प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर
कापूस हे राज्यातील विशेषत: विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. राज्यात कापूस या पिकाखाली सुमारे 42 लाख हेक्टर क्षेत्र असून ते देशाच्या एकूण कापूस पिकाखालील क्षेत्रांपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक आहे. बहुतांश कापूस लागवड ही मोसमी पावसावर अवलंबून असल्याने त्याचे उत्पादन व उत्पादकता कमी येते. याबरोबरच उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे असून यामध्ये मुख्यतः कीड व रोग, हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता यांचा समावेश आहे. परिणामी अशा नैसर्गिक संकटासमुळे कपाशीचे उत्पादनात घट येते.
कापूस उत्पादन तंत्रज्ञान या लेखाच्या माध्यमातून कापसाचे दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते. यासाठी आवश्यक व महत्त्वपूर्ण कापूस लागवडीच्या बाबींचा काळजीपूर्वक वापर करून कापसाचे उत्पादन घ्यावे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाची योग्य माहिती मिळणार असून त्यांचे कापसाचे उत्पादन निश्चितपणे वाढू शकेल असा लेखकाचा मानस आहे. यासाठी प्रस्तुत लेख खरीप कापूस लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरेल अशी माझी खात्री आहे.
प्रस्तुत लेखामध्ये कापूस लागवडीची अद्यावत व सखोल माहिती देण्यात येत असून यामध्ये कापूस पिकासाठी लागणारी जमीन, हवामान, पूर्व मशागत, बीजप्रक्रिया, कापूस वाणांची निवड, लागवड हंगाम, पेरणीचे अंतर, आंतरपिके, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, प्रमुख किडींचे व्यवस्थापन, प्रमुख रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, कापूस वेचणी, साठवण व्यवस्थापन व उत्पादन आदीं मुद्यांचा समावेश यात आहे.
जमीन
कापूस लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती योग्य असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी. जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 इतका असावा. कपाशीच्या झाडाची मुळे जमिनीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत कपाशीची लागवड करु नये. कापूस पीक लागवडीसाठी जमिनीची खोली किमान 60 ते 100 सें.मी. असावी. कोरडवाहू लागवडीमध्ये हलक्या जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास जमीन कपाशीला हानीकारक असते. कपाशीचे पीक अधिक ओलावा व चिबाड परिस्थितीत तग धरु शकत नाही. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्यास चर काढावेत.
हवामान
कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी सरासरी वार्षिक तापमान 16 अंश से.ग्रे. पेक्षा जास्त आवश्यक असते. कपाशीची उगवण चांगली होण्यासाठी किमान 16 अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यता असते तर पिकाच्या वाढीसाठी 21 ते 27अंश सें.ग्रे. तापमान मानवते. बोंडे लागणे व पक्व होण्यासाठी दिवसाचे तापमान 26 ते 32 अंश से.ग्रे. व रात्रीचे थंड तापमान योग्य असते. बोंडे लागणे व फुटण्याच्या अवस्थेत प्रखर सूर्यप्रकाश व पिकाच्या कालावधीत धुकेविरहित हवामान आवश्यक असते. यामुळे बोंडाचे योग्यरित्या पोषण होते व बोंडे चांगली फुटतात. कोरडवाहू लागवडीसाठी पाऊस 500 मि.मी. पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
पूर्व मशागत
कापूस लागवड करत असताना जमिनीची चांगल्या प्रकारचे नांगरणी करून घेऊन त्यामध्ये शेणखत, कंपोष्ट खत चांगले कुजलेले मिसळून वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून कापूस लागवडीसाठी तयार करणे गरजेचे असते. त्यामुळे कापूस लागवडीत पूर्व मशागत करणे, नांगरणी करणे, वखरणी करणे, जमिनीत खते टाकणे इ. आवश्यक कामे योग्य रितीने करावे.
कापूस वाणांची निवड
महाराष्ट्र प्रचलित हवामान घटक आणि पावसावर अवलंबित शेती यामुळे कापसाचे मुख्यतः मध्यम (25 ते 27 मि.मी.) ते मध्यम लांब (28 ते 30 मि.मी.) धाग्याचे सुधारित /संकरित वाणाचे पीक उत्पादनासाठी उपयोगात आणले जाते. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये परिपक्व होणारे कपाशीचे अनेक वाण उपलब्ध आहेत. बाजारात अनेक वाणांपैकी नेमका कोणता वाण लागवडीस निवडावा याबाबत शेतकऱ्यांचा गोंधळ होतो. म्हणून कपाशीचा वाण निवडताना मातीचा प्रकार, जमीन, हंगाम, हवामान, सिंचनाची सोय, इतर सुविधा लक्षात घेऊनच वाणांची निवड करावी लागते.
- एकंदरीत वाणांची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या.
- सरळ /देशी संकरित वाण रसशोषण करणाऱ्या किडींना सहनशील /प्रतिकारक्षम असावा.
- पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम राहणारा वाण असावा.
- मर, दहिया इत्यादी रोग संक्रमणला बळी न पडणारा वाण असावा.
- कापसाच्या बोंडाचा आकार मोठा व चांगला फुटणारा असावा.
- धाग्याची प्रत चांगली असणारा ज्यामुळे बाजारभाव चांगला मिळेल असा वाण निवडावा.
- कोरडवाहू लागवडीमध्ये मुळांची लांबी जास्त असणारा वाण निवडावा.
- कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे तर बागायतीसाठी उशिरा येणारे वाण वापरावे.
- मागील हंगामातील अनुभवाचा उपयोग करुन योग्य तो वाण पेरणीसाठी निवडावा.
वरील बाबींचा एकत्रित विचार करून कापसाचे दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असेल तर कापूस लागवडीसाठी डी एच वाय 286, ए के एच 081, एन एच 239-एन एच 452, सुरज (सी सी एच 510-4), आर एच सी 0717 (फुले यमुना) अशा जातींची निवड करावी.
बीजप्रक्रिया
पेरणीकरिता जातीवंत, दर्जेदार, प्रमाणित, शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. लागवड करण्यापूर्वी बियाण्याच्या उगवणशक्तीची चाचणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी रासायनिक बुरशीनाशक अथवा जैविक जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. शक्यतोवर तंतुविरहित बियाण्याचा वापर करावा. कपाशीमध्ये किडी, रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया कराव्या.
बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाण्यांद्वारे होतो. त्यामुळे बियाण्यास थायरम /कॅप्टन /सुडोमोनास या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रती कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणे व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अॅझोटोबॅक्टर /अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. यामुळे नत्र स्थिरीकरण केले जाते व नत्र खतांच्या मात्रेमध्ये बचत करता येते. जमिनीतील मातीच्या कणांवर धरुन ठेवलेले स्फुरद पिकास उपलब्ध करुन देण्यासाठी 25 ग्रॅम प्रति किलो ग्रॅम बियाणे याप्रमाणात जीवाणू संवर्धकाची गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करुन बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे.
सध्या द्रवरुप जीवाणू संवर्धके उपलब्ध आहेत. द्रवरुप जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करण्यासाठी 10 मि.ली. जीवाणू संवर्धक द्रव प्रती किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. बुरशीनाशक /कीडनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
लागवड हंगाम
कापूस पिकाची लागवड ही मुख्यतः खरीप हंगामात केली जाते. कारण आपल्याकडे या कालावधीत पाऊसाळा ऋतू चालू असतो. खरीप कापसाची लागवड ही 15 जून ते 15 जुलैपर्यंत करावी. उशिरा पेरणी केल्यास कापूस उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटते. त्यामुळे शक्यतो कापसाची लागवड योग्य वेळीच करावी.
पेरणीचे अंतर
कापसाची लागवड सर्वसामान्य 120 x 45 सें.मी. (4 x 1.5 फूट) अंतरावर करावी. कापूस लागवडीमध्ये झाडांच्या संख्येला अनन्यसाधारण महत्व असते. कापूस लागवडीमध्ये प्रती हेक्टरी 18518 (एकरी 7407) झाडे राहतील, याची काळजी घ्यावी. कोरडवाहू परिस्थितीमध्ये दोन ओळीतील अंतर यापेक्षा जास्त वाढविल्यास उत्पादनात घट येते. कापूस लागवडीमध्ये प्रती झाड 6 चौरस फूट जागा मिळेल, यानुसार लागवडीचे अंतर ठेवावे.
बियाणे प्रमाण
कापूस लागवडीसाठी सर्वसाधारण बियाणे 2.5 ते 3.0 किलोग्रॅम प्रती हेक्टरी पुरेसे आहे. परंतु कापूस लागवडीच्या दृष्टीने जमिनीचा पोत व जमिनीचा प्रकार यानुसार थोडे प्रमाणात कमी जास्त ठेवता येते.
कापूस लागवड
कापूस लागवडीमध्ये मान्सूनचा पुरेसा (किमान 75 ते 100 मि.मी.) पाऊस पडताच लागवड करावी. पेरणी करण्यासाठी ओळींचा अंतरानुसार जमिनीवर फास काढून वखराच्या सहाय्याने अथवा रेघा ओढणाऱ्या अवजाराने खुणा करुन घ्याव्यात. या रेघांवर दोन झाडांमधील अंतरानुसार आडव्या ओळींच्या खुणा करुन प्रत्येक चौफुलीवर सरकी पेरण्यात येते. काही भागांमध्ये सरकीची लागवड दोरींवर करण्यात येते. या पद्धतीत दोरींवर झाडातील अंतरानुसार खुणा (चिमण्या) करुन प्रत्येक खुणेवर सरकी पेरण्यात येते. पाऊस पडल्यानंतर कोरडवाहू कपाशीच्या पेरणीसाठी विलंब करु नये. पेरणीस एका आठवड्याने उशीर झाल्यास प्रती हेक्टरी एक क्विंटल उत्पादनात घट येते. त्यामुळे कोरडवाहू कपाशीची पेरणी वेळेवर करावी. पेरणी करताना लागवड शक्यतो दक्षिणोत्तरकरावी, म्हणजेच कमी अंतर असलेला झाडांचा भाग सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहतील.
आंतरपिके
कापूस पिकांबरोबरच इतर दुय्य्य पीक घेतल्यास आर्थिक उत्पन्नात चांगली भर पडते आणि प्रमुख पिकांवर झालेल्या खर्चाचा भार कमी करता येतो. त्यामुळे कापूस लागवडीत आंतरपीक पद्धतीला विशेष महत्त्व आहे. आंतरपीक घेत असताना ते पीक कमी कालावधीचे असणे गरजेचे असते. कापूस + तूर, कापूस + उडीद, कापूस + सोयाबीन इ. पीक पद्धतीचा अवलंब करावा आणि या पिकासाठी स्वतंत्र खत व्यवस्थापन, मशागत, तण व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणी इ. करणे गरजेचे असते. त्यामुळे हे पीक मुख्य पिकावर स्पर्धा करणार नाही.
कापूस खत व्यवस्थापन
कापसाला 120 : 60 : 60 किलोग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. म्हणजचे मराठवाड्यात कोरडवाहू लागवडीमध्ये बीटी कापूस पिकास एकरी 48 किलोग्रॅम नत्र, 24 किलोग्रॅम प्रत्येकी स्फुरद व पालाश द्यावे. कोरडवाहू लागवडीमध्ये 40 टक्के नत्र पेरणीच्या वेळी, 30 टक्के नत्र एक महिन्यानंतर व उर्वरित 30 टक्के नत्र दोन महिन्यानंतर विभागून देण्यात यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.
पाणी व्यवस्थापन
कापूस हे पीक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेत असल्यामुळे या कालावधीत पावसाळा हा ऋतू चालू असतो. त्यामुळे फारशी पाण्याची गरज भासत नाही. मात्र अलीकडील काळात ओलीता खालील कापूस पिकाच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या विविध योजनांमधून साकारलेले लघुपाटबंधारे, छोटे-मोठे पाझर तलाव, साठवण तलाव, विहीरी, बंधारे व शेततळे यामुळे महाराष्ट्रातील बागायत कापूस पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढत आहे. पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
तण व्यवस्थापन
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकामध्ये येणारी तणे अन्नद्रव्य, पाणी व सूर्यप्रकाश यासाठी कापूस पिकासोबत स्पर्धा करतात. कपाशीच्या पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात 70 ते 80 टक्के घट होते. कपाशीमध्ये पीक-तण स्पर्धेचा कालावधी लागवडीपासून 60 दिवसापर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून दोन महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते.
तणनियंत्रण व जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीच्या पिकात आंतरमशागत करणे अगत्याचे आहे. या करिता पहिली निंदणी (खुरपणी) पीक 3 आठवड्याचे असताना करावी व लगेच कोळपणी करून घ्यावी. यानंतर 6 आठवड्यानंतर दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपण्या /निंदण्या व 3 ते 4 कोळपण्या कराव्यात.
कापूस प्रमुख किडींचे व्यवस्थापन
अ) पीक वाढीची अवस्था : पेरणीनंतर 0 ते 60 दिवसापर्यंत
1) तंबाखूवरील पाने खाणारी अळी : अंडीपूंज व अळयांचे समूह पानासहीत हाताने गोळा करून नष्ट करावेत. निंबोळी तेल 5 मि.ली. /लीटर + 5 टक्के निंबोळी अर्क व धुण्याचा सोडा 1 ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
2) तंबाखूवरील पाने खाणारी अळी, अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळी : पिकाच्या सुरूवातीच्या काळात तंबाखुवरील पाने खाणारी अळी, अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक भासल्यास क्लोरॉनीलिप्रोल 18.5 एससी 3 मि.ली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3) पिठ्या ढेकूण : शेतातील व बांधावरील गाजर व गवत व अत्य वनस्पतींचा नाश करावा. पीकवाढीच्या सुरूवातीच्या काळात रासायनिक किटकनाशकांची फवारणी टाळावी. थोडासा प्रादुर्भाव झालेला असल्सयास कपाशीच्या प्रादुर्भावग्रस्त झाडांना शक्यतो हालवू नये,कारण पिठ्या ढेकणाची पिल्ले मानवी हस्तक्षेपामुळे इतरत्र पसरू शकतात. सुरूवातीच्या काळातील प्रादुर्भाव नैसर्गिक मित्रकिटकाच्या मदतीने आटोक्यात येतो.
4) इतर शोषक किडी : पीक वाढीच्या सुरूवातीच्या काळात मित्रकिटकांची संख्या भरपूर प्रमाणात असल्यामूळे किडींची संख्या नियंत्रणात राहते. घातक रसायनांच्या फवारणीमुळे मित्रकिटकांचा नाश होतो. कपाशीचे बियाणे हे अगोदरच निओनिकोटीनाईडयुक्त किटकनाशकांची बीजप्रक्रिया केलेले असते. 25 टक्के झाड शोषक किडींनी ग्रस्त आढळल्यास फ्लोनिकॅमिड 50 एससी 4 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5) गुलाबी बोंडअळी : पेरणीच्या 45 दिवसानंतर पतंगाची हालचाल कळण्यासाठी कामगंध सापळे प्रती हेक्टर 5 या प्रमाणे लावावेत.
ब) पीक वाढीची अवस्था : पेरणनंतर 60 ते 90 दिवसांपर्यंत
1) अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळी : गैर बीटी कपाशीत 1 किंवा त्यापेक्षा अधिक क्षतीग्रस्त पात्या प्रती झाड याप्रमाणे 25 टक्के झाडांवर प्रादुर्भाव आढळल्यास क्लोराट्रॉनीलिप्रोल 18.5 एससी 3 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2) गुलाबी बोंडअळी : पीक फुलोरा अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे निरीक्षण सुरू करावे आर्थिक नुकसानीची पातळी 10 टक्के फूले किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे आढळल्यास क्विनालफॉस 20 टक्के एएफ 20 मि.ली. किंवा थयोडिकार्ब 75 टक्के डब्लुपी 20 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 25 मि.ली. प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोंडे धरण्याच्या अवस्थेत शेतकऱ्यांना सूचना देण्यात येते की, त्यांनी एकरी 20 बोंडे तोडून त्यामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तपासावा. जमिनीवर पडलेल्या पात्या, फूले आणि बोंडे जमा करून नष्ट करावीत.
3) पिठ्या ढेकूण : शेतातील गाजर गवताचा नायनाट करावा. प्रादुर्भावग्रस्त झाडे प्लॅस्टिकच्या पिशवीतजमा करून नष्ट करावीत तसेच घातक रसायनांचा वापर टाळून अॅनासियस एरिजोनेन्सिस, अॅसेरोफॅगस पपई इ. परोपजीवी किटकाचे संवर्धन करावे.
4) तुडतुडे : आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास फ्लोनिकॅमिड 50 डब्लू जी 4 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
5) पांढरी माशी : पांढरी माशी निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास बुप्रोफेजीन 25 टक्के एससी 10 मि.ली. किंवा डायफेन्थीयुरॉन 50 टक्के डब्लूपी किंवा स्पायरोमेसीफेन 22.9 टक्के ईसी 12 मि.ली. किंवा पायरीप्रोक्सीफेन 10 टक्के ईसी 20 मि.ली. प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
6) लाल्या : मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के,यूरिया 2 टक्के तद्नंतर डीएपी 2 टक्के याप्रमाणे फवारणी करावी.
क) पीक वाढीची अवस्था : पेरणीनंतर 90 ते 120 दिवसापर्यंत
1) अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळी : गैर बीटी कपाशीत 1 किंवा त्यापेक्षा अधिक क्षतीग्रस्त पात्या प्रती झाड याप्रमाणे 25 टक्के झाडांवर प्रादुर्भाव आढळल्यास फ्लॅूबेनडायमॉइड 39.35 टक्के एससी 3 मि.ली. किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5 एससी 5 मि.ली. किंवा स्पिनोसॅड 45 टक्के एससी 2.5 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
2) तुडतुडे, फुलकिडे : प्रादुर्भाव श्रेणी 2/3/4 मध्ये 25 टक्के झाडांवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव किंवा पानांच्या आतल्या भागावर फुलकिड्यामुळे तपकिरी रंगाचे धब्बे 50 टक्के झाडे झाडांवर असल्यास थायोमिथोक्झाम 25 टक्के डब्लूजी 2 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात फवारणी करावी.
3) पांढरी माशी : पांढरी माशीमुळे 50 टक्के झाडे प्रादुर्भावग्रस्त असल्यास डायफेन्थीयुरॉन 50 एससी 12 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात फवारणी करावी.
4) गुलाबी बोंडअळी : उपलब्धता असल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परजीवी टा्रयकोग्रामा बॅक्टरी 60000 प्रती एकर प्रमाणे वापर करता येऊ शकतो. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 25 मि.ली. किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्लुपी 20 ग्रॅम प्रती 10 पाण्यात फवारणी करावी. किडविरहीत आणि किडग्रस्त कापसाची वेचणी वेगवेगळी करावी. किडविरहीत कापसाची साठवणूक करावी किंवा तो विकून टाकावा. किडग्रस्त कापसाचा त्वरित नायनाट करावा.
5) गुलाबी बोंडअळी आणि पिठ्या ढेकूण : 10 टक्के प्रादुर्भावाग्रस्त फूले व बोंडात जिवंत अळ्या किंवा गुलाबी बोंडअळीचे नर पतंग 8 प्रती सापळा सलग 3 रात्री सापडल्यास किंवा 20 झाडे प्रती एकरात पिठ्या ढेकूण प्रादुर्भाव श्रेणी 2/3/4 आढळल्यास थायोडीकार्ब 75 डब्लूपी 20 ग्रॅम क्लेरपायरीफॉस 20 ईसी 25 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी.
ड) पीक वाढीची अवस्था : पेरणीनंतर 120 दिवसांपर्यंत
गुलाबी बोंडअळी : 10 टक्के प्रादुर्भावाग्रस्त फुले किंवा बोंडात जिवंत अळ्या आढळल्यास फन्व्हलरेट 20 टक्के ईसी 10 मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी 10 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळवून फवारावे.
कापूस प्रमुख रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
सर्वसाधारणपणे कापसावर मूळकुजव्या रोग (बुरशीजन्य), मर रोग (बुरशीजन्य), सुत्रकृमी, जिवाणुजन्य पानांवरील ठिपके/करपा, अल्टरनेरिया पानांवरील ठिपके/करपा (बुरशीजन्य), तंबाखुवरील पर्ण छटा (विषाणूजन्य) असे रोग आढळून येतात. या रोगांमुळे कापसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येते. यासाठी कापसावरील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन खालील प्रमाणे करण्यात यावे.
- जमिनीची खोल नांगरणी करून जमीन कडक उन्हात तापू द्यावी.
- रोगग्रस्त पिकांचा काडीकचरा काढून तो नष्ट करावा.
- रोगांना प्रतिकार करणाऱ्या शिफारस केलेल्या उन्नत आणि संकरित वाणांची लागवड करावी. तसेच पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
- बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी थायरम (75 टक्के डब्लू.एस.) 3 ग्रॅम प्रती किलो बियाणे व जीवाणूजन्य रोगासाठी कार्बोक्सिन (75 टक्के डब्लू.एस.) 1.5 ग्रॅम प्रती किलो बियाणे किंवा कार्बोक्सिन 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के डी.एस.) 2.5 ग्रॅम प्रती किलो बियाणे तसेच ट्रायकोडर्मा भुकटी (परजीवी जैवनियंत्रक बुरशी) 4 ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- पीकवाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग आढळल्यास पायराक्लोसॅबीन (20 टक्के डब्लू.जी.) 2 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी किंवा कार्बेन्डॅझिम (50 टक्के डब्लू.पी.) 20 ग्रॅमप्रती 10 लीटर पाणी किंवा मेटीराम 55 टक्के + पायराक्लोस्ट्रॉबीन 5 टक्के डब्लू. पी. 12 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या जीवाणूजन्य रोगासाठी कार्बोक्सिन (75 टक्के डब्लू. पी) 1.5 ग्रॅम प्रती किलो बियाणे किंवा (कार्बोक्सिन 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के डी.एस.) 2.5 ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- पीकवाढीच्या अवस्थेत जीवाणूजन्य करपा रोग आढळल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड + स्ट्रेप्टोसायक्लीन (25 ग्रॅम + 1 ग्रॅम) प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- रोगाचे प्रमाण पुन्हा आढळल्यास पहिल्या फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दूसरी फवारणी करावी.
- फुलकिडयांच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझीन 25 टक्के एस.सी. 12 ग्रॅम किंवा डायफेन्थियुरॉन 50 टक्के डब्लू. पी. 12 ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड 50 टक्के डब्लू. जी. 4 ग्रॅम किंवा थायमेथोक्साम 25 टक्के डब्लू. जी. 2 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यास मिसळून फवारावे.
- सुत्रकृमिंच्या नियंत्रणासाठी शेतात नेहमी निरीक्षण करून बाधित झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.
कापूस वेचणी
शेतातील कापसाची अंदाजे 30 ते 35 टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेचण्या कराव्यात. कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, वाळलेली पाने कपाशीला चिकटत नाहीत. कापूस वेचताना चांगला कापूस प्रथम वेचणी करावी. त्यानंतर पावसात भिजलेला पिवळसर रंग असलेला व कीडका आणि कवडी कापूस वेगळा वेचावा. प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस 3 ते 4 दिवस उन्हात वाळवावा. स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा. असा स्वच्छ वेचणी केलेला कापूस चांगला दर मिळण्यास उपयुक्त ठरतो.
कापूस साठवण व्यवस्थापन
कापूस साठवण्यापूर्वी तो चांगला वाळविला पाहिजे म्हणजे त्यातील ओलसरपणा कमी होईल. तसेच कवडी, किडलेला पिवळा कापूस वेगळा साठवावा. वेचणीनिहाय व जातीनिहाय वेचलेला कापूस स्वतंत्र साठवावा. योग्य भाव आल्यावर असा कापूस विक्रीसाठी पाठवावा. या सर्व बाबींचा विचार करून कापसाची वेचणी आणि साठवण केल्यास कापसाला योग्य भाव मिळेल.
- प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.
- कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा.
- वेचणीच्या काळात पाऊस पडल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करुन वेगळा साठवावा.
- शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला झोडा असे संबोधले जाते. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.
- कपाशीवर रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरुन कापसावर पडतो व रुईची प्रत खालावते. परिणामत : बाजारभाव कमी मिळतो तसेच अशा प्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे या कापसाचीसुद्धा साठवण वेगळी करावी.
- पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करुन तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात साठविलेल्या असल्यास त्वरित झाकून ठेवावा.
- डागाळलेला रंग बदललेला किडलेल्या (कवडी) कापूस वेगळा साठववावा. तो कापूस चांगल्या कापसात मिसळू नये कारण त्यामुळे चांगल्या कापसाची किंमत कमी होते.
- कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसरपणा येतो त्यामुळे रुई आणि धाग्याची प्रत खालावते.
- निरनिराळया कापूस वाणांची साठवण वेगवेगळया ठिकाणी करावी जेणे करुन त्याची मिसळ किंवा भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
उत्पादन
योग्य ती काळजी घेतल्यास बागायतीखालील कपाशीच्या सरळ जातीपासून हेक्टरी 20 ते 25, तर संकरित वाणापासून 25 ते 30 क्विंटल कापसाचे उत्पादन मिळते. तर कोरडवाहू कपाशीचे 12 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते.
कापूस उत्पादन तंत्रज्ञान या लेखाचा खरीप हंगामातील कापूस लागवडीसाठी होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांना कापूस पिकाची अद्यावत व आधुनिक स्वरूपाची माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. त्यामुळे सदरील माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून त्यांचे कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे. याच उद्देशाने सदर लेख खरीप कापूस लागवडीपूर्वी तयार करून शेतकऱ्यांना सखोल माहिती मिळावी, त्यांचे उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यांचे दर्जेदार कापूस उत्पादन तयार व्हावे याकरिता आहे.
संदर्भ
- जाधव अण्णासाहेब (2020) : कापूस उत्पादन तंत्रज्ञान, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
- शेतकरी मासिक, कापूस विशेषांक, (फेब्रुवारी 2018), महाराष्ट्र शासन कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- पीक-उत्पादनाची मूलतत्त्वे आणि कार्यपद्धती : पाठ्यपुस्तिका-1, य.च.म.मु.वि., नाशिक
- बळीराजा शेतकरी मासिक (2018-19) : कापूस लागवड तंत्र
- अतुल गणत्रा, (9 नोव्हेंबर, 2019) : भारतीय कापूस महामंडळ, नई दिल्ली
- दै. अॅग्रोवन, 10 जून 2019 : कापूस लागवड तंत्र
प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर
कापूस उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !
Excellent cotton cultivation technology