ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजारे

ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून बहुसंख्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ऊस पिकावर अवलंबून आहे. प्रगत देशात शेतीतील कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा वापर केला जात  असून त्यांचे उत्पादन सुद्धा आपल्या देशाच्या तुलनेत चार ते पाच पटीने जास्त आहे. 

ऊसातील आंतरमशागत व इतर आवश्यक कामे हे यांत्रिकी पद्धतीने झाल्यास वेळेची व श्रमाची बचत होऊन उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होते. त्यामुळे ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजारांची नितांत गरज असल्यामुळे प्रस्तुत लेख ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजारे यावर आधारित तयार करण्यात येत आहे. मशागती अभावी ऊस पिकाचे नुकसान होऊ नये, ऊसातील आंतरमशागतीचे कामे वेळेवर करण्यात यावी, मजुरीवर जास्त खर्च होऊ नये, पिकांना पोषक वातावरण प्राप्त व्हावे, पिकांतील तणांचा बंदोबस्त व्हावा, ऊसासाठी खते देता यावेत अशा विविध प्रकारच्या कामासाठी सुधारित कृषी अवजारांची गरज असते. त्यामुळे कमीत वेळेत जास्तीचे काम करता येते आणि भेडसावणाऱ्या मजुरांच्या समस्येवर हा उत्तम पर्याय आहे.   

ऊसाच्‍या अधिक उत्‍पादनासाठी पूर्व मशागती सोबतच आंतरमशागतीला विशेष महत्‍त्‍व असून आंतरमशागतीचे कामे ऊसाच्‍या वाढीच्‍या अवस्‍थेनुसार योग्‍य पद्धतीने व वेळेवर करावी लागतात. त्यामध्ये तणांचा बंदोबस्‍त करणे, वरंबा फोडणे, लहान व मोठी बांधणी, पेरून खते देणे, इ. कामे करण्‍यासाठी मोठ्याप्रमाणात मजूर लागतात. परिणामी आंतरमशागतीसाठी येणारा खर्चही भरमसाठ होतो. हा खर्च कमी करण्‍यासाठी ऊस पिकांमध्‍ये आंतरमशागतीचे कामे करण्‍यासाठी ऊस शेतीसाठी उपयुक्त सुधारित कृषी अवजारे व यंत्राचा वापर करणे अत्‍यंत गरजेचे आहे. सुधारित अवजारे हे बैलजोडीच्‍या किंवा ट्रॅक्‍टरच्‍या साह्याने चालविता येतात. त्यामुळे ऊसातील आंतरमशागत किंवा इतर मशागतीचे कामे करणे सोयीस्कर होते.

ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजारे

1) सायन कुळव (Sayan Kulav)

या अवजारास दोन लोखंडी फणाला आडवी पास जोडलेली असते. या अवजाराचा उपयोग 3 ते 3.5 महिन्‍यांनी ऊस लागवडीनंतर कृषिराज यंत्र चालविल्‍यानंतर लगेच करावा. या अवजारामुळे जमीन भुसभुशीत व सपाट होते. तसेच तणांचा बंदोबस्‍त होतो. त्‍यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो व जमिनीत माती भुसभुशीत जमिनीत हवा खेळती राहते.

2) तीन पहारीचे अवजार (Tin Pahariche Aujar)

या अवजारास तीन लोखंडी पहारी 45 अंशाच्‍या कोनात जोडलेल्‍या असता. याचा उपयोग ऊसातील सरी वरंबा फोडण्‍यासाठी केला जातो. ऊसाच्‍या बाळबांधणीच्‍या वेळी या अवजाराचा वापर सरी वरंबा फोडण्‍यासाठी व जमीन भुसभुशीत करण्‍यासाठी, तण नियंत्रण करण्‍यासाठी केला जातो. ऊस 4.5 ते 5 महिन्‍यांचा झाल्‍यावर ऊसाची मोठी बांधणी केली जाते. यावेळी तीन पहारीच्‍या यंत्राच्‍या साह्याने सरी वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. यावेळी तीन पहारीच्‍या यंत्राच्‍या साह्याने सरी वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. त्‍यानंतर लगेच रिजरच्‍या साह्याने मोठी बांधणी केली जाते. यावेळी शिफारशीत खत मात्रेचा चौथा हप्‍ता 40 टक्‍के नत्र, 50 टक्‍के स्‍फुरद, 50 टक्‍के पालाश द्यावा. या अवजाराच्‍या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी 1 एकर क्षेत्र पूर्ण करते.

3) रोपे लागवड यंत्र (Rope Lagwad Yantra)

या यंत्राचा उपयोग रोपांची लागवड करण्‍यासाठी केला जातो. सलग सरी पद्धतीत प्‍लॅस्टिक ट्रेमधील रोपे लावण्‍यासाठी उपयोग होतो. या यंत्राद्वारे ऊस रोपे जमिनीत सरळ उभी राहून त्‍याला माती लावली जाते. ऊस रोपे लागवड यंत्र याचा उपयोग केल्याने कमीत वेळेत जास्त क्षेत्रावर ऊसाच्या रोपाची लागवड करणे शक्य होते. ज्या ठिकाणी मजुरांचा अभाव अशा ठिकाणी हे ऊस रोपे लागवड तंत्र उपयुक्त ठरते.  

4) पेरणी यंत्र (Perni Yantra)

हे ट्रॅक्टरला जोडलेले यंत्र मुख्यत: ऊस कापून त्याच्या कांड्या लावण्यासाठी / पेरण्यासाठी उपुयक्त आहे. आणि त्याचबरोबर एकाच फेरीत कांड्या लावून दाणेदार खतसुद्धा टाकते. हे ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ.द्वारे चालवले जाते. ऊस पेरणी यंत्राची क्षमता ही ताशी 0.6 हेक्टर असून एका नगाची  किंमत अंदाजे रू. 40,000/- इतकी आहे. बहुभूधारक शेतकऱ्यांना हे यंत्र आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे.

5) कृषीराज (Krishiraj)

या अवजाराला तीन लोखंडी फण असतात. याचा उपयोग ऊसाला भर देणे व सरी वरंबा फोडण्‍यासाठी होतो. कृषीराज अवजाराच्‍या मधील फण काढल्‍यास हे अवजार लागणीनंतर दीड ते दोन महिन्‍यांनी आंतरमशागतीसाठी वापरता येते. मधील लोखंडी फण काढल्‍याने कडेच्‍या दोन्‍ही फणांच्‍या मध्‍ये ऊस येतो व फणांच्‍या साह्याने ऊसाला दोन्‍ही बाजूंनी थोड्या प्रमाणात भर लागते. यावेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा हप्‍ता 40 टक्‍के द्यावा, म्‍हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. नत्रखते मुळांच्‍या सान्निध्‍यात दिल्‍याने व ऊसाला भर मिळाल्‍याने फुटव्‍यांची वाढ जोमदार होते. फुटवे फुटण्‍याचे प्रमाण व ऊसाच्‍या बगलेतील तणांचा बंदोबस्‍त करता येतो. या अवजाराच्‍या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी 1 एकर क्षेत्राची आंतरमशागत करते. या यंत्राला तिन्‍ही फण जोडून ऊस लागणीनंतर 3 ते 3.5 महिन्‍यांनी सरी – वरंबा फोडण्‍यासाठी उपयोग करतात. सरी वरंबा फोडल्‍यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते व ऊसाला भर दिली जाते. याला ऊसाची बाळबांधणी म्‍हणतात. या वेळी शिफारशीत नत्राचा तिसरा हप्‍ता 10 टक्‍के नत्राचा द्यावा, म्‍हणजे दिलेली खतमात्रा मुळांच्‍या सान्निध्‍यात मातीआड केली जाते. यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते. या यंत्राच्‍या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी 1 एकर क्षेत्र पूर्ण करते.

6) खत पेरणी यंत्र (Khat Perni Yantra)

या यंत्राच्‍या साह्याने ऊस लागणीपूर्वी सरी पाडल्‍यानंतर सरीत खत पेरून दिले जाते. यामध्‍ये स्‍फुरद व पालाशयुक्‍त खते एकत्र मिसळून दिली जातात. या खतामध्‍ये युरिया ओलसर होतो व खत पेरणीमध्‍ये अडचण येते. खत जमिनीत व्‍यवस्थित पेरता येत नाही, सारख्‍या प्रमाणात पडत नाही. खत पेरणी यंत्र बैलजोडीच्‍या साह्याने ओढले जाते. या यंत्राच्‍या साह्याने खत पेरणी केली असता, जमिनीत सारख्‍या प्रमाणात व 5 ते 7 सें.मी. खोलीवर पडते. यामुळे ते मुळांच्‍या कार्यक्षेत्रात पडल्‍याने पिकांना शोषण करणे सोयीचे जाते. यामुळे ऊसाची उगवण चांगली होते व दिलेल्‍या खतांचा पिकांच्‍या वाढीसाठी पुरेपूर उपयोग होतो. या यंत्राच्‍या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी 4 एकर क्षेत्रातील पेरणी करते.   

7) खते देण्‍यासाठी पहारीचे अवजार(Khate Denyashasti Pahariche Aujar)

ऊसाचा खोडवा पिकामध्‍ये खते देण्‍यासाठी मध्‍यवर्ती ऊस संशोधन केंद्राने पहारीचे अवजार विकसित केले आहे. या पहारीने खोडव्‍यामध्‍ये दुसऱ्या पाण्‍याच्‍या अगोदर व 135 दिवसांनी ऊसाच्‍या बुंध्‍यापासून 10-15 सें.मी. अंतरावर आणि 10 ते 15 सें.मी. खोल छिद्र घेऊन त्‍यामध्‍ये खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पहारीच्‍या साह्याने खते दिल्‍यामुळे खत मुळाच्‍या सान्निध्‍यात दिले जाते. खतांची कार्यक्षमता वाढते. सर्व ठिकाणी समप्रमाणात खत दिल्‍यामुळे पिकाची वाढ एकसारखी होते. त्‍यामुळे उत्‍पादन 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढते.

8) पॉवर टीलर (Power Tiller)

पॉवर टिलरच्‍या साह्याने ऊसाची आंतरमशागतीची कामे केली जातात. या यंत्रामध्‍ये कामानुसार बदल करता येतात. हे यंत्र स्‍वयंचलित असून सरी वरंबा फोडणे, ऊसाला भर देणे, ऊसाची बांधणी करणे, ऊसातील जमीन सपाट करणे, तण नियंत्रण करणे, औषध फवारणी करणे इ. कामे सुलभपणे केली जातात. तसेच आपल्‍या आवश्‍यकतेनुसार शेतीची इतर अनेक कामे पॉवर टिलरच्‍या मदतीने करता येऊ शकतात. या यंत्राच्‍या वापराने आंतरमशागतीच्‍या खर्चात मोठी बचत करता येते.

9) लहान ऊस आंतरमशागत यंत्र (ट्रॅक्टरचलित)

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. आ. शिं. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे हे यंत्र विकसित केलेले आहे. हे यंत्र 18.5 अश्वशक्ती ते 22.0 अश्वशक्ती (HP) लहान ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. या यंत्राच्या सहाय्याने ऊसाची संपूर्ण आंतरमशागत करता येते. चार ते पाच फुटाच्या सरीत ऊसाला भर घालणे तसेच खते पेरुन देणे इ. कामे या यंत्राने अगदी सहज करता येतात. एका दिवसात हे यंत्र 6.5 ते 7.0 एकर क्षेत्राची आंतरमशागत करते.

10) ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र  (ट्रॅक्टरचलित)

ऊस कापणीनंतर शेतात सरासरी 8 ते 10 टन प्रती हेक्टरी पाचट जमिनीवर पसरलेले असते. या पाचटाचा वापर सेंद्रिय खत तयार करणेसाठी होऊ शकतो. या रोटाव्हेटर सदृष्य यंत्राने 3 फूट पिकांच्या खोडव्यात वापरुन सरीतील पाचटाचे 10 ते 15 से. मी. चे बारीक तुकडे करता येतात. या यंत्रात पुढच्या बाजूला असलेल्या रोलरमुळे पाचट सरीत दाबले जाते. रोटरवर मधल्या भागात बसविलेली ‘जे- J’ आकाराची पाती तुकडे करीत जातात तर दोन्ही बाजूस बसविलेली ‘एल- L’ आकाराची पाती वरंब्याच्या बगलेची माती काढून पाचटासोबत थोड्या प्रमाणात मिसळली जाते. या यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरावरील पाचटाचे तुकडे करता येतात. हे यंत्र 45 ते 50 अश्वशक्ती ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. या यंत्राने एका दिवसात 2.5 ते 3.0 एकर क्षेत्रावरील पाचट बारीक करता येते. ज्या शेतकऱ्याकडे रोटाव्हेटर उपलब्ध आहे त्यावर पात्याची जोडणी केल्यास कमी खर्चात हे यंत्र उपलब्ध होते.

कृषि अवजाराच्या वापरामुळे होणारे फायदे

  • कमी वेळात व कमी श्रमात अधिक चांगले काम करता येते.
  • मजूरावर अवलंबून रहावयाची गरज भासत नाही.
  • मजुरी खर्चात मोठी बचत होते.
  • कमी वेळामध्ये अधिक क्षेत्रावर लागवडीचे कामे करता येतात.
  • कमी वेळामध्ये अधिक क्षेत्रावर आंतरमशागतीचे कामे करता येतात.
  • आधुनिक कृषि अवजारांमुळे सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • उत्पादीत मालाची गुणवत्ता व दर्जा चांगला राखला जातो.
  • कामे यांत्रिकी पद्धतीने केल्यामुळे मजुराअभावी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. 
  • सद्य:स्थितीला आधुनिक कृषि अवजारांमुळे शेतीचे चित्र बदलण्यास मदत झालेली आहे.

ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजारे या लेखाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसातील मशागतीचे कामे करण्यासाठी उपयोग होणार असून अशा विविध प्रकारच्या सुधारित कृषी अवजारांची ऊस शेतीसाठी खूप गरज आहे. सध्या मजुराच्या अभावामुळे शेतातील कामे तशीच रखडलेली अवस्थेत असते. या कृषी अवजारांचा उपयोग करून ऊस मशागतीचे कामे सुलभपणे करता येईल आणि ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होईल. त्यामुळे सदर लेख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेतातील मशागतीचे कामे सुधारित कृषी अवजाराद्वारे करण्यासाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  

संदर्भ :

  • देशमुख शिवाजीराव (2016) : ऊस शेती ज्ञानयाग, वसंतदादा शुगर इनिस्‍टट्यूट, मांजरी,  पुणे
  • जाधव सचिन (2018) : ऊस उत्पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि विज्ञान प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  • गुडालोड संगीता (2020) : आधुनिक कृषी अवजारे व यंत्राचा अभ्‍यास, अप्रकाशित कृषि विज्ञान प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर वेब – https://www.agrimoderntech.in/

 

 

 

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading