ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

ऊस हे महत्त्वाचे पीक असल्यामुळे ऊसासाठी लागणारी आवश्यक अन्न्द्रव्यांकडे दुर्लक्ष केल्यास परिणामी ऊस उत्पादनात लक्षणीय घट येते. यासाठी अन्नद्रव्यांचे एकात्किक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. म्हणून ऊसासाठी अन्नद्रव्याचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अभाव, अन्नद्रव्यांची लक्षणे, अन्नद्रव्ये कमतरतेवर उपाय आदी बाबींची सविस्तर माहिती प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे.
अन्नद्रव्यांचे महत्त्व :
ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित अन्न्द्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. फक्त रासायनिक किंवा सेंद्रिय खतांद्वारे चांगले उत्पादन मिळणे शक्य नाही. पीक-पोषणासाठी अन्नद्रव्यांसोबत नत्र, स्‍फूरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय घटकांसोबत समावेश करणे फायदेशीर ठरते. परिणामी, अधिक ऊस उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक नफयातही वाढ होईल. मृदा परीक्षण अहवालानुसार जास्त उत्पादन घेण्यासाठी ऊस पीक पोषणात सेंद्रिय घटकांबरोबर अन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
सध्या ऊस पीक पोषणामध्ये केलेल्या अन्नद्रव्यांच्या संतुलित वापरामुळे एकापेक्षा अधिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पिकांत दिसून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार करता येथील जमिनीत जस्त (35.4 टक्के), लोह (25.7 टक्के), बोरॉन (25.7 टक्के) अशी एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते आहे. ऊस पिकातील विविध अन्नद्रव्यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे ऊस पिकात आढळणारी विपरीत लक्षणे व त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी करावयाचे उपाय या विषयी सविस्तर जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीत उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांना लागणाऱ्या खतांचे प्रमाण लक्षात घेऊन माती परीक्षण अहवालातील शिफारसींप्रमाणे खतांचे व्यवस्थापन केल्यास ऊस पिकाला चांगला फायदा होतो. त्यामुळे खतांवर होणारा अनाठायी खर्च कमी होतो व अवास्तव खत वापरामुळे होणारा मातीतील विविध अन्न्द्रव्यांच्या असमतोल टाळला जातो.
) मुख्य अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे व उपाय :
ऊसासाठी सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद व पालाश हे असून यांचा पीक उत्पादनावर चांगला परिणाम होत असतो. याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
1) नत्र :
पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्रयुक्त खते उपयुक्त असतात. नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे ‍हरितद्रव्य तयार होण्यास मदत होते व पाने टवटवीत व हिरवी दिसतात. नत्र हा प्रथिनांचा एक मूलभूत घटक आहे. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते.
नत्राच्या कमतरतेची लक्षणे :
  • झाडांची वाढ खुंटते, झाडे बुटकी राहतात.
  • जुन्या पानांचा रंग पिवळा होतो.
  • शिरांच्या कडेचा भाग पिवळा पडतो व पाने करपतात.
  • परिपक्व झालेली पाने आधी पिवळी पडतात.
  • पाने खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पिवळी दिसतात.
नत्र खते देण्याची मात्र :
सुरु ऊस पिकात प्रती हेक्टर एकूण 250 किलो नत्राची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी लागवडीच्या वेळी सर्वप्रथम 25 किलोग्रॅम /हेक्टरची मात्रा, 6 आठवड्यांनी100 किलोग्रॅम /हेक्टर ही दुसरी मात्रा, 12 आठवड्यांनी 25 किलोग्रॅम /हेक्टर ही तिसरी मात्रा आणि बांधणीच्या वेळी 100 किलोग्रॅम /हेक्टर ही शेवटची मात्रा द्यावी.
2) स्‍फूरद :
स्‍फूरद हा प्रथिने, संप्रेरके, न्युक्लिक ॲसिड, आणि डी.एन.ए. चा घटक आहे. मुळांची वाढ चांगली होणे, कांड्या भरणे, पिके लवकर पक्व होणे, प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीविभाजन आणि पेशी तयार होण्यासाठी, अन्ननिर्मितीसाठी व ऊर्जा मिळण्यासाठी झाडांना स्‍फूरद देणे गरजेचे असते.
स्‍फूरद कमतरतेची लक्षणे :
  • ऊस पिकाच्या पानांच्या कडसर जांभळा रंग दिसतो.
  • पानांची असमतोल वाढ होते.
  • जुन्या पानांच्या कडा वाळतात व नंतर संपूर्ण पान वाळते.
  • फुटवेकमी येतात.
  • मुळांची वाढ कमी प्रमाणात होते.
स्‍फूरद खते देण्याची मात्रा :
  • सुरु ऊस पिकास एकूण 115 किलो प्रति हेक्टर स्‍फूरदाची शिफारस करण्यात आली आहे. स्‍फूरदाची ही मात्रा लागवडीच्या वेळी 57 किलोग्रॅम /हेक्टर व पक्व बांधणीच्या वेळी 58 किलोग्रॅम /हेक्टर अशी द्यावी.
  • स्‍फूरदाची कमतरता दिसल्यास 100-200 ग्रॅम डीएपी खत 10 लिटर पाण्यातून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
3) पालाश :
  • पालाशमुळे ऊसाची प्रत चांगली राहते व ऊसाला पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद मिळते. म्हणून हे पाण्याचा ताण निवारण करणारे अन्नद्रव्य आहे.
  • पर्णरंध्राची उघड-झाप नियंत्रित करते, ज्यामुळे पिकांतील जलसंतुलनात अत्यंत महत्त्वाचे.
  • प्रकाश संश्लेषण क्रिया आणि शर्करा /अन्ननिर्मितीत सहभाग.
  • कॅल्शियम आणि बोरॉनसह पेशी विकसित होण्यासाठी आवश्यक.
  • पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व काही प्रमाणात कीड प्रतिकारक शक्ती वाढवण्यास साह्यक.
पालाश कमतरतेची लक्षणे :
  • पालाश कमतरतेमुळे पिकाची पाने लांबट व अरूंद आकाराची होतात.
  • पालाश कमतरतुळे पाने आधी टोकाकडून करपतात, नंतर पानांच्या कडा करपतात.
  • पालाश कमतरतेमुळे कांडे लहान आकाराची येतात.
पालाश खते देण्याची मात्रा :
  • सुरु उस पिकास प्रति हेक्टरी एकूण 115 किलो पालाशची शिफारस करण्यात आली आहे. ही मात्रा लागवडीच्या वेळी पालाश 57 किलोग्रॅम /हेक्टर व 140 दिवसांनी (पक्क्या बांधणीच्या वेळी) 58 किलोग्रॅम /हेक्टर या प्रमाणात द्यावी.
  • पालाश कमतरता दिसल्यास 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत 10 लिटर पाण्यातून फवारावे.
)दुय्यम अन्नद्रव्ये ‍कमतरतेची लक्षणे, कार्य व उपाय :
पिकास परिपूर्ण वाढीसाठी नत्र, स्‍फूरदव पालाश या मुख्‍य अन्‍नद्रव्‍यानंतर कॅल्शियम, मग्‍नेशियम व गंधक या दुय्यम अन्‍नद्रव्‍यांचा समावेश होतो. अन्‍नद्रव्‍यांसोबतच गंधक आणि कॅल्शियम जमिनीची रासायनिक परिस्थिती बदलवण्‍यासाठी देखील उपयुक्‍त ठरतात.
1) कॅल्श्यिम :
जमिनीतील विविध मूलद्रव्‍यांचा कॅल्शियम हा घटक आहे. जमिनीत पुरेशा प्रमाणात कॅल्‍शियम उपलब्‍ध आहे.
कॅल्‍शियमचे कार्य :
  • पेशीभि‍त्‍तीका तयार होण्‍यासाठी पेशीविभाजन व पेशी लांब होण्‍यासाठी अत्‍यंत गरजेचे.
  • पिके त्‍यांना देण्‍यात आलेले नत्र याच नायट्रेटच्‍या स्‍वरुपात ग्रहण करतात. नायट्रेटच्‍या शोषणात आणि त्यांच्‍या वापरात गरजेचे. त्‍यामुळे पिकाच्‍या शाखीय वाढीच्‍या काळात कॅल्शियमची गरज भासते.
  • शर्करा तयार होऊन तिच्‍या वापरासाठी व पिकातील विविध संप्रेरकांच्‍या कार्यासाठी कॅल्शियम पिकात सहजासहजी वाहून नेले जात नाही. त्‍यामुळे कॅल्शियमचा पुरवठा थोडाथोडा पण सतत करत राहिले पाहिजे.
कॅल्शियम खत देण्याची मात्रा :
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास 100 किलोग्रॅम जिप्सम खत लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे. (जिप्सम हा कॅल्शियमच्या तुलनेने स्वस्त असलेला स्त्रोत आहे. जिप्सम क्षारयुक्त जमिनीत भुसूधारक म्हणून कार्य करते.)
2) मॅग्रेशियम :
पीक संगोपनासाठी ज्या ठिकाणी केवळ नत्र, स्‍फूरद व पालाशयुक्त खतांचा वापर केला जातो आहे, अशा सर्व जमिनींमध्ये मॅग्रेशियमची कमतरता प्रकर्षाने जाणवते. पिकाच्या चयापचयाच्या क्रियेत मॅग्रेशियम फार महत्त्वाची भूमिका पार पाडते.
मॅग्रेशियमचे कार्य :
  • हरितलवक निर्मिती व प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त प्रथिनांची निर्मिती
  • पिकांच्या अन्नवहनामध्ये सहभाग.
  • प्रकाश संश्लेषणक्रियेद्वारे निर्मित घटकांचा वापर अन्ननिर्मितीसाठी करणे.
मॅग्रेशियम कमतरतेची लक्षणे :
  • मॅग्रेशियमच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या पानावर लाल व तपकिरी रंगाचे डाग दिसतात.
  • जुन्या पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या व करपलेल्या आढळतात.
  • पानांच्या शिरांच्या आतील भाग पिवळा पडतो व पाने करपतात.
  • खोडाच्या आतील भाग तपकिरी दिसतो.
मॅग्रेशियम खते देण्याची मात्रा :
  • ऊस पिकास लागवडीच्या वेळी 25 किलोग्रॅम / हेक्टर मॅग्रेशियम सल्फेट खत जमिनीतून द्यावे.
  • मॅग्रेशियम कमतरता दिसल्यास 200 ग्रॅम मॅग्रेशियम सल्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवस अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
3) गंधक (सल्फर) :
पिकांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये हरितलवके तयार होण्यासाठी जैविक क्रियेमध्ये तसेच प्रथिने तयार होण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत गंधक अन्नद्रव्य महत्त्वाचे कार्य करते. ज्या जमिनीमध्ये उपलब्ध गंधकाचे प्रमाण 10 दशलक्ष भागापेक्षा कमी असते. अशा जमिनीस गंधक कमतरतेची मृदा म्हणतात. अशा जमिनीमध्ये गंधकाचा वापर केल्यास जमिनी पिकांना चांगला प्रतिसाद देतात.
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य सल्फरचा पुरवठा करणारे सेंद्रिय पदार्थ हे मुख्यत्वे करुन जमिनीच्या वरच्या थरातच असतात. जमिनीचा सामू हा जर कमी करायचा असेल, तर त्यात इलिमेंटल सल्फरचा वापर हा सुरक्षित व स्वस्त देखील आहे.
सल्फरचे कार्य :
  • कांदा, मोहरी आणि लसणाला वास आणि विशिष्ट चव देणाऱ्या रसायनांचा घटक.
  • प्रथिने आणि पेप्टाइडचा एक अविभाज्य घटक.
  • विविध एन्झाइम्सचा घटक म्हणून कार्य व नवचे रूपांतर प्रथिनांत करण्यासाठी उपयुक्त.
  • हरितलवक निर्मितीत संप्रेरक म्हणून कार्य करते.
  • पिकाच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरूस्तीसाठी उपयुक्त अन्नद्रव्य म्हणून कार्य करते.
4) गंधक :
गंधकाच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात व वाळतात. शिरांच्या आतील भाग पिवळा पडतो. कांडे लहान आकाराची येतात.
गंधक खते देण्याची मात्रा :
  • हेक्टरी 20 किलो गंधक लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
  • गंधक कमतरता दिसल्यास 100 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट खत 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन या लेखाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे. तसेच अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादनात 10 टक्के पर्यंत वाढ होऊ शकते.
संदर्भ :
  1. ज्ञानेश्वर मोरे (2020) : पीक उत्‍पादन वाढीसाठी मुख्‍य, दुय्यम व सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा चिकित्‍सक अभ्‍यास, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  2. खोब्रागडे एन. एच व इतर (2016) : पिकांसाठी सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये, गोडवा कृषि प्रकाशन, पुणे
  3. कौसीडकर हरीहर (2018) : सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये: नियोजन व व्यवस्थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
 प्रा. गोविंद अंकुश, (एम्. एस्सी. ॲग्री.), सहयोगी प्राध्यापक, अदित्य कृषि महाविद्यालय, बीड
 
ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

1 thought on “ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन”

Leave a Reply