खरीप मूग लागवड तंत्र

खरीप हंगामतील मूग हे महत्वाची पीक असून या पिकाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मुगात प्रथिनांचे प्रमाण अधिक (24%) असून त्‍याची प्रतही उत्तम आहे. मूग पचनास हलका असल्‍याने त्‍यातील प्रथिने अधिक सुलभतेने शरीराच्‍या वाढीसाठी आणि आरोग्‍यासाठी वापरली जातात. या शिवाय मुगामध्‍ये खनिजे आणि जीवनसत्‍वे पुरेशा प्रमाणात असल्‍यास आहारात मूग अथवा त्‍यापासून केलेली डाळ अंतर्भूत केल्‍यास समतोल आणि पौष्‍टिक आहार म्‍हणून उपयोग होऊ शकतो.

महाराष्ट्रात मूगाचे पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता ही दिवसेंदिवस कमी होत असून मूग पिकाच्या तुलनेत शेतकरी बांधव सोयाबीन, तूर, कापूस या पिकाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील मुगाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता कमी झालेली आहे. मात्र मूगाचा जास्त प्रमाणात उपयोग हा डाळ निर्मितीसाठी होत असून मूगाची डाळ आरोग्यासाठी उत्तम समजली जाते. तसेच मुगापासून विविध प्रकियायुक्त पदार्थ सुद्धा तयार केले जातात.या सर्व कारणांमुळे मूग पिकाला अनन्यसाधारण औद्योगिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

याच उद्देशाने मूगाची लागवड शेतकरी बांधवांनी करावी, मूगाचे महत्त्व वाढावे, मूगाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी, दर्जेदार व किफायतशीर उत्पादन शेतकऱ्यांना मिळावे, मूग लागवड पद्धत, पेरणी, बियाणे, बीजप्रक्रिया, आंतरमशागत, तणनियंत्रण, पाणी व्यवस्थापन, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करता यावे, यासाठी खरीप मूग लागवड तंत्र लेख तयार करण्यात येत आहे. सदर माहितीचा उपयोग महाराष्ट्रातील बहुसंख्य खरीप हंगामात मूगाची लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना होणार आहे.

मूग : शास्त्र व प्रजाती

कडधान्‍याचा बादशहा म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या मूगाची ओळख लहान-थोरांपर्यत सर्वांना आहेच. मूग हे मूलतः भारतीय कडधान्‍य पीक असून आता संपूर्ण जगभर पसरले आहे. हिमालयात जंगली अवस्‍थेत मूगाच्‍या प्रजाती आढळतात. ही एक वेलवर्गीय वनस्‍पती असून तिचे शास्‍त्रीय नाव Vigna radiata (L.) Wilczek’ असे आहे. इंग्रजीत Green Gram’ असे नाव असून आपल्‍याकडे हिरवे, पिवळे आणि काळे अशा तीन प्रकारचे मूग प्रामुख्‍याने दिसून येतात. शास्‍त्रीयदृष्‍ट्या मूगाचे तीन-चार प्रकार आहेत. रेडिअॅटाजातीच्‍या मूगाच्‍या झुडपाची पाने गर्द हिरवी असतात. शेंगा पसरट असतात. शेंगातील दाणे हिरवे असतात.

अॅरियाजातीच्‍या मुगाची पाने फिकट-हिरवी असून बाहेरच्‍या बाजूला वळलेल्‍या शेंगांमधील दाणे पिवळे असतात. ग्रॅडिस या अजून एका जातीच्‍या मूगाची पाने मध्‍यम हिरव्‍या रंगाची असतात आणि काळ्या रंगाचे दाणे असतात. एवढेच नाही तर तपकिरी रंगाचे दाणे असलेल्‍या मूगाची जातसुद्धा आहे. ही वनस्‍पती साधारण 50 ते 120 सेमी उंच वाढते. पाने संयुक्‍त आणि त्रिस्तरीय प्रकाराची असतात. फुले लहान पिवळी किंवा पिवळसर हिरवी असतात. या फुलांच्‍या पा‍कळ्यांची रचना पतंगाच्‍या आकाराची असते. ही फुले झुपक्‍यात येतात. याच फुलातून पुढे झुपकेदार शेंगा येतात. शेंगाची लांबी 5 ते 10सेमीएवढी असते.

मूगाचे महत्त्व

हमखास पाऊसमानाच्‍या प्रदेशात भारी कसदार काळ्या जमिनीत मूग हे पीक वरदान ठरलेले आहे. खरीप हंगामात मूग या पिकांना अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व प्राप्‍त झालेले आहे. या मूग पिकांचा कालावधी फक्‍त अडीच ते तीन महिन्‍याचा असून विविध पीक पद्धतीत या पिकांचा अंतर्भाव करण्‍याच्‍या दृष्टीने या पिकाला फार महत्‍त्‍व आहे. त्‍याचप्रमाणे शेंगा तोडणीनंतर पाला पाचोळ्यामधील जमिनीचा पोत सुधारण्‍यास मदत होते. त्‍यामुळे फेरपालटीसाठी हे पीक उत्तम आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्‍यासाठी मूग या पिकाचा आंतरपीक म्‍हणून उपयोग होतो.

या पीक पद्धतीमध्‍ये डाळींच्‍या पिकांचा समावेश करणे, प्रथिनांचा 18 ते 20 टक्‍के, मेदाचा 56.5 टक्‍के पुरवठा आपणास मूग पिकांपासून मिळतो आणि सर्वसाधारणपणे 20 टक्‍के ऊर्जेची गरज भागवली जऊ शकते. जागतिक आरोग्‍य संघटनेने प्रति माणसी प्रतिदिन 85 ग्रॅम डाळीची गरज असल्‍याने सांगितले आहे. भारतात मात्रहे प्रमाण जवळपास 36.5 ग्रॅम प्रति माणसी प्रतिदिन आहे. देशाची डाळीची मागणी पूर्ण करण्‍यासाठी डाळीची आयात करावी लागत आहे. यावरून पीक पद्धतीमध्‍ये मूगाची पेरणी करणे आवश्‍यक आहे.

खरीप मूग लागवड तंत्र

प्रस्तुत लेख खरीप मूग लागवडीविषयी असून मूग लागवडीची उपयुक्त व आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. सदर माहितीचा उपयोग शेतकरी बांधवानी खरीपात मूगाची लागवड करण्यासाठी करावयाची आहे.

जमीन

मध्‍यम ते भारी, पाण्‍याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्‍य असते. क्षारयुक्‍त खोलगट पाणथळ तसेच उतारावरील हलकी निकस जमिनीत मूग पिकांची लागवड करू नये. आम्‍ल-विम्म्‍ल निर्देशांक (पी.एच.) सामू 6.0 ते 8.5 असलेल्‍या जमिनीत ही पिके चांगली येतात.

हवामान

या पिकास सरासरी 21 अंश ते 25 अंश सें.ग्रे तापमान चांगले मानवते. तसेच सरासरी 30 अंश ते 35 अंश सें. ग्रे. तापमानात सुद्धा या पिकाची वाढ चांगली होते. मूगासाठी पाऊस हा 700 ते 1000 मिलीमीटर पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्‍यास या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्‍पादन चांगले मिळते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्‍हाळी मुगावर स्‍वच्‍छ सूर्यप्रकाश आणि उष्‍ण हवामान यामुळे रोग आणि किडीचे प्रमाण कमी प्रमाणात आढळून येते. परिणामी अधिक उत्‍पादन मिळण्‍यास उपयोग होतो.

पूर्व मशागत

मूग हे पीक मध्‍यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्‍याने जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुसीत करणे आवश्‍यक असते. जमिनीतील ढेकळे फुटून काडी – कचरा वेगळा करावा. ही धसकटे, काडी कचरा व्‍यवस्थित वेचून घ्‍यावे. कुळवाच्‍या एक दोन पाळ्या द्याव्‍यात म्‍हणजे जमीन चांगली भुसभुसीत होऊन पेरणी योग्‍य होईल.

पेरणीची वेळ

खरीपाचा पहिला योग्‍य पाऊस झाल्‍यावर आणि जमिनीत वापसा येताच खरीप मुगाची जूनच्‍या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी पूर्ण करावी. पाऊस अनियमित पडल्‍यास पेरणीस उशीर होते. उशीरा पेरलेल्‍या पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्‍यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले व शेंगा कमी लागतात. परिणामी उत्‍पादनात मोठी घट येते. म्‍हणून वेळेवर पेरणीस अतिशय महत्‍व आहे.

