खरीप ज्वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र हा लेख तयार करून महाराष्ट्रातील तमाम खरीप ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना सखोल व अद्यावत माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यामुळे खरीप ज्वारीचे उत्पादन वाढविणे शक्य होणार आहे.
खरीप ज्वारी (Sorghum Bicolor) हे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचा मुख्य उपयोग अन्नधान्य व जनावरांना कडबा म्हणून करतात. भारतात झालेल्या अन्नधान्य उत्पादन वाढीचे बहुतांश श्रेय हरिक्रांतीलाच आहे. पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांचा विकास, रासायनिक खते, पीक संरक्षण तंत्र, सुधारित पीक लागवड तंत्र आणि शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर इत्यादी बाबींमुळे उत्पादनात वाढ झाली आहे.
जगातील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी शेती उत्पादनात होणारी ही वाढ अपुरी ठरते. त्यामुळे शेती क्षेत्रातील संशोधनाकडे आज अधिकाधिक लक्ष दिले जात आहे. परिणाम शेतीत क्रांतिकारी बदल घडवणारे नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. शेती व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर व्हावा यासाठी सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न सुरू आहेत.
खरीप ज्वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र हे खरीप ज्वारी पिकाचे उत्पादनातील महत्वाचे घटक असून यामध्ये खरीप ज्वारीसाठी जमीन, हवामान, बी, पेरणी, आंतरमशागत, पाणी व्यावस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खते, पीक संरक्षण, काढणी, मळणी, साठवण व विक्री हे आहेत. यापैकी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बी होय, कारण पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवाय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळत नाही.
आधुनिक शेती जगतात बियाणे या घटकांवर प्रचंड संशोधन होत असून दिवसेंदिवस त्यात विकास व वाढ होत आहे. राज्यात आणि देशात सरकारी, खाजगी व स्वयंसेवी सस्था वेगवेगळ्या पिकांच्या बियाणे संशोधनात आणि उत्पादनात कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते असते.
खरीप ज्वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र :
पूर्वी खरीप ज्वारीचा उपयोग जास्त करून जनावरांना चाऱ्यांसाठी केला जात होता. परंतु मागील अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या कालावधीत शेतकरी बांधव खरीप ज्वारीला मुख्य अन्न म्हणून उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करत करत. पुढील काही कालावधीत यामध्ये बरेच संशोधने होऊन खरीप ज्वारीच्या खाण्यास रुचकर व पौष्टिक गुणधर्म असलेल्या सुधारित जाती विकसित करून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य उत्पादन वाढविले आहे. अशा खरीप ज्वारीचे दर्जेदार उत्पादन घेता यावे, यासाठी लेखकांनी खरीप ज्वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र याविषयी लेख तयार करून खरीप ज्वारीचे महत्त्व व गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
जमीन व हवामान :
खरीप ज्वारी बीजोत्पादन घेण्यासाठी चिकन मातीची, पोयट्याची, मध्यम काळी, तांबडी आणि उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. सिलेक्शन-3 आणि माऊली या जाती हलक्या जमिनीवर येऊ शकतात. ज्वारीचे पीक खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 400 ते 1000 मी. मी. हवेतील तापमान 27 ते 32 अंश सें. या पिकास अनुकूल समजले जाते.
विलगीकरण :
बीजोत्पादन घेण्यात आलेल्या जातीमध्ये त्या पिकांच्या इतर जातीपासून परागीभवन होऊन भेसळ होऊ नये म्हणून योग्य विलगीकरण अंतराद्वारे बीजोत्पादन पीक अलग ठेवावे लागते. सुधारित खरीप ज्वारी बीजोत्पादन पिकाचे 200 मीटरच्या परिसरात पीक फुलोऱ्यात येणारे अथवा येण्याची शक्यता असणारे अन्य जातीच्या पीक असता कामा नये. बीजोत्पादन पिकाचे 400 मीटरच्या परिसरातील जॉन्सन गवत फुलोऱ्यावर असू नये. बीजोत्पादन पिकाचे 200 मीटरच्या परिसरातील त्याच पिकात जातीतील बीजोत्पादन पिकात अथवा बिजात्पादन पिकात वापरलेल्या नर वाणाच्या जातीच्या पिकात प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढल्यास त्यापासून 200 मीटर अंतरावर येणारे बीजोत्पादन क्षेत्र प्रमाणिकरण अपात्र ठरते.
पूर्व मशागत :
खरीप ज्वारी बिजोटपणासाठी मे महिन्यात खोलवर नांगरट करावी. यानंतर काही महिन्यात मोठ्या कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर सपाट कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी उपलब्धतेप्रमाणे हेक्टरी 5-10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. यानंतर वखराची एक पाळी देऊन जमीन वरखाली करून घ्यावी.
पेरणी हंगाम :
खरीप हंगामामध्ये नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याबरोबर 15 जून ते 20 जुलै पर्यंत पेरणी प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर पेरणी केलेल्या पिकावर खोड माशीचा उपद्रव होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे ज्वारीचे बीजोत्पादन घेत असताना पेरणी शक्यतो वेळेवर व शिफारशीत वेळेवर करावी.
हेक्टरी बियाणे :
खरीप ज्वारीची बिजोत्पादन लागवड करताना प्रती हेक्टरी सर्वसाधारण 7.5 किलो बियाणे मादी जातीचे व 2.5 किलो नर जातीचे वापरावे.
बीज प्रक्रिया :
खरीप ज्वारी बिजोत्पादन मादी व नर बियाण्यास पेरणीपूर्वी 7 ग्रॅम इमिडॅक्लोप्रीड किंवा 5 ग्रॅम थायोमेथॉक्झाम प्रति किलो बियाण्यास चोळावे व त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम अॅझेटोबॅक्टर जिवाणू संवर्धन चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणीसाठी वापरावे.
पेरणीचे अंतर :
खरीप ज्वारी बीजोत्पादन पेरणी दोन चाड्याच्या 45 सें. मी. अंतराच्या तिफणीने जमिनीमध्ये 5 सें. मी. खोलीवर करावी. पेरणी करताना रासायनिक खत बियाण्याच्या खाली ओळीमध्ये पेरावे. नर व मादीचे प्रमाण 2:4 ओळी ठेवावे व सभोवती नराच्या चार ओळी पेराव्यात. त्यामुळे परागीकरण चांगले होईल. नराच्या ओळी ओळखता याव्यात म्हणून दोन्ही टोकाला खुंट्या अगर तागाचे बी पेरावे.
खरीप ज्वारीचे सुधारित वाण :
खरीप ज्वारीचे सुधारित/संकरित बीजोत्पादनाकरिता आवश्यक व उपयुक्त वाणासाठी जसे की, सीएसएच 14, सीएसएच 15, पीव्हीके 23, पीव्हीके 400, पीव्हीके 801, एसरीव्ही 462, एसपीव्ही 1616, पीव्हीके 809 याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :
तक्ता क्र. 1 : खरीप ज्वारीचे सुधारित वाणांची वैशिष्ट्ये
खरीप ज्वारी वाण
|
पक्व कालावधी (दिवस)
|
धान्य उत्पादन
(प्रती एकर /क्विंटल)
|
कडबा उत्पादन
(प्रती एकर /क्विंटल)
|
सीएसएच 14
|
115-120
|
15-16
|
45-48
|
सीएसएच 15
|
115-120
|
14-15
|
45-48
|
पीव्हीके 23
|
115-120
|
16-18
|
35-40
|
पीव्हीके 400
|
115-120
|
14-15
|
48-50
|
पीव्हीके 801
|
110-115
|
13-14
|
32-35
|
एसरीव्ही 462
|
115-120
|
14-15
|
35-40
|
एसपीव्ही 1616
|
115-120
|
15-16
|
35-40
|
पीव्हीके 809
|
115-120
|
15-16
|
35-40
|
स्त्रोत : https://www.agrowon.com/
संकरित बी :
दोन शुद्ध वंशाचे बी ठराविक वाणात (उपजातीत) फलन घडवून आणले तर त्यांचे पहिल्या पिढीतील गुणधर्मात मोठी वाढ / सुधारणा झालेली दिसते. या सुधारणेस संकर वेग / संकरशक्ती असे संबोधतात. संकरित बीजोत्पादनात तीन निरनिराळ्या वाणांचा उपयोग करण्यात येतो. मादी वाण-अ असे संबोधतात, जोडवाण-ब असे संबोधतात, नरवाण- आर रिस्टोरर म्हणतात.
मादी व नर वाणाचे बी तयार करणे :
शास्त्रीय पारिभाषेत मादीवाणांस (अ) वाण व मादीवाणाचे बी तयार करावायास लागणाऱ्या जोडवाणास ब वाण म्हणतात. मादीवाण तयार करताना चार ओळी मादीच्या (अ) व दोन ओळी जोडवाणाच्या (ब) लावतात. मादीवाणावरील बी मादीवाण म्हणून पुढे संकरित वाण तयार करण्यासाठी वापरतात. संकरित वाण तयार करण्यासाठी वापरलेल्या नरवाणास आर लाईन (रिस्टोरर) म्हणतात.
मादी, नर व सुधारित वाणांची शुद्धता चांगली म्हणजे 100 टक्के राखावी लागते. यासाठी तीन – चार वेळा भेसळ काढणे आवश्यक आहे. (अ) व (ब) वाणामध्ये संकर घडवून आणल्यास (अ) वाणाचे बी तयार होतो. संकरित बी तयार करण्यासाठी मादी वाण (अ) नर वाण ‘आर’ यांचा संकर किंवा परागीभवन घडवून आणल्यास संकरित बी तयार होते. अशा संकरित पहिल्या पिढीपासून संकरित बियांचा फायदा मिळतो. संकरित बी पेरून त्यापासून बी धरल्यास अशा बियांपासून संकरित बियांप्रमाणे फायदे मिळत नाहीत. कारण संकरित वाण आनुवंशिकदृष्ट्या अशुद्ध असल्याने त्यांच्या पुढील पिढीत निरनिराळ्या गुणधर्माच्या झाडांची उत्पत्ती होते.
खत व्यवस्थापन :
खरीप ज्वारी बिजोत्पादन 80 -100 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीस द्यावे. नत्र खताचा निम्मा हप्ता पेरणीच्या वेळेस व उरलेला निम्मा हप्ता पेरणीनंरत 30 दिवसांनी द्यावा.
पाणी व्यवस्थापन :
खरीप ज्वारी बिजोत्पादन करताना फारशी पाणी देण्याची गरज भासत नाही. कारण खरीप हंगामात महाराष्ट्रात पाऊस चालू असतो. त्यामुळे पाण्याची काही प्रमाणात गरज पडत नाही, परंतु खरीप ज्वारी पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे अनेक संशोधनावरून दिसून आले आहे.
तक्ता क्र. 2 : खरीप ज्वारीला पाणी देण्याच्या संवेदनशील अवस्था
अ.क्र.
|
पिकाची अवस्था
|
पेरणीनंतर दिवस
|
1
|
पीक पोटरीत असताना
|
50-55
|
2
|
पीक फुलोऱ्यात असताना
|
70-75
|
3
|
दाणे भरताना
|
90-95
|
आंतरमशागत :
खरीपात तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. खुरपणी व कोळपणी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी करावी. कोरडवाहू ज्वारी बिजोत्पादन तीन कोळपण्या द्याव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर आठवड्यांनी, दुसरी पेरणीनंतर 5 आठवड्यांनी व तिसरी 7 आठवड्यांनी पावसाच्या कोळप्याने करावी. कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीतील ओल टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार 1 ते 2 खुरपण्या कराव्यात आणि पीक तणमुक्त ठेवावे.
विरळणी :
पेरणीनंतर 10 दिवसांनी व 20 दिवसांनी विरळणी करावी. 1 हेक्टर क्षेत्रात 1.0 ते 1.2 लाख मादीच्या झाडांची व 50 ते 60 हजार नर वाणाच्या झाडांची संख्या असणे गरजेचे आहे. विरळणी योग्य वेळी न झाल्यावर पीक अपेक्षित वेळेत फुलोऱ्यात येत नाही.
