प्लँट लायब्ररी – Plant Library

प्लँट लायब्ररी (Plant Library) म्हणजे वनस्पति-संग्रहालय – वनस्पत्यालय. ज्याप्रमाणे ग्रंथालय निरनिराळ्या पुस्तकांसाठी, ग्रंथांसाठी असते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींसाठी प्लँट लायब्ररी असते. प्लँट लायब्ररी म्हणजे केवळ वनस्पति-संग्रहालय नव्हे तर ते एक खरेखुरे जिवंत प्रदर्शनच म्हणावे लागेल.

आपल्या देशातील जवळ जवळ 50 टक्के लोक शहरांत राहत आहेत आणि हे सर्वजण निसर्गाला दुरावले आहेत. निरनिराळ्या वनस्पती हा निसर्गाचा एक अविभाज्य असा महत्त्वाचा घटक आहे. प्लँट लायब्ररीच्या माध्यमातून निसर्ग आणि शहरी माणूस यांच्यात जवळीक निर्माण होऊ शकते.

प्रस्तुत प्लँट लायब्ररी Plant Library या लेखात आपणास प्लँट लायब्ररी म्हणजे काय? प्लँट लायब्ररीचे महत्त्व समजून घेता येईल. प्लँट लायब्ररीची स्थापना व प्रकार, प्लँट लायब्ररीची निगा आणि प्लँट लायब्ररीचे फायदे यांबाबत माहिती मिळेल व त्यांची निगा राखता येईल.

प्लँट लायब्ररीचे महत्त्व (Importance of Plant Library)

आजकाल शहरे वाढत आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळ जवळ निम्मे लोक शहरांत राहत आहेत. शहरात अनेक सुखसोयी असल्या तरी शहरी लोक निसर्गाला दुरावत चालले आहेत. निरनिराळ्या वनस्पती, शोभेची झाडे, फुलझाडे हे निसर्गाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या मनास आणि शरीरास आनंद देण्यात यांचा मोठा सहभाग असतो. याचबरोबर वनस्पती प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत करतात. व्यक्तिगत आणि सार्वजनिकरित्या प्लँट लायब्ररीचा उपयोग होतो.

प्लँट लायब्ररीची स्थापना (Establishment of plant library)

प्लँट लायब्ररीची स्थापना करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. पहिली बाब म्हणजे कालावधी. किती कालावधी असावा यास काही निर्बंध नाही. तथापि, हंगामी स्वरूपात अथवा बारमाही किंवा कायम स्वरूपात अशी लायब्ररी स्थापन करता येईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लायब्ररीचे ठिकाण निवडणे ही होय.

ठिकाण असे असावे की तेथे सहजपणे जाता-येता आले पाहिजे. ते आडवळणी अथवा दूर नसावे. इतर जीवनोपयोगी वस्तू जेथे मिळतात तेथे किंवा जवळपासचे ठिकाण असावे. तिसरी बाब म्हणजे प्लँट लायब्ररीने लोकांच्या गरजा भागविल्या पाहिजेत. गरजेप्रमाणे आवड-निवड सांभाळली गेली पाहिजे.

चौथी बाब म्हणजे लायब्ररीतील वनस्पती, झाडे, कुंड्या या हाताळताना सोपे गेले पाहिजे. त्यांची निगा राखणे सहजपणे जमले पाहिजे. पाचवी बाब म्हणजे लायब्ररीचा सहभाग अथवा उपभोग रास्त किमतीत घेता आला पाहिजे. या पाच प्रमुख बाबींव्यतिरिक्त स्थानिकरित्याही काही बाबी असू शकतात.

प्लँट लायब्ररीचे प्रकार (Types of Plant Libraries)

सोयीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे प्लँट लायब्ररीचे ढोबळ असे दोन प्रकार आहेत. एका प्रकारात प्लँट लायब्ररीची सेवा ही ग्राहकाने उपलब्ध करून घ्यावी लागते तर दुसऱ्या प्रकारात ही सेवा ग्राहकांना घरपोच पुरविली जाते. काही वेळा या दोन्ही प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकते.

प्लँट लायब्ररी इतर लायब्ररींबरोबर चालविण्याचाही एक प्रकार रूढ होत आहे. जसे दूध, वर्तमानपत्रे, भाजीपाला, फळे, पुस्तके यांच्या बरोबरीने प्लँट लायब्ररी चालविता येते. सोयी आणि मागणीप्रमाणे लायब्ररीची वेळ ठरवावी. तसेच ग्राहकांना घरपोच पुरवठा करण्यासाठीही वेळ, दिवस ठरवून दिला जातो.

प्लँट लायब्ररी उपप्रकार (Plant library subtype)

(अ) नैसर्गिक शोभिवंत झाडांच्या कुंड्या, (आ) फुलदाणी अथवा फुले, (इ) कृत्रिम फुले / झाडे – यांत कागदी अगर प्लास्टिकची पाने-फुले यांचा समावेश होतो. फुलझाडांमध्येही काही ठरावीक प्रकारच्या फुलझाडांना अधिक मागणी असते. गुलाब, कॅक्टस, बोन्साय, इत्यादी प्रकारही ठेवता येतात.

