गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन हे व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची फुले असून त्यांचे उत्पादन देशात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळेच फुलांची हाताळणी हा घटक फुले उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो.
दर्जेदार फुलशेतीपासून उत्पन्न घ्यावयाचे असल्यास फुलांची हाताळणी योग्य पद्धतीने करणे नितांत गरजेचे असते. अयोग्य हाताळणीमुळे फुलांचे, फळांच्या आणि भाजीपाल्याच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात नुकसान होते. फुले योग्य प्रकारे हाताळली नाहीत तर फुलशेतीपासून पूर्ण आर्थिक मोबदला मिळत नाही. ज्याप्रमाणे फळांची आणि भाजीपाल्यांची प्रतवारी करून विक्री केली जाते त्याप्रमाणे फुलेसुद्धा प्रतवारी करून, योग्य पॅकिंग करून बाजारात पाठविली पाहिजेत.
फुलांची हाताळणी म्हणजे काय?
एका विशिष्ट आकाराची व एकसमान असणारी फुलांची निवड करणे म्हणजेच फुलांची हाताळणी होय.
फुलांची हाताळणी
फुलांचे काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी फुले काढल्यानंतर त्यांचे पॅकिंग होईपर्यंत योग्यरित्या, काळजीपूर्वक हाताळणे महत्त्वाचे असते. फुलांची हाताळणी, साठवण स्थिती (प्रकाश, तापमान, वातावरण) फुलांना पाणी देणे, अन्नघटकांचा पुरवठा, संरक्षकद्रव्ये, आणि रोग व किडींचा प्रादुर्भाव हे काढणीपूर्वीचे घटक फुलांच्या पुढील आयुष्यावर परिणाम करतात. फुलांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि फुले लवकर खराब होत असल्यामुळे फुलांची हाताळणी करताना फुलांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. फुलांची वाहतूक करताना फुलांना व्यवस्थित पॅकिंग, संरक्षण आणि कुशनिंग करावे.
अ) साठवण स्थिती
फुलांच्या साठवणीत फुलांभोवती असलेले तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि प्रकाश यांवर फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य आणि गुणवत्ता अवलंबून असते. कमी तापमानात फुलांची साठवण केल्यास श्वासोच्छ्वासाचा वेग कमी राहतो आणि त्यामुळे फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य वाढते.
कार्नेशनची फुले 0 अंश सेल्सिअस तापमानाला 14 दिवस ठेवून बाहेर काढल्यानंतर 7 दिवस व्यवस्थित टिकतात; परंतु तीच फुले 5 अंश सेल्सिअस तापमानाला 14 दिवस साठविली असता बाहेर काढल्यानंतर ती फक्त 2 दिवस टिकतात. कमी तापमानामुळे इथिलीन वायूच्या निर्मितीचा वेग कमी होतो. कमी तापमानाला रोगजंतूंची क्रिया किंवा किडीचे प्रमाण अत्यंत कमी होते. जास्त सापेक्ष आर्द्रतेला फुले साठविली असता फुले टवटवीत राहतात. कार्नेशन आणि इतर फुले 90 ते 98 % सापेक्ष आर्द्रतेला साठविली असता जास्त दिवस टिकतात. फुलांच्या काढणीनंतर फुलांचे तापमान लगेच 2 ते 5 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आणावे. अशा प्रकारे फुलातील उष्णता काढून घेतल्यामुळे फुलांचे आयुष्य वाढते.
ब) पाणी देणे
पाण्याची कमकरता किंवा जास्त पाणी दिल्यामुळेसुद्धा फुलांचे आयुष्य वाढविण्यावर अनिष्ट परिणाम होतो. वनस्पतीच्या पेशींमध्ये असणाऱ्या पाण्यात विरघळणाऱ्या क्षारांचे प्रमाण हे झाडाला मिळणाऱ्या किंवा फुलांमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. पाण्याचे प्रमाण 50 % कमी झाल्यास क्षारांचे प्रमाण दुप्पट होते. क्षारांचे प्रमाण वाढल्यास फुलांना इजा होण्याची क्षक्यता असते. तसेच क्षारांचे प्रमाण वाढल्यास पाने पिवळी पडणे किंवा त्यांवर डाग पडणे, जुनी पाने गळणे आणि मुळांची वाढ खुंटणे, इत्यादी क्रिया घडतात. त्यामुळे फुलझाडांना नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते.
क) फुलसंरक्षक रसायने
सुक्रोज आणि हायड्रॉक्सी क्यूनोलीन सल्फेट यांचे द्रावण फुलांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी वापरतात. सुक्रोजचे प्रमाण वाढविल्यास फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य वाढते. सर्वसाधारणपणे फुले टिकविण्यासाठी 1 ते 4 % सुक्रोज आणि 50 ते 200 पीपीएम हायड्रॉक्सी क्यूनोलीन सल्फेट ही दोन रसायने इतर घटकांबरोबर वापरतात.
संरक्षक द्रव्यांचा फुले टिकविण्यावर होणारा परिणाम हा पाण्याची आम्लता, पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण, देठाचा किती भाग पाण्यात बुडालेला आहे आणि देठ किती वेळ पाण्यात ठेवतो यांवर अवलंबून असतो. फुले बाहेर पाठविण्यापूर्वी सिल्व्हर नायट्रेट आणि प्लास्टिकच्या भांड्यांचा साठवणीसाठी वापर करणे योग्य ठरते.
ड) रोग आणि कीड किंवा फुलांवरील विकृती
फुलांमध्ये सूक्ष्म जिवाणू, बुरशी तसेच किडींच्या वाढीमुळे फुलांची प्रत खराब होते. अशा फुलांचे देठ बुरशी किंवा इतर रोगाने ग्रस्त असतील तर इथिलीन वायूच्या निर्मितीचा वेग वाढतो आणि त्यामुळे फुलांचा दर्जा कमी होतो. अनेक सूक्ष्म जिवाणू किंवा बुरशी खोडातील जलवाहिन्यांचा मार्ग बंद करतात. अशा फुलांना संरक्षक द्रव्यांबरोबर जंतुनाशक द्रव्यांचासुद्धा वापर करावा.
गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची काढणीनंतरची हाताळणी :
1) गुलाब :गुलाबाच्या फुलांची तोडणी केल्यानंतर प्रत्येक फुलाचा देठ खालच्या बाजूला पुन्हा दोन सेंटिमीटर इतका छाटावा. फुलांचा वापर लगेच करावयाचा नसल्यास फुले बादलीमध्ये देठ बुडविलेल्या अवस्थेत 4.4 अंश सेल्सिअस ते 7.2 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या शीतगृहात सहा ते बारा तास ठेवावीत. फुलांची हाताळणी करणे सोयीचे व्हावे म्हणून देठाच्या बुंध्याकडील 20 सेंटिमीटर भागातील पाने आणि काटे फुलांची तोडणी करतानाच काढून घ्यावेत.
2) ग्लॅडिओलस :ग्लॅडिओलसच्या फुलांचे तुरे तोडल्यानंतर लगेचच त्यांचे देठ पाण्यात बुडवून फुले शीतगृहात 6.11 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावीत. लवकर काढणी केलेल्या फुलांचे तुरे एक आठवडाभर साठवून ठेवावयाचे असल्यास ते शीतगृहात 2.3 ते 2.8 अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावेत.
वाहतुकीनंतर ग्लॅडिओलसच्या फुलांचे देठ त्वरित पाण्यात बुडवून ठेवतात. देठ पाण्यात बुडविण्यापूर्वी देठाच्या खालच्या बाजूस 2.5 सेंटिमीटरचा तिरपा छाट घ्यावा. कळ्या आणि संपूर्ण तुरा पूर्ण ताजे आणि टवटवीत होईपर्यंत देठ पाण्यात बुडवून सरळ उभे ठेवावेत.
फुलदाणीत ग्लॅडिओलसचे फुलदांडे ठेवल्यानंतर 10 ते 15 दिवस फुलदांड्यावरील कळ्या उमलत राहतात. तुऱ्याच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत दर दिवशी एक कळी उमलते आणि ती सर्वसाधारणपणे चार दिवस उमललेल्या अवस्थेत राहते. फुले जास्त काळ टिकावीत यासाठी फुलदाणीत परिरक्षक द्रावण म्हणून 5 % साखर आणि 200 पीपीएम 8-एचक्यूएस यांचा वापर करावा.
3) कार्नेशन :कार्नेशनच्या फुलांचे बंडल्स बांधल्यानंतर त्यांचे देठ खालच्या बाजूस 2 सेंटिमीटर इतके छाटावेत. नंतर फुलांचे देठ कोमट (37 अंश सेल्सिअस) आणि 4.5 सामू असलेल्या परिरक्षकाच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवावेत. अशी परिरक्षकाच्या द्रावणात बुडविलेली फुले 21 अंश सेल्सिअस तापमानास 2 ते 4 तास ठेवावीत. नंतर फुले शीतगृहात 0-2 अंश सेल्सिअस तापमानाला 12 ते 14 तास ठेवावीत.
फुलांची हाताळणी केल्यामुळे होणारे फायदे :
- फुलांची हाताळणी काढणीनंतर केल्यामुळे फुलांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखली जाते.
- फुलांची हाताळणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची फुलांची नासाडी होत नाही.
- ग्राहकांना बाजारात ताजी व उत्तम दर्जाची हाताळणी केलेले फुले मिळतात.
- फुलांची हाताळणी केल्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो.
विशेष संदर्भ :
- फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका- 1, पृ.क्र. 1-6
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (AGR-213-216)
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/
गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.
फुलशेती विषयी उपयुक्त लेख
फुले परिपक्व करण्याच्या पद्धती