उत्‍पादन वाढीसाठी खतांचे महत्‍त्‍व

उत्‍पादन वाढीसाठी खतांचे महत्‍त्‍व
Sp-concare-latur

 208 views

पूर्वीच्या काळी पीक उत्पादनात खतांचा वापर कमी प्रमाणात शेतकरी बांधव करत होते. त्यामुळे शेतीतून उत्पन्न सुद्धा अल्प प्रमाणात मिळत होते. आता मात्र यात बदल होऊन आधुनिक युगात शेतीच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधने होऊन पीक उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असून अन्नधान्य उत्पादन वाढत आहे. त्यामुळे शेतीच्या अन्नधान्य उत्पन्नात आमूलाग्र बदल झालेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्‍पादन वाढीसाठी खतांचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन त्यांचा वापर पीक उत्पादनात विशेष भूमिका बजावत असल्याकारणाने पीक उत्पादनात रासायनिक, सेंद्रिय व जीवाणू खतांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. यामुळेच पीक उत्पादनात वाढ करून स्थिरता आणणे शक्य झाले आहे. म्हणून प्रस्तुत संशोधन लेख पीक उत्‍पादन वाढीसाठी खतांचे महत्‍त्‍व या विषयी थोडक्यात माहिती शेतकरी बांधव व वाचकांना मिळावी यासाठी प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
खतांचे प्रमुख तीन प्रकार
 1. रासायनिक खते
 2. सेंद्रिय खते
 3. जीवाणू खते
1) रासायनिक खतांचे महत्‍त्‍व
पीक पोषणास आवश्‍यक असलेल्‍या अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा करणाऱ्या सेंद्रिय किंवा असेंद्रिय तसेच नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थास खते म्‍हणतात. जमिनीतील अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा पीक वाढीसाठी कमी पडू नये म्‍हणून ती खताद्वारे देतात. पिकांना लागणाऱ्या 16 अन्‍नद्रव्‍यांपैकी 13 अन्‍नद्रव्‍ये जमिनीतून मिळतात व 3 अन्‍नद्रव्‍ये पाणी आणि हवेतून मिळतात. या 13 अन्‍नद्रव्‍यांपैकी जास्‍त प्रमाणात लागणारी तीन, मध्‍यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणत लागणारी सात आहेत. त्‍यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये म्‍हणतात. ऑक्सिजन, हैड्रोजन व कार्बन ही मूलतत्‍त्‍वे पाणी आणि हवा यांपासून मिळतात. नत्र, स्‍फुरद व पालाश ही प्रमुख अन्‍नद्रव्‍ये, गंधक व कॅलशियम ही दुय्यम अन्‍नद्रव्‍ये आणि लोह, मॅगेनीज, कॉपर, झिंक, बोरान, मॉलिबडेनम व क्‍लोरिन ही सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये जमिनीतून पिकास मिळतात. यांपैकी एक जरी कमी पडले तरी त्‍याचा पीकवाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन उत्‍पादन घटते. या अन्‍नद्रव्‍यांचा योग्‍य पुरवठा असताना व अपुरा पुरवठा असताना वनस्‍पती वाढीवर काय परिणाम होतो.
अन्‍नधान्‍य उत्‍पादनात खतांचा भरीव वाटा आहे. खतांचा वापर करून पीक-उत्‍पादन चांगले ठेवणे आवश्‍यक आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांद्वारे पिकास आवश्‍यक अन्‍नद्रव्‍यांचाच जमिनीत चांगला साठा ठेवून उत्‍पादनात वाढ करून ते स्थिर ठेवता येते. त्‍यामुळे दिवसेंदिवस खतांचा वापर वाढतच आहे. लोकसंख्‍या वाढीमुळे धान्‍य पुरवठ्याची गरज पूर्ण करण्‍यासाठी खते वापरण्‍याशिवाय आज दुसरा पर्याय नाही. तसेच खतांचा वापर करून दुष्‍काळी स्थितीवर मात करता येते. कोणत्‍याही पिकाचे जास्‍त उत्‍पादन येण्‍यासाठी खत वापर हा आज पीक व्‍यवस्‍थापनाचा आवश्‍यक भाग म्‍हणून ठरला आहे. खतांच्‍या वाढत्‍या किंमती, परदेशी चलनतुटवडा व अन्‍नधान्‍याची वाढती गरज लक्षात घेता खतांचा वापर किफायतशीर करावयास हवा.
2) सेंद्रिय खतांचे महत्‍त्‍व
पिकांचे उत्‍पादन हे जमिनीच्‍या सुपीकतेवर अवलंबून राहते तर जमिनीची सुपीकता ही तिच्‍या प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर आधारित असते. नत्र, स्‍फुरद आणि पालाशयुक्‍त रासायनिक खतांच्‍या वापरामुळे पिकांची या तीन प्रमुख अन्‍नद्रव्‍यांची गरज भागविली जाते. त्‍यामुळे उत्‍पादनात समर्थनीय अशी वाढ होते; परंतु कालांतराने जमिनीत सूक्ष्‍म आणि दुय्यम अन्‍नद्रव्‍यांची कमतरता मात्र वाढण्‍याची शक्‍यता असते. पीक पोषक द्रव्‍यांच्‍या पुरवठ्याबरोबरच जमिनीचे प्राकृतिक आणि जैविक गुणधर्माचे संवर्धन करणेही तितकेच महत्‍त्‍वाचे ठरते. या बाबतीत रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खते जास्‍त परिणामकारक ठरतात. म्‍हणून जमिनीचा सर्वांगीण मगदूर (भौतिक, रासायनिक व जैविक) सुधारण्‍यासाठी तसेच पिकांचे उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सेंद्रिय खते (भर खते) जणू काही संपूर्ण आहारांची भूमिका बजावितात. तरीदेखील भरघोस उत्‍पादन देणाऱ्या संकरित व उन्‍नत वाणांची प्रमुख अन्‍नद्रव्‍यांची वाढीव गरज जलदरित्‍या भागविण्‍यासाठी भर खतांच्‍या जोडीला पिकांचा खुराक म्‍हणून रासायनिक जोर खतांचा वापर करणे आवश्‍यक ठरते.
विविध सेंद्रिय खतांचा वापर शेतीसाठी फार पूर्वीपासूनच केला जात आहे. शेणखत, कंपोष्‍ट खत आणि हिरवळीची खते यांचा या दृष्‍टीने प्रामुख्‍याने वापर केला जातो. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे आणि ह्युमसचे प्रमाण टिकवून धरण्‍यासाठी किंबहुना या घटकांची वाढ करण्‍यासाठी सेंद्रिय खते तर फारच महत्‍त्‍वाची आहेत. सेंद्रिय खतांच्‍या वापरामुळे जमिनीचे सर्वांगीण स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍यास मदत होते. या खतांच्‍या वापरामुळे जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म म्‍हणजे जमिनीचा पोत, मातीच्‍या कणांची रचना, सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्‍याची क्षमता सुधारते. परिणामतः जमिनीचे रासायनिक आणि जैविक गुणधर्मही सुधारण्‍यासाठी या गोष्‍टींचा प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या उपयोग होतो. जमिनीतील अन्‍नद्रव्‍यांचे प्रमाण आणि त्‍यांची उपलब्‍धता देखील वाढते. रासा‍यनिक खतातील अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता जमिनीत वाढविण्‍यासाठी सेंद्रिय खतांचा उपयोग होतो. जमिनीतील जीवाणूंची संख्‍या व त्‍याची क्रियाशीलता सेंद्रिय खतामुळे वृद्धींगत होते.
सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील एक महत्‍त्‍वाचा घटक असून त्‍याच्‍यावर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. वर निर्देश केलेले विविध प्राकृतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म, सेंद्रिय कर्बाशी निगडित आहेत. उष्‍ण हवामानामुळे तसेच जैविक क्रियेमुळे जमिनीतील कर्बाचे विघटन आणि भस्‍मीकरण सतत सुरू असते. त्‍यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हळूहळू कमी होते. हे प्रमाण कायम राखण्‍यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्‍त्‍चाचा ठरतो. रासायनिक खतांद्वारे विशिष्‍ट अन्‍नद्रव्‍येच पुरविली जातात; परंतु सेंद्रिय खतांद्वारे सर्व प्रकारची पीक पोषक द्रव्‍ये पिकांना पुरविली जातात. हा पुरवठा अल्‍पशा प्रमाणात असतो. म्‍हणून पिकांची अन्‍नद्रव्‍यांची गरज सत्‍वर भागविण्‍यासाठी रासायनिक खते आणि जमिनींचे सर्वांगीण स्वास्थ्य अबाधित कायम राखण्‍यासाठी सेंद्रिय खते महत्‍त्‍वाची ठरतात. ह्या दोन्‍हीही बाबी जमिनीची सुपीकता आणि उत्‍पादन क्षमता सुधारण्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍त्‍वाचे कार्य करतात. म्‍हणून या दोन्‍हीही प्रकारचे खते शेतीसाठी वापरणे अपरिहार्य आहे.
प्रमुख वैशिष्‍ट्ये
 • रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय खतांमधील पीक पोषक द्रव्‍यांचे प्रमाण नेहमी सारखेच न राहता ते वापरलेल्‍या सेंद्रिय पदार्थाप्रमाणे बदलते.
