दुधाळ गाय आणि म्हशींचे निवड निकष

अन्‍न, वस्‍त्र, निवारा या माणसाच्‍या मूलभूत गरजा असल्‍या तरी अन्‍न ही सर्वात महत्‍वाची प्रथम गरज आहे. अन्‍नाची निर्मिती शेती आणि पशुधनापासून मिळणाऱ्या दूध उत्‍पादन पदार्थांवर अवलंबून असते. शेतीपासून धान्‍य, फळे, भाज्‍या मिळतात तर पशुधनापासून दूध, मांस व अंडी मिळतात.
दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ हे जगातील 100 टक्‍के लोकांच्‍या दैनंदिन आहारातील एकमेव घटक आहेत. दुधाचे स्‍त्रोत म्‍हणजे, गाय, म्‍हैस, शेळी, मेंढी आजच्‍या 21 व्‍या शतकात दूध देणाऱ्या म्‍हशींच्‍या विचार करता अंदाजे 30 हून अधिक जाती भारतात आहेत. तर जगाच्‍या 1/3 पशुधनाच्‍या एवढ्या मोठ्या संख्‍येचा विचार करता भारत देश जगात प्रथम क्रमांकाचा म्‍हणणे वावगे ठरणार नाही. पण दुग्‍धव्‍यवसायातील गुणवत्तेचा विचार करता आपण जगाच्‍या तुलनेत खूपच पिछाडीवर आहोत, हे विसरून चालणार नाही. मग ती दूध देणाऱ्या जनावराची गुणवत्ता असो, नाही तर दुग्‍धोत्‍पादनाची गुणवत्ता असो. आपण संख्‍यात्‍मक दृष्‍ट्या वरचढ आहोत. पण गुणात्‍मक दृष्‍टया खूपच मागे आहोत.
जगाच्‍या तुलनेत आपल्‍या देशात दुग्‍ध व्‍यवसायाला शासकीय अनुदान अद्यापपर्यंत नाही. त्‍याचबरोबर वाढत्‍या महागाईवर शासनाचे नियंत्रण नाही. त्‍यामुळे दुग्‍ध व्‍यवसयाय दिवसेंदिवस मिळणाऱ्या तुटपूंजी दूध दराअभावी अडचणीत सापडला आहे, म्‍हणजेच दुग्‍धव्‍यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडनासे झाला आहे. यामुळे पशुपालक व दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
जागतिक आरोग्‍य संघटनेच्या (WHO) मते प्रति माणसाला दरडोई 300 मि.ली. दुधाची गरज आवश्यक आहे. पण प्रत्‍यक्ष मिळते 190 मि.ली. दूध म्‍हणजे दुग्‍धव्‍यवसायात आणखीन भरपूर वाव आहे. ही गरज ओळखून नव्‍या उत्साहाने व आधुनिक तंत्रज्ञानाने दुग्‍धव्‍यवसायात उतरणे क्रमप्राप्‍त झालेले आहे. त्‍यावर सर्वोत्तम उपाय म्‍हणजे जातीवंत दुधाळ जनावरांची निर्मीती आणि गाय व म्हशींची निवड करताना दुधाळ म्‍हशींची बाह्य लक्षणे, अंतर्गत गुणवत्ता, पूर्व इतिहास (आनुवंशिक गुणवत्ता) इ. बाबींचा दुधाळ जनावरे निवड करताना विचार करावा.  ज्यामुळे आपला दुग्ध व्यवसायात तोट्यात जाणार नाही.
