स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन

डॉ. द. श. कदम, डॉ. रा. रा. पेरणे, विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर जि. सातारा

स्ट्रॉबेरी हे थंड हवामान प्रदेशातील महत्त्वाचे फळपीक आहे. आपल्याकडे स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने महाबळेश्वर (जि. सातारा), सांगली, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील मैदानी परिसरातील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी या ठिकाणी पोषक थंड वातावरण असल्यामुळे येथे स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.

यावर्षी (२०२२) पावसाळा हंगाम लांबल्यामुळे महाबळेश्वर या परिसरातील स्ट्रॉबेरीची लागवड तब्बल एक महिन्याने उशिरा झाली. माहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड झालेल्या रोपांचे मूळकूज या रोगामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यावर पुन्हा लागवड करण्याची वेळ आली. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन क्षेत्र देखील घटले आहे.

स्ट्रॉबेरी या पिकापासून दर्जेदार व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी हवामान, योग्य जमिनीची निवड, खत व पाण्याचे सुयोग्य नियोजन, पिकाचे रोग-किडींपासून वेळीच नियंत्रण, योग्य प्रकारे फळांची काढणी व हाताळणी अशा बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन हा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.  

स्ट्रॉबेरी महत्त्व :

स्ट्रॉबेरी फ्रिग्रीया प्रजातीचे एक झाड आहे, ज्यासाठी जगभरात स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. स्ट्रॉबेरी फळ त्याच नावाने देखील ओळखले जाते. स्ट्रॉबेरीचा विशेष वास त्याची ओळख बनली आहे. ते चमकदार लाल रंगाचे आहे. स्ट्रॉबेरी ताजे फळ म्हणून खाल्ले जाते. तसेच स्ट्रॉबेरीचा जॅम, ज्यूस, पाई, आइस्क्रीम, दुधाचे शेक इत्यादी स्वरूपात वापर केला जातो.

स्ट्रॉबेरी, फ्रिगिरा आनानास्सा, ही एक संकरित प्रजाती आहे. जी जगभरात त्याच्या फळांसाठी (सामान्य स्ट्रॉबेरी) लागवड केली जाते. फळ (जे प्रत्यक्षात मनुका नसून एक संयुक्त दुय्यम फळ आहे) आपल्या विशिष्ट सुगंध, चमकदार लाल रंग, रसाळ पोत आणि गोडपणासाठी व्यापकपणे ओळखला जातो. हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते, ताजे किंवा संरक्षित आणि फळांचे रस, आइस्क्रीम आणि दुधाचा शेक यांसारख्या तयार पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात वापरला जातो. कृत्रिम स्ट्रॉबेरीचा सुगंध बऱ्याच औद्योगिक खाद्य उत्पादनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अशा स्ट्रॉबेरीच्या विविध गुणकारी उपयोगिततेमुळे स्ट्रॉबेरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन बाबी :

सदर स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन यालेखाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकांबाबत अद्यावत व आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी या लेखाद्वारे केला आहे. तसेच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकाचे व्यवस्थापन करणे सुलभ होणार असून त्यांचे प्रती एकरी उत्पादन व उत्पादकतेत शाश्वता आणता शक्य होणार आहे.

खत व्यवस्थापन

सर्वसाधारणपणे स्ट्रॉबेरी पिकास प्रति हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे. नत्र, स्फुरद व पालाश अनुक्रमे १२०:१००:७५ किलो प्रति हे. या मात्रेत खत द्यावे. लागवडीच्या वेळी स्फुरद व पालाश एकत्र व नत्राचा हप्ता तीन समान हप्त्यात विभागणी करून १५ दिवसांच्या अंतराने द्यावा. स्ट्रॉबेरी पिकास विद्राव्य खतांची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे खते वाया न जाता देता येते. त्यासाठी १९:१९:१९ ची मात्रा रोपाच्या चांगल्या वाढीच्या अवस्थेपर्यंत व ०:५२:३४ या मात्रेची खते फुलकळीच्या अवस्थेत द्यावी. तसेच ही खते ४ ते ५ ग्रॅम/ली. पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ झाल्याची दिसून आले आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर :

स्ट्रॉबेरी पिकाच्या गरजेनुसार किंवा रोपांवरील लक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन त्यानुसार ही खते द्यावीत. साधारणत: स्ट्रॉबेरी पिकास बोरॉन, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भासते. ही कमतरता भरून काढण्यासाठी पुढीलप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याची आळवणी करावी. कॅल्शियम नायट्रेटची १ ग्रॅम प्रति लीटर, मॅग्नेशियम सल्फेट १ ग्रॅम प्रति लीटर, झिंक सल्फेट ०.५ ग्रॅम प्रति लीटर व बोरॅक्स ०.२५ ग्रॅम प्रति लीटर.

आच्छादनाचा वापर :

स्ट्रॉबेरी लागवडीनंतर ३० दिवसांनी गादीवाफ्याची चांगल्या प्रकारे खुरपणी करून गादी वाफ्यावर काळ्या किंवा चंदेरी रंगाचे कागदाचे आच्छादन घालावे. आच्छादनामुळे फळांचा मातीशी येणारा संपर्क टाळता येतो व फळकूज रोग रोखण्यास मदत होते; तणांचे प्रभावी नियंत्रण होते व रोपाच्या गुणवत्तापूर्वक वाढीसाठी थंडीच्या दिवसात जमिनीचे तापमान वाढून पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. सूर्यप्रकाशाचे परावर्तन होत असल्यामुळे उन्हाळ्यात मातीचे तापमान कमी होऊन फुलकळीचा कालावधी वाढतो.

पाणी व्यवस्थापन :

स्ट्रॉबेरी रोपांची गादी वाफ्यावर लागवड केल्यानंतर पाणी द्यावे. प्लॅस्टिक आच्छादनाखाली रोपांच्या दोन ओळीत मध्यभागी लॅटरल अंथरावी व वाफ्यावरील चार रोपांमध्ये एक ड्रिपर (४ ली./ तास) क्षमतेचे ठेवावे. रोपांची लागण केल्यानंतर लगेच पाणी द्यावे व २ ते ३ दिवस दररोज पाणी द्यावे. यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार २ ते ३ दिवसाआड ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत होऊन फळाच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. याशिवाय, दोन गादीवाफ्याचे मध्यभागी पीक वाढीच्या काळात तुषार सिंचन/फवारा सिंचनाचा वापर करावा म्हणजे रोपाच्या वाढीच्या काळात पाण्याची गरज जास्त असल्यामुळे ती पूर्ण होईल.

संजीवकांचा वापर :

स्ट्रॉबेरी पिकासाठी संजीवकांचा वापर करावयाचा असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक करावा. सामान्यत: संजीवकांचा वापर फूलांचे प्रमाण वाढवणे व फळांचे आकारमान वाढविण्यासाठी केला जातो. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या संजीवकांपैकी महाबळेश्वर परिसरातील शेतकरीवर्ग प्रामुख्याने जी. ए.- ३, २५ ते ५० पी.पी.एम. व एन.ए.ए., २०० पी.पी.एम. द्रावणाची लागवडीनंतर ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करतात. त्याने फळांचे आकारमान व संख्या वाढून उत्पादनात २५ टक्क्याने वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

स्ट्रॉबेरी : कीड व्यवस्थापन :

रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी रंगीत चिकट ट्रॅपचा वापर करावा व गरजेनुसार पुढील कीटक नाशकांची १५ ते २० दिवसातून आलटून पालटून फवारणी करावी. प्रोफेनोफॉस (२ मि.ली./ली. पाणी) किंवा ऑक्झी डिमेटॉन मिथिल (२ मि.ली./ली. पाणी) किंवा थायाक्लोप्रिड २४० एस.सी. (२ मि.ली./ली. पाणी) किंवा ईमिडाक्लोप्रिड २०० एस एल (१.५ ते २.० मि.ली./ली. पाणी).

पाने व खोड कुरतडणारी अळीच्या नियंत्रणासाठी ऑक्झी डिमेटॉन मिथिल (२ मि.ली./ली. पाणी) किंवा मिथिल डिमेटॉन (१ मि.ली./ली. पाणी) किंवा अॅक्टारा ५ ग्रॅम/पंप (१६ लीटर पाणी) या कीटकनाशकांची गरजेनुसार फवारण्या कराव्यात.

स्ट्रॉबेरी : रोग व्यवस्थापन  :

१) भुरी रोग : स्ट्रॉबेरीवर मुख्यत्वे भुरी रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र आढळून येतो. ढगाळ वातावरण तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी संरक्षणात्मक उपाय म्हणून पाण्यात विरघळणारे गंधक (२.५ ग्रॅम/ली. पाणी) फवारावे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास टेब्युकोन्याझॉल (१ मि.ली./ली. पाणी), कॅलिक्झीन (१ मि.ली./ली. पाणी) किंवा हेक्झाकोनॅझोल (१ मि.ली./ली. पाणी) फवारावे.

२) जिवाणूजन्य ठिपके : या रोगाच्या नियंत्रणासाठी ब्लायटॉक्स ५० डब्लू. पी. (२.५ ग्रॅम/ली. पाणी) अधिक स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट (२ ग्रॅम/ ली. पाणी) एकत्रित मिसळून रोगाची लक्षणे दिसताच त्वरित फवारणी करावी व त्यानंतर ४ ते ५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

३) करपा/ब्लाईट : या रोगाच्या नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायफेनकोनॅझोल २५० ईसी (१ मि.ली./ली. पाणी) किंवा ब्लायटॉक्स ५० डब्लू.पी. (२.५ ग्रॅम/ली. पाणी) किंवा कार्बेन्डॅझिम(१ ग्रॅम/ली. पाणी) या बुरशीनाशकांची गरजेनुसार फवारणी करावी.

४) क्राउन रॉट/शेंडाकूज/मर : या रोगांच्या रोगकारक बुरशीची बीजे जमिनीतून झाडात प्रवेश करतात. ही बीजे नष्ट करण्यासाठी लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी जमिनीचा निचरा योग्य असावा. रोगाचा प्रादुर्भाव न झालेली निरोगी रोपे लागवडीसाठी वापरावीत. रोपे लावण्यापूर्वी कार्बेन्डॅझिम (१ ग्रॅम/ली. पाणी) च्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवावीत.

५) फळकूज : यारोगांचे संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून कार्बेन्डॅझिम (१ ते २ ग्रॅम/ली. पाणी) किंवा कॅप्टन (२.५ ग्रॅम/ली. पाणी) या बुरशीनाशकांची ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारणी करावी.

६) मर रोग या रोगाच्यासंरक्षणात्मक उपाययोजना म्हणून बुरशीची बीजे नष्ट करण्यासाठी लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीचा निचरा योग्य असावा. रोगाचा प्रादुर्भाव न झालेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. रोपे लावण्यापूर्वी कार्बेन्डॅझिम १ ग्रॅम/प्रती लीटर पाणी च्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवावीत.

स्ट्रॉबेरी फळांची काढणी :

स्ट्रॉबेरीला चांगला सूर्यप्रकाश आणि योग्य तापमान असल्यास जातिपरत्वे ४५ ते ६५ दिवसांत फुले येण्यास सुरवात होते. हा कालावधी स्टॉबेरीची जात व हवामानाची परिस्थिती यावर अवलंबून असतो. तेथून ११ ते १६ दिवसांत फळे तयार होऊन २ ते ३ दिवसांत तोडणीस योग्य होतात. यानंतरच स्ट्रॉबेरी फळांची काढणी करावी. स्ट्रॉबेरी फळांची काढणी करतांना स्थानिक किंवा लांब पल्ल्यावरील बाजारपेठेची मागणी व दर लक्षात घेऊनच फळांची काढणी करावी.  

स्ट्रॉबेरी साठवणूक :

स्ट्रॉबेरी फळांचे फिकट-लालसर किंवा गुलाबी रंगाची अर्धपक्व फळे तोडून प्रतवारी करून, पुठ्याच्या खोक्यात झाडपाला किंवा कागदी तूस/तुकडे ठेवून अर्धा किलो किंवा पाव किलो फळांचे प्लॅस्टिक पॅकिंग करून ते २४ तासांत बाजारात पोहोचतील अशी व्यवस्था करावी. स्थानिक बाजारासाठी अर्धपक्व किंवा पक्व फळे तोडावीत. फळांची काढणी एक दिवसाआड करावी. स्ट्रॉबेरीची फळे नाशवंत असल्यामुळे अधिक कालावधीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. प्रिकुलींगमध्ये फळे ० ते ४ अंश सें.ग्रे. तापमानात ४ तास थंड केली जातात. यामुळे फळांचे आयुष्यमान दुप्पटीने वाढते.

स्ट्रॉबेरी उत्पादन :

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीच्या फळांचे प्रती हेक्टरी ५ ते ७ टन इतके उत्पादन घेत आहेत. तथापि, विदेशी जातींपासून जातिपरत्वे हेक्टरी १५ टनांपासून २० टनापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात उत्पादन मिळू शकते. पुढल्या वर्षाची पूर्वतयारी काढणी हंगाम संपल्यावर शेतातून राहिलेली सर्व स्ट्रॉबेरीची झाडे, सुकलेला पालापाचोळा तसेच टाकलेली फळे ही वेचून घ्यावी व जाळावी. जमिनीची उभी-आडवी खोलवर नांगरट करून जमिनीची स्वच्छता करावी जमीन सूर्यप्रकाशामध्ये तापू द्यावी, जेणेकरून बुरशीजन्य रोगांची बिजांडे नष्ट होतील. लागवडीपूर्वी धुरीजन्य औषधे वापरून निर्जंतुकीकरणासाठी धुरीकरण करावे.

विशेष संदर्भ :

  1. शेतकरी मासिक, जुलै २०२० : स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, मुंबई
  2. https://vishwakosh.marathi.gov.in/23555/
  3. https://hi.wikipedia.org/wiki/स्ट्रॉबेरी
  4. http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production

डॉ. द. श. कदम, डॉ. रा. रा. पेरणे, विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर जि. सातारा

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर वेबसाईट ॲडमीन :

स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribes, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading