सोयाबीन पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

 294 views

सोयाबीन हे महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

सध्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची वाढ समाधानकारक झाल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी पिकांवर विविध रोगांची लागण झालेली दिसून येत आहे. यासाठी सोयाबीन पिकावरील रोगांची लक्षणे समजून घेता यावे,  रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी हा लेख तयार करण्यात आला आहे.  

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे सोयाबीन पिकांवर हवामानातील अनुकूल वा प्रतिकूल बदलामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावरील रोगांचे प्रभावी नियंत्रण केल्यास ते नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकावरील रोगांची माहिती व नियंत्रण याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.  
सोयाबीन पिकावरील प्रमुख रोग कॉलर रॉट (बुंधा कुज), मूळ व खोडसड, पिवळा मोझॉक विषाणू, तांबेरा, मोझॅक, शेंगावरील करपा, पानावरील जिवाणूचे ठिपके इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात. या रोगाचे वेळेवर बंदोबस्त न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. परिणामी उत्पादन कमी मिळते. त्यासाठी सोयाबीन पिकावर आढळून येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण पुढीलप्रमाणे आहे.
1) कॉलर रॉट (बुंधा कुज) :
हा रोग स्क्लेरोसीअम रॉल्फसी या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पीक वाढीच्या काळात उष्ण व दमट हवामान या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. जमिनीलगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशीची पांढरी बिजेही आढळून येतात. त्यानंतर खोडाचा बुरशीग्रस्त भाग सडू लागतो, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे सुकू लागतात व मरून पडतात.
नियंत्रण :
पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 1.5 ग्रॅम थायरम + 1.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. बुरशीजन्य रोपे उपटून शेताच्या बाहेर पुरून टाकावीत असे केल्याने रोगग्रस्त रोपाच्या बुरशी लगतच असलेल्या चांगल्या रोपापर्यंत जाण्यापासून बचाव होतो. रोगग्रस्त रोपे उपटलेल्या जागेवर कार्बेन्डॅझिम 2.5 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून स्प्रे पंपाचे नोझेल काढून आळवणी करावी, तसेच पिकाची फेरपालट करावी.
2) मूळ व खोडसड :
या रोगाची लागण रोपावस्थेपासूनच दिसून येते. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची व मुळाची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात. जमिनीत कमी ओलावा तसेच 30 ते 35 अंश सें.ग्रे. जमिनीचे तापमान बुरशीच्या वाढीला अनुकूल आहे.
नियंत्रण :
बियाण्यास कार्बेन्डॅझिम 1.5 ग्रॅम + थायरम 1.5 ग्रॅम मिश्रण घेऊन प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व नंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. जमिनीत निंबोळी पेंड किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत. पावसाचा खंड पडल्यास ओलाव्यासाठी पाणी द्यावे.
3) पिवळा मोझॉक विषाणू :
हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसतात.
नियंत्रण :
रोगप्रतिकारक/ सहनशील वाणांची पेरणी करावी, जसे की, जे. एस. 20-69, जे. एस. 20-29, जे.एस. 97-52 आणि जे.एस. 95-60. आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी असल्याचे आढळते. पिवळे चिकटे सापळे साधारणपणे 64 प्रति एकर प्रमाणे 15 x 30 सें.मी. आकाराचे सापळे उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत. पीक उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. उदा. थायमेथोक्झाम 25 डब्ल्यु.जी. 100 ग्रॅम किंवा इथोफिनप्रोक्स 1 लीटर प्रति हेक्टर 500 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. 
4) तांबेरा :
हा रोग बुरशीजन्य असून या रोगामुळे सुरुवातीला झाडाच्या पानाची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांनी दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते. हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर पसरतो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानाच्या देठावर पसरते त्यामळे मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात, आणि उत्पादनात 50 ते 80 टक्क्यापर्यंतची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.
नियंत्रण :
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. उदा. फुले कल्याणी (डी. एस. 228), फुले अग्रणी (के. डी. एस. 344) व फुले संगम (के. डी. एस. 726). प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे 15 ते 25 मे च्या दरम्यान करावी त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पीक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोन्याझोल 25 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा हेक्झाकोन्याझोल 5 टक्के प्रवाही 10 मि.ली. 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5) मोझॅक :
हा रोग सोयाबीन मोझॅक व्हायरस (पोटीव्हायरस) या विषाणूमुळे उद्भवतो. या रोगाचा प्रसार, मावा किडींद्वारे व बियाण्यापासून होतो. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली दिसते तर पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. रोगग्रस्त रोपांना फळधारणा कमी प्रमाणात होते व झाल्यास तेही खुरटलेलीच असतात.
नियंत्रण :
केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत आंतरप्रवाही पी. व्ही. ग्लायसिन्स या जिवाणूमुळे होते. हा रोग झाडाच्या पानांवर कीटकनाशकाची फवारणी व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे करावी.ठिपके दिसून येतात. ठिपक्यांच्या भोवती पिवळसर वलय दिसते.
6) शेंगावरील करपा :
हा रोग व ठिपक्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात. हे जिवाणू कोलेटोट्रिकम डेमाटीअम या बुरशीमुळे होतो. या रोगास पॉड ब्लाईट असेही म्हणतात. यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेली व मोठे होत जाणारे लालसर अथवा गडद तपकिरी ठिपके पाने, खोड आणि शेंगावर दिसून येते. कालांतराने शेंगावर बुरशीचे काळे बिजाणू तयार होतात. अशा शेंगा तपकिरी /काळ्या पडतात व बी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. ही बुरशी पानावर, खोडामध्ये तसेच शेंगामध्ये सुप्तावस्थेत राहते.  
नियंत्रण :
पेरणीकरिता निरोगी उत्तम उगवणक्षमता असलेले बियाणे घ्यावे. पेरणीपूर्वी (कार्बेन्डॅझिम 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के) मिश्र घटक 75 टक्के डी.एस. ची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन 2.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास टेबुकोनाझोल 10 टक्के डब्ल्यू.पी. + सल्फर 5 टक्के + डब्ल्यू.पी. 25 ग्रॅम प्रति 10 लीटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
8) पानावरील जिवाणूचे ठिपके :
हा रोग झानथोमोनास आक्झॉनोपॉडीस इंडोस्किकार्ब पी.व्ही. ग्यायसीन्स या जिवाणूमुळे होतो. हा रोग झाडाच्या पानांवर व रोगांवर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते, या ठिपक्याचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात. हे जिवाणू पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीवरील बियाण्यांत विश्रांती घेतात. या जिवाणूचे वहन वारा, पाण्याचे थेंब आणि किडींद्वारे होते. ते झाडाच्या नैसर्गिक छिद्रातून किंवा शेतकाम करताना झाडाला झालेल्या जखमांतून आत प्रवेश करतात.  
नियंत्रण :
यजमान (होस्ट) नसणाऱ्या पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी. खत वापरात पालाश व स्फुरद असण्याची काळजी घ्यावी. पीक निघाल्यानंतर खोल नांगरणी तसेच झाडाचे सर्व अवशेष काढून जाळून टाकावे. रोगाचा प्रादुर्भाव आढल्यास कॉपर ॲक्झिक्लोराईड 30 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टीप : सदर लेखात नमूद केलेल्या कीटकनाशकाचे नाव, प्रमाण हे सोयाबीन रोगांसाठी शिफारशीत केलेले असून सदर औषधांचा वापर करताना तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन करावा. शासन वेळोवेळी कीटकनाशकावर बंदी घालत आहे.
सोयाबीन रोग नियंत्रणाचे फायदे :
  1. पीक रोगमुक्त व सशक्त होते.
  2. पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते.
  3. रोगांचे प्रभावी नियंत्रण केल्यामुळे पुढील रोगांना आळा बसतो.
  4. उत्पादनात वाढ होते.
 
प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर
 

सोयाबीन पिकावरील रोगांचे नियंत्रण हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

 
close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: