तूर लागवडीचे सुधारित तंत्र

तूर हे महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून तूर डाळ मानवी आरोग्याला प्रथिने पुरविणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात तूरीचे व्यापारी तत्त्वावर उत्‍पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच तूरीचे पीक कोरडवाहू भागात, अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकत असल्यामुळे तूरीची लागवड प्राधान्यक्रमाने शेतकरी बांधव करत आहेत. तूरीचे पीक विविध पीक पद्धतीमध्ये आंतरपीक पीक म्हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत जात आहे.  

महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात विशेषत: मराठवाड्यात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकरी बांधव खरीपाची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खरीप हंगामात घेतल्या जाणऱ्या पिकांपैकी तूर हे महत्त्वाचे पीक असून तूरीची लागवड चांगल्या प्रकारे करता यावी, तूरीचे उत्पादन वाढावे, तूरीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढावी, सुधारित तूर लागवडीची शेतकरी बांधवांना अद्यावत व आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी, त्यामध्ये बियाणे, बीजप्रकिया, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश करण्यात येत आहे. सदर लेखाचा उद्देश बहुसंख्य तूर उत्पादक शेतकरी बांधवांना कृषि विद्यापीठे व विविध संशोधन संस्थेने विकसित केलेले तूर लागवडीचे तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळावी असा आहे. सुधारित तूर लागवडी विषयी आधुनिक व दर्जेदार माहिती शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न लेखकांनी या लेखात केला आहे.

तूरीची कमी उत्‍पादनाची कारणे

 1. तूर लागवड व उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान शेतकऱ्यांना अवगत नसणे.
 2. तूरीची लागवड पारंपारिक पद्धतीने करणे.
 3. जास्त उत्पादन देणाऱ्या तसेच किडी  व रोगांना प्रतिकारक्षम असणाऱ्या जातींबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसणे.
 4. खरीप हंगामातील तूर लागवड ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते त्‍यामुळे खत, पाणी व्यवस्थापन याकडे शेतकरी दुर्लक्ष करतो. त्यामुळे पीक उत्पादनात जवळपास 50 टक्के इतकी घट  येते.
 5. तूरीची पेरणी योग्य वेळ न करणे.
 6. तूरीच्या पिकांवर किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचा अभाव.

तूर उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबी :

 1. तूरीची लागवड सुधारित तंत्रज्ञानाने करावी.
 2. कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित व संकरित जातींचा अवलंब करावा.
 3. तूरीची पेरणी शक्यतो जून पहिला पंधरवाडा ते 31 जून पर्यंत करण्यात यावी.
 4. तूरीच्या बियाण्याला पेरणीपूर्वी कार्बेन्डेझिम व रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
 5. तूरीची पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने आधुनिक  यंत्राद्वारे करण्यात यावी.
 6. तूरीमध्ये  सोयाबीन + सुर्यफूल अशा आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.
 7. तूरीला घाटे लागण्याच्या अवस्थेत किंवा परिपक्व होण्याच्या कालावधीत दोन संरक्षित पाणी द्यावे.
 8. काढणी व मळणीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
 9. मळणी झाल्यानंतर धान्य चांगले वाळवून व कीडमुक्त पोत्यात स्वच्छ करून भरावे.

तूर लागवडीचे सुधारित तंत्र

प्रस्तुत लेखामध्ये तुरीसाठी लागणारे हवामान व जमीन तसेच तूरीचे सुधारित वाणाची निवड, बीजप्रक्रिया, पूर्व मशागत, बियाणे प्रमाण, लागवड हंगाम, लागवड पद्धत, आंतरमशागत, आंतरपिके, खत व पाणी व्यवस्थापन, किडीं व रोगांचे व्यवस्थापन, काढणी, मळणी, साठवण व उत्पादन आदी घटकांविषयी माहिती देण्यात येत आहे.

हवामान :

तूर पिकास उष्‍ण व दमट हवामान  चांगले मानवते. ज्या प्रदेशात पर्जन्यमान 750 ते 1000 मिलीमीटर आहे. अशा प्रदेशात हे पीक चांगले येते. पुरेसा ओलावा, कोरडे हवामान व स्‍वच्छ सूर्यप्रकाश पिकास आवश्‍यक असतो. ढगाळ वातावरणात फुलगळ आधिक होते व परिणामी शेंगांमध्ये दाणेभरले जात नाहीत. पिकाच्या शाखीय वाढीच्या काळात पाण्याची गरज आधिक असते. सामान्यपणे तापमान 21 ते 25 अंश से. पोषक असते. बियाची उगवण होताना 15 अंश से. तापमानाची गरज असतेव त्यानंतर यापिकास पिकाचा उत्पादनक्षम कालावधी संपेपर्यंत 40 अंशसे. तापमान मानवते. महाराष्ट्राच्या मध्‍य महाराष्ट्र पठारी विभाग, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश, उपपर्वतीय विभाग इ. भागांमध्ये तूर पिकाची लागवड केली जाते.

जमीन :

तूर पिकास मध्‍यमते भारी, खोल, पाण्याचा उत्तम निचऱ्याची 45-60 सें.मी. खोल जमीन निवडावी. क्षारयुक्‍त, चोपण, पानथळ जमीन यापिकाच्या लागवडीकरिता वापरू नये. जमिनीत गंधक, कॅल्शियम व मँगनीज सूक्ष्‍म अन्‍नद्रव्याची कमतरता नसावी. तूर पीक काढणीनंतर जमिनीत पडणारा पाला-पाचोळा यांपासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्‍य सुधारण्यास मदत होते. तूर पिकामुळे एकरी 50-80 किलो नत्र जमिनीत साठविले जाते व पुढील पिकास उपलब्‍धहोते.  जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. तूरपीक अल्प प्रमाणात क्षार सहनशील असल्याने जमिनीचा आम्‍ल-विम्‍लनिर्देशांक (सामू) 8.4 असला तरीही चालतो. जमिनीत मातीचे प्रमाण 45 टक्के, सेंद्रीय पदार्थ 5 टक्के, हवा 25 टक्के पाणी 25 टक्केहे योग्‍य प्रमाणातअसावे. अशा प्रमाणे तूरीसाठी जमीन निवडावी.

सुधारित वाणाची निवड :

महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता महाराष्ट्राकरिता आयसीपीएल -87, युपीएएस-120, एकेटी -8811, विपुला, बीएसएमआर -853, अशा या वाणाची शिफारस केलेली आहे. कारण हे वाण स्थानिक वाणांपेक्षा 15-20 टक्केआधिक उत्पादन देतात. या शिवाय मरव वांझ रोगप्रतीकारक्षम आहेत. तसेच महाराष्ट्रासाठी उपयुक्त व दर्जेदार तूरीचे शिफारस केलेल्या वाण, कालावधी, गुणवैशिष्ट्ये, उत्पादन याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे: 

आशा (आय. सी. पी. एल. 87119) : हा वाणाची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात इ. राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. पिकांचा पक्‍व होण्याचा कालावधी सरासरी 170-200 दिवसांचा आहे. दाणे आकाराने टपोरे व रंग तांबडा असून, मर आणि वांझ रोगांना प्रतिकारक्षम आहे.  या वाणापासून प्रतिहेक्टरी सरासरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.

प्रगती (आय. सी. पी. एल.- 87) : या वाणाच्या झाडाची वाढ बुटकी असून शेंगा झुपक्याने लागतात. शेंगामधील दाणे मध्‍यम आकाराचे व रंगाने तांबडे असतात. पीक पक्वतेचा एकुण कालावधी सरासरी 120-125 दिवस इतका असतो. हा वाण लवकर पक्‍व होणारा असल्याने शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय आहे. सरासरी उत्पादन 20-25 क्विंटल प्रति हेक्टरी  मिळते.

अमोल (बी. डी. एन.- 708) : या वणाच्या शेंगामधील दाणे मध्‍यम आकाराचे असून रंगाने तांबडे आहेत. सरासरी उत्पादन 18-20 क्विंटल प्रतिहेक्टरी मिळते.

बीडीएन – 711 : हा वाण तयार होण्यास सरासरी 150 ते 160 दिवसाचा कालावधी लागतो. ही जात कमी कालावधीत तयार होणारी असून मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 16 ते 18 क्विंटल इतके आहे.

बीडीएन – 2 : या वाणाचा पीक पक्वतेचा कालावधी सरासरी 150-16 दिवस इतका आहे. शेंगामधील दाणे मध्यम आकाराचे व रंगाने पांढरे असतात. ही जात मर रोगास प्रतिकारक्षम आहे. प्रतिहेक्टरी 11-17 क्विंटल उत्पादन मिळते.

बीजप्रक्रिया :

बियाची उगवण चांगली होण्यासाठी, रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी तूरीच्‍या प्रति किलो बियाण्‍यास 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बन्‍डॅझिम एकत्र करून बियाण्‍यास चोळावे. त्‍यानंतर प्रति 10 किलो बियाण्‍यास ऱ्हायझोबियम  जिवाणू संवर्धकाचे 250 ग्रॅम वजनाचे एक पाकीट गुळाच्‍या थंड द्रावणात मिसळून चोळावे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोडा वेळ बियाणे सुकवून त्वरित पेरणी करावयाची आहे.

पूर्व मशागत :

तूर पिकाची मुळे जमिनीत जास्त खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. पूर्वीचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने खोलवर 25 सें.मी. नांगरणी करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळया द्याव्यात. त्यामुळे जमीन उघडी पडून सुप्त अवस्थेतील किडी उघडे पडतात. पक्षी किडे खातात. तसेच काही किडीकडक उन्हात मरण पावून नष्ट होतात. कुळवाचे उभे  व आडव्या 4 पाळ्यादेऊन जमीन भुसभुशीतकरावी. त्यानंतर शेतातील काडीकचरा, धसकटे वेचून शेत स्‍वच्छ करावे.

सेंद्रिय खतांचा वापर :

कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीपूर्वी एकरी 9 ते 10 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्‍ट खत हेक्टरी अंदाजे 25 ते 30 गाड्या टाकून जमिनीत चांगले मिसळावे. शेणखताऐवजी गांडूळखत खताचा वापर केला तरी उत्तम आहे. भरखतांमुळे जमीन चांगली भुसभुशीत होऊन पिकाच्‍या मुळ्या खोलवर जमिनीत जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्‍यास मदत होते.

लागवड हंगाम :

तूरीची पेरणी खरीप हंगामातकेली जाते. मान्सूनचा समाधानकारक पाऊस पडल्यावर आणि जमिनीत वाफसा स्थिती निर्माण होताच पेरणी करावी. पाऊस अनियमित पडल्यास पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते. उशिरा पेरणी केलेल्या पिकांना लवकर पेरलेल्या पिकाबरोबरच फुले येतात पण त्यांच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्या देखील कमी राहते आणि उत्पादनात घट येते. वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्या देखील कमी राहते आणि उत्पादनात घट येते. खरीप हंगामातील तूरीची लागवड ही जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा  किंवा उशीराने करावयाची असल्यास जुलै अखेर पर्यंत पेरणी करावी.  त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

बियाणे प्रमाण :

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या शिफारशीनुसार तूरीचे प्रतिहेक्टर बियाणे प्रमाण 12 ते 15 किलोएवढे आहे. फक्‍त तूरीचे पीक घेतल्यास गरव्या जातीचे  12 ते 16 किलो बी, निमगरव्या जातीचे 16 ते 24 किलो बी आणि हळव्या वाणांसाठी 20 किलो बी प्रती हेक्टरी पेरावे. तूर हे ज्यावेळेस आंतरपीक म्हणून घेतले जाते त्यावेळी वरील बियाण्यास 25 ते 30 टक्के इतके बियाणेपुरेसे आहे.  

लागवड पद्धत :

तूर पिकाची लागवड तिफणीच्या सहाय्याने बी पेरूनच केली जाते. सामान्यपणे तिफणीने तूरीची पेरणी खरीपात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. संकरित बियाणांची पेरणी टोकण पद्धतीने करतात. त्यासाठी तूरीच्या हलक्या, निमगरव्या आणि गरव्याजातींसाठी अनुक्रमे 45 x 15 से.मी. अंतरठेवावे.   

क्रीडा टोकण यंत्राचा वापर :

तूर पिकाची पेरणी ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे करावी. सलग तूर पीक पद्धतीत खरीप हंगामात 45 x 10 सें.मी. अथवा 30 x 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी. तसेच आवश्‍यकतेनुसार लागवडीचे दोन रोपातील अंतर 60 x 75 सें.मी. असे ठेवावे. तूरीची पाभरीने पातळ पेरणी केल्‍यास हेक्‍टरी 12 किलो बियाणे 4 ते 5 सें.मी. खोल पडेल अशाप्रकारे पेरणी करावी. उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी नांगे भरणी करावी. 10 ते 15 दिवसांनी  विरळणी करून दोन रोपांमध्‍ये 25 ते 30 सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार लागवडीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  

आंतर मशागतीचे कामे  :

 • रोपांची योग्य संख्या ठेवणे : तूरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रती हेक्टरी तूरीच्या रोपांची संख्या मर्यादित ठेवावी.
 • कोळपणी करणे : तूरीमध्ये पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. त्यानंतर गरजेनुसार दुसरी कोळपणी करावी.
 • खुरपणी करणे : तूरीतील तणांचा खुरपणीद्वारे वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा उत्पादनावर विपरित परिणाम होतो.

आच्छादनाचा वापर करणे : अवर्षप्रवण भागात तूर पिकासाठी तापमान अधिक असल्यास आच्छानाचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

खत व्‍यवस्थापन :

तूर पिकास प्रति हेक्टर 25 किलो ग्रॅम नत्र, 50 किलो ग्रॅम स्फुरदव 50 किलो ग्रॅम पालाशची आवश्यकता असते. ही रासायनिक खते पिकास पेरणीच्या वेळी दिली जातात. मात्रही खते योग्‍यप्रमाणात देणे गरजेचे असते पिकास रासायनिक खतांची असलेली गरज काढण्यासाठी प्रथम माती परिक्षण करून घ्यावे, जेणेकरून त्या मातीमध्ये असलेल्या अन्‍नद्रव्यांची कमतरता व विपुलता लक्षात येते.

पाणी व्यवस्थापन :

तूर पिकाच्या महत्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा अभाव झाल्यास त्याचा परिणाम त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर होतो. पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताणपडल्यास व सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तूरया पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (पेरणीनंतर 30-35 दिवस) फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (60-70 दिवस) व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढहोते. चांगल्या व्यवस्थापनात सरासरी 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

आंतरपिके :

आंतरपीक पद्धतीत एकाच शेतात, एकाच हंगामात दोन पिके घेण्यात येतात. त्यात एक प्रमुख पीक असते, तर दुसरे दुय्यम पीक असते. पिकांची पेरणी ओळींच्या ठराविक प्रमाणात केली जाते.  तूर हे बहुतांशी आंतरपीक म्हणून घतले जाते. तूर + सोयाबीन (1 : 2), तूर + सोयाबीन (1:3 किंवा 1:4) तूर + ज्वारी (1:2 किंवा 1:4) व तूर + भूईमुग पीकसुद्धा चांगले उत्पादन देते. आंतरपिकासाठी निवडावयाच्या तूरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्‍या काळात 3 ते 4 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तूर अशा पद्धतीने दोन्‍ही पिकांचे चांगले उत्‍पादन येत असल्‍याचे दिसून येते.

प्रमुख किडींचे नियंत्रण 

शेंगा पोखरणारी अळी : सुरूवातीच्या  काळात पाने व देठांवर पोसतात अळ्या शेंगाना छिद्रे पाडून दाणे.

उपाय : अळ्या गोळा करून नाश करणे, हेलीओकील या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा 500 मी. ली. / हे तीन फवारण्या कराव्या. 

पिसारी पतंग / तुरेवाला पतंग : लहान अळी कळ्या, फुले शेंगाना छिद्र पाडून दाणे, खाते, मोठी अळी शेंगावरील छिद्र पाडून दाणे खाते.

उपाय : अळींचा प्रादुर्भाव दिसताच निबोंळी अर्काची प्रतिकारात्मक उपाय म्हणून फवारणी करावी. प्रोफेनोफॉस 25 मी. ली. / 10 ली. फवारणी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना व 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

शेंगावरील ढेकूण : पाने व शेंडे यातून रस शोषते, झाडे निस्‍तेज होऊन वाळतात.

उपाय : कीड प्रतिबंधक वाण वापरावे. झाडे हलवून रॉकेल मिश्रित पाण्यात ढेकणांचा नाश करावा. डायमेथोएट 10 मि. ली. / 10 ली. पाण्याततून फवारणी करावी.

मिज माशी : अळीची वाढ खोडातच पूर्ण होते. शेंगात दाणे भरत नाहीत, शेंगा कमी लागतात. दाणे लहान राहतात.

उपाय :  पेरणीचे वेळी 10 टक्के फोरटे 10 किलो प्रती हेक्टरी वापरावे किंवा 5 टक्के  डायसल्फोरटॉन 20 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे.

खोड माशी  : स्वत: केलेल्या  खाचेत अंडी घालते. अळ्या खोड पोखरून आत शिरते. रोपाचा शेंड्याकडील भाग वाळतो.

उपाय :  स्वच्छ मशागत करावी. मेटासिस्‍टॉक 10 मी. ली. / 10 ली. पाण्यातून फवारणी करावी.

भुंगरे : फुलकळी व फुले अधीशीपणे खातात. एक दिवसात एक भुंगा 25 ते 30 फुले खराब करतो.

उपाय :  जाळीच्या साहाय्याने भुंगे पकडून त्याना स्‍पर्श न करता त्यांचा नाश करावा.

पानावरील तुडतुडे : पानातील रस शोषल्‍याने पाने तपकिरी होतात व सुकतात.

उपाय :  डायमेथोएट 10 मि. ली. प्रति 10 ली. पाण्यातून फवारणी करावी.

प्रमुख रोगांचे नियंत्रण 

तूरीवर आढळून येणाऱ्या रोगांपैकी मररोग (फ्युजॅरियमउडम), वांझ रोग, मुळकुज, खोडकुज, तूरीवरील करपा, कॅकर हे रोग असून याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :

1) मर रोग (फ्युजॅरियम उडम)

या रोगाची सुरूवात रोपावस्थेपासून सुरू होत असली तरी रोपे, फुले, शेंगा येईपर्यंत रोगाशी सामना करत असतात. भारी जमिनीत मात्र रोपावस्थेत असतानाच बीजपत्रे पिवळी पडून सुकतात. सुरूवातीस हा रोग शेताच्या ठरावीक जागी एखाद्या दुसऱ्या झाडावर आढळून येतो. नंतर मात्र तो झपाट्याने पसरतो. रोगट झाडाच्या खोडाचा जमिनी लगतचा भाग काळा पडतो व सोटमुळाचा गाभा तपकिरी काळ्या रंगाचा दिसतो. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात.

उपाययोजना :

 • पिकाची फेरपालट करावी. एकाच जमिनीत सतत एकाच गटातील पीक घेऊ नयेत.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅमथायरम/किलो किंवा कॅप्टन 3 ग्रॅम/कि.ग्रॅ. याची बीजप्रक्रिया करावी.
 • तूरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यांसारखी पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.
 • मर रोग प्रतिकारक्षम वाणांचा उपयोग पेरणीसाठी करावा.
 • रोग झाडे उपटून टाकावीत.
 • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.

2) वांझ रोग

या रोगाचा प्रादुर्भाव मागील काही वर्षात अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. याकोळींची मादी कोवळ्या फांदीवर अंडी घालते. कोळ्याची एक पिढीदोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीतपूर्ण होते.

लक्षणे :

 • तूरीची कोवळी पाने पिवळसर पडतात, पानेव फांद्या लहान राहतात.
 • झाडांची वाढ खुंटते व ते झुडूपा सारखे दिसू लागते.
 • वांझ रोगाचा प्रादुर्भाव फुलोरा येण्यापूर्वी रोगग्रस्‍त झाडांना फुले व शेंगा लागत नाहीत.
 • फुलोरा येण्यापूर्वी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या काही फांद्यांना फुले किंवा शेंगा लागत नाहीत.

नियंत्रण :

 • तूरीची पेरणी वेळेवर करावी. लवकर अथवा उशिरा करू नये.
 • आगोदरच्या हंगामातील बांधावरील खोडवा पिकाचे अवशेष उपटून नष्ट करावेत.
 • विपुला, बीएसएमआर 853, 736, बहार इ. रोगप्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी.
 • कोळीच्या नियंत्रणासाठी केलथेन 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 • रोगग्रस्‍त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत.
 • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळल्यास पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.

3) मुळ कुज

या रोगाचा प्रादुर्भाव पीक पेरणीनंतर 4-5 आठवड्यात आढळून येतो. रोपे कोमेजतात. पाने वाळतात व गळून पडतात. मुळे कुजल्यामुळे रोप लगेचच जमिनीतून उपटूनयेते. रोपटे उपटून पहिले असतामुळे हाताला चिकट लागतात व काळसर पडलेली दिसतात. मुळांवरील साल सहजरित्या निघते व सालीच्या आतील भागात बुरशीची गोल आकाराची व काळ्या रंगाची बीजे आढळतात. या बुरशीचा प्रसार पावसाच्या पाण्याद्वारे अथवा सिंचनाच्या पाण्याबरोबर होतो.

नियंत्रण :

 • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम/कि.ग्रॅ. याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
 • जमिनीचे तापमान 35 अंश. से. पेक्षा कमी करण्यासाठी आंतरपिके घ्यावीत.
 • बीजप्रक्रिया करतांना 3 ग्रॅम बावीस्टीन/कि. बियाण्यास चोळावे.
 • शेतात भुईमुग पेंड/निंबोळी पेंड 1000 किलो प्रती हेक्टर याप्रमाणे पसरावी.

4) खोडकुज

हा रोग जमिनीत आढळणाऱ्या फायटोप्थोरा ड्रेचलेरा नावाच्या बुरशीमुळे होतो. खोडकुजव्या रोगामुळे झाडाचा फक्‍त वरचा भाग वाळून जातो व रोग झालेल्या ठिकाणी झाडाचे खोड मोडते.

नियंत्रण :

 • जमिनीतील पाण्याचा निचरा योग्‍य रितीने करावा.
 • रोग प्रतिकारक वाणांची लागवड करावी. उदा. आय.सी.पी.एल. 83024
 • पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी व उगवणीनंतर 15 दिवसांनी त्या बुरशीनाशकाची फवारणी दहा दिवसाच्या अंतराने 2 वेळा करावी.
 • रोगग्रस्‍त झाडे उपटून टाकवीत व त्यांचा नाशकरावा.

5) करपा

हा रोग अल्टरनेरिया बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर ठिपके पडून ती गळतात. तसेच तूरीच्या शेंगा व दाणे काळपटपडतात.

नियंत्रण :

रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच 10 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 10 लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.

6) कॅकर 

हा रोग डिप्लोडियाकजानी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाचे खोड जमिनी जवळ जाड होते व त्या भागा शेजारी दुय्यम मुळे फुटतात.

नियंत्रण :

या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायथेनएम-45 प्रति 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारावे.

काढणी 

तूरीच्या शेंगा 70 ते 80 टक्‍के रंग बदल्‍यास म्‍हणजे तपकिरी रंगाच्‍या झाल्‍या किंवा वाळल्‍या की पीक काढणीस तयार झाले असे समजावे. साधारणपणे झाडावरील दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश शेंगाचा रंग बदलला की पीक काढणीस घ्‍यावे. जून-जुलै मध्‍ये पेरणी  केलेले पीक डिसेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात काढणीस येते. अधिक उत्‍पादन प्राप्‍त करण्‍यासाठी पहिल्‍या फुलोऱ्यात शेंगा तयार झाल्‍यावर पीक न कापता फक्‍त तयार झालेल्‍या शेंगा झाडावरून काढून घ्‍याव्‍यात. नंतरच्‍या फुलोऱ्यावरील शेंगा पुन्‍हा महिना भराने काढणीस तयार होतात. तूरीच्‍या शेंगासह झाडे खोडापासून विळ्याने कापून त्‍याच्‍या पेंढ्या बांधून ठेवाव्या.  

मळणी 

तूरीची झाडे पूर्ण वाळली की काठीच्‍या साहाय्याने पेंढ्या झोडपून शेंगातील दाणे वेगळे केले जातात. मळणी यंत्राचा वापर करून तूरीचे लागवड तूरीचे दाणे  वेगळे काढले जातात. सलग मोठ्या क्षेत्रावर जर तूरीची लागवड असेल तर कंबाईन हार्वेस्‍टर हे पिकाची काढणी तसेच मळणी या दोन्‍ही क्रिया करण्‍यासाठी वापरण्‍यात येते.

साठवण 

तूरीची साठवण करीत असतांना तूरीमध्ये जास्तीत- जास्‍त 10 टक्क्यांयापर्यंत पाण्याचा अंश आर्द्रता राहील, अशा दृष्टीने तूर वाळवून ती पोत्यात भरावी आणि एकावर एक अशी रचून ठेवावी. ठेवत असतांना पाणी, पाऊस, हवा, उष्णता, लागूनये अशा सुयोग्‍य ठिकाणी साठवण करावी. तसेच तूरीच्या साठवणीत कोणतीही किड लागू नये म्हणून यासाठी योग्‍य त्या उपाययोजना कराव्यात.

उत्पादन 

तूर पिकाचे सरासरी 25 ते 30 ‍क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. परंतु सुधारित पद्धतीने लागवड केल्यास अथवा सुधारित वाणांची लागवडीसाठी अवलंब केल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ  होते.

संदर्भReferences

 • सलील मोडक (2018) : कडधान्‍य उत्‍पादन तंत्रज्ञान, दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
 • पाटील प्रताप (2020) : तूर उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योग, अप्रकाशित कृषि प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
 • काकडे कविता (2013) : तूर लागवड, उत्पादन आणि प्रक्रिया, युनिव्हर्सल प्रकाशन, पुणे
 • चव्‍हाण यु.डी., पाटील जे. व्‍ही. (2011) : कडधान्‍य लागवड ते प्रक्रिया उद्योग, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/Prajwal Digital

2 thoughts on “तूर लागवडीचे सुधारित तंत्र”

Leave a Reply