बियाणे साठवणुकीत किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते. कारण साठवणुकीत किडींचे संरक्षण न केल्यास बियाणे खराब, गुणवत्ताहीन व दर्जाहीन होऊन उत्पादनात घट येते.
या सर्व बाबींचा विचार केल्यास बियाणे साठवण्यासाठी आवश्यक त्या साधनांचा वापर करून साठवणुकीतील किडींचे मुदतीत प्रभावीपणे नियंत्रण केल्यास या समस्यांना आळा बसून धान्याचे साठवण चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. याच उद्देशाने हा लेख तयार करून तमाम शेतकरी बांधव तसेच धान्य साठवणूक करणारे वेहरहाऊस, बीजभांडार व कोठार इत्यादींना ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता यावर प्रामुख्याने बियांतील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवणुकीच्या काळातील तापमान, साठवणुकीच्या काळातील वायू, बियाण्याची भौतिक स्थिती, अनुवंशिकता, अतिसूक्ष्म जिवाणू, किडी आणि बियांची सुरूवातीस उगवणक्षमता व जोम याचा परिणाम होतो. यापैकी बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता यांचे महत्व आधिक आहे.
बियाणे साठवणुकीत आर्द्रता व तापमान यांचे महत्त्व
बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश बियाण्याची अंकुरक्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे हा होय. साठविलेले बियाणे आणि इतर पदार्थ यांचे साठवणीत नुकसान करणाऱ्या काही किडींचा अभ्यास केल्यास त्यात काही बाबतीत बराचसा सारखेपणा आढळतो. उबदार व दमट हवामानात सर्वच कीटकांची वाढ झपाट्याने होते. साधारण 30 अंश सेल्सिअस उष्ण तापमान व 60 टक्केहून जास्त आर्द्रता असली की कीटकांना ते पोषक ठरते. साठवणुकीत बियाण्याचे आयुष्यमान हे हवेतील आर्द्रता आणि तापमान या घटकांवर बरेचसे अवलंबून असते. हॅरिग्ंटन नावाच्या शास्त्रज्ञाने 1959 मध्ये तापमान व हवेतील आर्द्रतेचे महत्व ओळखून त्यांचे बियाण्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम दाखविण्यासाठी दोन साधे नियम दिले आहेत.
बियाण्यातील ओलाव्याच्या प्रमाणात होणाऱ्या प्रत्येक 1 टक्का वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते किंवा बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 1 टक्के ने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुप्पटीने वाढते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे 5-14 टक्के दरम्यान असल्यास हा नियम लागू होतो.
बियाणे साठवणुकीच्या तापमानात होणाऱ्या प्रत्येक 5 अंश सेल्सिअस वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते किंवा साठवणुकीचे तापमान 5 अंश सेल्सिअसने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुप्पटीने वाढते. हा नियमसुद्धा साठवणुकीतील तापमान 0 ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान असेल, तेव्हाच लागू होतो.
आर्द्रतेमुळे बियाण्यात उष्णता वाढते व त्यास कुबट वास येऊ लागतो. त्याच्या चवीत फरक पडतो. त्यास कडवटपणा येतो आणि त्यावर बुरशी वाढते. असे बियाणे खाण्यासही योग्य राहत नाही. कोठारामध्ये जमिनीतून अगर खिडकीतून तसेच भिंतीतून आले आल्यास बियाणे खराब होण्याचा संभव असतो.
वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. आर्द्रतेचे प्रमाण 0 ते 25 टक्के दरम्यान असल्यास, बियाण्यातील ओलावा अधिक जलद प्रमाणात वाढतो. 25 ते 70 टक्के दरम्यान मध्यम गतीने तर 70 ते 100 टक्के दरम्यान पुन्हा जलद गतीने वाढतो. सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 12 टक्के पेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरणक्षमतेला हानीकारक असते. तसेच बियाण्यांची चांगल्या प्रकारे व आधिक काळापर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. थंड (15 अंश सेल्सिअस खाली) तापमान (30 अंश सेल्सिअस जास्त) तापमान किडींना हानीकारक असते. साधारणपणे तापमानात जसजशी वाढ होत जाते, तसतसे बियाण्यांच्या आयुष्यमान घट होत जाते.
