फुलांचे पॅकिंग व वाहतूक व्यवस्थापन

धार्मिक कार्यक्रमात आणि लग्नसमारंभात फुलांचा वापर वाढत आहे. मात्र फुलांचे पॅकिंग व वाहतूक व्यवस्थापन यावर फुल उत्पादक शेतकरी फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कमी दर्जाचे व कमी गुणवत्तेचे फुले मिळतात. परिणामी त्या फुलांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

राज्यात फुलांचा व्यापार करणारे लोक बहुतांशी मोठमोठ्या शहरांत विखुरलेले आहेत. ज्या ठिकाणी फुलांचे उत्पादन होते, त्या ठिकाणी त्यांचा वापर फारच कमी प्रमाणात म्हणजे 1 ते 2 टक्के एवढा होतो. आज महाराष्ट्रात फुलांचे व्यापारी उत्पादन शहराच्या जवळपासच्या भागात वाढत आहे.  

उच्च प्रतीच्या दिखाऊ आणि सुंदर फुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होते. परंतु फुलांचे पॅकिंग शेतकऱ्यांकडून योग्य प्रकारे होत नाही. सर्वसाधारणपणे फुलांच्या जुड्या बांधून फुले बाजारपेठेत आणली जातात.

शेवंती व ग्लॅडिओलस या फुलझाडांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत असून अनेक फुलझाडांच्या भरपूर उत्पादन देणाऱ्या नवीन जाती आज उपलब्ध होत आहेत. परंतु आपल्याकडे सर्व प्रकारच्या फुलांची वाहतूक गोणपाटाच्या पिशव्यांमधून किंवा बांबूच्या पाट्या आणि करंड्यांमधून होत असते. त्यामुळे फुलांची प्रत खराब होते. पारंपारिक पॅकिंगऐवजी आधुनिक पॅकिंग पद्धतींचा वापर केल्यास फुलांचे वाहतुकीत होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.

प्रस्तुत फुलांचे पॅकिंग व वाहतूक व्यवस्थापन या लेखाद्वारे आपल्याला फुलांचे पॅकिंग का करावे हे समजेल. फुले पॅकिंग करण्याच्या पारंपरिक आणि सुधारित पद्धतींची माहिती होईल. फुलांच्या पॅकिंगचे प्रकार माहीत होतील. फुलांची पॅकिंग व वाहतूक केल्यामुळे होणारे फायदे जाणून घेता येईल. त्यानुसार आपणास फुलांचे योग्य पद्धतीने पॅकिंग व वाहतूक करणे शक्य होईल. याबाबतची सविस्तर माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.

फुलांचे पॅकिंग करण्याच्या पारंपरिक पद्धती

आपल्याकडे सध्या फुले बाजारपेठेत पाठविताना पुढील साधनांचा वापर करतात : (1) बांबूच्या पाट्या व करड्या, (2) गोणपाटाच्या पिशव्या, (3) फुलांच्या जुड्या बांधून.

फुले ही नाजूक आणि नाशवंत असल्यामुळे त्यांचे हळूवारपणे पॅकिंग करणे महत्त्वाचे असते. बांबूच्या पाट्या आणि करंड्यांमध्ये फुले भरण्यापूर्वी पाट्यांना अथवा करंड्यांच्या तळाशी झाडाच्या पानांचा किंवा कागदाच्या तुकड्यांचा थर देऊन फुले भरतात. झेंडू, गेलार्डिया ही फुले गोणपाटाच्या पिशव्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठविली जातात. या प्रकारच्या पॅकिंगमध्ये फुलांभोवती हवा खेळती राहत नाही. वाहतुकीत फुलांचा टवटवीतपणा तसेच कोवळेपणा कमी होतो. फुलांच्या कळ्यांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. फुलांना इजा झाल्यामुळे इथिलीन वायूची निर्मिती वाढून फुले लवकर खराब होतात.

फुलांचे पॅकिंग करण्याच्या सुधारित पद्धती

गुलाब, निशिगंध, अॅस्टर, झेंडू, जाई, जुई, मोगरा, इत्यादी फुलांचा हारांसाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी, लग्नाच्या सजावटीत आणि इतर कार्यक्रमांसाठी वापर होतो. ग्लॅडिओलसचा वापरदेखील वरील गोष्टींसाठी होतो. यांतील काही फुलांची काढणी 3045 सेंटिमीटर लांब दांडी ठेवून करतात. अशा प्रकारच्या लांब दांड्यांच्या फुलांचे पॅकिंग गोणपाटाच्या पिशव्यांत अथवा बांबूच्या करंड्यांमध्ये करता येत नाही. या फुलांच्या पॅकिंगसाठी कागदी पेट्यांचा अथवा बॉक्सेसचा वापर केला जातो. अलीकडच्या काळात पॅकिंगचे निरनिराळे सुधारित प्रकार विकसित करण्यात आले आहेत.

(1) कागदी पेट्या (कोरुगेटेड बॉक्सेस) : या कागदी पेट्यांचे पुढे ठरावीक जाडीच्या कागदांचे एकावर एक 2 पासून 7 पर्यंत थर देऊन तयार केले जातात. यांतील सर्वांत बाहेरच्या कागदाच्या सपाट थराला बाह्य लायनर असे म्हणतात. तर सर्वांत आतील कागदाच्या सपाट थराला अंतर्गत लायनर असे म्हणतात. या दोन थरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या थराला नागमोडी वळणे दिली जातात. अशा नागमोडी वळणे असलेल्या कागदाच्या थराला कोरुगेटेड थरअथवा फ्ल्युटिंग असे म्हणतात. फ्ल्युटिंगचे एकेरी, दुहेरी आणि तिहेरी असे प्रकार आहेत.

फ्ल्युटिंगच्या दोन थरांमध्ये कमी जाडीच्या कागदाचा थर टाकतात. या कोरुगेटेड कागदाच्या पेट्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी ठरावीक व्यासाची छिद्रे ठेवलेली असतात. अशा प्रकारचे कोरुगेटेड कागदाचे बॉक्सेस फुलांच्या पॅकिंगसाठी उत्कृष्ट समजले जातात. या पेट्या वाहतुकीत एकावर एक रचता येतात. या पेट्यांमध्ये फुले जास्त काळ चांगल्या स्थितीत राहतात.

(2) पॉलिथीन शीट किंवा कागद (Polyethylene sheet or paper) : या शीटचा उपयोग   अस्तर म्हणून केला जातो. त्यामुळे फुलांभोवती आर्द्रता राखली जाऊन फुलांचे आयुष्य वाढते.

(3) पॉलिथीन पिशव्या (Polyethylene bags) : फुलांच्या पॅकिंगसाठी पॉलिथीन पिशव्यांचा वापर केला जातो. या पिशव्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पिशव्यांना लहान आकाराची छिद्रे पाडतात.

(4) प्लास्टिक क्रेट/ खोकी (Plastic crate / box) : हल्ली बाजारात निरनिराळ्या आकाराचे प्लास्टिकचे क्रेट्स् किंवा खोकी मिळतात. ही खोकी मजबूत असून त्यांना जास्तीत जास्त छिद्रे असतात. वाहतुकीत ही खोकी एकावर एक उत्तम प्रकारे रचता येतात.

फुलांचे पॅकिंग करण्याची आधुनिक पद्धती

आधुनिक पद्धतीने फुलांचे पॅकिंग 3 टप्प्यांत करतात : (1) जुडी बांधणे, (2) कागद किंवा पॉलिथीन गुंडाळणे, (3) पॅकिंग करणे.

(1) जुडी बांधणे (Judy tying) : फुलांची प्रत्येक जुडी ठरावीक संख्या व ठरलेल्या प्रतवारीप्रमाणेच बांधतात. सर्वसाधारणपणे गुलाबामध्ये 10, 12, 25 किंवा 50 फुलांची जुडी बांधतात. ग्लॅडिओलसच्या 50 ते 100 तुऱ्यांची जुडी बांधतात. कार्नेशनमध्ये 25 फुलांची एक जुडी बांधतात. निशिगंधामध्ये 100 फुलांची जुडी बांधतात. अॅस्टरच्या 4, 6, 9, 12 अशा फुलांच्या जुड्या बांधतात. फुलांची जुडी बांधताना पाने, फुले यांचे नुकसान होणार नाही अशा रितीने फुले एकत्रित बांधावीत. दांडीचा बुडख्याचा भाग रबर बॅण्डचा वापर करून घट्ट बांधावा.

(2) कागद/ पॉलिथीन गुंडाळणे (Paper / polyethylene wrapping) : फुलांच्या जुड्या बांधल्यावर त्यांचे पॅकिंग करण्यापूर्वी दांड्याचा खालचा भाग ओल्या टिश्यू पेपरमध्ये अथवा वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळतात. त्यानंतर फुलांचे पूर्ण बंडल टिश्यू पेपरमध्ये अथवा पॉलिथीन कागदामध्ये गुंडाळतात.

(3) पॅकिंग करणे (Packing) : सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या
कार्डबोर्डच्या पेट्या किंवा खोकी उपलब्ध आहेत. फुले निर्यात करणारे देश स्वतःच्या ठरलेल्या प्रतीनुसार फुले पॅकिंग करून पाठवितात. बहुतेक सर्व फुले खालील प्रकारच्या आकर्षक कार्डबोर्डच्या पेट्यांत पाठवितात.

तक्ता 1 : फुलांच्या पॅकिंगसाठी वापरावयाच्या आकारांच्या कार्डबोर्डच्या पेट्या

अ. क्र.

पेट्यांचे प्रकार

लांबी (सेंमी.)

रुंदी (सेंमी.)

उंची (सेंमी.)

1

पेटी-A

100

40

10

2

पेटी-B

100

40

14

3

पेटी-C

100

40

19

4

पेटी-D

100

40

25

फुलांची ठेवण आणि पॅकिंग (Flower placement and packing)

फुलांच्या साठवणीत शीतगृहातील वातावरणाचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता महत्त्वाची असते त्याचप्रमाणे पॅकिंगमध्येही पेटीतील हवा खेळती राहणे, योग्य तापमान आणि सापेक्ष आर्द्रता असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी पॅकिंगमध्ये फुलांची ठेवण व्यवस्थित असावी. खेळत्या हवेमुळे फुलांच्या श्वासोच्छ्वासावाटे बाहेर पडलेली उष्णता आणि तयार झालेला इथिलीन वायू पेटीबाहेर टाकला जातो.

यासाठी पॅकिंगमध्ये फुलांची ठेवण योग्य प्रकारे करून फुलांच्या थरावर खेळती हवा राहून, उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्यावी. फुलांच्या जुड्या टिश्यू पेपरमध्ये अथवा पॉलिथीन कागदामध्ये गुंडाळल्यानंतर कार्डबोर्ड पेट्यांमध्ये व्यवस्थित ठेवतात. फुलांच्या प्रकारानुसार फुले पेट्यांमध्ये ठेवण्याची पद्धत वेगवेगळी असते.

पॅकिंगवर कंपनी, फर्मचे नाव, फुलांची प्रत, पॅकिंग यांची माहिती असावी. कागद गुंडाळून ठेवलेली फुले काळजीपूर्वक पेट्यांमध्ये ठेवावीत. परंतु फुले पेट्यांमध्ये ठेवताना फुलांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहतुकीत पॅकिंगमध्ये फुले हलू नयेत यासाठी रबर बॅण्डचा वापर करून किंवा लाकडी ठोकळे वापरून किंवा प्लास्टिक खोचीत जुडी अडकवून ठेवणे आवश्यक असते.

गुलाबासारखी नाजूक फुले हाताळण्यासाठी पेटीच्या दोन्ही बाजूस 2-3 सेंटिमीटर जाडीचा लाकडी भुशाचा थर किंवा कागदी तुकड्यांचा थर द्यावा आणि त्यावर फुले ठेवावीत. अशा पेट्यांना पॉलिस्टिरीन, वर्तमानपत्राचे कागद किंवा फोम प्लास्टिकचा आवरण म्हणून वापर करावा. त्यामुळे बाहेरील उष्णता पेटीतील फुलांपर्यंत वाहून नेली जात नाही आणि फुलांचे तापमान कमी राखण्यास मदत होते.

उन्हाळ्यात इतर देशांत निर्यातदार शेतकरी अतिथंड (18 अंश सेल्सिअस) द्रव्याच्या प्लास्टिक बाटल्या कार्डबोर्डच्या पेटीत ठेवतात; त्यामुळे वाहतुकीत पेटीचे तापमान वाढत नाही, आणि फुलांची गुणवत्ता व दर्जा उत्तम राखली जाते.

फुलांची वाहतूक (Transportation of flowers)

फुलांची वाहतूक कशा प्रकारे करावी हे बाजारपेठांच्या अंतरावर अवलंबून असते. दूरच्या बाजारपेठांत फुले पाठविताना फुलांची सर्व प्रकारे काळजी घेणे आवश्यक ठरते. आपल्याकडे फुले मुख्यतः ट्रकमधूनच मुंबई, पुणे ह्या बाजारपेठांत पाठवितात. परदेशात मात्र फुले विमानाने तसेच समुद्रमार्गाने पाठविली जातात.

भारतीय कृषि अनुसंधान संस्था (ICAR), नवी दिल्ली यांनी राज्य विपणन महामंडळाच्या साहाय्याने प्रथम विमानाने गुलाबाची फुले पॅरिस, रॉस्टरडॅम, फ्रँकफर्ट येथे 1969 साली निर्यात करून भारतात फुले निर्यातीचा पाया घातला.

पुण्यातील ओरिएन्टल फ्लोराटेक ह्या संस्थेने गुलाबाचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर सुरू केले. त्यांची फुले पुण्याहून मुंबईला शीतवाहनांतून पाठविली जातात आणि तेथून हॉलंडला विक्रीसाठी विमानाने पाठवितात. अशा प्रकारे आता एकूण 50 विविध फुल उत्पादक कंपन्यांची फुले देशभरातून हॉलंड, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, इत्यादी देशांत निर्यात होत
आहेत.

परदेशी बाजारपेठेसाठी फुलांची वाहतूक मुख्यतः विमानानेच होते. मदुराई व कोईमतूर येथून नियमितपणे विमानाने मोगऱ्याची फुले बंगलोर, मुंबई व कोचीनला पाठवितात. बंगलोरहून शेवंतीची फुले विमानाने मुंबई, कलकत्ता व हैद्राबादला पाठवितात. कलिम्पांगची ग्लॅडिओलसची फुले कोलकात्याहून दिल्लीला पाठवितात.

फुलांचे पॅकिंग व वाहतूक केल्यामुळे होणारे फायदे :

 1. फुल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांचे पॅकिंग व वाहतूक योग्य पद्धतीने केल्यास खालील प्रमाणे फायदे होऊ शकतात.
 2. फुलांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राखली जाते.
 3. फुलांची पॅकिंग योग्य केल्यामुळे ग्राहक फुलांना जास्त पसंती देतात.
 4. ग्राहकांना उच्च दर्जाचे फुले मिळतात.
 5. बाजारात फुलांना योग्य दर मिळतो.
 6. फुले वाहतूकीत खराब होत नाहीत.
 7. फुल उत्पादक शेतकऱ्यांचे पॅकिंग अभावामुळे होणारे नुकसान टाळता येते.
 8. फुलांपासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा कमावता येतो.

फुलांचे पॅकिंग व वाहतूक व्यवस्थापन हा लेख महाराष्ट्रातील तमाम फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व उपयुक्त माहिती देणारा आहे. ज्यामुळे फुलांची पॅकिंग करणे सोयीस्कर तसेच फुलांचे वाहतुकीचे नियोजन करणे शेतकरी बांधवांना सुलभ होईल. हा हेतू महत्त्वाचा असल्यामुळे लेखकांनी प्रस्तुत लेख तयार केलेला आहे. यामुळे आपण प्रस्तुत लेखाच्या आधारे फुलांचे पॅकिंग व वाहतूकीचे नियोजन करावे.  

विशेष संदर्भ :

 1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका – 1 : 68-77
 2. https://www.agrowon.com/
 3. कृषि दैनंदिनी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
 4. ई-बुक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
 5. कृषि दैनंदिनी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
 6. https://ycmou.ac.in/ebooks
 7. कृषि दैनंदिनी : बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

फुलशेती इतर लेख

गुलाब प्रक्रिया

गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांची परिपक्वता

फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

Prajwal Digital

Leave a Reply