झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान
Sp-concare-latur

 217 views

झेंडू हे देशातील महत्त्वाचे व व्यापारी पीक आहे. झेंडू एक फूल वनस्पती असून जे महाराष्ट्रात देवपूजा व लग्नसमारंभासाठी सर्वाधिक वापरले जाते. सर्वांना आवडणारे आकर्षित असे फूल आहे. या फुलाला बाजारांमध्ये बारा महिने मोठ्या प्रमाणावर चांगली मागणी असते. विशेषत: दिवाळी व दसरा उत्सवामध्ये फुलांची मागणी वाढलेली असते. हे फूल टिकाऊ तसेच दिसायला आकर्षक असते. याचा फायदा शेतकरी बंधूंना मिळणे गरजेचे आहे, म्हणून शेतकऱ्यांनी दर्जेदार झेंडू उत्पादनाची माहिती उपलब्ध  व्हावी, झेंडूचे उत्पादन अधिकाधिक वाढावे, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे यासाठी सदर लेख तयार करण्यात येत आहे.   
झेंडूची शेती ही फायदा मिळवून देणारी व कमी कालावधीत म्हणजेच सहा ते सात महिन्याच्या आत उत्पादन देणारी आहे. झेंडूची लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम नफा इतर फूल पिकांच्या तुलनेत मिळू शकतो. झेंडू फुलाची लागवड फळबागांमध्ये आंतरपीक म्हणूनही करता येते. तसेच भाजीपाल्याच्या पिकात झेंडूची मिश्रपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही केली जाते. यामुळे दोन्ही पिकांपासून शेतकरी बांधवांना उत्पन्न मिळण्याची शक्यता जास्त असते.
झेंडू : शास्त्र व कुळ
झेंडूचे शास्त्रीय नाव टॅगेट्स एरेटा (Tagetes erecta) असून झेंडूचे कुळ अ‍ॅटेरासी (Asteraceae) हे आहे. झेंडूला इंग्रजीत मॅरीगोल्ड (Marigold) तसेच हिंदीमध्ये गेंदा असे म्हणतात.
झेंडूचे महत्त्व व उपयोग :  
झेंडू हे महत्त्वाचे फुलपीक आहे. झेंडूचा उपयोग दैनंदिन देवपूजा, अर्चा, धार्मिक ठिकाणी तसेच लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हंगामानुसार झेंडूची मागणी वाढत असते. यामुळे झेंडूला सर्वाधिक बाजारभाव हा दिवाळी व दसरा या सणोत्सवात मिळत असतो. त्यामुळे झेंडूची लागवड योग्य पद्धतीने केल्यास निश्चितपणे उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो.  
झेंडू उत्पादन :
खालील तक्त्यानुसार भारतातील झेंडूचे उत्पादन मध्य प्रदेश 94 राज्याचे झाले असून मध्य प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. याच खालोखाल कर्नाटक 87.34, गुजरात 81.7, आंध्र प्रदेश 66.54, हरियाणा 61.83, पश्चिम बंगाल 58.1, महाराष्ट्र 48.29, छत्तीसगड 30.5, तामिळनाडू 18.08, सिक्किम 16.5, हिमाचल प्रदेश 15.77, तेलंगणा 10.65, आसाम 4.03, उत्तर प्रदेश 7.2, उत्तराखंड 1.5, इतर 0.65, जम्मू आणि काश्मीर 0.26, राजस्थान 0.2 या राज्याचा क्रम लागतो. यावरून असे स्पष्ट होते की, भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्र राज्यामध्ये झेंडू उत्पादनास चांगला वाव असून झेंडूची मागणी व गरज मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.
तक्ता क्र. 1 : भारतातील प्रमुख राज्यनिहाय झेंडू उत्पादन स्थिती (2015-16)
अ.क्र.
राज्यनिहाय
उत्पादन
(000 Tonnes)
भाग शेअर (%)
1
मध्य प्रदेश
94
15.59
2
कर्नाटक
87.34
14.48
3
गुजरात
81.7
13.55
4
आंध्र प्रदेश
66.54
11.03
5
हरियाणा
61.83
10.25
6
पश्चिम बंगाल
58.1
9.63
7
महाराष्ट्र
48.29
8.01
8
छत्तीसगड
30.5
5.06
9
तामिळनाडू
18.08
3.00
10
सिक्किम
16.5
2.74
11
हिमाचल प्रदेश
15.77
2.61
12
तेलंगणा
10.65
1.77
13
आसाम
4.03
0.67
14
उत्तर प्रदेश
7.2
1.19
15
उत्तराखंड
1.5
0.25
16
इतर
0.65
0.11
17
जम्मू आणि काश्मीर
0.26
0.04
18
राजस्थान
0.2
0.03
स्त्रोत : National Horticulture Board (NHB)
आलेख क्र. 1 : भारतातील प्रमुख राज्यनिहाय झेंडू उत्पादन स्थिती (2015-16)
स्त्रोत : National Horticulture Board (NHB)
झेंडू उत्पादन तंत्रज्ञान
जमीन व हवामान :
महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर झेंडूची लागवड करता येते तसेच दमट हवामान हे या पिकाला मानवत ते थंड हवामानामध्ये या पिकाचे उत्पादन मिळते. मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि सात ते साडेसात पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते ज्या जमिनीत सक्रम यांचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा जमिनीत झेंडूची लागवड करावी पाणथळ जमीन निवडू नये.
पूर्व मशागत  :
ज्या शेतात झेंडू लागवड करावयाची आहे त्या क्षेत्राची चांगली नांगरणी उन्हाळयात करून घ्यावी. आवश्यकतेनुसार दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. यानंतर चांगले कुजलेले 10 ते 12 क्विंटल शेणखत किंवा कंपोष्ट जमिनीत मिसळून जमीन तयार करून घ्यावी.
झेंडूच्या सुधारित व संकरीत जाती :
स्थानिक लाल किंवा पिवळा, गेंद, परभणी लोकर, बेंगलोर लोकर, ऑरेंज फ्रेश , सुप्रीम तसेच झेंडूच्या प्रचलित जाती मखमली, गेंदा, गेंदा डबल, पुसा,पुसा बासमती, एम .डी.1. ह्या असून काही निवडक जातीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे :
1) आफ्रिकन झेंडू : 
या प्रकारची झेंडूची झुडुपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसालीची हवामानात झुडूपे 100 ते 150 से. मी. पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. या प्रकारांमध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेझंट, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, आफ्रिकन टॉल डबल, मिक्स्ड, यलो सुप्रीम, हवाई, स्पॅन गोल्ड, अलास्का, इत्यादी
2) फ्रेंच झेंडू : 
या प्रकारातील झेंडूची झुडूपे उंचीला कमी असतात व झुडुपासारखी वाढतात. झुडूपांची उन्ह्ची 30 ते 40 से. मी. असते. फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा, तसेच फुलांचा गालीचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. या प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, स्प्रे, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.
3) पुसा नारंगी, (क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली): 
या जातीस लागवडीनंतर 123-136 दिवसानंतर फुले येतात. झुडूप 73 से. मी. उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व 7 ते 8 से. मी. व्यासाची असतात. हेक्टरी उत्पादन 35 मे. टन / हेक्टर याप्रमाणे येते.
4) पुसा बसंती (गोल्डन यलो जरसन जायंट):
या जातीस 135 ते 145 दिवसात फुले येतात. झुडुप 59 से. मी. ऊंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून 6 ते 9 से. मी. व्यासाची असतात. प्रत्येक झुडूप सरासरी 58 फुले देते. कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.
5) एम. डी. यू. 1 :
झुडूपे मध्यम उंचीची असतात. ऊंची 65 से. मी. पर्यत वाढते. या झुडूपास सरासरी 97 फुले येतात व 41 ते 45 मे. टन प्रती हेक्टर याप्रमाणे उत्पादन येते. फुलांचा रंग नारंगी असतो व 7 से. मी. व्यासाची असतात.
हेक्टरी बियाणे :
झेंडूची लागवड बियांपासून करतात. यासाठी सर्वसाधारण 1.5 ते 2 किलो ग्रॅम बियाणे प्रती हेक्‍टरी वापरावे.
लागवड हंगाम : 
झेंडूची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. झेंडू लागवडीसाठी 15 जून ते 15 जुलै पर्यंत लागवड करणे अत्यंत गरजेचे असते. यानंतर सुद्धा लागवड केल्यास चालते, परंतु जास्त उशिर केल्यास उत्पादनात घट येते.  
लागवडीचे अंतर
झेंडूसाठी सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे जातीनिहाय लागवडीचे अंतर ठेवावे.  पावसाळ्यातील उंच जाती : 60 × 60 सेंमी., मध्यम जाती : 60 × 45 सेंमी., हिवाळी उंच जाती: 60 × 45 सेंमी. , मध्यम जाती : 45- सेंमी., उन्हाळी उंच जाती : 45-45 सेंमी., मध्यम : 45-30 सेंमी. यानुसार लागवडीचे अंतर ठेवावे.
