भरघोस कापूस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वाटा

महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी व जडणघडणीसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अगत्याचे ठरते. म्हणूनच कापसाला ‍सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

कापूस लागवडीपूर्वी शक्यतो, माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते. कापसाचे पीक हे कोरडवाहू आणि बागायती पद्धतीने घेतले जाते. निसर्गत: कोरडवाहू कापसाचे उत्पादन हे बागायती कापसापेक्षा कमी असते. पीक सशक्त आणि जोमदार ठेवण्यासाठी सर्व अन्नद्रव्यांची गरज व भूमिका महत्त्वाची असते.

सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व :

  1. कापसामध्ये शिफारशीप्रमाणे अन्न्द्रव्यांचा पुरवठा केल्यास झाडामध्ये रोग व किडींविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता तयार होते.
  2. माती परीक्षणाचा आधार घेऊन कापूस पीक वाढीत विविध वाढीच्या संवेदनशील अवस्था आणि अन्नद्रव्यांची गरज याप्रमाणे अन्नद्रव्यांचा वापर केल्यास अपेक्षित प्रतिसाद साध्य होतो.
  3. कापसामध्ये उगवण, वाढीची अवस्था, पाने लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे, बोंडे ‍टिकून राहणे आणि भरणे या संवेदनशील अवस्था आहेत.
  4. बीटी कापसामध्ये मॅग्नेशियम, जस्त व बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. पिकांच्या वाढीसाठी संतुलित पद्धतीने सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करताना त्यासोबतच जीवाणू खतांचा वापर फायदेशीर ठरत आहे.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाच्या बाबी :

  • एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनात पिकांची योग्य फेरपालट करणे,
  • आंतरपिकांत कडधान्य पिकांचा समावेश करणे,
  • पिकांचे अवशेष जमिनीत गाडणे,
  • हिरवळीची खते,
  • अपारंपरिक सेंद्रिय पदार्थांचा वापर,
  • सेंद्रिय खते, जीवाणू खते, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर.

कापूस पिकासाठी खतांचे व्यवस्थापन :

माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. माती परीक्षण केले नसल्यास कोरडवाहू कापसासाठी प्रति हेक्टरी (125 : 62.5 : 62.5) किलोग्रॅम नत्र, स्‍फूरद व पालाशचा वापर करावा.

पेरणी करतेवेळी नत्र, स्‍फूरद व पालाश (45 : 62.5 : 62.5) किलोग्रॅम प्रति हेक्टरी, पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी 40 किलोग्रॅम व 60 ते 65 दिवसांनी 40 किलोग्रॅम नत्र द्यावे.

पीक पोषणशास्त्रानुसार गंधक हे चौथे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. यासाठी प्रति हेक्टरी 20 किलो ग्रॅम गंधकाचा वापर करावा.

गंधक अन्नद्रव्यांसाठी स्वतंत्र गंधकयुक्त खतांचा वापर आवश्यक करावा, अन्यथा शक्य झाल्यास स्‍फूरद सिंगल सुपर फॉस्फेटद्वारेच द्यावे. पिकाची स्‍फूरद मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मधून दिल्यास 16 टक्के स्फुरदासह 12 टक्के गंधक आणि 21 टक्के कॅल्शियम देखील पिकास मिळते.

गंधकीय खतांचा वापर पिकाच्या पेरणीपूर्वी जमिनीत करावा. पिकाची गंधकाची गरज जवळजवळ स्फूरदाएवढी असून पिकातील त्याचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते असते. गंधक हे अन्नद्रव्य म्हणून आणि बुरशीनाशक म्हणून देखील कार्य करते. पीक पोषक अन्न्द्रव्यांव्यतिरिक्त गंधकाचा जमीन सुधारक म्हणूनही उपयोग होतो. विविध पिकांत केवळ गंधकाच्या वापराने 10 ते 30 टक्के उत्पादनात वाढ आढळून आली आहे. गंधकाचा अभाव असल्यास पिके इतर अन्नद्रव्यांचे देखील शोषण योग्य प्रमाणात करु शकत नाहीत. 

मॅग्नेशियम हे दुय्यम अन्नद्रव्य असून भारी जमिनीमध्ये त्याची कमतरता भासते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी आणि बोंडे चांगल्या रितीने भरावीत यासाठी मॅग्नेशियमचा वापर पूरक ठरतो.

मॅग्नेशियमची कमतरता असल्यास कापूस पिकाच्या पानांवर तपकिरी डाग दिसतात. जुन्या पानांवर शिरा, उपशिरा ‍हिरव्या राहून आतील भागावर डाग पडतात. कमतरता तीव्र असल्यास पान पूर्णपणे लालसर तपकिरी होते. मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो ग्रॅम लागवडीनंतर 1 ते  1.5 महिन्यात शेणखताबरोबर द्यावे.

रासायनिक खते पेरणी करुनच द्यावीत, फेकून देऊ नयेत. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा, अन्यथा केवळ कायिक/शाखीय वाढ जास्त प्रमाणात होऊन  झाडास फुले येणे व फलधारणा कमी प्रमाणात होते. नत्राच्या जास्त वापरामुळे झाडांवर अळयांचे प्रमाण देखील वाढते. युरियाचा वापर करताना त्याला 5:1 प्रमाणात निंबोळी पावडर चोळावी.  

विशेष अन्नद्रव्य व्यवस्थापन :

कापसाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शिफारस केलेल्या खतांच्या मात्रेसोबत पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी 2 टक्के डी.ए.पी. खताची फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पेरणीवेळी करता आला नाही तर फवारणी करुन देखील पिकांसाठी या अन्नद्रव्यांची गरज भागवता येईल. यासाठी पेरणीनंतर दोनदा 40 ते 45 व 60 ते 65 दिवसांनी प्रत्येकी 0.5 टक्के जस्त व (लोह) फेरस सल्फेट व 0.2 टक्के बोरॉक्सची फवारणी करावी. 

सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे होणारे फायदे :

  • कापसाची वाढ चांगली होते.
  • रासायनिक खतांचा पिकांना पुरेपूर उपयोग होतो.
  • पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • कापूस पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.

संदर्भ :

  1. कौसीडकर हरीहर (2018) : सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये : नियोजन व व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
  2. दैनिक ॲग्रोवन, (2019) : सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये व्यवस्थापन

भरघोस कापूस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वाटा हा लेख आपणास आवडला असल्यास किमान दहा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे. जेणेकरून लेखकाला  आणखीन उपयुक्त व महत्त्वपूर्ण लेख तयार करण्यास प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

1 thought on “भरघोस कापूस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वाटा”

Leave a Reply