन :

ऊसाची पाण्याची गरज लागवडीचा हंगाम आणि पीक वाढीसाठी लागणारा कालावधी यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे एक टन ऊस उत्पादनाला सव्वा दोनशे ते अडीचशे टन पाणी लागते. हंगामानुसार अडसाली ऊसाला 340 सें.मी., पूर्व हंगामी ऊसास 325 सें.मी. तर सुरू व खोडवा पिकास 275 सें.मी. पाणी पिकाच्या संपूर्ण कालावधीसाठी आवश्यक असते.

तक्‍ता क्र. 3 : ऊसाच्‍या हंगामानुसार पाणी देण्‍याची गरज व एकूण पाळ्याची माहिती

.क्र.हंगामएकूण पाणी
(सें.मी.)
एकूण पाणी
पाळ्या
1आडसाली3400 ते 35038 ते 42
2पूर्व हंगामी300 ते 32532 ते 34
3सुरू250 ते 27528 ते 30
4खोडवा225 ते 25026 ते 28

ऊस : ठिबक सिंचन पद्धत

ऊसासाठी ठिबक सिंचन पद्धत ही एक आधुनिक पाणी देण्याची पद्धत आहे. ठिबक संचातून ऊस पिकासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने वाळूची (सँड फिल्टर) आणि धातूची (स्क्रीन फिल्टर) गाळण यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. या गाळण टाळयाची वेळच्या वेळी स्वच्छता व देखभाल ठेवणे ही गरजेचे आहे. विहिर बागायतामध्ये उपलब्ध पाण्यावर लागवडी खालील क्षेत्र वाढवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक झालेली आहे. या पद्धतीमुळे मुळाच्या कक्षेत कायमस्वरूपी वापसा स्थितीत ओलावा राहतो. त्यामुळे हवा, पाणी, माती याचे योग्य संतुलन राहून अन्नद्रव्य व पाणी याची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ होते या पद्धतीत पाण्यात विरघळणारी खते देता येतात. जमिनीचे सपाटीकरण करण्याची आवश्यकता नसते. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो व पाणी देण्यासाठी लागणारी मजूरी व वेळ वाचतो.

ठिबक सिंचनाचे प्रमुख घटक : पंपसेट व इलेक्ट्रीक मोटार, मुख्य वाहीणी, उप मुख्य वाहीणी, लँटरल्स, तोटी / ड्रीपर, नियंत्रण झडपा, खत संयत्र / व्हेंच्युरी व दाबमापक इ. आहेत.

ठिबक सिंचनाचे फायदे :

  •  ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यावर पाण्यामध्ये 50 ते 60 टक्के बचत होते.
  • ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरामुळे ऊस पिकात 25 ते 30 टक्के उत्पादनात वाढ होते.
  • पाण्यात विरघळणारी खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य मुळाच्या सहवासात देता येतात त्यामुळे खताच्या मात्रेत 30% बचत होते. 
  • तणाचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे तण नाशकावरील खर्च वाचतो.
  • जमीन सपाटीकरण करण्याची आवश्यकता नाही.
  • ऊसामध्ये रानबांधणी करण्याची आवश्यकता नाही.

खत व्यवस्थापन :

ऊसाचे दर्जेदार व भरघोस उत्पादन घेण्यासाठी ऊसाला संतुलित खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता व पोत कमी होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ऊसाचे एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 %, स्फुरद 15 ते 20 % व पालाश 50 ते 60 % पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार चार वेळा विभागून द्यावी. मातीचे परीक्षण करून खतमात्रा देणे पीक वाढीसाठी फायदेशीर ठरते.

तक्‍ता क्र. 4 : ऊसासाठी विविध सिंचन पद्धतीची कार्यक्षमता

सिंचन पद्धतीदिलेले पाणी
(हे.सें.मी.)
ऊस उत्‍पादन
(टन /हे.)
पाणी वापराची
कार्यक्षमता %
सीसीएस
(टन /हे.)
ठिबक सिंचन132.14128.640.9718.29
तुषार सिंचन175.26126.560.7217.87
सरीसिंचन258.45104.420.4014.71

ऊसावरील प्रमुख कीड व्यवस्थापन :

ऊस पिकावर बहुतांशी प्रमाणात किडी जास्‍त प्रमाणावर आढळून येतात. विशेषत: खोडकिडीमुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. तसेच ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर.  

खोड किडा

ऊसावर 4 प्रकारच्या खोड कीडी येतात. त्यावर खोड किडा, शेंडा खोड किडा, दोन कांड्यामधील खोड किडा व मुळाजवळील खोडावर येणारा खोड किडा ह्या आहेत. खोड किडा ही ऊसाचे उगवणीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडकिडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर झाल्यास ऊस मरतो. वाळलेल्या पोंग्यावरून ही कीड ताबडतोब ओळखता येते. सुरू ऊसाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. ऊसाची लागवड फेब्रुवारीच्या पुढे केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

नियंत्रण : ऊस उगवणीनंतर ऊस 45 दिवसांचा झाल्यावर बाळबांधणी करावी म्हणजे खोडकिडीने निर्माण केलेली छिद्रे बंध होतील व पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल. खोडकिडीची अंडी व किडग्रस्त भाव अळ्यासह गोळा करून नष्ट करावा. खोडकिडीची अळ्या ऊस तोडणीनंतर खोडक्यात राहतात, म्हणून ऊस तोडणी नंतर लगेच नांगरणी करावी व अळ्या गोल करून नष्ट कराव्यात.

ऊस उगवणीनंतर पाचटाचे 5 टन प्रती हेक्टरी आच्छादन करावे म्हणजे खोडकिडीच्‍या अळ्यांना खोडामध्ये जाताना अडथळा होईल. 25 कामगंध (फेरोमोन) सापळे प्रती हेक्टरी लावावेत. खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अंड्यावरील परोपजीवी कीटक ट्रायकोग्राम चिलोनीस हेक्टरी 50 हजार प्रमाणे दर 10 दिवसाच्या अंतराने 4 ते 6 वेळा सोडावेत. ऊसाची लागवड करताना सरीमधून कार्बारील दाणेदार हेक्टरी 25 किलो द्यावे. ऊसाची लागवड झाल्यानंतर 21 दिवसांनी अथवा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रोटेक्टंट 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी 15% गाभेमर आहे. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. खोडकिडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा. ऊसाची तोडणी जमिनी लगत करावी.

लोकरी मावा

जगात लोकरी माव्याच्या सिरटोव्हॅक्यूना लॅनिजेरा, सिराटोव्हॅक्यूना ग्रामिनम व सिरटोव्हॅक्यूना जापोनिका या तीन जातीआढळतात. त्यापैकी भारतातील ऊसावर सिरटोव्हॅक्यूना ग्रामिनम या जातीच्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. महाराष्ट्रामध्ये प्रथम सांगली जिल्ह्यात को.सी. 671 व को. 86032 ह्या जातीच्या ऊसावर जुलै 2002 मध्ये लोकरी माव्याचा उपद्रव्य आढळून आला. त्यानंतर त्याचा प्रसार दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वाढू लागला. ही कीड बाल्ल्यावस्थेत 4 वेळा कात टाकते, म्हणजेच चार रूपांतर अवस्थेतून जाते.

