गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती

गुलाब फुलांचा वापर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण फुलांशिवाय कोणत्याही कार्यक्रमास सुशोभीपणा येत नाही. त्यामुळे फुलांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

प्रस्तुत लेख गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती यावर करण्यात येत असून गुलाबापासून पदार्थ तयार करणे व इतर फुलांपासून सुगंधी द्रव्ये निर्मिती याबद्दल शास्त्रोक्त पद्धतीने सविस्तर व सखोल माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. सदर माहितीचा उपयोग गुलाब प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या व उद्योजकांना होणार आहे.   

गुलाबापासून पदार्थ तयार करणे

1) गुलाबपाणी (Rose water)

गुलाबपाणी भारतात प्रामुख्याने तयार करण्यात येते. गुलाबपाण्याचा वापर निरनिराळ्या औषधांत, डोळ्यांच्या विकारांत होतो. सरबत तयार करण्यासाठी तसेच सांस्कृतिक समारंभात आणि लग्नकार्यांत गुलाबपाण्याचा उपयोग पाहुण्यांवर शिंपडण्यासाठी केला जातो.

भारतात दमास्कस गुलाब आणि एडवर्ड प्रकारातील बसैन किंवा बारवान बसरा, चैती या गुलाबाच्या फुलांपासून गुलाबपाणी बनविले जाते. गुलाबपाणी मिळविण्यासाठी तांब्याच्या भांड्यात फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यांच्या दुप्पट वजनाइतके पाणी ओतून उकळवितात. 5-6 तासांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुलाबपाणी मिळते.

घरात स्वच्छ केलेल्या कुकरमध्ये गुलाबपाणी तयार करता येते. यासाठी कुकरमध्ये 1.5 लीटर पाणी घेऊन त्यात 15 ते 20 गुलाबाच्या फुलांच्या सर्व पाकळ्या टाकाव्यात. कुकरला प्रेशर न बसविता प्रेशरच्या जागी प्लास्टिक नळी बसवून या नळीवर ओले फडके गुंडाळावे. नळीचे दुसरे टोक बाटलीत धरावे. पाण्याची वाफ थंड होऊन बाटलीत थेंबथेंब गुलाबपाणी पडू लागते.

रासायनिक प्रयोगशाळेत शुद्ध पाणी तयार करणारे उपकरण वापरून गुलाबपाणी तयार करता येते. यासाठी एका काचेच्या चंबूत 1.5 लीटर पाणी घ्यावे. त्यात एकाच प्रकारच्या 15 ते 20 गुलाब फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात. नंतर पाणी उकळावे. उकळत्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या रंगहीन होतात. फुलातील सुगंधी द्रव्य वाफेवाटे बाहेर पडते. ही वाफ थंड होऊन तिचे गुलाबपाण्यात रूपांतर होते.

2) गुलरोघन हेअर ऑईल (Gulroghan Hair Oil)

गुलाबपाणी आणि तेवढ्याच प्रमाणात तिळाचे तेल एकत्र करून तयार केलेल्या मिश्रित तेलाला गुलरोघन हेअर ऑईल असे म्हणतात.

गुलाबापासून गुलरोघन हेअर ऑईल हा पदार्थ सुधारित एन्फ्ल्युरेज पद्धतीने तयार केला जातो. या पद्धतीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि तीळ यांचे थर दिले जातात. त्यामुळे तिळामध्ये गुलाबपाकळ्यांतील सुगंधित द्रव्ये शोषली जातात. प्रत्येक दिवशी वापरलेल्या पाकळ्या काढून नवीन पाकळ्या वापरतात. गुलाबाच्या सुगंधित द्रव्याने तीळ संपृक्त होईपर्यंत ही कृती करतात. त्यानंतर गुलाबाच्या सुगंधाने संपृक्त झालेल्या तिळापासून घाणीच्या साहाय्याने तेल काढतात.

3) इतर प्रक्रियायुक्त पदार्थ (Other processed foods)

गुलाबापासून रोझ व्हिनेगार, रोझ पेटल प्रिझर्व्हसुद्धा तयार करतात. गुलाबपाणी अर्क मिश्रित शीतपेयेपण आज बाजारात उपलब्ध आहेत.

फुलांपासून सुगंधी द्रव्ये व तेल काढणे

जाई, जुई, मोगरा, चमेली, निशिगंध, गुलाब, इत्यादी फुलांपासून तेल काढतात. हे तेल सुवासिक अत्तरे तयार करण्यासाठी वापरतात. या सुगंधी फुलांची व्यापारी तत्त्वावर लागवड उत्तर प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रातील काही भागांत करतात.

जाईच्या फुलांचे उत्पादन एकरी 40 ते 80 किलो, चमेलीचे 200 ते 400 किलो आणि मोगऱ्याचे उत्पादन 300 ते 500 किलो मिळते. या फुलांच्या पाकळ्यांत हवेत उडून जाणारे सुगंधी तेल असते. फुले झाडावरून तोडल्यानंतर सुकेपर्यंत फुलांचा सुगंध दरवळत असतो. सूर्यास्तानंतर लागलीच फुले उमलण्यास सुरुवात होते. फुले उमलल्यापासून ते सूर्योदयानंतर काही तास फुलांचा सुगंध वाढत जातो. त्यानंतर फुलांमध्ये सुगंध तयार होण्याचे बंद झाले तरी फुलांत रात्री सुगंधी तेल तयार झालेले असल्याने तोडलेल्या फुलांचा सुगंध येत राहतो. सूर्योदयापूर्वी काढलेल्या पूर्ण उमलेल्या आणि ताज्या फुलांपासून ऊर्ध्वपातन (डिस्टिलेशन) पद्धतीने तेल मिळविता येते. सदर तेलाचे उत्पादन 0.2 ते 0.3% इतके असते.

फुलांपासून सुगंधी तेल काढणे हा अलीकडे महत्त्वाचा उद्योग झाला आहे. सुगंधी तेल काढताना खालील वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतात.

(1) एन्फ्ल्यु रेज प्रक्रिया (Influenza process)

ह्या पद्धतीत विशिष्ट प्रकारचे शोषक क्षार वापरून फुलांतील सुगंधी द्रव्ये शोषून घेतली जातात. अशा प्रकारे फुलांतील सुगंधी द्रव्याने क्षार पदार्थ संपृक्त झाल्यावर, घाणीच्या पद्धतीने सुगंधी द्रव्ये मिळवितात. ह्या पद्धतीने इतर पद्धतींपेक्षा 2 ते 3 पट अधिक उत्पादन मिळते. भारतामध्ये केसांसाठी वापरली जाणारी सुगंधी तेले तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत सिमेंटच्या टाकीमध्ये सोलून वाळविलेले तीळ आणि फुले यांचे आलटून पालटून एकावर एक थर देतात.

अशा प्रकारे तीळ सुगंधाने संपृक्त होईपर्यंत म्हणजेच सुमारे 5 ते 7 दिवस ही प्रक्रिया करतात. साधारणपणे एक किलो तिळासाठी 3 किलो ताजी फुले लागतात. त्यानंतर तेलाच्या घाणीमध्ये या तिळातील तेल काढतात. काही वेळा या तिळातील तेल वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो. यामध्ये सुगंधित पाण्याची वाफ चंदन तेलामध्ये शोषून घेतली जाते व चमेलीचे अत्तर तयार केले जाते.

(2) सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्रक्रिया (Solvent extraction process)

ह्या पद्धतीत पेट्रोलियम इथर अथवा हेक्झेनचा वापर करून तेल काढतात. पेट्रोलियम इथरमध्ये फुले बुडविली असता त्यात फुलातील तेल विरघळते आणि नंतर ते ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करतात. जस्मीन काँक्रीट आणि जस्मीन अॅबसोल्यूट तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.

जस्मीन काँक्रीट तयार करण्यासाठी चमेलीची फुले हेक्झेन या रासायनिक द्रव्यामध्ये बुडवून ठेवतात. त्यामुळे फुलातील सुगंधी तेल, मेण आणि रंगद्रव्ये हेक्झेनमध्ये विरघळतात. नंतर कमी तापमानाला बाष्पीभवन करून मिश्रणातील हेक्झेनचे वाफेत रूपांतर करतात. ही वाफ पुन्हा थंड केल्यावर द्रवरूप हेक्झेन मिळते.

अशा प्रकारे मिश्रणातील हेक्झेन वेगळे केल्यानंतर पिवळसर तपकिरी रंगाचे आणि सुवासिक चमेलीचे तेल शिल्लक राहते, त्यास जस्मीन काँक्रीट असे म्हणतात. 1000 किलोग्रॅम फुलांपासून 2.8 किलो जस्मीन काँक्रीट मिळते. जस्मीन काँक्रीटपासून जस्मीन अॅबसोल्यूट तयार केले जाते. यासाठी चांगल्या प्रतीचे अल्कोहोल वापरून जस्मीन काँक्रीटपासून घट्ट पिवळसर तपकिरी रंगाचे अत्यंत सुवासिक अॅबसोल्यूट तयार करतात. जस्मीन काँक्रीटपासून सुमारे 49% जस्मीन अॅबसोल्यूट मिळते.

(3) ऊर्ध्वपातन पद्धत (स्टीम डिस्टिलेशन)

या पद्धतीने पाण्याच्या वाफेच्या ऊर्ध्वपातनाने फुलातील तेल वेगळे केले जाते. या पद्धतीत तेलाचे उत्पादन कमी मिळते. चमेली व जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल काढतात. चमेलीच्या सुगंधी तेलाला युरोपीय देशांत खूप मागणी आहे. चमेलीच्या सुगंधी तेलाचे जागतिक उत्पादन 10 ते 15 टन इतके आहे. चमेलीची लागवड मुख्यतः दक्षिण अफ्रिका, चीन, इजिप्त, मोरोक्को, इटली, फ्रान्स या देशांत होते. भारतातही चमेलीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. उत्तर प्रदेशात हे क्षेत्र 150 हेक्टर व तामीळनाडूत 200 हेक्टरच्या आसपास आहे. तामीळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात चमेलीचे सुगंधी तेल तयार करणारे 16 कारखाने आहेत.

चमेलीच्या फुलांचा बहार मे ते डिसेंबर महिन्यांतच असतो. फुलांतील सुगंधी द्रव्य वेगळे करण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत फुलांची काढणी करावी. त्यानंतर तापमान वाढत जाते आणि फुलांतील सुगंधी तेल उडून जाते. म्हणून तोडलेली फुले लगेचच प्रक्रियेसाठी कारखान्यात पाठवितात.

चमेली व जाई या फुलांपासून तेल काढताना पेट्रोलियम इथरचा वापर करतात. पेट्रोलियम इथरमध्ये इतर रसायने असतात. ती पूर्णपणे नाहीशी करावी लागतात. अन्यथा त्यांचा अंश सुगंधी तेलामध्ये उतरतो. पेट्रोलियम इथरमधील इतर पदार्थ नाहीसे किंवा वेगळे करण्यासाठी पेट्रोलियम इथर तीव्र सल्फुरिक आम्लात धुऊन घेतात.

सुगंधी द्रव्ये काढणे

पूर्ण उमललेली फुले सूर्योदयापूर्वी काढावीत. अशी फुले पेट्रोलियम इथरच्या द्रावात ठेवून त्यापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने फुलांपासून तेल गोळा करतात. फुले पेट्रोलियम इथरच्या द्रावात तीन वेळा बुडवितात.

  1. प्रथम फुले इथरच्या द्रावात 40 मिनिटे बुडवितात.
  2. त्यानंतर तीच फुले दुसऱ्यांदा 30 मिनिटे बुडवितात.
  3. त्यानंतर तीच फुले तिसऱ्यांदा इथरच्या द्रावात 20 मिनिटे बुडवितात.

वरील पद्धतीने सुगंधी अर्क फुलांपासून वेगळा होऊन पेट्रोलियम इथरमध्ये उतरतो.
राहिलेल्या तेलाचा अंश व्हॅक्यूम फिल्टर प्रेसच्या साहाय्याने फुलांच्या लगद्यातून
काढून घेतात. शेवटी सर्व तिन्ही द्रव एकत्र करतात. त्यानंतर ऊर्ध्वपातन पद्धतीने
इथर द्रव वेगळा करून अर्क किंवा तेल मिळवितात. उडून गेलेले पेट्रोलियम इथर थंड करून परत मिळविता येते आणि त्याचा पुन्हा वापर करता येतो. या पद्धतीत प्रत्येक वेळी फक्त इथरचा
1520% द्राव वाया जातो.

अलीकडच्या काळात शेतकरी बांधव फुलशेतीकडे फारशे आकर्षित झालेले आहेत. कारण पारंपारिक पिकांच्या तुलनेत फुलशेती ही आजच्या परिस्थितीत उत्तम मानली जात आहे. तसेच फुलशेती बद्दल कृषि विद्यापीठाने विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करून फुलशेतीचे प्रती हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून सुधारित पद्धतीने फुलशेती केल्यास निश्चितपणे उत्पादनात वाढ करता येऊ शकते. असे अनेक संशोधकाचे व कृषि तज्ज्ञांचे मत आहे.

 विशेष संदर्भ (Special reference) :

  1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका – 1 : 94
  2. PDF E-BOOK : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

शब्दांकन : आकाश अशोक बानाटे, (बी.एस्सी. ॲग्रीकल्चर, लातूर.)

गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती हा लेख आपणास आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बाधंवापर्यंत Link Share करुन, वेबसाईट ला Subscribe, Web Push Notification Allow करुन सहकार्य करावे.

Popular Article for Floriculture

गुलाब प्रक्रिया

गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांची परिपक्वता

फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

 

Prajwal Digital

Leave a Reply