सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळी खते फायदेशीर

सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळी खते फायदेशीर आहे. पृथ्वीतलावर जमीन ही निसर्गाने दिलेली बहुमूल्य देणगी असून मानवाने आपल्या हव्यासापोटी नैसर्गिक तत्त्वाच्या विरोधात जाऊन, अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करून जमिनीचे नैसर्गिक सुपीकता आणि स्वास्थ्य कमी केले आहे.
परिणामी अशा जमिनी कालांतराने नापीक होऊन उत्पादनक्षम राहत नाहीत. त्यामुळे अशा समस्येवर शेतकरी बांधवांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, हिरवळीच्या खतांचे महत्त्व समजून घेता यावे आणि उद्भवलेल्या समस्येचे निराकारण करून जमिनीचे स्वास्थ्य व आरोग्य दीर्घकाळापर्यंत सुपीक व अबाधित ठेवण्यासाठी हिवळींच्या खतांचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे व फायदेशीर झाले आहे.  
प्रस्तुत लेखामध्ये हिरवळीचे खत म्हणजे काय, हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी कसे गरज व उपयुक्त आहे याबाब माहिती देऊन हिरवळीच्या खतांचे प्रकार, हिरवळीच्या खतांचे पिके, लागवड पद्धत, जमिनीसाठी वापर व हिरवळी खताचे फायदे आदी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी हिरवळीचे खते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी फायदेशीरया लेखात करण्यात येत आहे. 
हिरवळीचे खत म्हणजे काय?
हिवळीचे खत म्‍हणजे शेतात वाढलेल्‍या हिरव्‍या वनस्‍पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळया फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्‍ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आल्‍यावर शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे. या वनस्‍पतींच्‍या हिरव्‍या आणि कोवळया पाल्यापासून तयार करण्यात आलेल्‍या खताला हिरवळीचे खत असे संबोधतात.
जमिनीची सुपीकता दीर्घ काळापर्यंत टिकवण्‍यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्‍याची उपलब्‍धता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज पूर्ण करण्यासाठी हिरवळीची खते शेतीसाठी आणि शेतकऱ्यांना उपयुक्त व फायदेशीर आहेत. ही पिके जमिनीत अन्‍न पुरवठ्याबरोबरच जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म सुधारण्‍यास मदत करतात. नत्राचे प्रमाण : 0.03%  ते 2.4% गाडलेल्‍या पिकांना कुजण्‍यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. 
हिरवळी खतांसाठी उपयुक्त पिके
(1) ताग (2), धैंचा, (3) घेवडा, (4) सेंजी, (5) शेवरी, (6) बरसीम, (7) गिरिपुष्‍प (ग्लिरिसिडिया), (8) मूग, (9) चवळी, (10) गवार.
हिरवळीच्‍या खतांचे प्रकार
हिरवळीच्‍या खतांचे लागवडीनुसार प्रमुख शेतात लागवड करून घेण्‍यात येणारी हिरवळीची खते आणि हिरव्‍या कोवळया पानांचे हिरवळीचे खत असे दोन प्रकार आहेत. हिरवळीच्‍या खतांबाबत सविस्तर माहिती खालील देण्यात येत आहे.
1) शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :
हिरवळीची खतांचे पीक शेतात सलग, मिश्र किंवा एखाद्या पिकांमध्‍ये आंतरपीक म्‍हणून घेतात व त्‍याच शेतात ते पीक फुलोऱ्यावर येण्‍यापूर्वी शेतात नांगरून मिसळतात, तेव्‍हा त्‍याला शेतातच घेण्‍यात येणारे हिरवळीचे खत असे म्‍हणतात.
प्रकारच्‍या हिरवळीच्‍या खतामध्‍ये ताग,गवार, चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लुसर्न घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो.
2) हिरव्‍या कोवळया पानांचे हिरवळीचे खत :
पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्‍पतींची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्‍या बांधावर हिरवळीच्‍या झाडांची लागवड करून त्‍याचा पाला आणि कोवळया फांद्याशेतात पसरूवून नांगरणीच्‍या अथवा चिखलणीच्‍या वेळी मातीत मिसळणे होय.
हिरवळीच्‍या खतासाठी गिरिपुष्‍प, शेवरी, करंज, सुबाभूळ, कर्णिया, ऐन, किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढवून त्‍यांच्‍या हिरव्‍या पानांचा व कोवळया फांद्याचा वापर करतात.
हिरवळीचे खत तयार करण्‍याची पद्धत
निरनिराळया हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्‍याच्‍या वेळी हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. ही पिके 6 ते 8 आठवड्यांत फुलोऱ्यावर येतात. ही  पिके ज्‍या शेतात घेतली असतील, त्‍याचे खत तयार करावे. या हिरवळीच्‍या पिकांची पाने बाहेरून आणल्‍यास ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत. ट्रायकोर्डमाचा उपयोग केल्‍यास या खताची प्रत वाढवता येईल.
नुकत्‍याच फुलोऱ्यात आलेल्‍या हिरवळीच्‍या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेऊन नांगराच्‍या प्रतयेक सरीमध्‍ये उपलब्‍ध प्रमाणात टाकावे. नंतर नांगराच्‍या दुसऱ्या तासाच्‍या वेळी अन्‍यथा धानाच्‍या चिखलणीच्‍या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्‍यावी. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्‍यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्‍यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्‍याची क्रिया वेगाने सुरू होते.
हिरवळीचे पीक कुजण्‍यासाठी जमिनीमध्‍ये पुरेसा ओलावा असावा लागतो, म्‍हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्‍या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्‍या सुरूवातीस करून ऑगस्‍टमध्‍ये गाडणी करावी. हिरवळीचे पीक गाडण्‍याच्‍या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे. त्‍यामुळे कुजण्‍याची प्रक्रिया जलद होईल.
शेतातील उपलब्‍ध काडीकचरा व गवत यांचे ढीग शेतात जागोजागी करून कुजण्‍यास ठेवावेत व योग्‍य वेळी जमिनीत गाडावेत. कुजण्‍याची प्रक्रिया लवकर होण्‍यास 3.5 फूट x 3.5 फूट खड्डयात गवत व काडीकचरा कुजवता येईल.
कपाशीच्‍या रांगांमध्‍ये तृणधान्‍य, शेंगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन या पिकांच्‍या कापणीनंतर कपाशीच्‍या रांगांमध्‍ये जमिनीत पुरावे. उत्तम हिरवळ खत म्‍हणून कपाशीवर याचा परिणाम दिसून येतो. सोयाबीन, तूर व ज्‍वारीसोबत पेरून, सोयाबीन हिरवळ खत म्‍हणून वापरता येईल; त्‍यामुळे ज्‍वारी व तूर यांच्‍या उत्‍पादनात वाढ होईल.
हिरवळी खतांच्‍या पिकांची लागवड
1) ताग (बीरू, सलम):
ताग हे हिरवळीचे उत्तम खत आहे. ज्‍या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्‍या पाण्‍याची हमी असते, तेथे तागाचे पीक घ्‍यावे. सर्व प्रकारच्‍या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होत असली तरी आम्‍लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही. पावसाळयात सुरूवातीस तागाचे बी हेक्‍टरी 50 ते 60 किलो पेरावे. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यावर येण्‍याच्‍या सुमारास 60 ते 70 सेंमी उंच वाढली असताना नांगराच्‍या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावे. तागामध्‍ये नत्राचे प्रमाण 0.46 टक्‍के असून या पिकापासून हेक्‍टरी 80 ते 90 किलो नत्र मिळते.
2) धैंचा :
तागापेक्षा काटक असे हे हिरवळीचे पीक असून कमी पाऊसमान, पाणथळ ठिकाणी, क्षारमय अथवा आम्‍लधर्मीय जमिनीतसुद्धा तग धरू शकते. या वनस्‍पतीच्‍या मुळांवर तसेच खोडांवरही गाठी दिसून येतात. या गाठीमध्‍ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्‍या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
या पिकांच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे पावसाळयाच्‍या सुरूवातीस शेतात पेरावे. बियाण्‍याची उगवण लवकर होण्‍यासाठी त्‍यावर गंधकाची प्रक्रिया करून परत थंड पाण्‍याने धुवावे आणि त्‍यानंतर रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्‍यास करावी.
पिकाच्‍या वाढीसाठी आवश्‍यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक 6 ते 7 आठवड्यांत 90 ते 100 सेंमी उंचीपर्यंत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे. या काळात धैंचापासून 10 ते 20 टनापर्यंत हिरव्‍या सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते. या वनस्‍पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 टक्‍के इतके आहे.  
3) घेवडा :
हे पीक कमी पाऊस व हलक्‍या प्रतीच्‍या जमिनीत उत्तम वाढते. पाणथळ जमिनीत हे पीक योग्‍य नाही. पावसाळयाच्‍या सुरूवातीला प्रति हेक्‍टरी सरासरी 50 किलो बियाणे पेरावे. नंतर ऑगस्‍टच्‍या दुसऱ्या आठवड्यात ते घेवडा पीक जमिनीत चांगले गाडावे.
4) सेंजी :
सेंजी हे रब्‍बी हंगामासाठी हे उपयुक्‍त हिरवळीचे खत आहे. सिंचनाची सोय असलेल्‍या ठिकाणी हेक्‍टरी 30 ते 40 किलो बियाण्‍याचा वापर करून पेरणी करावी. जानेवारीच्‍या अखेरीस जमिनीत गाडण्‍यास ते योग्‍य होते. उसाच्‍या पिकास ते योग्‍य हिरवळीचे खत आहे.
5) गिरिपुष्‍प (ग्लिरिसिडिया) :
झुडूप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्‍याही प्रकारच्‍या जमिनीत तसेच निरनिराळया पाऊसाच्‍या प्रदेशात चांगले येते. या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात. पहिल्‍या पद्धतीत छाट कलमे निवडून पावसाळयाच्‍या सुरूवातीस 30 x 30 x 30 सेंमी आकाराचा खड्डा करून बांधावर अथवा पडीक जमिनीत लागवड करावी. दुसऱ्या पद्धतीत गादी वाफे तयार करून अथवा प्‍लास्टिकच्‍या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावीत. ही रोपे 5 आठवड्यांची झाल्‍यावर पावसाच्‍या सुरूवातीस शेताच्‍या बांधावर खड्डे खोदून लावावीत. पहिल्‍या वर्षी उन्‍हाळयात रोपांना पाणी देणे आवश्‍यक असून दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्‍येक छाटणीला 25 ते 30 किलो हिरवा चारा मिळू शकतो. या झाडाच्‍या फांद्याची वरचेवर छाटणी करूनही या झाडांना नवीन पालवी फुटते आणि त्‍यांच्‍या हिरव्‍या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते. गिरिपुष्‍पाची पाने धैंचा, मेंड, वन झाडांचा पालापाचोळा यापेक्षा जमिनीत जलदगतीने कुजतात.
या पानांमध्‍ये अन्‍नद्रव्‍यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते : सेंद्रिय कर्ब 36 टक्‍के, नत्र 2.70 टक्‍के, स्‍फुरद 0.5 टक्‍के व पालाश 1.15 टक्‍के. म्‍हणून नत्रयुक्‍त खतांच्‍या खर्चात बचत करण्‍यात गिरिपुष्‍प हिरवळीच्‍या खतांचा मोठा सहभाग आहे.
6) द्विदल कडधान्‍याची पिके :
पावसाळयाच्‍या सुरूवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरले असता, या द्विदलवर्गीय पिकांचा हिरवळीच्‍या खतासाठी चांगला उपयोग होतो. जमिनीची पूर्व मशागत केल्‍यावर मूग, उडीद, कुळीथ यासाठी 25 ते 30 किलो ग्रॅम प्रति हेक्‍टरी बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्‍यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करून आवश्‍यकतेनुसार पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात. पीक फुलोऱ्यावर येण्‍यापूर्वी नांगरणी करून जमिनीत चांगले गाडले असता यापासून प्रति हेक्‍टरी 50 ते 60 किग्रॅ नत्र पिकास उपलब्‍ध होते.
हिरवळीच्या खतामुळे होणारे फायदे
जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकविण्यासाठी हिरवळीचे खते वरदानच असून जमिनीची जडणघडण क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी किंवा पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी हिरवळीचे खते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी फायदेशीर असून हिरवळीच्या खतांमुळे कोणकोणते फायदे जमिनीला होतात याची माहिती खालील प्रमाणे आहे :
 1. ही खत सरासरी प्रति हेक्‍टरी 50.175 किलो नत्राचे योगदान देते.
 2. जमिनीत फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवते.
 3. मातीची पाणी व अन्‍नद्रव्‍ये धरून ठेवण्‍याची क्षमता वाढवते.
 4. मातीत फायदेशीर सूक्ष्‍म जीवाणूंच्‍या निर्मितीचे प्रमाण वाढवते.
 5. मातीच्‍या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात धारण होते.
 6. शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले 1 टन हिरवळीचे खत 2.8 ते 3.0 टन शेणखताच्‍या बरोबर असते.
 7. या खतांच्‍या आच्‍छादनाने जमिनीची धूप होत नाही.
 8. या खतांचा वापर वारंवार केल्यामुळे जमिनीचे स्वास्थ्य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवता येते.
 9. पीक उत्पादन चांगल्या प्रकारे वाढ होते.
अशाप्रकारे आपण हिरवळीचे खत म्हणजे काय, जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी हिरवळीचे खतांचे महत्त्व, खतांचे प्रकार, हिरवळीच्या खतांचे पिके, लागवड पद्धती व फायदे याबाबत सविस्तर अभ्यास सदर लेखात केला असून हिरवळीच्या खतांची उपयुक्ता व गरज लक्षात घेता पिकांचा उपयोग शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करावयाचा आहे. कारण जमिनीची सुपीकता वाढल्यास शेतातील पीक उत्पादन निश्चितपणे वाढून जमिनीचे स्वास्थ्य व आरोग्य दीर्घकाळ अबाधित ठेवणे शक्य होईल. त्यामुळे सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळी खते फायदेशीर या लेखाच्या माध्यमातून हिरवळीच्या खतांबाबत सखोल माहिती वाचकांना, अभ्यासकांना व शेतकरी बांधवांना प्राप्त व्हावी यासाठी लेखकांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या माहिती उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत हिरवळीच्या खतांचा उपयोग करावयाचा आहे.
संदर्भ :
 1. भारती इंद्रायणी श्रीधर (2019) : सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि  पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 2. कोठारे अशोक : सेंद्रिय खत निर्मिती उद्योग, कॉन्‍टीनेन्‍टल प्रकाशन पुणे
 3. तानाजीराव विक्रम : सेंद्रिय शेती, अंजिक्‍यतारा पब्लिकेशन, पुणे
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर, Website Admin : https://www.agrimoderntech.in/ 
Prajwal Digital

Leave a Reply