गाय व म्हशींचे बाह्य लक्षणे :
डोके : गाय व म्हशींचे डोके त्‍या जातीच्‍या वैशिष्ट्यपूर्ण असावे, ती शरीराशीं रेखीव प्रमाणबद्ध असावे, मान लांब सडपातळ व खांद्याशीं बेमालूम जोडलेली असावी. जनावरांच्‍या दोन्‍ही नराकपुड्या मधील काळसर भाग रूंद व नाकपुड्या मोठ्या असाव्‍यात. जनावरांचा जबडा रूंद व मजबूत असावा. दाताची झिज नसावी. दात पडलेले नसावेत. दाढाची वाढ वेडीवाकडी झालेली नसावी. दात पांढरे असावेत. ते काळपट असू नयेत. वयाप्रमाणे दाताचा बदल आहे की नाही पहावे. डोळे मोठे पाणीदार तेजस्‍वी असावेत. नाकावरील शिरा ठळक व सरळ असाव्‍यात. कपाळाचा भाग रूंद असवा.
शरीर धड : गाय व म्हैस शरीराने मोठे असले तरी त्‍याचा आकार कातीव बांधे सून असावा. अंगावर कोठेही अवाजवी चबरी नसावी. त्‍वचा मऊ व सैल असावी. शरीर कांती तेजपुंज असावी. पाठीचा कणा सरळ व मजबूत असावा. मणके उठाव व कातीव असावेत. बरगड्या चपट्या रूंद व उठावदार आणि एकमेकांपासून विलय असाव्‍यात. धडाची लांबी उंचीच्‍या मानाने जास्‍त असावी. म्‍हणजे हृदय फुप्‍फुस यकृत सुरक्षित निरोगी राहते. एक लिटर दूध तयार करायला 250 ते 300 लिटर रक्‍त कासेतून खेळवावे लागते. त्‍यासाठी रक्‍ताभिसरण संस्‍था कार्यक्षम असावी लागते. त्‍वेचेवर खरूज, नायटे यासारखी त्‍वचा रोगाची लक्षणे नसावीत.
पाय : गाय व म्हशींचे पाय कातीव व मजबूत असावेत. कारण जनावराचे वजन पायावर पेललेजाते. पुढचे पाय सरळ तर मागील पाय पाठीमागून सरळ असावेत. मांड्याअंतर्गोल असाव्‍यात म्‍हणजे भरदार व्‍यापक कासेला संरक्षण मिळते. म्‍हशींचे खूर टणक मजबूत असावेत ते ढिसाळ असू नयेत. खुरांचा रंग काळपट असावा. काळ्या खुरीची जनावरे काटक असतात. त्‍यामुळे लाळ खुरकत, फुटरूट सारख्‍या आजारात विपरीत परिणाम होत नाही. खुरीच्‍या दोन्‍ही बेचक्‍यात जखमा अथवा कोंब असू नयेत.
कास : दुभत्‍या जनावराची कास भरदार असावी. ती समतोल राहून रूंद व खाली उतरलेली असावी.  कासेच्‍या चारी स्‍तनाकडील भाग सारखा वाढलेला असावा. कासेचा पुढील भाग सुटसुटीत बेंबीपर्यंत पसरलेला आणि मागे उंच निरणापर्यंत भरलेला असावा. कासेत दूध असताना कास रेशमा सारखी मऊ, स्‍पंजासारखी रसरसीत उठावदार असावी. दूध काढले नंतर योग्‍य प्रमाणात अंकुचन ढिली होणारी असावी. कासेत चरबी अथवा मासल गाठी असू नयेत. कास स्पंजजासारखी मऊ असावी. स्‍तने गोल, चारी स्‍तनातील अंतरसारखे असावे. स्‍तनाची लांबी योग्‍य प्रमाणात असावी. ती कमी जास्‍त असू नयेत. जनावराच्‍या कासेवरील शिरा छाती पासून कासेपर्यंत ठळक लांब वाढलेल्‍या असाव्‍यात. कासेवर शिराचे जाळे असलेली जनावरे दुधासाठी चांगली असतात. स्‍तनात मासल गाठी असू नयेत. दुधाची धार सरळ जाड असावी. ती वेडी वाकडी असू नये.
शेपटी : गाय व म्हशींच्या शेपटी लांब झुपकेदार असारवी. शेपटीचे केस गेलेले नसावेत. शेपटीला गचाय, बिरूड याची व्‍याधी नसावी.
शिंगे : गाय व म्हशी बाजारात नेताना शिंगे तासतात.ती चांगले दिसावी म्‍हणून शिंगाचा आकार कमी करून ती घोळतात. यामध्‍ये बऱ्याच वेळा दसाड्या निघतात. त्‍याची इजा आतील कोवळ्या गाभ्‍यास होऊन जखम होते. त्‍याचा परिणाम कॅन्‍सरवर जाण्‍याची शक्यता असते. त्यासाठी शिंगे तपासून घ्‍यावे.
डोळे : गाय व म्हशींचे डोळे पाणीदार असावेत. डोळ्यातील बुब्‍बूळ पारदर्शक स्‍वच्‍छ असावे. डोळ्याचे बुब्‍बूळ व पांढऱ्या भागावर आर (R) किंवा जखमा नसाव्‍यात‍.
योनी : योनीचे स्‍नायू सैल व मऊ असावेत. योनीचा आकार पसरट मोठा असावा म्‍हणजे प्रसुतीच्‍या वेळी गाय व म्‍हशींना त्रास होणारा नाही. मायांग बाहेर येण्‍याचा विकार नसावा. योनीला टाके घातलेल्‍याचे वृण नसावेत.
गाय व म्हशींची अंतर्गत गुणवत्ता :
 1. गाय व म्हशींचे जन्‍मत: पारड्याचे वजन अपेक्षित असावे. ते सशक्‍त निरोगी असावे. वजन वाढीचा वेग जाती निहाय चांगला असावा.
 2. माजाचे वय – पहिल्‍या माजाच्‍या वेळी वय 2.5 ते 3 वर्षे असावे. वजन 250 ते 300 किलो अपेक्षित आहे. माजाची पाळी नियमित असावा. तिसऱ्या  चौथ्या माजात पारडी गाभ जावी.
 3. ऋतुचक्र- म्‍हशींची मासिक पाळी दर 20 ते 21 दिवसांनी आली पाहिजे. माजाचा कालावधी एक ते दीड दिवस असावा. माज ओरडून नैसर्गिक केलेला असावा.
 4. म्‍हैस पहिल्‍या एक-दोन माजात गाभ गेली पाहिजे. वारंवार उलटणारी म्‍हैस परवडणारी नाही. म्‍हशींला नैसर्गिक सर्व्हिस पेक्षा कृत्रिम रेतनाची सवय असावी.
 5. म्‍हशींची प्रसूती सुलभपणे व्‍हावी. प्रसुती नंतर वार 4 ते 6 तासात वार पडावी. प्रसूती पूर्व अथवा प्रसुतीनंतर मायांग बाहेर येता कामा नये. अशा सवयीच्‍या गाय व म्‍हशींना खरेदी करू नये.
 6. म्‍हशींने शेवटच्‍या 7 व्‍या महिन्‍यापर्यंत दूध दिले पाहिजे. सरासरी 300 दिवसाचा दुधाचा कालावधी असावा.
 7. म्‍हशींचा भाकडकाळ 80 ते 100 दिवसापेक्षा अधिक नसावा. म्‍हशींचे जातीनिहाय दूध अपेक्षित असावे.

पूर्व इतिहास :

वंशावळ म्‍हणजे खानदान, नेहमी प्राण्‍यामध्‍ये आईकडील 50 टक्‍के व वडिलाकडील 50 टक्‍के गुण असतात. या 100 टक्‍के गुणामध्‍ये आई किंवा वडिलाकडील सात-सातपिढीचे गुण संक्रमण होत असतात. त्‍यामुळे दोन्‍ही खानदानीला तितकेच महत्‍व आहे. अशा नोंदी चार दोन म्‍हशीं पाळणारे म्‍हैसपालक म्‍हशींच्‍या खानदानीचा विचार करत नाहीत. त्‍यांच्‍या दृष्‍टीने म्‍हैस गाभ जाणे महत्‍वाचे असते. दूध किती मिळाले महत्‍वाचे नसते. म्‍हैस गाभ घालवण्यासाठी वेळेत भेटेल त्‍या दरेड्याचा उपयोग करतात. त्‍यामुळे रेड्याकडील चांगल्‍या गुणवत्तेचा, खानदानीचा विचार होत नाही, पण कोठं मोठ्या नावाजलेल्‍या डेअरी फार्मवर उपलब्‍ध असलेले खात्रीचे रेकॉर्ड मिळू शकते. त्‍यासाठी चांगल्‍या खानदानीच्‍या म्‍हशींचा विचार करावा.
दूध उत्‍पादन : जनावराच्‍या जातीनिहाय दुग्‍धोत्‍पादनाचा विचार करावा. जनावराने एका विताला दूध किती दिले? दुधातील फॅट व त्‍याची रोजची सरासरी काय आहे? हे आवश्‍यक पाहिले पाहिजे. जनावराच्‍या दूध देण्‍यात चढउतार नसावा. दूध देण्‍याचे प्रमाण सातत्‍याने टिकून असले पाहिजे यावरून जनावरची दूध देण्‍याची क्षमता कळून येते. आहारानुसार दूध उत्‍पादन असावे.
औषधोपचार : आतापर्यंत जनावर किती वेळा आजारी पडले व त्‍यावर केलेला औषधोपचार याची नोंद असल्‍यास चांगले. नोंदीवरून जनावर किती वेळा आजारी पडल्‍याचे समजते. त्‍या आजारात औषधाची प्रतिक्रिया (रिअॅक्‍शन) येते. हे सर्व नोंदीवरून समजते. त्‍यावरून औषधापचार करायला मदत होते. काही जनावरांना प्रसुतीनंतर मिल्‍क फिवर होतो. कॅल्शियम कमी होण्‍याची सवय असेल तर दक्षता म्‍हणून प्रसुती पूर्व कॅल्शियम लावून घेऊन टाळता येते. याशिवाय जनावरामध्‍ये रोगप्रतिकार शक्‍ती किती आहे.
वेताच्‍या नोंदी : जनावराच्‍या वेताच्‍या नोंदी असतील तर फार चांगले. जनावराने दिलेली व त्‍या वेतन झालेले रेडकाचे लिंग यावरून जनावरचे आनुवंशिक गुण व त्‍याच्‍या खानदानी बद्दलचे निकष लावणे सोपे जाते.
रेतनाच्‍या नोंदी : जनावराच्‍या रेतनाच्‍या नोंदी आवश्‍यक असाव्‍यात. जनावराची कोणत्या पद्धतीने गर्भधारणा केली जाते, एका गर्भधारणेला किती वेळा रेतन करावे लागले, गर्भधारणेसाठी कोणता वळू वापरला होता, त्‍या वळूचे शुद्ध रक्‍ताचे प्रमाण, त्‍यातील या सर्व नोंदी महत्‍वाच्‍या ठरतात. भविष्‍यात आपल्‍या गाय व म्हशीमध्‍ये विदेशी रक्‍ताचे प्रमाण किती ठेवायचे हे निश्चित करता येते. याशिवाय जनावर गाभण राहण्‍याची सवई याची महिती मिळते. गाय व म्‍हशीं मध्‍ये सुद्धा या सर्व नोंदी महत्‍वाच्‍या आहेत.
चारा व खाद्याच्‍या नोंदी : जनावराच्या चारा-खाद्याच्‍या नोंदी असणे महत्‍वाचे आहे. जनावरांना आपल्याकडे कोणता चारा व खाद्य दिले जाते. जनावराचा एकूण आहाराचा खर्च व त्‍या दिवशी दिलेले दूध याचा ताळमेळ घालता येतो. अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
नोंदणी व गोंदणी : दुग्‍ध व्‍यवसायात नोंदणी आणि गोंदणी महत्‍वाच्‍या बाबी आहेत. नोंदणी म्‍हणजे इतिहास आणि इतिहास म्‍हणजे जनावराची कुंडली, कुंडलीवरून जनावराची गुणवत्ता समजते. निकृष्‍ट प्रतीची जनावरे सांभाळणे परवडणारे नसते. उत्‍पादनापेक्षा खर्च अधिक असणे हे दुग्‍ध व्‍यवसायातील अपयश समजावे. गोठ्यात जर निकृष्‍ठ गुणवत्तेची जनावरे असतील तर तो कमी करून चांगल्‍या गुणवत्तेची जनावरे वाढविणे यात फायदा आहे.
आपल्‍याकडे जनावरांची संख्‍या अधिक असल्‍यास त्‍यांचे संगोपन कळपांनी गोठ्यात, फार्मवर करतो. त्‍यांचे नाव नंबर, जात इत्‍यादीची नोंदणी व गोंदणी नसेल तर वैयक्तिक माहिती सांगणे कठीण जाते. त्यासाठी डेअरी फार्मवर योग्‍य नमुन्‍यात नोंदवह्या, बारनिशीं, माहिती पुस्तिका तयार केलेल्‍या असाव्‍यात. जनावरांना क्रमांक देऊन त्‍यांची नोंदणी केलेली असावी. जनावराच्‍या नावापुढे जनावरांची उपलब्‍ध माहिती लिहिलेली असावी. त्‍यासाठी गोंदणी महत्‍वाची आहे. आपल्‍या फार्मचा कोड नंबर, अनुक्रमांक असलेले बिल्‍ले कानात अडकवलेले असावेत. बऱ्याच वेळा जनावराच्‍या मागील चौकावर ब्रॅन्‍डींग केले जाते. यावरून जनावर ओळखणे सोपे जाते. आपल्‍याकडे विमा उतरवताना विमा कंपनीचे टॅग कानात अडकवलेले जातात. त्‍यावरून जनावराची ओळख होते.
दुधाळ गाय आणि म्हशींची निवड केल्यामुळे होणारे फायदे :
 • दुधाळ गाय व म्हशींची निवड करणे सुलभ होते.
 • व्यापाऱ्याकंडून शेतकरी तथा पशुपालकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही.
 • अनाठायी खर्च टाळता येतो.
 • गाय व म्हशींची संपूर्ण पार्श्वभूमी माहीत होते.
 • दुधाची गुणवत्ता व खात्री पटते.
 • दूध उत्पादन चांगला घेता येते.
 • जनावरांतील असणाऱ्या आजाराची माहिती होते.
 • दर्जेदार व गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन घेता येते.
 • शेतकरी तथा पशुपालकांना खात्रीशीर जनावरांची सत्यता पटते.
 • गाय व म्हशींचे खरेदी विक्री करणे सुलभ होते.
अशाप्रकारे दुधाळ गाय आणि म्हशींचे निवड निकष समोर ठेऊन आपण कोणत्‍याही दुधाळ गाय व म्हशींची निवड करताना वरील निकष पाहून दुधाळ म्हशींची निवड करावी, जेणेकरून दुग्‍ध व्‍यवसाय अधिकाधिक फायदेशीर होण्‍यास मदत मिळेल आणि शेतकऱ्यांचे त्यातून आर्थिक स्‍वावलंबन  होईल. 
संदर्भ :
 1. डॉ. बापूसाहेब उपासे, डॉ. धनंजय देशमुख (2015) : व्‍यावसायिक म्‍हैसपालन, विद्याभारती प्रकाशन, लातूर
 2. काकडे सचिन, तोरडमल विश्‍वास (2014) : पशुसंवर्धन-पैदास, पोषण व व्‍यवस्‍थापन, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे
 3. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग, कृषी मंत्रालय, भारत सरकार
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/
Prajwal Digital

Leave a Reply