प्रथम बाल्यावस्थेतील ही कीड 0.77 मि. मी. लांब ब 0.27 ते 0.38 मि.मी. रुंद पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असते. ही अवस्था अतिशय चपळ असून पोटाच्या मागील भागात दोन कॉरनिकल्स असतात. द्वितीय बाल्यावस्थेत कीड 1.23 मि.मी. लांब व 0.30 ते 0.46 मि.मी. रुंद, तृतीय बाल्यावस्थेतील 1.83 मि.मी. लांब व 0.46 ते 1.07 मि.मी. लांब रुंद व चौथ्या बाल्यावास्थेतील 2.01 मि.मी. लांब व 0.65 ते 1.28 मि .मी. रुंद आढळते. साधारणपणे तिसऱ्या बाल्यावस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढरे लोकारीसारखे तंतू दिसू लागतात. हे तंतू संरक्षणासाठी तयार केलेले मऊ कवच असते. हे कवच तयार करण्यासाठी लागणारे अमीनो आम्ल व नत्र कॉरनिल्समधून बाहेर टाकले जाते. बाल्यावस्था पानाच्या पाठीमागे प्रामुख्याने मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला स्थिरावलेली आढळते. प्रादुर्भाव वाढत गेल्याने पानाच्या इतर भागावरही दिसून येते.

बुडखा कांडी कीड

नुकसानीचा अंदाज 25 % पर्यंत ऊस उत्‍पन्‍नात व 0.3 ते 2.9 युनिट साखर उताऱ्यात घट येते. नुकसान कसे ओळखावे-जमिनीत असलेल्‍या कांड्या पोखरलेल्‍या व तांबड्या रंगाचया दिसतात. आत विष्‍ठा सापडते. लहान ऊसात पोंगामर आढळतो. कीडीची ऊसाला अपायकारक अवस्‍था व ओळख अळी फिकट पिवळसर व नंतर दुधासारखी पांढरी दिसते डोके पिवळसर लाल दिसते. अळी ऊसाच्‍या, जमिनीतील कांड्या पोखरते. या कीडीचा जीवनक्रम साधारणपणे दीड ते दोन महिने.

नियंत्रण : दूषित खोडव्‍याचे लागवडीसाठी उपयोग करण्‍यास  टाळावा. खूप प्रादुर्भाव झालेल्‍या शेतात भात, भाजीपाला, ते‍लबिाय इ. फेरपालटीची पिके द्यावीत. पाण्‍याचा योग्‍य निचरा करावा. 20 ई.सी. प्रवाही क्‍लोरपायरिफॉस 5 लिटर/हेक्टर 1000 लिटर पाण्‍यात मिसळून ज‍मिनीत टाकावे.  जमिनीत फेब्रुवारी व जुलै महिन्‍यात टाकावे. कीडग्रस्‍त शेतात ट्रायकोग्रामा हा अंड्यावरील परोपजीवी कीटक 3-5 लाख /हेक्टर सोडावा.

पायरीला  (पाकोळी)

नुकसानीचा अंदाज 31.6% ऊस उत्‍पन्‍नात 2 ते 3 % साखर उताऱ्यात घट. नुकसान कसे ओळखावे- पानांवर लहान व मोठे पायरीला (पाकोळी) बसलेले दिसतात. पाने कोरडी पडतात.  कीडीची ऊसाला अपायकारक अवस्‍था व ओळख बाल्‍यावस्‍था व प्रौढ पायरीला  पानाच्‍या खालच्‍या भागातून रस शोषतात. पिल्‍ले पांढऱ्या रंगाची असून त्‍याला करंगळ्यासारख्‍या दोन शेपट्या असतात. मोठे पायरीले तपकिरी दिसतात. या कीडीचा जीवनक्रम दोन महिने असतो परंतु या किडी जास्‍त प्रमाणावर पिकांवर आक्रमण करत असतात.

नियंत्रण : इपिरीकॅनिया या परोपजीवी किटकांचे कोष (1000) व अंडी (1 लाख) हेक्‍टरी सोडावीत. शक्‍य झाल्‍यास सुरूवातीस पायरीलाची अंडी पानांवरून गोळा करून नष्‍ट करावीत. परोपजीवी कीटक सोडलेल्‍या शेतात किटकनाशकांची फवारणी अथवा धुरळणी करू नये.

खवले कीड

नुकसानीच अंदाज 32 ते 60 % उत्पन्‍नात व 1.5 ते 2.5 % साखर उताऱ्यात घट येते. झालेले नुकसान कसे ओळखावे- कांड्यावर उंच लांब गोलाकार राखी व पांढरे खवले दिसतात. कांड्यावर सुरकुत्‍या आढळतात व त्‍याची उंची आणि जाडी कमी होते. कीडीची ऊसाला अपायकारक अवस्‍था व ओळख बाल्‍यावस्‍था कांड्यातून रस शोषण करते. कांड्यावर करडे पतकीरी गोल खवले दिसतात. जीवनक्रम 1.5 ते 2 महिन्‍याचा असतो.

नियंत्रण : खवले कीड विरहित बेणे वापरावे. बेणे 70 % दाणेदार इमिडॅक्‍लोप्रिड 33 ग्रॅम 100 लि. पाण्‍यात 15 मिनिटे बुडवून लावावे. कीडग्रस्‍त ऊसाची खालची वाळलेली पाने काढावीत व फवारणी करावी. ऊसाला कांड्या सुटू लागल्‍यावर इमिडॅक्‍लोप्रिड 17 % एस.एल. 300 मिली. /हे. 1000 मीटर पाण्‍यातून फवारणी करावी.

पांढरे तुडतुडे

नुकसानीचा अंदाज 10 ते 15 % ऊस उत्‍पन्‍नात व 1 युनिट साखर  उताऱ्यात घट. नुकसान कसे ओळखावे पानांवर पांढरे, पिवळसर व तांबडे सुरंगासारखे ठिपके/रेषा दिसतात. नंतर पाने तांबडी पडतात व कोरडी होतात. कीडीची ऊसाला अपायकारक अवस्‍था व ओळख लहान व मोठे तुडतुडे पांढऱ्या  रंगाचे दिसतात व ते पानातून रस शोषण करतात.  या कीडीचा जीवनक्रम हा 2 ते 3 आठवड्याचा असतो.

नियंत्रण :ऊस लागणीनंतर दोन महिन्‍यांनी कीडग्रस्‍त ऊसाची लालसर रंगाची दोन-तीन पाने किडींच्‍या अवस्थांसह काढून नष्‍ट करावीत. क्‍लोरोपायरीफॉस 5 लि. /हेक्‍टर 100 लि. अथवा 76 % ई.सी.डी.डी. व्‍ही.पी. 2 मिली प्रति लि. पाण्‍यात मिसळून फवारावे.

पांढरी माशी

नुकसानीचा अंदाज 86 % ऊस उत्‍पन्‍नात घट, 1.40 ते 1.77 युनिट साखर उताऱ्यात घट येते. नुकसान कसे ओळखावे – पाने अर्धवट पिवळी व काळ्या कोषांनी भरलेली आढळतात नंतर पाने कोरडी होतात. किडींची ऊसाला अपायकारक अवस्‍था ओळख लहान पिल्‍ले पानाच्‍या खालील बाजूने रस शोषतात. पानाच्‍या पाठीमागे काळ्या रंगाचे कोष दिसतात. या कीडीचा जीवनक्रम 1 महिना असतो. 

नियंत्रण : खोडव्‍यास खतांचा शिफारशीत हप्‍ता वेळेवर व प्रमाणात द्यावा. खोडव्‍यास पाण्‍याचा ताण पडू देऊ नये. कीडग्रस्‍त शेतात पानांच्‍या मागील बाजूस दिसणारे काळे कोष व पांढरी बाल्‍यावस्‍था असलेली दोन पाने ऑगस्‍ट-सप्‍टेंबर व जानेवारी-फेब्रुवारी महिन्‍यात काढावीत. पाण्‍याचा योग्‍य  निचरा करावा. पांढऱ्या माशीचा खूप प्रादुर्भाव असल्‍यास प्रति हेक्‍टरी 50 ते 100 कि. जादा नत्र एक महिन्‍यांच्‍या अंतराने दोन हप्‍त्‍यात टाकावे म्हणजे कीडग्रस्‍त ऊस सुधारतो.  कीडग्रस्‍त शेतात (17.8% एस.एल.) इमिडॅक्‍लोप्रीड 0.3 मिली प्रति लि. पाण्‍यात फवारावे. 

ऊसावरील प्रमुख रोग व्यवस्थापन  

ऊस पिकावर प्रमुख रोग, चाबू काणी, तांबेरा, गवताळ वाढ,पानावरील ठिपके, मररोग, अननस, पोक्‍का बोईंग, मोझेक, केवडा व मुळकूज इ. रोगांचा प्रादुभार्व अधिक होतो. याचा विपरित परिणाम उत्‍पन्‍न वाढीवर होतो. ऊसावरील रोगांचा बंदोबस्‍त वेळीच नाही केला तर येणाऱ्या उत्‍पादनात 30% पर्यंत घट होते. 

चाबूक काणी

बुरशीचे नाव :  चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगोसायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते.

लक्षणे : हा रोग ऊसाचे को- 740 या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त ऊसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टाबाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी ऊसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे ऊसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते. लागवडीच्या ऊसापेक्षा खोडव्या मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. व या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :रोग्रस्त ऊसाचा बेण्यासाठी वापर करू नये. लागवडीच्या ऊसात काणी रोगाचा प्रादुर्भाव 5 टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा ऊसाचा खोडवा घेऊ नये. रोगप्रतिकार क वाणांचा वापर करावा. 3 ते 4 वर्षानंतर बेणे बदलावे. शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.

मर रोग

बुरशीचे नाव :  हा रोगफ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो.

लक्षणे: या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ऊसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात. शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळत, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराच साभाग तंतुमय झालेला दिसतो.

नियंत्रणाचे उपाय : लागवडीपूर्वी जर्मिनेटर सोबत प्रोटेक्टंट 500 ग्रॅम किंवा कार्बेन्डिझम बुरशीनाशक 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून त्यात 10ते 15 मिनिटे ऊस बेने 2 बुडवून लागवड करावी. निरोगी बेणे वापरावे, रोगट ऊसाच खोडवा ठेवू नये. मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा, फेरपालटीची पिके घ्यावीत, प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरूनये, रोगट ऊसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

तांबेरा रोग

बुरशीचे नाव : पुकसिनीया मॅकनोसिकॅला या बुरशीमुळे होतो.

लक्षणे : सुरूवातीला पानांच्‍या खालच्‍या बाजूला लहान लांबट पिवळे ठिपके येतात, पुढे ते वाढतात. लालसर तपकिरी होतात. ठिपक्‍याचा भाग फुगतो व फुटतो. त्‍यातून नारंगी बीजाणू बाहेर पडतात. बीजाणूची पावडर बोटास सहज लागते. रोगाची तीव्रता वाढल्‍यानंतर पाने करपून जातात. वाढ खुंटते. साखरेचे प्रमाण कमी होते. रोग वाढण्‍याची कारणे, सतत पाऊस,दलदल, तापमानाची विषमता, दमटपणा यामुळे हा रोग होतो.

नियंत्रणाचे उपाय : पाण्‍याचा ताण पडू देऊ नये. दलदल होऊ नये. रोगट पाने काढून जाळून टाकावीत.  10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम डायथेन एम-45+ 7.5 मि.ली. कॅलॅक्झिन असे द्रावण करून 10 दिवसाच्‍या अंतराने दोन-तीन फवारण्‍यात कराव्‍यात. नत्राची जास्‍त किंवा उशिरा मात्रा देऊ नये. संतुलित पोषण द्यावे. फुले 265 किंवा को-86032 हे वाण वापरावे.

अननस रोग

बुरशीचे नाव : सेरॅटोसिस्टिस पॅराडॉक्‍झा या बुरशीमुळे होतो.

लक्षणे : ऊसाच्‍या कांड्या आतून तांबूस लालसर होतात. नंतर काळात पडतात. कुजलेल्‍या कांड्यांना अननसा सारखा वास येतो. दलदलीच्‍या ठिकाणी रोगाचा अधिक प्रादुर्भाव जास्‍त होतो. ऊस लोळला असल्‍यास, किंवा कोल्‍हा, डुकरे, उंदीर यांनी इजा केलेल्‍या ऊसात हा रोग होतो.

नियंत्रणाचे उपाय : कार्बेन्‍डॅझिम 0.1 टक्‍के यांच्‍या मिश्रणाची 10 ते 15 मिनिटे बेणे प्रक्रिया आवश्‍यक आहे. ऊसाची भरणी भक्‍कम करावी, जेणेकरून ऊस लोळणार नाही.  रोगग्रस्‍त ऊस उपटून नष्‍ट करावा.  जमिनीचा निचरा योग्‍य करावा. 

गवताळवाढ

बुरशीचे नाव : हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो.

लक्षणे : ऊसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसरतो.

नियंत्रणाचे उपाय : लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा,उष्णजल किंवा बाष्प उष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे,रोगट ऊसाचा खोडवा ठेवू नये, मावा किडीद्वारे ठेवू नये, मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे, रोगप्रतिबंधक वाणांची निवड करावी व शेतातील रोगग्रस्त बेटे मुळासकट काढून नष्ट करावीत.

पोक्काबोईंग (पोंगाकुजणे)

बुरशीचे नाव :‘फ्युजेरियममोनिलीफॉरमी’ याबुरशी पासून होतो.

लक्षणे : पोक्काबोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलीकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्काबोईंग रोगाची लक्षणे सर्व प्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरूवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात.  या रोगाची तीव्रता अधिक वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. ऊसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. ऊसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय: 20 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 20 ग्रॅम मॅन्कोझेब अथवा 10 ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीर म्हणजे एप्रिल – मी मध्ये ऊसाची लागवड करूनये.

गाभा रंगणे

बुरशीचे नाव : कोलिटोट्राय कमफालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो.

लक्षणे : सुरूवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळ्या नंतर जेव्हा ऊसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरूवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त ऊसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा 4 थे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभालाल झालेला आढळून येतो. त्यात अधून – मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व साली वर सुरकुत्या पडतात. अशा ऊसाला अल्कोहोल सारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.

केवडा

जमीनीतील चुनखडी व लोह यांचे प्रमाण कमी झाल्‍यास ऊसावरती केवडा रोगाची लक्षणे दिसून येतात. लागवडीनंतर काही दिवसातच उगवून आलेल्‍या ऊसाच्‍या पानांपैकी बरीचशी पाने पिवळसर पांढरी पडलेली दिसतात. मात्र पानांच्‍या शिरा हिरव्‍याच स्‍वरूपात राहातात. या रोगाचे वेळेवर नियंत्रण करणे गरजेचे  असते. 

नियंत्रणाचेउपाय : लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा,उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवाप्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणेमळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे,लागवडीपूर्वी ऊसाचे बेणे कार्बेन्डॅझिम 100 ग्रॅम बुरशीनाशक 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात 10 ते 15 मिनिटे बुडवून लागवड करावी,ऊस कापण्याचा कोयता सुद्धा निर्जंतूक करून घ्यावा,रोग्रस्त शेतातील ऊसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त ऊसाचा खोडवा घेऊ नये,ऊस कापणी नंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी व कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत

ऊस पक्वता व तोडणी

ऊस तोडणी करण्यापूर्वी ऊसातील साखरेचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी हॅंड रेफ्रॅक्टोमीटरकिंवा ब्रिक्से हैड्रोमीटरचा वापर करावा. या उपकरणांच्या साहाय्याने ऊसातील रसाची घनता कळते. त्यास ऊस रसाचे ब्रिक्स  असे म्हणतात.  हे ब्रिक्सर 21 डिग्रीपेक्षा जास्त असल्यास असा ऊस पक्‍व झाला आहे असे समजावे. ऊस पक्‍वतेची चाचणी शक्यतो सकाळी घ्यावी. तोडणी करून झाल्यानंतर सहा ते 12 तासांच्या आत ऊसाचे गाळप करावे. कारण, तोडणी नंतर रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

ऊस पक्‍वतेची लक्षणे

  • ऊसाची पाने पिवळी पडणे, कांडीवरील डोळे फुगणे.
  • ऊस कांडीवर मोडणे.
  • एकमेकांवर कांडी आपटल्‍यावर धातूसारखा आवाज येणे.
  • ऊस चीर पाडून उन्‍हात पाहिल्‍यास साखरेचे कण चमकणे.
  • हॅण्‍ड रिफ्रक्‍टोमीटरने ब्रिक्‍सचे प्रमाण 10 अंश पेक्षा जादा देणे.

ऊस तोडणीसाठी सध्‍या मोठ्या प्रमाणात मजूरांची कमतरता भासत आहे. यासाठी कारखाने, शेतकरी, सोसायटी इ. ऊस तोडणी यंत्रे खरेदी करून ऊस तोडणी सुरू केली आहे. ऊसाच्‍या पक्‍वतेची चाचणी घेतल्यानंतर धारदार कोयत्याने पक्‍व ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे बुडक्या कडील जास्त साखर असलेल्या कांड्या वाया जात नाहीत. ऊसावरील मुळ्या, पाचट, माती काढून ऊस स्वच्छ करावा. ऊसाच्या शेंड्याकडील दोन ते तीन कोवळ्या अपक्‍व कांड्या वाढ्याबरोबर तोडून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाण्याचे, नत्राचे आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तर साखरेचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

 ऊस उत्पादन :

ऊस या पिकाचे प्रति हेक्‍टरी उत्‍पादन हवामान व जमीन, बेण्‍याचा प्रकार, दर्जेदार व हमी भाव इ. प्रमुख बाबींवर अवलंबून असतो. सर्वसामान्‍यपणे ऊसाची को 86032 या जातीचे प्रति हेक्‍टरी उत्‍पादन 140 ते 150 टनापर्यंत निघू शकते. मात्र फुले को 10001 ह्या जातीचे प्रति हेक्‍टरी उत्‍पादन जास्‍त प्रमाणावर आहे. ऊसाचे प्रति हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 130 ते 145 टन या दरम्‍यान मिळूशकते.

संदर्भ :

  1. ऊस शेती ज्ञानयाग, (2015) : वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) जि. पुणे
  2. डॉ. बी .बी. पवार, ऊस शेती विशेषांक, निर्मल ऑफसेट, सिन्‍नर
  3. जगन्‍नाथ शिंदे (2016) : सुधारित ऊस लागवड, गोदावरी पब्‍लीकेशन, नाशिक
  4. दै. अग्रोवन ( 22 नोव्‍हेंबर, 2018) : उसासाठी खत व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
  5. ॲग्रोवन गाईड (2015) : ऊस उत्पादन तंत्र, सकाळ पेपर्स प्रा.लि., पुणे
  6. ऊस उत्पादन तंत्रज्ञान (2017) : अप्रकाशित पदवी प्रकल्प, य.च.म.मु.‍वि., नाशिक
  7. ऊस उत्पादन तंत्रज्ञान (2018) : अप्रकाशित पदवी प्रकल्प, य.च.म.मु.‍वि., नाशिक
  8. ऊस उत्पादन तंत्रज्ञान (2019) : अप्रकाशित पदवी प्रकल्प, य.च.म.मु.‍वि., नाशिक
  9. सुधारित ऊस उत्पादन तंत्रज्ञान (2020) : अप्रकाशित पदवी प्रकल्प, य.च.म.मु.‍वि., नाशिक

प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर वेबसाईट अडमीन : https://www.agrimoderntech.in/

ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

3 thoughts on “ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान”

Leave a Reply