दुग्धप्रक्रिया बाजार व्यवस्थापन तंत्र

दुग्धप्रक्रिया बाजार व्यवस्थापन तंत्र

 63 views

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्यामध्ये दुग्ध व्यवसाय वाढीस चालना मिळाली आहे. दूध विक्रिीच्या बरोबरीने काही शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडेही वाटचाल करीत आहेत. दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यासाठी प्रथम दुधाची गुणवत्ता, प्रक्रिया तंत्र आणि बाजारपेठ याचा अभ्यास महत्वाचा आहे. दही, पनीर, पेढा या दुग्धजन्य पदार्थांना वर्षभर मागणी असते. याव्यतिरिक्त लग्रसराईमध्ये खवा, पनीर आणि दही यांना सुद्धा मागणी वाढलेली असते.
पनीर, खवा, ताक, लस्सी, श्रीखंड, आइस्क्रीम इत्यादी पदार्थांसाठी क्रीम सेपरटर यंत्र उपलब्ध आहे. या यंत्राच्या वापरण्यासाठी विशेष तंत्रज्ञाची गरज भासत नाही.
दूध थंड करण्यासाठी लहान बल्क कुलर्सही उपलब्ध आहेत. दुग्धजन्यपदार्थ साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते.
पनीर प्रेस अंदाजे 15 हजार रूपये, खवानिर्मिती यंत्र अंदाजे 40 ते एक लाखापर्यंत, क्रीम सेपरेटर 40 हजार रूपयांपासून पुढे, श्रीखंड निर्मिती यंत्र 40 हजारांपासून पुढे, तर लस्सी निर्मित यंत्र पाच 5 ते 20 हजारांपर्यंत उपलब्ध आहे. विविध ठिकाणी किंमतीत थोडाफार फरक पडू शकतो.
सणासुदीला दुग्ध पदार्थांची मागणी :
वर्षभर दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी मिळण्यासाठी आपल्याला वेगळे नियोजन व व्यवस्थापन करावे लागते. यासाठी विविध दुग्ध पदार्थांचे उत्पादन घ्यावे लागेल. उदाहरणार्थ, दिवाळी अगोदर किंवा दिवाळी सणादरम्यान मिठाईची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. अशा वेळेस वेगवेगळ्या स्वादाच्या बर्फी (चॉकलेट, फळांचा वापर) चमचम, गुलाबजामुन,रसमलाई पेढे, कलाकंद बर्फी या दुग्ध पदार्थांना मागणी असते. त्यानुसार पदार्थ निर्मितीचे नियोजन व व्यवस्थापन करावे.
दसरा सणाला श्रीखंडाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. संक्रांतीसाठी, अनेक वेगवेगळ्या सणांसाठी, बासुंदीलाही चांगली मागणी वाढते. अशा सणांदरम्यान अगोदर नियोजन करून नफा कमावता येईल, विक्री वाढवता येईल.
उपवासादरम्यान ( एकादशी, संकष्टी ) दह्याची मागणी वाढते. रमजा, ईदसाठी शिरखुर्मा पदार्थ तयार केला जातो. याच कालावधीत फालुदाचीही मागणी वाढते. सणाचा कालावधी लक्षात घेऊन दुग्धपदार्थ तयार करून विक्री वाढ करता येऊ शकेल.
हंगामानुसार (ऋतू) दुग्धपदार्थ :
हिवाळा आणि विशेषत: उन्हाळ्यात दुग्ध पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. हिवाळ्यात पनीर, तूप, बटर, दही या दुग्ध पदार्थांची मागणी वाढते. उन्हाळ्यात सुगंधी दूध, ताक,  लस्सी, स्क्रीम, कुल्फी, बदाम शेक, इत्यादी दुग्धपदार्थांची मागणी वाढलेली  दिसते. ताकामध्ये मसाला ताक, काकम ताक, लस्सीत वेगवेगळ्या फळांच्या (उपलब्धतेनुसार) गराचा वापर करावा.
विक्रीसाठी बाजारात नवीन दुग्धपदार्थ :
वेगळ्या चवीच्या दुग्धपदार्थांना बाजारात मागणी आहे. पनीर टिक्का, दहीभात, मटार खीर, बाजरा लस्सी, अंगूर रबडी, चमचम, संदेश, लवंगलतिका, निवळीपासूनची पेये, सूप तसेच इतर राज्यांतील पदार्थ आपल्या राज्यात तयार करून विकता येतील. विविध वनौषधींचा दुग्धपदार्थांत वापर, त्यांच्या बनवण्याच्या पद्धती, मधाचा वापर, वेगवेगळ्या विरजणांच्या पद्धतींचा वापर इत्यादींवर कृषी विद्यापीठात किंवा अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.
फळांच्या उपलब्धतेनुसार पदार्थांची निर्मिती :
वेगवेगळ्या ऋतूंत विविध ठिकाणी वेगवेगळी फळे स्वस्तात उपलब्ध असतात. त्या फळांचा वापर अनेक दुग्धपदार्थांसाठी करता येतो. उदाहरणार्थ, आंबा, अंजीरचा वापर शेक, स्क्रीम, श्रीखंड, बर्फी, दही अशा अनेक दुग्धजन्य पदार्थांत करता येतो.
गरजेनुसार दुग्धपदार्थ निर्मिती :
सुरूवातीची दुधाची एक लीटरची बाटली आता छोटी होऊन पाव लीटरपर्यंतदेखील आली आहे. त्याचप्रमाणात मिठाईचे पॅकिंग उदाहरणार्थ, दोन ते चार गुलाबजाम, दोन ते चार रसगुल्ले, पेढा, बर्फी तसेच 100 किंवा 200 मि. लि. च्या पॅकमध्ये मिष्टी दही, 200 मि. लि. बाटलीमध्ये लस्सी अशा प्रकारे पॅकिंग करता येईल. अशा प्रकारचे लहान पॅकिंग रेल्वेस्थानक, बस स्थानक, हॉटेल्स, महोविद्यालये याठिकाणी ठेवता येतील. काही ठरावीक पदार्थ सोडल्यास अशा प्रकारचे लहान पॅकिंगमधले दुग्धपदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.
दुग्धजन्य पदार्थांचे विक्री तंत्र :
  1. आपला उत्पादित माल एकाच ठिकाणी विकताना विक्री कमी होते. परंतु अनेक ठिकाणी मागणीनुसार पुरवठा केल्यास विक्री वाढवता येईल.
  2. खव्यासाठी वेगवेगळे केटरर्स यांच्याशी संपर्क साधता येईल. पनीरची मागणी हॉटेल्ससाठी रोजची असते. शिवाय केटरर्सशीदेखील संपर्क ठेवून पुरवठा करता येईल. तसेच मेस, कँटिनसाठीही पुरवठा करता येईल.
  3. सॅण्डविच तयार करणाऱ्यांसाठी बटर, पिझ्झा तयार करणाऱ्यांसाठी मोझारेला चीज पुरवता येईल. तसेच रूग्णालयात काही ठरावीक दुग्धपदार्थ देता येतील. कमी फॅटचे दूध, सुगंधी दूध, दही इत्यादींची रूग्णालयात मोठी मागणी असते.
वयानुरूप व्यक्तींसाठी दुग्धपदार्थ :
  1. सर्वसाधारण दुग्धपदार्थांची ठरावीक विक्री तर होतच असते ; परंतु विशिष्ट वयाचा गट निश्चित करून दुग्धपदार्थांत विक्री वाढवता येईल. वयस्क किंवा स्थूल व्यक्तींसाठी कमी फॅटचे (फॅट काढून घेतलेले) दुग्धपदार्थ (कम फॅटचे दूध, दही, पनीर, बासुंदी, श्रीखंड इत्यादी) देता येतील.
  2. साखरऐवजी कृत्रिम साखर वापरूनकमी कॅलरीजचे दुग्धपदार्थम्हणून विक्री करता येते.
  3. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आकाराचे संदेश (बंगाली मिठाई), वेगवेगळ्या रंगात असणारा लहान चेरी रसगुल्ला, लहान पेढा असे पदार्थ तयार करावेत. यामध्ये शिफारशीत खाद्यरंगाचा उपयोग, आकारात थोडा बदल, चवीत थोडी नावीन्यता (चॉकलेट, फळांचा गर यांचा वापर) आणावी.
  4. गर्भावती स्त्रियांसाठी पौष्टिकता वाढवून गरजेनुसार पदार्थ तयार करता येतील.
  5. लहान मुलांसाठी कॅन्डी, मोठयांसाठी व्हे कॉफी, सुगंधी दूध इत्यादी प्रकारात दुग्धपदार्थ तयार करावेत.
दुग्धप्रक्रिया बाजार व्यवस्थापन तंत्र हा लेख दुग्धप्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण असून दुधाच्या पदार्थांचे बाजार व्यवस्थापन कसे करावे, त्यांचे नियोजन कसे करता येईल या बाबींकडे लक्ष वेधण्याचे काम लेखकांनी केलेले आहे.  
 
शब्दांकन  : आकाश बानाटे, बी. एस्सी.ॲग्री विद्यार्थी, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर
 
*** Please Like, Share & Comments *** 

आधुनिक खवा निर्मिती तंत्र

आधुनिक पनीर निर्मिती तंत्र

 

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: