मशरूम उत्पादन तंत्रज्ञान

अळिंबी (मशरूम) ही एक बुरशीजन्य हरितद्रव्यरहित वनस्पती असून निसर्गामध्ये अळिंबीच्या अनेक जाती प्रचलित आहे, त्या जातीपैकी काही थोड्या खाण्यायोग्य असून त्यांचीच लागवड करण्यात येते.

कृत्रिमरित्या वाढवलेली अळिंबी ही बिनविषारी असल्याने तिची लागवड करून खाण्यासाठी वापरणे धोक्याचे नाही. विपुल जीवनसत्त्वे, भरपूर प्रथिने, उच्च दर्जाची पौष्टिकता आणि विशिष्ट स्वाद यांमुळे मशरूमला भरपूर वाढती मागणी आहे. प्रामुख्याने थंड व आर्द्र हवामानात उत्पादन केल्या जाणाऱ्या मशरूमची लागवड आता इतर भागांतही आवश्यक परिस्थितीची निर्मिती करून केली जात आहे.

देशात जवळजवळ अंदाजे 70,000 टन मशरूमचे उत्पादन घेतले जाते. तामीळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तर-पूर्व राज्यांमध्ये बटन आणि धिंगरी मशरूम उत्पादन करतात. कमी कालावधीत अनेक पिके घेता येणाऱ्या, भरपूर उत्पादन देणाऱ्या, मशरूमची लागवड दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून स्त्रियांसाठी हे एक महत्त्वाचे उत्पादनाचे साधन ठरत आहे.

प्रस्तुत मशरूम उत्पादन तंत्रज्ञान या लेखात आपणास मशरूमचे महत्त्व व उपयोग माहिती होईल. मशरूमचे प्रकार व निवड त्यात युरोपियन अळिंबी किंवा बटन मशरूम, ऑइस्टर मशरूम किंवा धिंगरी अळिंबी हे असून भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी, बीज (स्पॉन) तयार करणे, पेंडा तयार करणे, अळिंबीची लागवड करण्यासाठी विशिष्ट पद्धती, दीर्घ मुदतीची पद्धत, कमी मुदतीची पद्धत, कंपोस्ट निर्जंतुकीकरण, आळिंबीची पेरणी (स्पॉनिंग), बटन अळिंबी पेरणीच्या (स्पॉनिंग), अळिंबीची निगा व काढणी, साठवण व प्रक्रिया आदी घटकांची माहिती होईल.

मशरूमचे महत्त्व व उपयोग :

मशरूमचा उपयोग भाजी म्हणून थोड्या प्रमाणावर होत असून वापर व लागवड यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असून ही प्राणिजन्य आणि वनस्पतिजन्य प्रथिनांच्यामधील वर्गात मानली जातात. यामध्ये विपुल प्रमाणात ब, क आणि ड जीवनसत्त्वे, अनेक जीवनावश्यक ॲमिनो आम्ले, तसेच खनिजद्रव्ये आहेत. मशरूममध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने रक्तक्षय असणाऱ्यांसाठी त्याचा चांगला उपयोग होतो.

पिष्टमय पदार्थ कमी प्रमाणात असल्याने मधुमेहाची व्याधी असलेल्या लोकांना अळिंबी हे उत्तम अन्न आहे. तसेच कमी उष्मांक असल्याने त्याचा उपयोग वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारात करू शकतात. 18 जीवनसत्त्व 12 ब हे भाज्यांमध्ये सहसा सापडत नाही, ते मशरूममध्ये आढळते. मशरूमचा उपयोग प्रक्रिया करून तसेच वाळवून किंवा डबाबंद करून करण्यात येतो आणि विविध प्रकारचे पदार्थ बनविता येतात; तसेच मशरूमच्या निर्यातीसही चांगला वाव आहे.

मशरूमचे प्रकार व निवड

खाण्यायोग्य मशरूमच्या अनेक जाती निसर्गात वाढत असल्या तरी फारच थोड्या जातींची व्यापारी तत्त्वावर यशस्वी लागवड केली जाते. यामध्ये बटन अळिंबी किंवा युरोपियन अळिंबी, ऑइस्टर किंवा धिंगरी अळिंबी आणि भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी असे तीन प्रकार प्रामुख्याने आढळतात. त्यांची नावे आणि वाढीसाठी योग्य तापमान खालीलप्रमाणे आहेत.

  1. युरोपियन अळिंबी किंवा बटन मशरूम – ॲगेरिकस बायस्पोरस् – 16-18° सेल्सिअस.
  2. ऑइस्टर मशरूम किंवा धिंगरी अळिंबी – प्लुरोटस स्पिसीज – 20-30° सेल्सिअस.
  3. भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी – व्हलवेरिएल्ला स्पिसीज – 30-40° सेल्सिअस.

यांपैकी बटन मशरूमला चागंली मागणी असून त्याला बाजारभावही अधिक मिळतो. वरील सर्वच प्रकारच्या अळिंबीची लागवड महाराष्ट्रात करता येते. यामध्ये धिंगरी मशरूमच्या प्लुरोटस सजोर काजू आणि भाताच्या काड्यांवर येणाऱ्या व्हलवेरिएला व्हिलुवालिया या प्रकारांची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येते आणि त्यांचे बीज उपलब्ध आहे.

बीज (स्पॉन) तयार करणे

मशरूम उत्पादनासाठी बीज (स्पॉन) योग्य जातीचे आणि ताजे असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम सोलन (हिमाचल प्रदेश) येथील मशरूम संशोधन प्रयोगशाळेत मशरूमचे उत्पादन करण्यात आले. आता देशाच्या विविध भागांत स्पॉन तयार करून मशरूम उत्पादकांना देण्यात येते. पुणे येथील कृषी महाविद्यालयात स्पॉनची निर्मिती करून देण्यात येते. कृषि विज्ञान केंद्रामार्फतही स्पॉनची निर्मिती करण्यात येते.

स्पॉनची निर्मिती आवश्यक शिफारस केलेल्या जातीची निवड करून निर्जंतूक वातावरणात प्रयोगशाळेत करावी लागते. स्पॉन गहू किंवा ज्वारीच्या दाण्यांवर वाढविण्यात येते. अशा प्रकारचे स्पॉन 500 मिली. दुधाच्या बाटल्यांमधून किंवा पॉली प्रॉपिलीनच्या पिशव्यांमधून पुणे येथील मशरूम योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळते. 200 – 250 ग्रॅम स्पॉन एका  बाटलीत येते व पूर्ण वाढ झालेले स्पॉन चांगली पांढरी चकाकी असलेले दिसते. या स्पॉनचा वापर मशरूमचे उत्पादन घेण्यासाठी करण्यात येतो.

पेंडा तयार करणे

अळिंबी कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर वाढते. बटन अळिंबी उत्पादनास सेंद्रिय पदार्थांचे कंपोस्ट (पेंडा) तयार करावे लागते. कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतामध्ये असलेल्या विविध टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून अळिंबीचे उच्च प्रतीचे माध्यम तयार करता येते.

कंपोस्ट तयार करण्याच्या दोन पद्धतींची शिफारस केली आहे. कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती अळिंबीची लागवड करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने केलेले कंपोस्ट वापरणे आवश्यक असते. हे कंपोस्ट दोन पद्धतीने करता येते.

अ) दीर्घ मुदतीची पद्धत,

ब) कमी मुदतीची पद्धत.

(1) दीर्घ मुदतीची पद्धत : या पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यास सुमारे 28 ते 30 दिवस लागतात यासाठी फळयांचा सांगाडा लागतो. शिवाय 25 ते 30 ट्रे किंवा पिशव्या भरण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य लागते.

तक्ता क्र. 1 : दीर्घ मुदतीची कंपोष्ट तयार करण्याची पद्धत

अ.क्र.

कंपोष्ट साहित्य

प्रमाण

वापरण्याचे औषध

प्रमाण

1

गव्हाचे काड

300 किलो

सल्फेट ऑफ पोटॅश

3 किलो

2

गव्हाचा कोंडा

30 किलो

सुपर फॉस्फेट

3 किलो

3

गव्हाचा कोंडा

30 किलो

सुपर फॉस्फेट

3 किलो

4

युरिया

3.6 किलो

फॉलिडॉल डस्ट (2%)

1 किलो

वरील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे 300 किलो गव्हाचे काड घेऊन त्याचे 5-6 इंच लांबीचे तुकडे करावेत. ते भरपूर पाणी शिंपडून भिजवावे व तसेच 48 तास ते काड ढीग करून ठेवावे. ते कोरडे झाल्यास त्यावर वरचेवर पाणी शिंपडावे. काड भिजल्यानंतर 24 तासांनी अमोनियम सल्फेट, युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश व गव्हाचा कोंडा, इत्यादी साहित्य वरील तक्त्यात दिलेल्या प्रमाणात एकत्र करून त्यामध्ये पाणी शिंपडून मिसळावे. असे भिजविलेले काड व खताचे मिश्रण एकमेकांत चांगले मिसळून त्याचा सुमारे 1.8 मी. लांब X 1.5 मी. रुंद X 1.5 मी. उंच आकाराचा ढीग तयार करावा. ढीग पायांनी तुडवून घट्ट करावा. दुसऱ्या दिवशी त्याचे 650 ते 70° सेल्सिअस इतके तापमान यायला पाहिजे.

6 व्या दिवशी : ढिगाची पहिली उलथापालथ करून जागा बदलून लाकडी फळ्यांच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी ढीग करावा. या वेळी ढीग सैल ठेवून हवा खेळती ठेवावी.

10 व्या दिवशी : ढिगाची दुसरी उलथापालथ करावी. कोरड्या पडलेल्या भागावर जरुरीप्रमाणे पाणी शिंपडावे.

13 व्या दिवशी : ढिगाची तिसरी उलथापालथ करताना 30 किलो जिप्सम मिसळावे. तसेच ढीग करताना किंचितसा दाबावा.

16 व्या दिवशी : ढिगाची चौथी उलथापालथ करावी. ढीग करताना थोडासा दाब द्यावा.

19 व्या दिवशी : ढिगाची पाचवी उलथापालथ करावी. या वेळी ढीगावर दाब देऊ नये.

22 व्या दिवशी : ढिगाची सहावी उलथापालथ करावी. या वेळी जरुरीप्रमाणे पाणी घालावे.

25 व्या दिवशी : ढिगाची सातवी उलथापालथ करताना कंपोस्ट मोकळेपणाने जमिनीवर थोडा वेळ पसरून ठेवावे. नंतर त्याचा ढीग करावा.

28 व्या दिवशी : ढीग फोडून त्यामध्ये दोन टक्के फॉलिडॉलची भुकटी मिसळावी. या वेळेपर्यंत कंपोस्ट चांगले कुजावयास हवे. नसल्यास आणखी एक उलथापालथ करावी. अशा रितीने तयार झालेले कंपोस्ट गर्द तपकिरी रंगाचे असते. असे कंपोस्ट चिकट असू नये, त्यास अमोनियाचा वाससुद्धा येऊ नये. त्यामध्ये आर्द्रता 65-70 टक्के असावयास हवी. तसेच त्याचा पीएच (सामू) 7 ते 8 निर्देशांकापर्यंत हवा. हे कंपोस्ट 25 ट्रे भरण्यास पुरेसे होते. या पद्धतीने केलेले कंपोस्ट निर्जंतूक करण्याची गरज नसते.

(आ) कमी मुदतीची पद्धत : या पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यास फक्त 16 ते 18 दिवस लागतात. त्यासाठी
खालीलप्रमाणे साहित्य लागते. (
25 ते 30 ट्रे करिता)

तक्ता क्र. 2 : कमी मुदतीची कंपोष्ट तयार करण्याची पद्धत

अ.क्र.

कंपोष्ट साहित्य

प्रमाण

1

गव्हाचे काड

300 किलो

2

गव्हाचा कोंडा

22.6 किलो

3

युरिया

4.5 किलो

4

कोंबडीचे खत

120 किलो

5

जिप्सम

9 किलो

6

फॉलिडॉल डस्ट (2%)

1 किलो

या पद्धतीतसुद्धा काडाचे 5-6 इंच लांबीचे तुकडे करून त्यावर भरपूर पाणी शिंपडावे. कंपोस्ट शेडमधील फरशीवर 48 तास पसरावे. जरूर वाटल्यास अधूनमधून त्यावर पाणी शिंपडावे.

1 ला दिवशी : 48 तासानंतर या काडात कोंबडीचे खत 120 किलो, गव्हाचा कोंडा 22.6 किलो व युरिया 4.5 किलो एकत्र करून त्यांचे चांगले मिश्रण करावे आणि वरीलप्रमाणे 1.8 मी. लांब, 1.5 मी. रुंद व 1.5 मी. उंच ढीग लाकडी फळ्यांच्या साहाय्याने करावा. हा ढीग तुडवून घट्ट करावा.

2 रा दिवशी : ढिगाची पहिली उलथापालथ करावी.

4 था दिवशी : ढिगाची दुसरी उलथापालथ करावी. यावेळी ढीग करताना त्यामध्ये 9 किलो जिप्सम मिसळावे. पण ढीग तुडवू नये.

6 व्या दिवशी : ढिगाची तिसरी उलथापालथ करावी.

8 व्या दिवशी : ढिगाची चौथी उलथापालथ करावी.

10 व्या दिवशी : ढिगाची पाचवी उलथापालथ करावी.

12 व्या दिवशी : ढिगाची सहावी उलथापालथ करावी.

या मुदतीत खत कुजले नाही तर चौदाव्या दिवशी ढिगाची आणखी एक उलथापालथ करावी. ढिगाची उलथापालथ करताना पहिल्या ढिगाचा मधला भाग दुसऱ्या वेळेस तळाला व वरचा आणि बाजूचा भाग मध्यभागी येईल याची काळजी घ्यावी. तसेच खत चांगले हलवून थोडा वेळ पसरून ठेवावे, म्हणजे त्यामधील जादा अमोनिया निघून जाईल.

कंपोस्टचे तापमान 80° सेल्सिअसपर्यंत जाते. ढिगाच्या तापमानाची नोंद ठेवावी. ट्रेमध्ये कंपोस्ट भरताना त्यामध्ये 60 ते 70 टक्के पाणी असावे. योग्य तापमान न आल्यास एकतर काडामध्ये पाणी जास्त असते त्यामुळे हवेचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा वेळी ढीग फोडून पसरून ठेवावा व पुन्हा योग्य प्रकारे ढीग करावा.

कंपोस्ट ट्रेमध्ये भरताना त्यामध्ये 2.2 ते 2.3 टक्के नत्र असावे. कंपोस्ट ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ट्रे 5 टक्के कॉपर सल्फेटच्या द्रावणाने निर्जंतूक करावेत. तसेच कंपोस्टमध्ये एक किलो फॉलिडॉल डस्ट मिसळावी. कंपोस्टचे मोठे गठे फोडून बारीक करावेत. ट्रे पूर्ण भरून हलक्या हाताने दाबावेत.

कंपोस्ट निर्जंतुकीकरण : दीर्घ मुदतीच्या पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट निर्जंतूक केले नाही तरी चालते; परंतु कमी मुदतीच्या पद्धतीने केलेले कंपोस्ट निर्जंतूक करणे आवश्यक असते. त्यासाठी बॉयलरचा उपयोग करणे आवश्यक असते. कंपोस्ट ट्रेमध्ये सैलसर भरून एकावर एक असे सहा ट्रे ठेवता येतात. दोन ट्रेमध्ये किमान 10 सेंमी. तसेच भिंतीच्या बाजूने 30 सेंमी. व मध्यभागी 75 सेंमी. मोकळी जागा ठेवून ट्रे एकमेकांवर पद्धतशीर रचावेत.

खोलीमध्ये ट्रे रचताना कंपोस्ट थंड होऊ नये म्हणून हीटरच्या साहाय्याने खोली उबदार ठेवावी. खोली शक्यतो हवाबंद करून खोलीमध्ये हळूहळू पाण्याची उष्ण वाफ सोडावी. कंपोस्टचे तापमान 550 ते 60° सेल्सिअस गेल्यानंतर ते किमान 6 ते 8 तास स्थिर राहील याची दक्षता घ्यावी. त्यानंतर तापमान कमी करावे. निर्जंतुकीकरण
चालू असताना शुद्ध हवेचा पुरवठा होण्यासाठी मधूनच दारे खिडक्या अल्प काळ उघडाव्यात. त्यानंतर दारे व खिडक्या उघडून कंपोस्टचे तापमान
24° सेल्सिअसपर्यंत आणावे. या वेळी कंपोस्टमध्ये 67 ते 70 टक्के पाणी असावे. नंतर हे ट्रे स्पॉन रनिंग खोलीमध्ये ठेवावेत.

आळिंबीची पेरणी (स्पॉनिंग)

स्पॉन म्हणजे अळिंबीचे बी. हे स्पॉन प्रयोगशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यात येते. दर्जेदार आणि उत्पादनशील स्पॉन हे खात्रीलायक ठिकाणाहूनच घ्यावे. गहू किंवा ज्वारीच्या ओलसर व निर्जंतूक दाण्यावर वाढविलेले असे स्पॉन 500 मिली. दुधाच्या बाटल्यांतून किंवा पॉलीप्रॉपिलीनच्या पिशव्यांतून अळिंबी सुधार योजना, कृषि महाविद्यालय, पुणे 411005 यांच्याकडे किंवा काही खाजगी प्रयोगशाळेत स्पॉन मिळते. परंतु त्यांच्या गुणवत्तेची खात्री करूनच खरेदीचा निर्णय घ्यावा. प्रत्येक पिशवीत अंदाजे 200 ते 250 ग्रॅम बी असते, पूर्ण वाढलेले स्पॉन शुभ्र व तजेलदार दिसते.

बटन अळिंबी पेरणीच्या (स्पॉनिंग) तीन पद्धती आहेत.

  1. पहिल्या पद्धतीने ट्रेमधील 3-5 सेंमी. कंपोस्टचा वरचा थर बाजूस करून संपूर्ण ट्रेवर स्पॉन पसरतात आणि ते कंपोस्टने झाकून टाकतात.
  2. दुसऱ्या प्रकारामध्ये स्पॉनची दोन थरांमध्ये पेरणी करतात.
  3. तिसऱ्या पद्धतीमध्ये कंपोस्टमध्ये पूर्णपणे स्पॉन मिसळतात. 100 X 50 X 18 सेंमी. आकाराच्या एक ट्रेसाठी एक पिशवी स्पॉन (200 ते 250 ग्रॅम) पुरेसे होते.

स्पॉनची पेरणी केल्यानंतर कंपोस्ट हलकेसे दाबून त्यावर निर्जंतूक केलेला वर्तमानपत्राचा कागद झाकावा. हे कागद ओलसर राहतील अशा बेताने दिवसातून एक किंवा दोन वेळा त्यावर पाण्याचा हलका फवारा मारावा.

खोलीचे तापमान 20° ते 250 सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण 70 ते 80 टक्के ठेवावे. पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कंपोस्टवर बुरशीची पांढरी शुभ्र वाढ होऊन कंपोस्टचा रंग तपकिरी दिसू लागतो.

केसिंग करणे अळिंबीच्या बुरशीची वाढ पूर्ण झाल्यावर कंपोस्टवरील कागद काढून त्यावर निर्जंतूक केलेली माती, खत व वाळू 1 : 1 : 1 या प्रमाणात मिसळून 2.5 ते 3 सेंमी. जाडीचा थर देण्यासाठी वापरावे. यालाच केसिंग असे म्हणतात.

हे मिश्रण वापरण्यापूर्वी वाफेच्या साहाय्याने 60° सेल्सिअस तापमानास 4 तास ठेवावे, 2 टक्के फॉरमॅलिन वापरावे. त्यासाठी 3 लीटर 40 टक्के फॉरमॅलिन 40 लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाचा उपयोग करावा. केसिंगसाठी वापरावयाची माती भुसभुशीत असावी. त्यामुळे हवा खेळती राहते. मातीचा पीएच 7-8 निर्देशांकाच्या दरम्यान असावा.

केसिंग केल्यानंतर 5-7 दिवस खोलीतील तापमान 23° ते 24° सेल्सिअस व आर्द्रता 70 ते 80 टक्के ठेवावी. केसिंगवर दिवसातून एकदा पाणी फवारून ते ओलसर ठेवावे. त्यानंतर मात्र खोलीचे तापमान 16° ते 18° सेल्सिअस व आर्द्रता 80 टक्के ठेवणे जरूर असते. पण या काळात शुद्ध हवेची गरज कमी प्रमाणात असते.

अळिंबीची निगा व काढणी

केसिंग केल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी लहान लहान अळिंबी दिसू लागतात. या काळात शुद्ध हवेचा भरपूर पुरवठा करावा. तसेच खोलीत कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण 0.1 टक्कयाचे आत ठेवावे. खोलीमध्ये हवा व ट्रेचे क्षेत्रफळ यांचे प्रमाण 6 : 1 असे ठेवावे लागते. खोलीचे तापमान 16° ते 18° सेल्सिअस व आर्द्रता 80 ते 90 टक्के ठेवावी. यावेळी जादा पाण्याची गरज असते.

बटन अळिंबीच्या टोपीखालच्या भागावरील पापुद्रा कालांतराने फाटतो व ती छत्रीप्रमाणे उघडलेली अळिंबी खाण्यायोग्य असली तरी अशा अळिंबीस बाजारात मागणी नसते. पाण्याची फवारणी करण्यापूर्वी देठ पिळून अळिंबी काढावी. मुळाचा भाग चाकूने कापून अळिंबी स्वच्छ करावी. सामान्यत: 200 ग्रॅम स्वच्छ केलेली अळिंबी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुणवत्ते प्रमाणे भरतात.

अळिंबीचे पहिले पीक निघाल्यानंतर केसिंगमधील पडलेले खड्डे निर्जंतूक केलेल्या मातीने भरून काढावेत. तसेच त्यापूर्वी जर अळिंबीचे काही बुडखे केसिंगमध्ये राहिले असतील तर तेही काढून टाकावेत. साधारणपणे पहिले पीक निघाल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी अळिंबीचे दुसरे पीक मिळते. या अळिंबीच्या पिकाचा पूर्ण कालावधी 45 ते 60 दिवासपर्यंत राहतो.

अळिंबीचे उत्पन्न अनेक बाबींवर अवलंबून असते. उत्तम प्रतीचे कंपोस्ट, अनुकूल तामपान व आर्द्रता, उच्च दर्जाचे स्पॉन वापरल्यास दर चौ. मी. ला. 60 दिवसांत 5 ते 6 किलो अळिंबीचे उत्पन्न मिळते. अळिंबी काढल्यानंतर ती शक्य तितक्या लवकर विक्रीसाठी पाठवावी. सर्वसाधारण तापमान म्हणजे 25° सेल्सिअसला अळिंबी 24 तास चांगल्या स्थितीत राहू शकते. रेफ्रिजरेटरमध्ये दोन ते तीन दिवस टिकू शकते. ही अळिंबी 2 टक्के मिठाच्या द्रावणात हवाबंद डब्यात साठविता येते.

अळिंबीचे पीक संपल्यानंतर ट्रेमधील कंपोस्ट दूर खड्डयात टाकून फॉरमॅलीन अथवा कॉपर सल्फेटच्या द्रावणाने ट्रे निर्जंतूक करावेत. म्हणजे नंतर घेतल्या जाणाऱ्या पिकास रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संपूर्ण वर्षात अळिंबीची चार पिके घेता येतात. उत्तम व्यवस्थापन केल्यास अळिंबीची पाच पिके घेणे शक्य आहे.

साठवण व प्रक्रिया

केसिंग केल्यापासून साधारणपणे 15-16 व्या दिवशी अळिंबी काढण्यास योग्य होतात. त्यानंतर सतत 60 दिवस
अळिंबीची काढणी करता येते. अळिंबीची विक्री काढल्यावर शक्यतो लवकर करावी. मिठाच्या व सायट्रिक अॅसिडच्या द्रावणात मशरूम हवाबंद डब्यात भरता येतात. भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी उन्हात ठेवून दोन दिवसांत सहजरित्या वाळविता येते व वाळविलेल्या अळिंबीची विक्री करता येते
.

मशरूमचे विविध खाद्यपदार्थ बनविता येतात. यासाठी ताज्या किंवा वाळवलेल्या मशरूमचा किंवा डबाबंद मशरूमचा वापर करता येतो. आणि विविध प्रकारे याचा वापर आहारात करता येतो.

अशाप्रकारे आपणास मशरूम उत्पादन तंत्रज्ञान या लेखामध्ये मशरूम उत्पादनाची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. त्यामुळे सदर माहितीचा उपयोग करून दर्जेदार व किफायतशीर मशरूम उत्पादन घ्यावे.  

विशेष संदर्भ :

  1. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-2 : पाठ्यपुस्तिका-2, पृ.क्र. 53-69
  2. ई-बुक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  3. https://ycmou.ac.in/ebooks

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन: https://www.agrimoderntech.in/

मशरूम उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. 

पॉप्युलर लेख

अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्र

आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड

उद्योजकता विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सबलीकरण

कोरडवाहू शेती- Dryland Farming

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्र

बांबू लागवड- Bamboo lagwad

बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

स्ट्रॉबेरी पीक व्यवस्थापन

Prajwal Digital

Leave a Reply