शतावरी उत्पादन तंत्रज्ञान

शतावरीचे उत्पादन घेण्यास भारतामध्ये खूप मोठा वाव असून लागवडीसाठी पोषक हवामान व भौगोलिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. यामुळे शतावरीचे दर्जेदार उत्पन्न घेता येऊ शकते.
शतावरीच्या दोन प्रजातींचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. त्यातील पहिली औषधीसाठीची शतावरी (Asparagus racemosus) व भाजीसाठीची शतावरी (Asparagus officinalis). याशिवाय शतावरीच्या शोभेची शतावरी, महाशतावरी, इत्यादी 22प्रजाती आहेत.
शतावरी हे भाजीपाला वर्गातील महत्त्वाचे पीक असून शतावरी वनस्पतीच्या कुळातील अॅस्परागस (Asparagus) ही भाजीची जात आहे. शतावरी अॅस्परागस ऑफिसिनॅलिस (Asparagus- officinalis) या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. याचे मूळस्थान यूरोप व सैबेरिया असून आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, चीन या देशात अॅस्परागसची लागवड  मोठ्या प्रमाणावर केली जाते. 
शतावरीचे कोवळे कोंब मानवाला खाण्यासाठी उत्तम असल्याने त्याची मागणी वाढत आहे. विशेष आंतराष्ट्रीय स्तरावर शतावरीचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जात असून  भारतात मात्र शतावरी उत्पादनाचे  प्रमाण अल्प आहे.  यामुळेच देशातील शतावरीचे उत्पादन वाढवावे आणि पर्यायी भाजीपाला पीक म्हणून उत्पादन घेतल्यास निश्चितपणे फायदा मिळू शकतो. या उद्देशाने शतावरी-Asparagus उत्पादन तंत्रज्ञान हा लेख तयार करून शेतकऱ्यांसाठी याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.   
प्रस्तुत माहितीच्या आधारे आपल्याला शतावरी या पिकाच्या लागवडीविषयी माहिती होईल. शतावरी या पिकाचे विविध उपयोगाची माहिती होईल. शतावरी पिकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरू शकेल.
शतावरीचे महत्त्व (Importance of asparagus)
शतावरीचा उपयोग आहारात भाजीसाठी आणि सूप तयार करण्यासाठी करण्यात येतो. औषधी शतावरीचा उपयोग विविध प्रकारच्या आजारामध्ये करतात. शतावरीच्या मुळ्या शक्तिवर्धक आहेत. शतावरी बाळंतपणानंतर मातेचा अशक्तपणा घालविण्यासाठी व दूधवाढीसाठी फार उपयुक्त आहे. तसेच गर्भाशयाचे विकार, मूलतत्त्व, प्रदर आणि शुक्रजंतू वाढीसाठी शतावरी उपयुक्त आहे. शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधिवात यासाठी वापरण्यात येते. भाजीच्या शतावरीच्या मुळापासून नवीन कोंब येतात. त्यापासून भाजी बनवितात आणि सूप तयार करतात. शतावरीमध्ये जीवनसत्व ब, क यांचे प्रमाण जास्त असते.
शतावरीचे आरोग्याधिष्ट फायदे (Health benefits of asparagus)
शतावरी प्रजननक्षमतेसाठी आणि महिलांच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप उत्कृष्ट वनस्पती आहे, पण काही कारणांमुळे तिला अनेक उपाय असलेली वनस्पती असे म्हटले जाते. शतावरीचे आरोग्याधिष्टीत होणारे विविध फायदे खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
  1. शतावरी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे.
  2. ताण – तणाव कमी करण्यास मदत होते.
  3. संधिवाताच्या आजार व लक्षणांपासून आराम मिळते.
  4. संशोधनाआधारे पुरुषांमधील लैंगिक इच्छा सुधारण्यास मदत होते.
  5. संगोपक मातांसाठीचे लाभदायक आहे.
  6. एंटीबॉयटिक म्हणून कार्य करते
  7. अतिसारामधून आराम मिळतो.
  8. शतावरी केसांसाठी चांगली आहे.
  9. रक्तशर्करा कमी करणे,
  10. प्रतिकार शक्ती वाढवते
  11. कर्करोग काही प्रमाणात टाळता येतो.
शतावरीचा प्रसार   
भारतामध्ये भाजीच्या शतावरीची लागवड अलीकडच्या काळामध्ये वाढत असून पूर्वी हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात होणारी लागवड महाराष्ट्रात नाशिक, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. औषधी शतावरीची लागवड जंगलामध्ये दिसून येते. महाराष्ट्रात शतावरीखालील क्षेत्र वाढत आहे. उत्पादनातही वाढ होत असून शतावरीला परदेशातूनही मागणी येत आहे. तसेच देशांतर्गत उत्पादनवाढीमुळे उपलब्धता वाढून शतावरीची विक्री नजीकच्या भविष्यात वाढेल. शतावरीच्या प्रक्रियायुक्त पदार्थांनासुद्धा मागणी वाढेल. यामुळे शतावरीची मागणी व प्रसार ‍दिवसेंदिवस वाढत जात आहे. कारण भारतामध्ये शतावरी लागवडीस खूप मोठा वाव आहे. शेतकरी बांधवांनी इतर पिकांच्या तुलनेत शतावरीची लागवड केल्यास निश्चितपणे भरघोस शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
शतावरी उत्पादन (Asparagus production)
तक्ता क्र. 1
आंतरराष्ट्रीय स्तरावर शतावरीचे प्रमुख उत्पादक देशांची उत्पादन स्थिती (2018)
अ. क्र.
शतावरी उत्पादक देश
उत्पादन मे. टन
(000 MT)
भाग
(Share %)
1
चीन
7,982.23
87.64
2
पेरू
360.63
3.96
3
मेक्सिको
277.68
3.05
4
जर्मनी
133.02
1.46
5
स्पेन
68.40
0.75
6
इटली
49.00
0.54
7
संयुक्त राज्य
35.46
0.39
8
जपान
26.94
0.30
9
थायलंड
23.78
0.26
10
इराण
20.96
0.23
एकूण
8,978.10
Source: Food & Agricultural Organization (FAO)
वरील तक्ता क्र. 1 हा आंतरराष्ट्रीय स्तरावर शतावरीचे प्रमुख उत्पादक देशांची उत्पादन स्थिती (2018) दर्शविणारा तक्ता आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर शतावरीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशाच्या तुलनेत चीनचा प्रथम क्रमांक असून त्याचे उत्पादन 7,982.23मे.टन इतके आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरू हा देश असून याचे उत्पादन 360.63 मे.टन एवढे आहे. याच खालोखाल  मेक्सिको 277.68 मे.टन, जर्मनी 133.02 मे.टन, स्पेन 68.40 मे.टन, इटली 49.00 मे.टन, संयुक्त राज्य 35.46 मे.टन, जपान 26.94 मे.टन, थायलंड 23.78 मे.टन, इराण 20.96 मे.टन या देशांच्या उत्पादनाचा क्रम लागतो.
वरील विश्लेषणाचा विचार करता शतावरी उत्पादनात चीन 7,982.23 मे.टन व पेरू 360.63 मे.टन उत्पादन घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असून शतावरी उत्पादनात भारताचा क्रमांक निरंक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारत व भारतातील इतर राज्यात शतावरीसाठी लागणारे भौगोलिक हवामान पोषक व चांगले असून शतावरी लागवडीसाठी उत्तम प्रकारची संधी उपलब्ध झालेली आहे. यामुळे शतावरीचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे स्थान निश्चित करण्यासाठी मोठा वाव निर्माण झाल्याचे  स्पष्ट होते. 
शतावरी उत्पादन तंत्राचे घटक (Elements of Asparagus Production Technique)
प्रस्तुत शतावरी-Asparagus उत्पादन तंत्रज्ञान या लेखात शतावरीचे महत्त्व, हवामान, जमीन, उन्नत वाण, अभिवृद्धी, हंगाम, लागवड पद्धती, खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, आंतरपिके, महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण, काढणी व उत्पादन आदी बाबींचा ऊहापोह करण्यात येत आहे.
हवामान (Climate)
शतावरी पिकाला समशीतोष्ण व उष्ण हवामान चांगले मानवते. भाजीच्या शतावरीसाठी थंड व समशीतोष्ण वातावरण अनुकूल असते. पिकाच्या वाढीसाठी महाराष्ट्रात हे पोषक तापमान उपलब्ध आहे त्यामुळे शतावरीचे पीक घेता येते व कोणत्याही ठिकाणी शतावरीची लागवड करता येते.
जमीन (Soil)
शतावरी पिकासाठी उत्तम निचरा होणारी, पोयट्याची, वाळूमिश्रित आणि सेंद्रिय खताचे प्रमाण जास्त असणारी जमीन उत्तम असते. सर्वसाधारणपणे भुसभुशीत असलेल्या जमिनीत कंदाची वाढ चांगली होते व त्यापासून चांगल्या प्रकारचे कोंब मिळू शकतात. 6.5 ते 7.5 सामू (पीएच) असणारी जमीन, उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन शतावरीला चालते. निचरा न झाल्यास करपा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.
उन्नत वाण (Improved Varieties)
महाराष्ट्रात अॅस्पॅरगस ऑफीसिनॅलीस या प्रकारातील मेरी वाशिंग्टनया वाणाची चांगल्या उत्पादनासाठी भाजीसाठी शिफारस करण्यात येते. 