जीवनासाठी प्राणवायू जरी आवश्यक असला, तरी बियाण्याची साठवणूक प्राणवायू विरहित जागेत सुरक्षित करता येते. नत्रवायू हा इतर कुठल्याही वायूपेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढवण्यात अग्रेसर ठरला आहे. त्याचप्रमाणे बियाण्यांची काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना बियाण्यास पोहोचणारी इजा ही बहुतेक करून साठवणुकीच्या काळात उगवणशक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरते. अनुवंशिकतासुद्धा बियाण्यांची साठवणूक शक्ती जास्त अथवा कमी करण्यासाठी कारणीभूत असते.
बियाणे साठवणुकीमध्ये सापडणारे प्रमुख किडे आणि पतंग
सोंडे किडे : तारुण्य आणि अळी अवस्था जास्त करून बियाणे नुकसान करते. मादी जास्त करून ज्या बी मध्ये खाते तिथेच ती अंडी घालते नंतर त्या अंड्याचे पूर्ण किड्यांमध्ये रुपातर होईपर्यंत ते बिया मधेच राहतात आणि नुकसान करतात. ह्या किडींचा जीवनचक्र 35 दिवसात पूर्ण होते यासाठी पोषक तापमान 280 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 70 टक्के असल्यास किडे झपाट्याने वाढतात.
पतंग : बियाण्याजवळ अंडी घालतात. पांढऱ्या रंगाच्या अळ्या बियाला होल पाडतात आणि आतील भाग खातात. तरुण अवस्थेत आल्यावर बियांतील आतील भाग खाऊन कडेचे आवरण तसेच ठेवतात, नंतर त्या आवरणाच्या आत ते कोश तयार करतात. पतंग अवस्थेत आल्यावर बाहेरील आवरण तोडून ते बाहेर येतात, नंतर वरच्या भागातील बियाणे ते खातात. त्या खोलवर साठवलेल्या बियाण्यात जात नाहीत.
धान्य, बियाणे पोखरणारे किडे/ अळी : जास्त करून अंडी बियाण्यामध्ये घालतात. अळ्या बियाण्यामध्ये शिरतात आणि तिथेच वाढतात आणि बियाची झालेली पावडर ते खातात जी पावडर तरुण किड्यांनी तयार केलीली असते. या किडीच्या प्रजनन वाढीसाठी तापमान 34 से. ग्रे. पोषक असते. आर्द्रता 60 ते 70 टक्के लागते. मादी तिच्या आयुष्य काळात 300-500 अंडी घालते.
पिठातील लाल किडे आणि अळी : हे किडे व अळी प्रामुख्याने पिठावर आणि फुटलेल्या बियाण्यावरती गुजराण करतात न फुटलेल्या बियाण्यावर ते खात नाहीत. ह्या किडीमुळे साठवणुकीत दुर्गंध येतो. प्रजननासाठी आवश्यक तापमान 35 से. ग्रे. आर्द्रता 75 टक्के लागते. मादी 20 दिवसांच्या आयुष्य चक्रात 500 अंडी घालते.
अशाप्रकारच्या बियाणे साठवणुकीत प्रमुख आढळून येणाऱ्या किडींमध्ये सोंडे किडे, पतंग, धान्य, बियाणे पोखरणारे किडे/ अळी, पिठातील लाल किडे आणि अळी किडी ह्या असून बियाणे व धान्य साठवणुकीत आढळून येतात. त्यांचे वेळेवर कीड व्यवस्थापन करणे अगत्याचे ठरते.
बियाणे साठवणुकीत कीड व्यवस्थापन
अ) प्रतिबंधात्मक उपाय
बियाणे मळणी करताना खळे हे कोठारीपासून लांब अंतरावर असावे. बियाणे साठवण्यापूर्वी ते चांगले वाळवावे. ज्यामुळे बियाण्यातील ओलावा 10 टक्के पेक्षा कमी होईल. या ओलाव्यामध्ये किडींचे प्रजनन होण्याची शक्यता कमी असते. बियाणे साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, कणग्या, साठवणुकीची जागा तसेच वाहतुकीची साधने साफ करून कीडविरहित करावी.
