शेतमाल विक्रीच्या सामान्य पद्धती

शेतमाल विक्री करणे व रोख पैसे मिळवणे हे शेतकऱ्‍यांचे अंतिम उद्दिष्ट असते. भारतात शेतमालाची अनेक पद्धतीने विक्री केली जात असली तरी प्रत्येक पद्धतीला वेगळी पार्श्वभूमी आहे. प्राचीन काळात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्त्वात होती. परंतु कालांतराने त्यात बरेच बदल होत गेले. बाजारपेठेच्या स्वरूपानुसार विक्री पद्धतीत कालानुरूप बदल होत गेले. शेतमालाच्या विक्री करण्याच्या आणि किंमत निश्चित करण्याच्या ज्या विविध पद्धती अस्तित्त्वात आहेत यापैकी महत्त्वाच्या शेतमाल विक्री पद्धती, शेतमालाची वैशिष्टये, शेतमाल विपणन व्यवस्थेचे टप्पे आदी बाबींची सविस्तर माहिती प्रस्तुत लेखात करण्यात येत आहे.

सदरील माहितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीविषयी ज्ञापन होईल, किंमतीतील तफावत समजून घेता येईल, जास्तीत जास्त किंमतीला शेतमाल विक्री करता येईल, मध्यस्थांकडून होणारे नुकसान टाळता येईल अशा समस्येवर मात करण्यासाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरू शकेल. तसेच त्यांना शेतमालाची योग्य पद्धतीनुसार किफायतशीर दरात विक्री करता येईल. त्यामुळे आडते किंवा व्यापारी किंवा दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक पिळवणूक काही प्रमाणात थांबवता येईल. या सर्व बाबींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यांचे मध्यम स्थांकडून होणारे नुकसान टाळता यावे, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांचा माल चांगल्या किंमतीला विक्री केला जातो या बहुउद्देशाने सदरचा लेख शेतकऱ्यांच्या हितासाठी लेखकांनी तयार केलेला आहे.
शेतमालाची वैशिष्टये
नाशवंत स्‍वरुप : बहुतेक सर्व शेतमाल नाशवंत स्‍वरुपाचा आहे. हे स्‍वरुप काही तासांपासून काही महिन्‍यापर्यंतच्‍या कालावधीचे असते. त्‍यामुळे विपणनात शेतमाल विक्री हे सडणे-कुजणे-नुकसान होणे-वाया जाणे म्‍हणजे विक्री-योग्‍य न राहणे ह्या नैसर्गिक परिणामांना योग्‍य त्‍या उपायोजना करणे गरजेचे ठरते. उदाहरणार्थ, फळे, फुले, भाजीपाला इत्‍यादी.
हंगामी उत्‍पादन  :  काही थोडा शेतमाल सोडून बहु‍तेक सर्व प्रकारचा शेतमाल हंगामी ऋतुमानाप्रमाणे खरीप, रब्‍बी, उन्‍हाळी अशा वेळी काढणीस येतो. त्‍यातही मातीप्रकार, मशागत, पर्जन्‍यमान, हवामान यांच्‍या बदलामुळे त्‍यात खूपच फरक पडतो. उदाहरणार्थ, कापूस, पालेभाज्‍या इत्‍यादी.
प्रचंड आकारमान  : बऱ्याच शेतमालाचे आकारमान प्रचंड असल्‍याने त्‍याची वेष्‍टनात भरणी, शेतातून खळयात, खळयातून साठवणीच्‍या किंवा विक्रीच्‍या जागी, बाजारपेठेत वाहून नेणे श्रमाचे, जिकिरीचे, गैरसोयीचे तसेच खर्चिक असते. उदाहरणार्थ, कलिंगड, फळभाज्‍या, कोबी, फ्लॅवर, इत्‍यादी.
उत्‍पादनाचे प्रकार, गुणधर्म, प्रती  : सर्व जैविक उत्‍पादनांचे जाती प्रकार, वाढीची स्थिती यांमुळे सर्व बाबतीत एकसारखेपणा नसणे हा नैसर्गिक अटळ भाग असतो. मालविक्रीच्‍या वेळी एकसारखा एकाच गुणधर्माचा, रंग, रुप, आकारमान, गंध व चव यांत साम्‍य असलेल्‍या मालास ग्राहकाची सामान्‍यतः पसंती असते.
वरील नैसर्गिक कारणांत लहान शेती व तीही विखुरलेली, तसेच काढणीची वेगवेगळी वेळ आणि बाजारासाठी शेतमाल तयार करण्याच्‍या पद्धती, साठवणुकीच्या सोयींचा अभाव, त्‍या वेळचे हवामान, अवेळी पडणारा पाऊस, आदींमुळे येणारे अडथळे यामुळे बाजारपेठेत होणारा माल पुरवठा आवक ही अनियंत्रित, सतत कमी-जास्‍त होणारी होते. शेतमाल मागणी पुरवठ्याच्‍या सार्वत्रिक नियमामुळे किंमतीत सतत चढउतार होत राहतात. त्‍या अनुभवामुळे पुढील हंगामात, वर्षांत पेरणी-लागवड कमी-जास्‍त करण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल असल्‍याने त्‍याचे दुष्‍परिणाम वा फायदे शेतकऱ्यांनाच भोगावे लागतात.  
शेतमाल विक्री करण्याच्या पद्धती
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाणात शेतमालाची विक्री ही कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फत होत असते. कारण बाजार समिती ही कृषि पणन मंडळाच्या अधिपत्याखाली चालत असून शेतमाल विक्री प्रक्रियेतील आडते, व्यापारी व दलाल व शेतमाल उत्पादक हे प्रमुख घटक असून यांच्यावर कृषीपणन मंडळाचे नियंत्रण असते.  यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री केली जाते, त्यांना पैसे रोख स्वरूपात अदा केले जाते. अशा शेतमाल विक्री करण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.   
1) लिलाव पद्धत
लिलाव पद्धतीमध्ये आडत्या शेतमालाचा लिलाव करतो व मालाच्या सभोवती असलेले ग्राहक-व्यापारी लिलावात भाग घेऊन आपापली किंमत आडत्याला कळवतात, लिलावात सर्वात जास्त किंमत देणाऱ्या व्यापाऱ्याला माल विक्री केला जातो. लिलाव पद्धत ग्राहक व व्यापाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्‍यांच्याही हिताची आहे. लिलाव पद्धतीत ग्राहक-व्यापारी विक्रीसाठी उपलब्ध असलेला माल स्वत: पाहून त्याची तपासणी करू शकतात. ज्या व्यापाऱ्यास मालाची खरेदी करावयाची आहे, तो मालाची जास्तीत जास्त बोली लावून खरेदी करू शकतो. लिलाव पद्धतीमुळे ग्राहक-व्यापाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होत असल्यामुळे मागणी व किंमत वाढू लागते. शेतकऱ्‍यांच्या शेतमालास जास्तीत जास्त किंमत मिळविणे शक्य होते. शेतमालाचा लिलाव शेतकऱ्‍यांच्या समोर होत असल्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री करण्याची पद्धत आज अनेक कृषि उत्पन्न बाजार समिती आपल्या बाजारपेठ परिसरात अवलंबित आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांकडून ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने शेतमाल विक्री केल्यास शेतकऱ्यांची मध्यस्थांकडून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शेतमाल विक्री प्रक्रियेत या पद्धतीचा अवलंब केला जातो.
2) हत्ता पद्धत (बोटांवर रुमाल टाकून शेतमालची बोली लावणे)
या पद्धतीमध्ये शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणतो. तेव्हा शेतकऱ्‍याच्या वतीने माल विकून देणारा कच्च्या आडत्या किंवा दलाल यांच्या हातावर एक कापड टाकले जाते. खरेदी करणारे व्यापारी कापडाखालील हाताच्या बोटांना स्पर्श करून सांकेतिक पद्धतीने ते कोणत्या किंमतीला माल खरेदी करण्यास तयार आहेत ते सांगतात. निरनिराळ्या व्यापाऱ्यांनी सांकेतिक पद्धतीने किंमत कळवल्यास आडत्या सर्वात जास्त किंमत कोणता व्यापारी देण्यास तयार आहे, ते आडत्ये विक्रेत्याला कळवितो. आडत्या-व्यापारी एकाच बाजारपेठेत दैनंदिन व्यवहार करत असतात. त्यामुळे त्यांच्यात संगनमत होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत पारदर्शक नाही असे मानले जाते. ही अशास्त्रीय पद्धत असून किंमत निश्चितीचे कोणते निकष आहेत या बद्दल शेतकरी अनभिज्ञ असतो. त्यामुळे हत्ता पद्धत शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री करण्यायोग्य नाही. याउलट या पद्धतीत शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री प्रक्रियेत तोटाच होतो.     
3) वाटाघाटी पद्धत 
या पद्धतीनुसार शेतमालाची खरेदी करणारा खरेदीदार किंवा व्यापारी आपल्या सोयीनुसार शेतकऱ्‍यांकडे येतो आणि योग्य वाटणारी किंमत शेतकऱ्‍यांना देऊ करतो. ज्या दिवशी व्यापाऱ्यांने किंवा आपल्या मालाच्या विक्रीचा निर्णय व्यापाऱ्यास द्यावा लागतो. जो व्यापारी शेतमालास जास्तीत जास्त किंमत देण्यास तयार असेल त्याला शेतकरी माल विकतो. हा व्यवहार दलालामार्फत होत असला तरी पारदर्शक असतो. या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते आणि शेतमाल वाटाघाटीतून विक्री केला जातो. त्यामुळे या पद्धतीने शेतमाल विक्री करावयाचा असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी विक्री प्रक्रियेदरम्यान समक्ष हजर असणे आवश्यक आहे.  
4) ढीग पद्धत 
ही शेतमाल विक्रीची सर्वसामान्य पद्धत आहे. या पद्धतीनुसार शेतमालाचे तारणाच्‍या दर्जानुसार विशिष्ट आकाराचे ढीग केले जातात व प्रत्येक ढीग विशिष्ट किंमतीला विक्री केला जातो. या पद्धतीमुळे कमी वेळेत जास्तीत जास्त शेतमालाची विक्री होते, परंतु या शेतमाल विक्री प्रक्रियेत या पद्धतीचा फारसा अवलंब केला जात नाही.
5) मोघम पद्धत
या पद्धतीनुसार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शेतमाल खरेदीचा तोंडी करार (सौदा) होतो. शेतमालाची विक्री किंमत मात्र ठरविली जात नाही. जेव्हा व्यापारी शेतमाल उचलतो तेव्हा जी प्रचलित किंमत असेल ती शेतकऱ्‍यांना दिली जाते. शेतकरी जेव्हा सावकाराकडून कर्ज घेतो किंवा शेतकरी बाजारापासून बऱ्याच अंतरावर राहतो. शेतकऱ्‍यांना बाजार भावाचे पुरेशे ज्ञान नसते. तेव्हा या पद्धतीचा स्वीकार केला जातो. ही पद्धत देखील शतकऱ्‍यांना कमी किंमत मिळवून देणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीनुसार शेतमालाची विक्री करू नये, कारण या पद्धतीने विक्री केल्यास शेतमालाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
6) नमुना पद्धत
या पद्धतीनुसार कापूस, मिरची, तंबाखू आणि अन्नधान्य इत्यादीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या पद्धतीत सर्वच्या सर्व शेतमाल खरेदीदाराला दाखवितात त्यातील थोडा शेतमाल नमुना म्हणून घेतला जातो व तो खरेदीदार किंवा व्यापाऱ्याला दाखविला जातो. नमुन्याच्या आधारावर शेतमालाची किंमत निर्धारण किंवा निश्चित (ठरवली) केली जाते. या पद्धतीत नमुन्यानुसार सर्व शेतमाल सारखाच नसावा अशी अपेक्षा असते. बरेचदा शेतकरी चांगला नमुना दाखवून किंमत ठरवतात व नंतरचा शेतमाल खराब किंवा नमुन्यानुसार नसतो, अशा वेळेस किंमत कमी आकारली जाते. यातून वादविवाद निर्माण होण्याची शक्‍यता जास्त असते. या पद्धतीचा फायदाही पारीच उचलतात. त्यामुळे या पद्धतीने शेतमालाची विक्री करणे फारशे योग्य नाही. याउलट शेतकऱ्यांची यातून शेतमाल विक्री केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
7) बंद ­ निविदा पद्धत
ही पद्धत नियंत्रित बाजारपेठेत आढळून येते. शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत आणतात तेव्हा प्रत्येकांच्या शेतमालास एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकानुसार शेतमाल विक्रीसाठी ठेवला जातो. शेतमाल खरेदी करणाऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीकडून विशिष्ट फॉर्म्सवर पुरविले जातात. त्या फॉर्म्सवर खरेदीदार आपण जी किंमत देण्यास तयार आहोत ती किंमत लिहितात व आपला पसंतीक्रम देतात. ते फॉर्म्स एका बंद पाकीटात कृषि उत्पन्न बाजार समितीकडे पाठवितात. कृषि उत्पन्न बाजार समितीकडून हे बंद अर्ज (पाकीट) उघडून देऊ केलेली किंमत आणि अग्रक्रम लक्षात घेऊन शेतमालाची विक्री केली जाते. या पद्धतीत शेतकऱ्‍यांची फसवणूक होत आहे. कारण शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीबाबत फारशे ज्ञान नसल्यामुळे किंवा व्यापारी व मध्यस्थ यांच्यामध्ये संगनमत वाढत असल्यामुळे शेतकरी मात्र बळीचा बकरा बनत असतो. त्यामुळे या पद्धतीने शेतमाल विक्री केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होते.
कृषी विपणन प्रणालीचे टप्पे
कृषि उत्पादने शेतकऱ्‍यांच्या शेतात उत्पादित झाल्यानंतर ते उपभोक्त्याच्या किंवा ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत अनेक टप्यातून जात असतात. भारतीय शेतीच्या तसेच शेतकऱ्‍यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनाच्या विविध वैशिष्टयाचा परिणाम आपल्या देशातील कृषि मालाच्या विपणन व्यवस्थेवर झाला आहे. कृषि मालाच्या खरेदीचे व विक्रीचे व्यवहार विविध पातळीवर विविध पद्धतीने होतात. कृषि मालाच्या बाजारपेठा विविध पातळीवर वेगवेगळया स्वरुपाने कार्य करत असतात.
1) प्राथमिक बाजार 
शेतकरी, आपल्या शेतातील उत्पादित माल कुटुंबाची धान्याची गरज, मजुरांना किंवा नोकरांना त्यांच्या कामाचा मोबदला देऊन शिल्लक माल विकू शकतो. शेतकऱ्‍यांच्या घरी येऊन खरेदी करणाऱ्या फिरत्या व्यापाऱ्यांना, सावकारांना, गावातील किंवा बाहेर गावातील व्यक्तींना विकतो. शेतकरी आपले धान्य व इतर शेतमाल गावात किंवा जवळच्या स्थानिक दुसऱ्‍या गावामधील बाजारपेठेत विकण्याचा प्रयत्न करतात. ह्या बाजारपेठेलाच प्राथमिक बाजारपेठ असे म्हणतात. प्राथमिक बाजार म्हणजेच आठवडी बाजार होय. आठवड्यातून एकदा-दोनदा विशिष्ट दिवशी वेगळया ठिकाणी बाजार भरतो. भारतातील सर्व गावात किंवा मोठ्या खेड्यात हा बाजार भरतो.
2) घाऊक बाजार
ज्या बाजारात शेतमालाची खरेदी विक्री घाऊक किंवा ठोक मोठ्या प्रमाणात केले जातात. अशा बाजाराला घाऊक बाजार म्हणतात. घाऊक बाजारानांच मंडी किंवा गंज असेही म्हणतात. घाऊक बाजार तालुक्‍याच्‍या व जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी किंवा सडक वाहतूकीचे व रेल्वे वाहतूकीचे प्रमुख केंद्र असल्या ठिकाणी असतात. व्यापाराचे केंद्र म्हणून प्रसिद्धीस असलेल्या सर्व प्रमुख ठिकाणी घाऊक बाजार आढळून येतो. घाऊक बाजारात विविध मध्यस्थ सक्रिय असतात. या बाजाराचे मुख्य वैशिष्‍ट्ये म्हणजे शेतमाल शेतकऱ्‍यांच्या किंवा फिरत्या व्यापाऱ्यांच्या हातामधून घाऊक व्यापाऱ्यांच्या हातात पडतो. शेतकऱ्‍यांच्या शेतामध्ये सुरु झालेली शेतमालाची एकत्रीकरणाची प्रक्रिया घाऊक बाजारात संपते. घाऊक बाजारातील व्यवहाराच्या स्वरुपावरुन आणि उचलीवरुन खालील प्रकार पडतात-
अ) प्राथमिक घाऊक बाजार
या बाजारात येणारा शेतमाल हा प्रामुख्याने खेड्यातून येतो. प्राथमिक घाऊक बाजार आठवड्यातून एकदा, दोनदा विशिष्ट दिवशी किंवा यात्रेसारख्या कारणास्तव भरतो. या बाजारात स्वत: शेतकरी किंवा शेतकऱ्‍यांकडून मालाची खरेदी केलेले फिरते विक्रेते किंवा कच्च्या अडत्या आपल्या मालाची विक्री करतात. घाऊक व्‍यापारी स्वत: किंवा पक्का आडत्याच्या सहाय्याने शेतमालाची खरेदी केली जाते.
ब) दुय्यम घाऊक बाजार
प्राथमिक बाजारात व प्राथमिक घाऊक बाजारात त्यांनी शेतमालाची खरेदी केलेले असे घाऊक व्‍यापारी मालाचीच दुय्यम घाऊक बाजारात विक्री करतात. या बाजारालाच मंडी किंवा गंज असे म्हणतात. दुय्यम घाऊक बाजाराचे क्षेत्र 10 ते 40 किलो मीटर परिसरात विखुरलेले असते. या बाजारात इतर छोट्या (प्राथमिक, प्राथमिक घाऊक) बाजारातून शेतमाल येत असतो. कृषी बाजारात होणारे व्यवहार घाऊक व्यापाऱ्यामध्ये किंवा घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यामध्ये होतात.
क) मध्यवर्ती घाऊक बाजार 
मध्यवर्ती घाऊक बाजारात शेतमालाची विक्री करण्याचे कार्य घाऊक व्यापारी करतात. तर शेतमालाची खरेदी अल्पप्रमाणावर किरकोळ व्यापारी किंवा ग्राहकांचे प्रतिनिधी करतात.
3) किरकोळ बाजार 
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या परिणामात वस्तूची विक्री जेथे केली जाते अशा बाजाराला किरकोळ बाजार असे म्हणतात. प्रत्येक शहरात किंवा गावात किरकोळ विक्रीची दुकाने ही निरनिराळया भागात विखुरलेली असतात. विशिष्ट वस्तूची किरकोळ विक्री करणारे अनेक दुकाने विशिष्ट रस्त्यावर किंवा ठराविक भागातच केंद्रीत झालेली असतात. रस्ता किंवा भाग मंडई म्हणून ओळखला जातो. उदा. भुसार लाईन, भाजी मंडई, फळांचा बाजार इत्यादी.
4) सीमांत बाजार 
समुद्र किनाऱ्यावर किंवा देशाच्या सरहद्दीवर अशा ठिकाणी वसलेल्या बाजाराला सीमांत बाजार असे म्हणतात. सीमांत बाजार हा भौगोलिक दृष्टीने अशा ठिकाणी वसलेला असतो की जेथे देशा अंतर्गत व्यापार संपून विदेशी व्यापाऱ्यांचा प्रारंभ होतो. सीमांत बाजारामध्ये एकत्रित झालेला शेतमाल प्रत्यक्ष ग्राहकाकडे, कारखानदाराकडे किंवा विदेशी बाजारपेठांमध्ये तो पाठवला जातो. सीमांत बाजार भारतात मुंबई, मद्रास, कलकत्ता, भारत-तिबेट सरहद्दीवर आहेत.
5) जत्रा 
वर्षातून विशिष्ट ठिकाणी व ठराविक वेळेस धार्मिक कारणाच्या निमित्ताने जपणाऱ्या जनसमुदायाला जत्रा असे म्हणतात. जत्रेमध्ये शेतमालाची तसेच शेतकऱ्‍यांना आवश्यक असणाऱ्या विविध उपभोग्य वस्तूंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. म्हणून जत्रांचे व्यापारविषयक दृष्टीकोनातून महत्त्व आहे.
6) बाजारपेठा 
ज्या बाजारपेठेमधील व्यवहार विशिष्ट कायद्यानुसार तसेच मुद्दाम तयार केलेल्या यंत्रणेमार्फत नियंत्रित केले जात नाहीत. अशा बाजारपेठेला अनियंत्रित बाजारपेठ असे म्हणतात.
7) नियंत्रित बाजारपेठ 
शेतमालाचे खरेदीदार व विक्रेते यांच्यामधील व्यवहार व्यवस्थितपणे घडून यावेत आणि दोघांचेही हितसंबंध सुरक्षित राहावेत, या करिता शेतमालाची विक्री जेथे करण्यात येते. अशा बाजारपेठांचे व्यवस्थितपणे नियंत्रण केले जाणे आवश्यक असते. विशिष्ट कायद्यानुसार राज्य सरकार किंवा सार्वजनिक संस्थेने निर्माण केलेल्या यंत्रणेमार्फत ज्या बाजारपेठेचे कामकाज चालते अशा बाजारपेठेला नियंत्रित बाजारपेठ असे म्हणतात.
सदर लेखात शेतमाल, विक्री पद्धती, लिलाव पद्धत, हत्ता पद्धत (बोटांवर रुमाल टाकून शेतमालची बोली लावणे), वाटाघाटी पद्धत ढीग पद्धत, मोघम पद्धत , नमुना पद्धत, बंद ­ निविदा पद्धत तसेच कृषी विपणनाची टप्पे या लेखाच्या आधारे शेतमाल विक्रीच्या प्रचलित पद्धती, त्यांचे गुणदोष व फायदे, कृषि विपणनाची विविध टप्पे, प्राथिमक बाजार, घाऊक बाजार, किरकोळ बाजार, सीमांत बाजार व इतर आवश्यक बाबींची सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आली असून या सर्व बाबींचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची  विक्री संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यासाठी होणार आहे. त्यातून त्यांची होणारी फसवणूक व अनिष्ट प्रथा याबाबत ज्ञापन होऊन शेतमाल चांगल्या प्रकारे विक्री करता येईल.  

संदर्भ :

आकाश बानाटे (2020) :  कृषि  उत्‍पन्‍न बाजार समिती, लातूर अंतर्गत कृषीमाल विपणन व्‍यवस्‍था, पद्धती व समस्‍या यांचा चिकित्‍सक अभ्‍यास, अप्रकाशित कृषी पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक  

 – शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर, Website Admin : https://www.agrimoderntech.in/
Prajwal Digital

Leave a Reply