प्लँट लायब्ररीची निगा (Plant library care)

ही लायब्ररी सजीव आणि कमी टिकाऊ असते, तसेच तिचा वापर हा अधिक काळासाठी अपेक्षित नसतो. पुस्तके-मासिके, वर्तमानपत्रे, सांभाळणे जसे सोपे असते तसे हे काम सोपे नसते. प्लँट लायब्ररीत कुंड्या, झाडे ठेवण्यास मोकळी, उजेडाची जागा हवी असते.

दूध, भाज्या, इत्यादी रोजचे रोज वापरले जाते तसे या लायब्ररीतील वनस्पतींचे नसते. वनस्पतींची वाढ होत असते. त्यासाठी त्यांना खतपाण्याची गरज असते. त्यांवर रोगराई, कीड पडते. प्रखर सूर्यप्रकाश, ऊन, सततची सावली यांपासून संरक्षण करण्याची जरुरी असते.

याबद्दलची माहिती प्लँट लायब्ररी चालकास / मालकास असणे आवश्यक असते. याबद्दलची माहिती निदान काही बाबींसंबंधी ग्राहकास देणेही उपयोगी पडते. प्रत्येक ग्राहकास त्यांची आवडनिवड ओळखून ती पुरविता आली पाहिजे.

तसेच फक्त एकाच प्रकारच्या वनस्पती न पुरवता त्यांत सांगड घालता आली पाहिजे. प्लँट लायब्ररीमधील सर्व प्रकार निरोगी आणि तजेलदार असले पाहिजेत. त्यांचे योग्य प्रकारे हार्डनिंग केलेले असावे. कुंड्या या आकर्षक, हलक्या आणि झाडांशी सुसंगत असाव्यात. कुंड्यांची बदलणी ठरावीक काळात केली पाहिजे. कुंड्यांमुळे ग्राहकांना अडगळ वाटता कामा नये.

प्लँट लायब्ररीची घ्यावयाची काळजी

  1. कुंड्यांत अनावश्यक गर्दी टाळावी.
  2. कुंड्यांना अधिक पाणी देऊ नये; मोजके पण ठरावीक वेळेला पाणी द्यावे.
  3. रोपांना नियमितपणे खते द्यावीत. खत-पाणी पुरविणाऱ्या कुंड्या व त्यांचे तंत्र आता विकसित झाले आहे, त्याचा वापर करावा.
  4. कुंड्यांतील रोपांना वळण आणि आधार द्यावा.
  5. कुंडीतील रोपांचे निकामी भाग, मोडलेला शेंडा, फाटलेली पाने वेळेवर काढावीत.
  6. कुंड्यांतील रोपांच्या योग्य वाढीसाठी संजीवकांचा यथोचित वापर करावा.

प्लँट लायब्ररीचे फायदे (Benefits of Plant Library)

  1. निसर्गाचा सहवास, प्रदूषणावर मात करण्यासाठी प्लँट लायब्ररी फायदेशीर ठरत आहे.
  2. इतर पद्धतीच्या तुलनेत प्लँट लायब्ररीद्वारे रोपांची योग्य देखभाल करता येते.
  3. निरनिराळ्या वनस्पती, शोभेची झाडे, फुलझाडे हे निसर्गाचा अविभाज्य यातून मिळते.
  4. माणसाच्या मनास आणि शरीरास आनंद देण्यात यांचा मोठा सहभाग असतो.
  5. वनस्पती प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यास चांगली मदत करते.
  6. मानवाला व्यक्तिगत आणि सार्वजनिकरित्या प्लँट लायब्ररीचा उपयोग होतो.

सद्य:स्थितीला पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्लँट लायब्ररी Plant Library ची गरज महत्त्वाची आहे. आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे शहरवासी निसर्गापासून दुरावत जात आहेत. निसर्गाचा सहवास, प्रदूषणावर मात ही आजची गरज झालेली आहे. ही गरज भागविण्यासाठी प्लँट लायब्ररी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक आहे.

प्लँट लायब्ररीचे ठिकाण आणि विस्तार हे ग्राहकाच्या सोयीचे असले पाहिजे. प्लँट लायब्ररी चालकास तसेच प्लँट लायब्ररीच्या ग्राहकास, प्लँट लायब्ररीची निगा सांभाळण्यासंबंधी थोडीफार तरी माहिती असावी लागते. ती पुरवणे महत्त्वाचे आहे. प्लँट लायब्ररी हाताळणी – बदलणे सुटसुटीत व आनंददामयी असावे.  

प्लँट लायब्ररी Plant Library हा लेख आपणास आवडला असला त्यास लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. तसेच Latest Article Update करिता www.agrimoderntech.in वेबसाईटला सब्सक्राईब करून Web Push Notification बटन Allow करावे.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

 

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading