करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा

करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा या लेखाद्वारे घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास ते बियाणे शुद्ध व चांगल्‍या गुणवत्तेचे असणे अत्‍यंत गरजेचे असते.
पीक रोगांना कारणीभूत असलेल्‍या बऱ्याच सूक्ष्‍मजीवांचा प्रसार बियाण्‍यांद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्‍याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्‍ती व जोमदार वाढ होण्‍यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्‍त्‍वाचे आहे.
कृषि उत्‍पादनामध्‍ये हमखास वाढ करणाऱ्या या कमी खर्चाच्‍या साधनामुळे शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नातही निश्चित वाढ होईल. पीक संरक्षणामध्‍ये रोगांचा प्रादुर्भाव झाल्‍यानंतर नियंत्रणाचे उपाय केल्‍यापेक्षा ते रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याआधीच बीजप्रक्रियेद्वारे पूर्व नियंत्रणाचे उपाय योजना करणे फायद्याचे आणि कमी खर्चाचे ठरते.
करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा हा असून द्वारे बीजप्रक्रिया म्हणजे काय? बीजप्रक्रिया उद्देश, बियाण्याचे महत्‍व, बीजसंस्‍करण घटक व प्रक्रिया, महत्त्वाची जैविक संवर्धके, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास कोणत्या कोणत्याही बीजप्रक्रिया कराव्या लागतात, बीजप्रक्रियेचे करण्याचेे महत्त्व, बीजप्रक्रिया करण्याची पद्धत, बीजप्रक्रियेचे फायदे याबाबत सखोल माहिती प्रस्तुत लेखात खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
बीजप्रक्रिया म्हणजे काय
रोग व्‍यवस्‍थापनासाठी पूर्व नियंत्रणाचा एक महत्‍त्‍वाचा उपाय म्‍हणजेच बीजप्रक्रिया /बीजसंस्‍करण होय. बीजप्रक्रिया म्‍हणजे बी-बियाण्‍यास किंवा लागवडीसाठी वापरल्‍या जाणाऱ्या रोपांना, त्‍यांच्‍या निरोगी उगवणीकरिता किंवा रोगाविरूद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्‍यासाठी रासायनिक, जैविक किंवा भौतिक घटकाची प्रक्रिया करणे म्हणजेच बीजप्रक्रिया होय.
बीजप्रक्रियेचा उद्देश– 
बियाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन देणारी व निरोगी झाडे उगवण्यासाठी जी प्रक्रिया बियाण्यांवर केली जाते, त्यास बीजप्रक्रिया असे म्हणतात. बीजप्रक्रियेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे :
 • रोगांपासून संरक्षण करणे.
 • कीटकांपासून नियंत्रण करणे.
 • लवकर उगवण करण्यासाठी
 • पेरणी सुलभ होण्यासाठी
 • द्विदल पिकांकडून जमिनीस नत्राचा पुरवठा करणे
 • बियाण्याची सुप्तावस्था घालवण्यासाठी
बियाण्याचे महत्‍व
दर्जेदार पिकाचे उत्‍पादन घेण्‍यासाठी बियाणे शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण असणे अत्‍यंत गरजेचे असते. त्‍यामुळे पिकांचे भरघोस उत्‍पादन वाढीस मदत मिळते. बियाण्‍याची भौतिक व आनुवंशिक शुद्धता शास्‍त्रीय पद्धतीने तपासण्‍यात येते. त्‍यामुळे बियाण्‍याची सरासरी उगवण क्षमता ही 70 ते 80 टक्‍के शुद्ध असणे पेरणी करण्याच्या दृष्टीने अनिवार्य असते. म्‍हणून शुद्ध बियाण्‍याला विशेष महत्‍व दिले आहे.
बीजसंस्‍करण घटक व प्रक्रिया
बी-बियाण्‍याला बीजप्रक्रिया करण्‍यासाठी शिफारशीत मात्रेत सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशक/जीवाणूनाशक लावावे, त्‍यानंतर अनुक्रमे जैविक संवर्धके/ (रायझोबियम /अॅझोटोबॅक्‍टर/ अॅझोस्‍पीरिलम /स्फुरद विरघळणारे जीवाणू) व सगळ्या शेवटी जैविक बुरशीनाशकाची (ट्रायकोडर्मा) बीजप्रक्रिया करावी. रासायनिक रोगजंतूनाशक (बुरशीनाशक, जीवाणूनाशक) बियाण्‍यातून किंवा मातीतून उद्भवणारे बुरशीजन्‍य /जीवाणूजन्‍य रोग (मर, मूळकुज व इतर रोग) नियंत्रणासाठी वापरतात.
महत्त्वाची जैविक संवर्धके
1) रायझोबियम : नत्रयुक्‍त खते जमिनीत टाकल्‍यानंतर अर्धे नत्र बाष्‍पीभवनाद्वारे वातावरणात निघून जाते व अर्धेच नत्र पिकांना उपलब्‍ध होते. रायझोबियम जीवाणू नत्राचे स्थिरीकरण करतात आणि कडधान्‍य वर्गीय पिकांच्‍या मुळांना नत्र लवकर उपलब्‍ध होऊन मुळावर गाठी तयार होतात. परिणामी, जास्‍त उत्‍पन्‍न मिळते.
2) अॅझोटोबॅक्‍टर/अॅझोस्‍पीरिलम: तृणधान्‍य वर्गीय पिकामध्‍ये नत्र स्थिरीकरण करतात.
3) पी.एस.बी. (स्‍फुरद विरघळणारे जीवाणूBacteria that dissolve phosphorus) : स्‍फुरदयुक्‍त खते जमिनीत टाकल्‍यानंतर अविद्राव्‍य अवस्‍थेतील स्‍फुरद विद्राव्‍य होऊन पिकाला उपलब्‍ध होण्‍यासाठी 25 ते 30 दिवस लागतात. ही अविद्राव्‍य स्‍फुरद हे जीवाणू विरघळवून तो पिकाला लवकरात लवकर उपलब्‍ध करून देतात.
4) जैविक बुरशीनाशक (ट्रायकोडर्मा) : ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असून ती तइर रोगकारक बुरशीवर उपजीविका करते आणि त्‍यांना नियंत्रित ठेवते त्‍यामुळे पिकावर बियाण्‍यांद्वारे /जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्‍य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
बीजप्रक्रिया करण्याची पद्धत
 1. प्रथम कडधान्ये किंवा तृणधान्याच्या पेरणीसाठी बियाणे घमेल्यात किंवा पोत्यावर घ्यावे.
 2. बियाण्याला जिवाणूखत किंवा बुरशीनाशक अशा दोन्हींची प्रक्रिया करावयाची असल्यास प्रथम बुरशीनाशक करावी.
 3. बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावयाची असल्यास ती जिवाणूखताची करण्यापूर्वी करावी.
 4. सदर बियाण्यास थायरम किंवा कार्बोफ्युरॉन ह्या कीटकनाशकाची तसेच बावीस्टीन सारख्या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात  बीजप्रक्रिया करावी.
 5. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना हातात रबरी /प्‍लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत, डोळ्यांना चष्‍मा व नाकाला रूमाल बांधावा, शरीरास इजा होणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
 6. जिवाणूखतांमध्ये कडधान्य अथवा द्विदलवर्गीय पिकांसाठी प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम 250 ग्रॅमचे पाकीट वापरावे. त्यातही कडधान्याच्या गटानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन यानुसार खत वापरावे.
 7. तृणधान्यांसाठी ॲझोटोबॅक्टर किंवा अझोस्पीरिलियम ह्या जिवाणूखताचा प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ह्या प्रमाणात वापरावे.
 8. त्याचवेळी स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.)सुद्धा कडधान्य अथवा तृणधान्यासाठी 10 बियाण्यास 250 ग्रॅम ह्या प्रमाणात वापरावे.
 9. बियाण्यांवर जिवाणूखत पसरविल्यावर ते बियाण्यावर चिकटण्यासाठी गुळाचे पाणी त्यांवर शिंपडावे.
 10. अशा प्रकारे सर्व बियाणे योग्य प्रकारे खाली वर करून सर्व बियाण्याला जिवाणूखत लागल्याची खात्री झाल्यावर असे बियाणे सावलीत काही वेळ अंदाजे 1 ते 2 तास ठेवावे किंवा त्वरित पेरणी केली तरी योग्य.
 11. नंतर बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणी करावी.
बीजप्रक्रिया करण्याचे फायदे
      बियाण्‍यास बुरशीनाशक व जैविक बीजप्रक्रिया केल्‍यामुळे पुढील प्रमाणे फायदे होतात.
 1. बियाण्याची उगवण क्षमता सुधारते.
 2. बी-बियाण्‍यास सम प्रमाणात औषध लावले जाते.
 3. बियाण्‍याची उगवण निरोगी आणि सम प्रमाणात होऊन पुढील रोगप्रसार थांबतो.
 4. पीकसंरक्षण खर्च कमी होतो.
 5. औषधे फवारणी वरील खर्चात बचत होते.
 6. जास्‍त उत्‍पन्‍न मिळण्‍यास मदत होते.
 7. बीजप्रक्रियेमुळे, नत्र, स्‍फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्‍ध होऊन, खतावरील खर्च कमी होऊन उत्‍पन्‍नात वाढ होते.
अशाप्रकारे बियाणे पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍यामुळे बियाण्‍याची उगवण चांगली होऊन पीक उत्‍पन्‍नात चांगली वाढ होईल. करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा याच उद्देशाने सदरील लेखाद्वारे बियाण्याचे महत्त्व समजावे, बुरशीनाशक आणि जिवाणूखते यांचे महत्त्व समजावे, बीजप्रक्रियेबाबत आवश्यक माहिती मिळावी, बीजप्रक्रियेची कृती समजून घेता, तसेच शेतकरी बांधवांना पेरणी करण्यापूर्वी घरगुती बियाणे वापरावयाचे असेल तर त्याला बीजप्रक्रिया कशी करावी, बीजप्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे कोणते आहेत आदी घटकांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
संदर्भ
 1. डॉ. विजय शेलार व इतर (2018) : बियाणे तंत्रज्ञान आणि व्‍यवस्‍थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
 2. जाधव भाग्यश्री (2019) : बीजोत्‍पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषी पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 3. पोटे संजीव (2020) : प्रमुख तृणधान्‍य पिकांचे बीजोत्‍पादन तंत्रज्ञान आणि साठवण व्‍यवस्‍थापन, अप्रकाशित कृषी पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 4. पीक उत्पादनाची मूलतत्त्वे आणि कार्यपद्धती : कार्यपुस्तिका, य.च.म.मु.वि., नाशिक

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447

करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा हा लेख आपणास आवडला असल्यास करून लाईक करावे, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे.

 

Prajwal Digital

1 thought on “करा बीजप्रक्रिया आणि उत्पन्न वाढवा”

Leave a Reply