साठवणुकीच्या जागेतील भिंतीचे छिद्र व बारीक भेगा सिमेंटने लिंपून घ्याव्यात, कारण त्यात कीटक वास्तव्य करतात. साठवणुकीच्या जागेत उंदराची बिळे असल्यास, काचेचे तुकडे, दगड टाकून सिमेंटने बुजवून घ्यावीत. उंदरांनी प्रवेश करू नये यासाठी दरवाजे, खिडक्या घट्ट बसवावे. दरवाजाखाली गॅल्वहनाईजचा पत्रा बसवून घ्यावा. उंदीर तसेच पक्ष्यांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या बसवाव्यात. रिकामे गोदाम/भांडारामध्ये भिंतीवर/पृष्ठभागावर डेल्टामेथ्रिन 2.5 टक्के पाण्यात विरघळणारी पावडर 120 ग्रॅम 3 लिटर पाण्यात मिसळून प्रति 100 चौ. मी. क्षेत्रात फवारणी करावी.
बियाणे साठवणुकीसाठी शक्यतो नवीन गोण्या/पोती वापरावीत. जर जुने पोते वापरावयाचे असल्यास, पोते गरम पाण्यात (50 अंश. से. पेक्षा तापमानापेक्षा जास्त) 15 मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावेत किंवा डेल्टामेथ्रीनची 2.5 टक्के पाण्यात विरघळणारी पावडर 120 ग्रॅम मात्रा 3 लिटर पाण्यात मिसळून 100 चौ. मी. क्षेत्र या प्रमाणात पोत्यावर/गोण्यावर (दोन्ही बाजूस) फवारणी करून वापरावे.
कोठारामध्ये बियाण्यांची पोती रचून त्या थप्प्यांवर डेल्टामेथ्रिन 40 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पोत्याचा/गोण्याचा कोणताही भाग ओला होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच उघड्या बियाण्यावर फवारणी करू नये. पोते डजेनवर (12 नग) (लाकडी फळ्या, पॉलिथीन चादर, बांबूच्या चट्टया) ठेवावेत आणि पोत्यांची थप्पी भिंतीपासून 3 फूट अंतरावर ठेवावी.
बियाणे साठवलेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून दर 15 दिवसांनी बियाण्यांची तपासणी करावी. गोळा केलेला कचरा जाळून टाकून नष्ट करावा. पावसाळ्यात बियाणे हवाबंद जागेत ठेवावे. उन्हाळ्यात बियाण्याला मोकळी हवा लागेल अशी व्यवस्था करावी. बियाणे साठवणुकीच्या जागेत पावसाचे पाणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. बीजभांडाराचे वातावरण /हवामान कोरडे व थंड राहील याची काळजी घ्यावी.
बियाणे साठवण करावयाच्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण सुरक्षित पातळीपर्यंत असणे आवश्यक आहे. खाली पडलेले बियाणे जमा करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे तसेच बीजभांडाराचा तळ खराब झाला असल्यास तातडीने त्याची दुरूस्ती करून घेतली पाहिजे.
ब) गुणात्मक उपाय
1) रसायनविरहीत व 2) रसायनांच्या साह्याने किडींचा बंदोबस्त करता येतो.
थंड तापमान पद्धत : बऱ्याचदा साठवणुकीतील किडी विशेषतः बाल्यावस्थेतील या 14 अंश से. तापमानाखाली मरतात. गोठणबिंदूच्या खाली तापमान गेल्यास या किडींचा नाश होतो. साठवलेल्या बियाण्यामध्ये नैसर्गिक थंड हवा खेळवून आपणास त्यात थंडावा आणता येतो. त्याचप्रमाणे शीत पद्धतीच्या उपयोगाने मोठ्या प्रमाणात बियाणे थंड करता येते.
उष्ण तापमान पद्धत : अनेकदा साठवणुकीतील किडी या 50-60 अंश से. 5 सें. ने तापमान वाढल्यास त्यांची वाढ थांबते. जवळ-जवळ सर्वच किडी 50 अंश से. तापमानात दोन तासांसाठी संपर्कात आणल्यास नाश पावतात. साठवणुकीपूर्वी सर्व बियाण्यास एकसारखा उष्ण प्रवाही हवेचा झोत, इन्फ्रारेड, जास्त पुनरावृत्ती वीज, अति उष्ण लहरी या पद्धतीचा अवलंब करतात.
नियंत्रित वातावरण पद्धत : बियाण्याची साठवणूक वातभेद्य पद्धतीने करण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बियाणे साठवणुकीसाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीस हवाबंद किंवा वातभेद्य माध्यमात साठवले असता बियाण्यांच्या तसेच कीटकांच्या श्वासोच्छवासामुळे साठवणुकीच्या माध्यमातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साईडमुळे कीटकांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण होऊन त्यांचे नियंत्रण होते. या तत्वाचा उपयोग करून बियाणे 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी साठवले जाते. साठवणुकीचे माध्यम उदाहरणार्थ, प्लॅस्टिकचा ड्रम, पत्र्याची कोठी इत्यादी हे हवाबंद असणे गरजेचे आहे. अशाप्रकारे हवाबंद माध्यमांमध्ये बियाणे भरून त्यांच्या क्षमतेच्या 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कार्बन डायऑक्साईड वायू त्यामध्ये भरला असता बियाण्यातील कीटकांचे प्रभावीपणे नियंत्रण होते.
निष्क्रिय घटक : बिनविषारी पदार्थ, उदाहरणार्थ, माती, राख, गारगोटी, डायटोमॅसिस अर्थ इत्यादीचा वापर करावा. जर किडींच्या शरीरातील 60 टक्के पाणी किंवा 30 टक्के वजनात घट झाली तर त्यांचा नाश होतो.
तेल :मोहरी व शेंगदाण्याचे तेल 7.5 मि.लि. प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास चोळले असता 9 महिन्यापर्यंत त्यांचा कडधान्यावरील भुंगेऱ्यापासून बचाव करता येतो.
वनस्पतींचा उपयोग : कडूलिंब या जैविक कीटकनाशकांचा (पाने व बियांची पावडर तसेच तेल इत्यादी) उपयोग प्रतिबंधक तसेच खाण्यास विरोध करणारा आहे. कडधान्यातील भुंगेऱ्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी पावडर 5 टक्के, नीम तेल व मोहरी तेल 1 टक्के अशी बीजप्रक्रिया फायदेशीर ठरते. तसेच सोंडे किडींसाठी हळदीची पावडर 3.25 टक्के अथवा रिठा किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया केली असता उपयुक्त ठरते.
जैविक उपाय : इंडियन मील मॉथ व गोदामाचा पतंग या किडीसाठी बॅसिलस थुरीथुरीजेनेसीस (बी.टी.) या जीवणूचा बियाण्यांचा संरक्षक म्हणून नोंद झालेली आहे.
क) रासायनिक उपाय
धुरीजन्य औषधे :
अॅल्युमिनिअम फॉस्फाईड या धुरीजन्य कीटकनाशकाच्या 3 ग्रॅम वजनाच्या 3 गोळ्या प्रति टन बियाण्यास अथवा 150 ग्रॅम पावडर/100 घनमीटर जागेसाठी अथवा 10 ग्रॅमचे पाऊच /टन बियाण्यासाठी 5 ते 7 दिवस संपर्कात ठेवल्यास किडींचा नाश होतो. ज्या बियाण्याचे अथवा कोठारातील जागेचे धुरीकरण करावयाचे आहे, ते हवाबंद असावे. तसेच धुरीकरणानंतर प्लॅस्टिक कागद अथवा ताडपत्री हळूवार काढावी व अशा बियाण्याचा वापर 48 तासांनी करावा.
दक्षता : धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर शासन मान्य अधिकृत परवानाधारक धुरीकरण यंत्रणेमार्फत करावा अन्यथा जीवितास धोका उद्भवू शकतो.
बियाणे साठवणुकीत एकात्मिक कीड नियंत्रण
- बियाण्यातील पाण्याचे प्रमाण म्हणजेच आर्द्रता 10 ते 12 टक्के ठेवावी.
- पावसाचे पाणी साठवणीच्या ठिकाणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- साठवण ठिकाणे साफ व स्वच्छ ठेवावीत.
- पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी, जेणेकरून जमिनीचा संपर्क येणार नाही.
- बाजारातील कीड नियंत्रक सापळे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.
- हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
- कडूलिंबाचा पाला साठवण पत्रामध्ये मिसळून ठेवला तरी चांगल्या प्रकारे किंड नियंत्रण होऊ शकते.
- निमतेल, निमार्क आणि निबिसिडीन या पैकी कोणतेही एक औषध 2 मी.ली 1 किलो बियाण्यास चोळावे किंवा पोत्यावर बाहेरून फवारावे.
- साठवणुकीची पोती, कणग्या, पक्की कोठार, वाहतुकीची साधने किंवा भिंतीच्या फटी मधील किडींचा नाश करण्यासाठी मेलॉथियान 1 लिटर + 100 लिटर पाणी यांची फवारणी करावी. ही फवारणी उघड्या बियाण्यावर करू नये, त्यानंतर बियाणे साठवणूक करावी.
- सामान्य 25 टक्के पाण्यात मिसळणारी डेल्टामेथ्रीन पावडर 40 ग्रॅम + 1 लिटर पाणी यांचे द्रावण साठवलेल्या पोत्यावर तसेच कोठारावर बाहेरून फवारणी करावी, ही फवारणी दर 3 महिन्याने करावी.
- पावसाळ्यात गॅसयुक्त धुरीजन्य औषधाने किडींपासून तसेच बुरशीपासून संरक्षण करता येते, त्यासाठी साठवण ठिकाणे ही हवाबंद करावी लागतात. साठवलेलं बियाणे प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्रीने झाकून त्यात धुरीजन्य औषधाच्या पुड्या फोडून ठेवाव्यात व झाकण 8-10 दिवस बंद ठेवावे.
अशाप्रकारे बियाणे साठवणुकीत किडींचे एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून बियाण्याचे प्रभावीपणे संरक्षण करावे. त्यामुळे बियाण्याचा दर्जा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा बियाणे साठवणुकीत किडींचे व्यवस्थान नाही केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यात कधी न भरून येणारे नुकसान सुद्धा होते.
बियाणे उत्पादनामध्ये धान्य साठवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. किडींपासून बियाणे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना केल्या जातात. याच अनुषंगाने बियाणे साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता, वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवण काळातील तापमान, साठवण काळातील वायू, बियाण्याची भौतिक स्थिती, अनुवंशिकता, अतिसूक्ष्म जिवाणू, किडी, बियांची सुरूवातीस उगवणक्षमता व जोम आदीं बाबींचा लेखाजोखा प्रस्तुत लेख म्हणजेच बियाणे साठवणुकीत किडींचे व्यवस्थापन च्या मध्ये करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
प्रस्तुत लेखाच्या आधारे बियाणे साठवणुकीत किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करता येईल. किडीमुळे बियाण्याचे होणारे नुकसान टाळता येईल. बियाणे दीर्घकाळापर्यंत टिकविणे शक्य होईल. बियाण्याची गुणवत्ता व दर्जा चांगला राखला जातो. बियाणे साठवणुकीतील किडींना आळा बसवता येतो. अशा बहुउद्देशाने या लेखाचे महत्त्व व उपयोग बियाणे साठवणुकीत होणार आहे.
संदर्भ :
- डॉ. विजय शेलार व इतर (2018) : बियाणे तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
- बावीस्कर व्ही. एस. व इतर, अनुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था, पुणे
– शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
Mostly information