भेंडी हे महत्त्वाचे व्यापारी भाजीपाला पीक आहे. भेंडीचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल बदलामुळे भेंडी पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. त्यामुळे भेंडी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असते.
भेंडी पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित पद्धतीने भेंडी लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता भेंडीचे सुधारित वाण, सुधारित लागवड पद्धत, बीजप्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, काढणी व विक्री व्यवस्थापन हे पद्धतीने केल्यास निश्चितपणे भेंडीचे पीक फायदेशीर ठरू शकते.
भेंडी उगमस्थान
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडी हे ‘मालव्हेसी’ कुळातील पीक असून त्याचे शास्त्रीय नाव ‘अॅबलमॉस्कस’ ‘एरक्युलेन्टस’ हे आहे. जगभरातील जवळपास सर्व देशात ह्या पिकाची लागवड केली जाते व विविध देशात भेंडी निर्यातीस मोठा वाव आहे.
भेंडीचे महत्त्व
भेंडी ही एक अत्यंत चवदार, पाचक अशी भाजी आहे. जवळपास प्रत्येक घरात भेंडीची भाजी आवडीने खाल्ली जाते. विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये देखील भेंडीचा चांगला उपयोग केला जातो. भेंडीची सुकी भाजी करण्यासाठी तसेच आमटी, सांबर यामध्ये भेंडीचा उपयोग करतात. भेंडीच्या कोरड्या फळात जीवनसत्वे अ, क तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, चुना व लोह इ. खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात.
भेंडी लागवड तंत्रज्ञान घटक
भेंडीचे उत्पादन आपल्याकडे तीन्ही हंगामात घेतले जाते, मात्र भेंडीची लागवड ही हिवाळी व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या हंगामातील भेंडीची गुणवत्ता व दर्जा हा उत्तम राखला जातो. ज्यामुळे बाजारपेठेत त्याला किफायतशीर दर मिळतो. भेंडीचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी भेंडीचे पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा लागतो.भेंडीच्या अधिक उत्पादनासाठी भेंडीच्या सुधारित व संकरित वाण, उच्च दर्जाचे बियाणे, पूर्व मशागत, लागवड हंगाम, आंतरमशागत, तणनियंत्रण, कीड व रोग नियंत्रण, काढणी पद्धती, काढणीनंतर मालाची प्रतवारी व गुणवत्ता इत्यादी बाबींची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे भेंडीचे उत्पादन वाढण्यास मदत मिळेल यात शंका नाही.
हवामान
भेंडी पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. भेंडीच्या लागवडीच्या वेळी बी उगवणीसाठी 150 अंश सें. पेक्षा कमी तापमान असल्यास बी व्यवस्थित उगवत नाही, फुलांची लागण झाल्यावर तापमान 420 अंश सें. पेक्षा जास्त झाल्यास फुलगळतीची समस्या उद्भवते. एकंदरीत विचार करता सर्वसाधारण 200 ते 400 डिग्री सें. तापमान भेंडीसाठी अनुकूल असते. महाराष्ट्रातील हवामान भेंडी लागवडीसाठी पोषक असल्याने वर्षभर भेंडीची लागवड करता येते.
जमीन
भेंडीच्या लागवडीसाठी व किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी जमीन तसेच कसदार व उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. भेंडी हे पीक रोग व किडीला लवकर बळी पडते म्हणून जमीन निचरा होणारी तसेच सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्ये भरपूर प्रमाण असणारी निवडावी. एकंदरीत जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असावा. पिकाच्या सुयोग्य वाढीसाठी संपूर्ण अन्नद्रव्याची गरज असते. म्हणून 6 ते 7 दरम्यान सामू असल्यास पिकांना अन्नद्रव्ये चांगली उपलब्ध होतात.
भेंडीचे सुधारित वाण
भेंडी पिकासाठी वाणाची निवड करताना वाणाचे उत्पादन, वाणाचा परिपक्व कालावधी, कीड व रोगास प्रतिकारक्षम, बाजारपेठेतील मागणी या बाबींचा विचार करून भेंडीच्या वाणाची निवड करावी.
भेंडी वाण- पुसा सावनी, परभणी क्रांती, फुले कीर्ती, नंदिनी, बीएसएस 893- त्रिवेणी, अंकुर– 40, अर्का अनामिका, आय. एच. आर.-2031, ऐश्वर्या, एन. ओ. एच. -15, ए. आर. ओ. एच.-9, ए. आर. ओ. एच. 10, ए. आर. ओ. एच. -113, ए. आर. ओ. एच.- 96, ए. आर. ओ. एच. -85, एन. एस. –810 (काबिनी), एन. एस. –801 (कपिला), एस.ओ.एच. –136 इ.
पूर्व मशागत
भेंडी हे महाराष्ट्रातील तिन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक असून त्यासाठी पूर्व मशागत चांगल्याप्रकारे करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य व सेंद्रिय खतांचा पुरवठा पिकांना सुलभरित्या प्राप्त होण्यास मदत होते. पीक लागवडीसाठी पेरणीपूर्वी जमीन तयार करण्यासाठी जी मशागत करावी लागते त्यास पूर्व मशागत असे म्हणतात.
पूर्व मशागतीच्या कामात प्रामुख्याने नांगरट करणे, ढेकळे फोडणे, जमीन सपाटीकरण करणे, कुळवणी करणे, वखरणी करणे, खत जमिनीत मिसळणे व जमीन दाबणे या कामांचा समावेश होतो. नांगर, ढेकळे फोडणारे यंत्र, तणांचा नांगर व कुळव, पासेचा कुळव, इत्यादी कृषी अवजारांनी ही कामे केली जातात.
सेंद्रिय खतांचा वापर
भेंडी पिकाच्या दर्जेदार व चांगल्या उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय खते किंवा भरखते म्हणून हेक्टरी 25 टन शेणखत टाकून मातीत एकत्र करुन घ्यावे किंवा कंपोस्ट खताचा, गांडूळ खताचा वापर करावा. भेंडी लागवडीपूर्वी तागाचे पीक घेऊन ते जमिनीत गाडून त्यावर भेंडी लागवड केली तर उत्पादन चांगले येण्यास मदत होते. म्हणून शक्य झाल्यास ताग किंवा धैंचा गाडून भेंडीची लागवड करावी. भेंडी पिकाला सेंद्रिय खतांचा जास्त पुरवठा असल्यास रोग–किर्डीचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनात निश्चित
वाढ होते.
लागवड हंगाम व अंतर
भेंडीची लागवड तीनही हंगामात करता येते. पावसाळी हंगामात भेंडीची लागवड जून–जुलै महिन्यात करावी तर रब्बीची लागवड थंडीच्या अगोदर तर उन्हाळी लागवड 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत करावी. भेंडीची उन्हाळी लागवड ही सर्वाधिक पैसा मिळवून देणारी असते असा आमचा अनुभव आहे. भेंडी लागवड हंगामाप्रमाणे अंतरे बदलतात. तरी यासाठी खालील तक्त्यात भेंडी लागवड हंगाम, कालावधी व अंतर याची माहिती
दिलेली आहे.
तक्ता क्र. 1 : भेंडी लागवड हंगाम, कालवधी व लागवडीचे अतंर
अ. क्र. |
हंगाम |
बी लागवडीचा काळ |
लागवड अंतर (सें.मी.) |
1) |
खरीप |
जून – जुलै |
60 X 30 सें. मी. 60 X 45 सें. मी. |
2) |
रब्बी |
थंडीच्या अगोदर, कोकणात सप्टेंबर, ऑक्टोबर |
45 X 15 सें. मी. 45 X 20 सें. मी. 60 X 20 सें. मी. |
3) |
उन्हाळी |
15 जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत |
45 X 15 सें. मी. 60 X 15 सें. मी. 60 X 20 सें. मी. |
हेक्टरी बियाणे
भेंडी पिकाच्या लागवडीसाठी सर्वसाधारणपणे बियाणे 8-10 किलो (खरीप) हंगामासाठी लागते, तर 10-15 किलो (उन्हाळी) बियाणे पुरेसे होते.
भेंडी लागवड पद्धती
खरीप हंगामातील दोन ओळीतील अथवा सरासरी अंतर 45 ते 70 सें. मी. आणि दोन रोपांतील अंतर 30 ते 45 सें. मी. ठेवावे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी दोन ओळींतील अंतर 45 ते 70 सें. मी. व दोन झाडातील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. पोयट्याच्या जमिनीत भेंडीची लागवड सपाट वाफ्यावर केली तरी चालते. जमिनीत ओलावा असतानाच लागवड करावी.
भेंडीची लागवड पाभरीने पेरुन किंवा टोकण पद्धतीने करावी. निश्चित केलेल्या अंतरावर 2 बिया 1 ते 2 सें. मी. खोलीवर टाकाव्या. बी उ वून पडल्यानंतर त्याची विरळणी करावी व ठराविक अंतरावर रोपे ठेवावी. पेरणी करुन लागवड करण्यासाठी बियाणे जास्त लागते. त्यामुळे उत्पादनखर्च वाढतो. त्यापेक्षा थोडी मजुरी जास्त जाईल पण बियाण्याची टोकण पद्धतीनेच लागवड करावी. अनेक शेतकरी एका जागी एकच बी देखील लावतात. असे जरी केले तरी चांगले उत्पादन येते. बी पेरुन लागवड करण्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे लागते. टोकण पद्धतीने मात्र बियाणे कमी लागते.
आंतरमशागत
मुख्य पिकाच्या दोन ओळी मध्ये केल्या जाणाऱ्या उदा. खुरपणी, कोळपणी, इ. कामास आंतरमशागत असे म्हणतात. भेंडीच्या योग्य वाढीसाठी व शाश्वत उत्पादनासाठी पीक सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी आंतरमशागत करावी लागते. खुरपणी, निंदणी, कोळपणी करणे, विरळणी करणे, नांगे भरणे, संजीवक फवारणे, आदी कामांचा समावेश आंतरमशागतीमध्ये होतो.
पाणी व्यवस्थापन
भेंडी पिकास पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून या पिकांसाठी एकूणच 8-10 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पाण्याची पाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे 4-5 दिवसांच्या अंतराने द्यावी. या पिकाला फांद्या फुटव्याच्या अवस्थेत, फळ लागण्याच्या अवस्थेत पाणी पिकांना द्यावे. पाण्याच्या
पाळ्या चुकवू नये. अन्यथा भेंडी पोचट राहून उत्पादनात घट येते.
भेंडी पिकाला : ठिबक सिंचन वरदान
भेंडी पिकात ठिबक सिंचनपद्धतीच्या वापरासाठी सर्वप्रथम शेतात 90 सें. मी. रूंदीच्या सऱ्या पाडाव्यात लागतात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस दोन ओळीत 45 सें.मी. अंतर राखून दोन रोपांमध्ये 7-8 सें.मी. अंतर ठेऊन भेंडी पिकाची लागवड करावी लागते असे केल्यास प्रचलित लागवड पद्धती एवढीच हेक्टरी रोपांची संख्या कायम राहील. भेंडी पिकाच्या दोन ओळीसाठी म्हणजेच सरीच्या वरंब्यावर एक उपनळी टाकावी लागते. मात्रा वरंब्याच्या टोकावरून उपनळी घसरू नये. म्हणून सुमारे 10-15 सें.मी. रूंदीचा वरंबा सपाट करावा लागते. त्यामुळे भेंडी पिकाच्या दोन्ही ओळीस पाणी समप्रमाणात मिळते. भेंडी पिकाच्या दोन ओळीसाठी एका उपनळीचा वापर करतांना दोन उपनळ्यांतील अंतर 90 सें.मी. तर जमिनीच्या प्रकारानुसार उपनळीवरील दोन तोट्यात 60-70 सें. मी. अंतर ठेवावे लागते. तोट्यांचा प्रति तास प्रवाह 4-8 लिटर असावा लागतो. भेंडीसाठी 8 लिटर प्रति तास प्रवाह असणाऱ्या तोट्या बसव्यात. प्रामुख्याने भेंडी पिकासाठी ‘ईनलाईन’ ठिबक सिंचनाचा वापर करावा. खरोखरच भेंडी पिकाला ठिबक सिंचन वरदानच आहे.
खत व्यवस्थापन
भेंडी पिकाची पेरणी करताना 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश प्रति एकर अथवा प्रति हेक्टरी द्यावे. कोरडवाहू भेंडी लागवडीसाठी 12.5 किलो नत्र व 25 किलो स्फुरद व बागायती भेंडीसाठी 25 किलो नत्र व 40 किलो स्फुरदाचा पुरवठा करणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने गरजेचे असते. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात 18.55 टक्के इतकी वाढ झाल्याचे अनेक
प्रयोगांती आढळून आले आहे. भेंडी पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर 10-15 दिवसांनी दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन
पिकाच्या योग्य वाढीसाठी रासायनिक खताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा होणे गरजेचे असते. भेंडी पीक 35-40 दिवसाचे झाल्यावर फेरस सल्फेट 1.5 किलो + झिंक सल्फेट 1.5 किलो बोरॅक्स 500 ग्रॅम + 4-5 लिंबाचा रस 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी याप्रमाणे 15-20 दिवसाच्या अंतराने पिकावर दोन फवारण्या कराव्यात. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट रोखता येते.
तणनियंत्रण
भेंडी पिकातील नियमित खुरपणी करून बागेतील तण काढून टाकावेत. खुरपणी करताना भेंडीच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही. पुनर्लागवड केलेल्या भेंडीमध्ये तणनाशक वापरताना त्यांचा पिकाशी संपर्क होऊ नये याची काळजी घ्यावी. पिकाची वेळेवर खुरपणी व तणनाशकाचा बंदोबस्त नाही केल्यास एकूण उत्पादनाच्या 30–40 टक्के घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
तण नियंत्रणासाठी आंतरमशागत करणे गरजेचे ठरते. तणांमध्ये काही तणे हंगामी म्हणजे त्या तणांचा कालावधी हा कमी असतो. काही वार्षिक व काही बहुवर्षीय (हरळी, लव्हाळ) अशा तणांचे नियंत्रण करणे कठीण जाते कारण या तणांचे बी वर्षानुवर्षे जमिनीत पडून राहतात त्यामुळे त्यांचा बदोबस्त करणे कठीण जाते. पीकसंरक्षणामध्ये तण नियंत्रण हे देखील महत्वाचे आहे.
तक्ता क्र.2 : भेंडी पिकासाठी वापरावयाचे तणनाशकाचे प्रकार व प्रमाण
अ. क्र. |
तणनाशकाचे नाव |
हेक्टरी ग्रॅममध्ये (क्रियाशील घटक) |
तणनाशकात क्रियाशील घटकांचे शेकडा प्रमाण |
हेक्टरी लागणारे व्यापारी औषध (ग्रॅम/मिली) |
1. |
पेन्डीमेथॅलीन |
750-1000 |
30 |
2500-3000 |
2. |
फलुक्लोरॅलीन |
750-1000 |
50 |
1500-2000 |
3. |
ॲलाक्लोर |
2000-2500 |
50 |
4000-5000 |
भेंडी तोडणी
भेंडी पिकाला जातीपरत्वे 35-40 दिवसात फुले येतात. फुले आल्यानंतर साधारण एका आठवड्यात म्हणजे 6-7 दिवसात फळे काढणीस येतात. जातीपरत्वे तसेच वातावरण व हंगामापरत्वे यात थोडा–फार फरक पडतो. भेंडीची योग्य वेळी काढणी फार महत्वाची असते. जर भेंडी योग्य वेळी काढली नाही तर ती काढणी योग्य राहात नाही व निबर होऊन जाते. भेंडीच्या क्षेत्रावर एक ते दोन दिवसाआड फळांची तोडणी करावी लागते. जातीनुसार मध्यम आकाराची कोवळी फळे तोडावी. स्थानिक बाजारपेठात तसेच शहरी भागात कोवळया भेडयांनाच जास्त मागणी असते.
उत्पादन
भेंडी पिकाचे सर्वसाधारण प्रतिहेक्टरी जातीपरत्वे 15 ते 25 टन उत्पादन येते. मात्र संकरित जातींची निवड, खताचा योग्य पुरवठा, अन्नद्रव्य, रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन ठेवल्यास भेंडी उत्पादन प्रति हेक्टरी 30 टन येऊ शकते.
अशाप्रकारे शेतकरी बंधूंनी दर्जेदार व किफायतशीर भेंडी पिकाचे उत्पादन घेण्यासाठी वरील तंत्राचा अवलंब करून भेंडी पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढवावी. याकरिता भेंडीचे सुधारित वाण वापरावे. भेंडीची लागवड सुधारित पद्धतीने करावी. भेंडीच्या बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा द्यावी. भेंडीवर आढळून येणाऱ्या कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. काढणी व विक्री व्यवस्थापन चांगले करावे. यामुळे नक्कीच या तंत्रचा अवलंब केल्यास निश्चितपणे भेंडीचे पीक
दर्जेदार व फायदेशीर उत्पादन घेता येऊ शकते.
संदर्भ
- सुधारित भेंडी लागवड तंत्रज्ञान, रवींद्र काटोले,गोडवा कृषि प्रकाशन, पुणे, पृ. 34–60
- होळकर सचिन (2008) : भेंडी
लागवड, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयानगर, पुणे, पृ. 5-55 - शिंदे जगन्नाथ (2015) : सुधारीत भेंडी लागवड, गोदावरी पब्लिकेशन, नाशिक,
पृ. 10- 69 - कृषि दैनंदिनी (2016) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी, पृ. 45
- http://agriplaza.in/leadyfinger.html
- http://agriplaza.in/okra-weeds.html
- www.vikaspedia.co.in
पॉप्युलर व उपयुक्त लेख
टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र
दर्जेदार आले उत्पादन तंत्रज्ञान
दर्जेदार चवळी – गवार उत्पादनाचे तंत्र
शेडनेटगृहातील ढोबळी मिरची लागवड तंत्र