लागवड पद्धत
जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार सपाट वाफ्यावर व सरी वरब्यांमध्ये लागवड करतात. बी पेरल्यापासून 35 ते 40 दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. निरोगी, पाच पानावर आलेली, 15 ते 20 सेंमी उंचीची रोपे निवडावीत. लागवड शक्‍यतो सायंकाळी 60 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे 30 मिनिटे कॅप्टन 0.2 टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी.
आंतरमशागत :
झेंडूची लागवडीनंतर 15 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर पंधरा दिवसांनी 20 किलोग्रॅम नत्राचा दुसरा हप्ता देऊन मातीची भर लावावी. आवश्यकतेनुसार तणांचा बंदोबस्त करून घ्यावा.
रासायनिक खते :
झेंडू फुलांचे भरपूर उत्पादन यासाठी वरखते देणे गरजेचे आहेत. लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो ग्रॅम नत्र, 50 किलो ग्रॅम स्फुरद व 50 किलो ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एका महिन्याने 50 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा, लागवड केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी 10 किलो ॲझोटोबॅक्‍टर किंवा ॲझोस्पिरिलम 100 किलो ग्रॅम ओलसर शेणखतात मिसळावे. याचा डिलीट करून प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. त्याचप्रमाणे 10 किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू खत आणि 10 किलो ट्रायकोडर्मा100 किलो ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रातील झेंडूच्या पिकाला द्यावे. आठवड्याने गाडीचे काम करावे, त्यामुळे फांद्या फुटतील आणि फुलांच्या उत्पादन संख्येत वाढ होईल.  
पाणी व्यवस्थापन :
झेंडू पीक खरीप हंगामात घेतले जात असल्यामुळे या पिकाला फारशी पाण्याची गरज भासत नाही, परंतु पावसाचा खंड पडल्यास अथवा पिकांच्या संवदेनशील अवस्थेत पाणी देणे गरजेचे असते. यामुळे एक ते दोन जरी पाणी दिले तरी झेंडू पिकाला मानवते.
झेंडू कीड व रोग :
झेंडूवर आढळून येणाऱ्या प्रमुख किडींची व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन खालील तक्त्यात दर्शविण्यात येत आहेत.  
तक्ता क्र. 2 : झेंडू किडींचे व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
अ. क्र.
कीड व रोग
कीटकनाशक 
पाण्याचे प्रमाण
(प्रति 10 लिटर)
1
मावा, तुडतुडे, पांढरी माशी
डायमेथोएट 30% प्रवाही
10 मिली
2
लाल कोळी
डायकोफॉल  18.5% ई. सी.
गंधक 80% पाण्यात विरघळणारी पावडर
10 मिली / ली
15 ग्रॅम
3
नाग अळी
क्लोरोपायरीफॉस 20 % प्रवाही
होस्टॅथिऑन
15 मिली
2 मिली
4
फळ किंवा फूल पोखरणारी अळी
डायमेथोएट 30% प्रवाही
10 मिली
5
करपा
क्लोरोथॅलोनील
डायथेनएम- 45
15 ग्रॅम
20 ग्रॅम
6
मुळकुजव्या
कॉपर ऑक्झीक्लोराईड
2025 मिली
काढणी : 
झेंडूची लागवड केल्यापासून 60 ते 65 दिवसांत फुले काढणीस तयार होतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर काढणी करावी. उमललेली फुले देठाजवळ तोडून काढावीत. काढलेली फुले थंड ठिकाणी ठेवावीत, काढणी शक्‍यतो संध्याकाळी करावी. स्थानिक बाजापेठेसाठी बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात बांधून फुले पाठवावीत.  हंगाम, जात, जमीन, हवामान यानुसार फुलांच्या उत्पादनात विविधता आढळते. 
उत्पन्न :
झेंडूचे सर्वसाधारण प्रती हेक्‍टरी 10 ते 12 हजार किलो फुलांचे उत्पन्न मिळते. मात्र झेंडूची सुधारित पद्धतीने लागवड केल्यास प्रती हेक्टरी उत्पादन 14 ते 16 हजार किलो मिळतात. 
संदर्भ :
  1. रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, निम्नस्तर कृषी शिक्षण शाखा, म.फु.कृ. वि.,राहुरी
  2. झेंडू : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, मुंबई
  3. https://www.agrowon.com/
  4. http://krishi.maharashtra.gov.in/  
  5. https://agriexchange.apeda.gov.in/India%20Production/India_Productions.aspx?hscode=1033
डॉ. सुमठाणे योगेश वाय., (M.Sc., Ph.D., M.B.A.), Bamboo Research & Training Centre, Chandrapur, Mob. +91 88062 17979
शब्दांकन :प्रियंका सुरवसे, लातूर
close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: