माती तपासणीची शास्त्रीय पद्धत

Sp-concare-latur

 356 views

माती तपासणीची शास्त्रीय पद्धत– Classical method of soil testing

https://www.agrimoderntech.in/2020/06/classical-method-of-soil-testing.html
Author: Deshmukh Sandip B., (Crop scientist) Krishi Vigyan Kendra, Latur
जमीन ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. पीक उत्‍पादन वाढीसाठी तसेच जमिनीचे जडणघडण क्रिया, जमिनीतील उपलब्‍ध जीव-जंतू व जिवाणमुळे अनुकूल क्रिया घडून येत असतात. त्‍यामुळे पीक उत्‍पादन होण्‍यास मदत मिळते. जमिनीत पेरलेले बियाणे ते काही ठराविक अवधीत आंकुरण पावून दिसू लागते, अशा जमिनीतील नैसर्गिक क्रिया घडत असतात. म्‍हणून पीक उत्‍पादन, उत्‍पादकतकेसाठी जमीन आणि तिचे घटकाला अनन्‍यसाधारण महत्व आहे. अशा परिस्थितीत जमिनीचे स्‍वास्‍थ्‍य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवणे अत्‍यंत जरूरीचे आहे.      
शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपणास शेतजमिनीबाबतची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पीक घेण्यापूर्वी पिकास कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे? जमिनीत पीक पोषकद्रव्याचा साठा कितपत आहे? जमिनीची जलधारणशक्ती आणि पोत कसा आहे? या बद्दलची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. यशस्वी शेती व्यवसायाचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून पिकासाठी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
याच उद्देशाने पीक उत्पादनात जमिनीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जमिनीचे स्वास्थ्य सुपीक असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तुत लेख माती तपासणीची शास्त्रीय पद्धत – Classical method of soil testing आधारित आहे. सदर लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माती परीक्षण, माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना कसा घ्यावा, माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षण तपासणीसाठी पाठवण्याचे विशेष बाबी, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती मिळणार आहे. माती परीक्षणानंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्न्द्रव्यांची कमतरता अथवा त्याअनुषंगाने पीक उत्पादन वाढीसाठी खतांचा पुरवठा आणि एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.   
माती परीक्षण म्हणजे कायWhat is soil testing?
शेतातील मातीच्या नमुन्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेस माती परीक्षण असे म्हणतात.
माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची एक जलद पद्धती आहे, शेतजमिनीची पिकांना निरनिराळी अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता काढणे, यालाच माती परीक्षण किंवा मृदा चाचणी असे म्हणतात.
माती परीक्षणाचे उद्देश Objective of soil testing
माती परीक्षणात पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा कस (सुपीकता) अजमाविला जातो. माती परीक्षणाचे उद्देश खालील प्रमाणे :
 • मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे.
 • रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात येते.
 • जमिनीची उत्पादनक्षमता समजते.
 • जमिनी क्षारयुक्त व खारवट याबाबत माहिती समजते.
 • रासायनिक खतांची मात्रा देता येते.
 • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.
माती परीक्षण महत्त्व Importance of soil testing
 • शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून तिची उत्पादनक्षमता वाढते.
 • योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते.
 • पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो.
 • उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो.
 • जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन क्षारयुक्त किंवा खारवट जमिनीबाबत माहिती घेता येते.
 • अन्नद्रव्यांचा अभाव असल्यामुळे पुढील योग्य त्या सुधारणा करता येते.
 • जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
मातीचा नमुना घेण्याची पद्धत Soil sampling method
मातीचा नमुना हा शेतातील किंवा ठराविक क्षेत्रातील प्रातिनिधिक असावा. त्यासाठी शेतात गेल्यानंतर लगेच नमूना घेण्यास सुरुवात न करता प्रथम शेताची पूर्णपणे पाहणी करुन जमिनीचा रंग, उंच सखलपणा, हलकी, भारी, कोरडवाहू, सिंचनाची जमिनीचा खोली, पाण्याच्या निचऱ्याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊ शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत.
खतांच्या शिफारशीसाठी मातीच्या नमुन्याची खोली किती असावी हे ठरविताना पिके जमिनीच्या कोणत्या थरातून अन्नद्रव्ये शोषण करुन घेतात हा मुद्दा विचारात घेतला जातो.
शेतातून मातीचा नमुना काढण्यासाठी साधारणत: फावडे, खुरपी, घमेली, बादली, अगर, सॉईल टयुब, गोणपाट, किंवा जाडकापड, पॉलिथीन किंवा कापडी पिशव्या इत्यादी वस्तूंची गरज भासते.  
माती परीक्षणासाठी आपण फक्त अर्धा किलो मातीचा नमुना परिक्षणासाठी पाठवतो. म्हणून हा नमुना त्या शेतातील / विभागातील प्रतिनिधीक नमुना असावा लागतो. त्यासाठी प्रत्येक विभागातून साधारणपणे 12 ते 15 ठिकाणाहून नमुने घ्यावेत व त्यापासून एक प्रतिनिधिक नमुना तयार करावा.
एका विभागातील प्रतिनिधिक नमुना घेण्यासाठी त्या विभागातून सुमारे 12 ते 15 ठिकाणचे 15 ते 20 सें.मी. खोलीपर्यंतची माती गोळा करावी. खुरपी अथवा फावडे यांचा उपयोग करुन नमुना घ्यावयाचा असेल तर इंग्रजीतील व्ही (V) आकाराचा 15 ते 20 सें.मी. खोलीचा खड्डा करुन खड्डयाच्या एका बाजूला पृष्ठभागापासून खालपर्यंत सारख्या जाडीचा मातीचा थर घ्यावा. प्रत्येक ठिकाणाहून साधारणत: अर्धा किलो मातीचा नमुना स्वच्छ घमेल्यापर्यंत गोळा करावा.  
प्रत्येक विभागातून साधारणपणे 12 ते 15 ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा केल्यानंतर ते स्वच्छ पोत्यावर किंवा ताडपत्रीवर पसरवावे. मातीसोबत आलेला काडीकचरा, दगड काढून ती चांगली मिसळून घ्यावी. नंतर मातीचा वर्तूळाकार ढिग करुन सारखे चार भाग करावे. समोरासमोरील कोणतेही दोन भाग घ्यावेत. हे दोन भाग आणखी एकत्र मिसळवून त्याचे परत चार भाग करावेत व समोरचे दोन भाग घ्यावेत असे शेवटी अंदाजे अर्धा किलो (500 ग्रॅम) माती मिळेपर्यंत करावे व तो प्रतिनिधिक नमुना म्हणून एका स्वच्छ कापडाच्या किंवा पॉलिथीनच्या पिशवीत भरावी. मातीचा नमुना आलेसर असेल तर प्रथम तो सावलीत सुकवावा व नंतरच पिशवीत भरावा. अशा तऱ्हेने प्रत्येक विभागातून मातीचा प्रतिनिधिक नमुना घेवून स्वच्छ पिशवीत भरावा व त्या विभागाचे नाव व इतर माहिती लेबलवर लिहून ते लेबल मातीचा नमुना असलेल्या पिशवीत ठेवावे व नमुने संबंधित माती परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावे.
मातीचा नमुना गोळा करताना घ्यावयाची खबरदारी Precautions to be taken while collecting soil sample
 1. ज्या शेतातील मातीचा नमुना घ्यावयाचा आहे त्या पूर्ण शेतामध्ये फिरुन पाहणी करुन जमिनीचा विविध गुणाधर्मानुसार शेतीचे विभाग करुन प्रत्येक विभागातून एक प्रतिनिधिक नमुना घ्यावा.
 2. मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे स्वच्छ असावीत. गंजलेल्या अवजारांनी नमुना घेऊ नये.
 3. सर्व साधारणपणे मातीचा नमुना पीक काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
 4. शेतामध्ये पिके उभे असल्यास दोन ओळीतील जागेमधून मातीचा नमुना घ्यावा. रासायनिक खते दिली असल्यास दोन अडीच महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
 5. रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरु नयेत.
 6. शेतामधील खते साठविण्यास व कचरा टाकण्याची जागा तसेच जनावरे बसण्याची जागा, शेतातील झाडाखालील जागा विहिरीजवळ, निवास स्थानाजवळ व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेवू नयेत.
 7. पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर, वापसा असताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुना घेवू नये.
नमुन्यासह आवश्यक कागदपत्रे Required documents with sample
 • शेतकऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता
 • जमीन सर्व्‍हे नंबर / गट नंबर
 • जमिनीचा प्रकार अ. बागायती  ब. कोरडवाहू
 • जमीन बागायती असेल तर सिंचनाचे साधने (विहिर / ट्यूब वेल )
 • जमिनीची खोली (उथळ / मध्यम / खोल )
 • जमिनीची निचरा (कमी / मध्यम / चांगला)
 • जमिनीचा प्रकार (हलकी / मध्यम / सपाट)
 • जमिनीच्या समस्या (खारवट / चोपण / पाणथळ /चुनखळीयुक्त )
 • पूर्वीच्या हंगामात घेतलेली पिके, त्यांचे उत्पादन, वापरलेली खते व प्रमाण
 • नमुना घेतल्याची तारीख
माती परीक्षण निष्कर्ष Soil test results
माती परीक्षण केल्यानंतर जमिनीत सामूनुसार वर्गवारी करण्यात येते.  त्यानुसार आम्ल किंवा विम्ल निर्देशांक समजून घेता येतो. तसेच जमिनीची सुपीकता व उत्पादकतेचा सुद्धा अंदाज घेता येतो.
तक्ता क्र. 1 : माती परीक्षण केल्यानंतर जमिनीचा सामू आणि वर्गवारी 
अ.क्र.
सामू
निष्कर्ष
1
4.5 पेक्षा कमी
अत्यंतिक आम्ल जमिन
2
4.6 ते 5.2
तीव्र आम्ल जमिन
3
5.3 ते 6.0
मध्यम आम्ल जमिन
4
6.1 ते 6.5
किंचित आम्ल जमिन
5
6.6 ते 7.0
उदासीन जमिन
6
7.1 ते 7.5
किंचित विम्ल जमिन
7
7.6 ते 8.3
मध्यम विम्ल जमिन
8
8.4 ते 9.0
तीव्र विम्ल जमिन
9
9.0 पेक्षा जास्त
अत्यंतिक विम्ल जमिन
माती परीक्षणासाठी शिफारशी Recommendations for soil testing
 1. जमिनीची सुपीकता व उत्‍पादकता टिकवण्‍यासाठी माती परीक्षण करणे अत्‍यंत गरजेचे आहे.
 2. माती परीक्षण करताना शास्‍त्रीय पद्धतीचे निकष व नियमांची पूर्तता काटेकोरपणे शेतकऱ्यांनी करणे अगत्‍याचे आहे.
 3. मातीचा नमुना घेताना जनावरांचा गोठा, सेंद्रिय अथवा कंपोष्‍ट खत प्‍लॅंट व इतर ठिकाणच्‍या मातीचा नमुना शेतकऱ्यांनी घेण्‍यात येऊ नये.
 4. पिकाच्‍या उत्‍पादन व उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक व सेंद्रिय खतांचे व्‍यवस्‍थापन करावे.
 5. माती परीक्षण केल्‍यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची माहिती मिळणे सुलभ होते.
 6. जमिनीत सूक्ष्‍मजीवजंतूचे संरक्षण करून जमिनीचे स्‍वास्‍थ्‍य अबाधित ठेवण्‍यात यावे, जेणेकरून उत्‍पादनात स्थिरता आणणे शक्‍य होईल.
 7. माती परीक्षण अहवाल हा तज्‍ज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सल्‍ल्‍यानुसार पुढील नियोजन आखावे.
 8. माती परीक्षण हे दर दोन वर्षांनी करावे, जेणेकरून  जमिनीतील उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍ये माहित होण्‍यास मदत मिळेल.
 9. माती परीक्षण केल्‍यामुळे जमिनीचा सामू व आम्‍ल-विम्‍ल निर्देशांक माहिती होऊन त्‍याचे पुढील पीक पद्धतीनुसार आयोजन करण्‍यात यावे. 
 10. माती परीक्षण करण्‍यासाठी जिल्‍हा किंवा तालुका माती परीक्षण केंद्रावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती घेऊन मातीचे परीक्षण करावे.
 11. शेतकऱ्यांनी माती परीक्षणाबरोबरच पाणी परीक्षणसुद्धा करणे अत्‍यंत गरजेचे आहे.
 12. माती परीक्षण अहवाल प्राप्‍त होताच पुढील हंगामातील घेण्‍यात येणाऱ्या पिकांचे व खतव्‍यवस्‍थापन करावे. 
अशाप्रकारे माती परीक्षण, उद्देश, माती परीक्षण महत्त्व, माती परीक्षण नमुना घेण्याची पद्धत, माती परीक्षण नमुना घेताना घ्यावयाची दक्षता, मातीच्या नमुन्यासोबत द्यावयाची आवश्यक कागदपत्रे आदी बाबींचा संक्षिप्त आढावा प्रस्तुत लेखात लेखकांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माती परीक्षणानंतर जमिनीचा पोत, उत्पादनक्षमता, रासायनिक खतांची मात्रा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, हंगामनिहाय पीक लागवडीचे व्यवस्थापन करणे सुलभ होते आणि माती परीक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यस्थापन करून जमिनीचे स्वास्थ्य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवता येते. त्यामुळे पीक उत्पादनात भरघोसपणे वाढ होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राखता येते.
प्रस्तुत माती तपासणीची शास्त्रीय पद्धत – Classical method of soil testing या लेखाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे माती परीक्षणांचे महत्त्व समजून घेता येईल. त्यानंतर मातीचे परीक्षण कसे करावे, माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे, माती परीक्षणासाठी माती नमुना पाठवावयाची याबाबत ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार असून शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढ होईल, अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल आणि त्यातून जमिनीचे स्वास्थ्य चांगले राखता येईल.
संदर्भ References
 1. विकास देशमुख (2017) : जमीन सुपीकता वाढीच्‍या उपाय योजना, आनंद पब्लिकेशन, पुणे, 23
 2. कृषि पणन मित्र (जानेवारी 2014/18) : माती परीक्षण, महत्व, पद्धत आणि उद्देश, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
 3. मृदशास्‍त्राची मूलतत्‍त्‍वे आणि कार्यपद्धती : पाठ्यपुस्तिका, य. च. म. मु. वि., नाशिक
 4. कदम रामप्रसाद (2020) :  जमिनीचे प्रकार, गुणधर्म आणि माती परीक्षण पद्धतीचा अभ्यास, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य. च. म. मु. वि., नाशिक                          Author: Deshmukh Sandip B., (Crop scientist) Krishi Vigyan Kendra, Latur     – शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: