हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान

हळद हे महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. हळदीचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात सतत होत असतो. हळदीपासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. त्यामुळे हळद पिकाला दुहेरी महत्त्व प्राप्त झालेले आहे.
शेतकऱ्यांना इतर हंगामी पिकाच्या तुलनेत हळद हे पीक चांगले फायदेशीर उत्पाद देणारे आहे. याकरिता हळद लागवडीचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन  देशाच्या आर्थिक उत्पन्नात आपला हातभार अगत्याचे आहे.
याच उद्देशाने हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान हा लेख महाराष्ट्रातील हळद उत्पादन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार असल्यामुळे तयार करण्यात येत असून याद्वारे त्यांना कृषि विद्यापीठाने विकसित केलेली हळद उत्पादनाची शास्त्रोक्त पद्धत, बियाणे, हंगाम, पेरणी, खते, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व साठवण याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. या माहितीचा अवलंब करून हळद  लागवड केल्यास निश्चितपणे उत्पादनात वाढ होईल.      
प्रस्तुत लेखाच्या आधारे शेतकरी बांधवांना हळद या पिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करता येईल, हळदीचे व्यापारी व पौराणिक महत्त्व, उत्पादन, जमीन, हवामान, बियाणे प्रमाण, लागवड पद्धत, आंतरमशागत, आंतरपिके, खते, पाणी व्यवस्थापन, किडी व रोगांचे नियंत्रण, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, उत्पादन, साठवण, हाताळणी व प्रक्रिया आदी घटकांसंबंधी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.  
हळदीचे महत्त्व
भारतीय आहारात हळदीचा उपयोग विविध प्रकारे होतो. हळदीचा भाजीमध्ये, तिखटामध्ये आणि मसाल्याच्या पावडरमध्ये उपयोग होतो. हिंदूंच्या धार्मिक कार्यात, सौंदर्य प्रसाधनासाठी तसेच लग्नसमारंभात हळदीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीचा उपयोग औषधासाठीदेखील होतो. हळद कांतिवर्धक आहे. हळदपूड व चण्याचे पीठ एकत्र लावल्यास कांती तजेलदार होते. हळदीपासून कुंकू तयार करतात. खोकल्यावर, छाती दुखल्यास, सर्पदंशांवर, विंचू चावल्यास, मूळव्याध, मूर्छा येणे, कफ रोगावर, मुतखड्यावर हळद औषधी म्हणून वापरली जाते. हळदीमध्ये जीवनसत्त्व असते. हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे. त्याशिवाय दुखावलेल्या भागास हळद उगाळून लावल्यास वेदना कमी करता येतात. स्वयंपाकात वापरलेल्या हळदीमुळे अन्नद्रव्यातील पाचक द्रव्ये सुटी होतात व अन्न लवकर पचते. भाजीला आकर्षक रंग येतो व स्वाद मिळतो.
हळद लागवडीसाठी वाव 
हळद हे मसाला वर्गातील प्रमुख नगदी पीक असून भारतात फार पूर्वीपासून हळद पिकविली जाते. हळदीला पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे. महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, चंद्रपूर, इत्यादी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली जाते. हळदीची लागवड इतर जिल्ह्यांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणांत केली जाते. आता नाशिक, नगर, पुणे, इत्यादी जिल्ह्यांमध्ये हळदीच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. उपरोक्त हळद उत्पादन तक्त्यानुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी बराच वाव आहे.
भारतात हळदीचे पीक तेलंगणना, महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळा, ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश, मिझोरम, पश्चिम बंगाल, मेझालय, नागालँड आदी राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात हळदीची प्रामुख्याने लागवड होते. इतर भागातदेखील हळदीचे उत्पन्न घेता येते.
दर्जेदार हळद उत्पादनासाठी शास्त्रोक्त बाबी
 1. कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या हळदीच्या सुधारित वाणाची निवड करावी.
 2. लागवडीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक व जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
 3. हळदीची लागवड सरी वरंबा पद्धतीनेच करावी.
 4.  पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
 5. हळद पिकातील आंतरमशागतीचे कामे तसेच तणनियंत्रण प्रभावीपणे करावे.
 6. हळदीसाठी योग्य खतांची मात्र देऊन पाण्याचे व्यवस्थापन चांगले करावे.
 7. द्रवरूप व नत्रयुक्त खते ठिबक सिंचन फर्टिगेशनद्वारे देण्यात यावेत.
 8. हळद पिकांवरील एकात्मिक कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण करावे.
 9.  लागवडीसाठी सुधारित मार्गाचा अवलंब करावा.   
 10. हळद काढणी, साठवणूक, प्रतवारी व प्रक्रिया योग्य पद्धतीने करावी. 
 
 
हवामान
हळद पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. तापमान 20 ते 250 अंश सेल्सिअस अनुकूल असून हळद पिकासाठी सरासरी 700 ते 1100 मिलीमीटर पाऊस चांगला मानवतो. पीक वाढीच्या काळात 30 अंश सेल्सिअस व समशितोष्ण हवामान मानवते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जास्त थंड हवामान असल्यास गड्डा चांगला पोसतो. एप्रिल ते मे महिन्यातील 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान हळदीच्या उगवणीसाठी अनुकूल असते, तर पीकाच्या वाढीसाठी गरम व दमट हवामान अनुकूल असते. हवामानातील गारपीट व धुके यांचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.   
जमीन
या पिकास मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. नदीकाठी पोयट्याच्या जमिनीत हळदीचे पीक चांगले येते. काळ्या, चिकण माती व क्षारयुक्त चुनखडीच्या जमिनी हळदीच्या लागवडीस योग्य नाहीत. हळदीसाठी जमिनीचा सामू 6 ते 8 (आम्ल विम्ल निर्देशांक) दरम्यान असावा लागतो. हळद लागवडीसाठी निवडलेली जमीन चांगली भुसभुशीत  व सेंद्रिय खतांचे मुबलक प्रमाण असणारी असावी.
हळदीचे सुधारित वाण 
हळदीचे दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असल्यास लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड करणे गरजेचे असते. याशिवाय हळदीच्या वाणाची गुणवैशिष्टये, उत्पादन, कीड व रोगास प्रतिकारक्षम असणाऱ्या जातींची निवड करावी. अशा निवडक जातींची माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.   
फुले स्वरूप 
फुले स्वरूप जात ही मध्यम उंच वाढणारी असून लागवडीसाठी योग्य वाण आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या 6 ते 7 असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा 8.5 महिन्याचा असून फुटव्यांची संख्या 2 ते 3 प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे 50 ते 55 ग्रॅम असतात. हळकुंडे 35 ते 40 ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात 7 ते 8 हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी 7 ते 8 सें.मी. असते. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन 358 क्विंटल प्रती हेक्टर असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन सरासरी 78  क्विंटल प्रती हेक्टर इतके आहे.  
कृष्णा 
कृष्णा हा अधिक उत्पादन देणारा  वाण असून हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि.सांगली येथून विकसित केलेला आहे. या वाणाच्या ओल्या हळदीचे हेक्टरी सरासरी 450 क्विंटल उत्पादन आणि वाळलेल्या हळदीचे सरासरी 75 क्विंटल एवढे उत्पन्न मिळते.
राजापुरी 
प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात हा वाण प्रचलित असून कोकणात या वाणाच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. याच्या प्रत्येक झाडाला 10-18 पाने येतात, पाने रुंद, फिकट हिरवी आणि सपाट असतात. 15-20 हळकुंडे येतात, फुले क्वचित येतात. हळकुंडे जाड, आखूड, ठसठशीत असून गाभ्याचा रंग गर्द पिवळा आहे. उतारा 16-18 टक्के मिळतो. या वाणाच्या हळदीला गुजरात व राजस्थानमधून अधिक मागणी असून वाळलेल्या हळदीचे हेक्टरी सरासरी 56 क्विंटल उत्पादन मिळते.
अलेप्पी 
अलेप्पी ही  केरळ राज्यातील महत्त्वाची जात असून या हळदीच्या गाभ्याचा रंग पिवळा असतो. वाळलेल्या हळदीचे प्रमाण 19-20 टक्के मिळते. वाळलेल्या हळदीचे उत्पन्न हेक्टरी सरासरी 50 क्विंटल एवढे मिळते.
वायगांव 
विदर्भातील वर्धा, चंद्रपूर भागात प्रचलित हा वाण 8-10 महिन्यांत तयार होतो. प्रत्येक झाडाला 8 – 10 पाने येतात. फुले येण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत असून, पाने गर्द हिरवी, चकाकणारी, गाभ्याचा रंग गर्द पिवळा, उठावदार, विशिष्ट सुंगध, वाळलेल्या हळदीचे उत्पन्न हेक्टरी सरासरी 50 क्विंटल असून गाठी रताळ्यासारख्या जाड, गोल व लांबट असतात.
लागवड हंगाम 
हळदीची लागवड अक्षयतृतीयेपासून म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळदीच्या लागणीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते. मे-जूनमध्ये लागवड केलेल्या हळदीचा कालावधी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत जातो. त्यामुळे दुसरे भाजीपाला पीक घेता येते.
पूर्व मशागत 
हळद हे जमिनीत दीर्घकाळ वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी जमीन उभी-आडवी 2-3 वेळा खोल नांगरून घ्यावी पहिली नांगरणी मार्चमध्ये करावी. जमीन 15-20 दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळे फोडून 25 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. एक दोन कुळवाच्या पाळ्या देऊन इतर पिकांचे अवशेष व धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
हळद लागवडीच्या पद्धती 
हळद लागवडीच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत, (1) सरी-वरंबा (2) रुंद वरंबा ह्या आहेत.
1) सरी-वरंबा  : या पद्धतीने हळद लागवड करण्यासाठी 75 सेंमी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूस दोन गड्यांमध्ये 30 सेंमी. अंतर ठेवून लागवड करावी.
2) रुंद वरंबा  : या पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास 1.5 मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. म्हणजे दोन सऱ्यांच्या मध्ये 90 सेंमी. ते 1 मीटरचा गादीवाफा तयार होतो. या गादीवाफ्यावर अगर रुंद वरंब्यावर दोन ओळींतील आणि दोन झाडांतील अंतर 30 सेंमी. ठेवून लागवड केली जाते. मात्र या पद्धतीत जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाफ्यांना सोडलेले पाणी व्यवस्थित देता येते. आणि उत्पादन चांगले येण्यास मदत होते.
हळद बेण्याची निवड
हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात योग्य ती काळजी घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा आंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. प्रत्येक जेठा गड्यावर आठ ते दहा कोंब असतात. लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे जून किंवा डोळे फुटलेले, 40 ग्रॅम वजनाचे, मुळ्या विरहित असावे. नासके, कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत.
बियाणे प्रमाण 
हळद लागवडीसाठी हेक्टरी साधारणपणे 25 ते 27 क्विंटल बियाणे पुरेशे आहे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे त्यात कमी जास्त करता येते.  
बीजप्रक्रिया 
हळद बियाची उगवण चांगली होण्यासाठी तसेच दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असल्यास खालील दोन्ही बुरशीनाशक व जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण चांगली होऊन पीक उत्पादन वाढ होते.
) बुरशीनाशक 
हळद लागवडीपूर्व किडींचा आणि बुरशीजन्य रोगजंतूंचा नाश करण्याचे दृष्टीने बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी 20 ग्रॅम बाविस्टीन 10 लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बियाणे कमीत कमी 15 ते 20 मिनिटे बुडवून घेऊन सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावे.
) ॲझोटोबॅक्टर 
हळद बियाला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर 50 लिटर पाण्यात अझॅटोबॅक्टर जीवाणूखत 2 किलो + पीएसबी जीवाणूखत 2 किलो + ताजे शेण 5 किलो किंवा दूध 1 लिटर एकत्र द्रावण तयार करून यामध्ये बेणे 15 ते 20 मिनिटे बुडवून नंतरच बेणे लागवड करावी.
हळदीची लागवड
हळदीची लागवड दोन प्रकारे केली जाते. रानबांधणी केल्यानंतर प्रथम मोकळ्या रानास पाणी देऊन वाफसा आल्यानंतर लहान कुदळीने अगर खुरपीने माती उकलून गड्डे लागण करावी. यामुळे बियाणे योग्य अंतरावर व खोलीवर लावले जाते.
दुसऱ्या पद्धतीने लागवड करताना रानबांधणी केल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडले जाते. पाण्याबरोबर सरीच्या दोन्ही बाजूला गड्डे लावतात. या पद्धतीला गड्डे मातीत खोल जाण्याची आणि दोन गड्यांतील अंतर सारखे न राहण्याची शक्यता असते. त्यामध्ये बियाणे जास्त लागणे, गॅप पडणे, उगवण न होऊन गड्डे कुजणे, इत्यादी संभाव्य धोके येतात.
खत व्यवस्थापन
हळद पिकास सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा. जमिनीच्या प्रकारानुसार हेक्टरी 25 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत पूर्व मशागतीच्या वेळी देऊन मातीत चांगले मिसळावे. याशिवाय 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावे आणि नत्रखताची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यांत विभागून लागवडीपासून दीड, तीन व साडे चार महिन्यांनी द्यावी.  
पाणी व्यवस्थापन 
हळद पिकाला सर्वसामान्य 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. पीक 9 महिन्याचे झाले म्हणजे किंवा पीक काढणीस येते त्या वेळेस झाडाची पाने खालून पिवळी पडून सुकत असताना संपूर्ण रोप दांड्यासह जमिनीवर लोळले की पाणी देणे बंद करावे. पीक काढणी अगोदर एक महिना पाणी देणे बंद केलेले असावे. ज्यांना या काळात उत्पादन पाहिजे असेल त्यांनी काढून घ्यावे. ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी हळद मार्च – एप्रिल मध्ये काढली तरी नुकसान होत नाही.
आंतरमशागत
हळदीचे शेत नेहमी तणविरहित ठेवावे. परंतु यामध्ये रानाची फार तुडवण होणार नाही याची दक्षता घ्यावी; कारण हळदीचे कंद जमिनीत पोसतात. जमीन घट्ट झाल्यास हळदीच्या कंदाच्या वाढीस अडथळा होतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार 4 – 5 खुरपण्या कराव्यात. हळद 5 – 6 पानांवर आल्यानंतर म्हणजे ऑगस्टमध्ये सरीतील माती उकरून वरंब्यावर लावावी. त्यामुळे उघडे पडलेले गड्डे झाकले जातात.
आंतरपिके
हळद रोपांची वाढ 30 ते 120 सेंमी. अंतरावर सर्वसाधारणपणे होत असल्याने रिकाम्या भागामध्ये भुईमूग, घेवडा, तूर, चवळी, काकडी, भेंडी, सदाफुली, केळी, मिरची, कोथिंबीर, गवार, आले, वांगी, मुळा, मका, टोमॅटो, एरंडी व इतर भाजीपाला पिके घेता येतात.  
महत्त्वाच्या किडी व रोगांचे नियंत्रण 
कंद माशी – कंदमाशीच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डॅझिम मिसळून 15 ते 20 मिनिटे बुडवावे. जमिनीमध्ये थीमेट 10 जी प्रति हेक्टरी 20 किलो याप्रमाणे तीन वेळा ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात हळद कंदालगत मातीत मिसळून दिले असता या किडीचा बंदोबस्त होतो.
रोग 
गड्डा कुजणे किंवा मूळकुजव्या
कंद कुजणे हा रोग बियाणे योग्य न वापरल्यामुळे आणि चांगला निचरा नसलेल्या ठिकाणी दिसून येतो. त्यासाठी योग्य निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीमध्ये थायरम 25 ग्रॅम 10 लीटर पाण्यात विरघळून टाकावे.
पानावरील ठिपके व करपा
पानावरील ठिपके, करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम – 45 या औषधाची 25 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी दर 15 दिवसांच्या अंतराने थंडीच्या कालावधीत करावी.
काढणी 
हळदीचे पीक 8-9 महिन्यांत तयार होते. गड्डे पक्व झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात. आणि जमिनीवर लोळतात. काढणी अगोदर जमिनीच्या मगदुरानुसार 15 दिवस ते 1 महिना पिकास पाणी देणे बंद करावे. वाळलेला पाला जमिनीलगत विळ्याने कापून घ्यावा. हळदीची काढणी योग्य ओलावा असल्याचे पाहून कंद कुदळीने खणून काढावेत. काढणीच्या वेळी गड्डयांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कंद व हळकुंडे वेगवेगळी वेचणी करून गोळा करावीत. बियाण्यासाठी गड्डे योग्य ठिकाणी साठवावेत. काढणीनंतर हळद शिजवावी लागते.
उत्पादन 
एका हेक्टरपासून 300 ते 350 क्विंटल ओली हळद आणि 25 ते 30 क्विंटल गड्डे मिळतात. जातिपरत्वे उत्पादनदेखील जास्त मिळते.
अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान याचा अवलंब करून हळदीचे उत्पादन घेतल्यास नक्कीच अधिक फायदा मिळतो. यासंबंधी संपूर्ण अद्यावत व सखोल माहिती प्रस्तुत लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला असून या माहिती आधारे हळदीचे दर्जेदार उत्पादन घ्यावे आणि आपले आर्थिक उत्पन्नात वाढवावे असा या लेखाचा उद्देश आहे. 
संदर्भ 
 1. हळद उत्पादन तंत्रज्ञान : भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग एक, पाठ्यपुस्तिका – 2,य.च.म.मु.वि., नाशिक
 2. कृषी जागरण कृषी क्षेत्रातील अग्रेसर मासिक, हळद लागवड तंत्रज्ञान, 12 जुलै 2018
शब्दांकन :किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन :
 
हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान सदर लेख आपणास आवडला असल्यास आपल्यासारख्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे.
 * Please like, share & comments *
 

 

Prajwal Digital

1 thought on “हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान”

Leave a Reply