कोथिंबीर उत्पादन तंत्रज्ञान

कोथिंबीर हे कमी कालावधीत व कमी उत्पादन खर्चात येणारे महत्त्वाचे पीक आहे. कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्वच राज्यांत व्यापारी तत्त्वावर केली जाते.

कोथिंबिरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबिरीला वर्षभर सर्वत्र मागणी असते; मात्र कोथिंबिरीची लागवड प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीला चांगला वाव आहे.

कोथिंबीर हे पीक इतर हंगामी पिकांच्या तुलनेत कमी वेळेत व अधिक उत्पादन देणारे पीक असून यासाठी कमीत कमी उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारशे आर्थिक नुकसान होत नाही उलट कमी वेळेत अधिक नफा या पिकापासून मिळतो.

वर्षभर केव्हाही कोथिंबीर पिकाची लागवड करता येते. महाराष्ट्रात प्रामुख्याने खरीप व रब्बी विशेषत: उन्हाळी हंगामात कोथिंबीरची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जात असून यापासून किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकरी बांधव कोथिंबीर ‍पिकाकडे आकर्षित झालेले आहेत.

कोथिंबीर महत्त्व

कोथिंबीर ही रोजच्या आहारातील वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी आहे. कोथिंबिरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांमुळे इतर भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी शाकाहारी तसेच मासांहारी पदार्थांमध्ये कोथिंबिरीचा सर्रास वापर करण्यात येतो. कोथिंबिरीमुळे पदार्थाला लज्जत येऊन पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतात. कोथिंबिरीचा भाजी म्हणूनही उपयोग करतात. कोथिंबिरीच्या वड्या, चटणी अणि कोशिंबीर लोकप्रिय आहे.

हवामान व जमीन

कोथिंबिरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. त्यामुळे अती पावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड करता येते. उन्हाळ्यात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते. कोथिंबिरीच्या पिकासाठी मध्यम, कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक चांगले येते.

कोशिंबीरीचे उन्नत वाण

कोशिंबीरी पिकाचे वाणनंबर ६५ टी, ५३६५ एनपीजे, १६ व्‍ही, १ व्‍ही २, को-१, डी-९२, डी-९४ जे २१४ व के ४५ या कोथिंबीरीच्‍या स्‍थानिक आणि सुधारित जाती आहेत. तसेच वैशाली, जीसी- १, २, ३, दापोली या जाती देखील आहेत. तसेच आंध्र प्रदेशातील लाम येथील संशोधन केंद्र, ग्वाल्हेर येथील संशोधन केंद्र, तामिळनाडू कृषी विद्यापीठ आणि राजस्थानातील सुखाडिया विद्यापीठ येथील संशोधनातून कोथिंबिरीच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत :

1) लाम सी.एस.-4 (साधना) : ही जात उंच वाढणारी, भरपूर फांद्या आणि पाने असलेली आणि झुडूपवजा वाढणारी आहे. ह्या जातीची मुख्य काडी रंगीत असते. ही जात रोग आणि किडींना प्रतिकारक आहे. बियाण्यासाठी चांगल्या असणाऱ्या या जातीचे हेक्टरी 1,000-1,100 किलो उत्पादन मिळते.

2) लाम एस.एस.-6 : ही जात झुडूपवजा वाढणारी, भरपूर फांद्या असलेली आणि मध्यम उंचीची आहे. ह्या जातीची मुख्य काडी रंगीत असते. ही जात भुरी रोगास प्रतिकारक आहे.

3) व्ही.-1 व व्ही.-2 : या कटवान पद्धतीच्या जाती असून त्यांपासून 3-4 खोडवे मिळत असल्यामुळे या जाती लोकप्रिय आहेत.

4) को-1: ही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात कोथिंबीर आणि धन्यांसाठी चांगली आहे. या जातीचे 40 दिवसांत हेक्टरी 10 टन कोथिंबिरीचे उत्पादन मिळते. तर बियाण्याचे 110 दिवसांत 500 किलो उत्पादन मिळते.

5) पंत हरित्मा : पंतनगर येथे विकसित झालेल्या या वाणापासून हेक्टरी 125 – 140 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते, पाने मुलायम, सुवासिक, आकर्षक हिरव्या रंगाची, उंच वाढणारी 140-150 सेंमी., 8-9 फांद्या, बियाणे लहान आकाराचे, जांभळ्या रंगाचे, फांद्यांवर जांभळ्या छटा. प्रत्येक झाडावर 40-50 फुलांचे गुच्छ असतात. स्टेम गॉल ह्या रोगास प्रतिकारक. 155 – 160 दिवसांत हा वाण तयार होतो. याशिवाय कोथिंबिरीचे आरसीआर – 41, गुजरात 1, गुजरात 2 हे राजस्थान आणि गुजरातमध्ये घेतले जाणारे प्रचलित वाण आहेत.

लागवडीचा हंगाम आणि बियाण्याचे प्रमाण

कोथिंबिरीची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. कोथिंबिरीच्या लागवडीसाठी हेक्टरी 60-80 किलो बी लागते.

लागवड पद्धती

कोथिंबिरीच्या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरून चांगले भुसभुशीत करून 3 X 2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत. प्रत्येक वाफ्यात 8-10 किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्यावे. वाफ्यात बी सारखे पडेल या बेताने फोकून पेरावे. बी खत-मातीने झाकून हलके पाणी द्यावे.

तणाचा प्रादुर्भाव जास्त होत असल्यास सपाट वाफ्यांमध्ये 15-20 सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्यावे आणि वाफसा तयार झाल्यावर बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी धणे फोडून बिया वेगळ्या कराव्या लागतात. यासाठी धणे चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे.

पेरणीपूर्वी धण्याचे बी 12 तास पाण्यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्यामुळे उगवण 15-20 दिवसांऐवजी 8-10 दिवसांत होऊन कोथिंबिरीच्या उत्पादनात वाढ होते आणि काढणी लवकर होण्यास मदत होते. टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फुलकोबी, इत्यादी पिकांमध्ये कोथिंबीर आंतरपीक म्हणून घेता येते.

खत व पाणी व्यवस्थापन

कोथिंबिरीच्या पिकाच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्टरी 35-40 गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबिरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15:5:5 हे मिश्रखत द्यावे. बी उगवून आल्यावर 20-25 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीचा खोडवा घ्यावयाचा असल्यास कापणीनंतर हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे. अधिक उत्पादन घेण्यासाठी 3 X 2 मीटर आकाराच्या वाफ्यात 130 ग्रॅम युरिया दोन ओळींमध्ये देऊन मातीने झाकून पाणी दिल्यास, बी उगवून आल्यावर 20-25 दिवसांनी दर 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम युरिया ह्या प्रमाणात मिसळून 2 वेळा फवारणी केल्यास, पीक 30-35 दिवसांत काढणीस येते आणि भरपूर कोवळी लुसलुशीत पाने येऊन उत्पादन वाढते.

कोथिंबिरीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोथिंबिरीच्या पिकाला उन्हाळी हंगामात दर 6 – 7 दिवसांनी आणि हिवाळी हंगामात 10 -12 दिवसांनी पाणी द्यावे. सुरुवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे. त्यामुळे बी वाहून एकत्र न होता सारखे राहून उगवण चागंली होते.

महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण

कोथिंबिरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाहीत. काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळी त्याच जमिनीत सतत कोथिंबिरीचे पीक घेण्याचे टाळावे, प्रतिकारक जातींचा वापर करावा आणि स्वच्छता राखावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लाम.सी.एस.-6 सारख्या भुरी प्रतिबंधक जातीचा वापर करावा आणि पाण्यात विरघळणारे गंधक फवारावे. मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून फवारावे. काढणीच्या 8-10 दिवस अगोदर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये.

काढणी : उत्पादन व विक्री

पेरणीपासून 2 महिन्यांनी कोथिंबिरीला फुले येण्यास सुरुवात होते; म्हणून त्यापूर्वीच हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी. साधारणपणे 15-20 सेंटिमीटर उंच वाढलेली, परंतु फुले येणारी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी. नंतर कोथिंबिरीच्या जुड्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये व्यवस्थित रचून अथवा गाडीत योग्य प्रकारे रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. पावसाळी आणि हिवाळी हंगामात कोथिंबिरीचे हेक्टरी 10- 15 टन उत्पादन मिळते. तर उन्हाळी हंगामात 6 -8 टन उत्पादन मिळते.

कोथिंबीर लागवड केल्यामुळे होणारे फायदे :

  1. कमी कालावधीत व कमी श्रमात चांगले उत्पादन मिळते.
  2. कोथिंबीर हे कमीत उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न मिळते.
  3. वर्षभर कोथिंबीरला बाजारात चांगली मागणी असते.
  4. कोथिंबीर हे इतर पिकांच्या तुलनेत जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पर्यायी पीक आहे.

कोथिंबीर उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख
तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

विशेष संदर्भ :

  1. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग- 2, य.च.म.मु.वि., नाशिक
  2. PDF E-BOOK : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

इतर पॉप्युलर लेख

कमी खर्चाचे शेवगा लागवड तंत्र

टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र

दर्जेदार आले उत्पादन तंत्रज्ञान

दर्जेदार चवळी – गवार उत्पादनाचे तंत्र

बटाटा लागवडीची पूर्व तयारी

बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान

भेंडी लागवड तंत्रज्ञान

रब्बी हंगामातील कांदा लागवड

शेडनेटगृहातील ढोबळी मिरची लागवड तंत्र

हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान

झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान

Prajwal Digital

Leave a Reply