लागवड
शतावरीची लागवड बियाणे पेरून किंवा क्राउन्सपासून करता येते. बियाणे रोपवाटिकेत पेरून 2 महिन्यांत रोपे लागवडी योग्य होतात.
रोपवाटिका (Nursery)
उन्हाळ्यामध्ये चांगल्या तापलेल्या जमिनीवर एक-दोन पाऊस पडल्यावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी जमीन भुसभुशीत करून 1 मी. X 3 मी.  आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात 1 पाटी कुजलेले शेणखत मिसळावे. एक हेक्टर लागवडीसाठी 1 किलो बियाणे लागते. गादीवाफ्यावर बियाणे 5 ते 7 सेंमी. अंतरावर व 2सेंमी. खोल पेरून मातीने झाकून द्यावे.
लागवड हंगाम (Planting Season)
शतावरीची लागवड ही खरीप हंगामात केली जाते. शतावरीची लागव ड 15 जूलै ते 20 सप्टेंबर पर्यंत करणे गरजेचे असते. यानंतर  लागवड केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता असते कारण किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शतावरीचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असल्यास लागवड शक्यतो वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.
शतावरी लागवडीची पद्धत (Method of Asparagus Planting)
पावसाळी हंगामात रोपे तयार करून लागवड करतात. लागवडीपूर्वी शेतामध्ये 1.5 मीटर अंतरावर 45 X 45 X 45 सेंमी.आकाराचे खड्डे काढावेत. या खड्यांमध्ये प्रत्येकी एक पाटी कुजलेले शेणखत घालावे तसेच हुमणीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम फोरेट हे दाणेदार कीटकनाशक मिसळून खड्डे भरावेत. चांगला पावसाळा सुरू झाल्यावर जुलै -ऑगस्ट महिन्यात पुनर्लागवड करावी. रोप काढण्याअगोदर रोपवाटिकेस आदल्या दिवशी हलके पाणी द्यावे म्हणजे रोपांना इजा होणार नाही.
रोप काढल्यानंतर ज्या रोपांच्या मुळांना मांसल मुळे तयार झाले असतील अशीच रोपे पुनर्लागवडीसाठी वापरावीत. पाऊस नसल्यास लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. शेतात सरी पद्धतीने किंवा वाफे तयार करून 120 X 45 सेंमी. किंवा 90 X 60 सेंमी. अंतरावर लागवड करता येते. पावसाने ताण दिल्यास वेल चांगली वाढेपर्यंत 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि हंगामाप्रमाणे15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. योग्य आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात 1 पाटी कुजलेले शेणखत मिसळावे. एक हेक्टर लागवडीसाठी 1 किलो बियाणे लागते. गादीवाफ्यावर बियाणे 5 ते 7 सेंमी. अंतरावर व 2 सेंमी. खोल पेरून मातीने झाकून द्यावे.
बियाण्याची लागवड झाल्यांनतर त्याला सुरवातीला 5-6 दिवस रोज पाणी द्यावे. रोपे साधारणपणे 6 आठवड्यांत तयार होतात.
खत व्यवस्थापन (Fertilizer management)
शतावरीला भरपूर सेंद्रिय खतांचा वापर करावा. शेणखताबरोबर कोंबडीखत, निंबोळी खत, करंज, एरंड पेंड तसेच गांडूळ खत, जिवाणुखते वापरावी. लागवडीच्या वेळी शेतामध्ये 20 ते 25 गाड्या शेणखत मिसळावे. लागवड झाल्यानंतर शतावरीचे वेल चांगले वाढू लागल्यावर प्रत्येक वेलाला आळे पद्धतीने 50 ग्रॅम 15:15:15 सुफला खताचा हप्ता द्यावा.
पाणी व्यवस्थापन  (Water management)
शतावरी हे बहुवर्षीय पीक असल्याने वर्षभर पाणीपुरवठा असावा लागतो. उन्हाळ्यात 2-3 महिने पाणी नसल्यास झाडे सुप्तावस्थेत राहू शकतात. ठिबक सिंचन पद्धतीनेही पाणी देता येते. जमिनीच्या मगदुरानुसार नियमित पाणी द्यावे
आंतरमशागत (Intercultural)
औषधी शतावरीचे वेल चांगले वाढू लागल्यावर प्रत्येक वेलीला 5-6 फूट उंचीचे बांबू किंवा एरंड लावून आधार द्यावा. याशिवाय लोखंडी अँगल व तारेचा वापर करून मंडपावरही वेल वाढविता येतो. भाजीसाठी चांगले कोंब मिळण्यासाठी झाडाच्या बुंध्याजवळ मातीची भर देणे आवश्यक असते. ही भर वर्षातून दोन वेळा द्यावी. भाजीच्या शतावरीला आधाराची आवश्यकता नाही. याशिवाय मधून मधून झाडाच्या बुध्यांलगतचे तण खुरपणी करून काढावे.
छाटणी (Pruning)
भाजीसाठी शतावरीची लागवड केलेली असल्यास दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर शतावरीच्या झुडूपवजा रोपांची जमिनीला लागून छाटणी करावी; त्यामुळे चांगल्या प्रतीचे कोंब मिळतील. पावसाळा चालू झाल्यावर खतांची मात्रा द्यावी.
शतावरी : किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण
जांभळा डाग, रस्ट, फ्यूशेरियम किरीट, रूट आणि लोअर स्टेम रॉट, फायटोफोथोरा किरीट, रूट आणि भाला रॉट, बीटल, फिडस्, कटवर्म, आर्मीवर्म, गुलाब चाफर आणि शतावरी खाण हे आढळतात. शतावरी लागवड हे कीटक, रोग आणि नियंत्रण उपाय ओळखण्यासाठी कोणत्याही संबधित विभागाशी संपर्क साधा.
शतावरी या पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसून आलेला आहे. शतावरी हे अतिशय काटक व रोगप्रतिकारक पीक असल्याने पीकसंरक्षणावर खर्च करावा लागत नाही; असा अनुभव आहे.
काही वेळा पाण्याचा निचरा चांगला न झाल्यास करपा रोग येऊ शकतो. म्हणून चांगला निचरा होणारी जमीन निवडावी आणि डायथेन एम-45 ची 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
काढणी (Harvesting)
लागवडीनंतर झाडांची उंची सुमारे 120-150 सेंमी. झाल्यावर म्हणजे 6 – 8 महिन्यांनी काढणी करतात. दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी लागवडीनंतर 10-15 महिन्यांनी शतावरीची काढणी करावी. कोंबांची साईज पेन्सिल साईजपेक्षा जास्त असावी व लांबी 20 – 25 सेंमी. असावी.
भाजीपाल्यासाठी शतावरीच्या कोंबांची छाटणी जमिनीपासून ब्लेडने किंवा कात्रीने करावी. कोंबांची छाटणी रोज सकाळी करावी लागते. कोंबांचे झाडामध्ये रूपांतर होण्यापूर्वी छाटणी करावी अन्यथा कोंबाच्या प्रतीवर विपरीत परिणाम होतो. छाटणी झाल्यानंतर कोंब त्वरित बाजारामध्ये पाठवावेत. कोंबांचे 1 किलोंचे गड्डे बांधून विक्रीसाठी पुठ्याच्या खोक्यात पॅकिंग करून पाठवतात. औषधी शतावरीच्या मुळांची पहिली काढणी 1.5 ते 2 वर्षांनी करावी. त्यानंतर 10 ते 15 वर्षांपर्यंत मुळांचे उत्पादन घेता येते.
उत्पादन (Production)
शतावरीच्या 1 हेक्टर क्षेत्रातून साधारणत: रोज 5 ते 15 किलो उत्पादन मिळते. याप्रमाणे वर्षभरात हेक्टरी 2.5 ते 7.5 टन कोंबांचे उत्पादन मिळते. 1 हेक्टर क्षेत्रातून 12 ते 15क्विंटल सुकलेल्या मुळ्या मिळतात. शतावरीची फळे 10 मि.मी. आकाराची असतात, त्यात 4 – 5 मिमी आकाराचे बी असते. बी धरताना कोंब सुकू नयेत म्हणून मधमाश्या पाळाव्या. पूर्ण पिकलेल्या फळांचेच बी काढावे.
अशाप्रकारे शतावरी उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पन्न घेता येऊ शकते. शतावरी इतर भाजीपाला पिकाच्या तुलनेत अधिक सरसपणे उत्पादन देणारे पीक आहे. यामुळे शतावरी उत्पादन घेण्यास स्पर्धा करणारे शेतकरी कमी असल्यामुळे उत्पादीत शतावरीला चांगला बाजारभाव मिळू शकतो. त्यामुळे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शतावरीचे पीक वरदान ठरून अधिक शाश्वत उत्पादन देऊ शकते, असे लेखकाचे मत आहे.
सदर माहितीचा उपयोग शतावरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण असून त्यांना शतावरीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन करणे शक्य होणार आहे. 
संदर्भ (References)
शतावरी उत्पादन तंत्रज्ञान, भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग – 1 : पाठ्यपुस्तिका –2, य.च.म.मु.वि., नाशिक
प्रा. गोविंद अंकुश, सहयोगी प्राध्यापक, अदित्य कृषि महाविद्यालय, बीड
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन
Prajwal Digital

Leave a Reply