देशातील बहुसंख्य लोक शेती व शेतीपूरक उद्योगधंद्यावर अवलंबून आहेत. कुटुंबाची वेळोवेळी प्राथमिक गरजा आणि उदरनिर्वाह भागवण्यासाठी पैशाची नितांत गरज भासते. शिवाय शेतीतील उत्पन्न अल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. याकरिता उद्योजकता विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सबलीकरण करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबाला शेतीपूरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेली असून त्याद्वारे त्यांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण होणे आवश्यक आहे.
मागील अनेक वर्षांपासून रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी उद्योजकता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केवळ कुटुंबाच्या गरजा भागविणे हाच उद्योजकाचा उद्देश नसून व्यवसायातून आर्थक प्रगतीकडे वाटचाल करणे हा आहे. यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळविल्यानंतर योग्य तो व्यवसाय निवडून तो चालवला तर संपन्नता वाढते, कुटुंबाचा आर्थिक आधार प्राप्त होतो, जीवन जगण्याचे साधन उपलब्ध होते आणि त्यातून कुटुंबाचा सर्वांगीण विकास साध्य होतो. याच उद्देशाने उद्योजकता विकास व शेतकऱ्यांचे सबलीकरण होणे महत्त्वाचे असल्यामुळे प्रस्तुत लेख तयार करून उद्योजकता विकासासाठी उपयोग व्हावा, वाढती बेकारी व रोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरणास चालना मिळू शकेल.
उद्योजक व उद्योजकता म्हणजे काय?
उद्योजक हा निर्णय घेणारा, दिशा देणारा, विकासाचा ध्यास घेणारा असतो. “नैसर्गिक साधनसामुग्री, भौतिक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ या तीन गोष्टींना एकत्र आणून कोणत्या वस्तूंची निर्मिती करता येईल याची शक्यता पडताळून पाहणारा समाजाचा गतिशील घटक म्हणजे उद्योजक होय.”
सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला, परंतु तेवढाच महत्वपूर्ण असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता होय.
उद्योजकता विकास
उद्योजकता विकासासाठी उद्योजकतेची गुणवैशिष्ट्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांमध्ये आहे हे अचूकपणे शोधून त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवावी. शिवाय उत्पादनासाठीआवश्यक असणारी कोणकोणती कौशल्ये किंवा अनुभव आपल्या गटाच्या सभासदांमध्ये आहेत, याचाही मागोवा घेतला पाहिजे. त्यासाठी लागणारे भांडवल, उत्पादन साधने कोठे मिळतील आणि तयार होणाऱ्या मालाच्या विक्रीची व्यवस्था कशी करता येईल ? त्यासाठी अन्य कोणकोणत्या संस्थाची मदत घ्यावी लागेल. या सर्वांचा विचार करुन नियोजन करता येईल व एक सविस्तर प्रस्ताव तयार करता येईल. अशा कार्यवाहीतून बचत गट उद्योजकतेकडे वाटचाल करु शकेल.
उद्योजकता विकासाचे घटक
उद्योजकता विकासासाठी प्रामुख्याने खालील चार घटकांची आवश्यकता असते.
- भांडवल : उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे वित्त म्हणजेच भांडवल असावे लागते.
- तांत्रिक ज्ञान : जो उद्योग करायचा असेल त्याचे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असते.
- उद्योजकता प्रेरणा : उद्योजकता असलेल्या व्यक्तींनी जीवनात स्वकर्तृत्वाने कठीण परिस्थितीवर मात करुन प्रगती केल्याचे दिसून येते.
- इतर घटक : जागा, कारागिर, कच्चा माल, वीज, पाणी, विक्री कौशल्ये, बाजारपेठ इ. बाबी उद्योग अथवा व्यवसायासाठी आवश्यक असतात.
उद्योजकाची वैशिष्ट्ये
उद्योजक महिला/ पुरुषाच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्व प्रेरणेशिवाय पूरक अशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत. त्यात खालील बाबींचा समावेश होतो.
- उद्योगात जोखीम व धोका पत्करणे.
- उद्योगाच्या वाटचालीत भविष्याचा अंदाज घेणे.
- विविध स्तरांवरील लोकांशी प्रभावी संपर्क करून सुसंवाद साधणे.
- कार्य सिद्धीस नेण्यासाठी कल्पकता व चिकाटी असावी.
- आपल्या कृतीच्या परिणामांची जबाबदारी स्वत: स्विकारणे.
- कठीण परिस्थितीत व्यवसायाची योग्य दिशेने वाटचाल करणे.
- कालानुरूप उद्योग किंवा व्यवसायामध्ये आवश्यक तो बदल करणे.
- उद्योग किंवा व्यवसायाचे सोशील मीडियाच्या माध्यमातून सादरीकरण व जाहितीकरण करणे.
उद्योजकता विकासासाठी महत्त्वाच्या बाबी
कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाची सुरुवात करत असताना संबंधित व्यवसायाची योग्य शहानिशा करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे व्यवसायात कोणत्याही स्वरूपाचे नुकसान अथवा हानी होण्याची शक्यता राहत नाही. यासाठी पुढील बाबींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
1) अर्थसहाय्य : जो व्यवसाय आपल्याला बचतगटामार्फत चालवायचा आहे? त्या व्यवसायासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे? अर्थसहाय्य कोणाकडून उपलब्ध होऊ शकते? मिळणारे उत्पन्न व आपल्या अपेक्षा यांचे गणित काय? या सर्व गोष्टींचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
2) बाजारपेठ : आपण जो व्यवसाय करणार आहोत त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे काय? जर आपण एखादी सेवा देणारा व्यवसाय चालविणार असेल तर सेवा घेणाऱ्या व्यक्ती उपलब्ध आहेत काय? या सर्व गोष्टीचा आढावा घेणे आवश्यक असते. तसेच सुरूवातीला स्थानिक बाजारपेठ संपादन करणे गरजेचे असते.
3) कच्चा माल : आपण निवडलेल्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा कच्चा माल अथवा आवश्यक असलेली साधणे परिसरात सहजरित्या व माफक दरात उपलब्ध होईल काय याचा आढावा उद्योग, व्यवसाय निवडण्यापूर्वी घ्यावा.
4) तंत्रज्ञान : व्यवसायाची निवड करताना व्यवसायासाठी लागणारे किमान अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय अथवा ते कशाप्रकारे उपलब्ध होईल याचा आढावा घ्यावा.
5) मनुष्यबळ : उद्योग अथवा व्यवसाय असा निवडावा जेणेकरून सर्व सदस्यांच्या कौशल्याचा वापर होणे आवश्यक असते. यंत्राची हाताळणी करण्याचे कौशल्य असणाऱ्या सदस्यांकडून कौशल्याची कामे व ज्यांना कौशल्याची कामे जमत नाही अशांना त्यांच्याकडून अंग मेहनतीची कामे करावी.
6) प्रशिक्षण : उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षणाची गरज असते ते सेवाभावी संस्था किंवा शासन अनुदान प्राप्त संस्था आयोजन करतात. अशा प्रशिक्षणात तांत्रिक व प्रात्यक्षिक्रमाची परिपूर्ण माहिती सादर करत असतात. अशा प्रकारचे प्रशिक्षण गटातील दोन सदस्यांनी घेऊन ते इतरांना द्यावे.
7) तज्ञांचे मार्गदर्शन : बचतगटांच्या व्यवसायांना व्यवस्थापनाचे ज्ञान देण्यासाठी तज्ञ लोक उत्सुक असतात. उदा. निर्मिती व विपणन या क्षेत्रातील तज्ञ अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनातून व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यास सहकार्य मिळते.
उद्योजकता विकास व सबलीकरण या लेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योजकता विकासासाठी आवश्यक व महत्त्वपूर्ण बाबींचा सखोलपणे माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. ज्यांचा उद्योग सुरु आहे किंवा ज्यांना उद्योग नव्याने उभारणी करावयाचा आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त, महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी आहे. यातून असे स्पष्ट होते की, खरोखरच उद्योजकता विकासाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यास किंवा त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास सर्वाअर्थाने उद्योजकता विकासाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
संदर्भ
- चेंडके प्रदीप हणमंत (2020 ): स्वयंसहाय्यता बचत गटांतर्गत महिलांचे आर्थिक सबलीकरण, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
- बचत गट विकासासाठीची साधने व समन्वय पान क्र. 197 ते 211
- दांडेकर लक्ष्मण व इतर, स्वयंसहाय्यता बचत गट प्रेरक व प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम, य.च.म.मु.वि., नाशिक
प्रा. गोविंद अंकुश, सहयोगी प्राध्यापक, अदित्य कृषि महाविद्यालय, बीड व डॉ. सुमठाणे योगेश वाय., दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर