धिंगरी अळिंबी – फायदेशीर पूरक व्यवसाय

धिंगरी अळिंबी हे महत्त्वाचे व्यापारी तत्त्वावर लागवड केले जाणारे पीक असून अळिंबीचा उपयोग दैनंदिन आहारात भाजी म्हणून केला जात आहे. उत्पादीत अळिंबीपासून निरनिराळे  प्रक्रियायुक्त पदार्थ करून त्याची व्यापारी तत्त्वावर विक्री केली जाते. म्हणून धिंगरी अळिंबी एक फायदेशीर पूरक व्यवसाय अलीकडच्या काळात पुढे येत आहे.  

धिंगरी अळिंबीची लागवड अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने केली जाते. ऊन, वारा व पावसपासून निवाऱ्याची जागा असली म्हणजे साध्या झोपडीतदेखील धिंगरी अळिंबीची लागवड उत्तम करता  येते. शिवाय 20 ते 22 दिवसांत अळिंबीच्या उत्पन्नाची सुरुवात होते. त्यामुळे अळिंबीच्या लागवडीस फारसा खर्चदेखील येत नाही. म्हणूनच धिंगरी अळिंबी लागवड शेतकरी बांधवांना करणे शक्य आहे.

अळिंबी उत्पादन

सरकारच्या आकडेवारीनुसार 2013-14 मध्ये भारतात अळिंबीचे 17,100 मेट्रिक टन मशरूम तयार झाले होते आणि सन 2018 पर्यंत ही संख्या 4,87,000 मेट्रिक टन (चार वर्षात सुमारे २ फोल्ड पट वाढ) झाली. तरीही जगातील मशरूम उत्पादनापैकी केवळ 2% भारताचा वाटा आहे, कारण सिंहाचा वाटा चीन देशाचा असून जागतिक स्तरावरील अळिंबी उत्पादनात 75% इतका हिस्सा आहे.

भारतातील उत्तर प्रदेश हे अळिंबी उत्पादनात अव्वल क्रमांकावर आहे, परंतु अळिंबीचा दैनंदिन आहारात वापर अजूनही कमी आहे हेच प्रमाण पाहिले तर अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत प्रति व्यक्ती 30 ग्रॅम (प्रति व्यक्ती 2 किलो -3 किलो) असून यात एक मोठी संधी आहे.

अळिंबी लागवडीसाठी साहित्य

अळिंबीची लागवड करण्यासाठी पुढील चार वस्तूंची आवश्यकता असते. (1) भाताचा पेंढा, गव्हाचे काड, उसाचे पाचट अशा प्रकारचे वनस्पतीचे भाग, (2) स्पॉन (अळिंबीचे बी), (3) हरभरा डाळीचे पीठ, (4) 35 X 50 सेंमी. किंवा 45 X 75 सेंमी. आकाराची पॉलिथीन पिशवी.

धिंगरी अळिंबी लागवड

दीड ते दोन किलो भाताचे किंवा गव्हाचे काड घेऊन त्याचे 3 ते 5 सेंमी. लांबीचे तुकडे करावेत. प्रथम ते कापडी पिशवी अगर पोत्यामध्ये भरून आठ ते दहा तास थंड पाण्यात भिजत ठेवावे. काड पाण्यातून काढून चांगले निथळू द्यावे.

त्यानंतर हे काड 80° ते 90° सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात 20 मिनिटे बुडवावे. त्यानंतर किमान दोन ते तीन तास पाणी निथळण्यासाठी पाण्याच्या बाहेर काढून ठेवावे. जरुरीप्रमाणे पॉलिथिनची पिशवी घेऊन तिचा पातळ भाग लहान घड्या करून दोऱ्याने घट्ट बांधावा. ही पिशवी निर्जंतूक करण्यासाठी कढत पाण्यात अगर दोन टक्के फॉरमॅलीनमध्ये बुडवून घ्यावी.

अळिंबीची लागवड ज्या खोलीत करावयाची आहे ती खोली दोन टक्के फॉरमॅलीनच्या द्रावणाने निर्जंतूक करावी. पिशवी भरण्यासाठी शक्यतो बंदिस्त जागेची निवड करावी.

पिशवीच्या तळाशी डाळीचे पीठ व स्पॉन मिसळलेल्या काडाचे एकावर एक असे चार इंच जाडीचे चार ते पाच थर देऊन काड भरत असताना ते तळहाताने हलकेसे दाबावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या 2 टक्के म्हणजे 200 ग्रॅम स्पॉन 10 किलो काडास व डाळीचे पीठ 1 टक्का ठेवावे. उच्च दर्जाचे स्पॉन हे कोणत्याही मान्यवर संस्थेकडून घ्यावे.  

पिशवी भरल्यानंतर तिचे तोंड घट्ट बांधावे. अळिंबीच्या वाढीस साधारणपणे अनुकूल तापमान 20 ते 30° सेल्सिअस व हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के असल्यास बुरशीची वाढ 12 ते 15 दिवसांत पूर्ण होते. त्यानंतर पॉलिथीन पिशवी लांबीच्या बाजूने ब्लेडने सरळ रेषेत कापून अलग करावी. बुरशीच्या वाढीमुळे काड घट्ट होते व त्याचा लंबगोलाकार कायम राहतो. अशा बेडवर त्यापुढे दिवसातून 1 ते 2 वेळा जरुरीप्रमाणे दररोज पाणी फवारावे. लागवडीच्या जागेत पाणी शिंपडून आर्द्रता 80 टक्क्यांपर्यंत राहील याची काळजी घ्यावी.

पॉलिथीनचे आवरण काढल्यापासून साधारणपणे तीन दिवसांत बेडच्या सर्व बाजूंनी अळिंबीचे कोंब निघू लागतात. या कोंबाची पुढे दोन-तीन दिवसांत संपूर्ण वाढ होते व सर्व बाजूंनी बेडवर अळिंबीची फळे दिसू लागतात.

पूर्ण वाढलेली धिंगरी अळिंबी शिंपल्याच्या आकाराची, पिवळसर पांढऱ्या अथवा करड्या रंगाची असून तिचा देठ इतर अळिंबीच्या मानाने कमी लांबीचा असतो. या अळिंबीचा वरील पृष्ठभाग मऊ व सपाट असतो तर पाठीमागील भागावर दाट शिरा (गिल्स) असतात. पूर्ण वाढ झालेली धिंगरी अळिंबी तळहाताएवढी मोठी असू
शकते.

अळिंबी काढण्यापूर्वी 4 ते 6 तास बेडवर पाणी शिंपडू नये. पूर्ण वाढ झालेली अळिंबी कात्रीने देठ कापून काढावी.

अळिंबीची निगा व उत्पन्न

अळिंबीचे एक पीक घेण्यास सुमारे 40 ते 45 दिवस लागतात. बेड पिशवीतून काढल्यानंतर अळिंबीचे पीक सुमारे 30 ते 40 दिवसांत चार वेळा बहरते. पहिला तोडा बेड भरल्यानंतर 20 ते 22 दिवसानंतर मिळतो. (म्हणजेच प्लॅस्टिकच्या पिशवीतून बाहेर काढल्यावर 5 ते 6 दिवसांनी) त्यानंतर दुसरे पीक 8 ते 10 दिवसांनी व नंतरची पिके 8 ते 10 दिवसांच्या अंतराने येतात.

एक महिन्यात चार पिकांपासून मिळणाऱ्या अळिंबीचे वजन हे कोरड्या काडाच्या वजनाच्या 40 ते 80 टक्के इतके असू शकते. पहिल्या दोन तोड्यांपासून जवळ जवळ 80 टक्के उत्पन्न मिळते व नंतर उत्पन्न घटते. योग्य तापमान व आर्द्रता राखल्यास व योग्य काळजी घेतल्यास उत्पन्न यापेक्षाही जास्त मिळू शकते. काढलेली ताजी अळिंबी 200 ग्रॅम वजनाची प्लॅस्टिकची भोके पाडलेल्या पिशवीत भरून ताबडतोब विक्रीसाठी पाठवतात.

धिंगरी  अळिंबी वाळविता येते. साध्या उन्हात ठेवून 2 ते 3 दिवसांत किंवा उष्ण पेटीत (ओव्हनमध्ये) 50°
सेल्सिअस तापमानात 5 ते 6 तास ठेवून वाळवावी. वाळविलेली अळिंबी हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीत बरेच दिवसांपर्यंत ठेवता येते व गरजेनुसार केव्हाही वापरता येते. पुन्हा वापरण्यापूर्वी थोडा वेळ कोमट पाण्यात भिजविल्यास अळिंबी फुलतात व ती परत वापरता येतात. अळिंबीपासून आपल्या चवीनुसार वेगवेगळे पदार्थ करता येतात. वाळविलेल्या अळिंबीसदेखील चांगली मागणी आहे.

भाताच्या काडावर वाढणारी अळिंबी

भाताच्या काडावर वाढणाऱ्या (पॅडी स्ट्रॉ मशरूम) या अळिंबीच्या दोन जातींची (व्हलवेरिएल्ला व्हलवेसिया व व्हलवेरिएल्ला डिप्लेसिया) भारतात लागवड केली जाते. सर्वप्रथम कोईमतूर येथे या अळिंबीची लागवड करण्यात आली. या अळिंबीच्या लागवडीस 30° ते 40° सेल्सिअस तापमान पोषक असल्याने भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात अळिंबीची लागवड करता येते.

या अळिंबीचे एक पीक 30 ते 35 दिवसांत निघत असल्याने वरील कालावधीत अनेक पिके घेता येतात. या अळिंबीच्या लागवडीचे तंत्र सोपे असून त्यास फारसे तांत्रिक ज्ञान व भांडवली खर्च लागत नाही. अळिंबीच्या लागवडीसाठी पूर्वतयारी हाताने मळणी केलेला, ताजा व वाळलेला भाताचा पेंढा घेऊन अंदाजे एक किलो वजनाच्या व 20 सेंमी. व्यासाच्या पेंढ्या बांधाव्यात.

या पेंढ्या हौद किंवा पिंपात स्वच्छ पाण्यात बारा तास भिजत ठेवाव्यात. भाताच्या पेंढ्यांचा बेड म्हणजेच ढीग रचणे लाकडी किंवा सिमेंटच्या चबुतऱ्यावर भाताच्या पेंढ्याचा थर द्यावा. प्रत्येक थरात चार पेंढ्या, बुडके एका बाजूस ठेवून अंथराव्यात. बुडके विरुद्ध बाजूस करून चार पेंढ्यांचा दुसरा थर द्यावा. याप्रमाणे 32 पेंढ्यांचे आठ थर करावेत. किंवा आठ पेंढ्यांचे चार थर करावेत. परंतु ढिगाचा आकार 90 X 90 X 120 सेंमी. पेक्षा मोठा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

स्पॉनची (बी) पेरणी

पेंढ्याचा ढीग रचतानाच स्पॉन (बी) पेरण्यात येते. सर्वसाधारणपणे 1 किलो पेंढ्यासाठी 15 ते 20 ग्रॅम स्पॉन पुरेसे होते. प्रत्येक थरामध्ये 10 ते 15 सेंमी. अंतरावर ओळीमध्ये स्पॉन टाकावे. कडेच्या 10 ते 15 सेंमी. आतपर्यंत चौफेर स्पॉन टाकू नये. त्याचप्रमाणे वरच्या थराच्या पृष्ठभागावरदेखील स्पॉन टाकू नये.

स्पॉन पेरल्यावर त्यावर तूर किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकावे. एका ढिगासाठी अंदाजे 200 ग्रॅम पीठ वापरावे. ताजे आणि उच्च दर्जाचे स्पॉन (बी) वापरावे. हवेतील आर्द्रता व तापमान कमी असल्यास ढिगावर
पॉलिथीनचा कागद ठेवावा. कागद पेंढ्यास चिकटणार नाही अशा प्रकारे ठेवावे. हवेत आर्द्रता कमी असेल व ढीग झाकला नसेल तर त्यावर मधूनमधून पाण्याची हलकी फवारणी करावी.

अळिंबीची काढणी

  1. स्पॉन (बी) पेरल्यानंतर भाताच्या पेढ्यांमधून अळिंबी उगवू लागतात. 30 ते 35 अंश सेल्सिअस
    तापमानात
    8 ते 10 दिवसांत पॉलिथीनचा कागद काढून टाकावा.
  2. त्यानंतर लहान लहान अळिंबी ढीगाच्या सर्व बाजूंनी निघू लागलेली दिसतात, त्यांची जलदगतीने वाढ होऊन ती अंड्याच्या आकाराची होतात. अळिंबी छत्रीसारखी उघडण्यापूर्वी म्हणजेच बंद अवस्थेत असताना काढावी.
  3. पिकाची वाढ चालू असताना पाण्याची हलकी फवारणी करावी. म्हणजे ढिगामधील काड वाळणार नाही. सर्वसामान्यपणे 25 ते 30 दिवसांत अळिंबीची दोन वेळा काढणी करावी.
  4. अळिंबी काढताना हळूवारपणे काढावी, तसेच शेजारील लहान अळिंबीस इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  5. एका ढिगापासून अळिंबीचे सरासरी 2 ते 3 किलो उत्पन्न मिळते.

अळिंबीचा वापर व विक्री

ही आळिंबी काढल्यानंतर जास्त वेळ टिकत नाही; त्यामुळे शक्य तितक्या लवकर वापरावी किंवा सच्छिद्र पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये 200 ग्रॅम वजनाची पाकिटे भरून विक्रीस पाठवावीत. ही अळिंबी उन्हात किंवा ओव्हनमध्ये वाळविता येते.

धिंगरी अळिंबी लागवड केल्यामुळे होणारे फायदे

  1. धिंगरी अळिंबी हा ग्रामीण भागातील  महत्‍त्‍वाचा शेतीला पूरक व्यवसाय आहे.
  2. अळिंबी निर्मितीला शेतातील पिकांचे अवशेषांचा (भाताचे काड, पाला-पाचोळा, गुळी) चांगला उपयोग होतो.
  3. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अळिंबी हे अतिशय फायदेशीर ठरत आहे.
  4. बारामाही धिंगरी अळिंबीला चांगला बाजारभाव मिळतो.
  5. धिंगरी अळिंबी उत्पादनाला पंचतारांकित हॉटेल्समध्ये वर्षभर खूप मागणी असते.
  6. धिंगरी अळिंबी पासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते.
  7. अळिंबी उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होते.

 विशेष संदर्भ :

  1. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-2 : पाठ्यपुस्तिका-2, पृ.क्र. 53-69
  2. ई-बुक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  3. https://ycmou.ac.in/ebooks

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर  वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

धिंगरी अळिंबी – फायदेशीर पूरक व्यवसाय हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. 

पॉप्युलर लेख

अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्र

आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड

कोरडवाहू शेतीDryland Farming

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्र

बांबू लागवडBamboo lagwad

बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

1 thought on “धिंगरी अळिंबी – फायदेशीर पूरक व्यवसाय”

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading