आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड

शेतीच्या विकासात कृषि सेवा केंद्राची भूमिका महत्त्वाची असून ग्रामीण भागापर्यंत आधुनिक शेतीची साधने तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात कृषि सेवा केंद्र उपलब्ध असते. याद्वारे शेतकऱ्यांना संकरित बियाणे,  विविध प्रकारची खते, कीटकनाशक व रोगनाशक औषधे, अवजारे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संप्रेरके, रोपे, इत्यादी विक्री केली जाते.
शेतीवरच अवलंबून लोकसंख्येचा वाढता भार सुसाध्य करण्यासाठी उत्पन्नात भरीव वाढ होणे आणि आधुनिक शेतीचा प्रसार करणे गरजेचे हे. याच उद्देशाने शेतकरी बांधवांना आपल्या परिसरातील आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड कशी करावी, आदर्श कृषि सेवा केंद्र म्हणजे काय? आणि आदर्श कृषि सेवा केंद्राचे फायदे कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती सदर लेखात देण्यात येत आहे.
आदर्श कृषि सेवा केंद्र म्हणजे काय?
ढोबळमानाने याची व्याख्या अशी की, कृषि निविष्ठांबाबत ग्राहकांना योग्य सल्ला देणे, निविष्ठांची वर्गवारी करून योग्य पद्धतीने ज्या कृषि सेवा केंद्रातून निविष्ठा विक्री किंवा प्रदान केला जातात अशा केंद्रास आदर्श कृषि सेवा केंद्र असे म्हणतात. 
आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड
आपल्या भागातील कोणते कृषि सेवा केंद्र आदर्श कृषि सेवा केंद्र आहे याची माहिती आपणास संबंधित कृषि सेवा खात्यातील मंडळ अधिकारी, तालुका कृषि सेवा अधिकारी, जिल्हा परिषदेच्या तालुक्याच्या कृषि सेवा विस्तार अधिकारी यांच्याकडे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड करण्यासाठी दुसरे कोणतेही सर्वसाधारण कृषि सेवा केंद्र निवडावे. अशा प्रकारे दोन्हीही कृषि सेवा केंद्राची निवड पुढील बाबींसाठी करावी.
 • कृषि सेवा केंद्राची जागा.
 • कृषि सेवा केंद्रामधील पुढील निविष्ठांची मांडणी. (बी- बियाणे, खते, अन्नद्रव्ये, संप्रेरके, कीटकनाशके, बुरशीनाशके, छोटी हत्यारे, औजारे, मशिनी, रोपे व इतर साहित्य)
 • कृषि सेवा केंद्रामधील कार्यरत नोकर व व्यवस्थापकांचे प्रशिक्षण
 • कोणकोणत्या निविष्ठांना प्राधान्य
 • निविष्ठा कोठून खरेदी करतात
 • खरेदीसाठी कोण जातो? किंमतीमध्ये काही कमी जास्ती करतात काय?
 • निविष्ठांची वाहतूक कशाने करतात? वाहतुकीमध्ये होणारे नुकसान, खर्च, इत्यादी.
 • निविष्ठा खरेदीची ऑर्डर किती अगोदर द्यावी लागते? नसल्यास, पाहिजे त्या निविष्ठा बी-बियाण्यासहीत ताबडतोब मिळतात का?
 • सर्व निविष्ठा खरेदी, नियोजन कसे केले जाते?
 • शेतकरी त्यांची निविष्ठांची मागणी अगाऊ नोंदवितात काय?
 • शेतकऱ्यांना निविष्ठा विक्रीबरोबर इतर सल्ला दिला जातो का?
 • शेतकऱ्यांना हवे ते बी-बियाणे, खते, रासायनिक कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, औजारे, इत्यादी आपल्याकडे उपलब्ध असतात काय? नसल्यास कशा प्रकारे शेतकऱ्यांचे समाधान केले जाते?
 • शेतकऱ्यांसाठी मेळावे, प्रदर्शने, प्रात्यक्षिके, सहली, इत्यादींचे आयोजन करता काय? त्याबद्दल शेतकऱ्यांची मते काय आहेत?
 • आर्थिक नियोजन करताना आपणास काही अडचणी येतात काय? स्वत:चे व कर्जरूपाने किती भांडवल आपणास सुरुवातीस लागेल? आताची परिस्थिती काय आहे?
 • कृषि सेवा  उद्योगात भांडवल जास्त प्रमाणात आणि जास्त काळ गुंतून राहते की त्याची उलाढाल होत राहते?
 • व्यवस्थापनाचा मोबदला आपणास मिळतो किंवा नाही?
 • कृषि सेवा  खात्याचे अधिकारी, कृषि सेवा  विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, पीक विशेषज्ञ यांच्याशी आपण संपर्क ठेवता काय? त्यांचा कृषि सेवा केंद्र व्यवस्थापनेत उपयोग होतो किंवा नाही.
अशाप्रकारे आपण आपल्या भागातील आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड करताना वरील बाबींचा विचार करावा.  ज्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कृषि निविष्ठांची गुणवत्ता व विश्वासार्हता समजून घेता येईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांची खरेदी करता येणे सोयीस्कर होईल.  
कृषि सेवा केंद्रामुळे होणारे फायदे
 1. शेती व्यवसाय करत असतांना शेतकरी बांधवांना विविध कृषि निविष्ठांची गरज हंगामानुसार सतत पडत असते. ह्या सर्व निविष्ठा संबंधित जवळील कृषि सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना प्राप्त होत असतात.   
 2. कृषि सेवा केंद्रामुळे शेतकऱ्यांना नवनवीन कृषि निविष्ठा उपलब्ध होतात.
 3. विविध पीक पद्धतीनुसार पिकांची लागवड व संगोपन करण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित कृषि सेवा केंद्राकडून मार्गदर्शन मिळते.
 4. शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन घेण्यासाठी तसेच शेतीचा विकास साध्य करण्यासाठी कृषि सेवा केंद्राची गरज भासते. त्यामुळे या केंद्रातून विविध कृषि सेवा व निविष्ठा प्रदान केल्या जातात. ज्यामुळे या निविष्ठांचा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी करता येतो.
 5. स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. यासाठी वेगळया भटकंती करावी लागत नाही.
 6. शेतीच्या हंगामानुसार तसेच वेगवेगळया पीक पद्धतीनुसार कृषि निविष्ठांची गरज भासते. त्याप्रमाणे कृषि सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांना मागणीनुसार वितरीत करीत असतात. त्यामुळे विक्रेता व शेतकरी यांच्यामध्ये एकप्रकारे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते.
 7. शेतकऱ्यांना आर्थिक निकडीपोटी कृषि निविष्ठांची गरज भासल्यास सलोख्याच्या संबंधामुळे त्यांना वेळेवर खते, बियाणे व औषधे उपलब्ध होतात.
 8. शेतकऱ्यांचा वेळ व खर्चात बचत होते.
 9. शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांबाबत माहिती मिळणे सुलभ होते.
 10. कृषि सेवा केंद्रधारक हा पदवीधर असल्यास किंवा शेती विषयाचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींकडून शेतकऱ्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळते.
 11. शेतकऱ्यांच्या पिकासंबंधी समस्येनुसार त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन हे केंद्रचालक करतात.
 12. शेतीचा विकास होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यास मदत होते.
 13. कृषि पदविका व कृषि पदवीधर विद्यार्थ्यांना एक रोजगाराचे साधन उपलब्ध होते.
अशाप्रकारे आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड करून शेतकऱ्यांनी अशा कृषि सेवा केंद्रातूनच कृषि निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल, त्यांच्या समस्येचे निराकरण होईल, पीक वाढीच्या अवस्थेनुसार औषधांची माहिती मिळेल, त्यांची फसवणूक होणार नाही व इतर आवश्यक फायदे आदर्श कृषि सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या निविष्ठामुळे होत असते. या लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तसेच कृषि सेवा केंद्रचालकांना आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड कशी असावी याबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
संदर्भ :
 1. कृषि सेवा व्यवसाय व्यवस्थापन भाग-1: कार्यपुस्तिका-37, य.च.म.मु.वि., नाशिक
 2. चव्हाण संजय सुधाकर (2020) : एखाद्या शहरातील कृषि सेवा केंद्राचा अभ्यास, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 3. https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/97620/8/08_chapter%20-i.pdf
Prajwal Digital

1 thought on “आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड”

Leave a Reply