बियाणे व पेरणी अंतर

पिकाचे अपेक्षीत उत्‍पादन मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने हेक्‍टरी रोपांची संख्‍या योग्‍य प्रमाणात असणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी प्रति हेक्‍टरी बियाणाचे पुरेसे आणि प्रमाण वापरणे महत्‍वाचे अन्‍यथा अन्‍यथा पिकाची सर्वप्रकारे योग्‍य निगा ठेऊनही बहुतेक वेळा हेक्‍टरी कमी रोप संख्‍येमुळे उत्‍पादन कमी येते. मूगपिकाकरिता 15 ते 20 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. दोन ओळीमध्‍ये 30 सें. मी. व दोन रोपामध्‍ये 10 सें. मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. उत्‍पादन वाढीसाठी प्रति हेक्‍टरी रोपांची अपेक्षित संख्‍या असणे सर्वात महत्‍त्‍वाची बाब आहे.

मुगाचे सुधारित वाण

मुगामध्‍ये अनेक वाण उपलब्‍ध आहेत. त्‍यातील वैभव हा वाण भुरी रोगाला प्रतिकार असून मध्‍यम आकाराच्‍या हिरव्‍या दाण्‍याचा आहे. उत्‍पादन चांगले आहे. तो खरिप व उन्‍हाळी या दोन्‍ही हंगामात चांगला येतो. बी. पी. एम. आर. 145 आणि ए. के. एम. 8802 हे इतर दोन वाण सुद्धा हिरव्‍या टपोरे दाण्‍याचे व चांगले उत्‍पादन देणारे आहेत, शक्‍यतो या तीन वाणांची निवड करावी. कोपरगाव – 1 हा वाण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर घेण्‍यात येतो. उडीदामध्‍ये टी. पी. यु. – व टी. यु. – 1हे दोन वाण टपोरे काळ्याभोर दाण्‍याचे आहेत. त्‍यांची उत्‍पादन क्षमताही चांगली आहे. या व्‍यतिरिक्‍त बी. डी. यु. – 1 हा वाण देखील अधिक उत्‍पादन देणारा आहे.

बीजप्रक्रिया

बियाण्‍याची उगवण चांगली होण्‍यासाठी आणि रोपावस्‍थेत बुरशीजन्‍य पासून संरक्षण करण्‍यासाठीपेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्‍यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेन्‍डेंझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्‍यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन मूग बियाण्‍यासाठी, 250 ग्रॅम वजनाचे एका पाकीटातील संवर्धन गुळाच्‍या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.यामुळे मुळातील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्‍ध केला जातो आणि पिकाचे उत्‍पादन वाढते.

खत व्यवस्थापन

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत 5 टन प्रति हेक्‍टरी प्रमाणे शेवटच्‍या कुळवणीच्‍या वेळी शेतात पसरून द्यावे. त्‍यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. यानंतर बियाणे करताना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्‍फुरद म्‍हणजेच 100 किलो डायअमोनियम फॉस्‍फेट (डीएपी)अथवा 43 किलो युरिया आणि 250 सिंगल सपर फॉस्‍फेट हेक्‍टरला द्यावे. पिकास पालाश 30 किलो प्रति हेक्‍टरी म्‍हणजेच 50 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकार क्षमता वाढते.

आंतरमशागत

पीक सुरूवातीपासूनच तण विरहित ठेवणे ही पिकाच्‍या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. कोळप्‍याच्‍या सहाय्याने पीक 20-25 दिवसाचे असताना पहीली आणि 30-35 दिवसाचे दुसरी कोळपणी करावी. केल्‍याने जमीन भुसभुसीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्‍यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्‍पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्‍यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी जमिनीत वापसा असताना करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण विरहित ठेवणे हे उत्‍पादन वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक असते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपणी करावी. तणनाशकाचा वापर करावयाचा असल्‍यास, बियाणे पेरणीपूर्वी फ्ल्युक्‍लोरॅलीन किंवा पेंडीमेथीलीन हे तणनाशक 3 लिटर प्रति हेक्‍टरला 500 ते 700 लिटर पाण्‍यातून जमिनीवर फवारून वखरपाळी घालावी म्‍हणजे तणनाशक जमिनीत चांगले मिसळले जाऊन तण नियंत्रण चांगले होते.

पाणी व्‍यवस्‍थापन

मूग ही पीक सर्वस्‍वी पावसाच्‍या पाण्‍यावर येणारी पिके आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्‍याची कमतरता भासू लागते. अशा वेळी पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी झाला असल्‍यास, जमनिीच्‍या प्रकारनुसार पाणी द्यावे. उन्‍हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्‍याच्‍या पाळ्या देणे अतिशय महत्‍वाचे असते. उन्‍हाळी मुगाचा पिकाचा कालावधी ऐन उन्‍हाळ्यात येत असल्‍यामुळे ओलीताच्‍या साधारणपणे 5 ते 6 पाळ्या द्याव्‍या लागतात. पीक पेरणीच्‍या पाण्‍यानंतर जमिनीचा मगदुराप्रमाणे दर 8-10 दिवसाने पाण्‍याची पाळी द्यावी. यासाठी शेतीची रानबांधणी व्‍यवस्‍थित करावी. सारे पाडून जमिनीच्‍या उतारानुसार योग्‍य अंतरावर आडवे पाट टाकावेत म्‍हणजे पाणी देणे अधिक सोयीचे होते.

कीड व रोग नियंत्रण

या पिकावर प्रामुख्‍याने भुरी आणि पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. भुरी रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे पिकाच्‍या खालील पानांवर पांढरे ठिप‍के दिसतात व थोड्याच दिवसात पानांच्‍या काही भागावर अनियमित आ‍काराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पान संपूर्ण पिवळे होऊन कर्बग्रहणाच्‍या क्रियेत अडथळा येऊन फार कमी प्रमाणात शेंगा लागतात. या रोगाच्‍या नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच पाण्‍यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम कार्बेन्‍डेंझिम अधिक 30 टक्‍के प्रवाही डायमेथोएट 500 मिली किंवा 36 टक्‍के मिली 500 लिटर पाण्‍यातून प्रति हेक्‍टरी फवारावे. आवश्‍यकता भासल्‍यास 8-10 दिवसांनी आणखी एक फवारणी करावी. (टीप: रासायनिक औषधांवर शासनाने वेळोवेळी बंदी आणली असून तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन योग्य ते औषध फवारणीसाठी निवडावे.)

आंतरपीक आणि मिश्र पीक

मूग हे अतिशय लवकरयेणाऱ्या पिकांमध्‍ये मुगाच्‍या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्‍यास तूरीच्‍या जोमदार वाढीची सुरूवात होण्‍यापूर्वी मूगाचे पीक हाती येते. त्‍यापासून हेक्‍टरी 8-10 क्विंटल उत्‍पादन मिळते. पुढील काळामध्‍ये तूर वाढीला लागते, अशा वेळी मूग काढून झालेल्‍या जागेत चांगली डावरणी करून / फुले यशोदा / मालदांडी यासारखीज्‍वारीची एखादी ओळ पेरल्‍यास सप्‍टेंबर-ऑक्‍टोबरच्‍या पावसाचा त्‍यांना लाभ होतो. या सर्व प्रकारामध्‍ये शेतकऱ्याला ज्‍वारी जनावरांना व कडबा व मूग, उडीद यांचे बोनस पीक मिळते.

काढणी व मळणी

मुगाचे पो साधारणतः 60 ते (65 दिवसात तयार होते. परिपक्व झालल्या शेंगाची रोडणी 6 ते 10 दिवसाच्या अंतराने करावी, शेंगा तोडण्यास उशीर झाल्यास शेंगा तडकून पिकाचे नुकसान होते. शेंगा खाल्‍ल्‍यानंतर मळणी करावी, मूगाच्या शेंगा 75 टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर 8-10 दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाहल्यावर फाठीचे सहाय्याने झोडपून मळणी करावी. मूगाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही.

साठवण

मूग 5-6 दिवस चांगले कडक उन्‍हात वाळवून पोत्‍यात किंवा कोठीत साठवावे. साठवणीमध्‍ये कडुनिंबाचा पाला 5 टक्‍के प्रमाणात घालावा. साठवण कोंदट व ओलसर जागेत करू नये. शक्‍य असल्‍यास धान्‍यास 1 टक्के लिबोंळी किंवा मोहाचे किंवा करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे. त्‍यामुळे धान्‍य साठवणीतील किडीपासून सुरक्षित राहते.

उत्पादन

मुगाचे प्रति हेक्टरी उत्पादन हे हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता, कीड व रोग इ. प्रमुख घटकांवर अवलंबून असते. या बाबींचे काटेकोरपणे नियोजन केल्यास निश्चितपणे प्रति हेक्टरी सरासरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते. मूगाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास सरासरी 20 ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

खरीप मूग लागवड तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

Leave a Reply