जैविक कीटकनाशके बनविण्याच्या पद्धती

जैविक कीटकनाशके बनविण्याच्या पद्धती पीकसंरक्षण हा शेतीमधील उत्पादन वाढीचा मुख्य घटक आहे. पीक घेताना तसेच साठवणुकीत काही कीड व रोग त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्याचे नुकसान होते.
जैविक पीक संरक्षणामध्ये पिकावरील किडींचा नैसर्गिक शत्रू शोधून त्याची कृत्रिमरित्या वाढ करणे, त्याचा कीड नियंत्रणासाठी वापर करणे, तसेच पिकांवरील किडींचे व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी काही पारंपारिक कीटनाशकांचाही वापर सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. आतापर्यंत एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाव्यतिरिक्त वेगवेगळ्या वनस्पतीचे अर्क काढून त्याचा वापर शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये करीत आहेत. वेगवेगळ्या किडी व रोगांकरिता खालील नैसर्गिक किटकनाशके वापरतात.
1) दशपर्णांक किंवा दशपर्णी अर्क (दहा पानांचा अर्क)
साहित्य :
 • कडूलिंबाचा पाला 5 किलो
 • घाणेरी किंवा बेशरमचा पाला 5 किलो
 • निरगुडी पाला 2 किलो
 • पपई पाला 2 किलो
 • गुळवेल/ पांढरा धोतरा 2 किलो
 • रूई पाला /पांढरी मंदार 
 • लाल कव्हेर पाला 2 किलो
 • बन एरंड पाला 2 किलो
 • करंज पाला 2 किलो
 • सीताफळ पाला 2 किलो

इतर साहित्य

 • गोमूत्र 10 लीटर
 • देशी गाईचे शेण 2 किलो
 • गोणपाट

तयार करण्याची पद्धती

 • वरील सर्व प्रकारचा पाला बारीक करून 200 लीटर ड्रम मध्ये टाकावा.
 • त्यामध्ये 10 लीटर गोमूत्र टाकावे व देशी गाईची शेण 2 किलो टाकून पूर्ण ड्रम 200 लीटर पाण्याने भरावा. हे द्रावण गोणपाटाने बंद करावे व हा ड्रम सावलीत 30 दिवस आंबवण्यासाठी ठेवावा.
 • हे द्रावण दिवसातून 2 ते 3 वेळा डावीकडून उजवीकडे ढवळावे.
 • हे द्रावण 30 दिवसानंतर गाळून घेऊन ते आपणास फवारणी करिता वापरता येते. हे औषध आपण सहा महिन्यापर्यंत वापरता येते.

फवारणीसाठीचे प्रमाण

2.5 लीटर औषध 200 लीटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारावे किंवा 300 मि.ली. औषध 15 लीटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारावे.
परिणाम
सर्व प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी, बोंडअळाच्या, पाने खाणाऱ्या अळ्या, नागअळी इत्यासाठी उपयुक्त आहे.
2) निमपर्ण अर्क (Nee Leaf Extract)
साहित्य
 • निमपाला 5 किलो
 • जुने किंवा आंबवलेले गोमूत्र 2 लीटर

तयार करण्याची पद्धत

 • 5 किलो निमपाला बारीक ठेचून घ्यावा व त्यामध्ये 2 लीटर गोमूत्र एकत्र करून 24 तास भिजत ठेवावा.
 • हे द्रावण 24 तासानंतर गाळून घेऊन फवारणीस वापरावे.

फवारणीसाठीचे प्रमाण

15 लीटर फवारणी पंपासाठी  600 मि.ली. औषध 14.400 लिटर + 15 ग्रॅम खादी साबणाचा चुरा एकत्र करून फवारावे.
परिणाम
केसाळ अळ्या, मावा, तुडतुडे, नागअळी, विषाणूजन्य विविध रोगासाठी उपयुक्त आहे.
3) निमतेल अर्क 0.3 % (Neam Oil Spools)
साहित्य
 • निमतेल 45 मि.ली.
 • खादी साबणाचा चुरा 15 ग्रॅम
 • तयार करण्याची पद्धत
 • 45 मि.ली. निमतेल व खादी साबणाच्या चुऱ्याचे 100 मि.ली. द्रावणामध्ये एकत्र करून घ्यावे.

फवारणीसाठीचे प्रमाण

15 लीटर फवारणी पंपासाठी 45 मि.ली. निमतेल + खादी साबणाच्या चुऱ्याचे 100 मि.ली. द्रावण 14.900 लीटर पाणी एकजीव करून फवारावे.
परिणाम
मावा, तुडतुडे, नागअळी, फुलकिडे, कोबीवरील अळ्या इत्यासाठी उपयुक्त आहे.
4) कडूनिंबाच्या बियांचा अर्क   3 % (Neam Extremes Extract)
साहित्य
 • कडूनिंबाच्या बिया 5 किलो
 • खादी साबणाचा चुरा 15 किलो

तयार करण्याची पद्धत

कडूनिंबाच्या झाडाखाली पिकलेल्या निंबोळ्यांचा सडा 5 ते 7 किलो घेऊन बियांवरील अवरण (कव्हर) काढून टाकावा.
फवारणीचे महत्त्वाचे मुद्दे
 1. वरील सर्व निमयुक्त औषधे सकाळी किंवा संध्याकाळी फवारावीत. दुपारी उन्हामध्ये या औषधांची फवारणी करू नये. सूर्य प्रकाशातील अलव्ट्राव्हायोलेट किरणांमुळे कडूनिंबाच्या किटकनाशातील गुणधर्म कमी होतात. उन्हाळ्यामध्ये पिकाला आठवड्यातून 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
 2. कडूनिंबाच्या बिया वापरताना त्या कमीत कमी 3 महीने जुन्या असाव्या, तसेच त्या 8 ते 10 महीने जुन्या नसाव्या. कारण जास्त जुने बियाणे असेल तर त्यामधील अझडिरॅक्टीन या कीटकनाशकांचे बियांमधील प्रमाण कमी होते.
 3. फवारणी करताना पानाच्या खालच्या बाजूने देखील फवारणी करावी, कारण किडींची अंडी पानाच्या खालच्या बाजूवर असतात.
 4. निमयुक्त औषधांचा किटकांवर परिणाम होण्यास वेळ लागतो.
 5. ह्या जैविक फवारण्यांमुळे कीटकांच्या जीवनशैलीवर परिणाम होऊन त्यांच्या मार्फत होणारे नुकसान कमी होते.

जैविक कीटकनाशके बनविण्याचे फायदे

 • पिकांवर चांगल्या प्रकारे परिणाम करणारी जैविक पद्धत आहे.
 • कमीत कमी खर्चात तयार होणारी आहे.
 • किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो.
 • पिकावरील बहुतांशी रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करता येतो.
 • रसायनविरहित असल्यामुळे मानवाला कोणत्याही प्रकारचा इजा होत नाही.
 • या पद्धतीने किडींचे नियंत्रण केल्यामुळे उत्पादनात अंदाजे 5 टक्के पर्यंत वाढ होते.
 • कोणतेही रसायन न वापरल्यामुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चात बचत होते.
जैविक कीटकनाशके बनविण्याच्या पद्धती या तंत्राचा शेतकरी बांधवांनी कीड व रोग नियंत्रणासाठी अवलंब केल्यास निश्चितपणे कमी खर्चात चांगल्या प्रकारे पिकांचे किडींपासून संरक्षण करता येऊ शकते. तसेच घरच्या घरी हे जैविक कीटकनाशके तयार करता येत असल्यामुळे ही जैविक पद्धत सहज आणि सुलभ आहे. या पद्धतीची माहिती महाराष्ट्रातील सबंध शेतकरी बांधवांना मिळावी, किडींचे व रोगांचे जैविक पद्धतीने नियंत्रण करता यावे, किडींमुळे होणारे नुकसान टाळता यावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावा, यासाठी प्रस्तुत लेख तयार करून शेतकऱ्यांना उपयुक्त व महत्त्वपूर्ण माहिती ठरू शकेल अशी लेखकाची खात्री आहे.  
Prajwal Digital

4 thoughts on “जैविक कीटकनाशके बनविण्याच्या पद्धती”

 1. खूप छानं आणि महत्व पुर्ण माहिती या लेखात दिली आहे . या शिक्षणाचा कोर्स करायचा झाल्यास कुठे करावा.
  सध्या मी निंबोनी अर्क,दशपर्णी ,लमित, जिवाअमृत, आणि बीजामृत हे सर्व जैविक किडनियत्रंणासाठी विद्यार्थ्यांना आनंद निकेतन विद्यालय सेवाग्राम नई तालीम . ईथे शिकवण्यात आले आहे .

  Reply

Leave a Reply