पीक वाढीसाठी जिवाणू खते फायदेशीर

जमिनीमध्‍ये विविध प्रकारचे असंख्‍य सूक्ष्‍म जीवजंतू वास्‍तव्‍य करत असतात. काही सुप्‍तावस्‍थेत असतात, काही पिकांना अन्‍नद्रव्‍य उपलब्‍ध करून देतात, काही रोग निर्माण करणारे तर काही रोगप्रतिबंधक असतात. त्‍यात, बुरशी, बॅक्‍टेरिया, अॅक्टिनोमायसिटीस यांचा समावेश होतो. त्‍यातील उपयुक्‍त जिवाणू मातीपासून विलग करून त्‍यांची उपयुक्‍ततेच्‍या दृष्‍टीने कार्यक्षमता पारकली जाते.
असे अतिकार्यक्षम जिवाणू प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात वाढवून ते जमिनीत पुन्‍हा वापरल्‍याने त्‍यांची जमिनीतील संख्‍या वाढते आणि हवेतील मुक्‍त नत्र स्थिरीकरण, स्‍फुरद विरघळवणे, सेंद्रिय पदार्थांचे विघटन इत्‍यादी उपयुक्‍त क्रियांतून पिकांना आवश्‍यक असा अन्‍नद्रव्‍याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊन उत्‍पादनात लक्षणीय वाढ होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन दोन किंवा तीन अवस्‍थेत होते. सेंद्रिय पादार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारी अन्‍नद्रव्‍ये, नमूद केलेले जिवाणू उपलब्‍ध करून देतात.
पीक वाढीसाठी सूक्ष्मजीवजंतूचे महत्त्व, कार्य, ह्युमस म्हणजे काय, सेंद्रिय पदार्थ विघटनक्रम, सेंद्रियपदार्थातील प्रथिने, सेंद्रिय पदार्थातील गंधक तसेच नत्रयुक्‍त जिवाणू खते, स्फुरदयुक्‍त जिवाणू खते, पालाश जिवाणू खते, तसेच इतर उपयुक्त जिवाणू खते, अॅसेटोबॅक्‍टर (Acetobacter), अझोला (Azolla), आझोलाच्‍या विविध जाती, अझोलाचे फायदे, मायकोरायझा (Micronize), व्हिएएम-मायकोरायझाची कार्ये, निळे-हिरवे शेवाळ (Blue-Green Algae), निळया-हिरव्‍या शेवाळाच्‍या जाती आदींची माहिती देण्याचा प्रयत्न पीक वाढीसाठी जिवाणू खते फायदेशीर या लेखात लेखकांनी केलेला आहे.
ह्युमस म्‍हणजे काय ?
ह्युमस हा पदार्थ जमिनीत सूक्ष्‍म जीवाणूंच्‍या सेंद्रिय पदार्थावरील प्रक्रियेत तयार होतो. ही अत्‍यंत बारीक भुकटी असते. तिचा रंग तांबडा-काळा असतो. तो बारीक कणांचा बनलेला असतो. ह्युमस नावाचा पदार्थ सेंद्रिय पदार्थांच्‍या विघटनाअंती तयार होतो. ह्युमस हे अत्‍यंत महत्‍वाचे अन्‍नद्रव्‍य आहे. ह्युमसमुळे पिकांची वाढ होऊन उत्‍पादन चांगले येते.
सेंद्रिय पदार्थ विघटनक्रम
सुरूवातीला बुरशी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करते. त्‍यावरून तयार होणाऱ्या विघटित पदार्थावर बॅक्‍टेरियांमुळे पुढील विघटन होत राहते. लवकर विघटित होणारे पदार्थ जसे, साखर, स्‍टार्च, प्रथिने, सेल्‍युलोज, हेमीसेल्‍युलोज इत्‍यादींवर बॅक्‍टेरिया व इतर सूक्ष्‍म जीवाणूंची प्रक्रिया होते. या प्रक्रियेतून त्‍याचे रूपांतर ह्युमसच्‍या स्‍वरूपात होते. या प्रक्रियेत पाणी, कार्बन डाय-ऑक्‍साईड (वायू) व उर्जा निर्माण होते. लिग्निनचे विघटन व्‍हायला वेळ लागतो. लिग्निन विघटनात सुगंधी पदार्थ तयार होतात. त्‍याचप्रमाणे काही प्रथिने लिग्निनसोबत विघटित होऊन ह्युमस तयार होते.
सेंद्रिय पदार्थातील प्रथिने
सूक्ष्‍म जीवाणूंमुळे प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो आम्‍ल व अमाईड या पदार्थात होते. पुढे हे पदार्थ अमोनिअम संयुगामध्‍ये रूपांतरित होतात. अमोनिअम कंपाउंड पुढे प्राणवायूच्‍या संपर्काने नायट्राई (नायट्रोसोमोनस बॅक्‍टेरियामुळे) व पुढे नायट्रेट (नायट्रोबॅक्‍टर) या रूपात तयार होतात. नायट्रेटच्‍या रूपात नत्र झाडांना उपलब्‍ध होतो.सेंद्रिय स्‍फुरद हे अन्‍नद्रव्‍यसेंद्रिय पदार्थात फायटिन, न्‍यूक्लिक अॅसिड आणि फॉस्‍फोलिपिड या स्‍वरूपात असते. या पदार्थाचे जीवाणूंमुळे विघटन होऊन थोफॉस्‍फेट आयन तयार होतात. आर्थोफॉस्‍फेट आयनाच्‍या स्‍वरूपात स्‍फुरद पिकांना उपलब्‍ध होते.
सेंद्रिय पदार्थातील गंधक
गंधक हे अन्‍नद्रव्‍य अमिनो आम्‍ल (मिथीओनिन, सिस्‍टीन, सिस्‍टाईन) या स्‍वरूपात सेंद्रिय पदार्थात असते. ही अमिनो आम्‍ले सूक्ष्‍म जिवाणू विघटित करून गंधकाचे रूपांतर सल्‍फेटच्‍या रूपात करतात. सल्‍फेटच्‍या रूपात गंधक हे अन्‍नद्रव्‍य पिकांना उपलब्‍ध होते.
जिवाणू खताचे प्रकार
अ. नत्रयुक्‍त जिवाणू खते
वातावरणात सुमारे 78 % नत्र वायू असतो. तो मुक्‍त स्‍वरूपात असल्‍याने पिकांना त्‍याचा उपयोग करून घेता येत नाही. परंतु नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंद्वारे हा मुक्‍त नत्र शोषून तो पिकांना देण्‍याचे काम जिवाणू करत असतात. हे जिवाणू सहयोगी, असहयोगी आणि सह-सहयोगी पद्धतीने काम करतात. सहयोगी पद्धतीने अझोस्पिरिलिम आणि अॅझोटोबॅक्‍टर असहयोगी पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण करतो.
1) अॅझोटोबॅक्‍टर (Azotobacter)
सर्व एकदल वर्गीय पिकांना नत्राचा पुरवठा करण्‍यासाठी अॅझोटोबॅक्‍टर जिवाणू खताचा फायदा होतो. उदाहरणार्थ, कापूस, उस, ज्‍वारी, बाजरी, गहू इत्‍यादी तृणधान्‍ये व भाजीपाला इत्‍यादी. जिवाणू खत बनवण्‍यासाठी अॅझोटोबॅक्‍टर जिवाणूची द्रव माध्‍यमामध्‍ये वाढ करण्‍यात येते. लिग्‍नाईट नावाच्‍या पावडरमध्‍ये ही जिवाणूची वाढ म्‍हणजेच संवर्धक मिसळले जातात. 1 ग्रॅम पावडरमध्‍ये 10 कोटी एवढया प्रमाणात जीवाणूंच्‍या पेशी असतात. हे मिश्रण पॉलिथीन पिशव्‍यांमध्‍ये भरून सीलबंद करतात. या पाकिटातील जिवाणू खत सहा महिन्‍यांत बीजप्रक्रियेसाठी वापरणे आवश्‍यक असते.
अॅझोटोबॅक्‍टर जिवाणू खते पुढील तीन प्रमुख पद्धतींनी वापरता येतात :
बियाण्‍यांसाठी किंवा बेण्‍यासाठी : 10 लीटर पाण्‍यात 50 ग्रॅम या प्रमाणात
रोपांच्‍या मुळांवर : 1 लीटर पाण्‍यात 5 ग्रॅमया प्रमाणात द्रावणकरून मुळे त्‍यात पाच मिनिटांसाठी बुडवावीत.
शेतातील मातीत जिवाणू खते मिसळावीत : 100 किलो खतांमध्‍ये 1 ते 1.5 किलो ग्रॅम जिवाणू पावडर मिसळावी.
फायदे
 • या प्रकारच्‍या जीवाणूंमुळे पीक उत्‍पादनात वाढ झाल्‍याचे आढळून आलेले आहे.
 • मुळांची वाढ चांगली होते.
 • रोपाची उगवण चांगली होते.
 • पीक उत्‍पादनाची प्रत सुधारते.
 • उदाहरणार्थ, भाजीपाला पिकामध्‍ये प्रथिनांचे, वाटाण्‍यात स्‍टार्चचे व कंदमुळांमध्‍ये साखरेचे प्रमाण वाढते.
2) अॅझोस्पिरिलम (Azospirillum)
अॅझोस्पिरिलम जिवाणू गवत वर्गातील पिके उदाहरणार्थ, मका गहू, बाजरी, ज्‍वारी, भात, उस व चा-याचे गवत यांच्‍या मुळांमध्‍ये व मुळांभावतालच्‍या भागात प्रामुख्‍याने आढळतात. या जीवाणूंचे अॅझोस्पिरिलम लिपोफेरम व अॅझोस्पिरिलम ब्रासिलन्‍स असे दोन प्रकार आहेत. या दोन्‍ही प्रकारच्‍या जीवाणूंना अॅझोस्पिरिलम असे म्‍हणतात. हे जिवाणू अॅझोटोबॅक्‍टर जीवाणूंपेक्षा दीडपट ते दुपटीपेक्षा जास्‍त हवेतील नत्र पिकांना मिळवून देतात.
वापर : 1 किलो जिवाणू भुकटी 25 ते 30 किलो बियाण्‍यांसाठी, पाण्‍याचा कमीत कमी वापर करून, बियाण्‍यांच्‍या आवरणाला इजा न होउ देता हलक्‍या हाताने चोळावी. रोपांच्‍या लागवडीसाठी किंवा पुनर्लागवडीसाठी 1 किलो अॅझोस्पिरिलम 25 ते 30 लीटर पाण्‍यात मिसळून तयार केलेल्‍या मिश्रणात लागवडीच्‍या रांपोची मुळे बुडवून घ्‍यावीत व सामान्‍य पद्धतीने लागवड करावी.
3) रायझोबियम (Rhizobium)
रायझोबियम जीवाणूंना सहयोगी नत्र स्थिर करणारे जिवाणू म्‍हणतात. जिवाणू व्दिदल वनस्‍पतीच्‍या मुळांवर गाठी तयार करून त्‍यामध्‍ये राहतात. हे जिवाणू वनस्‍पतीकडून त्‍यांना लागणारे अन्‍न मिळवतात व हवेतील नत्र अमोनियाच्‍या स्‍वरूपात पिकांना उपलब्‍ध करून देतात. हे खत तयार करण्‍यासाठी कडधान्‍यांच्‍या मुळांवरील गाठीतून उपयुक्‍त कार्यक्षम जिवाणू अलग करून विशिष्‍ट प्रकारच्‍या माध्‍यमातून त्‍यांची मोठ्या प्रमाणावर वाढ करून निर्जंतुक केलेल्‍या लिग्‍नाईट पावडरमध्‍ये मिसळून होणाऱ्या खताला रायझोबियम जिवाणू खत असे म्‍हणतात.
वापर : रायझोबियम जिवाणू खत 250 ग्रॅम वजनाच्‍या पाकिटात उपलब्‍ध असते. हे पाकिट 10 ते 15 किग्रॅ बियाण्‍यासाठी वापरावे. खताची पावडर पुरेशा पाण्‍यामध्‍ये मिसळून त्‍याचे घट्टद्रावण तयार करावे. तयार केलेले द्रावण बियाण्‍यांवर हलक्‍या हाताने, सारख्‍या प्रमाणात लेप बसेल, परंतु बियाण्‍याचा पृष्‍ठभाग खराब होणार नाही अशा पद्धतीने लावून लेप लावलेले बियाणे सावलीत स्‍वच्‍छ कागदावर अथवा किलतानावर सुकवून लगेच पेरणी करावी.
एकाच प्रकारचे रायझोबियम जिवाणू खत सर्वच शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. वेवेगळया गळातील पिकांना विशिष्‍ट प्रकारच्‍या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरतात. त्‍यानुसार त्‍याचे पुढील सात गट पडलेले आहे :
रायझोबियम जिवाणू गटनिहाय पिके
 • रायझोबियम जिवाणू : चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, धैंचा, कुळीथ
 • रायझोबियम ल्‍युपिनी : हरभरा
 • रायझोबियम ल्‍युमिनोसेरम : वाटाणा, मसूर
 • रायझोबियम फॅसीओलाय : सर्वप्रकारचा घेवडा गट
 • रायझोबियम जॅपोनीकम : मेथी, बरसीम घास
 • रायझोबियम मेलिलोटी : मेथी, लसूण घास
 • रायझोबियम ट्रायफोली : बरसीम घास
रायझोबियम जिवाणू खताचे फायदे
 • कडधान्‍याचे उत्‍पन्‍न 15 ते 20 टक्‍कयांनी वाढते.
 • बियाण्‍यांची उगवण लवकर व चांगली होते.
 • जिवाणू खताच्‍या वापरामुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्‍याने रोपांची वाढ जोमदार होते.
 • जीवाणूंनी सोडलेल्‍या बुरशीरोधक द्रव्‍यांमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.
 • जमिनीत कर्ब-नत्राचे प्रमाण योग्‍य राखून जमिनीचा कस सुधारतो.
ब. स्‍फुरद विरघळवणारे जिवाणू (PSB Phosphorus Solubilising Bacteria)
पिकांच्‍या व मातीतल्‍या सूक्ष्‍म जीवाणूंच्‍या वाढीसाठी स्‍फुरद हे महत्‍वपूर्ण खाद्य आहे. सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या पिकांना जी अन्‍नद्राव्‍ये मिळतात. त्‍यात स्‍फुरदाचा महत्‍वाचा वाटा आहे. सर्वसाधारण मातीत स्‍फुरद 0.5% उपलब्‍ध असून त्‍यातील फक्‍त 10% पिकांना मिळते. बाकी सर्व आहे तसेच जमिनीत पडले असते. स्‍फुरदाच्‍या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. पीएसबी अशा परिस्थितीत मुळांची वाढ करण्‍यात महत्‍वाचे काम करते, त्‍यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
फॉस्‍फेट मातीत कॅल्शिअम (चुना), अल्‍युमिनिअम व आयर्न (लोह) यांच्‍या समवेत संयुगाच्‍या स्‍वरूपात आढळतो, त्‍यामुळे पिकांना ते सहजासहजी मिळत नाही. पीएसबी जिवाणू हे निष्क्रिय स्‍फुरद अविद्राव्‍य अवस्‍थेतून विद्राव्‍य अवस्‍थेत रूपांतरित करतात व पिकांनासहजरीत्‍या मिळवून देतात. पिकांच्‍या कालावधीनुसार व जमिनीच्‍या परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 25 किलोग्रॅम पीएसबी द्रावणाची शिफारस केली जाते.
जमिनीत उपलब्‍ध असणारा स्‍फुरद हा सेंद्रिय स्‍वरूपातच असतो. ज्‍या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्‍त असते, त्‍या जमिनीत सेंद्रिय स्‍फुरद मोठ्या प्रमाणात अविद्राव्‍य स्‍वरूपात असतो. या सेंद्रिय स्‍फुरदाचे असेंद्रिय स्‍वरूपात म्‍हणजेच विद्राव्‍य स्थितीत रूपांतर होणे गरजेचेअसते. ते काम जिवाणू, बुरशी, निळ-हिरवे शेवाळ, अॅक्टिनोमायसीटस जमिनीत वास्‍तव्‍य करत असताना, फॉर्मिक, फ्युमॅरिक, लॅक्टिक, ग्‍लायकॉनिक, सक्सिनिक यांसारखी सेंद्रिय आम्‍ले तयार करतात. सेंद्रिय आम्‍लांमुळे स्थिर आम्‍लाच्‍या अभिक्रियेमुळे अविद्राव्‍य स्‍फुरदाचे रूपांतर विद्राव्‍य स्‍फुरदात होते. अशा रीतीने ज्‍या जमिनीत सेंद्रिय पदार्थजास्‍त आहेत. त्‍या जमिनीत स्‍फुरदाचे सेंद्रिय, असेंद्रिय स्‍फुरद असे रूपांतर होते व पिकांना मोठ्या प्रमाणात स्‍फुरद मिळतो. वापर पीएसबी 8 ते 10 किग्रॅ प्रति हेक्‍टर वापरणे गरजेचे आहे. चांगल्‍या कुजलेल्‍या शेणखताबरोबर किंवा गांडूळखताबरोबर लावणी वेळी पिकांना देणे गरजेचे आहे. आम्‍लधर्मीय जमिनीत जिवाणू संवर्धकाचावापर करण्‍यापूर्वी 2 क्विंटल चुना टाकणे गरजेचे आहे.
क. पालाश उपलब्‍ध करणारे जिवाणू
मध्‍यम ते भारी स्‍वरूपातील जमिनीमध्‍ये पालाशयुक्‍त खनिजे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, ते अविद्राव्‍य स्थितीत असल्‍याने पिकांना उपलब्‍ध होत नाही. आपण वापरत असलेल्‍या रासायनिक खतांच्‍या मात्रेपैकी 30% पालाश पिकांना मिळतो; उर्वरित 70 टक्के पालाश जमिनीमध्‍ये अविद्राव्‍य स्‍वरूपात साठून राहतो. बॅसिलस इडयाफिक्‍स (Bacillus edaphic us) नावाचे जिवाणू या अविद्राव्‍य पालाशचे स्‍वरूपात अस्थिरीकरण करतात. हे जिवाणू स्थिर झालेल्‍या पालाशवर जैव रासायनिक क्रिया करून पिकांना ते विद्राव्‍य अवस्‍थेत मिळवून देतात. हे जिवाणू ऑक्‍झॅलिक आम्‍ल व टार्टारिक आम्‍लाच्‍या सहाय्याने खनिज स्‍वरूपातील पालाशचे धन आयन वेगळे करतात व जमिनीतील पाण्‍यामध्‍ये मिसळून हे आयन्‍स मुळांद्वारे पिकांना उपलब्‍ध होत असतात. पालाशचे पिकांच्‍या मुळांच्‍या कार्यक्षेत्रात वहन होते व अविद्राव्‍य स्‍वरूपातील पालाश पिकांना सहज प्राप्‍त होतो. या जीवाणूंच्‍या वापराने रासायनिक पालाशयुक्‍त खतांची मात्रा 25 टक्के पर्यंत कमी करून खतांची बचत करत येते.
वापर- 250 ग्रॅम पालाश जिवाणू खतांचीबीजप्रक्रिया 10 किलो बियाण्‍यांकरिता करावी. साधारण 5 किलो पालाश जिवाणू खत 500 किलां चांगल्‍या कुजलेल्‍या शेणखताबरोबर अथवा गांडूळखताबरोबर ज‍मिनीत ओलावा असताना वापरावे. दोन लीटर द्रव स्‍वरूपातील पालाश जिवाणू संवर्धक प्रति 100 लीटर पाण्‍यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचनातून वापरता येतात.
ड. इतर उपयुक्त जिवाणू खते
1) अॅसेटोबॅक्‍टर (Acetobacter)
उस, तृणधान्‍य आणि शर्करायुक्‍त पिकांसाठी हे जिवाणू खत वापरले जाते. 1 एकर उस पिकासाठी 2 ते 3 किलो असेटोबॅक्‍टर भुकटी आणि 40 लीटर पाणी यांच्‍या मिश्रणात बेणे किंवा रोपे 5 मिनिटे भिजवून लागवड करावी.
2) अझोला (Azolla)
अझोला ही नेचे वर्गातील पाणवनस्‍पती आहे. या वनस्‍पतीच्‍या पेशीत नत्र स्थिर करणारी अॅनाबिना अझोली नावाची नीलहरित शेवाळ वर्गातील वनस्‍पती वाढत असते. ही वनस्‍पती सूर्यप्रकाशात स्‍वत:चे अन्‍न स्‍वत:च तयारकरून त्‍यातील काही शेवाळासही पुरवते. अशा प्रकारे सहजीवी पद्धतीने जगणाऱ्या या वनस्‍पतीमध्‍ये 4 ते 5 टक्‍के नत्र असते. त्‍याचा भातशेतीस चांगला उपयोग होतो. अझोलामध्‍ये नत्राचे व पाण्‍याचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे तो जमिनीत टाकल्यावर लवकर कुजतो व त्‍यापासून उत्‍तम प्रकारचे सेंद्रिय खत मिळते. अझोलाची वाढ अतिशय झपाटयाने होत असल्‍याकारणाने अझोलाचा नत्र पुरवणारी वनस्‍पती म्‍हणून चांगला उपयोग होऊ शकतो. अझोला गटोचे जिवाणू जमिनीत वास करतात आणि मातीतल्‍या सेंद्रिय पदार्थांपासून उर्जा ग्रहण करतात व त्‍यांचाजीवनक्रम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांनी हवेतन घेतलेला नत्र ते पिकांना मिळवून देतात. अझोला लालसर रंगाचा असून तो शेवाळासारखाच ताज्‍या पाण्‍यावर तरंगत असतो. अझोला हा ग्रीक शब्‍द असून त्‍याचा अर्थ आहे. अवर्षणस (उन्‍हामुळे पडलेला सुकाळ संपणारे एक शेवाळ म्‍हणजे सूर्यप्रकाशामुळे सुकलेल्‍या जमिनीत तो नाहीसा होतो ; म्‍हणजेच त्‍यास जिवंत राहण्‍यास ओलावा महत्‍वाचा आहे.
आझोलाच्‍या विविध जाती
 • अझोला कॅरोलिनिआना (Azolla carolilniana)
 • अझोला मेक्सिकाना (Azolla mexicana)
 • अझोला निलोटिका (Azolla nilotica)
 • अझोला मायक्रोफायला (Azolla microphylla)
 • अझोला फिलिक्‍युलॉईडस (Azolla filiculoides)
 • अझोला पिनाटा (Azolla pinnata)
अझोलाचे फायदे
 • भाताच्‍या एका हंगामात अझोलाचे 5 पिके घेतल्‍यास एकूण 120 किग्रॅ नत्र प्रति हेक्‍टरी स्थिर केला जातो.
 • रासायनिक नत्र खताप्रमाणे यातील नत्राचा ऱ्हास होत नाही.
 • अझोलापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
 • भारतात ज्‍या ठिकाणी पाणी साठून राहिल्‍यामुळे अॅझोटोबॅक्‍टर कार्य करत नाही त्‍या ठिकाणी अझोला नत्र स्थिरीकरणाचे उत्‍तम काम करते.
3) मायकोरायझा (Micronize)
मायकोरायझा ही वनस्‍पतीच्‍या मुळांवर वाढणारी एक प्रकारची बुरशी अहे. ती वनस्‍पतीला जमिनीतील स्‍फुरद उपलब्‍ध करून देण्‍याचे कार्य करते व त्‍या मोबदल्‍यात वनस्‍पतीकडून खाद्य मिळवते. ही बुरशी वनस्‍पतीच्‍या मुळांमध्‍ये व मुळाबाहेर तंतुमय धाग्‍यासारखे अनेक दोरे बाहेर तयार करते. हे दोरे मुळांच्‍या आतील पेशीपासून मुळांबाहेर मातीमध्‍ये खोलवर दूरवर पसरलेले असतात. त्‍याच्‍या माध्‍यमातून निरनिराळे आम्‍लधर्मीय पदार्थ तसेच विकरे जमिनीत सोडली जातात. त्‍यामुळे जमिनीतील अविद्राव्‍य स्‍फुरदाचे विद्राव्‍य स्‍फुरदात रूपांतर होते. हे स्‍फुरद नंतर मायलेलिअम (तंतुमय धाग्‍यांमार्फत) मुळांच्‍या पेशीत असणाऱ्या पोकळीत साठवले जाते आणि पिकाला पुरवले जाते.
व्हिएएम-मायकोरायझाची कार्ये
 • जमिनीतील अविद्राव्‍य स्‍फुरदाचे विघटन करून विद्राव्‍य स्‍फुरद पिकास मिळवून देतात.
 • मुळांच्‍या संख्‍येत जोमाने वाढ होते. त्‍यामुळे जमिनीतील अन्‍नद्रव्‍ये व पाणी पिकास जलद उपलब्‍ध होते.
 • पिकांच्‍या उत्‍पन्‍नात 15 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ होते. अन्‍नधान्‍य व भाजीपाला पिकांची प्रत सुधारते.
 • पिकांमध्‍ये रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण होते.
 • रोपवाटिकेत मायकोरायझाचा वापर केल्‍यास रोपांची निरोगी व जोमदार वाढ होत असल्‍याने पुढील पीकही चांगले जोमदार वाढते.
 • पीकवाढीसाठी उपयुक्‍त असलेली वाढवर्धक द्रव्‍ये उदाहरणार्थ, हार्मोन्‍स, ऑक्झिन्‍स (Auxins), सायटोकिनिन्‍स (Cytokinins) इत्‍यादी तयार केली जाउन ती पिकांना होतात.
4) निळे-हिरवे शेवाळ (Blue-Green Algae)
ही एक सूक्ष्‍मदर्शी एकपेशीय, तंतुमय शरीरचना असलेली असलेली गोडया पाण्‍यातील स्‍वयंपोशी पाणवनस्‍पती आहे. काही निळे-हिरवे शेवाळ पाण्‍यातराहून हवेतील मुक्‍त स्थितीत असलेला नत्र हेटरासीस्‍ट (Heterocyst) या विशिष्‍ट प्रकरच्‍या शरीर रचनेद्वारे स्थिर करतात. योग्‍य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतीवर्षी प्रती हेक्‍टरी 30 किलो नत्र स्थिर करू शकते.
निळया-हिरव्‍या शेवाळाच्‍या जाती- नत्र स्थिर करण्‍यास उपयुक्‍त निळया-हिरव्‍या शेवाळांच्‍या पुढील जाती आहेत : (1) अॅनाबिना (Anabaena) (2) अॅलोसिरा (Aulosira) (3) सिलेंड्रोस्‍परामम (Cylindrospermum) (4) वेसटीलॉपसिस (Westillopsis) (5) अॅसिलॅटोरिया (Acilatoriya) (6) नोस्‍टॉक (Nostoc) (7) सायटोनिमा (Scytonema) (8) टॉलीपोर्थिक्‍स (Tolypothrix)
निळया-हिरव्‍या शेवाळाचे फायदे
 • सर्वसाधारण एका हंगामात हेक्‍टरी 25 ते 30 किग्रॅ नत्र या खतामुळे मिळतो.
 • जमिनीतील अविद्राव्‍य स्‍वरूपातील स्‍फुरद, पिकास काही प्रमाणात उपलब्‍ध करून दिला जातो. जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते.जमिनीचा पोत सुधारण्‍यास मदत होते.
 • जमिनीमध्‍ये अॅझोटाबॅक्‍टर, बायजेरिकिया यांसारख्‍या उपयुक्‍त जीवाणूंची वाढ होण्‍यास मदत होते. या शेवाळीची वाढ होत असताना तयार झालेली वृद्धी संप्रेरके व जीवनसत्‍वाचा पिकाच्‍या वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जमिनीची धूप कमी होते.
प्रस्तुत संशोधन लेख पीक वाढीसाठी जिवाणू खते फायदेशीर हा असून पीक उत्पादनात सूक्ष्मजीवजंतूचे महत्त्व, कार्य तसेच ह्युमस जमिनीसाठी कसे उपयुक्त आहे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. त्यानंतर पीक वाढीसाठी अत्यावश्यक असणारे जिवाणू खते, त्यात नत्र स्थिर करणारे जिवाणू खते, स्फुरद विरघळवणारे जिवाणू खते,पालाश विरघळवणारे जिवाणू खते यांचे महत्त्व, कार्य, वापर व फायदे इत्यादींची माहिती विशद करण्याचा लेखकांनी केलेला आहे. सदरील माहिती तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, नगदी पिके इत्यादींच्या वाढीसाठी जिवाणू खते कसे उपयुक्त ठरतात, त्यांचे पीक वाढीसाठी कार्य व त्यांचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात वाढ कशी होते यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
सदर माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांना त्यांचे पीक उत्पादन वाढसाठी होणार असून याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात लेखकांनी केलेला आहे. त्यामुळे उपरोक्त बाबींचा विचार करून शास्त्रीय दृष्टकोनातून पीक उत्पादन घ्यावे. यामुळे पिकाची वाढ होईल आणि उत्पादनात भरघोस वाढ होईल. यात काही शंका नाही.
 
 
पीक वाढीसाठी जिवाणू खते फायदेशीर हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

 

 

Prajwal Digital

Leave a Reply