भेसळ काढणे :
बीजोत्पादनात वेळोवेळी भेसळीची झाडे काढणे फारच महत्त्वाचे असते. वेगळ्या जातीची तसेच त्याच जातीची परंतु रोगट, पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच किंवा बुटकी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे उपटून काढून टाकावीत. पीक अशा प्रकारच्या भेसळीपासून मुक्त होईपर्यंत दररोज भेसळ काढण्याचे काम चालू ठेवावे. ज्या पिकांत परपरागीभवन होते, अशा पिकांतील भेसळीची झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत. जी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत, अशी झाडे फुलोऱ्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात. तसेच सुधारित बीजोत्पादनात मादी वाणाच्या ओळीत नर वाणाची झाडे असल्यास ती सुद्धा काढून टाकावीत. पीक पक्व होण्याच्या अवस्थेत सुद्धा भेसळ काढणे महत्त्वाचे असते. वेगळ्या गुणधर्मांची झाडे स्वपरागीभवन होणाऱ्या पिकांमध्ये पक्व होण्याच्या अवस्थेतही काढता येतात.
बीजोत्पादन क्षेत्र तपासणी :
बीजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणा पिकाच्या परागीभवनाच्या प्रकारानुसार 2 ते 4 क्षेत्र तपासण्या करतात. यामध्यये प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे बीजोत्पादन आहे किंवा नाही, ते तपासले जाते तसेच बीजोत्पादनासाठी मार्गदर्शन केले जाते.
पीक संरक्षण :
रोग आणि कीड यांचे प्रभावी नियंत्रण हा बीजोत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रोग आणि कीड यांच्या संसर्गामुळे बीजोत्पादन घटते आणि तयार झालेले बियाणे निकृष्ट प्रतीचे होते. रोग अथवा किडींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. त्यासाठी चांगल्या प्रतीची कीटकनाशके अथवा बुरशीनाशके वापरावीत. रोग आणि किडींच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी आवश्यक तेव्हा फवारण्या कराव्यात. रोग आणि कीडग्रस्त रोपे/झाडे उपटून काढावीत. बियाण्यापासून होणारे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नेहमी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
पीक पक्वतेची लक्षणे :
कणासाचा दांडा पिवळा झाला म्हणजे पीक तयार झाले असे समजावे. कणसातील खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर पिकाची काढणी करावी.
ज्वारी : कापणी व मळणी :
ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाला किंवा आतल्या भागातील दाणे टणक झाले व दाण्याचा खालच्या भागावर काळा ठिपका आला म्हणजेच ज्वारीचे पीक काढणीस पक्व झाले आहे असे समजावे. अशा वेळेस दाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 25-30 टक्के ओलाव्याचे प्रमाण असावे. ज्वारीच्या पिकाची शारीरिक पक्व अवस्थेत (8-10 दिवस पूर्ण पक्वतेच्या अगोदर) कापणी केल्यास उत्पादनात घट न होता बुरशी रोगापासून बचाव होतो. कापणी उशिरा केल्यास पीक उशिरा येणाऱ्या पावसात सापडण्याची शक्यता असते. साठवणुकीत धान्य चांगले राहण्यासाठी धान्यात ओलाव्याचे प्रमाण 10 टक्के असावे. त्यासाठी मळणी नंतर धान्य उन्हात चांगले वाळवून मगच स्वच्छ पोत्यात भरून साठवण करावी.
उत्पादन :
खरीप ज्वारी बिजोत्पादन उत्पादन हेक्टरी 10 क्विंटल नर जात (सीएसएच-14) 15 क्विंटल मादी जात मिळते. तर चाऱ्याचे उत्पादन 15-20 क्विंटल पर्यंत मिळते. तसेच खरीप ज्वारीचे सुधारित वाणापासून साधारणपणे 8-10 टनापर्यंत कडब्याचे उत्पादन मिळू शकते.
संदर्भ :
- डी. एस. थोरवे, बी.बी.पाटील, प्रमुख पिकांचे उत्पादन व बीजोत्पादन तंत्रज्ञान, म.फु.कृ.वि., राहुरी
- खरीप ज्वारी बीजोत्पादन तंत्र, कृषि दैनंदिनी, 2018, व.ना.म.कृ.वि., परभणी
- खरीप ज्वारी बीजोत्पादन तंत्र, कृषि पत्रिका, 2017, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला
- https://www.agrowon.com/
प्रा. गोविंद अंकुश, एम्. एस्सी. (कृषि), सहयोगी प्राध्यापक, आदित्य कृषि महाविद्यालय, बीड
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर