कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र

भाजीपाला वर्गातील शेवगा हे महत्त्वाचे नगदी व्यापारी पीक म्हणून ओळखले जाते. यामुळेच महाराष्ट्रात शेवग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते.
शेवग्याची लागवड कमी खर्चात होते. कमी कालावधीत पक्व होतो. शेवग्याला वर्षभर बाजारपेठ समाधानकारक असते. कमी कष्टात येणारे पीक आहे. तसेच इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत हे पीक अधिक सरस आहे. कारण शेवग्याच्या शेंगा ह्या नाशवंत नसून त्या अधिक काळ टिकू शकतात. त्यामुळे माल नाशवंत होण्याची भीती वाटत नाही आणि आर्थिक नुकसान कोणत्याही प्रकारची होत नाही.
शेवगा पिकास स्वच्छ व दमट हवामान अतिशय अनुकूल ठरते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत चांगल्या प्रकारे करता येते. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या ते मध्यम जमिनीत शेवगा लागवड चांगली करता येते. याच उद्देशाने कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र याविषयी शेतकरी बांधवांना सखोल माहिती देण्यासाठी तसेच त्यांचे शेवगा लागवडीपासून आर्थिक उत्पन्न वाढावे आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचा शेवगा पुरवठा करता यासाठी तयार करण्यात येत आहे.
शेवग्याचे व्यापारी महत्त्व
  • शेवग्याची लागवड ग्रामीण व शहरी भागामध्ये व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  • कमी कष्टात, कमी लागवडी खर्चात शेवग्याचे दर्जेदार उत्पादन घेता येते.
  • कमी पाण्यात व कमी रासायनिक खतांद्वारे शेवग्याचे उत्पादन चांगले मिळते.
  • कमी वेळेत शेवग्याचे किफायतशीर उत्पादन घेता येते.
  • वर्षभरात केव्हाही शेवग्याची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.
  • शेवग्याला तिन्ही हंगामात बाजारभाव चांगला मिळतो.
  • शेवगा जास्त काळ टिकवता येत असल्यामुळे नासाडी व कोणतेही नुकसान होत नाही.

शेवग्याचे आरोग्याधिष्टित उपयोग  

शेवग्याच्या शेंगाचा उपयोग दररोजच्या भाजीमध्ये केला जातो. शेवग्याची शेंगा पचनास सुलभ व चविष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात गृहीणी भाजीसाठी जास्त प्रमाणात वापरतात. शेवग्याच्या पानात व शेंगात ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्ते तसेच लोह, चुना, प्रथिने भरपूर प्रमाणात आढळतात. वाळलेल्या बियांचे तेल रंगहीन स्वच्छ असल्याने घडयाळ दुरूस्तीत वापरले जाते. शेवगा वीर्यवर्धक, कफनाशक व पित्तनाशक आहे. शेवग्याच्या मुळांचा काढा शरीरातील टयूमर नाहीसा करतो. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याकरिता शेवग्याच्य बियांची पावडर अतिशय गुणकारी ठरते. अशा प्रकारे शेवग्याचे विविध फायद्याचे मानवी आहारात होतात. त्यामुळे शेवग्याला विशेष महत्त्व आले आहे.
शेवग्याचे मूळ, फुले, पाने आणि साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. शेवग्याची पाने दुभत्या जनावरांना दिल्यास दूध वाढते असा समज आहे. तसेच अनेक व्याधींवर शेवगा बहुउपयोगी गुणकारी आहे. वाताचे विकार असणाऱ्या, सूज येणाऱ्यांना आराम मिळतो. याच्या पानांचा रस मधात घालून अंजन केल्याने नेत्ररोग दूर होतात. मुळांचा काढा घेतल्याने उचकी थांबते, पानाच्या रसाने डोक्याला मर्दन केल्यास कोंडा निघून जातो.
शेवग्याच्या शेंगाचा आहारात भरपूर वापर केल्यास सांधेदुखी थांबते. शेवग्याच्या शेंगा आणि  पाने यांमध्ये जीवनसत्व अ, ब आणि क तसेच लोह आणि चुना ही खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. शेवग्याच्या शेंगांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागापासून २६ कॅलरी तर १०० ग्रॅम हिरव्या पानांपासून ९२ कॅलरी ऊर्जा मिळते.
तक्ता क्र. १
शेवग्याची १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामधील अन्नघटकांचे प्रमाण
अ.क्र.
अन्नघटक
अन्नघटक
शेंगा
पाने
पाणी
८७
७६
प्रोटीन्स
२.५
६.७
खनिजे
०.०३५
०.४५
लोह
०.००५
०.००७
जीवसत्व ब
०.००१२
०.००११
उष्मांक
२६
९२
कार्बोहायड्रेटस
३.७
१२.५
फॅट्स
०.१
१.७
कॅल्शियम
०.०३
०.४४
१०
कॅरोटीन
०.००१
०.००७
११
जीवनसत्व क
०.१२
०.२२
शेवगा लागवडीस वाव
महाराष्ट्रामध्ये सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे प्रमुख पिकांचे उत्पादनात दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. तसेच आपल्याकडे पडीत व शेतीउपयोगी नसलेल्या जमिनीवर मशागत करून शेवगा लागवड केल्यास उत्पादन वाढविता येते आणि अयोग्य जमिनीचा पुनर्वापर करता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र या पद्धतीचा अवलंब केल्यास, त्यापासून वर्षभर नगदी स्वरूपात पैसा कमावता येईल, शेतकरी बांधव व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांचे आर्थिक सशक्तीकरण उत्तमोत्तम होत राहील. यात काही शंका नाही.    
हवामान
शेवगा लागवडीसाठी सर्वसाधारण ७०० ते १००० मिली मीटर पाऊस चांगला मावतो. शेवगा पीक हवामानास अनुकूल असल्याने वर्षभरात कोणत्याही हंगामात घेता येते. मात्र शेवग्याच्या उत्तम वाढीसाठी सम आणि दमट हवामान चांगले मानवते. २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात पिकाची चांगली वाढ होते. तापमान ४० सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास फूलगळ होते. जून ते जुलै महिन्यात शेवगा लागवड केल्यास उत्पादन चांगले मिळते.  
जमीन
शेवगा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसेच मध्यम खडकाळ जमीन सुद्धा आवश्यक आहे. यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. जमिनीत सेंद्रिय वा कंपोष्ट खते चांगल्या मिसळावे. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळेल.
शेवगा सुधारित वाण
शेवग्याच्या बहुतांशी स्थानिक वाणाची लागवड केली जाते. शेवग्याचे दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्यासाठी शेवगा लागवडीपूर्वी चांगले गुणधर्म असणाऱ्या जातींची निवड करणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे पीक उत्पादन वाढते, शेंगाची गुणवत्ता चांगली राखली जाते, शेंगाला बाजारपेठेत किफायतशीर दर मिळतो आणि ग्राहकांना शेंगा विक्रीसाठी आकर्षित करता येते. त्यामुळे अशा शेवग्याच्या निवडक जाती पुढील प्रमाणे आहेत :  
पीकेएम-१ : हा वाण कमी पाण्यावर कोरड्या व उष्ण हवामानात भरपूर आणि बारमाही फळे देतो. एका झाडापासून २५० ते ३०० शेंगा मिळतात. शेंगाची लांबी ६५ ते ७९ सेंमी. पर्यंत असते.
पीकेएम-२ : या जातीच्या शेंगा आखूड २० सेंमी. व झाडे बुटकी असतात. प्रत्येक झाडापासून ४५० ते ५०० शेंगा मिळतात.
कोकण रूचिरा : हा वाण कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेला बहुवर्षीय आहे. हा वाण ५ ते ६ मीटर उंच वाढतो. झाडास १६ ते २२ फांद्या असतात. शेंगा त्रिकोणी आकाराच्या व चवीला स्वादिष्ट असतात.
लागवड पद्धत
शेवगा व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास दोन झाडात व दोन ओळीत ४ किंवा ५ मीटर अंतर ठेवावे. पावसाळ्यापूर्वी दोन फूट लांब, रूंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्डयामध्ये पोयटा माती, चांगले कुजलेले शेणखत ३-४ घमेले, सुपर फॉस्फेट १ किलो आणि फॉलीडॉल पावडर ५० ग्रॅम टाकावी. अशा प्रकारे सर्व खड्डे भरून घ्यावेत. शेतीच्या बांधावर लागवड करताना ३ ते ४ मीटर अंतर ठेवावे. कमी पावसाच्या प्रदेशात जून-जुलै मध्ये पहिले एक – दोन पाऊस पडून गेल्यावर लागवड करावी. पावसास उशीर झाल्यास खड्डयात मध्यभागी करून चोहोबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी. कलम लावल्यास त्याच्या वरच्या भागावर शेणमातीचा गोळा लावावा. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पुढे ६ ते ८ महिने गरज पडल्यास पाणी देऊन झाडे जगवावी, किंवा प्रत्येक खड्डयात २ ते ३ मीटर पाणी बसेल, अशा क्षमतेने मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे व त्यामध्ये ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे. झाडे मोठी झाल्यावर पाणी देण्याची गरज भासत नाही. आंतरपीक म्हणूनही शेवगा घेता येतो. 
अभिवृद्धी  
शेवग्याची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून किंवा फाटे कलमापासून केली जाते. परंतु बियांपासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणेच गुणधर्म असलेली झाडे मिळू शकत नाहीत. तसेच अशा लागवडीपासून उत्पादन उशिरा मिळते. फाटे कलमासाठी ५ ते ६ सेंमी. जाडीच्या सुमारे १ ते १.५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.
आंतरमशागत
शेवग्या झाडांची अळी खुरपून स्वच्छ ठेवावीत. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. शेवग्याच्या झाडांना खते देताना प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद व ७५ ग्रॅम पालाश द्यावे. तसेच इतर सेंद्रिय खते गरजेनुसार द्यावीत.
छाटणी
शेवगा लागवडीनंतर चार महिन्यांनी पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून एक मीटर अंतरावर छाटावे आण चार दिशांना चार फांद्या वाढू द्याव्यात. त्यानंतर पुन्हा ७ ते ८ महिन्यांनी चारही फांद्या मुख्य आराखडा तयार होईल व झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे होऊन उत्पादनात वाढ होते. पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल – मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी, म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.
खत व पाणी व्यवस्थापन
शेवग्याच्या प्रत्येक झाडास दरवर्षी १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र, ७५ ग्रॅम स्फुरद व ७५ ग्रॅम पालाश खतांची मात्रा द्यावी. तसेच शेवगा पीक अवर्षप्रणव भागातील पीक असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही, परंतु शेवग्याचे झाड दोन ते तीन वर्षांपर्यंत लहान असते त्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे. आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असल्यास आवश्यकतेनुसार शेवग्यास पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
पीकसंरक्षण
शेवगा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु काही वेळा जून-ऑगस्ट महिन्यात पानाची गळ होते. खोड व फांद्यावर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोपे मरतात या रोगाच्या नियंत्रणासाठी बावीस्टीन १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून किंवा बोर्डोमिश्रण ०.२५ टक्के फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास इतर शिफारशीत केलेल्या औषधांचा वापर करावा. रसायनाचा वापर करीत असताना तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.
शेवग्याच्या झाडास खोड व फांद्या पोखरणाऱ्या, पाने गुंडाळणाऱ्या, फुले व शेंगा खाणाऱ्या अळीपासून प्रादुर्भाव होतो. अळ्या खोड पोखरून आत शिरतात. त्यामुळे झाडे कमकुवत होऊन उत्पादन कमी मिळते. झाडाच्या बुंध्याजवळ अळीने बाहेर काढलेला भुसा दिसून येतो. अशा छिद्र चिखलाने बंद करून घ्यावे. पाने गुंडाळणाऱ्या अळीचा तसेच फुले व कोवळ्या शेंगा खाणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी १५ मिली फ्रिप्रोनिल किंवा २० मिली प्रोफेनोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच जमिनीवर सुद्धा या कीटकनाशकाची फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
शेवगा लागवडीनंतर साधारणपणे सहा महिन्यात फुले येऊन पुढे ८ ते १० महिन्यात शेंगा पक्व होऊन काढणीस तयार होतात. रोपे वापरून लागवड केल्यास १२ ते १८ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. शेंगाची जाडी एक इंच झाल्यावर शेंगा काढणीस तयार झाल्या आहेत असे समजावे. अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. नंतर त्या ओल्या गोणपाटात बांधून बाजारात पाठवाव्यात. लांबच्या बाजारपेठांसाठी गोणपाटावर प्लॅस्टिक पेपर गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. एक वर्षानंतर दरवर्षी एका झाडापासून २५ ते ५० किलो शेंगाचे उत्पादन मिळते.
कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र हा लेख महाराष्ट्रातील तमाम भाजीपाला उत्पादक, शेतीवर अवलंबून असणारे मजूर आणि नगदी पिके घेणारे शेतकरी किंवा आता नवीन शेवगा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर माहिती महत्त्वपूर्ण व उपयुक्त ठरेल, तसेच त्यांच्या शेवगा लागवड उत्पादनात वाढ होईल, किफायतशीर व दर्जेदार शेवग्याचे उत्पान घेणे शक्य होईल. सदर लेखामध्ये लेखकांनी कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र याविषयी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी हा लेख आपणास आवडला असल्यास आपल्या संबंधित दहा शेतकऱ्यांपर्यंत हा लेख शेअर करावा.      
संदर्भ :
  1. सुवर्णा पाटील, डॉ. मधुकर भालेकर, भाजीपाला सुधार प्रकल्प, म.फु.कृ.वि.राहूरी
  2. भाजीपाल्याचे उत्पादन भाग-१, पाठ्यपुस्तिका-२, य.च.म.मु.वि., नाशिक
– शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर 
Prajwal Digital

1 thought on “कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र”

Leave a Reply