खतांच्या उत्पादनात खतांची साठवण, हाताळणी व व्यवस्थापन या तीन गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या स्थानिक, सुधारित व संकरित वाणांची होत असणारी लागवड व त्यास रासायनिक खतांची मिळालेली जोड यामुळे कृषि क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली दिसून येत आहे. त्यामुळे देशात रासायनिक खतांचे उत्पादन आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतातील कोणत्याही पिकांसाठी रासायनिक खतांची गरज महत्त्वाची असते.
रासायनिक खतांच्या उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय नैसर्गिक संपत्ती, पैसा, ऊर्जा, परिश्रम आणि वेळ सातत्याने खर्च होत आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही खतांच्या खरेदीवर रोख पैसे मोजावे लागतात. म्हणून या खताची गुणवत्ता व दर्जा कमी न होता उत्तम स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत योग्य वेळी पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. त्या दृष्टीकोनातून रासायनिक खतांची हाताळणी, वाहतूक आणि साठवण या गोष्टींना फार महत्त्व दिले जाते.
रासायनिक खतांचे उत्पादन वर्षभर सतत सुरू असते; पण त्यांचा वापर मात्र हंगामी स्वरूपातच करावा लागत आहे. शिवाय उत्पादनाच्या केंद्रापासून दूरवर असलेल्या खेड्यांपर्यंत या खतांची वाहतूक, अपेक्षित ठिकाणी त्यांची साठवण आणि लाभधारकांना योग्य वेळी या खतांची वितरण या गोष्टी पार पाडाव्या लागतात.
रासायनिक खते उत्पादन केंद्रापासून उचलून ती लक्षावधी खेड्यात पोहचेपर्यंत अनेक ठिकाणी त्यांची भरणी, उतरणी, हाताळणी, वाहतूक, साठवण आणि वितरण होत असते. या प्रत्येक बाबतीत उचित दक्षता न घेतल्यास त्यातील पीक पोषक द्रव्यांची गुणवत्ता कमी होते. काही प्रसंगी संपूर्ण खत वापरासाठी अयोग्य बनते आणि त्यामुळे प्रचंड नुकसानही संभवते. विकसनशील राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने होणारा नाश अंदाजे 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. भारतात हे प्रमाण जरी अत्यल्प म्हणजे 1 टक्का मानले तरी त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान मात्र अंदाजे 100 कोटीपर्यंत पोहोचते. म्हणून हे टाळण्यासाठी खतांचे पॅकींग, हाताळणी वाहतूक आणि साठवण ही शास्त्रोक्त पद्धतीने करणे अनिवार्य आहे.
खतांचे गुणधर्म आणि त्यांची साठवण
रासायनिक खते वेगवेगळ्या प्रकारची असून त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मही विभिन्न असतात. म्हणून साठवण करताना खतांच्या गुणधर्मांची माहिती असणे महत्त्वाचे ठरते. ही खते ज्या ठिकाणी साठवली जातात, तेथील हवेतील आर्द्रता, तापमान, त्यांच्यात होणारे बदल, हाताळणी आणि खत भरण्यासाठी वापरलेल्या पोत्यांचा दर्जा या सर्वांचा परिणाम खतांच्या गुणधर्मावर होतो. यातील कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा आढळून आल्यास खतांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
खत साठवणुकीसाठी वापरलेली अयोग्य पोती, हाताळणीमध्ये पोत्यावर पडलेली छीद्र, हवेतील आर्द्रता व दमटपणा यामुळे रासायनिक खते हवेतील बाष्प शोषून घेतात आणि त्यामुळे खत ओले आणि चिकट होते. परिणामतः खतांचे मोठे आणि टणक खडेही तयार होतात. असे खत हाताळणीस अयोग्य ठरते आणि त्याची कार्यक्षमताहीकमी होते.
खत साठवणुकीत होणारे हे बदल सर्व खतांमध्ये सारखेच नसून त्यांच्या गुणधर्मानुसार ते बदलतात. या दृष्टीने खतांचे स्वरूप (भुकटी / स्फटिक / दाणेदार)त्यांच्या कणांचे आकारमान आणि खतांची बाष्प शोषूनघेण्याची क्षमता हे महत्त्वाचे गुणधर्मआहेत. हवेतील आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता काही खतांमध्ये अति जास्त तर काही खतात अति कमी आहे. हवेतील बाष्प शोषून घेण्याचे प्रमाण अमोनियम सल्फेट, यूरिया, अमानियम नायट्रेट, यूरिया अमोनिय फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट आणि कॅलशियम अमोनियम नायट्रेट या खतांमध्ये अनुक्रमे वाढत जाते. विशेषतः यूरिया, नायट्रोफॉस्फेट, कॅलशियम अमोनियम नायट्रेट यासारख्या जलाकर्षक खतांवर जास्त आर्द्रतेमुळे विपरित परिणाम होतो. पोटॅशियम सल्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, डायअमोनियम फॉस्फेट ही खते मात्र या दृष्टीने तुलनात्मकदृष्ट्या जास्त स्थिर आहेत. त्यांचा हवेतील बाष्प शोषणाचा गुणधर्म इतरांपेक्षाबराच कमी आहे.
म्हणून प्रचलित असणारी विविध खते कोणत्या निर्णायक सापेक्ष आर्द्रतेपर्यंत स्थिर राहू शकतात. उदा. अमोनियम नायट्रोफॉस्फेट या खताची निर्णायक आर्द्रतेची मर्यादा सुमारे 56 टक्के आहे, तर हीच मर्यादा यूरियाच्या बाबतीत 85 टक्के इतकी आहे.म्हणून हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण 58 टक्क्यांपेक्षा वाढल्यास त्याचा अनिष्ट परिणम नायट्रोफॉस्फेटवर होऊ लागतो; पण आर्द्रतेचे हेच प्रमाण 58 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याशिवाय यूरियाच्या साठवणुकीत मात्र मोठी समस्या निर्माण होत नाही. म्हणून साठवणुकीच्या वेळी खतांचे विशिष्ट गुणधर्म लक्षात घेणे जरूरीचे आहे.
खताच्या कणांचे आकारमान 1 ते 4 मि. मी. इतके असावे. लहान कण असल्यास ते एकमेकास चिकटतात, मोठेअसल्यास ते सुकत नाहीत व त्यातील ओलाव्यामुळे खताचे खडे बनतात. सिंगल सुपरफॉस्फेट आणि ट्रिपल सुपरफॉस्फेट यामध्ये मुक्त आम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोत्यावर परिणाम होऊन खते साठवता येत नाहीत. खतांच्या पोत्याची निष्काळजीपणे केलली भरणी किंवा उतरणीसाठी हुकाचा वापर करणे, यामुळे खताची सुरक्षित साठवणीचा काळ कमी होतो. हुकाचा वापर करू नये अशी सूचना पोत्यावर असून देखील, प्रत्येक पोत्यावर हुकाच्या वापरामुळे 6 – 10 छिद्र नेहमीच दिसतात. म्हणून खतांची हाताळणीकाळजीपूर्वक करणे फार गरजेचे आहे.
साठवणुकीत खतांमध्ये होणारे बदल
खत निर्मिती केंद्रापासून खतांचा वापर प्रत्यक्षात शेतावर होईपर्यंत खतांची विविध पातळीवर भरणी, उतारणी आणि साठवणूक करावी लागते. परदेशातून आयात केलेल्या खतांची साठवणही बंदरावर करावी लागते. त्यानंतर हंगामी मागणीनुसार खतांचा पुरवठा ग्रामपातळीपर्यंत केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत खतांच्या गुणधर्मानुसार तसेच अशास्त्रोक्त पॅकींग, हाताळणी, साठवण यामुळे रासायनिक खतांच्या गुणधर्मात खालील प्रमाणे बदल घडून येतात आणि खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण व स्वरूप बदलते.
हवेतील बाष्प शोषून घेतल्यामुळे खतातील ओलाव्याचेप्रमाण वाढून खत ओले आणि चिकट बनते. विशेषतः जलाकर्षक खतांवर (उदा. नायट्रोफॉस्फेट) हा परिणाम जास्त दिसून येतो. त्यामुळे खतांचा लगदा बनतो. हे खत हाताळणीस आणि वापरण्यास अयोग्य ठरते.
हवेतील दमटपणा आणि आर्द्रतेचे जास्त प्रमाण यामुळे ओल्या झालेल्या घनरूप खतांचे रूपांतर द्रवरूपात होते. त्यामुळे खतातील द्रवरूप घटक पोत्याबाहेरझिरपूलागतात. त्यामुळे खतांच्या वजनात घट येते. खतांचे वजन आणि गुणवत्ता कमी झाल्यामुळे आर्थिक नुकसानही होते. कॅलशियम अमोनियम नायट्रेट आणि नायट्रोफॉस्फेट या खतांच्या वजनात अशी घट अनुक्रमे 50 टक्के आणि 40 टक्के आढळून आली आहे. मात्र बऱ्याच दिवसाच्या साठवणीनंतरही अमोनियम सल्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट आणि अमोनियम फॉस्फेट ही खते मात्र स्थिर राहू शकतात असे दिसून येते.
उष्णता आणि आर्द्रता यामध्ये सारख्या होणाऱ्या फेरबदलामुळे भुकटी, स्फटिक आणि दाणेदार रूपातील खतांचे मोठे आणि टणक खडे तयार होतात. विशेषतः अमोनियम सल्फेट आणि यूरियाचे मोठ्या खड्यात परिवर्तन होते. अमोनियम फॉस्फेट आणि ट्रिपल सुपरफॉस्फेट मध्ये हे प्रमाण मात्र कमी आहे. नायट्रो फॉस्फेट अर्ध कोरड्या हवामानात असे खडे बनतात.
या भौतिक गुणधर्मातील बदलांबरोबरच खतांच्या रासायनिक गुणधर्मावरही परिणाम होऊन खतातील अन्नद्रव्ये स्वरूप आणि प्रमाण बदलते. दमट हवामानामध्ये खते ओली होतात. त्यातीलअन्नद्रव्येविरघळून द्रवरूपात पाझरून ऱ्हास पावतात आणि पोत्यात फक्त अविद्रव्य घटकशिल्लक राहतात.
नायट्रोफॉस्फेट या संयुक्त खताचे अशा पद्धतीने विघटन होऊन त्यातील अमोनियम व नायट्रेट नत्र द्रावण स्वरूपात बाहेर पडतो.तर पोत्यात फक्त डायकॅलशियम फॉस्फेट उरते. स्फुरदाचीही उपलब्धता कमी होते. कॅलशियम अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट नायट्रेट या खतांमध्येही असेच स्थित्यंतर घडून येते. कॅलशियम अमानियम नायट्रेट खतातील अन्नद्रव्यांचा या पद्धतीने ऱ्हास झाल्यामुळेखताची गुणवत्ताखालावतेआणि पोत्यात फक्त चुना उरतो; परंतु अमोनियम सल्फेट आणि यूरिया या खतांच्या बाबतीत मात्र हा बदल कमी संभवतो. विशषत: दमट हवामानात यूरियाचे विघटन होऊन अमोनियाच्या स्वरूपात नत्राचे अस्तित्त्व हवेत व गोदामात आढळून येते.
सुरक्षित खत साठवणुकीसाठी आवश्यक बाबी
प्रामुख्याने हवेतील आर्द्रता शोषून घेतल्यामुळे खतांच्या गुणधर्मात बदल होतो. त्यामुळे हाताळणी, वापर आणि साठवणीसाठी खतांचा दर्जा खालावतो. पीक उत्पादनाच्या दृष्टीनेही त्यांची उपयुक्तता कमी होते. म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी खतांची शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करणे महत्वाचे ठरते आणि त्यासाठी पुढील बाबी आवश्यक ठरतात.
- खतांची हाताळणी आणि साठवणीच्या दृष्टीने खतांच्या पॅकिंगला सर्वप्रथम महत्त्व आहे. उचीत दर्जाची पोते पॅकिंगसाठी वापरल्यास खतांचे हवेतील आर्द्रतेपासून संरक्षण मिळते. या दृष्टीने गोणपाट तसेच अलीकडे एच. डी. पी. इ. (HDPE: High Density Poly Ethylene) आणि एल. डी. पी. इ. (LDPE: Low Density Poly Ethylene)पोत्यांचा होणारा वापर या बाबतीत कार्यक्षम ठरतो.
- खतांची पोती ओढण्यासाठी तसेच उचलण्यासाठी धातूच्या हुकाचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. त्यामुळे पोत्यांना अनेक ठिकाणी छिद्र पडतात आणि खतांच्या साठवणीचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी हुकाचा वापर शक्यतो टाळावा आणि खतांची भरणी, उतरणी, हाताळणी आणि साठवणूकीची सर्वच कामे काळजीपूर्वक करावीत.
- दमट हवामानात खतांची साठवण करणे ही बाब कठीण बनते. खते साठवणूकीच्या ठिकाणी हवेतील आर्द्रता साधारपणे 60 टक्क्यांपेक्षा कमी राखणे उपयुक्त ठरते; परंतु हेच प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जसजसे वाढत जाते तसतसे जलाकर्षक खतांवर आर्द्रतेमुळे होणारा परिणाम जास्त तीव्र होतो. म्हणून साठवणीच्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण सर्वसाधारणपणे 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
- गोदामातील उष्ण तापमान जास्त वाढू नये, म्हणून दिवसभर गोदामात चांगले वायूजीवन सुरू राहील याची खबरदारी घ्यावी, तर रात्रीच्या वेळी आतील आर्द्रता वाढू नये, म्हणून गोदामाच्या सर्व खिडक्या, व्हेन्टिलेटर्स आणि दरवाजे बंद करावेत.
- घरात साठवणूकीसाठी निवडलेली जागा कोरडी असावी. छप्पर गळके नसावे. जमिनीतून आणि भिंतीतून ओलावा येऊ नये याची काळजी घ्यावी.
- पोत्यांची थप्पी भिंतीपासून अर्धा ते एक मीटर (0.5 ते 1 मी.) अंतरावर ठेवावी. तसेच दोन थप्प्यांमध्येही योग्य अंतर ठेवावे.
- प्रथम आणलेली खते प्रवेशद्वाराच्या सान्निध्यात ठेवावीत व त्यानंतर आणलेली पोती 1 मीटर अंतरावर पुढे ठेवावीत. त्यामुळे सर्वप्रथम खरेदी केलेले खत, वापरासाठीहीप्रथम उचलणे जास्त सोईचे होते.
- खतांच्या पोत्यांचा जमिनीसी प्रत्यक्ष संपर्क टाळावा. त्यासाठी जमिनीपासून 9 ते 12 सें.मी. उंचीचा प्लॅटफॉर्म तयार करावा. त्यासाठी बांबूचा अथवा जंगली लाकडाच्या फळ्यांचा वापर करावा.
- प्लॅटफॉर्मवर प्लॅस्टिक कागद पसरावा. त्यानंतर त्यावर पोती रचावीत. यामुळे हवेचे चलनवलन क्रिया सुधारते व जमिनीस क्वचित प्रसंगी ओलावा आल्यास त्यापासून पोत्यांना संरक्षण मिळते.
- खतांची पोती एकावर एक अशी रचावीत. थप्पींची उंची साधारणपणे 3 मीटर पेक्षा जास्त नसावी. उंची जास्त वाढविल्यास तळाच्या पोत्यातील खताचे, दाबामुळे मोठे खडे बनतात. 3 मीटर उंचीमध्ये एकरावर एक अशी 19 ते 20 पोती बसतात.
- पोती रचताना त्यांची तोंडे चांगली शिवलेली आहेत याची खात्री करावी. पोत्यांची तोंडे बाहेरील दिशेला न करता ती ढिगाच्या मध्यभागाकडे करावीत.
- सर्व प्रकारची खते एकाच थप्पीत एकत्र न रचता, खतांच्या प्रकाराप्रमाणे त्याची साठवण वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे करावी.
- अर्धवट उघडलेली, ओली असणारी, चिकट व कठीण बनलेली खतांची पोती वेगवेगळी साठवावीत.
- एकदा उघडलेले खताचे पोते संपूर्णपणे त्याचवेळी वापरावे. शिल्लक राहिल्यास त्याचे तोंड घट्ट बांधून स्वतंत्र ठेवावे.
सदरील माहितीचा उपयोग रासायनिकखत उत्पादक कंपन्या, खत विक्रेता करणारे किरकोळ व ठोक विक्रेत, खत साठवणुकीचे गोदाम, शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचा पुरवठा करणारे कृषि सेवा केंद्र आणि खतांचा कार्यक्षम वापर करणारे शेतकरी बांधव यांना रासायनिक खतांची साठवणुकीसाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहे. या माहितीच्या आधारे रासायनिक खतांची शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करून साठवणुकी अभावी होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
देशात व महाराष्ट्रामध्ये रासायनिक खतांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून खतांची पॅकिंग, हाताळणी, दळणवळण व साठवणुकीमध्ये खतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. परिणामी अशा खतांचा वापर केल्यास त्याचा कसलाही फायदा पिकांना होत नाही. याउलट शेतकऱ्यांचे नुकसानच होते. या सर्व बाबींचा विचार करून रासायनिक खतांचे साठवण व्यवस्थापन हा लेख तयार करून अभ्यासकांना, वाचकांना व शेतीशी संबंधित अभ्यास करणाऱ्यांना ही माहिती उपयोगी पडेल अशा पद्धतीने मांडणी करून प्रकाशित करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
संदर्भ :
- थॉमस, 1971, पाटील आणि कदम, 1992 आणि टंडन, 1992
- चेतन भारती (2020) : रासायनिक खतांचा तुलनात्मक अभ्यास, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
– शब्दांकन :किशोर ससाणे, लातूर Website Admin : https://www.agrimoderntech.in/