करोना महामारी पश्चात उद्योजकांसमोरील आव्हाने

करोना महामारी (कोवीड-19) या रोगाने जागतिक स्तरावर अतिशय वेगाने थैमान घातले आहे. यामुळे लाखो व्यक्तींचा मृत्यू झालेला असून मोठ्या प्रमाणावर लोक या आजाराने मूत्यूशी झुंज देत आहेत. यामुळे विकसित व विकसनशील राष्ट्रांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून परिणामी शेती, उद्योजक, व्यवसाय, कंपन्या ह्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. ही जागतिक व देशातील सद्य:परिस्थिती आहे. बरेच उद्योग मनुष्य बल स्थलांतरित झाल्यामुळें उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. परिणामी उद्योगांसमोरील अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत.   
उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या आजच्या काळात मंदी मुळे तरुणास शेती उद्योगात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकापुढे अनेक संधी व आव्हाने निर्माण झाली आहेत. उद्योजकांची आर्थिक विकासातील भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे. कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रात उद्योजकतेला फार वाव आहे. विशेषतः पायाभूत सुविधा, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा, अपारंपरिक ऊर्जा, हॉटेलिंग, मनोरंजन, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, संगणक, मूलभूत उद्योगधंदे अशा अनेक क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र स्पर्धात्मक क्षमता, दर्जा, गतिमानता ह्या बाबीकडे व खर्च नियंत्रणाकडे लक्ष द्यावे लागेल. अश्या उपक्रमास जागतिक स्तरावर न्यावे लागेल.
आधुनिक युग हे अत्यंत गतिमान, तीव्र बदलांचे, अनिश्चितता व अस्थैर्याने भरलेले, विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रात कल्पनातीत वेगाने संशोधन चालू असणारे असे आहे. गेल्या हजारो वर्षात जितकी प्रगती झाली तितकी आता काही दशकांमध्ये होत आहे. त्या अर्थाने आजच्या युगाचे वर्णन अतितीव्र बदलाचे युगअसे केले जाते.
करोना महामारी पश्चात उद्योजकांसमोरील प्रमुख आव्हाने
सध्याच्या आधुनिक युगात अनेक नवीन व्यवसायसंधी निर्माण झाल्या आहेत. जागतिकीकरणाच्या, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या आणि व्यवसायावरील नियंत्रणे शिथिल करण्याच्या धोरणामुळे विविध व्यवसायात उद्योजकतेलाउधाण आले आहे. तसेच उद्योजकापुढील समस्या, संकटे वाढली आहेत. आधुनिक युगात उद्योजकांपुढे निर्माण झालेल्या प्रमुख आव्हानांची माहिती खालील प्रमाणे आहे:   
  1. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आजच्या काळातील उद्योजकांना स्विकारावे लागेल. कमीत कमी किंमतीला अधिक दर्जेदार, अधिक वैशिष्ट्यपूर्ण, नवनवीन प्रकारच्या वस्तू/सेवांची अपेक्षा आज ग्राहक करीत आहेत. उदा. त्यांना नुसता मोबाईल हॅन्डसेट नको असून स्मार्ट फोनहवा आहे.
  2. उद्योजकांना जागतिक स्पर्धेशी मुकाबला करावा लागेल. आज आपल्या देशात बँकिंग, विमा, संदेशवहन, हॉटेलिंग, किरकोळ व्यापार, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक क्षेत्रात विदेशीकंपन्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान आपल्या उद्योजकांपुढे आहे. त्यासाठी एका बाजूला उत्पादन खर्चात कपात व दुसऱ्या बाजूला गुणवत्तेत वाढ ही व्यूहरचना करावी लागेल.
  3. चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागेल. पारंपरिक चौकटीत, चाकोरीत राहून व्यवसाय करणे कठीण होईल. जसे महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांना कर्जपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली. 
  4. जागतिक स्तरावर जाण्याची तयारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठात आपली एक खास ओळखकिंवा स्थान निर्माण करावे लागेल. केवळ देशांतर्गत व्यवसाय करून चालणार नाही तो देशाबाहेर सुद्धा करावा लागेल.
  5. पर्यावरणपूरक उत्पादने व व्यवसाय पद्धतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आपल्या उत्पादनामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल. प्रदूषणाची पातळी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. ऊर्जाबचत करणारी, अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरणारी, पुनर्वापर करता येणारी उत्पादने तयार करावी लागतील.
  6. अधिक सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागेल. कंपनीच्या नफ्याचा काही हिस्सा विविध समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावा लागेल. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या वस्तूंचे उत्पादन व व्यापार यावर बंधने येतील. उदा. सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ, दारू यांचे उत्पादन व व्यापार.
  7. व्यवसाय सचोटीने व नीतिमूल्यांची जपणूक करून करावा लागेल. व्यवसायात बालकामगार वापरणे, कामगारांचे शोषण करणे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे, लबाडी, नफेखोरी करणे इत्यादी अनैतिक बाबी टाळाव्या लागतील.
  8. मनुष्यबळ व तंत्रज्ञान यांची सांगड घालावी लागेल. आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम प्रशिक्षण देऊन नवीन तंत्रज्ञान वापरासाठी, बहुविध कामे करण्यासाठी सिद्ध करावे लागेल. प्रशिक्षित, कुशल व गुणवान कर्मचारीहे संस्थेची संपत्तीठरतील.
  9. तीव्र वेगाने बदलणाऱ्या काळाशी जुळवून घ्यावे लागेल. व्यवसायात लवचीकता ठेवावी लागेल. वस्तूत/सेवात काळानुरूप सुधारणा कराव्या लागतील. प्रसंगी काही उत्पादने बंदही करावी लागतील.
  10. नावीन्य व संशोधनचे महत्त्व वाढत जाईल. अभिनव उत्पादनांची आखणी करावी लागेल. उत्पादन संशोधन व विकासावर जास्त खर्च करावा लागेल.
  11. व्यवसायात प्रचंड भांडवल गुंतवणूक करावी लागेल. कमी गुंतवणुकीमध्ये उपक्रम चालू शकणार नाहीत. उत्पादनाचे यांत्रिकीकरण, उच्च तंत्रज्ञानाचा वापर, वाढलेला विपणन खर्च, इत्यादि कारणांमुळे उपक्रमात कोट्यवधी रुपयांचे भांडवल गुंतवावे लागेल. गुंतवणुकीबरोबर जोखमीचे प्रमाणही वाढेल. प्रचंड भांडवल गुंतवणूक करूनदेखील उपक्रमांच्या यशाची खात्री देता येणार नाही.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक घटक :
यशस्वी उद्योजक होण्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते. महत्त्वाच्या गुणांमध्ये, उच्च सिद्धी प्रेरणा, महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टी, कल्पकता, कठोर परिश्रम, सौजन्य, आत्मविश्वास, निर्धार, चिकाटी, चारित्र्य, संदेशवहन कौशल्य, निर्णयक्षमता, चांगला जनसंपर्क, उत्साह, सृजनशीलता, भावनिक स्थैर्य, अभिप्रेरणक्षमता, संधी साधण्याची क्षमता इत्यादिंचा समावेश होतो.
यशस्वी उद्योजकाचे गुण: अनेक व्यक्तींना उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा असते. ते एखादा उपक्रम स्थापन करून उद्योजकही होतात. परंतु त्यांच्यापैकी काहीच यशस्वी उद्योजक होतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे आवश्यक गुण विविध विचारवंतांनी सांगितले असून त्यापैकी काही महत्त्वाच्या गुणांचे वर्णन परिस्थितीनिरूप खालील प्रमाणे करण्याचा प्रयत्न केलेला  आहे.
1) महत्त्वाकांक्षा : उद्योजकाला आपल्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी महत्त्वकांक्षा ह्या गुणाची आवश्यकता असते. महत्त्वाकांक्षा नसेल तर उद्योगांचा विस्तार होणार नाही. नवनवीन वस्तू बाजारात येणार नाहीत. यशाची उत्तुंग शिखरे गाठता येणार नाहीत.
2) सृजनशीलता : सृजनशीलता म्हणजे नवीन गोष्ट करण्याची क्षमता होय. सृजनशीलता या गुणाच्या बळावरच उद्योजक यश मिळवितात. समाजाला नवीन वस्तू आणि सुधारित चांगल्या दर्जाच्या वस्तू उपभोगावयास मिळतात.
3) आत्मविश्वास : उद्योजकांचा स्वतःवर पूर्ण विश्वास असावा. आत्मविश्वासामुळे उद्योजक ठामपणे कृती करतात. गोंधळून जात नाहीत, संकटावर मात करतात. प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतात.
4) उत्साह : उत्साहामुळे उद्योजकाला आपली कार्ये न दमता अखंडपणे करता येतात. उद्योजकाला त्याच्या कार्यालयात तसेच कार्यालयाबाहेर अनेक कामे करावी लागतात. एकाचवेळी अनेक आव्हाने सांभाळावी लागतात. त्यासाठी जोम व उत्साहाची आवश्यकता असते.
5) दूरदृष्टी : यशस्वी उद्योजकाजवळ दूरदृष्टी असते. ते नेहमी भविष्याचा वेध घेत असतात. पुढील 5-10 वर्षानंतर उद्योगात काय परिस्थिती असेल, ग्राहकांच्या आवडी-निवडी काय असतील, तंत्रज्ञान किती प्रगत झाले असेल याचा अगोदरच अंदाज घेऊन त्यानुसार कृती आराखडा तयार करतात.
6) कष्टाची तयारी : उद्योगात यशस्वी व्हावयाचे असेल तर उद्योजकाने प्रचंड कष्ट केले पाहिजेत. कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे त्यांना माहित असते. उपक्रमात पडेल ते काम करण्याची, घड्याळाकडे न पाहता काम करण्याची तयारीच उद्योजकाला यशस्वी बनविते.
7) भावनिक स्थैर्य : उपक्रमात सतत चढउतार होत असतात. नफा-नुकसान होत असते. ह्या सर्व परिस्थितीत उद्योजकाने भावनिकदृष्ट्या स्थिर राहिले पाहिजे. यशामुळे हुरळून जाणे, अपयशामुळे खचून जाणे टाळले पाहिजे. यश-अपयश, नफा-नुकसान ह्या व्यवसायातील सामान्य गोष्टी असतात असे मानून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
8) निर्णयक्षमता : यशस्वी उद्योजकाजवळ चांगली निर्णय क्षमता असते. तो तत्परतेने व अचूकपणे निर्णय घेत असतो. त्यामुळे त्यास उपक्रमातील समस्या समाधानकारकपणे सोडविता येतात. येणाऱ्या संधीचा फायदा करून घेता येतो. निर्णय घेणे हे उद्योजकाचे महत्त्वाचे कार्य असते.
9) सौजन्य : उद्योगात यशस्वी होण्यासाठी उद्योजकाने ग्राहक, कर्मचारी, सरकारी अधिकारी, पुरवठेदार व सर्वसामान्य जनता यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे. चांगल्या शिष्टाचारामुळे उद्योजक ह्या सर्व घटकांना लवकर जिंकू शकतो व अपेक्षित कामे करवून घेऊ शकतो.
10) उच्चसिद्धी प्रेरणा : उद्योजकाजवळ इतरांच्यापेक्षा जास्त काम करून दाखविण्याची, आव्हाने स्वीकारण्याची, कठीण कामगिरी साध्य करण्याची तीव्र प्रेरणा असावी लागते. मॅकलेलँड यांनी म्हटल्याप्रमाणे उच्च सिद्धी प्रेरणेमुळेच उद्योजक यशस्वी होत असतात. व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यासाठी, निरंतर उत्कर्षासाठी तीव्र सिद्धीप्रेरणा लागते.
11) संदेशवहन (संवाद) कौशल्य : यशस्वी उद्योजकाच्याअंगी चांगले संदेशवहन कौशल्य असते. अपेक्षित कार्यपूर्तीसाठी उद्योजकाने उपक्रमात प्रभावी संदेशवहनाची व्यवस्था प्रथम निर्माण केली पाहिजे व नंतर ती टिकवून ठेवली पाहिजे. प्रभावी संदेशवहनामुळे व संवाद कौशल्यामुळे व्यवस्थापन कार्य सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी मदत होते.
12) चारित्र्य : आज उद्योगांत चांगल्या चारित्र्यास, नीतिमूल्यास फार महत्त्व आले आहे. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अप्रामाणिकपणा, लबाडी, अनीती यांचा त्याग करावा लागतो. समाजात आपल्याबद्दल एक चांगली प्रतिमा तयार करावी लागते.
13) अभिप्रेरण क्षमता : आपले सहकारी, कर्मचारी यांच्याकडून जास्तीत जास्त कामगिरी करवून घेण्यासाठी उद्योजकाजवळ अभिप्रेरण क्षमता असली पाहिजे. तसेच ग्राहक, सरकार यांनाही अभिप्रेरित करता आले पाहिजे. तरच त्यांच्याकडून उद्योजकाला अपेक्षित कृती होईल.
14) संधी साधण्याची क्षमता : उद्योजक हा संधिसाधू असला पाहिजे. त्याने सतत संधीचा शोध घेतला पाहिजे व त्या काबीज केल्या पाहिजेत. संकटातूनही संधी निर्माण होत असतात हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. उदा. दूषित पाणी हे सामान्य जनतेला संकट वाटत असले तरी उद्योजकाला शुद्ध पाणी विकण्याची ती सुवर्णसंधी असते.
15) चिकाटी : उपक्रमात यश मिळवावयाचे झाल्यास उद्योजकाने चिकाटीने काम करीत राहिले पाहिजे. तात्कालिक अपयश, ग्राहकांचा कमी प्रतिसाद, कामगार समस्या अशा कारणामुळे न विचलित होता, धीर न सोडता, चिकाटीने, संयमाने काम करीत राहिले पाहिजे. मध्येच उपक्रम बंद करून पलायन करता कामा नये.
सदर लेखाच्या आधारे आपणास उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा व मदत मिळेल. तसेच ‍ यशस्वी उद्योजक  तथा व्यवसायिक होण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गुणांची माहिती समजून घेता येईल. तसेच उद्योगाची आजच्या युगात कशाप्रकारे उभारणी करावयाचे हे आपणास या द्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे सदरील माहिती ही लघु आणि मोठ्या उद्योग तथा उद्योजकासाठी महत्त्वपूर्ण व प्रोत्साहन देणारी असल्यामुळे लेखकांनी सदर लेख तयार करून उद्योग व उद्योजकांसमोरील प्रमुख आव्हाने व  त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती देऊन प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.     
संदर्भ : उद्योजकतेचे मूलतत्त्वे, (2014)  : बी.ए. प्रथम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पृ. 13 ते 15
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/
Prajwal Digital

Leave a Reply