खरीप भुईमूग लागवड तंत्र

भुईमूग हे औद्योगिक आणि व्‍यापारीदृष्‍ट्या खाद्यतेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते. मनुष्‍याच्‍या आहारात स्निग्‍ध पदार्थ आणि प्रथिने यांचा स्‍वस्‍त पुरवठा भुईमूगातून होत असल्‍यामुळे त्‍याला आंतरराष्‍ट्रीय महत्‍त्‍व प्राप्‍त झाले आहे. सध्‍या भुईमूगाचे तेल सर्वाधिक किंमतीला बाजारात विक्री केले जाते. भुईमूगाच्या तेलाची स्‍वाद, चव, अप्रतिम आहे. शेंगदाणा तेलाच्‍या निर्यातीपासून भारताला परकीय चलन देखील मिळते.  

जमिनीचा पोत आणि मानवाचे आरोग्य सुधारणारे भुईमूग पीक शेतकऱ्याला निश्चितपणे आर्थिक लाभ मिळवून देणारे हुकमी पीक आहे. देशातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा  या राज्यांत खरीप भुईमूगाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या महाराष्ट्रात अंदाजे 4.20 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. पावसाची अनियमितता, वातावरणातील होणारे अनुकूल वा प्रतिकूल बदल, किडींचा व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे महाराष्ट्रातील भुईमूग क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेत दिवसेंदिवस घट होत आहे.

खरीप भुईमूग लागवड तंत्राचा अवलंब केल्यास भुईमूग पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे शक्य होईल. याच उद्देशाने भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना अद्यावत व सखोल माहिती मिळावी, भुईमूग उत्पादन वाढावे, सुधारित वाणाचा वापर, पीकसंरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे, तणांचा बंदोबस्त करावा, कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशा विविध घटकांची माहिती भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सदर लेख तयार करण्यात येत आहे.

भुईमूग उत्पादन 

तक्ता क्र. 1 : भारतातील प्रमुख राज्यनिहाय भुईमूग उत्पादन स्थिती

अ.क्र.राज्य2019-20
उत्पादन (000 Tonnes)भाग (Share %)
1गुजरात3,940.0042.92
2राजस्थान1,260.0013.73
3आंध्र प्रदेश1,040.0011.33
4तामिळनाडू970.0010.57
5कर्नाटक560.006.10
6मध्य प्रदेश350.003.81
7तेलंगणा350.003.81
8महाराष्ट्र330.003.59
9इतर210.002.29
10पश्चिम बंगाल170.001.85
एकूण9,180.00

Source: Ministry of Agriculture APEDA under Agri – Exchange official website

हवामान

भुईमूग पिकास भरपूर सूर्यप्रकाश, उबदार हवामान चांगलेच मानवते. भुईमूगासाठी सर्वसाधारण 700 ते 1000 मि.मी. पाऊस आवश्यक आहे. तसेच 25 ते 30 अंश से. तापमान हे भुईमूग पिकाच्‍या वाढीस, फुले येण्‍यास तसेच भुईमूगाच्या आऱ्या धरण्‍यास अनुकूल असते. तापमान 30 ते 35 अंश सें. तापमानात शेंगा चांगल्‍या पोसल्‍या जातात आणि उत्‍पादन वाढते.

जमीन

खरीप भुईमूग पिकासाठी पाण्‍याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी किंवा खडकाळ जमीन योग्‍य असते. सेंद्रिय पदार्थ भरपूर असतील तर जमीन भुसभुशीत होऊन भुईमूग पिकाच्‍या आऱ्या चांगल्‍या प्रकारे जमिनीत घुसून उत्‍पादनात वाढ होते. भारी काळी, चिकण मातीच्‍या जमिनीत खरीप भुईमूग घेऊ नये. कारण पाण्‍याचा ताण बसल्‍यास जमीन टणक होते व आऱ्या जमिनीत घुसू शकत नाहीत. त्‍यामुळे भुईमूग उत्‍पादनात घट येते.

पूर्व मशागत

भुईमूग लागवडीच्या सुरुवातीस जमिनीची चांगली खोलवर नांगरणी करून घ्‍यावी. नंतर 3 ते 4 वखराच्या किंवा कुळवाच्‍या पाळ्या द्याव्‍यात. शेवटच्‍या कुळवणी अगोदर जमिनीत प्रति हेक्‍टरी 15 ते 20 बैलगाड्या चांगले कुजलेले कंपोष्ट किंवा शेणखत टाकावे. हुमणी या रोगाचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी शेणखतात एक बैलगाडी खतासाठी एक ते दीड किलो कार्बारिलची भुकटी मिसळावी. जेणेकरून जमिनीतील वाळवी व इतर उपद्रव करणाऱ्या किटकापासून बियाचे संरक्षण होईल.

लागवड हंगाम 

भुईमूग हे पीक खरीप व उन्‍हाळी हंगामात संवेदनशील येत असल्‍यामुळे त्‍यांची लागवड महाराष्‍ट्र राज्‍यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. भुईमूगाची लागवड उन्हाळी लागवड करावयाची असल्यास सर्वसामान्य भुईमूगाची पेरणी 15 जून ते 20 जूलै  या दरम्यान करावी. भुईमूगाची पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान सरासरी तापमान 16 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे. त्यामुळे भुईमूगाची उगवण चांगली होण्यास मदत होते.

पेरणीची वेळ

जून महिन्‍यात पुरेसा पाऊस झाल्‍यानंतर भुईमूगाची पेरणी करावी. जमिनीचा प्रकार व पावसाचे प्रमाणानुसार 15 जून ते 15 जूलै अखेरपर्यंत महाराष्‍ट्रात भुईमूग पिकाची पेरणी खरीप हंगामात करतात. 15 जूलैनंतर पेरणीस उशीर होतो त्‍याचा उत्‍पन्‍नावर किंवा भुईमूगाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असतो. पेरणीसाठी पाभरीचा वापर करावा किंवा सुधारित टोकण पद्धतीने लागवड करावी. 

पेरणीचे अंतर 

पसऱ्या व निमपसऱ्या 40 x 40 सें. मी.  तर उपट्या वाणासाठी  30 x 15 सें. मी.  अंतर दोन रोपांमध्‍ये असावे. तसेच बियाणे जमिनीत 3 ते 4 सें. मी.  खोलवर पेरणी करावी. एके- 259, टीएजी – 24, टीएजी -26, फुले – प्रगती या खरीपात घेतल्‍या जाणाऱ्या जातीची लागवड करावी.

सुधारित जाती

भुईमूग पिकाचे उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सुधारित जातींची लागवड करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे उत्‍पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. यामध्‍ये उपट्या प्रकारामध्‍ये एस. बी. 11, जे. एल. 24, टी. ए. जी. 24,टी. जी. 26, फुले व्‍यास, निमपसऱ्या वाणांमध्‍ये टी.एम.व्‍ही. 10 पसऱ्यांमध्‍ये कऱ्हाड 4-11 असून  वेस्‍टर्न -20, वेस्‍टर्न -44, टी. जी.-1 (विक्रम), जीपीबीडी-4, कोपरगाव नं.-3, स्‍पॅनिश इम्‍प्रुव्‍हड, फैजपूर 1-5, टी. पी. जी.- 41, लातूर  नं.-33, एम-13, भुईमूगाचा एके 303, टी. के. जी.-19- ए, यु. एफ. 70-103, आय. सी. जी. एस.-11, कोयणा (बी-95), जे.एल. 24 (फुले प्रगती) भुईमूगाच्‍या सुधारित जातीचा लागवडीसाठी उपयोग करावा.

हेक्‍टरी बियाणे 

  1. भुईमूग उपट्या : एस.बी. 11, टीएजी-24 करिता 100 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे.
  2. भुईमूग पसऱ्या : सर्वसाधारण 70 ते 80 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे.
  3. भुईमूग निमपसऱ्या : सर्वसाधारण 80 ते 90 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया 

बियांण्‍यापासून उद्भवणाऱ्या किंवा रोपावस्‍थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्‍यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्‍यास थायरम 5 ग्रॅम, मॅन्‍कोझेब 4 ग्रॅम अथवा कार्बेन्‍डझिम 3 ग्रॅम या बुरशीनाशकापैकी कोणत्‍याही एकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर भुईमूग बियाण्यास प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. या दोन्ही प्रक्रियेमुळे बुरशीजन्‍य रोगांना आळा बसतो, बियाणे उगवण चांगली होते आणि मर रोगाचे प्रमाण कमी झाल्‍याने हेक्‍टरी रोपांची संख्‍या योग्‍य राखता येते.

लागवड पद्धत 

टोकण पद्धत (डिबलिंग)  : महाराष्‍ट्रात भुईमूग लागवड ही टोकण पद्धतीने केली जाते. टोकण पद्धतीचा वापर भारी जमिनीत व बागायती क्षेत्रात प्रामुख्‍याने केला जातो. भारी जमिनीत 90 सें. मी.  रूंदीच्‍या सऱ्या सोडतात आणि वरब्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूस 45 X 10 सें. मी.  अंतरावर 1 – 2 बिया टोकूण भुईमूग लागवड केली जाते. टोकण पद्धतीने भुईमूग लागवड करण्‍यासाठी 45 – 50 किलो प्रति हेक्‍टरी बियाण्‍याची गरज असते. भुईमूग टोकण पद्धतीमुळे बियाण्‍याची मोठी बचत होते आणि उत्‍पादनात चांगली वाढ होते.

भुईमूग आंतरपीक 

खरीप हंगामातील पिकांची पेरणी जुलैच्‍या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्‍यावेळी आपल्याकडे पावसाळा सुरु असल्याने या कालावधीत तापमान कमी असते. भुईमूग वाढ सावकाश होते. अशा परिस्थितीत भुईमूगाच्‍या दोन ओळींमध्‍ये कमी कालावधीत तयार होणारी भाजीपाला पिके आंतरपीक म्‍हणून घेता येतात. कारण भुईमूग हे पीक फक्‍त तीन महिन्‍यात परिपक्‍व होऊन काढणीस येते. भुईमूग आंतरपीक उदा. भुईमूग + तीळ (6 : 2), भुईमूग + सूर्यफूल (6 : 2), भुईमूग + कापूस (2 : 1), भुईमूग + तूर (6 : 2 ) या प्रमाणे आंतरपिकाची लागवड करावी. जे आंतरपीक निवडले आहे त्‍याची स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करणे गरजेचे असते. कारण सदर पीक प्रमुख पिकांसोबत अन्‍नद्रव्‍ये व इतर घटकांसाठी स्‍पर्धा करत असते.

भुईमूग खत व्यवस्थापन 

खरीपहंगामातभूईमुगाच्याअधिकउत्पादनासाठी10किलोलोह + 5किलोजस्त+ 1किलो अथवा  दोन किंवा तीन वर्षांतून एकदा द्यावी, तसेच पसऱ्या आणि अर्ध पसऱ्या भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी 0.5 पीपीएम प्रमाणाच्या बोरॉनच्या दोन फवारण्या अनुक्रमे 30 आणि 55 दिवसांनी देण्याची शिफारसकरण्यातआलीआहे.

तक्ता क्र. 2 भुईमूग पिकासाठी खत व्यवस्थापन

पोषणतत्व मात्रा प्रति हेक्टरस्त्रोतवापरण्याची पद्धतपेरते वेळेस प्रमाण /प्रति हेक्टर
नत्र  25 किलो ग्रॅमअमोनिया सल्फेटजमिनीद्वारे125 किलो ग्रॅम
युरियाजमिनीद्वारे52 कि.ग्रॅ
स्‍फूरद 50 किलो ग्रॅमसिंगल सुपर फॉस्फेटजमिनीद्वारे312 किलो ग्रॅम
डी.ए.पी.जमिनीद्वारे108 किलो ग्रॅम
पालाश 30 किलो ग्रॅमपोटॅशियम सल्फेटजमिनीद्वारे65 किलो ग्रॅम
म्युरेट ऑफ पोटॅशजमिनीद्वारे50 किलो ग्रॅम
गंधकजिप्समजमिनीद्वारे250 किलो ग्रॅम
जस्तझिंक सल्फेटजमिनीद्वारे20-25 किलो ग्रॅम
लोहफेरस सल्फेटजमिनीद्वारे15 किलो ग्रॅम
बोरॉनबोरॉक्सजमिनीद्वारे5 किलो ग्रॅम

स्‍त्रोत– कौसीडकर हरीहर (2018)- सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये:नियोजन व व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे, पृ. 118

पाणी व्‍यवस्‍थापन 

खरीप हंगामातील भुईमूग शक्‍यतो मध्‍यावर किंवा हंगामाच्‍या शेवटी अवर्षणात सापडतो. पीक फुलोऱ्यावर आल्‍यापासून ते शेंगा भरेपर्यंत पावसात खंड पडल्‍यास पाणी देण्‍याची सोय असल्‍यास संरक्षित पाणी द्यावे. अन्‍यथा उत्‍पादनात 40 ते 50 टक्के पर्यंत घट होते.

तणनियंत्रण 

भुईमूग पिकाचे तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते. एकूण कृषी उत्पादनाच्या होणाऱ्या किंमतीच्या किमान 10टक्के घट निव्वळ तणांचे नियंत्रण वेळीच न केल्यामुळे होते. तणांमुळे होणारे भुईमूग पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे; परंतु मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात. या तणांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक, रासायनिक व यांत्रिकी पद्धतीने तणांचे प्रभावी नियंत्रण करावे.

भुईमूग पीकसंरक्षण 

अ. भुईमूग किडींचे व्यवस्थापन 

महाराष्‍ट्रात भुईमूगावर साधारणपणे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने पोखरणारी अळी, रस शोषणारी किडी, मुळावर उपजीविका करणारी हुमणीमी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.  या किडींची माहिती खालील प्रमाणे आहे:

1) मावा 

भुईमूगाच्‍या शेंड्यावर पानाच्‍या खालच्‍या बाजूला, फुलामध्‍ये तसेच खोडावर माव्‍याचा प्रादुर्भाव आढळून येतो. पीकवाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात किंवा फुलावर असताना याच प्रादुर्भाव आढळून येतो. पूर्ण वाढ झालेला मावा व त्‍याची पिके ही भुईमूगाची कोवळी शेंडे, फुले व पानातून रस शोषण करतात. त्‍यामुळे पिकाचा जोम कमी होऊन वाढ खुंटते व पर्यायाने उत्‍पादनावर विपरित परिणाम होतो. याशिवाय मावा आपल्‍या शरीरातून चिकट पदार्थ झाडावर सोडतो. त्‍यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो.

ओळख : मावा कीड ओळखण्‍यास अतिशय सोपी आहे. साधारणपणे 2 मि.मी. लांब असणारी ही कीड अर्धगोलाकार आकाराची असून, शरीर मृद असते. लहान असणाऱ्या माव्‍याचा रंग तपकिरी असतो. पुढे तो बदलून काळपट रंगाचा होतो. माव्‍याची मादी नराशी समागम न करता पिलांना जन्‍म देते. एक मावा कीटक अनेक पिलांना जन्‍म देते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अनेक पिढ्या तयार होतात. उष्‍ण हवामान माव्‍याच्‍या वाढीला अनुकूल असते, तर जोराच्‍या पावसामुळे प्रादुर्भाव कमी होतो. मावा जास्‍त असला तर पिकाचे 40 टक्के नुकसान होते.   

2) तुडतुडे

भुईमूग पिकावर वास्‍तव्‍य करणारी तुडतुडे ही कीड पिकाच्‍या सर्व अवस्‍थेत पानाच्‍या शिरेजवळ किंवा पानाच्‍या देठात दिसून येते. भुईमूगाच्‍या पिकातून चालताना हे तुडतुडे उडतात. त्‍यामुळे त्‍यांचे वास्‍तव्‍य सहजासहजी दिसून येते.

ओळख : भुईमूगाच्‍या पानांतील रस खालील बाजूस बसून शोषण करतात. त्‍यामुळे पानावर पांढरट चट्टे दिसतात. ते तुडतुड्याचे प्राथमिक लक्षण होय. वेळीच उपाययोजना न केल्‍यास पानावर व्‍ही आकाराचा पिवळसर हिरव्‍या रंगाचे असतात.

3) फुलकिडे थ्रिप्स

भुईमूगाच्‍या फुलात व पानांच्‍या गुंडाळीत हे कीटक वास्‍तव्‍य करतात व पानाच्‍या मागील बाजूस अंडी घालतात. ही कीड पाने, फुले खरडून त्‍यातील रस शोषून घेतात.

ओळख : वेलींची पाने पिवळी पडून पानांच्‍या कडा वरच्‍या बाजूस मुरडतात. काही वेळा शेंडेमर या रोगाचा प्रादुर्भावसुद्धा यामुळे होऊ शकतो. आकाराने लहान असणारे हे फुलकिडे 1 ते 2 मि.मि. लांबीचे, पिवळसर तसेच काळपट रंगाचे असतात व दोन पंख असून, शरीराचा मागील भाग निमुळता होत गेलेला असतो. भुईमूगाच्‍या फुलांचे या किडींमुळे नुकसान होऊन त्‍याचा फळधारणेवर परिणाम दिसून येतो.

मावा, तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडीचे व्‍यवस्‍थापन करून प्रादुर्भाव ओळखण्‍यासाठी पिवळा चिकट सापळा लावावा, तर फुलकिडीसाठी निळा चिकट सापळा वापरावा व त्‍यानुसार सर्वेक्षण करून त्‍यावर उपाययोजना करावी. परभक्षी कीटक जसे लेडीबर्ड, भुंगेरे या कीटकांना संवर्धित करावे. त्‍याचबरोबर भुईमूगाचे  पीक तणविरहित ठेवावे. नियंत्रण पुढे दिल्‍याप्रमाणे करावे.

मावा, तुडतुडे व फुलकिडे यांचे एकात्मिक कीड नियंत्रण

  1. या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच. थायोमेटान 25 ईसी. 400 मि.लि. 500 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.
  2. धुरळणी करायची असल्‍यास मॅलॅथिऑन 5टक्के भुकटी 20 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टरी धुरळणी करावी.
  3. दुसरी धुरळणी पुन्‍हा 10 दिवसांनी केल्‍यास कीड आटोक्‍या येते.
  4. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी जैविक कीडनियंत्रण फोरोमेन कामगंध सापळ्यांचा वापर करूनही कीड नियंत्रणात आणता येते.

टीप : सदर लेखात दिलेले रासायनिक औषधे व प्रमाण हे तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन त्याचा पिकांसाठी वापर करावा. कारण शासनाने वेळोवेळी रासायनिक औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

4) पाने गुंडाळणारी /पोखरणारी अळी

भुईमूगाच्‍या झाडाची पाने ही अळी गुंडाळून त्‍याला पोखरून टाकते म्‍हणून तिला पाने गुंडाळणारी किंवा पोखरणारी अळी म्‍हणतात. खरीप हंगामात पाऊस पडून गेल्‍यावर उष्‍णता वाढते अशावेळी ही अळी आक्रमक होते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्‍यास पीक जळाल्‍यासारखे दिसते. परिणामी पिकाच्‍या उत्‍पादनात घट होते. रंग हिरवा असलेल्‍या या अळीचे डोके गर्द रंगाचे असते. तसेच या किडीचे पतंग रात्रीच्‍या वेळेस कोवळ्या पानावर अंडी घालतात. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी पिकांची फेरपालट करणे आवश्‍यक आहे. तसेच सोयाबीन पीक काढल्‍यावर भुईमूगाचे पीक घेतल्‍यास ही कीड जास्‍त प्रमाणात आढळून येते.

नियंत्रण : या किडींच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारे कार्बारिल 50 टक्के प्रवाही 14 मिली 10 लिटर पाण्‍यातून फवारावे. किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीच्‍या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही, 4 मि.लि. औषधांची 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

5) हुमणी

भुईमूगाच्‍या मुळावर उपजीविका करणारी हुमणी ही कीड आहे. या अळीचा रंग पांढरा असून, डोके करड्या रंगाचे असते. हुमणीचे शरीर इंग्रजी सी आकाराप्रमाणे बाकदार असते. हुमणीची मादी जमिनीत अंडी घालते व अंडी मोठी झाल्‍यावर पिकाच्‍या मुळावर उपजीविका करते. त्‍यामुळे झाडे वाळतात. महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी ही कीड आढळून येते. हुमणीचा प्रादुभार्व रोखण्‍यासाठी थायरम 2टक्के भुकटी हेक्‍टरी 65 किलो जमिनीत मिसळावी. कंपोष्‍ट खताचा वापर करण्‍यापूर्वी 1 गाडी चांगले कुजलेले शेणखत तसेच कीडग्रस्‍त शेताची नांगरट पीक काढल्‍यावर करून अळ्या हाताने वेचून नष्‍ट कराव्‍यात.

भुईमूगाचे एकात्मिक कीड नियंत्रण

  1. हेक्‍टरी भुईमूग झाडांची संख्‍या मर्यादित ठेवावी.
  2. शेतातील तणे व रोगग्रस्‍त झाडे काढून टाकावीत.
  3. पिकांची चांगली फेरपालट करावी व सेंद्रिय खताचा वापर अधिक करावा.
  4. विषाणूजन्‍य रोग टाळण्‍यासाठी भुईमूगात सोयाबीन, चवळी व घेवडा इ. पिके घेऊ नयेत.
  5. पिकांवर जास्‍त किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्‍यास रासायनिक, जैविक पद्धतीने नियंत्रण करावे.
  6. मुळांचे रोग टाळण्‍यासाठी जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  7. पूर्वीच्‍या पिकांचे अवशेष चांगल्‍या प्रकारे वेचून ते नष्‍ट करावीत.
  8. मावा, तुडतुडे व फुलकिडे या किडींच्‍या नियंत्रणात आणण्‍यासाठी बावीस्‍टीन + एम 45 या बुरशीनाशकाची फवारणी प्रभावी आहे.
  9. एकात्मिक किड नियंत्रणामध्‍ये कीडनाशके व बुरशीनाशके एकत्रित करून फवारणी केली असता कीड व रोगावर नियंत्रण मिळवता येते. 

ब. भुईमूग रोगांचे व्यवस्थापन

भुईमूगात आढळून येणारे रोग- अल्टर्निया लिफ, अँथ्रॅकोनोझ कॉलर रॉट किंवा क्राउन रॉट किंवा बीपासून नुकतेच तयार झालेले रोप ड्राय रूट रॉट किंवा ड्राय विल्ट फ्यूशेरियम, आफारूट रोग बड नेक्रोसिस किंवा बड रॉट किंवा बड ब्लाइट मिरपूड स्पॉट आणि लीफ ज्वलन रूट नॉटडेडस रूट्समेटोस्टस रूट रॉट किंवा स्क्लेरोटियम विल्ट टिक्का लीफ डाग इ. प्रमुख रोग आहेत.   

1) टिक्का रोग (पानावरील ठिपके)

टिक्का रोग पिकाच्या खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात हमखास येणारा रोग आहे. हा रोग सरकोस्पोरा स्पेसीज या बुरशीमुळे होतो. या रोगाची सुरुवात लवकर येणारे व उशिरा येणारे ठिपक्याच्या स्वरुपात आढळून येते. लवकर येणारे ठिपके तपकिरी रंगाचे अनियमित आकारांचे व सभोवताली सोनेरी वलय असणारे असतात तर उशिरा येणारे ठिपके हे गर्द काळे व वर्तुळकार असतात. सर्वसाधारणपणे हे ठिपके 3 ते 8 मि.मी. परिघाचे असतात. असे ठिपके आकाराने व संख्येने वाढून एकमेकांत मिसळतात व पानावर मोठे चट्टे पडून पान करपल्यासारखे होते. हवेतील भरपूर आर्द्रता व 25 ते 30 अंश सें.प्रे. तापमान या रोगाला पोषक असते. शेंगामुळे या रोगाचे बिजाणू हवेमार्फत इतरत्र पसरतात व रोग फैलावतात.

नियंत्रणControl : शेतातील रोगग्रस्त झाडांचा नायनाट करावा. गहू, हरभरा, मका, ज्वारी व कांदा इ. पिकांची फेरपालट करावी. आंतरपीक पद्धतीत तूर, मूग, उडीद, बाजरी व ज्वारी इ. पिके घ्यावीत. नत्र, स्फुरद, पालाश (15:35:15कि.ग्रॅ./हे.) अ 6.5 टन/हे. कंपोस्ट आणि मँकोझेबच्या चार फवारण्या प्रभावी ठरतात.  बियाणे बुरशीनाशकाची (बाविस्टीन) बीजप्रक्रिया करुन पेरावे. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा बियाण्यास चोळावा. कडुनिंब, सदाफुली व मेंदी यांसारख्या वनस्पतिजन्य अर्काच्या वापराने नियंत्रण होते. गिरनार-1, आय.सी.जी.व्ही.-86590, 87160, 325, टी.ए.जी. – 24 यासारख्या रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा.

2) तांबेरा

हा रोग टिक्का या रोगासोबतच आढळतो. पुकक्सिनिया अराचीडीस या बुरशीमुळे हा रोग होतो. पानांवर नारिंगी रंगाच्या ठिपक्यांमुळे हा रोग सहज ओळखता येतो. या नारिंगी रंगाच्या ठिपक्यांमधून तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. रोगाच्या प्रादुर्भाव तपकिरी रंगाच्या बारीक फोडाच्या स्वरुपात पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने सुकून गळून पडतात. शेंगातील दाण्यावरही परिणाम होऊन दाणे लहान व सुरकुतलेले होतात. हवेमधील आर्द्रता पानावरील ओलसरपणा व 20 अंश सें.ग्रे. तापमान या रोगाला अतिशय पोषक असते.

नियंत्रण: शेंगातील रोगग्रस्त झाडांचा नायनाट करावा. पिकामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हा रोग ट्रायकोडर्मा हरझियानम या बुरशीच्या फवारणीमुळे नियंत्रणात येतो. तसेच निम, सदाफुली व मेंदी या वनौषधींचा अर्क रोग नियंत्रणात मदत करतो. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच बाविस्टीन (0.1 टक्के) बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी. तीव्रतेनुसार वरील फवारण्या 8 दिवसाच्या अंतराने कराव्या.

3) मर रोग – फ्युजेरियम विल्ट

ह्रा रोगाची लागण रोजकुजव्या (ऍस्परजीलस नायजर), खोडकुजव्या (स्क्लेरोशियम रोल्फसाय) व मुळकुजव्या मायक्रोफोमीना फ्याजिओलिना या तिन्‍ही बुरशीमुळे जमिनीतून किंवा बियाद्वारे होते. या रोगामुळे साधारणत: 25 ते 30 टक्के नुकसान होते. महाराष्ट्रामध्ये स्क्लेरोशियम र्रोल्फसायमुळे होणाऱ्या खोडकुजव्या 26 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान करतो. या रोगाची लक्षणे दोन प्रकारे दिसून येतात. रोपटे जमिनीच्या वर येण्यापूर्वीच मरुन जाते व दुसरा प्रकार म्हणजे रोपटे जमिनीच्या वर आल्यानंतर त्याच्या वाढीच्या काळात मरुन जाते. झाडे मेल्यामुळे झाडांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. याचे बिजाणू मातीमध्ये सुप्तावस्थेत राहतात.

नियंत्रण : उन्हाळ्यात जमिनीची नांगरट खोल करावी व जमीन चांगली तापू द्यावी.  जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट, निंबोळी पेंड टाकावे. तसेच ट्रायकोडर्मा बुरशी व सुडोमोनास या जिवाणूंचा बियाण्यांना चोळण्यासाठी वापर करावा. तुळस, अशोक, घायपात, कडुनिंब या वनस्पतींच्या पानांच्या रसाची फवारणी करावी. तसेच शेतामध्ये एरंड पेंड (500 कि.ग्रॅ./हे.) ट्रायकोडर्मा बुरशी (62 कि.ग्रॅ/ हे.) मिसळली असता रोगाचे नियंत्रण होते. पेरण्यापूर्वी 2.5 ग्रॅम बाविस्टीन किंवा 4 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति 1 किलो बियास चोळावे. पिकाची फेरपालट करावी.

4) शेंडेमर

हा रोग विषाणूजन्य आहे. हा रोग टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूमुळे होत असून रोगाचा फैलाव थ्रिप्स या फुलकिड्याद्वारे होतो. यामध्ये सुरुवातीला कोवळ्या पानावर पिवळसर किंवा पांढऱ्या कंकणाकृती कड्या दिसून येतात. नंतर हा रोग वेलाच्या शेड्यावर किंवा फुलावर दिसून येतो. कळी कोमेजून वाळून जाते. अशा वेलाची वाढ खुंटते, झाडाच्या फांद्याची संख्या वाढते व मुख्य शेंडे मर होते.

नियंत्रण : भुईमुगामध्ये बाजरीचे पीक घेतल्यास नेक्रोसिस कमी होते. आय.सी.जी.एस.-11, 44, 37, 86325, कादिरी-3, चंद्रा, टी.एम.व्ही-2 आणि रॉबट-33 या रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. प्रभावी कीटकनाशकाचा वापर करुन फुलकिडीचा बंदोबस्त करावा.

तक्‍ता क्र. 3 : भुईमूग पिकांचे प्रमुख रोग नियंत्रणासाठी रासायनिक उपाय  

अ. क्र.रोगऔषधाचे नाव आणि कार्यक्षम घटकाची तीव्रतालागणारे औषध + पाणी (प्रति हेक्‍टरी)
1टिक्‍का300 पोताची गंधकाची भुकटी20 किलो /हेक्‍टर
80 टक्‍के पाण्‍यात मिसळणारे गंधक2 किलो + 500 लि. पाणी
बावीस्‍टीन पा.मि.500 ग्रॅम + 500 लि. पाणी
तांबेराडायथेन एम-45 (मॅन्‍कोझेब) 75 टक्‍के1 किलो + 500 लि. पाणी
ट्रायडोमार्फ (कॅल्क्झिीन 75 ई.सी.)350 मि.ली. + 500 लि. पाणी

स्‍त्रोत– पीकरोगशास्‍त्रः रोगांची ओळख व व्‍यवस्‍थापन, पृ. 139-140

टीप : सदर लेखात दिलेले रासायनिक औषधे व प्रमाण हे तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन त्याचा पिकांसाठी वापर करावा. कारण शासनाने वेळोवेळी रासायनिक औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

काढण

भुईमूग शेंगा पक्व होताना शेंगावरील शिरा स्पष्ट दिसतात. टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा सताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस चांगल्या वाळवाव्यात. भुईमूग पिकाची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली म्हणजे पीक तयार झाले असे समजावे. शेंगांचे टरफल टणक होते तसेच शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. त्यावेळी भुईमूगाची काढणी करावी. शेंगांना असणारी माती स्वच्छ करावी. भुईमूग शेंगा व्यवस्थित वाळवून पोते भरून ठेवावेत.

उत्पादन

खरीप हंगामातील भुईमुगाचे उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी 12 ते 14 क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी 15 ते 18 क्विंटल उत्पादन मिळते. शिवाय भुईमूग ढाळ्यांचा हिरवा अथवा वाळवून पौष्टिक चारा साधारणत: 2 ते 3 टन पर्यंत मिळतो. खरीप भुईमुगाची सुधारित तंत्राने लागवड केल्यास सरासरी खरीप भुईमूग 25 ते 27 प्रति क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन मिळते. परंतु भुईमूगाचे दर्जेदार उत्पादन सुधारित वाण, लागवड पद्धती आणि  व्यवस्थापन यावर अवलंबून असते.

प्रस्तुत खरीप भुईमूग लागवड तंत्र या लेखाच्या माध्यमातून सखोल व अद्यावत माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. सदर तंत्राचा उपयोग करून भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी भुईमूगाचे दर्जेदार उत्पादन घ्यावे, प्रति हेक्टरी उत्पादकता वाढावी त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळून देशाला तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी हातभार लावावयाचा आहे.

संदर्भ 

  1. सोनकवडे रोहिणी भीमराव (2018) : भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  2. श्री. रवींद्र काटोले (2014) : भुईमूग लागवड, प्रक्रिया उद्योग,गोडवा कृषी प्रकाशन, पुणे
  3. डॉ. साबळे रामचंद्र (2000) : भुईमूग लागवड, कॉन्टिनेन्‍टल प्रकाशन, पुणे
  4. कौसीडकर हरीहर (2018) : सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये : नियोजन व व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
  5. झगडे श्रीकृष्ण नामदेव (2015) : पीकरोगशास्त्र : रोगांची ओळख व व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

खरीप भुईमूग लागवड तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

1 thought on “खरीप भुईमूग लागवड तंत्र”

  1. खाण्या साठी पांढरा भुईमूग चे वाण कोणते?. दाणे चवदार, टपोरे व किमान एका शेंगेत कमीत कमी ४ते ५ असावेत

    Reply

Leave a Reply