दर्जेदार चवळी व गवार उत्पादन तंत्र

 
गवार व चवळी ही दोन्ही द्विदल वर्गातील महत्त्वाची भाजीपाला पिके असून शेतकरीवर्गात लोकप्रिय आहेत. या दोन्ही पिकांची लागवड कडधान्य, भाजी आणि चारा पीक म्हणून केली जाते.
गवारीच्या बियांपासून गवारीचा डिंक (गवार गम) काढतात. या डिंकाला कापड उद्योगामध्ये बरीच मागणी आहे. मुख्य धान्य पिकात मिश्रपीक म्हणून चवळी आणि गवार या दोन्ही पिकांची मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्त्वावर लागवड होत नसल्यामुळे या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने या पिकांच्या सुधारित जाती आणि हिरवळीच्या खतांची मशागतीच्या तंत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. या पिकांचा हिरवळीच्या खतांची पिके म्हणूनही उपयोग होतो.
सदरील माहितीचा उपयोग आपल्याला चवळी आणि गवार या भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्यासाठी होणार आहे. चवळी आणि गवार या भाजीपाला पिकाच्या सुधारित जातींची माहिती होईल. चवळी आणि गवार या भाजीपाला पिकांवरील प्रमुख रोग आणि किडींचे नियंत्रण करता येईल. तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या द्वारे त्यांचे चवळी व गवारीचे उत्पादन दर्जेदार शक्य होणार आहे.
चवळी व गवारीचे महत्त्व
भाजीपाला पिके म्हणून गवार आणि चवळी ही पिके महत्त्वाची आहेत. ही पिके कोरडवाहू आणि बागायती म्हणून आणि पिकांची फेरपालट करण्यासाठी आंतरपिके म्हणूनही घेता येतात. या पिकांमुळे जमिनीतील नत्राचा साठा वाढतो. चवळी आणि गवार या दोन्ही पिकांच्या शेंगांमध्ये प्रोटीन्स, जीवनसत्त्व अ आणि ब, लोह, चुना यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
सुधारित मुलायम शेंगांच्या उन्नत वाणांच्या उपलब्धतेमुळे या भाज्या फार लोकप्रिय होत आहेत. काही ठिकाणी ही पिके जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतली जातात. तसेच चवळीच्या पिकाचा हिरवळीचे खत म्हणून उपयोग केला जातो.
तक्ता 1
चवळी आणि गवार शेंगांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण
अन्नघटक
प्रमाण (%)
अन्नघटक
प्रमाण (%)
चवळी
गवार
चवळी
गवार
पाणी
84
81
कार्बोहायड्रेट्स
8.0
11
प्रोटीन्स
4.3
3.2
फॅट्स
0.2
0.4
खनिजे
0.9
1.4
तंतुमय पदार्थ
2.0
2.2
लोह
00.03
00.06
कॅल्शियम
00.8
0.13
फॉस्फरस
0.07
00.04
जीवनसत्त्व
941
316
जीवनसत्त्व
0.001
00.01
जीवनसत्त्व
0.013
0.05
उष्मांक
16
चवळीगवार उत्पादन तंत्राच्या मुख्य बाबी
प्रस्तुत दर्जेदार चवळी व गवार उत्पादन तंत्र लेखामध्ये चवळी व गवारीचे महत्त्व, हवामान, जमीन, लागवडीचा हंगाम, विविध प्रकार, उन्नत वाण, बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर, लागवड पद्धती, खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, आंतरपिके, महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण, महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण,  काढणी आणि उत्पादन आदी घटकांची माहिती देण्यात येत आहे.
हवामान 
चवळी आणि गवार या दोन्ही पिकांना उष्ण हवामान लागते. परंतु ही सर्व पिके हंगामात वर्षभर घेतली जातात. ही दोन्ही पिके मध्यम पाऊस असणाऱ्या भागात चांगली येतात. गवार हे कोरडवाहू पीक असल्यामुळे ते जमिनीतील कमी पाण्यावरही तग धरू शकते. चवळीचे पीक कडक थंडी सहन करू शकत नाही. तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास चवळीच्या झाडाला शेंगा व फुले येत नाहीत.
जमीन 
गवार आणि चवळी ही दोन्ही पिके मध्यम खोलीच्या, कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत उत्तम येतात. जास्त काळ साचलेले पाणी या पिकांना मानवत नाही. म्हणून खरीप पिकासाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी आणि साचलेले पाणी काढून घ्यावे. रब्बी आणि उन्हाळी हंगामात ही पिके भारी जमिनीतही घेता येतात; मात्र पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी सेंद्रिय खते देऊन जमिनीचा पोत चांगला ठेवावा लागतो.
लागवडीचा हंगाम 
चवळी व गवार या दोन्ही पिकांची लागवड खरीप हंगामासाठी जून-जुलै ते ऑगस्टपर्यंत कोरडवाहू पीक म्हणून तर उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये बागायती पीक म्हणून करतात. गवार पिकाची लागवड महाराष्ट्रात बाराही महिने करता येते. चवळीचे पीकही महाराष्ट्रात जवळजवळ वर्षभर घेता येते. परंतु ठरावीक जातच लावावी. कारण चवळी पिकाच्या जाती दिवसातील प्रकाशाच्या कालावधीनुसार वाढतात. चवळीच्या काही जाती उदाहरणार्थ, पुसा दो फसली आणि पुसा ऋतुराज या पावसाळी व उन्हाळी हंगामात लावता येतात. चवळीच्या उन्हाळी पिकासाठी शिफारस केलेल्या जाती (पुसा फाल्गुनी) खरीप हंगामात लावल्यास फक्त पानांचीच वाढ होते आणि शेंगा धरत नाहीत. चवळीची पुसा बरसाती ही जात खरीप हंगामात लावावी.
चवळी व गवार वाणांची वैशिष्ट्ये 
भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली (ICAR) यांनी चवळीच्या पुढील वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे :
चवळीचे सुधारित वाण 
1) पुसा फाल्गुनी (Pusa Falguni)
पुसा फाल्गुनी ही चवळीची जात उन्हाळी हंगामासाठी (फेब्रुवारी – मार्च पेरणी) वाणाचा विकास करण्यात आला आहे. प्रत्येक झाडाला 12-15 फांद्या येतात आणि साधारणत: एका झाडाला 133 शेंगा लागतात.
2) पुसा बरसाती (Pusa Barsati)
पुसा बरसाती ही लवकर येणारी जात असून खरीप हंगामासाठी या जातीची शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा पिवळट हिरव्या रंगाच्या आणि 25 ते 27 सेंटिमीटर लांब असतात.
3) पुसा दो-फसली (Pusa do-phasali)
हा वाण पुसा फाल्गुनी आणि फिलीपीन्समधील लांब शेंगाच्या वाणाच्या संकरातून विकसित केला आहे. हा वाण उन्हाळी आणि खरीप हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे. या जातीची झाडे, झुडपी, बुटकी असून शेंगा 18 सेंटिमीटर लांब, सरळ आणि हिरव्या रंगाच्या असतात. बी लावल्यानंतर 35-40 दिवसांत या जातीला फुले येतात. या जातीचे जवळजवळ 10 तोडे मिळतात आणि त्यापासून दर हेक्टरी 10 टन उत्पादन मिळते.
4) पुसा ऋतुराज (Pusa Rituraj)
हा दोन्ही हंगामांत घेण्यास योग्य वाण आहे. ही जात झुडूप वजा वाढणारी असून या जातीची फुले जांभळ्या रंगाची असतात. या वाणामध्ये पेरणीनंतर उन्हाळी हंगामात 40 – 45 दिवसांनी आणि खरीप हंगामात 30 दिवसांनी शेंगा काढणीला येतात. या जातीची झाडे बुटकी असून भरपूर शेंगा येतात. या जातीच्या शेंगा 22-25 सेंटिमीटर लांब, कमी तंतुमय आणि हिरव्या रंगाच्या असतात. एकूण 8 ते 10 तोडण्या मिळतात. या जातीचे हेक्टरी उत्पादन 8-8.5 टनांपर्यंत मिळते. बी भुरकट रंगाचे असून शेंगा आणि बी या दोन्हींसाठी लागवड करण्यात येते.
5) पुसा कोमल (Pusa Komal)
हा जिवाणूमुळे होणाऱ्या करपा रोगाला प्रतिबंधक वाण असून पुसा दो फसलीच्या मानाने लवकर तयार होणारा लांब शेंगांचा, अधिक उत्पादन देणारा आहे. खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामांत घेण्यास योग्य, 45 दिवसांत फुले यायला सुरुवात होते.
गवारीचे सुधारित वाण 
गवार या पिकाच्या अनेक स्थानिक जाती आहेत. स्थानिक जातीच्या शेंगा आखूड असून त्यांवर पांढरी बारीक लव असते. स्थानिक जातीच्या शेंगांमधील दाणे ठळकपणे दिसतात. याशिवाय या शेंगा चरबट असतात. परंतु आता अधिक उत्पादन देणाऱ्या लांब, कोवळ्या लुसलुशीत शेंगांच्या सुधारित जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे.
1) पुसा सदाबहार (Poosa Sadaabahaar)
पुसा सदाबहार ही जात राजस्थानातील स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली असून ही जात चांगले उत्पादन देणारी आणि सरळ वाढणारी आहे. उन्हाळी आणि खरीप हंगामात ही जात चांगली वाढते. या जातीच्या शेंगा पिवळसर हिरव्या रंगाच्या असून 12 ते 13 सेंटिमीटर लांब, मऊ तसेच कमी तंतुमय असतात. उन्हाळ्यात या जातीची पहिली तोडणी 45 दिवसांनी तर पावसाळ्यात 55 दिवसांनी होते.
2) पुसा मोसमी (Pusa Mosami)
ही जात पावसाळी हंगामासाठी चांगली आहे. या जातीची झाडे सरळ न वाढता भरपूर फांद्या येतात. या जातीच्या शेंगा मऊ, चकचकीत, हिरव्या आणि 10 ते 15 सेंटिमीटर लांबीच्या असतात. उशिरा तयार होणाऱ्या या जातीच्या शेंगा 65 ते 80 दिवसांनी तोडणीस येतात.
3) पुसा नवबहार (Pusa Navbahar)
ही जात पुसा सदाबहार आणि पुसा मोसमी या जातींच्या संकरातून विकसित केलेली आहे. या जातीच्या शेंगांची प्रत पुसा मोसमीसारखी असून झाडे पुसा सदाबहार सारखी सरळ वाढतात. भरपूर उत्पादन देणारी ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उत्तम आहे. या जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन 12 टनांपर्यंत मिळते. शेंगा 15 सेंमी. लांब आणि जिवाणूमुळे होणाऱ्या करपा रोगाला प्रतिकारक वाण आहे.
4) शरद बहार (Sharad Bahar)
महाराष्ट्रातील IC-11708 या स्थानिक वाणातील एकाच झाडाच्या निवडीमधून या उत्कृष्ट असून बुटकी आणि झुडूप वजा वाढणारी जात आहे. या जातीच्या शेंगा 10 – 12.5 सेंटिमीटर लांबीच्या सरळ आणि गर्द हिरव्या रंगाच्या असतात. बी पेरणीपासून 60 दिवसांत शेंगा तोडणीस येतात. 3 ते 4 दिवसांच्या अंतराने शेंगांची तोडणी करावी. या जातीचे दर हेक्टरी उत्पादन 9 टनांपर्यंत मिळते. बी लहान आणि पांढऱ्या रंगाचे असते.
बियाणे प्रमाण (Seed ratio)   
चवळीच्या टोकण पद्धतीने लागवडीसाठी दर हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे लागते. तर गवारीची टोकण पद्धतीने लागवड केल्यास दर हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणे लागते. या दोन्ही पिकांची ज्वारी आणि कापसाच्या मुख्य पिकांत मिश्रपिक म्हणून लागवड केल्यास बी कमी लागते. टोकण पद्धतीने प्रत्येक जागी 2-2 बिया टोकतात.
लागवड पद्धती 
चवळीच्या सुधारित जातीची टोकण पद्धतीने 45 x 30 सेंटिमीटर अंतरावर व स्थानिक जातींची 60 x 45 सेंटिमीटर अंतरावर लागवड करतात. तर गवारीची लागवड टोकण पद्धतीने 60 x 30 सेंटिमीटर अंतरावर करतात. चवळी आणि गवार या दोन्ही पिकांची पाभरीने अथवा तिफणीने 45 सेंटिमीटर अंतरावर पेरणी करतात आणि नंतर 15 दिवसांनी विरळणी करून 2 झाडांत 30 सेंटिमीटर अंतर ठेवतात.
खत व्यवस्थापन 
आवश्यकतेनुसार जमीन नांगरून तयार केल्यावर वखराच्या अथवा कुळवाच्या शेवटच्या कुळवणीबरोबर हेक्टरी 25 ते 50 टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. गवार आणि चवळी या दोन्ही पिकांना हेक्टरी 25 किलो नत्र, 60 ते 75 किलो स्फुरद आणि 60 ते 75 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. राहिलेली नत्राची अर्धी मात्रा लागवडीपासून 30 दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन
ही दोन्ही पिके खरीप हंगामात कोरडवाहू म्हणून घेता येतात. यांपैकी गवार पीक कोरडवाहू म्हणून अधिक चांगले आहे. या दोन्ही पिकांना उन्हाळी हंगामात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. मात्र फुले धरल्यापासून तर शेंगांचा बहार पूर्ण होईपर्यंत 10 ते 12 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. या पिकांना पाणी देताना हंगाम, जमिनीचा मगदूर आणि पिकांच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन पाण्याच्या पाळ्या आणि त्यांतील अंतर ठरवावे.
आंतरमशागत 
चवळी आणि गवार या पिकांची पाभरीने अथवा तिफणीने पेरणी केल्यास 15 दिवसांनी आवश्यकतेनुसार विरळणी करून दोन झाडांमध्ये 20 ते 30 सेंटिमीटर अंतर ठेवावे.  लागवडीनंतर 2 ते 3 आठवड्यांनी दोन्ही पिकांत खुरपणी करून तण काढावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा तण काढावे. फुले येण्यापूर्वी, गवार पिकास सी. सी. सी. (सायकोसील) 500 पीपीएम तर चवळीमध्ये मॅलिक हैइँझाईड (एमएच- 40) 15 पीपीएम या संजीवकांचा फवारा दिल्यास उत्पादनात 35 % पर्यंत वाढ होते.
आंतरपिके 
ही दोन्ही पिके आंतरपिके म्हणून घेण्यात येतात. कापूस, ज्वारी, तसेच मिरची पिकामध्ये आंतरपिके म्हणून घेता येतात. फळबागामध्ये यांची आंतरपिके म्हणून लागवड केल्याने फायदा होतो.
पीकसंरक्षण 
चवळी आणि गवार या दोन्ही पिकांवर विशेष नुकसानकारक किडींचा उपद्रव होत नाही. मात्र मावा, तुडतुडे आणि शेंग पोखरणाऱ्या अळ्या या किडी आढळल्यास हेक्टरी 20 किलो 5 % कार्बारिलची धुरळणी करावी.
चवळी आणि गवार या दोन्ही पिकांवर प्रामुख्याने भुरी, करपा आणि रोपांची मर या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा रोगांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
1) भुरी : हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा उपद्रव झाल्यास झाडाच्या खोडावर, पानांवर आणि शेंगांवर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात. रोगाचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास पाने गळून पडतात आणि झाडाला शेंगा लागत नाहीत.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावर पाण्यात मिसळणारे गंधक 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
2) रोपमर : हा बुरशीजन्य रोग असून बियांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली रोपे सडतात आणि जमिनीवर कोसळतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी बियांच्या पेरणीपूर्वी बियांना दर किलोस 2 ते 3 ग्रॅम थायरम अथवा कॅप्टान हे बुरशीनाशक चोळावे.
3) पानांवरील ठिपके : हा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे पानांवर ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा असून कडा लाल रंगाच्या असतात. ठिपके हळूहळू संपूर्ण पानावर पसरतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम थायरम मिसळून 15 मिळतात. शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या, 25-30 सेंमी. लांब आणि उत्पादन हेक्टरी 10 टनमिळते.
4) पानावरील मोझॅक : हा विषाणुजन्य रोग असून यामुळे चवळीच्या पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
उपाय : रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगप्रतिबंधक किंवा रोगाला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जाती लावाव्यात. पांढरी माशी या किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो. म्हणून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात  ट्रायझोफाँस 45 ईसी 16 मि.ली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. जिवाणूमुळे येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यास त्याला प्रतिबंधक वाणांची लागवड करावी.
टीप : सदर लेखामध्ये कीटकनाशके व त्यांचे प्रमाण दिले असून फवारणीसाठी शक्यतो पीकशास्त्र तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार फवारणी करावी. कारण शासनाने वेळोवेळी औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे.
काढणी 
चवळी आणि गवार या दोन्ही पिकांत हंगाम आणि जातीनुसार 6 ते 8 आठवड्यांत शेंगा तोडणीस येतात. शेंगा फार कोवळ्या अथवा जून झाल्यावर तोडू नयेत. कोवळ्या परंतु वाढलेल्या अवस्थेत एकेक शेंग तोडावी. शेंगेत बी निब्बर होऊ देऊ नये. तोडणी 3 ते 4 दिवसांनी करावी.
उत्पादन
चवळी पिकाचे सर्वसामान्य सरासरी प्रती हेक्टरी 5 ते 8 टनांपर्यंत हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते तर गवारीचे 4 ते 6 टनांपर्यंत हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते. चवळी व गवार लागवडीसाठी योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.
संदर्भ :
  • भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग – 1 : पाठ्यपुस्तिका –2 : 7, य.च.म.मु.वि., नाशिक
  • चवळी आणि गवार उत्पादन तंत्रज्ञान, य.च.म.मु.वि., नाशिक
 
प्रा. गोविंद अंकुश, सहयोगी प्राध्यापक, अदित्य कृषि महाविद्यालय, लातूर
 
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन

 

 

Prajwal Digital

Leave a Reply