 • जमिनीची सुपीकता सुधारण्‍यासाठी तसेच पोषणाच्‍या दृष्‍टीने सेंद्रिय खते सर्वकष खाद्याची (आहाराची) भूमिका बजावितात. रासायनिक खतांमधून मात्र विशिष्‍ट अन्‍नद्रव्‍यांचाच पुरवठा पिकास होतो.
 • सेंद्रिय खते जरी सर्वकष असली तरी त्‍यामध्‍ये पीक पोषक द्रव्‍यांचे असणारे प्रमाण फारच कमी असते. त्‍यामुळे रासायनिक खतांच्‍या तुलनेत ही खते मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात.
 • या खतामधून पिकांना होणारा अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा मंदगतीने किंवा हळूवार पद्धतीने होत असतो. म्‍हणून पिकांची अन्‍नद्रव्‍यांची गरज तात्‍काळ भागविण्‍यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खते वापरावी लागतात.
 • अन्‍नद्रव्‍याची उपलब्‍धता हळूवारपणे वाढत असल्‍यामुळे सेंद्रिय खतामधील अन्‍नद्रव्‍यांचा ऱ्हास रासायनिक खतांच्‍या तुलनेत कमी होतो. म्‍हणून अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता दीर्घकाळ टिकून राहण्‍यास मदत होते.
 • यामुळे सेंद्रिय खतांचा शेष परिणाम पुढील पिकांवरही चांगला दिसून येतो.
 • या खतांच्‍या पीक पोषण मूल्‍यांबरोबरच त्‍यांचा विशेष उपयोग जमि‍नीचे प्राकृतिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्‍यासाठी महत्‍वाचा ठरतो. म्‍हणून जमिनीच्‍या सर्वांगिण स्‍वास्‍थ्‍यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खते एकात्मि‍क पद्धतीने वापरावीत.
 • रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय खते बाजारात उपलब्‍ध नाहीत. जी आहेत ती फारच महाग असल्‍यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्‍या आवाक्‍याबाहेर आहेत. या खतांचा वाहतूक खर्चही न परवडणारा ठरतो. म्‍हणून ही खते प्रत्‍येकाने स्‍वतः च्‍या शेतावरच तयार करून वापरणे जास्‍त फायदेशीर ठरते. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍नांची गरज मात्र निश्चितपणे आहे.
 • यासाठी शेती व्‍यवसायापासून मि‍ळणारे सर्व प्रकारचे सेंद्रिय टाकाऊ पदार्थ, अखाद्य पेंडी, शहरातील काडीकचरा, कृषि उद्योगातील टाकाऊ पदार्थ, हिरवळीची पिके इत्‍यादींचा वापर योग्‍य तंत्रज्ञानाने करून घेता येईल. यातील काही पदार्थापासून चांगल्‍या दर्जाचे शेणखत, कंपोस्‍ट खत, व्‍हर्मीकंपोस्‍ट, बायोगॅस स्‍लरी या सारखी उपयुक्‍त खते बनविता येतात.
3) जीवाणू खतांचे महत्‍त्‍व
जीवाणू खतांची निर्मिती आणि त्‍यांचा शेतीसाठी वापर ही अलीकडच्‍या काळातील एक क्रांतीकारी बाब असून आधुनिक शेतीपद्धतीचे ते एक प्रमुख अंग आहे. गरीब शेतकऱ्यांच्‍या दृष्‍टीकोनातून तर ही पद्धत फारच उपयुक्‍त आहे. कमी खर्चिक आहे; परंतु उत्‍पादनात निश्चितपणे वाढ होणे या पद्धतीचे वैशिष्‍ट्य आहे. जमिनीत असंख्‍या प्रकारचे सूक्ष्‍म जीवाणू असतात आणि ते पिकांच्‍या निकोप व जलद वाढीसाठी विविध पद्धतीने सदैव मदत करत असतात. त्‍यामुळे पिकांच्‍या उत्‍पादनात वाढ होते. अशा जिवाणूंची प्रयोगशाळेत स्‍वतंत्ररित्‍या वाढ करून शेतावर ती सुलभरित्‍या वापरता यावीत म्‍हणून विशिष्‍ट माध्‍यमात मिसळतात.
अ. नत्र स्थिर करणारे जीवाणू खते
वातावरणात 78 टक्‍के नत्र वायूचे प्रमाण असते; परंतु या विपूल नत्र साठ्याचा उपयोग वनस्‍पती प्रत्‍यक्षरीत्‍या करून घेऊ शकत नाहीत; परंतु जीवाणूंच्‍या माध्‍यामातून या नत्र साठ्याचा उपयोग आता पीक उत्‍पादनासाठी करून घेण्‍याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्‍टर आणि अॅझोस्पिरिलम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंचा उपयोग होतो. रायझोबियम जीवाणूंमुळे द्वि‍दल पिकांच्‍या मूळांवर ग्रंथी तयार होतात व नत्राचा पिकांना पुरवठा होतो. या कमी वनस्‍पती, जीवाणूंना अन्‍नचा पुरवठा करतात. तर जीवाणू या मोबदल्‍यात पिकास नत्राचा पुरवठा करतात. म्‍हणून या क्रियेस सहजीवी नत्र स्थिरीकरण असे म्‍हणतात.
द्वि‍दल पिके सोडून इतर एकदल पिकांना (गहू, ज्‍वारी, भात, ऊस, कापूस, वांगी, टोमॅटो इत्‍यादी) अॅझोटोबॅक्‍टर आणि अॅझोस्पिरिलम ही जीवाणू खते वापरावीत. हे वनस्‍पतीवर स्‍वतःची उपजीविका न करता, जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर स्‍वतःचे पोषण करतात. हे जीवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून त्‍याचा पुरवठा पिकांना करतात, या क्रियेस असहजीवी नत्र स्थिरीकरण असे म्‍हणतात.
भात पिकासाठी निळे-हिरवे शैवाळ व अॅझोला याही जैविक खतांचा वापर नत्राचा पुरवठा करण्‍यासाठी केला जातो. नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणू संवधर्नाच्‍या वापरामुळे बियांची उगवण क्षमता सुधारते. नत्राचा पुरवठा झाल्‍यामुळे उत्‍पादनात 15 ते 29 टक्‍के वाढ होते. कमी खर्चात जास्‍त फायदा हे जीवाणू खतांचे खास वैशिष्‍ट्य आहे.
ब. स्‍फुरद विरघळविणारे जीवाणू खत
जमिनीमध्‍ये स्‍फुरदाचा साठा भरपूर असतो; परंतु हा साठा बहुतांशी पाण्‍यात न विरघळणारा असतो. त्‍यामुळे पिकांना या अविद्राव्‍य स्‍फुरदाचा उपयोग वाढीसाठी करून घेता येत नाही. म्‍हणून अविद्रव्‍य स्‍फुरदाचे रूपांतर विद्राव्‍य स्‍वरूपात होणे गरजेचे असते. हे रूपांतर विशिष्‍ट जीवाणू मार्फत घडवून आणता येते. या प्रकारच्‍या जीवाणूंना स्‍फुरद विरघळणारे जीवाणू असे म्‍हणतात. या जीवाणू संवर्धनाच्‍या वापरामुळे, जमिनीत उपलब्ध स्‍फुरदचा पुरवठा वाढून उत्‍पादनात वाढ होते. या जीवाणूंच्‍या सान्निध्यात रॉक फॉस्‍फेट सारख्‍या अविद्राव्‍य स्‍फुरद खतांचाही वापर परिणामकारकपणे करून घेता येतो.
जीवाणू खतांचे फायदे
 • बियाण्‍याची उगवण लवकर व जास्‍त प्रमाणात होते.
 • पिकांस नत्राचा आणि स्‍फुरदाचा पुरवठा होतो.
 • पिकांच्‍या उत्‍पादनात सर्वसाधारणपणे 15 ते 20 टक्‍के वाढ होते.
 • रासायनिक नत्र खतांची सर्वसामान्य 15 ते 20 टक्‍के बचत होते.
 • स्‍फुरद जीवाणू खतांमुळे अविद्राव्‍य स्‍फुरद खतांचाही (उदा. रॉक फॉस्‍फेट) वापर करणे शक्‍य होते.
 • रासायनिक खतावरील परावलंबित्‍व काही प्रमाणात कमी करता येते.
 • जमिनीचे इतर प्राकृतिक गुणधर्म सुधारण्‍यास मदत होते.
अशाप्रकारे उत्‍पादन वाढीसाठी खतांचे महत्‍त्‍व अनन्यसाधारण आहे. या लेखामध्ये खतांचे महत्त्व जाणून घेतले असून रासायनिक, सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर, त्यामुळे होणारे पिकांवर अनुकूल परिणाम याबाबत सविस्तर माहिती प्रस्तुत संशोधन लेखामध्ये लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर माहितीमध्ये काही चुकीचे वा अतिरिक्त असल्यास त्याची माहिती खाली कमेंटसद्वारे देण्यात यावी. त्यानंतर त्यात योग्य तो बदल करण्यात येईल.
संदर्भ :  
 1. भारती चेतन संजय (2019) – रासायनिक खतांचा तुलनात्‍मक अभ्‍यास, अप्रकाशित कृषि पदवी प्रकल्‍प, य.च.म.मु.वि., नाशिक
 2. डोंगळे जयवंत, रासायनिक खते (2003) – कॉन्टिनेन्‍टल प्रकाशन प्रकाशन, पुणे
– शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: