गोदाम पावती

गोदाम पावती शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर बोलताना गोदाम पावतीचा उल्लेख हमखास होतो. अभ्यासकांच्या मते ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याची आहे. शेतमालाची साठवणूक, दर्जा, प्रमाणिकरण, विक्रीसाठी, पतपुरवठा, योग्यवेळी विक्री इत्यादी अनेक घटकावंर गोदाम पावतीचा सकारात्मक प्रभाव पडून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. अशा या व्यवस्थेबदल सखोल माहिती आपण गोदाम पावती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  

गोदाम पावती म्हणजे काय?

कोणत्याही गोदाम सुरक्षा कक्ष अथवा सुरक्षित जागेत साठवून ठेवलेल्या वस्तूची मालकी सिद्ध करणारे कागदपत्र म्हणजे गोदाम पावती होय.गोदाम पावती ही हस्तांतरणीय किंवा अहस्तांतरणीय असू शकते. हस्तांतरणीय म्हणजे अशी गोदाम पावती मालकाने विकल्यास संबंधित शेतमालावर ती पावती विकत घेणाऱ्याचा हक्क प्रस्थापित होतो. अहस्तांतरणीय पावती मात्र विकता अथवा गहाण ठेवता येत नाही.गोदामातून माल न हलवता मालकी बदलणे म्हणजे मालाचे हस्तांतरण करणे गोदाम पावतीमुळे शक्य होते.

गोदाम पावतीची व्याख्या :

वेअर हाऊसिंग (विकास व नियमन) कायदा २००७ च्या कलम २ अन्वये गोदाम पावतीची व्याख्या करताना, गोदाम चालक अथवा त्याने अधिकृत केलेल्या प्रतिनिधीने गोदाम मालकाच्या नसलेल्या वस्तू गोदामात प्राप्त झाल्यानंतर दिलेली लेखा अथवा संगणीकृत पावतीला गोदाम पावती असे म्हटले आहे, तसेच कलम ११ नुसार वस्तूची मालकी दर्शविणारा दस्तऐवज, लेखी अथवा संगणीकृत स्वरुपात असेल त्याला गोदाम पावती असे संबोधले आहे.गोदाम पावती संदर्भात विकसीत देशांमध्ये काय स्थिती आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे दिसून  येते की, अमेरिकेत जुन्या १९१६ चा कायदा बदलून नवा वेअर हाऊसिंग कायदा २००० मध्ये अंमलात आला. त्यामध्ये गोदाम पावतीला शेतमालाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून मान्यात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये गोदाम पावती ही अहस्तांतरणीय असून वेअरहाऊसिंग वाँरट हे हस्तांतरणीय आहे. मात्र त्याचा वापर प्रामुख्याने मान्यता प्राप्त धातूच्या गोदामांमध्ये होतो.

हस्तांतरणीय गोदाम पावती :

हस्तांतरणीय गोदाम पावती म्हणजे अशी पावती, जी ज्यात नमूद केलेला शेतमाल अथवा इतर माल पावतीच्या अथवा त्या निर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल असे वचन देते. अशी पावती विम्याव्दारे संरक्षितही असू शकते. त्याचप्रमाणे धारकाच्या नावे असलेली पावती कोणत्याही शेऱ्याशिवाय वाटविली अथवा हस्तांतरीत केली जाऊ शकते. मात्र विशिष्ट व्यक्तीच्या नावे असलेल्या पावतीवर त्यांचा शेरा घेऊनच हस्तांतरण अथवा विक्री करता येते. वेअरहाऊसिंग (विकास व नियमन) कायदा २००७ च्या कलम २ मध्ये गोदाम पावतीची व्याख्या अशी केली की, पावती यामध्ये नमूद केलेल्या मालकी दुसऱ्याला हस्तांतरीत होऊ शकते अशी केलेली आहे.याउलट अहस्तांतरणीय गोदाम पावती म्हणजे त्यात नमूद केलेली वस्तू विशिष्ट नामानिर्देशित व्यक्तीच्याच मालकीची असून मालकी हक्क बदलण्यासाठी तसा स्वतंत्र्य लेखी करार करणे आवश्यक ठरते. असा करार केल्यानंतर ठेवीदाराने तात्काळ गोदाम, चालकाला तसे कळविणे आवश्यक असून त्यांनतरच गोदाम चालक नवीन मालकाच्या नावे नवीन गोदाम पावती जारी करु शकतो.

गोदाम पावती काय दशविते?

गोदाम पावतीच्या दर्शनी भागावर कायद्याच्या कलम ११ (१) नुसार खालीलबाबी आवश्यक आहे.

  1. पावती क्रमांक
  2. गोदामाचा नोंदणी क्रमांक व नोंदणी वैधता कालावधी
  3. गोदामाचे नाव पूर्ण पत्ता
  4. ठेवीदार अथवा त्यांच्या प्रतिनिधीचे नाव व पूर्ण पत्ता
  5. पावती जारी केल्याची तारीख
  6. ठेवीदाराला अथवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला वस्तूचा ताबा दिला जाईल. अशा आशयाचा हमीनामा.
  7. साठवणूक व हाताळणी शुल्काचा तपशील.
  8. वस्तूचे अथवा पॅकींगचे वर्णन, ज्यामध्ये वजन व दर्जाचा उल्लेख असेल.
  9. वस्तू ठेवतांना असलेल्या बाजारभावानुसार वस्तूचे एकूण मूल्य
  10. वस्तू अथवा पॅकींगवर ठेवीदाराची खाजगी चिन्हे अंकीत असल्यास त्याचे वर्णन.
  11. विमा कंपनीच नाव व आग, पूर, चोरी, दरोडी, अफरातफर, दंगल, संप अथवा दहशतवाद इत्यादी नुकसनीपासून संरक्षणाचा तपशील.
  12. गोदाम पावती हस्तांतरणीय आहे अथवा अहस्तांरणीय आहे याचा उल्लेख.
  13. गोदाम चालकाला मिळालेला अग्रीम व येणे बाकी बाबतचा तपशील.
  14. गोदामचालक अथवा त्यांच्या प्रतिनधीची तारखेसह सही व शिक्का.
  15. वस्तूचे साठवणुकीतील आयुष्यमान या ठिकाणी दोन बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे. एक म्हणजे गोदामाचे भाडे व हाताळणी शुल्कापोटी गोदामचालकाचा सदर वस्तूवर मर्यादित हक्क प्रस्थापित होतो व दुसरे म्हणजे अशी पावती वस्तूच्या निर्देशित केलेल्या आयुष्यमानाच्या कालावधीपर्यंत वैध ठरते.

शेतकऱ्यांसाठी गोदाम पावती उपयुक्त :

लहान शेतकऱ्यांकडे माल साठवणुकीची उपलबध व्यवस्था नसते. त्यामुळे बिगर हंगामात वाढणाऱ्या बाजारभावाचा लाभ त्यांना घेता येत नाही. हंगामात शेतमालाची काढणी झाल्याबरोबर नेणे भाग पडते. मात्र नेमके त्याचवेळी मोठ्या प्रमाणावार शेतमालाचा पुरवठा बाजारात झाल्यामुळे मालाचे भाव कोसळतात. काढणीपर्यंत पिकाच्या मशागतीसाठी झालेली गुंतवणूक व इतर गरजा यामुळे अशा वेळी शेतकऱ्याला पैसाची अत्यंत गरज असते. त्यामुळे लवकर विक्री करुन पैसे मिळवणे हा उद्देशही  ताबडतोब विक्री करण्यामागे असतो.गोदाम वित्त अथवा साठवणूक वित्त ही संकल्पना नवी नसली तरी पुरेशा कायदेशीर तरतुदीअभावी परतफेडीची जोखीम विचारात घेऊन वित्तसंस्था असा कर्जपुरवठा करण्यात हाच आराखडा घेतात. या उपरही कर्जपुरवठा केल्यास तर त्याचे व्याजदर सामान्यपणे जास्त असतात. अशा प्रकाराच्या वाढीव प्रक्रिया खर्चामुळेही असा वित्त पुरवठा महागडा बनतो. मात्र नव्या वेअर हाऊसिंग कायद्यामुळे या व्यवहाराला कायद्याचे पाठबळ लाभले असून गोदामात शेतमाल सुरक्षित राहण्याची आणि हस्तांतरणीय गोदाम पावतीवर कर्ज देण्यास पुढे येत आहे.ही व्यवस्था चालू राहण्यासाठी व अधिक विकसीत होण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना गोदामात माल ठेवून नंतर विक्री केल्यावर मिळणारा नफा हा साठवणूक कर्जावरील व्याज व हाताळणी खर्चापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. ज्या शेतमालाचा किमान हमी भाव सरकारतर्फे जाहीर केला जातो. त्या, शेतमालाची खरेदी करताना प्रत्यक्ष माल ताब्यात घेण्याऐवजी शेतकऱ्याकंडून गोदाम पावत्या घेणे शक्य आहे. त्यायोगे शेतमालाची अनावश्यक हाताळणी टाळता येईल व गरज असेल तेव्हा शेतमाल थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देता येईल.ज्या लहान शेतकऱ्याकडे विक्री योग्य माल अगदी थोड्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी सहकारी संस्था अथवा स्वंयसहाय्यता गट मालाचे एकत्रिकरण करुन गोदामात ठेवू शकतात. त्यांनतर मिळालेल्या कर्जाचे वाटप शेतकऱ्याला करता येऊ शकते. अशा व्यवस्थेतून माल साठवणूक व कर्जपुरवठा याचा खर्च कमी होत जाईल व सहकारी संस्था/बचतगट आपल्या क्षमतेच्या कार्य क्षमतेच्या जोरावर अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करु शकतील.

वित्तीय संस्था/विमा कंपन्यासाठी गोदाम पावतीचे महत्व :

शेतमालाचे तारण व हस्तांतरणीय गोदाम पावती देण्याच्या व्यवस्थेला कायद्याचे पाठबळ लाभल्यामुळे बँका विमा कंपन्याला शेती क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण सहकारी संस्था अथवा स्वंयसहाय्यता गटाला आता कमी जोखीम व कमी व्याजदारावर वित्त पुरवठा करता येईल.गोदाम पावतीच्या व्यवहारात विमा ही अविभाज्य भाग असल्यामुळे विमा कंपन्या याही व्यवसायाची मोठी संधी यामध्ये उपलब्ध आहे. शिवाय या व्यवहारात कोणत्याही भागीदाराने केलेली चूक अथवा साठवणूकीतील भरुन काढण्यासाठी एक परफार्मन्स गॅरंटी फंड स्थापन केला जाणार आहे. यामध्ये वित्त संस्था व विम्या कंपन्यांचा मोठा सहभाग राहणार आहे. त्यासाठी एक नवीन सेवा सुरू करण्याची आता गरज आहे.

शेतमाल व्यापाऱ्याकरीता गोदाम पावतीचे महत्व :

शेतमालाची प्रक्रिया उद्योग हंगामाच्या दिवसात शेतमालखरेदी करुन नोंदणीकृत गोदामात ठेवू शकतात व हस्तांतरणीय गोदाम पावतीच्या आधारे वित्तसहाय्य प्राप्त करून साठविलेला माल वर्षभर प्राक्रियासाठी वापरु शकतात. असे हस्तांतरणीय गोदाम पावती व्यवस्था एकदा सुस्थापित झाल्यानंतर निर्यात होणाऱ्या मालावर गोदामचालक कमी व्याजदरावर विदेशी भांडवल आणू शकतील. जेणेकरुन विदेशी चालकाच्या दरातील चढ उतारापासून ही संरक्षण मिळू शकेल. केनिया व युगांडामध्ये कॉफीच्या साठवणूक व्यवस्थेमध्ये अशी पद्धत अस्तित्वात असून तेथे पाऊंड स्टर्लिंगमध्ये वित्तपुरवठा केला जातो.

संगणीकृत हस्तांतरणीय गोदाम पावती :

वेअर हाऊसिंग (विकास व नियमन) कायदा २००७ मध्ये संगणीकृत हस्तांतरणीय गोदाम पावतीला मान्यता देण्यात आली आहे. कायद्याच्या कलम २ नुसार दिलेल्या व्याख्यानुसार संगणीकृत किंवा इलेक्ट्रॉनिक माहिती म्हणजे अशी माहिती जी चुबंकीय, प्रकाशतंतुयुक्त, संगणक मेमरी, मायक्रोफिल्म अथवा तत्सम साधनांचा वापर करुन तयार केली जाते. साठविली, पाठविली व प्राप्त केली जाते अशा पावतीचे फायदे म्हणजे त्यामुळे कागदपत्राचा पसारा कमी होतो. त्याची हाताळणी हस्तांतरणासाठी लागणारा वेळ श्रम, यात बचत होऊन जोखमही कमी होते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. तसेच पावतीची संपूर्ण हालचाल संगणकाव्दारे जतन /टिपली जात असल्यामुळे अपहाराचा छडा ताबडतोब लावला जातो.संगणीकृत हस्तांतरणीय गोदाम पावतीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यावर वायदे बाजारही विविध गोदामांमध्ये साठविलेल्या मालाच्या प्रमाणे व त्यांची मालकी याची ताजी माहिती गोदामांकडून थेट मिळू शकतील. त्यांचा उपयोग वायदे व्यवहाराची वैधता तपासून पाहण्यासाठी तर होईलच, शिवाय असे व्यवहार अत्यंत वेगाने पूर्ण होऊ शकतील.

गोदाम पावतीचे फायदे :

  • एक विशिष्ट स्वरुपाचा, दर्जाचा, वजनाचा माल एका विशिष्ट गोदामात निश्चितपणे उपलब्ध असल्याचे गोदाम पावतीवरुन कळते.
  • भविष्यातील ठरावीक दिवशी मालाचे हस्तांतरण होणार असल्यास किंवा वायदे बाजारात त्याची झालेली असल्यास तस गोदाम पावतीवर नमूद केलेले असते.
  • वायदे बाजारात सौदा पूर्तीच्या दिवशी प्रत्यक्ष मालाचे हस्तांतरण न करता हस्तांतरणीय गोदाम पावती वापरली जाते.
  • गोदाम पावती शेतमाल व्यापाऱ्याकरीता शेतमाल विक्रीसाठी महत्वाची ठरते.
  • शेतकऱ्यांचा उत्पादीत होणारा शेतमाल यशीस्वीरित्या व चांगल्या प्रकारे गोदामात साठवण केला जातो.
  • शेतकऱ्यांचा शेतमाल गोदामात साठवण केल्यामुळे त्यांना शेतमाल तारण योजनेतून कर्ज कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते.

संदर्भ :गोदाम पावती, शेतकरी उत्पादक कंपनी : महाराष्ट्र शासन, कृषि विभाग, आत्मा कार्यालय, लातूर.


शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर वेबसाईट : https://www.agrimoderntech.in/

गोदाम पावती हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe,  लाईक,  कंमेट्स,  जास्तीत जास्त शेतकरी बांधव व वाचकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading